रविवार, २३ सप्टेंबर, २०१८

एक कविता. जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने...

* जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने....*

वैष्णवी आणि वेदश्री,
शक्ती रुपांची ही दोन्ही नावं.

  आहेत बनल्या या दोघीही,
  आमच्या कुटुंबाची शक्तिस्थानं.

   प्रेमळ, सालस अशा दोघी या,
   निरागसतेच्या मुर्तीमंत प्रतिमा.

   विलक्षण चुणूक बुध्दिमत्तेची
                      घेवून,
    मान कुटुंबाची अभिमानाने
                     उंचावून.

शिस्त आणि शिष्टाचाराची कास
       ‌             धरुन,
  माणूसकीच्या चालत वाटेवरुन.

   आकाशाला आपल्या घेताना
                    कवेत,
    पाय मात्र कायम जमिनीवर
                    टेकवत.

    बाळगत जिद्द उंच भरारीची,
    म्हणतात कशा काळजी नको
                    आमची.
    
     स्वतःकरतात मात्र थोरांची
                    काळजी,
     होऊन कधी आई तर कधी
                 ताई आमची.

    वाटतो केवढा दिलासा
                   मनाला
    होताच स्पर्श नाजूक हातांचा.

    असेच प्रेम सदा राहो बाप्पा,
    मावशी असूनही मुलींची
            ‌      माया.  

    राहोत सुखी कायम दोन्ही
               माझ्या भाच्च्या,
    लेकीच जणू या आपल्या
        ‌‌      मावशीच्या.

   असू द्यावा आशिर्वाद एवढाच
                   देवा,
    मागणं माझं हे कृपया
           ‌‌       स्विकारा.

   आशिर्वादाचं लेणं लेकींना
                  द्यावं,
   लेणं आशिर्वादाचं लेकींना
                  द्यावं.....

          © नंदिनी देशपांडे.

२३,सप्टेंबर २०१८.

🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

* गणपती बाप्पा *

*गणपती बाप्पा*

     पहूणा तरी कसा म्हणू रे तुला गणेशा?तू तर आम्हा लोकांच्या मना- मनांत कायम घर करून आहेस. तूच तर करता करविता, आरंभ देवता,विघ्नहर्ता.

   नव्याने कोणत्याही गोष्टीची सुरुवात करावयाची म्हटले की सर्वात पहिल्यांदा तुझीच मूर्ती  डोळ्यापुढे ठेवून श्रीगणेशा होतो,आम्हाकडून. आनंदाच्या वेळीसुद्धा तुझ्याच पुढे साखर ठेवावी वाटते सर्वप्रथम. आणि संकटाच्या वेळीही तुझीच तर आठवण होते. तुझ्याच नावाचा घोष असतो मनात. तूच तर देतोस बळ अडचणींवर मात करण्यासाठी. म्हणूनच ना रे तूच सुखकर्ता आणि दुःखहर्ताही.

     गजानना, गेली दहा दिवस तू येऊन उपकृत केलयंस पाहुणा या नात्याने घराघरात.ते सुद्धा किती खोलवर रुजलाएस तू आमच्या मनात? हे तपासून बघण्यासाठीच ना? अगदी जवळून आमच्या सुखदुःखाशी, आनंदाशी एकरूप होण्या साठीच ना? घडेल तशी सेवा, घडेल तसा नेवेद्य स्वीकारण्यासाठीच ना?

      हे ओंकारा, एकाच वेळी घराघरांत प्रवेशता झालाएंस, तेंव्हापासून नुसता उत्साह ओसंडून वाहत आहे आमचा. उत्सवी वातावरण निर्मिती करत, आम्हा सर्वांच्या आनंदाला उधाण आणले आहेस तू अगदी!

      मयूरेश्वरा,तुझ्या साक्षीने कितीतरी शुभारंभाच्या गोष्टी घडल्या. केवढी तरी खरेदी झाली. केवढ्या तरी व्यवहाराचा भागिदार बनलाएस आमचा तू!  आणि कितीतरी जणांचं साकडं ऐकून घेतलंएस तूच.

    फार त्रास दिला का रे अमेया, आम्ही तुला? तुझ्या निमित्ताने म्हणून लहान थोरांसाठी कितीतरी उपक्रम राबवले आम्ही. त्यांचा  मनमुराद आनंद लुटला आम्हीच. आमच्यातील कलागुण प्रदर्शित करत विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले तुझ्याच संगतीने. त्यांना वाव मिळवून दिला तुझ्याच समोर. डिजे आणि गाण्यांच्या कर्णकर्र्कश्य आवाजाने उबग येऊन परतीचा जाण्याचा दिवस जवळ तर केला नाहीस ना तू विनायका?अशीही शंका डोकावतिए मनात.

      एकदंता,तू आलाएंस तसा प्रत्येकाच्या आनंद व्यक्त करण्याच्या नाना तह्रां तू सहन केल्याएस खऱ्या. तुझे कान सुपाएवढे म्हणून काहीही आणि कितीही ऐकून घेण्याची तुझी ही सवय.पण आम्हाला कधी  कळणार रे,की हे नाहीच आहे  योग्य ते? दे रे बाबा तूच आता अशा लोकांना सुबुद्धी जाता जाता. पण 'तुझ्यासाठी प्रसाद' या नावाखाली आमच्या जिभेचे चोचले भरपूर पुरवून घेतलेआम्ही साऱ्यांनी भालचंद्रा.

      दरम्यानच्या काळात गौराई आल्या. त्यावेळी छोट्या बालकाप्रमाणे पुरवलेले तुझे लाड, आम्हाला आमचे बालपण आठवते करवून गेले.गौराईंना निरोप देताना, 'मी येईन काही दिवसात'.हा तू दिलेला शब्द पाळण्याची तुझी वेळ अगदी समीप येऊ घातली आहे.

     बाप्पा उद्या तुझ्या निरोपाचा दिवस.आम्हाला हुरहूर लावणारा, रिकामा रिकामा वाटवणारा आणि ' पुनःश्च कामाला लागा' हे सुचवणारा.

       पण खरं सांगू लंबोदरा, तुझे रिकामे मखर आवरून ठेवताना राहून राहून आवंढे येतात रे या घशात. डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा घरातील प्रत्येक जण लपवण्याचा प्रयत्न करतो, पण लपतील तर शपथ! खरचं दहा दिवस आमच्या सान्निध्यात येऊन आम्हाला सहवास घडवणारा, आमच्या सुखदुःखात एकरूप होणारा आणि आनंदात सोबत करणारा तो तूच एकमेव चिंतामणी. तूच मोरया नि तूच सिद्धेशा.

     हे वक्रतुंडा तुझ्या येण्याने आलेले उत्साहाचे भरते तुझ्या निरोपाने रिते करून जातोएंस तू विघ्नेशा.

    नावं कोणतीही घेतली तरी एकमेव मंगलमूर्ती आहेस तो तूच. हे कसे विसरू आम्ही गणनायका. आम्ही केवळ एवढेच म्हणू शकतो गजमुखा, की आमचा उद्याचा गजर हाच असणार आहे,

      गणपती बाप्पा मोरया ।   
           मंगलमूर्ती मोरया।
      पुढच्या वर्षी लवकर या।
         बाप्पा लवकर या।

            * © नंदिनी देशपांडे *

२२,सप्टे.२०१८.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

माझे पहिले पुस्तक.

* माझे पहिले पुस्तक *

     आठवणींचा मोरपिसारा, या पुस्तकाची लेखिका माझी विद्यार्थिनी, नंदिनी म्हणजे या मराठवाड्याच्या मातीतलं बावनकशी सोनं आहे. बघा पुस्तक हातात पडल्यावर वाचून तुम्हाला खात्री पटेलच.

       विश्रब्ध लेखन हे तिच्या लिखाणाचे सौंदर्य. तर‌ अडगळीत पडलेल्या अनेक मराठी शब्दांना मुक्तहस्ते शब्द फुलात गुंफत तिने नवीन पायंडा पाडलाय जुन्या शब्दांचे पुनरुज्जीवन करण्याचा....... वगैरे वगैरे.

श्री लक्ष्मीकांत तांबोळी सरांची ही अशी वाक्य कानावर पडत होती, आणि माझे मन मात्र मोहरून जात होते. बापरे! सरांनी आपल्याला बावनकशी सोन्याची उपमा देऊन खूपच मोठी जबाबदारी टाकली आहे की आपल्यावर.....

   ‌   आईच्या प्रेरणेने अगदी सहज सरळ साध्या अशा बालपणाच्या आठवणींना मी मोरपिसारा च्या रुपात एकत्रित बांधून ठेवले, आणि एवढे छान काम नकळतपणे आपल्या हातून घडले ही जाणीव सरांच्या भाषणाने प्रथमच झाली माझ्या मनाला.

      या पुस्तकातील वाडा संस्कृती निरनिराळी आभुषणं, त्यात मांडलेली स्त्री व्यक्तिरेखा वगैरे अनेक अनेक ललित लेखांवर सर भरभरून पण खुसखुशीत शब्दात बोलत होते. त्यातील 'बाळांतपण'या लेखावर भाष्य करताना तर सर चक्क म्हणाले, या पुस्तकाचे बाळंतपण करण्याचे काम मात्र लेखिकेने आणि संपादकाने माझ्यावर सोपवले होते.अशा पद्धतीने हशा आणि टाळ्यांच्या गजरात चालू असणाऱ्या माझ्या आठवणींचा मोरपिसारा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रंगतदार बनत चालला होता.

   ‌‌ दुसऱ्या वक्त्या, सौ.चंद्रज्योति भंडारी मॅडम. औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयात मराठी विषयाच्या विभागप्रमुख आहेत. शिवाय मराठीतील महिला लेखिकांच्या व कवयित्रींच्या लेखनावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे. त्यांनीही बारकाईने माझ्या या पुस्तकाचा अभ्यास करत, बोलता-बोलता दुर्गाबाई भागवत,इंदिरा संत,सौ.विश्राम बेडेकर वगैरे महान स्त्री व्यक्तिरेखांच्या लेखनाशी माझ्या लेखनाची तुलना करत, माझा जणू सन्मानच केला."त्यांच्या एवढी योग्यता, त्यांच्या लेखनाची उंची तू नक्कीच गाठू शकशील,"अशी कौतुकाची थाप देऊन मला प्रोत्साहित केले.

      मॅडमने सुध्दा पुस्तकातील सर्वच ललित लेखां विषयी सखोलपणे विवेचन करत,हे पुस्तक वाचताना, माहेर या ललित लेखाने मला माझ्या माहेराच्या आठवणी जाग्या केल्या,नव्हे मी माझ्या माहेरी जाऊनही आले.असे भंडारी मॅडम‌ बोलल्या.साड्यांचे प्रकार वाचताना मी भरपूर प्रकारच्या साड्याही नेसून घेतल्या असेही त्या बोलत होत्या.

    या प्रकाशन कार्यक्रमात झालेल्या सर्वच भाषणांनी माझ्यावर व माझ्या पुस्तकावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला. पण वाचकांनीही हे पुस्तक वाचल्यानंतर जेव्हा आवर्जून फोन करून सांगितले की हा लेखसंग्रह आमच्या पूर्णपणे पसंतीस उतरला तर आहेच.पण या आठवणीतून उभा केलेला काळ हा खरंच अगदी असाच अस्तित्वात होता, हे हल्ली आमच्या मुला सुनांना सांगितले तर कळत नाही. खरं वाटत नाही. त्यामुळे हे पुस्तक मी त्यांना वाचावयास सांगणार आहे. "एक कॉपी मी अमेरिकेत माझ्या मुलीसाठी पाठवली आहे" असे जेव्हा एका वाचकाने मुद्दाम फोन करून सांगितले, आणि काय आनंद झाला म्हणून सांगू! या पुस्तकामुळे आम्हाला खूपच नॉस्टॅल्जिक व्हायला झालं त्यातच रेंगाळत बसावं असं वाटत होतं.आपल्या सासूबाईंची व्यक्तिरेखा आत्ता पर्यंत कोणी लिहिली असेल असे वाटत नाही.... वगैरे वगैरे अनेक छान छान प्रतिक्रिया माझ्यापर्यंत जशा येत होत्या, खरेतर तेंव्हा मला लक्षात आलं की अरेच्चा,आपण खरच मराठीतील लेखकांच्या मांदियाळीत येऊन बसलेलो आहोत हे खरंय तर....

औरंगाबाद पासून मुंबई पुण्या पर्यंत आणि नांदेड कोल्हापूर अगदी थेट कर्नाटका पर्यंतच्या मराठी माणसाच्या हातात आठवणींचा मोरपिसारा पोहोंचले आणि मला कृतकृत्यता लाभली...

     अशा या माझ्या पहिल्याच पुस्तकाची लेखन प्रक्रिया अगदी सहज घडत गेली.किंबहूणा,या पुस्तकाचा प्रकाशन प्रवास आणि प्रकाशन सोहळा माझ्या आयुष्यातील एक सुवर्णयोग ठरला. माझ्या जीवनाला एक कलाटणी देणारी ही घटना या नात्याने आठवणींच्या मोरपिसाऱ्यातील इतर अनेक मोरपिसां प्रमाणे आणखी एक सुंदर मोरपिस,आठवणीच्या रुपात माझ्या मनःचक्षूं मध्ये कायमचे विराजमान झाले. कधीच न विसरण्यासाठी. आपली खास उंची आणि जागा निर्माण करत.

