शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

*संस्कार आणि शाळकरी मुले*

       " अगं निकिता, हॉल मध्ये बसलेल्या पाहुण्यांसाठी ट्रे मध्ये पाण्याचे ग्लास घेऊन जा बरं...."
       " निखिल, हॉल मध्ये विखूरलेल्या वस्तू आवरून जागेवर ठेऊन देशील तेवढ्या...."
        "अरे मुलांनो , काका काकू निघाले आहेत ना गावी जाण्यासाठी ,या त्यांना नमस्कार करा...."       किंवा
       "अरे वरद,क्लास पुर्ण करून येशील तेंव्हा,वेळ मिळेल तसे शेजारच्या आजींच्या घरी जाऊन त्यांना भेटून ये बरं का...तब्येत बरी नाहीए त्यांची,तुझी आठवण काढत होत्या आजी...."
       "अगं मैथिली,आज सुट्टी आहे ना तुला? मग चल आज माझ्या सोबत मंडईतून भाजी आणू या आपण ....."
        मुलांनो,वरील प्रकारचे संवाद दररोजच तुम्ही तुमच्या किंवा तुम्हा मित्र मैत्रिणींच्या आईबाबां कडनं दिवसातून एकदा तरी नक्कीच ऐकत असाल होय ना ? तुम्ही म्हणाल,त्यात काय एवढे? हे तर रोजचेच डायलॉग ! पण बरं का मुलांनो , घरातील मोठ्या माणसां कडून दिवसभरांत तुम्हाला आलेल्या अशा प्रकारच्या सुचनां मधून ही माणसे काही ना काही तरी शिकवत असतात नक्कीच. तुम्ही सुध्दा त्यातून कांही तरी शिकावे अशी त्यांचीही अपेक्षा असतेच.
     या सर्व  गोष्टी वर वर बघता,या तर खूपच सोप्प्या आहेत असे वाटतही असेल.पण,बर का,या सार्या गोष्टी,तुम्हाला मोठे झाल्या नंतर जेंव्हा समाजा मध्ये एक मोठी आणि यशस्वी व्यक्ती बनाल तेंव्हा फार उपयोगी पडणार आहेत.
     या आणि अशाच प्रकारच्या अनेक सुचना,तसेच तुमच्या अवती भोवतीच्या वातावरणातून,परिस्थिती मधून तसेच शाळेत असताना तुमच्या शिक्षक वृंदां कडून तुमच्यावर नकळतपणे संस्कार घडवत असतात.
     तुम्ही म्हणाल,संस्कार म्हणजे काय?तर मित्रांनो,सध्या तुम्ही विद्यार्थि अवस्थे मध्ये आहात.यालाच आपण विविध विषयांचा अभ्यास करुन विद्या ग्रहण करण्याची म्हणजे त्यातून द्य्न्यान मिळवण्याची अवस्था असे म्हणतो.तुम्ही जसे मोठे होत जाल तसे,तुमचा या जगातील वेगवेगळी क्षेत्रं,त्यात काम करणारी माणसं, वेगवेगळी परिस्थिती इत्यादी अनेक बाबींशी संबंध येईल.उच्च शिक्षणाच्या निमित्ताने,नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने किंवा प्रसंगानुरुप तुम्हाला कधी तरी आपल्या घरा पासून आपल्या माणसां पासून थोडे दूर एकट्याने जाण्याचे सुध्दा काम पडू शकते.प्रत्येकाच्या आयुष्यात केंव्हा ना केंव्हा अशी वेळ येत असतेच.अशा परिस्थिती मध्ये काही अडचण आली तर, त्यातून योग्य तो मार्ग काढण्या साठी,किंवा आलेल्या अडचणीला योग्य पध्दतीने सामोरे जाण्यासाठी तसेच अडचणी येऊच नयेत या साठी प्रयत्न करता यावेत म्हणून तुमचे आई बाबा,घरातील मोठी माणसं,तुमचे शिक्षक वृंद आपल्या अप्रत्यक्ष शिकवण्यातून वेळोवेळी जी शिकवण देत असतात ना,त्यांनाच "संस्कार" असे संबोधले जाते.
       अगदी छोटी मुलं ही मातीच्या गोळ्या सारखी असतात.त्यांच्या मनाला आणि शरिराला योग्य संस्कारां मधून योग्य वळण लावण्याचे काम घरातील मोठी माणसे करत असतातच.मुलांना देवा घरच्या फुलांचीही उपमा दिली जाते.म्हणतात ना,"मुले ही देवा घरची फुले असतात."म्हणूनच लहान पणा पासून ते विद्यार्थी दशेमध्ये होणारे संस्कार हे अतिशय आवश्यक असे पायाभूत संस्कार असतात.त्यांना फार महत्व असते.या अवस्थेत होणारे संस्कार हे चांगल्याच दर्जाचे असावेत असायलाच पाहिजेत असाच वडिलधार्या लोकांचा आणि शिक्षक वृंदांचाही प्रयत्न असतोच.म्हणूनच या संस्कारांचे पालन,ग्रहण प्रत्येकानेच करण्याचा आपला प्रयत्न चालूच ठेवला पाहिजे.कोणत्याही चांगल्या गोष्टी एेकल्याने,वाचल्याने,निरिक्षण केल्याने त्यांचा आपल्या मनावर चांगला परिणाम होऊन त्याचा आयुष्यात आपल्याला कधी ना कधी तरी निश्चितच उपयोग होतो हे आपण चांगले लक्षात ठेवलेच पाहिजे.
        वर लिहिलेल्या संवादांमध्ये आई निकिताला पाणी घेऊन जाण्यासाठी सांगते.कित्ती साधे काम आहे ना हे !पण फार महत्वाचा संस्कार किंवा शिकवण देऊन जाते हे काम.घरी आलेल्या पाहुण्याचे प्रथम आदरातिथ्य कसे करावे?याचा धडा शिकवलाय आईने निकिताला.आल्या आल्या पाहूण्यांचे स्वागत कसे करावे ही ती शिकवण होती.
       याच बरोबर आलेल्या पाहूण्यांशी आई बाबा कसे बोलतात ,वागतात, त्यांची काळजी कशी घेतात ?त्यांचा व्यवस्थित पाहूणचार करत त्यांचा मान कसा राखतात?या सार्या गोष्टीं सुध्दा तुम्ही निरिक्षणातून शिकू शकता,आत्मसात करू शकता.हा पण एक संस्कारच होय.प्रत्येक गोष्ट सांगून किंवा हाताला धरूनच शिकवली पाहिजे असे नाही तर,आपल्या सभोवती चांगले काय?वाईट काय?यातून आपण कोणता बोध घ्यावयास हवा?हे तुम्ही तुमच्या तर्क शक्तीच्या म्हणजेच विचार क्षमतेचा उपयोग करत ठरवले पाहिजे.यातून होणारा संस्कार तुमच्या मनावर आणि व्यक्तिमत्वावर नक्कीच परिणाम करतो.
        निखिलला त्याची आई,हॉल आवरुन ठेवण्याविषयी सांगते.याचा अर्थ आपण आपल्या स्वतः प्रमाणेच घराचा निटनेटकेपणा पण नेहमीच राखला पाहिजे हेच आईला यातून निखिलच्या लक्षात आणून द्यावयाचे आहे.नेटके पणाचा संस्कार होणार निखिलवर हे निश्चित.
       काका काकुंना नमस्कार करावयास सांगून,यातून तुमच्यावर विनम्र होण्याचा,मोठ्या माणसांचा आदर राखण्याचा संस्कार रुजवणे हाच हेतू असतो आईचा.
       वरदला त्याची आई शेजारच्या आजारी आजीला भेटून यावयास सांगते,याचा अर्थ ती वरदवर माणुसकी धर्म कसा पाळावयास हवा या संस्काराचे धडे शिकवते आहे.
        आई मैथिलीला मंडईत भाजी आणण्या साठी घेऊन जाणार आहे,यातून मैथिलीने दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे व्यवहार द्न्यान शिकले पाहिजे हा त्या मागे आईचा हेतू तर आहेच.शिवाय चांगली भाजी कशी निवडून घ्यावी?हे सुध्दा मैथिली यातून जाणणार आहेच.
       तर मित्रांनो,अशा पध्दतीचे हे शिकणे आणि शिकवणे जे आहे ना ,हेच तर तुमच्यावर घडत असणारे संस्कार होत.
     तुम्ही जसे जसे मोठे होत जाता तसे,तुम्ही चांगल्या आणि वाईट गोष्टींतील फरक जाणायला लागाल.त्यातील चांगले तेवढे स्विकारावे आणि वाईटा पासून दूर रहावे ,याचे द्न्यान तुम्हाला या संस्कारांमुळेच होऊ शकेल.
       वर उल्लेख केलाय त्या प्रमाणे तुमच्या शिक्षक वृंदा कडूनही तुमच्यावर संस्कार होतच असतात तुमच्या शिक्षणातूनच ते घडवले जातात.उदा: शिस्तीने वागण्याचे संस्कार,नियमीत अभ्यास करण्याचे संस्कार.तुम्हाला क्लास चा मॉनिटर बनवले जाते यातून तुमच्या अंगी नेतृत्व गुण विकसित व्हावेत हा उद्देश असतो. आपला जेवणाचा डबा सर्वांनी मिळून खाण्याची शाळेतील सवय तुम्हाला आहे तेवढे अन्न सार्यांमध्ये वाटून खाण्याचे संस्कार शिकवते.शाळेतील विविध खेळांमार्फत तुमच्या मध्ये व्यायामाचे महत्व,संघटित पणाचे गुणधर्म घडवले जातात.असे एक ना अनेक किती तरी संस्कार नकळतपणे तुमच्यावर रुजवले जातात.त्याची जोपासना तुम्ही सुध्दा मनापासून करत असता.हे असे चांगल्या दर्जाचे संस्कार आपल्या भल्यासाठीच आहेत,असतात हे तुम्ही कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.तुमच्या भविष्य काळात त्यांचा सातत्याने पाठपुरावा करत,सुसंस्कृत आणि यशस्वी जीवन जगण्याची कला यातून तुम्ही आत्मसात करू शकता.ती तशी तुम्ही आत्मसात केलीच पाहिजे.आपण अापल्या संस्कारांच्या माध्यमातून शिकलेली कोणतीही चांगली गोष्ट कधीच वाया जात नसते हे विसरु नका.ही आपण मिळवलेली आयुष्यभराची संपत्ती असते.तिला आपण नैतिक संपत्ती असेही संबोधू शकतो.विद्यार्थी दशे मध्ये घडवलेले ,रुजवलेले संस्कार हे कायम स्वरुपी असतात.आपल्या करिअर मध्ये उच्च पदावर पोहोंचण्या साठी या संस्कारांचा फार मोठा वाटा असतो.त्यांमुळे तुमचे आयुष्य सोन्या सारखे बनवता येऊ शकते यात काहीच शंका नाही.
       चला तर मग मुलांनो,चांगल्याच संस्कारांची कास आपण कायम स्वरुपी आपल्या हाती धरु या ! त्या साठी तुम्हा सर्वांनाच माझ्या मनःपुर्वक शुभेच्छा !!
*नंदिनी म.देशपांडे*.
nmdabad@gmail.com
✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌
   

बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

*निमित्त*

     आज एका साहित्यिक ग्रुप वर एका मित्राने प्रश्न केला,"लेखक का बनायचे असते?पैसा ,कौतुक ,प्रसिध्दी की आत्मसुख यांसाठी?"हा प्रश्न वाचनात आला आणि मलाच आश्चर्य वाटलं हा काही प्रश्न असू शकतो! एखादा व्यक्ती लेखक बनतो म्हणजे काय तो ठराविक इन्सटीट्यूट मध्ये जाऊन त्या बद्दलची पदवी /पदविका घेतो की काय असे अभिप्रेत आहे का या प्रश्नात?हा प्रश्न वाचल्या पासून मी मात्र अस्वस्थ बनले.कधी एकदा व्यक्त होईल मी या विषयावर असे झाले अगदी!
       या प्रश्नाच्या निमित्ताने एक संधी चालून आली आहे व्यक्त होण्या साठी....असे वाटले खरे मनातून....
         अरेच्या!! एखाद्या विषयावर व्यक्त होण्या साठी आपल्या मनातील विचार लिहून काढणे  हा एक सोप्पा उपाय असू शकतो की!असे वाटून गेले पटकन. पण लगेच लक्षात आले,व्यक्त होण्यासाठी लिहावेच लागते असेच कांही नाही बोलण्यातूनही ते साधता येतेच ना ?
         प्रश्न वाचल्या बरोबर ,"आपण यावर व्यक्त झालेच पाहिजे," असे मनाच्या आतल्या कप्प्यातून बुध्दिला जो संकेत मिळाला ना ,हा संकेत  म्हणजे लेखनासाठी आवश्यक असणारे पहिले लक्षण होय.ज्याला साहित्यिक भाषेत "प्रतिभा" या नावाने संबोधले जाते.
