रविवार, २१ एप्रिल, २०१९

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने.

२३, एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो.या निमित्ताने मी माझ्या स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचा अनुभव संवादातून सांगण्याचा एक छोटा प्रयत्न या ठिकाणी करु ईच्छिते.

       या वर्षीच्या जागतिक पुस्तक दिनाचं घोषवाक्यच आहे,ते म्हणजे," साहित्यातून संवाद साधा,गोष्टी सांगा."

      आठवणींचा मोरपिसारा, या पुस्तकाची लेखिका माझी विद्यार्थिनी, नंदिनी म्हणजे या मराठवाड्याच्या मातीतलं बावनकशी सोनं आहे. बघा पुस्तक हातात पडल्यावर वाचून तुम्हाला खात्री पटेलच.

       विश्रब्ध लेखन हे तिच्या लिखाणाचे सौंदर्य. तर‌ अडगळीत पडलेल्या अनेक मराठी शब्दांना मुक्तहस्ते शब्द फुलात गुंफत तिने नवीन पायंडा पाडलाय जुन्या शब्दांचे पुनरुज्जीवन करण्याच.....वगैरे वगैरे.

श्री लक्ष्मीकांत तांबोळी सरांची ही अशी वाक्य कानावर पडत होती, आणि माझे मन मात्र मोहरून जात होते. बापरे! सरांनी आपल्याला बावनकशी सोन्याची उपमा देऊन खूपच मोठी जबाबदारी टाकली आहे की आपल्यावर.....

   ‌   आईच्या प्रेरणेने अगदी सहज सरळ साध्या अशा बालपणाच्या आठवणींना मी मोरपिसारा च्या रुपात एकत्रित बांधून ठेवले, आणि एवढे छान काम नकळतपणे आपल्या हातून घडले ही जाणीव सरांच्या भाषणाने प्रथमच झाली माझ्या मनाला.

      या पुस्तकातील वाडा संस्कृती निरनिराळी आभुषणं, त्यात मांडलेली स्त्री व्यक्तिरेखा वगैरे अनेक अनेक ललित लेखांवर सर भरभरून पण खुसखुशीत शब्दात बोलत होते. त्यातील 'बाळांतपण'या लेखावर भाष्य करताना तर सर चक्क म्हणाले, या पुस्तकाचे बाळंतपण करण्याचे काम मात्र लेखिकेने आणि संपादकाने माझ्यावर सोपवले होते.अशा पद्धतीने हशा आणि टाळ्यांच्या गजरात चालू असणाऱ्या माझ्या आठवणींचा मोरपिसारा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रंगतदार बनत चालला होता.

   ‌‌ दुसऱ्या वक्त्या, सौ.चंद्रज्योति भंडारी मॅडम. औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयात मराठी विषयाच्या विभागप्रमुख आहेत. शिवाय मराठीतील महिला लेखिकांच्या व कवयित्रींच्या लेखनावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे. त्यांनीही बारकाईने माझ्या या पुस्तकाचा अभ्यास करत, बोलता-बोलता दुर्गाबाई भागवत,इंदिरा संत,सौ.विश्राम बेडेकर वगैरे महान स्त्री व्यक्तिरेखांच्या लेखनाशी माझ्या लेखनाची तुलना करत, माझा जणू सन्मानच केला."त्यांच्या एवढी योग्यता, त्यांच्या लेखनाची उंची तू नक्कीच गाठू शकशील,"अशी कौतुकाची थाप देऊन मला प्रोत्साहित केले.

      मॅडमने सुध्दा पुस्तकातील सर्वच ललित लेखां विषयी सखोलपणे विवेचन करत,हे पुस्तक वाचताना, माहेर या ललित लेखाने मला माझ्या माहेराच्या आठवणी जाग्या केल्या,नव्हे मी माझ्या माहेरी जाऊनही आले.असे भंडारी मॅडम‌ बोलल्या.साड्यांचे प्रकार वाचताना मी भरपूर प्रकारच्या साड्याही नेसून घेतल्या असेही त्या बोलत होत्या.