     मूळचा असणारा लेखनाचा छंद लहानपणापासून वेळ मिळेल तसा जोपासत जोपासत शाळेचा वार्षिक अंक वर्तमानपत्र,साप्ताहिकं मासिकं, दिवाळी अंक,इत्यादी माध्यमातून लिहिती रहात  पूर्ण करते आहे, हे माझ्या आईच्या लक्षात आले. तिला अर्थातच,प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या कौशल्यगुणांचे कौतुक वाटतच असते. तसेच ते माझ्या आईला सुध्दा वाटायचं. मी माझे सारे लिखाण जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवले पाहिजे.यासाठी सारखे समुपदेशन करत आईने मला प्रोत्साहित केले खरे. पण तिच्याच प्रेरणेने मी बांधलेली पुस्तक रुपातली पहिली कलाकृती बघावयास आई राहिली नाही हे शल्य मात्र मनाला कायम लागून राहिले.हे पण तेवढेच खरे.प्रकाशनाचा सोहळा चालू असताना आईच्या आठवणीने खूप गहिवरायला होत होतं. पण जिथे कुठे असेल आई तेथून ती आपल्या मुलीचं कौतुक नक्कीच डोळे भरून बघत असेल. अशी ग्वाही राहून राहून माझे मन मलाच देत होतं.

     दोन वर्षांपूर्वी दिवाळीची भेट या स्वरुपात वाचकांच्या हाती माझे पुस्तक, 'आठवणींचा मोरपिसारा' सुपूर्त करताना खरोखर मनस्वी आनंद झाला होता.आईच्या ऋणातून, आपल्या मायबोलीच्या ऋणातून, आपल्या मातीच्या, शाळेच्या, पर्यायाने माझ्या लेखांवर प्रेम करणाऱ्या वाचकांच्या ऋणातून थोडे तरी उतराई होण्याचा प्रयत्न मी केल्याचे समाधान मनावर उमटत गेले.

      आठवणींचा मोरपिसारा या ललित गद्याच्या पहिल्या पुस्तकाला प्रथम प्रकाशित पुस्तकाच्या ओळीमधील पहिल्या क्रमांकाचा गौरव देऊन सन्मानित करण्यात आले.त्यावेळी, या माझ्या समाधानाने अलौकिकत्व प्राप्त केले.

     ‌ गेल्या पंचवीस वर्षांपासून देण्यात येणारा, मराठवाड्यातील 'कै. सावित्रीबाई वामनराव जोशी' पुरस्कार. आत्तापर्यंत अनेक दिग्गजांना मिळालेला हा पुरस्कार बाविसाव्या वर्षी चा असा २०१६-१७  यावर्षी माझ्या आठवणींचा मोरपिसारा या पहिल्या पुस्तकाला मिळालाय. असे जेव्हा मला फोनवरून प्रथम सांगण्यात आले, तो क्षण माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा केंद्रबिंदू नक्कीच ठरला होता. यात अजिबात दुमत नाहीच. केवळ आपली स्वतःची अशी अभिव्यक्ती,कलाकृती पुस्तक रूपात आपण पहिल्यांदाच बांधली काय आणि ती पहिल्या प्रकाशनाच्या मानांकनात सामील होत, तिला यावर्षीचा पहिला गौरव सन्मान प्राप्त होतो काय माझ्यासाठी हे खरोखरच एक स्वप्नवत सत्य होतं. ते प्रत्यक्षात उतरलं आहे ही अनुभूती खरचं खूप अविस्मरणीय आनंददायक अशीच.

      ‌ परीक्षकांनी हेच पुस्तक पुरस्कारासाठी का निवडले याची केलेली मिमांसा खरोखर आजच्या काळात विचारप्रवृत्त करावयास लावणारी होती . मला ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्या सुद्धा एक सुप्रसिद्ध लेखिका गादगे मॅडम . यांनी पुस्तक वाचून माझे हे पुस्तक त्यातील लिखाण नात्यांचा भावबंध जपणारे आहे . हा एका संस्कृतीचा , एका  काळाचा अनमोल ठेवा आहे हे जेव्हा सांगितले ;तेव्हा मलाही माझ्या पुस्तकाची नव्याने पुन्हा ओळख झाल्यासारखे वाटले . खरं म्हणजे तीन पिढ्यांची  साक्षीदार असणारी मी ,या समाजाच्या बदलत गेलेल्या चालीरितीं मध्ये काळाच्या ओघात  सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक बदल कसे होत गेले, आणि या बदलांमधील मी एक दुवा या उद्देशाने लिहिती झालेली मी. पुस्तक रुपाने माझ्या विचारांचा  ठेवा बनून राहिले आहे. त्यावर या साऱ्या मान्यवरांचे विचार ऐकल्यानंतर मला विश्वास बसला. आणि समाजात वावरताना थोडेसे समाजऋणातून उतराई झालीयं मी. ही जाणीव स्पर्श करून गेली.चित्ताला खूप मोठ्या प्रमाणावर प्रसन्नता प्राप्त झाली. जी अगदी अतुलनीयच आहे. अशा निर्मळ निर्भेळ समाधानाने मी भरून पावले त्यामुळे  ही पहिली कलाकृती हा माझ्या आयुष्यातील एक अतिशय हृद्य, अविस्मरणीय, आईच्या आठवणींने हळवा बनवणारा सोहळा ठरला हे निर्विवाद.

*© नंदिनी म.देशपांडे.*
औरंगाबाद.

💥💥💥💥💥💥💥💥
         

बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८

*देव*

* देव *

     "टाकीचे घाव सोसल्या शिवाय देव पण येत नाही "

    ‌खरं तर दगडातून एखाद्या विशिष्ट देवतेची मूर्ति बनवावयाची असेल तर दगडाला छन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने भरपूर घाव सोसावे लागतातच. बनवणाऱ्या मुर्तीकाराला,तो कितीही मोठा कलाकार असू देत,पण आपण देवतेची मूर्ती बनवत आहोत हे माहीत असूनही तो त्या दगडावर घाव घालतोच ना?

त्यानंतर तयार होणाऱ्या मूर्तीला पूजनाच्या अधिष्ठानावर बसवून, मंत्रोच्चाराच्या संगतीने त्यावर पूजा संस्कार केले जातात. मांगल्य निर्माण केले जाते.यामूळे त्या मुर्ति मध्ये पावित्र्य वास करु लागते असे म्हणतात. 

       त्या नंतर भक्तिरसाच्या वर्षावात त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.

    कोणत्याही धातूची लाकडातून किंवा दगडातून जेव्हा 'देव'म्हणून एखादी मूर्ती साकारली जाते,ती जवळजवळ अशाच पद्धतीने.

    असे सर्व माहीत असताना सुद्धा आपण त्या विशिष्ट आकारातील मूर्तीला, शिल्पाला 'देव'असे संबोधतो.

    बहुतेक प्रत्येक धर्मातच मूर्त किंवा अमूर्त स्वरुपात देवाचे स्थान आहेच. त्याचे सर्व धर्मातील पावित्र्य सुध्दा सारखेच आहे.त्या मागचा असणारा भक्ति रस ही सर्वांचा सारखाच.देवांच्या केवळ नावांमध्ये आणि रुपा मध्ये वैविध्य असते.

‌    आज, सुशिक्षितपणा शास्त्रीय दृष्टिकोन सोबत घेऊनच जन्माला आलेलो आपण व लहानाचे मोठे झालेलो आपण. खोलवर जाऊन जेंव्हा चिकित्सा करतो, या मूर्त किंवा अमूर्त कल्पनेत खरच देवत्व असतं का? याचा विचार करू लागतो.

     आणि येथेच मग 'देव' या कल्पनेला अनेक फाटे फुटू लागतात.

     कोणाला या मूर्तींमध्ये देव दिसतो, तर कोणाला सत्कर्मात तो दिसतो. कुणी दानधर्म करुन त्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसतो.आणि कुणी आपल्या आचरणातून स्वतः च देवमाणूस बनण्याचा अट्टहासही करत असतो.

     पण खरा देव मला वाटतं माणसाच्या कल्पनेतूनच साकारतो. नाही का ?

‌‌   हा खरा देव कल्पनेत असतो. आपल्या मनाच्या श्रद्धेमध्ये असतो.

  ‌ श्रद्धा म्हणजे सुद्धा दुसरे-तिसरे काही नसून मनाच्या कल्पनेचाच एक आविष्कार होय.

     माणूस हा समाजशील आणि भावनाशील प्राणी आहेच .
    जीवन जगत असताना त्यात सुकरता यावी यासाठी नेहमीच प्रयत्न करणारा.

दरवेळी केलेले प्रयत्न सफल होतीलच याची शाश्वती त्यालाही नसते. पण अशावेळी खचून न जाता मनःशांती मिळवण्यासाठी,पुन्हा प्रयत्नांची कास पकडण्यासाठी त्याला कुठेतरी एखादे श्रद्धा स्थान असावे असे सारखे वाटत असते. जेणे करून त्याच्या समोर बसून आपली तक्रार त्याला मांडता येईल. डोळे मिटून शांतपणे ध्यानमग्न अवस्थेमध्ये त्याच्या पुढ्यात बसले थोडावेळ तर, मनावरील अपयशाचा ताण नाहीसा करता येतो. तसेच आपल्या या श्रद्धास्थानाला साकडं घालून पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागता येतं.

       माझ्या मते असे श्रद्धास्थान जे असते ते आपण देवतांच्या मूर्तीं मध्ये शोधत असतो. आपल्या मानसिक अवस्थेची ती एक नितांत गरज असते.
 
    या गरजेला आपण भावनांचे कुंपण घालतो. ही गरज भागवण्यासाठी, मनः शांती मिळवण्यासाठी ,आपण करत असलेल्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी अशी श्रद्धा स्थानं फार आवश्यक ‌असतात. मग ती कोणत्याही देवतेच्या रुपात असतील तरीही हरकत नाही.

   हीच श्रद्धा एका मर्यादेपर्यंत बाळगणे केव्हाही चांगले. पण तिला अमर्याद महत्त्व देऊन, त्याचे अवडंबर करत तिला अंधश्रद्धेचे रूप येता कामा नये.किंबहुणा त्यात राजकारण येता कामा नये.कारण अंधश्रद्धा आणि राजकारणाला स्वार्थाचा संसर्ग फार पटकन होऊ शकतो.

   ‌असे म्हणावेसे वाटते की,
         " ईश्वरी श्रद्धा ही मनाच्या कोंदणातच शोभून दिसते. तिचे प्रदर्शन होऊ लागले, की तिला स्वार्थाचा किंवा राजकारणाचा वास येऊ लागतो."

    ‌  या श्रद्धेला आपल्या घराच्या देवघरात किंवा एखाद्या मंदिराच्या गाभार्‍यातच मांगल्य युक्त वातावरणात, तेलाच्या अखंड ज्योतिर्मय प्रकाशात तेवत ठेवावयास हवे. बाहेरच्या वादळाशी टक्कर देण्यासाठी  तिला कधीच अधांतरी सोडू नये. आणि तिचे पावित्र्य भंग करू नये. ज्याला हे उमगले, समजले त्यालाच खऱ्या अर्थाने देव समजला.देव भेटला. असे आपण म्हणू शकतो. काय? खरं आहे ना...?

© * नंदिनी देशपांडे.*
        
१२, सप्टें २०१८.

🔔🔔🔔🔔🔔🔔

शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

*. लिव्ह इन रिलेशनशिप *

*लिव्ह इन रिलेशनशिप*

       सवयी प्रमाणे दैनिक पेपर वाचत असताना वाचनात आलेली एक बातमी म्हणजे,एका स्त्री ने टाकलेल्या दाव्यात, न्यायालयाने सदरील स्त्री ला निर्वाह निधी मिळावा, असा निकाल दिला. ही व्यक्ती तिच्या बरोबर  लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये रहात होती.

     संबंधित व्यक्तीस तिच्या आणि दोन मुलांच्या निर्वाहासाठी ठराविक रक्कम दरमहा दिली जावी. असा आदेश न्यायालयाने दिला होता.व्यवसायाने वकील असल्यामुळे न्यायालयीन संदर्भात आलेली एकही बातमी नजरेतून सुटत नाही.

    यातील परिस्थिती अशी की, बारा वर्षांपासून ही दोघं रिलेशनशिपमध्ये राहात होती. त्यांना दोन मुले झाल्यानंतर 'पटत नाही'या करण्यासाठी तिचा मित्र वेगळा झाला होता. आणि निर्वाहाचा प्रश्न आ वासून तिच्यासमोर उभा राहिला. न्यायालयात यासाठी तिने अर्ज केला. पण यात केवळ तिच्या मित्राचे सातत्याने म्हणणे होते की,आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये राहात होतो. आणि ही दोन्ही मुले आमच्या दोघांचीच आहेत. हेच ग्राह्य धरून सदरील आदेश देऊन त्या व्यक्तीस निर्वाहासाठी रक्कम देणे बंधनकारक ठरवले न्यायालयाने.....

    तार्किक दृष्टीने विचार केल्यास हा निर्णय अगदी योग्य असाच आहे.

   ‌ ‌ ही बातमी वाचली आणि अंतर्मुख मनाने माझे विचारचक्र चालू झाले. खरंच, लिव्ह इन रिलेशनशिप हा जो काही प्रकार समाजात रूढ होऊ पाहत आहे तो कितपत योग्य आहे? याला कोणताही धार्मिक वैदिक कायदेशीर किंवा नैतिक आधार आहे का ?या नात्यातील विश्वासार्हता कितपत मान्य करावी अशी आहे?अशा नाना प्रश्नांनी मनात वादळं उठवले. अशा पद्धतीने एकत्र राहण्याचा हा मार्ग व्यभिचाराकडे झुकणारा नव्हे काय? किंवा व्यभिचाराचा आधुनिक मार्ग आहे हा. असे का म्हणू नये? असाही विचार मनात रुंजी घालत होता.मन पुन्हा पुन्हा या मतावर विश्वास ठेवत आहे अशी जाणीव झाली.

     लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे नेमका काय प्रकार आहे?तर यात एक मॅच्युअर्ड मुलगा आणि एक मॅच्यूअर्ड मुलगी, स्वतःच्या पसंतीने एकत्र राहतात. एकाच छताखाली यांचे एकत्र राहणे हे इतर लोकांना नवरा-बायको रहातात हे. या सारखे वाटणारे असेच असते!

        कोणत्याही पद्धतीने लग्न करून एकत्र राहणे आणि अशा रिलेशनशिपमध्ये राहणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. असे दोघेजण जेंव्हा लग्नाच्या गाठींनी बंधनात राहतात, तेव्हा ते काही लोकांच्या साक्षीने, कोणत्या तरी कायदेशीर तत्वा वर आधारित लग्न पद्धतीने, स्वतःच्या आणि दोघांच्याही कुटुंबातील इतर सदस्यांच्या संमतीने संसार थाटावयास,एक नवीन कुटुंब संस्था स्थापन करण्यासाठी निश्चित उत्सुक असतात. नव्हे पात्र असतात. असे गृहीत धरले जाते. ते सर्वस्वी बरोबरच आहे.

   पण रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी एखादा तरी आधार आहे का? केवळ दोघांची इच्छा असणे हे काही समाजमान्य कारण नाही. त्याला कोणत्याही कायद्याचा, रुढी-परंपरांचा किंवा नैतिकतेचा आधार नाही.उलट पूर्वीच्या काळी, लग्न न करता एखादी स्त्री एखाद्या पुरुषाबरोबर काही दिवसांसाठी जरी अशी एकत्र राहिली, तर ती स्त्री त्या पुरुषाची 'ठेवलेली बाई' आहे असे कुजबुजले जायचे. केवळ शारीरिक आकर्षणातून असे संबंध जोपासले जायचे. तिने मूल जन्माला घातले तरी बायकोचा दर्जा तिला कधीच दिला जात नसे.मात्र कुत्सित नजरांचा सामना तिला अवश्य करावा लागत असायचा. असा पुरुष स्वतःच्या कुटुंबात अशा संबंधां बाबत ब्र ही उच्चारायचा नाही. सर्व चोरून-लपून चाललेले असायचे.

रिलेशनशिप मध्ये तरी यापेक्षा वेगळे काय आहे? फक्त फरक एवढाच झालाय की काळ बदलला.कोण, कोठे, कोणाबरोबर, कसे राहतो? हे जाणून घ्यावयास व त्यावर चर्चा करावयास कोणालाही वेळच नाही मुळी.

    या रिलेशनशिपला कायद्याचा पाठिंबा नाही त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यास कौटुंबिक न्यायालयातही दाद मागता येत नाही. अशा प्रकारे एकत्र राहण्याने कुटुंबाची निर्मिती होण्यापेक्षा वाताहात होण्याचीच शक्यता जास्त आहे.जुळले नाही तर 'वेगळे राहणे'नाहीतरी बंधनमुक्त असेच संबंध आहेत की हे!

    आज ही तर उद्या ती .किंवा आज हा तर उद्या तो. अशी भावना वाढीस लागू शकते.
    या नात्यांना नातं हा शब्द सुद्धा देता येत नाही.कारण स्वैराचातून तयार होणाऱ्या या नात्याला काय नाव द्यावे? यातील विश्वासार्हतेचे मोजमाप कसे करावे? दोघांची कुटुंबे यासाठी परवानगी देणार नाहीतच. परिणामी ते क्षणभंगुरच ठरतील.

‌  आजच्या तरुणाईने कुटुंबाप्रती कर्तव्य जबाबदारी टाळण्यासाठी, पण स्वतःची शारीरिक भूक भागवण्यासाठी तयार केलेली पळवाट म्हणजे लिव्ह-इन-रिलेशनशिप .असे आपण म्हणू या का?

      यात व्यवहार असेल भावनांची पाटी मात्र कोरीच राहिल.आकर्षण असेल पण प्रेम असेलच असे काही नाही. त्यातून जन्म घेणाऱ्या मुलांचे भवितव्य काय? त्यांच्यावर योग्य संस्कार होऊ शकतील का?जेथे त्यांना जन्माला घालणाऱ्या दोन व्यक्ती नात्याने नवरा-बायको नाहीतच. तर या मुलांनी त्यांना आई-बाबा तरी कसे म्हणावे?कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास होण्यासाठीचे हे एक लक्षण नव्हे काय?

    कुटुंबसंस्था ही आपल्या समाजाचा मूलभूत घटक आहे. येथे प्रत्येकाला खूप सुरक्षित वाटत असते. यालाच सुरुंग लावणे म्हणजे लिव्ह-इन-रिलेशनशिप!असे संबंध ठेवून मूल जन्माला घालण्याचा आणि त्याला दिशाहीनत्वाचा मार्ग आखून देण्याचा कोणालाही  अधिकार नाही. जन्मदात्यांना सुध्दा नाही.जन्मदात्यांच्या चुकीची शिक्षा मुलांना मिळता कामा नये.

   ‌ एका वृत्तपत्रात असेही वाचनात आले की, एका अभिनेत्रीने स्वतःचे मांडलेले मत असे, ती म्हणते, मी लग्न करेन किंवा नाही हे सांगू शकत नाही. मात्र माझी स्वतःची भरपूर मुले जन्माला येतील. केवढा हा विरोधाभास! लग्न न करता मुले जन्माला घालण्याचे व्यभिचार नव्हे तर काय?

रिलेशनशिपमध्ये राहताना केवळ शारीरिक आकर्षणच असावे का? बहिण-भाऊ किंवा निर्मळ मित्र-मैत्रिणी असे नाते का असू नये?

    शारीरिक आकर्षणातून कपडे बदलावेत तशा व्यक्ती बदलत जातील, आणि याचा अर्थ केवळ व्यभिचार असाच लावता येईल. याचा राजरोसपणे पुरस्कार वाढत गेला तर आपला समाज अक्षरशः वाहवत जाईल.सर्वत्र अराजकता निर्माण होऊन नीतिमूल्यांना काहीच अर्थ राहणार नाही.देश केंव्हा रसातळाला लागेल हे सांगता येणार नाही.

        आपल्या देशात, आपल्या संस्कृतीमध्ये संस्कारांना खूपच महत्त्व आहे. ते प्रत्येक कुटुंबातून टिकवून ठेवलेच पाहिजेत. त्यांची नव्याने रुजवणूक झाली पाहिजे.तरच अशा प्रकारच्या रिलेशनशिप मधून आजची तरुणाई दूर राहील.यातच सर्वांचे भले आहे. हे विसरून चालणार नाही.

    वयानुसार व्यक्तीने मॅच्युरिटी गाठली तरीही, मानसिक प्रगल्भता येण्यासाठी,ती टिकून राहण्यासाठी कुटुंबाचे पाठबळ असणे अत्यंत गरजेचे आहे. तरच माणसाला 'तारतम्याचे' भान राहिल असे वाटते.

     थोडक्यात सांगायचे तर अजूनही वेळ गेलेली नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने अशा प्रकारच्या रिलेशनशिप साठी विरोध दर्शवत त्यांना कॉन्सेलिंग करत, आजच्या तरुण पिढीला सावरायला हवे.त्यांना कुटुंबसंस्थेचे लग्न किंवा विवाह संस्कारांचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. तरच काही खरे आहे असे म्हणता येईल.
 
             पाश्चिमात्यांच्या चांगल्या गोष्टीचे अनुकरण निश्चित करावे. वाईट गोष्टींचे नव्हे. पाश्चिमात्त्य लोक आपल्या देशात राहून योगा संगीत किंवा इतर कलाप्रकार शिकवून त्यांचा अभ्यास करून पारंगत होतात. मग आपणही निर्धाराने त्यांच्या केवळ चांगल्या गोष्टी आत्मसात का करू नयेत?प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू पैकी एक निश्चितच चांगली असते. तिचा अंगीकार केल्यास आपले भविष्य नेहमीच उज्ज्वल असेल. पण केवळ वासनेच्या आहारी जाऊन स्वतःची अधोगती करून घेऊ नये एवढे निश्चित सांगावेसे वाटते.....

© *नंदिनी म.देशपांडे.*

  

👫👫👫👫👫👫👫👫

          ‌