बुधवार, ३ एप्रिल, २०१९

गीत रामायणाचा सोहळा.

*एक सोहळा,गीत रामायणाचा*.

‌     शिशीर संपल्या नंतर  वसंत ऋतूमध्ये सृष्टी  नव्याने बहरू लागते. सर्वत्र झाडाला फुटलेली नवी पालवी झाडांच्या  फांद्यांवर मोठ्या दिमाखात  उभी राहिलेली दिसते. तिचे हिरव्या पोपटी रंगाचे चकाकणारे तुरे, हवेच्या लहरींबरोबर आपली ईवलीली पानं नाचवत, त्यातून गोड हसत आहेत, असा भास निर्माण करतात. वैराग्य पत्करलेली त्याच झाडाची कांही  पानं  वानप्रस्थाश्रमात जाण्याच्या तयारीत असतात.  आपल्याच या नव्या चैतन्याच्या पिढीकडे कौतुकाने बघत हळूहळू गळून पडू लागतात.
          झाड  असू देत किंवा माणूस, सृष्टीचे हे निसर्ग चक्र कधी चुकलंयं का कुणाला? प्रत्येकजणच या चक्रावरचा एक बिंदू नक्की आहेच .फक्त प्रत्येकाच्या वेळेत तफावत असते एवढेच.
        तर हा वसंत आला बहराला की, मनाला चैत्राच्या गुढीचे, नववर्षाच्या  पहिल्या दिवसाचे, चैत्र शुद्ध प्रतिपदेचे स्वागत करण्याचे वेध लागतात. प्रतिपदेची  पहाट घेऊन येते असंख्य स्वप्नांना, अनेक उद्दिष्टांना भरपूर साऱ्या धैय्यांना आणि सोबतच चैतन्याच्या मंद नाजूक झुळकींना.
           नववर्षाच्या स्वागताचे मनसुबे पूर्ण होईस्तोवर, येते ती रामनवमी.तोवर चैत्रगौरी ला आंबट कैरीचे डोहाळे लागलेले असतात ना ! ते बरोबर आठवण करून देतातच येणाऱ्या  रामनवमीची.
       हाच तो दिवस, जो मनाला उल्हासित करत गदिमांच्या ओजस्वी तेजस्वी लेखणीतून, बाबुजींच्या मधुर वाणीतून आणि त्यांच्याच सप्तसूरां मधून साकारलेल्या नादमधुर झंकारातून उजाडणारा मंगल दिवस. या दिवशी माझाही दिवस सुरू होतो तो गीत रामायणाचे सर्व दहा भाग ऐकत त्यांचा भरभरुन आनंद घेण्या साठी. या संगीत व्दयींच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेले हे महाकाव्य ऐकणे म्हणजे,एक पर्वणीच असते.
             अगदी सात-आठ वर्षांची होते तेंव्हापासूनच मला गीतरामायण ऐकण्याची गोडी निर्माण झाली.मी खूप प्रेम करते या काव्या वर.                                                  माझ्या   लहानपणी, परभणीला, जिंतूर रोड शाखेच्या नुतन शाळेच्या हॉलमध्ये झालेल्या, बाबूजींच्या गीत रामायणाच्या लाईव्ह कार्यक्रम मी  ऐकला आणि तो कायमची जादू करवून गेला माझ्या मनावर. आणि एका छोट्याशा डायरीवर यांची सही घेतलेला प्रसंग आजही आठवतोय . रामनवमीच्या दिवशी हा संगीत नजराणा  ऐकणे म्हणजे खरोखरच एक  सोहळाच .अनुभव घेतल्याशिवाय कळायचाच नाही तो !
      ही महेफील ऐकताना संगतीला मस्त दहीधपाटे , वाटलेली कैरीची डाळ,  कैरीची चटणी आणि गारेग्गार  पन्ह! आणखी काय हवंय? मेजवानीला !
            गीतरामायणाच्या या उत्सवाची सुरुवातच होते मुळी, दोन सारख्याच वयाचे राजकुमार जे हुबेहूब श्रीरामांचे सजीव पुतळेच! कुश-लव हे जेव्हा आपल्या पित्याला त्यांचे चरित्र सांगतात त्यावेळी, गदिमांनी त्यासाठी बांधलेले शब्द,

" ज्योतीने तेजाची आरती"
   
     काय अप्रतिम उपमा आहे ! खरंच,संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा राहून डोळे भरून येतात. स्वरांची ही किलबिल ऐकून ऋतुराज वसंत ही भारावून जातो. सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या स्वरधुनीतून निघणारे हे सूर ऐकण्यासाठी प्रत्यक्ष आर्या सुद्धा यज्ञमंडपात उतरतात. आणि श्रोत्यांच्या बरोबर या बालकांच्या गोड स्वरांना दाद देतात.या बाळांच्या स्वरांमधून आपल्याच जीवनाचा पट ऐकून श्रीरामही गहिवरून जातात. जणूकाही या बाळांच्या मुखातून सामवेदच उच्चारला जातोयं. असे वाटते.भावना कल्लोळात भारावलेले राघव, आपले आसन सोडून बालकांना पोटाशी कवटाळतात. आपल्याच शैशवाला उराशी लावतात. असा हा पिता-पुत्रांच्या भेटीचा महोत्सव घडतो ! पण दोघांनाही याविषयी काहीच जाणीव नसते. गदिमा म्हणतात,

         "पुत्र भेटीचा घडे महोत्सव,
         परी तो उभया नच जाणती
            कुशलव रामायण गाती
              कुशलव रामायण गाती.."....

       केवळ अप्रतिमच  !!

© नंदिनी म. देशपांडे.

https://youtu.be/pWfZG7n5D_Q

🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा