सोमवार, २९ मार्च, २०२१

होळी रे होळी पुरणाची पोळी.

*होळी रे होळी पुरणाची पोळी*😋

  काय मंडळी,खाल्ली का मग शिळी पुरणपोळी? किंवा शिळया पुरणाची ताजी पोळी?संगतीला दुधातला चंद्र घेऊन?
      हे काय बोलतीए मी? संभ्रम आला ना मनात?पण असू दे, जातीवंत पुरणपोळी भक्तांना बरोबर समजलंयं बरं का माझं म्हणणं....😀
       महाराष्ट्रातील संस्कृती जेवढी प्राचीन तेवढीच या लोकांची खवय्येगीरीही प्राचीनच!
थोडक्यात माणसाचा पोटोबा शमवण्याचा मार्ग या सणावारांच्या निमित्ताने जास्त सुकर होतो असेच म्हणा ना!....हवे तर...
  कारण ऋतूचक्र हवामानातील बदल यांना जुळवून घेण्याचे कसब माणूस आपल्या खाद्यसंस्कृती मधून शिकतो असे म्हणता येईल....
     प्रत्येक मोठ्या सण उत्सवा बरोबर आपल्या एखाद्या पदार्थाचे घट्ट नातं जुळलेलं आहेच...
     अगदी गुढी पाडव्या पासून ते होळी पौर्णिमे पर्यंत....
    कधी श्रीखंड, बासुंदी, निरनिराळ्या खीरी तर कधी जिलेबी,लाडवाचे विविध प्रकार आणि वर्षाचा शेवट आणि सुरुवात मात्र,पक्वान्नांच्या महाराणी सोबतच!
     ही परंपरा कितीही मोडावी आपण असे वाटले तरीही आपल्या जीभेचे चोचले ती चुकवू देतच नाहीत... बरोबर त्या त्या सणाला तेच वैशिष्ठ्यपूर्ण पदार्थ बनवण्याकडेच कल असतो आपला.....
      आता होळी आणि पुरणाची पोळी यांचं नातं तर फारच घनिष्ठ!
पिढ्या न् पिढ्या जपले गेलेलं....
    'पुरणपोळी आवडत नाही' असे म्हणणारा माणूस सहसा पटकन सापडणं कठिणच!
   ‌‌मस्तपैकी गरमागरम पुरणपोळी त्यावर,किंबहूणा वाटीतच लोणकढं तूप!असा घास जीभेवर ठेवला रे ठेवला की,खरंच स्वर्गीय सुख ते हेच तर! असे म्हणावेसे वाटते...मग तुम्ही त्याच्या सोबतीला भले दहा पदार्थ बनवा, पण सारी फीकीच त्यापुढे!
     मग ती भजी असो,पंचामृत असो,आमटी असो,कढी असो किंवा होळीच्या पुरणपोळी बरोबरचा कायरस असू दे!
काही जण कुरडी,पापड वडा अशीही संधी साधतात पुरणपोळी बरोबर.....
मुखरस चाळवला गेला ना, मंडळी!
   हरकत नाही कालच होळी पौर्णिमा झालीए...फ्रीज मध्ये
थोडे तरी पुरण ठेवले असेलच ना शिलकीत?मस्त वेलची जायफळाचा घमघमाट येत असेल... 
मला माहित आहे,
ती एकदाच खाऊन पोट भरेल,तृप्त होईल असे घडणे केवळ अशक्यच!
     अहो दोन दोन दिवस फ्रीज मध्ये ठेवून आवडीने पोळी खाणारा वर्गही मोठ्या प्रमाणात आहे.... किंवा पुरण ठेवून पोळी बनवणारेही!
     कधीतरी एखादा 'पुरण पोळी आवडत नाही',असे म्हणणारा सापडला तर कीव येते त्याची!हे म्हणजे कोकणात राहून हापूस आवडत नाही म्हणण्या सारखं आहे....
     पुरणपोळीची श्रीमंती काय वर्णावी?
हे जेवणाचं ताटही कसं दृष्ट लागण्या सारखं दिसतं....
जणू त्या गरमागरम पोळीचं त्या तुपाच्या धारे बरोबरच्या मिलनाचा हृद्य सोहळा होतोय आणि बाकी पदार्थांची मांदियाळी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जमली आहेत....
    शिळ्या पोळीला दुधातला चंद्रच भावतो मात्र....पण पुरणपोळी आणि आमरस काय चवदार लागतं म्हणून सांगू....
प्रत्येकाची चवीष्टपणाची तह्राच न्यारी!
म्हणूनच तर पुरणपोळी माझी पक्वान्नाची राणी! मऊ मऊ लुसलुशीत अगदी ओठांनी तोडून खावी आणि जीभेवर तत्काळ विरघळणारी!
     ‌हळू हळू आपले हातपाय जगभर पसरते आहे ती...अगदी परदेशातही मिळू लागलीए हल्ली!
    पण ताज्या ताज्या पोळीची गम्मतच भारी!
अशी ही पुरण पोळी
जिला येते ती जातीवंत सुगरण गृहिणी आणि राजाची आपल्या आवडती राणी!🤗
म्हणूनच सरत्या वर्षाला निरोप देताना होळी रे होळी अन् पुरणाची पोळी!

©️
 नंदिनी म. देशपांडे.
होळी,२०२१.
औरंगाबाद.

🌹🌹🌹🌹🌹🌹

रविवार, २८ मार्च, २०२१

होलिकोत्सवाच्या शुभेच्छा...

गोकुळीच्या अंगणी
   रासरंग रंगला 

 कान्हासवे खेळण्या 
गोपिका त्या जमल्या
 
रंगरंग घेऊनिया 
 सोहळा रंगांचा 
  सजला 

गोकुळात कृष्णसखा 
रंगांमध्ये भिजला 

पितरंग सुवर्णाचा किरणा किरणांत हासला 

हरित रंग चैतन्याचा 
आसमंती भारला 

रंग गुलाबी प्रितिचा 
गाली वसला राधेच्या
 
जांभळी ती मस्त छटा 
व्यापून टाकी अंबरा
 
श्वेत शुभ्र छान साज 
दिशादिशात फाकला
 
कोमल श्यामल श्याम सावळा 
कृष्णसखा तो दंगला

रंगूनी रंगारंगात तोच 
तरीही किती आगळा!

कान्हा माझा विश्व राणा 
आहेस खूप वेगळा 
आहेस खूप वेगळा!

*होलिका पुजनाच्या सर्वांना शुभेच्छा*. 🔥

©️
नंदिनी म. देशपांडे. 
औरंगाबाद. 
मार्च, २८,२०२१.

🌹🌹🌹🌹🌹

शुक्रवार, २६ मार्च, २०२१

एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व. रामचंद्रराव आसोलेकर.

एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व,
 #श्री #रामचंद्र
#आसोलेकर
💥💥💥

     "दादा आधार देऊ का तुम्हाला? उठण्यासाठी?"
असं म्हणत मी पटकन उभी राहिले.... सोफा थोडा खालच्या लेव्हलला होता, म्हणून काळजीनं विचारलं मी दादांना...पानं वाढलेली होती,त्यांना उठून जेवणाच्या टेबला जवळ जेवणासाठी जावयाचं होतं...पण दादांनी खुणेनेच तळहात हलवत मला नकार दिला....आणि मागनं उमाचा त्यांची (सूनबाई) तिचा आवाज आला तीनही मला सुचना केली,'त्यांना आवडत नाही आधार घेणं,'मी मात्र दोन मिनिट निःशब्दच झाले....   
   
     साधारण सात-आठ महिन्यांपूर्वी आम्ही मुंबईला त्यांच्या घरी आयआयटीच्या कॅम्पसमध्ये,पवईत गेलो होतो....दादांच्या आणि आमच्या आत्यांच्या भेटीसाठी... तसे नात्याने,दादा माझे मामा... आत्यांचे यजमान... पण आम्ही सर्वजण त्यांना 'दादा' या नावाने संबोधितो... अगदी त्यांच्या भावंडांपासून, मुलांपासून आम्ही बाकीचे सर्व नातेवाईक... 

    दादा, *रामचंद्र असोलेकर*  या नावाने सर्वांना परिचित आहेत... माझ्यासाठी तर ते एक पितृतुल्य व्यक्तिमत्व...
माझ्या वडिलांच्या नंतर आदरयुक्त असणारं असंच त्यांचं माझ्या आयुष्यातील स्थान.... 
२१ सप्टेंबर १९३१  रोजी जन्मलेले आमचे दादा, आज त्यांच्या वयाच्या नव्वदी मध्ये प्रवेश करत आहेत... आणि आजही हे व्यक्तीमत्व बघून पंचविशी तीशीचा तरुण लाजेल असेच हे कार्यरत असतात... प्रत्येकासाठी अत्यंत अनुकरणीय, आदर्श, सोज्वळ,अतिशय साधी रहणी, भौतिक सुखाची कधीही आसक्ती नसणारं,कायम दुसऱ्यांचा विचार करणारं,अतिशय स्वावलंबी आणि कुटुंबासाठी,आईवडिलांसाठी ,
आपल्या माणसांसाठी अविरत कष्टणारं असंच...
किंबहूणा, "कुटुंबाप्रती कर्तव्य" हेच आपल्या आयुष्याचे ब्रिद ठेवणारे असे....

    नाकी डोळी नीटस, हसतमुख गोरापान तेजःपुंज चेहरा, मध्यम उंचीचा बांधा आणि बघणार्‍याला आदरच वाटावयास हवा असंच हे  व्यक्तिमत्व....
आजही श्री रामचंद्रराव आसोलेकर नव्वदीत आले आहेत,यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही... दोन-तीन दिवस त्यांच्या सहवासात घालवले तर, 'हे ज्येष्ठ नव्हेतच, तर नव्वदीतील तरुणच'! असेच उद्गार निघतील कोणाच्याही मुखातून...

   आई-वडिलांचं हे ज्येष्ठ आपत्य... वडील प्राथमिक शिक्षक शेतीशिवाय दुसरा बाकी आधार नाही.... पण पाठची पाच भावंडं... एवढा मोठा डोलारा सांभाळताना एकट्या वडिलांची कसरत व्हायची.... माफक शिक्षण झाल्याबरोबर नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता ,दादांजवळ....  बीएस्सी नंतर खूप इच्छा असूनही शिक्षणाला अर्ध विराम  देऊन औरंगाबादच्या शासकीय (घाटी) रुग्णालयात क्लार्कची नोकरी स्विकारली त्यांनी... त्यामुळे वडिलांना आधार होऊन भावंडांची लग्न, बहिणींची बाळंतपण, शिवाय घाटी ची सोय म्हणून नातेवाईकांची आजारपणं, त्यांची शुश्रुषा ह्यांची कायम जबाबदारी त्यांनीच घेतली... औरंगाबाद शहराचं ठिकाण म्हणून गरजवंत नातेवाईकाला शिक्षणासाठी स्वतःच्या घरी ठेवून घेणं... असे कितीतरी नातेवाईकांना, स्नेह्यांना आपल्या आहे त्या परिस्थितीत सामावून घेत असताना कोणताही अभिनिवेश नाही की उपकाराची भाषा नाही....कायम  इतरांप्रती मदतीचा हात त्यांनी दिलाय....

      त्यांच्या स्वतःच्या संसारात या दोघांशिवाय तीन मुलींसह एक मुलगा.... या चौघांनाही त्यांनी शिक्षणाच्या परिपूर्ण संधी उपलब्ध करून दिल्या...त्यांनी प्रत्येकाला उच्चशिक्षीत बनवलेले आहे... आज प्रत्येक जण ताठ मानेने आपल्या पायावर भक्कमपणे स्थिरावलेली दिसतात... मुलाला इंजिनियर बनवत,पी.एच. डी.बनवले... परदेशगमनाची संधी उपलब्ध करून दिली...आज पवई आय आयटीत तो पर्यावरण विभागाचा एच.ओ.डी.असून प्रोफेसर आहे...एक मुलगी शिक्षिका, इतर दोघी डॉक्टर म्हणून यशस्वी  झाल्या आहेत... असं सगळं सांभाळत, आपली शिक्षणाची सुप्त इच्छाही त्यांनी नोकरी करत करतच पूर्ण केली...एल.एल.बी. केले... शिवाय वयाच्या ४५ व्या वर्षी एम. एस. सी. बायोकेमिस्ट्री करुन घाटीमध्येच प्राध्यापक पदावर रुजू झाले... आज औरंगाबाद येथील कितीतरी डॉक्टर्स त्यांचे विद्यार्थी आहेत...

    या सर्व आघाड्यांवर बरोबरच कौटुंबिक जबाबदारीत तसूभरही कमी पडले नाहीत दादा... अर्थात घरातल्या आघाडीवर आमची आत्या, सौ. कुंदा रामचंद्र आसोलेकर हिची यथार्थ साथ होतीच... आजही आहेच...आमच्या आत्यांना तिच्या लग्नानंतर जवळजवळ पंचवीस वर्षे बाहेरचे कोणतेही व्यवहार करावे लागलेच नाहीत...एक तर घकामाच्या मांदीयाळीत तिला वेळही मिळायचा नाही, आणि काटकसरीनं संसार करत, घरातील सदस्यांच्या कपड्यांचं शिवणकाम करत वाचवता येतील तेवढे पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला...दादा, बाहेरची सारी कामं खंबीरपणानं
करुन संसारातील समतोल साधत....शिवाय  आत्यावर असणाऱ्या घरच्या जबाबदारीची जाणीव ठेवत घर कामातही शक्य तेवढी मदतच केली दादांनी...घरात नेहमीच पाहूण्यांचा राबता असायचा...
  
  शासकीय नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर सुध्दा दादा, पुण्यात भारतीय विद्यापीठाच्या मुलींच्या हॉस्टेलवर रेक्टर पदावर कांहीवर्ष कार्यरत होते...
  
   मुंबईसारख्या ठिकाणी सुध्दा आसोलेकर कुटुंबाच्या चार पिढ्या एकत्र राहत असत... दादांचे वृद्ध आई-वडील, ही दोघं नवरा-बायको, मुलगा-सून आणि एक नातू... अक्षरशः या सर्वांना समाधानाने एकत्र नांदताना बघून लोकांना आश्चर्य वाटायचं... आपल्या वयाच्या सत्तरी,बहात्तरी पर्यंत रामचंद्रराव आसोलेकरांना मातृपितृ सुख मिळाले...खरंच, त्यांच्यासारखे भाग्यवान तेच!

   दादा आपल्या सत्तरी मध्ये स्वतः आपल्या अतिवृद्ध आईला उचलून घेत त्यांची शुश्रूषा करत असत...

     गेली दोन वर्षे झाली, माझी आत्या बेडरिडन  आहे... २४ तासांसाठी मेट्रन ठेवावी लागते.... पण या 'करोना'काळात ती सोयही थांबवावी लागली आहे...   आज नव्वदीतही हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, रामचंद्रराव आसोलेकर, आपल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असणाऱ्या आपल्या अर्धांगिनी ची काठी बनून तिला मानसिक आधार तर देत आहेतच, पण  तिला शारीरिक आधार देत,अगदी भरवण्या पासून तिची शुश्रुषा करत आहेत ! अगदी न थकता...विना तक्रार...अजूनही आपली बँकेचीे कामं ते गाडीतून जातात, पण स्वतः करतात.... उच्चप्रतीची स्मरणशक्ती लाभलेले, आणि भूगोल या विषयाचे सखोल ज्ञान असणारे रामचंद्रराव आसोलेकर कायम अवतीभवती काय चालू आहे याचे अपडेट्स ठेवून असतात....

    असा सगळा आनंदीआनंद असताना, समाधान असताना कुठेही दादांच्या वागण्या-बोलण्यात बडेजाव नाही... कायम जमिनीवर पाय घट्ट रोवलेले असतात... 
दुर्देवानं आजारपणामूळे एका जावयानं अर्ध्यातून संसार टाकत एक्झिट घेतली या जगातून...पण, दादा आणि आत्याने आपल्या मुलीला आणि  नातवंडांना अगदी समर्थपणे मानसिक आधार देत खंबीरपणे उभं केलं आहे....नातवंडही आपापल्या पायावर स्थिर होत आहेत....

    तरुणपणातील कष्टांचा शीण कुठल्या कुठे पळून गेलाय आज दादांचा... असाच प्रसन्न तृप्तीचा आनंद, समाधान ईश्वराने त्यांच्या आयुष्यात कायम ठेवावा... या अतिशय साध्या आदरणीय व्यक्तिमत्वाला शतायुषाचा उंबरठा ओलांडण्यास ईश्वरानं साथ करावी...हिच सदिच्छा व्यक्त करते,मी आज त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने....  
    दादांना, या पुढच्या वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा देऊन त्यांना अभिवादन करते....🙏🙏
*त्वं जीव शतम् वर्धमानः।।*

©️ 
*नंदिनी म. देशपांडे.*

सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा. (कुंदा आत्या)

*सहस्त्रचंद्र दर्शन*
   *सोहळा*
🌹🌹🌹🌹🌹
        "मेल्या,थांब, तुला बघते, नंतर..."असे म्हणत, कौतुकाची नजर एखाद्याकडे टाकत,पण हसत त्याच्याकडे बघणं....ही माझ्या आत्याची, कुंदा आत्याची फार जुनी सवय...माझी कुंदा आत्या म्हणजे,
*सौ.कुंदा रामचंद्रराव* *आसोलेकर*. 
 माझ्या लहानपणापासून तिची ही सवय मी बघते आहे....मला खरंच आश्चर्य वाटायचं, कौतूक करतानाही कुणी एखाद्याला शिवी का घालतं असं ? हा माझ्या बालमनाला नेहमीच प्रश्न पडायचा....पण मग माणसाचा चेहरा वाचायचं समजायला लागलं आणि आत्याच्या बोलण्याचा रोख, तिच्या त्या कमलपाकळी अशा मोठ्या मोठ्या डोळ्यातून ओसंडणारं कौतूक, आणि खणखणीत पण प्रेमभरा आवाज ऐकला की मला त्या मागचे भाव समजायला लागले....
     अशी माझी कुंदा आत्या...अगदी आम्हा भावंडाचीच, हक्काची अशी...कारण तिला आत्या म्हणणारे  भाच्चे मंडळी फक्त आम्हीच भावंड!
     त्यामूळे बाबांपेक्षा मोठी असली तरीही आम्हा भावडांना सगळ्या आत्यांमध्ये लहान असणारी हिच आत्या....
     "आत्या" हे नातं कायमच हक्काचं, लाड करवून घ्यायचं, हट्ट पुरवून घ्यायचं आणि आईबाबांकडे आपली मागणी पुरी करुन घेताना माध्यम म्हणून उपयोगी पडणारं!
     गव्हाळ गोरापान रंग, मध्यम ऊंची, मध्यम बांधा, बऱ्यापैकी लांब सडक केस, कपाळावर मोठं लाल कुंकु.साडीचा पदर मागून घेत कमरेला खोचणं ही तिची लकब अगदी खास आहे....हे सारं तिला खूप शोभून दिसणारं असंच...
  तिच्या या साऱ्या गोष्टी तिचं जात्याच असणारं सौंदर्य आणखी खुलवत ठेवतात आजही....
    अशी माझी कुंदा आत्या आज २६ मार्च, २०२१ या रोजी तिच्या वयाची ८० वर्षे पूर्ण करत आहे....आज ती तिच्या वयाच्या 
८१ व्या वर्षात, *'सहस्त्रचंद्र दर्शन वर्षात'* 
प्रवेश करत आहे...
  या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या आरंभी कुंदा आत्याचे,माझ्या शब्दरुपी ज्योतींनी लावलेल्या निरंजनांनी औक्षवण करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न!
     त्या वेळच्या प्रथेप्रमाणे सातवी पर्यंत शिक्षण झाले, आणि आत्या लग्नाच्या बेडीत अडकवली गेली...तिच्या लग्नाविषयी घरात चर्चा चालू झाली असताना घडलेला एक किस्सा मला माझ्या मोठ्या आत्याने सांगितलेला... 
     कुंदा आत्यापेक्षा मोठी असणारी एक बहिण,तिच्या स्वतःच्या लग्नानंतर तीन वर्षांत काही आजारपणानं जात राहिली...
तिच्याच यजमानांबरोबर आपल्या ह्या मुलीचे(कुंदाचे)लग्न लावून देऊ अशी घरात चर्चा चालू झाली... आणि कुंदा आत्याने मात्र या गोष्टीला ठासून नकार दिला....तिने मोठ्या बहिणीला तिच्या गावी 'मला घेऊन चल',असा लकडा लावत तिच्या घरी (निटूरला) ही चार दिवस रहाण्याच्या निमित्ताने गेली...आणि तेथून तिने स्वतः आजोबांना स्वतःच्या लग्नाबाबत चा निर्णय स्वहस्ते मोठ्ठं पत्र लिहून कळवला....
हा तिचा विलक्षण करारी बाणा आजही तिनं जपून ठेवलायं!प्रचंड आत्मविश्वास, अभेद्य निर्णय क्षमता,परिस्थितीशी जुळवून घेणं आणि एवढंच नाही तर प्रतिकूल परिस्थितीही आपल्याला अनुकूल बनवणं तिच्यातील हे गुण खरोखरच वाखाणण्या सारखे आहेत!
     हस्ताक्षर तर अतिशय वळणदार सुंदर!तिच्या हस्तक्षरातील कितीतरी पत्र आजही असावित माझ्या माहेरी!
    किती गम्मत असते ना, भाचीचं माहेर तेच तिच्या आत्याचं माहेर!दोघींचेही 'माहेर घरची लेक' या नात्याने सारखेच लाड!त्यामूळे तर आत्या बद्दल आणखीनच आपलेपणा वाटत जातो....आपणही तिच्याच रक्ताचा पण पुढच्या पिढीचा अंश आहोत ही जाणीव फार सुखाऊन जाते...
     शिक्षणाची संधी मिळाली नाही पण, आमची कुंदा आत्या फार हुशार!काळाची पावलं बरोबर ओळखणारी आणि आपल्या एक मुलगा व तीन मुली यांना उच्च शिक्षित करताना जीवाचं रान करणारी!त्याच बरोबर नातेवाईकांच्या मुलांनाही आपल्या जवळ ठेवत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करवून देणारी....
देवावर श्रध्दा बाळगणारी पण देवभोळेपणा झुगारणारी, स्पष्टवक्तेपणा बाळगणारी, पण अत्यंत सेवाभावी वृत्तीनं,कृतार्थतेनं नाती जपत त्यांचे आदरातिथ्य करणारी!
     संसारात गृहिणी म्हणून यथार्थ पणे हातभार लावत, मामांबरोबर आनंदानं संसार पेलणारी....अशी माझी ही आत्या!
    मला नाही वाटत तिनं कधी आमच्या आसोलेकर मामांकडे (तिचे यजमान) कधी एखाद्या साडीसाठी, वस्तू साठी, किंवा एखाद्या दागिन्या साठी हट्ट धरला 
असेल....माहेर आणि सासर शिवाय कधीतरी प्रसंगानुरुप इतर दोन बहिणींच्या घरी म्हणून प्रवास करणारी आत्या, कधीच पर्यटन किंवा बदल म्हणून सुध्दा, चार दिवस बाहेरगावी जाऊन राहिली नाही...तिला त्याची कधीच खंतही वाटलीच नाही...
अतिशय समंजसपणा,
तडजोड करण्याची वृत्ती ठेवत, काटकसरीनं संसार करणाऱ्या या कुंदा आत्या कडून आमच्या पिढीला खूप काही शिकावयास मिळाले...आजही मिळत आहे....
अधुनिक विचारांची कास धरलेली, एक यशस्वी गृहिणी, अर्धांगिनी, एक उत्तम सून,उत्तम आई, सासू,आजी,आणि पणजी आजी सुध्दा... अशा विविध पातळ्यांवर च्या नात्यांवर तिने आपला ठसा उमटविला आहे...
गाण्याची आवड जोपासत सुरेल आवाजात गाणं म्हणणं हा तिचा छंद! सुगरणपणा ही दैवी देणगीही तिच्याजवळ आहेच...
     गेल्या तीन वर्षांपासून वृध्दापकाळाने घराबाहेर पडू शकत नाहीए ती, पण सर्वांची खबरबात ठेवून असते....
     आदर्श सहजीवनाचा पायंडा पाडून या उभयतांनी एक उत्तम आदर्श संसाराचं उदाहरण आपल्या पुढच्या तीन पिढ्यांसमोर  एक आदर्श म्हणून उभं केलं आहे....याचा एक भाच्ची म्हणून मला स्वतःला कुंदा आत्या आणि (दादा)श्री रामचंद्रराव आसोलेकर या उभयतांचा निश्चितच खूप अभिमान वाटतो.....
आज मामांचे वय वर्षे ९०आणि आत्याचे वय वर्षे ८० आहे....
आयुष्याच्या शतायुषाकडे चालू असणारी या दोघांची वाटचाल मृदू मुलायम मखमली वाटेवरुन चालू रहावी.... सहजीवनातील आनंद व्दिगुणीत करणारी असावी,या साठी आत्या आणि मामांना माझ्या मनाच्या अगदी गाभार्‍याच्या आतून भरभरून आरोग्यपूर्ण हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
आणि आत्याला सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्याच्या उदंड उदंड शुभेच्छा,
हार्दिक अभिनंदन आणि आत्या व मामा या उभयतांना  माझा मनःपुर्वक  नमस्कार...
🙏😊🙏

 ©️
 नंदिनी म. देशपांडे.
942241695.
औरंगाबाद. 

🌹🌹🌹🌹🌹