    या प्रकाशन कार्यक्रमात झालेल्या सर्वच भाषणांनी माझ्यावर व माझ्या पुस्तकावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला. पण वाचकांनीही हे पुस्तक वाचल्यानंतर जेव्हा आवर्जून फोन करून सांगितले की हा लेखसंग्रह आमच्या पूर्णपणे पसंतीस उतरला तर आहेच.पण या आठवणीतून उभा केलेला काळ हा खरंच अगदी असाच अस्तित्वात होता, हे हल्ली आमच्या मुला सुनांना सांगितले तर कळत नाही. खरं वाटत नाही. त्यामुळे हे पुस्तक मी त्यांना वाचावयास सांगणार आहे. "एक कॉपी मी अमेरिकेत माझ्या मुलीसाठी पाठवली आहे" असे जेव्हा एका वाचकाने मुद्दाम फोन करून सांगितले, आणि काय आनंद झाला म्हणून सांगू! या पुस्तकामुळे आम्हाला खूपच नॉस्टॅल्जिक व्हायला झालं त्यातच रेंगाळत बसावं असं वाटत होतं.आपल्या सासूबाईंची व्यक्तिरेखा आत्ता पर्यंत कोणी लिहिली असेल असे वाटत नाही.... वगैरे वगैरे अनेक छान छान प्रतिक्रिया माझ्यापर्यंत जशा येत होत्या, खरेतर तेंव्हा मला लक्षात आलं की अरेच्चा,आपण खरच मराठीतील लेखकांच्या मांदियाळीत येऊन बसलेलो आहोत हे खरंय तर....

औरंगाबाद पासून मुंबई पुण्या पर्यंत आणि नांदेड कोल्हापूर अगदी थेट कर्नाटका पर्यंतच्या मराठी माणसाच्या हातात आठवणींचा मोरपिसारा पोहोंचले आणि मला कृतकृत्यता लाभली...

     अशा या माझ्या पहिल्याच पुस्तकाची लेखन प्रक्रिया अगदी सहज घडत गेली.किंबहूणा,या पुस्तकाचा प्रकाशन प्रवास आणि प्रकाशन सोहळा माझ्या आयुष्यातील एक सुवर्णयोग ठरला. माझ्या जीवनाला एक कलाटणी देणारी ही घटना या नात्याने आठवणींच्या मोरपिसाऱ्यातील इतर अनेक मोरपिसां प्रमाणे आणखी एक सुंदर मोरपिस,आठवणीच्या रुपात माझ्या मनःचक्षूं मध्ये कायमचे विराजमान झाले. कधीच न विसरण्यासाठी. आपली खास उंची आणि जागा निर्माण करत.

     मूळचा असणारा लेखनाचा छंद लहानपणापासून वेळ मिळेल तसा जोपासत जोपासत शाळेचा वार्षिक अंक वर्तमानपत्र,साप्ताहिकं मासिकं, दिवाळी अंक,इत्यादी माध्यमातून लिहिती रहात  पूर्ण करते आहे, हे माझ्या आईच्या लक्षात आले. तिला अर्थातच,प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या कौशल्यगुणांचे कौतुक वाटतच असते. तसेच ते माझ्या आईला सुध्दा वाटायचं. मी माझे सारे लिखाण जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवले पाहिजे.यासाठी सारखे समुपदेशन करत आईने मला प्रोत्साहित केले खरे. पण तिच्याच प्रेरणेने मी बांधलेली पुस्तक रुपातली पहिली कलाकृती बघावयास आई राहिली नाही हे शल्य मात्र मनाला कायम लागून राहिले.हे पण तेवढेच खरे.प्रकाशनाचा सोहळा चालू असताना आईच्या आठवणीने खूप गहिवरायला होत होतं. पण जिथे कुठे असेल आई तेथून ती आपल्या मुलीचं कौतुक नक्कीच डोळे भरून बघत असेल. अशी ग्वाही राहून राहून माझे मन मलाच देत होतं.

     दोन वर्षांपूर्वी दिवाळीची भेट या स्वरुपात वाचकांच्या हाती माझे पुस्तक, 'आठवणींचा मोरपिसारा' सुपूर्त करताना खरोखर मनस्वी आनंद झाला होता.आईच्या ऋणातून, आपल्या मायबोलीच्या ऋणातून, आपल्या मातीच्या, शाळेच्या, पर्यायाने माझ्या लेखांवर प्रेम करणाऱ्या वाचकांच्या ऋणातून थोडे तरी उतराई होण्याचा प्रयत्न मी केल्याचे समाधान मनावर उमटत गेले.