          प्रतिभा ही एक कला आहे.कोणत्याही कलाकाराच्या अंगी असणारी कला ही त्याला उपजतच मिळालेली दैवी देणगी असते.कलेला जसजसे मार्गदर्शन, सराव,योग्य ती संधी मिळाल्यास तिचे सौंदर्य अधिकात अधिक प्रमाणात खुलवण्याचे प्रयत्न कलाकार करत असतो.कलेची प्रगल्भता वाढती ठेवतो,तसेच प्रतिभेचेही आहे.पुस्तकांचे जास्तीत जास्त वाचन,निरिक्षण क्षमता,आपल्या स्वतःला आलेले अनुभव,इतरे जनांचे अनुभव कथन एेकणे,एखाद्या विशिष्ट विषयाचा सखोल अभ्यास या सर्व  गोष्टींची मुबलकता ज्यांच्याजवळ असते त्यांची प्रतिभा सदाफुली सारखी असते.
      प्रगल्भ झालेली ही प्रतिभा मग काव्य किंवा गद्य लेखनाच्या स्वरूपात जेंव्हा प्रकट होते ना,तेंव्हा संबंधित व्यक्ती लेखक बनण्यासाठी पात्र आहे असे मला वाटते.तो आपल्या प्रतिभा शक्तीच्या जोरावर काल्पनिक रचनाही शब्दांमध्ये गुंफत रहातो.यातूनच कथा,कादंबरी,नाटक,ललितगद्य,विडंबन,प्रवास वर्णन,व्यक्तीचित्र,समिक्षण,काव्य वगैरे वगैरे लेखनाच्या स्वरुपात व्यक्त होऊ लागली की,ती व्यक्ती लेखक बनली आहे याला पुष्टीच मिळते.
       लेखकाची प्रतिभा जसजशी बहरु लागते,तसा त्याच्या लिखाणाचा वाचक वर्ग वाढू लागतो.लेखनाचे विषय समाजाभिमुख असतील तर नक्कीच ते वचकांच्या पचनी पडते.हाच वाचक वर्ग उस्फुर्तपणे दाद देऊन प्रशंसा करतो तेंव्हा,होणारे कौतूक कोणाला नको असते?अहो,देव सुध्दा भक्तिभावाचा भुकेला असतो म्हणतात,मग हा प्रतिभा संपन्न माणूस तर,हाडामांसाचा बनलेला असतो .तो कौतुकाचा भुकेला असणे अगदी स्वाभाविक आहेच.
        हळू हळू कौतूकाची ही पावलं पुर्णत्वाच्या दिशेने सरकत सरकत प्रसिध्दी पर्यंत पोहोंचतात.प्रसिध्दी हे कौतूकाचेच विस्तारित रुप आहे असे म्हणता येईल.ही वाट्याला आल्यास न आवडणारा व्यक्ती विरळाच.
       प्रश्नातला आणखी एक मुद्दा म्हणजे पैसा.याबाबत मी एकदा मत व्यक्त केले असल्याचे स्मरते आहे मला.लेखक किंवा कवी आपल्या प्रतिभेच्या माध्यमातून कौतूक प्रसिध्दी,अधुनिक काळात थोडाफार पैसा मानधन म्हणून मिळवू शकतो.पण त्याची शाश्वती देता येत नाही.त्यामूळे प्रतिभा शक्तीच्या जोरावर मिळणारा पैसा हा लेखकाचे जीवन आर्थिक दृष्टिने संपन्न करेलच असे अजिबात नाही.पण ही प्रतिभा त्याची स्वतःची वैचारिक आणि मानसिक क्षमता नक्कीच संपन्न बनवते हे तेवढेच खरे.
       कोणताही लेखक ,कवी आपल्या लिखाणातून जेंव्हा व्यक्त होतो,तेंव्हा त्याची प्रत्येक लेखन कलाकृति ही त्याची सवतःची अशी एक स्वतंत्र नवनिर्मिती असते.ती पुर्णत्वाला नेल्यानंतर त्याला मिळणारे आत्मसुख /आत्मानंद हा कुठल्याही एककात न मोजता येण्याजोगे असा अलौकिक असतो .त्याच्या या आत्मसमाधानापुढे इतर कोणत्याही गोष्टी क्षुल्लक असतात.तो कधीच 'कमाई'करण्यासाठी लिहित नसतो . आत्मसुखाच्या रुपाने त्याला मिळणारा मोबदला हा सर्वोच्च स्थानी असतो.हेच समाधान साध्य करण्याच्या ध्येयाने प्रेरित होत त्याची प्रतिभा त्याच्या लेखणीतून पाझरत रहाते.
        *नंदिनी म.देशपांडे*
nmdabad@gmail.com
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