      आठवणींचा मोरपिसारा या ललित गद्याच्या पहिल्या पुस्तकाला प्रथम प्रकाशित पुस्तकाच्या ओळीमधील पहिल्या क्रमांकाचा गौरव देऊन सन्मानित करण्यात आले.त्यावेळी, या माझ्या समाधानाने अलौकिकत्व प्राप्त केले.

     ‌ गेल्या पंचवीस वर्षांपासून देण्यात येणारा, मराठवाड्यातील 'कै. सावित्रीबाई वामनराव जोशी' पुरस्कार. आत्तापर्यंत अनेक दिग्गजांना मिळालेला हा पुरस्कार बाविसाव्या वर्षी चा असा २०१६-१७  यावर्षी माझ्या आठवणींचा मोरपिसारा या पहिल्या पुस्तकाला मिळालाय. असे जेव्हा मला फोनवरून प्रथम सांगण्यात आले, तो क्षण माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा केंद्रबिंदू नक्कीच ठरला होता. यात अजिबात दुमत नाहीच. केवळ आपली स्वतःची अशी अभिव्यक्ती,कलाकृती पुस्तक रूपात आपण पहिल्यांदाच बांधली काय आणि ती पहिल्या प्रकाशनाच्या मानांकनात सामील होत, तिला यावर्षीचा पहिला गौरव सन्मान प्राप्त होतो काय माझ्यासाठी हे खरोखरच एक स्वप्नवत सत्य होतं. ते प्रत्यक्षात उतरलं आहे ही अनुभूती खरचं खूप अविस्मरणीय आनंददायक अशीच.

      ‌ परीक्षकांनी हेच पुस्तक पुरस्कारासाठी का निवडले याची केलेली मिमांसा खरोखर आजच्या काळात विचारप्रवृत्त करावयास लावणारी होती . मला ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्या सुद्धा एक सुप्रसिद्ध लेखिका गादगे मॅडम . यांनी पुस्तक वाचून माझे हे पुस्तक त्यातील लिखाण नात्यांचा भावबंध जपणारे आहे . हा एका संस्कृतीचा , एका  काळाचा अनमोल ठेवा आहे हे जेव्हा सांगितले ;तेव्हा मलाही माझ्या पुस्तकाची नव्याने पुन्हा ओळख झाल्यासारखे वाटले . खरं म्हणजे तीन पिढ्यांची  साक्षीदार असणारी मी ,या समाजाच्या बदलत गेलेल्या चालीरितीं मध्ये काळाच्या ओघात  सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक बदल कसे होत गेले, आणि या बदलांमधील मी एक दुवा या उद्देशाने लिहिती झालेली मी. पुस्तक रुपाने माझ्या विचारांचा  ठेवा बनून राहिले आहे. त्यावर या साऱ्या मान्यवरांचे विचार ऐकल्यानंतर मला विश्वास बसला. आणि समाजात वावरताना थोडेसे समाजऋणातून उतराई झालीयं मी. ही जाणीव स्पर्श करून गेली.चित्ताला खूप मोठ्या प्रमाणावर प्रसन्नता प्राप्त झाली. जी अगदी अतुलनीयच आहे. अशा निर्मळ निर्भेळ समाधानाने मी भरून पावले त्यामुळे  ही पहिली कलाकृती हा माझ्या आयुष्यातील एक अतिशय हृद्य, अविस्मरणीय, आईच्या आठवणींने हळवा बनवणारा सोहळा ठरला हे निर्विवाद.

     याच दिवशी मी माझ्या आगामी पुस्तक प्रकाशनाचा संकल्प सोडला आणि तो पुर्णत्वास जात कांहीच दिवसांत "भावशिंपलीतील मोती"
वाचकांशी संवाद साधण्यास पुस्तक विश्वात प्रवेश करत आहे हे आवर्जुन सांगावेसे वाटते.

*© नंदिनी म.देशपांडे.*
औरंगाबाद.

💥💥💥💥💥💥💥💥
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा