बुधवार, ३१ जुलै, २०१९

दीपपुजन.

*दीप पुजन*

दिवा,प्रकाशाचं प्रतिक।
दिवा मांगल्याचं लेणं।
दिवा ज्ञानज्योतिचं तेज।

उजळवू या दिशा दिशा।
लावोनिया ज्ञानदिवा।
ज्ञानदीपाच्या ज्योतिने।
नष्ट करु आंधळा विश्वास।
प्रसन्नतेच्या दिव्यानं
स्वागत करुया समाधानाचं।
अंधःकार मिटवू या।
प्रकाशाची वाट दावत।
प्रकाशित होवो दाही दिशा।
चैतन्याचा साज लेवत।
मनांमनांतील किल्मिश,मळभ।
दूर करी हा प्रकाश दर्शक।
दिव्या दिव्या दिपत्कार।
तुला माझा शत शत नमस्कार।
शत शत नमस्कार।🙏

©
*नंदिनी म.देशपांडे*

🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎

स्माईल प्लीज.

*स्माईल प्लीज*

     कुंद वातावरणाची  सकाळ ही सूर्याबरोबरच अवतरली होती दोन दिवसांपूर्वी.....काही केल्या प्रसन्नता येत नव्हतीच वातावरणात.... मनालाही कंटाळवाणेपणाचं किटण बसलं होतचं. एवढ्यातच ह्यांच्या मित्राचा फोन आला, "अरे आज जाऊया, 'स्माईल प्लीज' ला थिएटररमध्ये बघावयास.... तयार राहा दोघेही,आम्ही दोघे येतोय गाडी घेऊन."....

       झालं, मूव्ही बघायचायं तोही नवीनच मराठी.... चला स्माईल प्लीज.... यानिमित्ताने तरी वातावरणातील चैतन्य फुलेल..... कारण मुव्ही बघून मनाच्या चैतन्याला बहर येईल ना! त्याचा परिणाम सहजच बाह्य वातावरणावरही पडणारच.....

     ठरल्याप्रमाणे गेलो आम्ही मुव्हीला.....हल्ली मल्टिप्लेक्सचा जमाना.... एका एका मॉलमध्ये चार-पाच तरी सिनेमा हॉल्स.....त्यामुळे बाहेर गर्दी दिसते खूप, पण थिएटर मध्ये प्रवेश केल्यानंतर कुठेतरी तुरळक माणसं दिसतात..... खरंच, म्हणून एवढ्या मोठ्या हॉलमध्ये अक्षरशः भुतासारखे बसलोयं आपण असं वाटतं, अशा वेळी.....अशा वेळी, हमखास माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात.... ठराविकच टॉकीज पंधरा-पंधरा दिवस एकच सिनेमा...... दिवसाच्या चार ही प्रयोगांना तोबा गर्दी.....हे चित्र डोळ्यांसमोरुन तरळून जातं..... नकळतपणे तुलना होऊ लागते..... असो....विषयांतर नको.....

     आपलेच हास्य खुलवण्यासाठी म्हणून  गेलो आम्ही स्माईल प्लीज ला ! काय सुरेख अभिनय आहे सर्वांचाच! त्यातही मुक्ता बर्वे, लाजवाब!जान ओतते ती ,त्या नंदिनीच्या भूमिके मध्ये.... खूप मोठे ध्येय, महत्त्वाकांक्षा घेऊन मिरवणारी ही मुलगी.आई आणि बाबा दोन्ही भूमिका साकारत वडिलांनी लहानाची मोठी केलेली असते....तिला हवं ते पदरात टाकलं तिच्या आप्पांनी! तीनंही लहानपणापासून मिळालेल्या संधीचं सोनं करत, भरपूर ट्रॉफ्या मिळवलेल्या....

      महत्त्वाकांक्षेच्या आड येणारा नवरा सोडून देते... चार वर्षांची मुलगी त्याच्या झोळीत घालत, कोर्टाच्या माध्यमातून वेगळी होते नवऱ्यापासून.... पण नवरा व मुलगी यांच्याशी कायम सुसंवाद ठेवून असते....

      लहानपणीचा आईवरचा राग कायम ठेवत,तिला कधीही "आई" म्हणून हाका न मारणारी तिची मुलगी, नपा.त्यामुळे होणारी नंदिनीच्या मनाची घालमेल, मुलीच्या आनंदासाठी जीव ओतून प्रयत्न करणारी ही आई जेंव्हा, अगदी तरुण वयात "डिमेन्शिया"या मानसिक आजाराची शिकार बनावयास सुरुवात होते..... तेंव्हापासून चा तिचा प्रवास, पुढे काय होईल? ही उत्कंठा ताणतच ठेवतो.....

     आपण आलो होतो  'स्माईली' सायंकाळ बनवण्यासाठी हे विसरुनच जातो......
कारण आपण एखादीच हलकीफुलकी दाद हसून दिलेली असते एव्हाना.... आपलं मनसोक्त स्माईल नाहीच एकदाही नसंतंच केलेलं अजिबात.....

       पण मग लक्षात येतं की, तरुणपणातच,डेमेन्शिया‌ या मानसिक आजाराला तोंड देता देता गोंधळून गेलीयं बिचारी... बावरी झालीए....

    आपल्या महत्त्वाकांक्षा,ईप्सित साध्य करण्यात कितीतरी मागे पडलेली ही नंदिनी यातून बाहेर पडावी....विसरभोळेपणा वर मात करत,जमेल तसं आपल्या ध्येयपूर्तीसाठी चालत राहावं तिनं....तिच्या आयुष्यात नव्यानेच आलेल्या मित्राची,अं हं मित्रही नव्हेच.....एका हितचिंतकाची विराज ची धडपड आणि तिची मुलगी नपा हिचे प्रयत्न.... नंदिनीच्या आयुष्यात पुन्हा हास्य आणण्यासाठी तिला 'स्माइल प्लीज'म्हणत, आयुष्याला सकारात्मक वळण देण्यासाठी हा सिनेमा बनवलायं.... प्रेक्षकांना स्माईल देण्याची गरज पडत नाही.... पण या आजारावर मात करण्याचा प्रयत्न करत आयुष्याकडे किती सकारात्मक नजरेने खुद्द त्या पेशंटने आणि तिच्या आजूबाजूच्या लोकांनीही दृष्टिकोण स्विकारावयास हवा....ही जाणीव करवून देतो हा सिनेमा... शेवट उदासवाणा नाही तरीही खूपच सकारात्मकता स्विकारावयास लावणारा... नंदिनी साठी आणि प्रेक्षकांसाठीही अंतर्मुख करावयास भाग पाडणारा असाच! या सिनेमाचे हे सूत्र खूप भावते मनाला....अन् आपण प्रचंड समाधान घेऊन बाहेर पडतो थिएटरच्या....

©
*नंदिनी म.देशपांडे*.

✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻😄

मंगळवार, ३० जुलै, २०१९

कविता.भक्ती

*भक्ति*

श्रध्दा भक्ति ईश्वर
उपासनेचीच रुपं दोन।
मनाच्या गाभाऱ्यातलं
प्रतिबिंबच आणिक कोण।
कर्म कांडाला
फाटा देणारा
भावनेचा हा स्त्रोत।
  भक्तिमार्ग दाखवतो
माणुसकीचा झोत।
    कोंदणातून मनाच्या
चमकून जातो तोच।
    भक्ति शिकवते दयामाया।
    हिंसेचा त्याग कराया 
ईश्वराने पेरलीए मनात
     माणसाच्या भक्ति।
भक्ति मध्येच ईश्वराला
जाणून घेण्याची शक्ती।
माणसा रे तू रहा करत आवर्तनं माणूसकीची।
यातूनच साधली जाईल
ईश्वराची भक्ति। ईश्वराची भक्ति।

*नंदिनी देशपांडे*
औरंगाबाद.
दि.२८जूलै २०१९.

🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

लघु कविता.

प्रेम,गंधाळलेल्या मनाचा सुगंध।
प्रेम, हृदयीच्या ओलावा।
प्रेम,उमललेल्या नात्यांची पाकळी।
प्रेम, दुखावलेल्या जखमेवर हळूवार फुंकर।

© *नंदिनी*

🌹🌹
  
प्रेम

प्रेम रुजलेला संस्कार
प्रेम मनाचं मुलायमपण
प्रेम एक लावण्य
प्रेम एक आभुषण
🌹🌹

*गजरा**

फुल फुल वेचत
बनवलास गजरा
माळताच तो केसांत
मन हसले गालात
गजऱ्याचा रंग मोहक
त्याला प्रसन्नतेची महेक
तुझ्या श्वासाचा दरवळ
आला लहरत लहरत....

*नंदिनी*

🌹🌹🌹🌹🌹

कविता...

*आभाळमाया*

     आभाळमाया
       का अशी आटली,
      वसुंधरेला विराण
      करत सुटली ।

    आभाळमाया का गं  
अशी आटली
आम्हा लोकांचे
घसे कोरडे होण्याची ,
    वेळ का आणलीस ।

  आभाळमाया,
तोंडचे  पळवलंस पाणी
तरीही तुला ,
    आमची दया
    का ग नाही आली ।

       आभाळमाया
     झाकळून
     येतेस अवचितच ,
       आशा लावतच
   बसतो ना जीव ।

आभाळमाया   
अधीर डोळे
  सारखे तुझ्याकडे ,
  अंत आता तू
बघू नकोस ना गडे ।

  आभाळमाया,
काळ्या मेघांना  
        तू पोटाशी घे ,
       डोळ्यातून त्यांच्या
         पाऊस बरसू दे।

     आभाळमाया ,
बळीराजाच्या   
     चेहऱ्यावरचाआनंद ,
          वसुंधरेला
    डोळे भरुन
            बघू दे ।

आभाळमाया
   आम्हा लोकांना 
     पाऊस सहलींची ,
       मनसोक्त पणे
   मजा चाखू दे ।

    आभाळमाया
  अशी आटून
  जाऊ नकोस ,
लेकरांच्या तुझ्या
तोंडचा घास
काढून घेऊ नकोस ।

  आभाळमाया
तुझ्या लेकरांचा
  श्वास असा टांगणीला        
लावू नकोस।

आभाळमाया,
अशी रुसून नकोस
तुझ्या लेकरांचा
डोळा पाणी
आणू नकोस....।

©
*नंदिनी म.देशपांडे*
जूलै,२४,२०१९.

🌧🌧🌧🌧🌧🌧

*चंद्रमा*🌕

हे शांत शितल चंद्रमा
निशेच्या आकाशीच्या
               राजसा ।

बांधतअसतोस
    प्रत्येकाच्या मनाशी
                 तू धागा ।

कळतं रे कसं
         ‌‌ तुला मनातलं
निरव शांततेत साधत
    असतोस गप्पाष्टक ।

प्रेमिकांच्या प्रेमाचा
       होतोस तू साक्षी
बहिणीला भावाच्या                           
       हक्कानं तूच रक्षी।

वाढत असता
कलेकलेनं
अहंकार तू
    त्यागून टाकतोस‌ ।

कलेकलेनंच
कमी होताना सदैव
हसतमुख असतोस ।

नभांगणीच्या तारकांशी
मैत्र मात्र जोडतोस
आकाश गंगेचा प्रियतम
            बनून राहतोस।

आभा तुझी देखणी
तेजश्री त्यातूनि प्रकटी
प्रियकराच्या प्रियेचा
       तू असशी ऋणी‌ ।

मुखकमलाला तिच्या
    तुझीच रे उपमा
सौंदर्याच्या साजाने
तूच चिरंतन साजिरा
तूच चिरंतन साजिरा ।

©
*नंदिनी म.देशपांडे*
दि.२१,जूलै,२०१९
औरंगाबाद.

🌕🌕🌕🌕🌕🌕

दोन अलक

*अलक*

   सर्वार्थाने त्यागाची मूर्ती असणाऱ्या तिनं पण्णास वर्षांच्या आपल्या संसारात नंदनवन फुलवलं.पण आयुष्याच्या उत्तरार्धात केवळ एकदाच जीवघेण्या आजारपणातून बाहेर पडताना तिची असणारी माफक  अपेक्षा खाण्यासाठी फळ सोलून देण्याची पूर्ण होऊ नये, अगदी नवऱ्याकडूनही हे जेंव्हा तिला उमगले तेंव्हा तिला समजलं,उगवत्या सूर्याला नमस्कार घालणाऱ्या या माणसा साठी आपण केलेला त्याग वाया गेलाय तर...कसं ओळखता आलं नाही हे एवढी वर्ष आपल्याला?

*नंदिनी*

🤔🤔🤔🤔🤔


*अलक*

    *प्रसाद*

   मनस्वी, अक्षरशः हादरुनच गेली.गेली आठवडाभर अॉफिस सांभाळत आईच्या घरी यायची.आईला मदत व्हावी महालक्ष्मी मोठा सण म्हणून.
      ‌पुजेच्या दिवशी बाहेर गावहून आलेल्या वहिनीनं नैवैद्याचं एक ताट स्वतःच्या जेवणासाठी घेतलं नी दुसरं आपल्या मुलाला दिलं.
     आई म्हणाली अगं मनस्वीला दे ना!तर वहिनीने उत्तर दिलं त्या या घरच्या नव्हेत.परक्या आहेत.आपल्या महालक्ष्मीचा प्रसाद त्यांना कसा देता येईल?


*नंदिनी म.देशपांडे*
२१-७-२०१९.

😦😦😦😦

रविवार, २८ जुलै, २०१९

हिमालयाच्या सहवासात


*हिमालयाच्या सहवासात*
      * " देवभूमी उत्तरांचल मे आपका स्वागत है।"
  * " आपकी यात्रा मंगलमय होओ।"
   * "हम आपके पुनरागमन की अपेक्षा करते है।"
  * "आपको हुए कष्ट के लिये क्षमस्व।"
   हरिद्वार सोडल्यानंतर ठिकठिकाणी आशा आशयाचे बोर्ड वाचत वाचत चालू झालेला आमचा प्रवास मनामध्ये एक प्रकारची अदृश्य काळजीचे घर बांधतो आहे.याची हळू हळू जाणीव होऊ लागली.
     खरं म्हणजे औरंगाबाद ते दिल्ली प्रवास खूपच आधर आधर, अहो चक्क शुभ्र कापसी ढगांवर आरुढ होत विमानाने तर झाला होता. दिल्लीत पोहोचलो तेव्हा रात्र होती. त्यामुळे दिल्लीच्या  उन्हाच्या झाळा सुद्धा लागल्या नाहीत आम्हाला.
   
    
आम्ही दोघं आणि आमचे स्नेही असणारी आणखी एक जोडी.आम्ही चौघांनी मिळून ठरवलेल्या उत्तरांचल सहलीचा हा पहिला टप्पा.
     दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा साडे अकरा पर्यंत दिलीत राहलो आम्ही, पण तेवढ्याच वेळात उन्हाने आपले अस्तित्व सिद्ध केले होतं. विशाल वृक्षांच्या छायेखाली शांतपणे उभी राहात आमची बस प्रवाशांची वाट बघत उभी असल्याने उष्णतेची तीव्रता तेवढी सतावत नव्हती.
     तासा-दीड तासातच देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे सर्व सहप्रवासी बसमध्ये विराजमान झाले, आणि मग मात्र आमच्या बसनेही आपला एसी चालू करत,साऱ्यांची गर्मी पळवून लावली. जून चा मध्य होता तरीही काही त्रास वाटला नाही. सुंदर रस्ते,स्वच्छ सूर्यप्रकाश, भरपूर वृक्षराजींनी हवेमध्ये आणलेला सुखद गारवा आणि डोळ्यांना मिळणारा थंडावा या साऱ्या गोष्टींचा आनंद घेत घेत आमची बस दिल्लीच्या बाहेर पडत हरिद्वारच्या रस्त्याला लागली.
  
     
पण, दिल्ली आपल्या देशाच्या राजधानीचं शहर. किती स्वच्छ सुरेख,हिरवाई ने नटलेले.जणू काही सर्व  पूर्वनियोजित दृष्टिकोन ठेवून वसवलेले एक मोठं शहर.परदेशी पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत त्यांच्या मनावर आपली छाप उमटवण्यात आणि आपल्या देशाची मान उंचावण्यात यशस्वी ठरलेलं शहर.भारत मातेच्या या राजधानीकडे बसच्या काचांमधून निरखत असताना,काय कौतूक ओसंडून वाहात होतं आमच्या उभयतांच्या चेहऱ्यावर!
    रस्ता छानच असल्यामुळे भन्नाट वेगाने चालणारी आमची बस आणि मी ऐकत असलेली गाणी यांच्यात छान पैकी एक लय निर्माण झाली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास हरिद्वार या पवित्र शहरात प्रवेश करताच गंगामातेचे दर्शन झालं. शुभ्र धवल दुधी रंगाचं फेसाळतं पाणी आपल्या छोट्या छोट्या तरंगांनी प्रवाहाचा वेध घेताना दिसत होतं गंगेच्या दोन्ही तीरांवर भाविक पवित्र स्नान करत तिच्या पुढे नतमस्तक होत असताना दिसत होते. गंगातीर माणसांच्या गर्दीने आणि प्रसन्नतेने फुलून गेला होता अगदी. येथून जात असतानाच सायंकाळची गंगा आरती बघण्यासारखी असते ही माहिती मिळाली.
    बारा महिने अठरा काळ दुष्काळाच्या वेदना सहन करणारे आम्ही महाराष्ट्रातील काही मराठवाडी मंडळी, विशाल खळाळते पात्र बघत आनंदित आणि अचंबितही झालो होतो, यात शंकाच नाही.
    रात्रीचा मुक्काम हरिद्वारला एका छानशा हॉटेलमध्ये झाला. त्यामुळे पुरेशी झोप आराम करुन दिवसभराच्या प्रवासाचा न आलेला शीण केंव्हाच पळून गेला आमचा.
     दुसऱ्या दिवशी मात्र एक प्रवासी म्हणून खरी परीक्षा होती आमची. कारण सलग बारा तास बस मध्ये बसून असणार होतो आम्ही.
हरिद्वार ते स्यानचट्टी असा होता हा प्रवास.
    खरं म्हणजे,उत्तरांचल राज्यात प्रत्यक्ष येण्याची,आमची ही पहिलीच वेळ होती.तरीही,ईतर नातेवाईकांकडून डेहराडून अणि नैनिताल चे पर्यटनासाठी असणारे महत्व ज्ञात होते.त्यावरुन सहज, सरळ,सोपा सुखकर प्रवास अशीच प्रतिमा तयार झाली होती मनात.
      हरिद्वार ते स्यानचट्टी व्हाया डेहराडून,प्रवासास सुरुवात झाली. आणि मी अगदी सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे उत्तरांचल शासनानाने लावलेले स्लोगन्स वाचावयास मिळू लागले.ते वाचून निश्र्चितच प्रवासाचा आनंद व्दिगुणित होत होता.येथील शासनाला प्रवाशांची किती काळजी आहे ही होणारी जाणीव मनाला सुखावत होती.
     प्रवास चालूच होता.अंतर कमी होतं, तरीही वळणावळणांमूळे वेळ भरपूर लागायचा.असेच पुढे जात असताना मोठ्या मोठ्या पहाडांनी आपले दर्शन द्यावयास सुरुवात केली.किती नेत्र सुखद दृश्य होते ते! वळणा वळणाचा रस्ता,प्रत्येक वळणावर स्वागतासाठी सज्ज उंच हिमालयाचा एक एक पहाड.दुसऱ्या बाजूनं निसर्गानेच तयार केलेली दरी आणि या दऱ्यांमधून शांतपणे शुभ्र जलाला कवेत घेऊन एखाद्या कुमारवयीन बालिके प्रमाणे हसत खळाळत निरागसतेने वाहणारी नदी. अहाहा! काय मनोहरी नजराणा होता हा आमच्या डोळ्यांसाठी!
    घाटाचा रस्ता चालू झालेला, त्यामूळे गाडीचा एसी बंद करण्यात आला होता.माझ्यासाठी ही एक छान पर्वणीच ठरली.माझ्या बाजूच्या खिडकीची काच संपूर्णपणे उघडी ठेवत मी, निसर्गाच्या या आविष्काराच्या सान्निध्यात भरभरुन आनंद मिळवायचाच असं ठरवलंच होतं.
     नेत्रसुखद,विलक्षण देखणं निसर्गाचं हे प्रसन्न रुप! सोबतीला थंडगार वाऱ्याची येणारी झुळूक मनोमन सुखावणारा या हवेचा लाघवी स्पर्श.मनाचा मोर आनंदाने थुई थुई न नाचला तरच नवल ठरावे! असं सगळं आल्हाददायक वातावरण!
      खरं तर अशा प्रवासात  तेही दिवसाच्या वेळी गाडीच्या काचा बंद करत,पडदे ओढून वामकुक्षी घेणाऱ्या लोकांची मला या वेळी प्रचंड कीव कराविशी वाटत होती.
     निसर्गाचा हा नजराणा सलग बारा तेरा दिवस आपण अनुभवणार आहोत,त्याचा यथेच्छपणे आस्वाद घ्यावा,हे सारं नटलेल्या निसर्गाचं रुप डोळ्यांत व शक्य तेवढं कॉमेरा मध्ये बंद करुन ठेवावं अशीच भुरळ कुणासही पडावी असंच होतं सारं सभोवताल!
  
ज्याचा त्याचा'दृष्टिकोण'.म्हणून मी दुर्लक्ष केले त्याकडे.पण माझ्या हक्काच्या माणसाला, माझ्या जीवनसाथीदाराला मात्र हा आनंद भरभरुन घेण्या विषयी सुचित करण्याची आग्रही भुमिका मात्र घेतली होती मी.
     आपण पुनःपुन्हा न येवू शकणाऱ्या या मार्गावरचा स्वच्छंदी अनुभव मनाच्या नि शरीराच्या कणाकणात भरुन घ्यावा असाच हा प्रवास होता.
     माझं मात्र चौफेर निरिक्षण चालू होतं.पहाडांचं सौदर्य त्यांच्या आकारात,रंगात,त्यांवर हवे तसे उगवलेल्या हिरव्यागार वृक्षराजींवर, तसेच त्यांच्या उंचीवर, आणि अर्थातच त्यांना साथ देणाऱ्या दऱ्यांवर अवलंबून असतं हे हळूहळू लक्षात येऊ लागलं होतं एव्हाना.येथील पहाडांवर मनसोक्तपणे रेंगाळणाऱ्या सुचीपर्णी वृक्षांसोबत आंब्याची कितीतरी वृक्ष ताठ मानेनं उभी होती.त्याच प्रमाणे लिचीची झाडं,सफरचंदाची झाडं आणखीण बरीचशी मसाल्याच्या पदार्थांची झाडं या सर्वांनी गर्दी जमवलेली होती.तरीही पायथ्याशी आपल्याकडच्या कढीपत्त्याची बारीक बारीक रोपं लुसलुशीत कांतीनं डौलात चमकत होती.
      या‌ प्रदेशात मिळेल तेथे सपाट जमीनीवर दाट आमराईने आपलं राज्य उभं केलेलं होतं.महाराष्ट्रामध्ये आंब्याचा मौसम संपत चाललेला असताना, उत्तरांचल मध्ये मात्र कैऱ्यांनी लखडलेली झाडं,आमच्याकडे बघत हासून आमचं स्वागत करत आहेत असं वाटत होतं.
      सुरुवातीला असणारी वळणं ज्यावेळी अधिकाधिक चक्राकार बनत चालली होती. तसं हिमालयाच्या रांगा दृष्टीक्षेपात येण्याचं प्रमाणही वाढतं झालं होतं.त्याच जोडीला दऱ्यांच्या खोलीचं प्रमाण विलक्षण खोल खोल जात,त्या जमिनीशी जास्तीत जास्त सलगी करताना दिसत होत्या. त्यांमधून वाहणार्‍या नदीचा प्रवाह अजूनच बारीक, अरुंद, शांत एखाद्या आखून दिलेल्या मार्गावरुन चाललायं हे लक्षात येऊ लागलं. रस्त्यांची रुंदी अरुंद झालेली दिसत होती. त्यातही रस्त्यांना कठडे नावाचा प्रकार गायब होता. आणि अधूनमधून उपरोक्त सुचनांच्या पाट्या. अंगावर रोमांच उभे करणारा हा निसर्ग तेवढाच हवाहवासा होताच.आम्ही घाट उंच उंच चढत जात आहोत याचेच हे निदर्शक होतं.आम्हाला वाट दाखवणारी तिच्या उगमाकडे घेऊन जाणारी ही या दऱ्या खोऱ्यातून वाहणारी आमची मार्गदर्शक सोबतीण यमुना नदीच तर  होती ना!
     यमुना, गंगेच्या बरोबरीने नाव घेतले जातं अशी यमुना. जमुना,कालिंदी अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी, हिमालय पर्वतांमधूनच उगम पावणारी, गंगेची बहीणच ही! गंगोत्रीच्या अगोदर या यमुनोत्री च्या उगमस्थानाच्या दर्शनासाठी आम्ही पोहोचलो ते ठिकाण होते,स्यानचट्टी हे गाव.
    चौफेर हिमालयाच्या रांगांमध्ये, हिरव्यागार जंगलाच्या वनराईमध्ये,शुद्ध स्वच्छ हवेच्या स्त्रोतात खेळणाऱ्या पहाडातून छोटे-मोठे जलस्त्रोत मनसोक्तपणे आपल्या अंगावर खेळवणारे आणि यमुना मातेच्या उगमस्थानाच्या दिशेनं  घेऊन जाण्याचा एक टप्पा असणारे हे स्यानचट्टी.
      दिवसभराच्या प्रवासाला विराम देत,दुसऱ्या दिवशी सकाळीच यमुना मातेच्या मूळ स्थान कडे प्रस्थान करण्यासाठी,अशा आल्हाददायक वातावरणात आम्ही दोन दिवस घालवणार आहोत, ही बाब खूप आनंद देऊन जात होती. याच समाधानात निद्रादेवीने आमच्यावर आपले पांघरुण घातले होते. आणि उद्याच्या अनुभवासाठी सज्ज राहण्यास सांगितले होते तोपर्यंत. कारण येथूनच आमच्या उत्तरांचल चारधाम यात्रेचा श्रीगणेशा होणार होता ना !
*यमुनोत्री*
    वर असणाऱ्या या टप्प्यावरुन, यमुनोत्री कडे प्रस्थान करण्यासाठी आमची बस हिमालय पर्वतांवर रस्तारुपी वळणावळणातून चढाई करत जानकी चट्टी ला येऊन पोहोचली.
     'चट्टी' हा काय प्रकार आहे?आश्चर्य वाटले ना?याबाबत पुढील भागांमध्ये ओघानेच स्पष्टीकरण येणार आहेच.
   तसाच आल्हाददायक रोमांचित करणारा निसर्ग, ज्याने आम्हा प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ न देता, पुरेपूर काळजी घेतली होती. कारण या भागात निसर्ग कायम लहरी प्रमाणे वागत असतो, एकाच वेळी तीनही ऋतू अनुभवास येऊ शकतात. या म्हणण्याला किती विश्वास ठेवावा असा प्रश्न आम्हालाच पाडला होता त्याने. सकाळची मस्त निसर्ग सैर करत, २६५०मीटर उंची असणाऱ्या जानकी चट्टीवर आम्ही बसमधून उतरत असताना,यमुनोत्री च्या उगमापर्यंत आणि मंदिरापर्यंत भाविक पर्यटकांना पोहोंचवण्यासाठी, सवारी मिळवण्यासाठी डोलीवाल्यांनी आणि घोडे (खेचर) वाल्यांनी बसच्या दरवाज्यापाशी तुफान गर्दी केली होती.  त्यावेळी मला अक्षरशः आमच्या औरंगाबादची आठवण झाली. पुण्याहून औरंगाबादला उतरल्यानंतर बाबा पेट्रोल पंपाच्या बस थांब्यावर ऑटो वाले जशी गर्दी करतात ना, ती आठवण आल्याशिवाय रहावले नाहीच. असो.
जानकी चट्टी पासून आणखी वर म्हणजे, ३१६५ मीटर उंचीवर यमुनोत्री ला जाण्यासाठी आम्ही डोलीने जाण्याचा पर्याय निवडला. हे अंतर सहा किलोमीटर आहे. खूप जण पायी जाणं पसंत करत होते. पण, आम्हाला ते कदापीही शक्य झाले नसते. खेचरांचा पर्यायही उपलब्ध होता पण त्यातही सुरक्षेची हमी वाटली नाही. म्हणून उरलेला पर्याय डोली.केवळ लाकडाच्या पट्ट्या आणि रुळ वापरुन बनवलेली डोली, बसणाऱ्याला बऱ्यापैकी पाय लांब करत आरामात बसता येईल अशीच बनवलेली बघावयास मिळाली. डोली बनवताना बनवण्यामध्ये मजबूती आणि नजाकत या दोन्हींचाही मिलाफ बघावयास मिळाला. यावेळी वैष्णोदेवीला डोलीने गेलो होतो आम्ही, तो प्रसंग डोळ्यांपुढे आला.पण तेथील डोल्या केवळ लोखंडी धातू पासून बनवलेल्या होत्या.
    खरं म्हणजे आपल्या शरीराचे ओझे असे दुसऱ्यांच्या आठ खांद्यांवर लादून पुण्य मिळवण्याचा मार्ग मनाला न पटणाराच. त्या भागातील स्थानिक आणि नेपाळ मधून पोटासाठी आलेले नेपाळी तरुण हे मुख्य लोक प्रमुख्याने आहेत या व्यवसायात. आम्ही माहिती घेतली त्यावेळी या श्रमिक लोकांशी व्यवहाराबाबत कोणत्याही वाटाघाटी न करण्याचे आणि ते मागतील तो आकडा त्यांना मोबदल्याच्या रुपानं द्यावयाचे असे पूर्विच ठरलेले होते आमचे. माझ्या डोलीचे चारही वाहक नेपाळी तरुण, सुस्वभावी आणि खूपच नम्र वागणारे आहेत हे थोड्याच वेळात लक्षात आले.अधनं मधनं नाश्ता जेवण वगैरे चे बिल मागताना,"एवढे एवढे बील झाले, पण तुमच्या इच्छेनुसार जेवढे द्यावयाचे तेवढेच द्यावेत मॅडम...." असे म्हणत होते त्यावेळी माझ्या पोटात कालवाकालव चालली होती. बिचारे, पोटासाठी येथे एवढे कष्ट करतात येऊन ते, आणि ज्यांच्या जीवावर आपल्यासारखे भाविक, पर्यटक पुण्य मिळवतात,तेथे अशा बारीकसारीक रकमेच्या हिशेबाचे आकडे मोजणे म्हणजे निव्वळ क्षुल्लक बाब होय.
     जानकी चट्टी ते यमनोत्री केवळ सहा किलोमीटरचे अंतर पण ती पहाडाची अगदी चढणच होती. छोट्या छोट्या अंतरावर गोल गोल आणि अवघड वळणं,त्यातही असणारा रस्ता केवळ सहा फूट रुंदीचा. त्यातच डोली वाले, खेचरावरुन जाणारे आणि पायी चालणारे ह्या सर्वांच्या चालण्याच्या कसबाला त्रिवार कुर्निसातच घालावासा वाटला.
      एकाबाजूला भलामोठा सह्याद्रीचा भिडू आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी.जमिनीचा तळ दिसणे केवळ अशक्यच. यमुना माता वसुंधरेला आलिंगन घ्यावयास उत्सुक आणि आम्ही यमुनेच्या उगमाकडे जावयास उत्सुक! तिचा प्रवास खालच्या दिशेने चालू होता तर आमचा वरच्या दिशेने!
    पण या निसर्गाचे किती किती आणि काय काय वर्णावे ते अद्भुतपण! संपूर्ण पहाडाने हिरवीगार चादर आपल्या अंगावर ओढलेली.झोंबणारा गारवा देणाऱ्या हवेच्या झुळकी. काळया आणि पांढऱ्या मेघांचा लपंडाव. पहाडांची आकाशाला गवसणी घालण्याची स्पर्धा. आणि माणूस नामक जीवाला यमनोत्री च्या दर्शनाची ओढ हे खूपच विलोभनीय सौंदर्य! पहाडांच्या वरच्या पातळीवरुन जेंव्हा आपण सहजच वळण घेत असताना खाली बघतो ना,त्यावेळी आपल्या हृदयाचा ठोका चुकेल की काय? अशी वाटणारी निःशब्द भीती. सगळंच विलक्षण आणि शब्दातीत. त्यावेळी या डोली वाल्यांच्या पायावर डोकं ठेवावयास हवं असे वाटणारा हा क्षण.
     यमुनोत्री च्या मंदिरा जवळ जेंव्हा आपण डोलीतून पायउतार होतो ,त्यावेळी होणारा आनंद उपभोगावा असाच. कारण त्याचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्यच.
    यमुनोत्रीच्या स्वच्छ पाण्याच्या खळखळाटाच्या नादाने संपूर्ण वातावरण भारुन गेललेे होते.नदीचे पात्र बऱ्यापैकी रुंद आणि यथेच्छ प्रवाह  पाहून, हा अगदीच काही उगमच नसावा या निष्कर्षाला आपण
    आपसूकच येतो.  आणखी काही अंतरावर असणाऱ्या उगमाकडे जाण्याची वाट अशी बिकट आणि तेथे पोहोचू शकणारच नाही कोणीही अशा निसर्गाचे राज्य.त्यामुळे तसा प्रयत्न करणे म्हणजे आपल्या अंताकडे जाणे होय.
     पण येथे आल्यानंतर प्रत्यक्ष यमुना माता खेळताना  बघणे आणि तीही जवळून, त्याचबरोबर संगमरवरी मूर्ती रुपातील तिचे रुप डोळे भरून पाहणे म्हणजे,खरंच आपलं परमभाग्यच! असं वाटल्यावाचून राहत नाही. विशेष म्हणजे जेथे थंडगार पाण्याचा खळाळता प्रवाह आहे त्याला समांतर वाफाळलेल्या गरम पाण्याचंहीे कुंड आहे. तेथे स्नान करण्याचा आनंद बरेच भाविक घेत होते.बऱ्याच ठिकाणाहून गरम पाण्याचे छोटे मोठे झरे वाहत होते.काही ठिकाणी तर कुंडीतील तांदूळ पाण्यात टाकले  काही वेळ तर त्याचा भात शिजत होता. निसर्गाच्या या चमत्काराने खरोखर तोंडात बोट घालण्याची वेळ आणली होती.
    वाहत्या यमुनेला मनापासून नमस्कार करत तिची साडीचोळी ने ओटी भरली.दोन्ही डोळ्यांमध्ये यमुनोत्रीचे हे रुप शक्य तेवढे साठवून ठेवताना कृतार्थतेच्या भावनेने माझ्या डोळ्यातून गंगा-यमुना वाहत आहेत हे लक्षात आलं. पुन्हा एकदा तिच्याकडे बघत हात जोडत,आम्ही खाली जानकी चट्टीवर उतरावयास सुरुवात केली. कारण आकाशातही श्यामल मेघांची बरसण्यासाठी गर्दी जमली होती.
डोलीत बसलो तरीही, उतरत असताना घोड्यावर बसल्याची जाणीव होत होती.डोली वाहकांचा या उतारावरुन पळत पळत चालण्याची एकसारखी गती, परिणामी त्यांच्या पावलांचा आवाज घोड्याच्या टापां प्रमाणे येत होता. तर बसणाऱ्याला त्याच्या शरीराची हालचाल घोड्यावर स्वार झाल्यासारखी होते आहे असं जाणवत होतं.
       अगदी नम्रपणे बहेनजी,मांजी,नानाजी, भाईजी रस्ता दो रस्ता दो.असे म्हणत म्हणत ,  येताना तासाभरात आम्ही जानकी चट्टीवर पोहोंचलो देखील.जाताना याच अंतराला अडीच तीन तास लागले होते.  आमची बस आमची वाट बघत उभी होतीच.
    डोलीतून पायउतार झाल्यानंतर डोली वाल्यांना बक्षीसासह त्यांचा मोबदला बहाल करताना त्यांचे कष्ट आणि त्यांच्या चेहर्‍यावर तेज बघून ऊर भरून आल्याशिवाय राहिला नाही.
      उरलेल्या दिवशी आराम घेत पुन्हा दुसऱ्या दिवशी अशीच एक सवारी घेऊन  त्यांना यमुना मातेचा आशिर्वाद घ्यायचा होता. कृतार्थ भावाने आम्ही आमच्या घरवजा निवासस्थानी परतलो.
    होय,आम्ही जिथे उतरलो होतो ते  निवासस्थानच होते. हॉटेल वगैरे चा अजिबात लूक नव्हता त्याला. कारण एवढ्या दुर्गम भागात जेथे केवळ सहा महिनेच लोकांची चहलपहल असते,त्या ठिकाणी हॉटेल व्यवसायिक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार नाहीत, हे कुणालाही पटकन लक्षात येण्यासारखे होते.त्यामुळे उपलब्ध जागे मध्ये आपली दोन दिवस राहण्याची सोय झाली हे समाधानही खूप मोठा दिलासा होता आमच्यासाठी.
     येथे दोन दिवसांच्या वास्तव्यात बकेटात गरम पाणी आणून दिल्यानंतर होणारी अंघोळ खूप वर्षांनी अनुभवली.
       जानकी चट्टी वरुन परत आल्यानंतर आमच्या निवासस्थानाच्या गच्चीवर चौफेर पहाडांच्या साक्षीने आम्ही दोघी मैत्रिणी,   निसर्गाचे अवलोकन करत करत मन भरुन निवांत गप्पा करत बसलो.कितीतरी वेळ....असा निवांतपणा घरी आल्यानंतर मिळणे केवळ अशक्य होते.
     त्याचवेळी या निवासाच्या घरमालकांना आम्ही बोलता बोलता माहिती विचारली.हे सत्तरीतले घरमालक तब्येतीने अगदी काटक आणि निरोगी होते निसर्गाची आभाळमाया या लोकांवर चांगली होती त्याचा परिणामच म्हणावा हा.त्यांनी सांगितल्या नुसार, असेल तेथे सपाट जमिनीवर शेती हा व्यवसाय येथील लोक करतात. आणि शेतीतून प्रामुख्याने गहू आणि बटाट्याचे उत्पादन घेतात. त्यांच्या चेहऱ्यावर पर्यटकांची सेवा करण्याचे समाधान ओसंडून वाहत होते.
     ज्या पहाडांच्या संगतीने आम्ही मैत्रिणींनी हितगुज केले होते, तेथे अंधार पडल्यामुळे  काळेकभिन्न दिसणारे पहाड आपण बघूच नयेत असे वाटू लागले. या वेळी मात्र आम्ही आमच्या खोली मध्ये जाऊन आराम करणे पसंत केले. कारण दुसर्‍या दिवशी गंगामातेच्या दर्शनासाठीचा असणारा पायथा आम्हाला गाठायचा होता.

* उत्तर काशी *
   यमुनोत्रीच्या दर्शनाने तृप्त झालेल्या मनाला आता मात्र गंगोत्रीच्या दर्शनाची ओढ लागली होती.ती पूर्ण करण्यासाठी तिच्या पायथ्याशी असणाऱ्या मोठ्या शहरात आम्हाला पाच तासांचा प्रवास करत, उत्तरकाशीला पोहोचणे आवश्यक होते. स्यानचट्टी ते उत्तर काशी केवळ एकशे दहा किलोमीटरचा प्रवास होता.पण पाय मोकळे करावे यासाठी आणि जेवणासाठी चा ब्रेक घेत तिथे पोहोचेपर्यंत पाच तास लागणार होते.तीव्र घाटाच्या रस्त्यांवरून प्रवास करताना असा वेळ लागणे सहाजिकच होते. आम्हीसुद्धा देवदर्शन आणि पर्यटन यासाठी तर निघालो होतो ना, मुद्दाम घर सोडून. अशा अतिसुंदर संगीतमय सदाबहार आणि विविध रंगी निसर्ग सफर करण्याचा कंटाळा येणे शक्यच नव्हते. वसुंधरेच्या या सुंदर रुपाचे अवलोकन करत करत , चालू असणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाच्या लढतींवर वर गप्पाष्टकं आणि प्रत्येक वळणावर होणाऱ्या आपल्याच शरीराच्या हेलकाव्यांनी  प्रवासात रंगत आणली होती.असा सुंदर प्रवास कधीच संपू नये असेही कुठेतरी वाटत होते.
     रस्त्यामध्ये गाडी थांबवून कोणत्याही व्ह्यू पॉईंट ला उतरावे अशी तेथे सोयच नव्हती. कारण रस्त्यांची अरुंद आणि अतिवळण रचना. समोरुन येणारे वाहन असेल तर, अलीकडच्या वाहनाला  थांबावेच लागायचे. आणि मग समोरचे वाहन निघून जायचे. पण गंमत म्हणजे दोन्ही वाहनांना रस्त्यावर मिळणाऱ्या इंच इंच जागेचा अंदाज घेऊनच गाडी थांबवावी लागायची. कारण एका गाडीच्या बाजूला भलामोठा पहाड,बाहेर आलेल्या मोठमोठ्या दरडी, तर दुसऱ्या गाडीच्या बाजूला खोल खोल दरी. दोन्ही गाडीतील प्रवाशांना परस्परांशी हस्तांदोलन करता येईल एवढ्या या गाड्या जवळून जायच्या परस्परांच्या! या वेळी तेथील ड्रायव्हर लोकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे अशी भावना होती प्रत्येकाच्या मनात.
खरं म्हणजे उत्तरांचल मध्ये तेथील अख्खा निसर्ग हाच एक मोठ्ठा व्ह्यू पॉइंट होता,माझ्या दृष्टीने!अशा या निसर्ग सफरीचा आनंद लुटत लुटत आम्ही शहराच्या जवळ येऊ लागलो आहोत हे लक्षात आले. समुद्रसपाटीपासून ११५८ मीटर उंच असणाऱ्या उत्तर काशी या शहरातून हिमालय पर्वतांच्या मधुन उगम पावणाऱ्या बऱ्याच छोट्या मोठ्या नद्यांचे प्रवाह वाहत येतात.
    "नदीकिनारी गावे वसवली जातात हे इतिहासातील गृहीत तत्त्व होय." घाट उतरत उतरत असतानाच, पहाडांच्या कुशीमध्ये, वसुंधरेच्या मांडीवर, भागीरथी (गंगा) नदीच्या दोन्ही किनाऱ्यालगत उत्तरकाशी हा, उत्तरांचलमधील प्रमुख मोठा जिल्हा वसलेला आहे.हे दृष्टीक्षेपात आले.
     काय विहंङम दृश्य दिसत होते ते!उंचावरुन या शहराचे!शुभ्र पांढरी खळाळती भागीरथी,वळणावळणाचे टप्पे घेत, येथील नागरिकांशी हितगुज करत आहे असा भास होत होता. शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या वरच्या पातळ्यांवर वर्षभरात बराच काळ पाण्याचा प्रवाह गोठत असावा.म्हणूनच अगदी किनाऱ्यांवर लोकांनी पक्की घरे बांधून राहण्याची हिंमत केली असणार. नदीचा प्रवाह  लहान शांत मुलांसारखा, चोहोबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार पहाडांच्या रांगा, वसुंधरेने पांढराशुभ्र बारीक वाळू कणांचा केलेला पेहराव!येथे राहणाऱ्या नागरिकांचा दररोजचा दिवस कित्ती प्रसन्नपणे उगवत असेल कल्पना करा!
    दुपारच्या तीन चार वाजताच आम्ही हॉटेलवर पोहोचल्यानंतर,थोडासा आराम करून सायंकाळी सहा वाजता आम्ही उत्तरकाशी शहरातून फेरफटका मारावयाचे ठरवले.तेथे असणाऱ्या मुख्य धार्मिक स्थळांनाही भेटी द्यावयाच्या होत्याच उत्तर काशी या शहरालाही धार्मिक पार्श्वभूमी आहे. येथे अगदी गावातच प्रसिद्ध अशा स्वयंभू  काशीविश्वेश्वराचं मंदिर आहे.या मंदिरात असणारी महादेवाची पिंड ही,वाराणसी (काशी) येथील मूर्तीशी साधर्म्य साधणारी असावी, असा माझा तर्क. म्हणूनच ही 'उत्तर काशी' म्हणून नावारुपाला आली असेल, असा माझा कयास आहे. येथील महादेवाची पिंड किंचितशी उजवीकडे झुकलेली असल्याचे स्पष्ट दिसून येते.
   याच मंदिर परिसरामध्ये एक शक्ती मंदिरही आहे.पण तेथे देवीची मूर्ती नाहीए, तर सहा मीटर उंच आणि भव्य असा त्रिशूल  युगानुयुगे अखंड उभ्या अवस्थेत आहे. जेव्हा देव आणि दानव यांच्यात युद्ध चालू होते, त्यावेळी दुर्गादेवीने आपल्या हातातील त्रिशूळ दानवांना मारण्यासाठी स्वर्गातून फेकला होता. तोच त्रिशूळ जमिनीवर या ठिकाणी मातीत रुतून बसला. तेंव्हापासून तो असाच आहे.अक्षरशः भारावून टाकणारी ही अख्यायिका होय.  खरे खोटे त्या देवांनाच ठाऊक. पण एक पर्यटक म्हणून आपण जेव्हा अशी हटके ठिकाणं बघतो ना, तेंव्हा त्यामागील रहस्य या अख्यायिकांच्या रुपाने ऐकून घेण्याची मनुष्य प्रवृत्ती असते. त्याला काहीतरी धार्मिक अधिष्ठान असले म्हणजे, आपोआपच दोन हात जोडले जातात.मनही प्रसन्न होतो.
     यानंतर शहरातून थोडासा फेरफटका मारला.कारण आवश्यक असणारी औषधं, काही वस्तू, किंबहुणा एटीएम सेंटर यानंतर कुठेही उपलब्ध नसणार ही कल्पना होतीच.या संबंधीची  कामं येथेच आटोपणं  आवश्यक होतं.
    नदीकाठावरचं  शहर, चढ-उतारांचं आणि गजबजलेलं होतं. येथीलच नव्हे तर एकूणच उत्तरांचलमध्ये फिरत असताना फळभाज्या, पालेभाज्या, विविध प्रकारचे रसरशीत फळं, आणि मसाल्याचे पदार्थ यांची चंगळ दिसली. पाण्याला तर काही कमीच नाही.  पहाडांमध्येही ठीकठिकाणी  स्वच्छ वाहत्या पाण्याचे झरे, धारा ओसंडून  वाहत येताना दिसायच्या. जाणारे-येणारे वाटसरु याच धारांना एखादा प्लास्टिक पाईपचा तुकडा किंवा रिकाम्या पाण्याच्या बाटलीचा पाइप सारखा उपयोग करत,ते स्वच्छ नैसर्गिक पद्धतीने निर्जंतुकीकरण झालेलं थंडगार गोड पाणी पित होते. किती छान असेल नाही हा अनुभव! असे अनुभव मिळावयास खरंच भाग्य लाभायला हवे तेही  खरंए.
सुर्यास्ताला आम्ही हॉटेलवर परतलो. जेवण वगैरे आटोपून हॉटेलच्या बागेमध्ये आम्हा दोघी मैत्रिणींची गप्पांची बैठक बसली. पुरुष मंडळी वर्ल्ड कप चा सामना बघण्यात रममाण झाली होती.
   आम्ही दोघी बसलो होतो तेथून,हिरव्यागार पहाडांच्या उंच उंच रांगा सुंदर दिसत होत्या. जसजसा अंधार पडू लागला तसा त्या पहाडांवर काहीतरी लकाकत असल्याचे जाणवले.सुरुवातीला दुर्लक्ष केले आम्ही. तरीही वारंवार तिकडे लक्ष जातच होते. तासाभरातच ती लकाकी ज्वालांची होती हे लक्षात आले. कारण पहाडांवरील जंगलात वणवा लागलेला होता. आणि तो क्षणाक्षणाला पसरत चाललेला होता. तेथील स्थानिक नागरिकाला याविषयी विचारले असता,त्यानेही नेहमीचीच घटना आहे.  पहाडांवरील दगड गोटे घरंगळत एकमेकांवर आदळतात, आणि त्यातून निघणार्‍या ठिणगीने वणवा पेट घेतो,असे सांगितले. हा निसर्ग नियमच. त्याला कोण रोखणार होते? तेथे ना अग्निशामक दल, ना माणसांची मदत.त्या पर्जन्य राजालाच दया आली आणि तो बरसला तर त्याचीच मदत होणार होती.पण हे दृश्य आमच्या मनात कायमचं कोरलं गेलं होतं मात्र.
     तोपर्यंत निद्रादेवीचंही बोलावणं आलं. म्हणून, नाईलाजाने झोपावयास जावे लागले.कारण भल्या पहाटे पाच तासांचा प्रवास करत येथून ११० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गंगामातेच्या उगम स्थळाकडे आम्हाला रवाना व्हायचे होते.
*गंगोत्री*
    दुसर्‍या दिवशी ठरल्याप्रमाणे, पहाटे सव्वापाच वाजता आम्ही गंगोत्री साठी प्रयाण केले.  

   
उत्तरांचलमध्ये सकाळी पाच वाजता व्यवस्थित उजाडलेलं असतं. त्यामूळे, तशी पहाटही नव्हतीच. तर, चक्क सकाळ झाली होती. अर्थात तिकडे अंधारात प्रवास कदापिही करुच नये हे तत्त्व पाळणे अत्यंत निकडीचे आहे.
    अगोदरच आम्ही उंचावर होतोच.पण त्याहीपेक्षा उंचावर, उंच उंच पहाडांच्या रांगांमधून नागमोडी वळणाची वाट सारत सारत, आमची गाडी निघाली. तशी,या गंगामातेच्या उदयोन्मुखाकडे जाणारा निसर्ग, डोळ्यात साठवून घेण्याची उत्सुकताही लागलेली होतीच.
   आपण अधिकात अधिक उंच जात आहोत, आणि आमच्यासारख्याच पर्यटकांचे एखाद-दुसरे वाहन रस्त्यांवर चालताना दिसत होतं.तेवढीच काय ती रहदारी होती. मुख्य म्हणजे, पर्यटकां शिवाय या संपूर्ण भागात दुसरे कोणीच नव्हते. एवढ्या मोठ्या ३४१५ मीटर उंचीवर जाताना देखील, काही रस्ते अगदी नवीनच बनवलेले होते.  काही रस्ते मात्र खूपच उखडलेले होते,तर काहींची कामं मोठ्या प्रमाणावर सुरु होती. त्याचप्रमाणे तेथेपर्यंत, त्या उंचीपर्यंत  लाईट्स , केबल वायर्स, काही मोबाईल कंपनीचे टॉवर्स असे सारे तंत्रज्ञान पोहोचलेले बघून माणसाला थक्क व्हायला होते. आलेल्या पर्यटकांची आहे त्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त काळजी घेऊन,त्यांना सोयी उपलब्ध करवून देण्याचंखरंच खूप कौतुक वाटत होतं. अतिदुर्गम प्रदेशातही सर्व सोयी मिळत असल्यामूळे,नक्कीच पर्यटकांचा ओघ वाढला असणार.
        होय, कारण एप्रिल ते ऑक्टोबर वर्षातला एवढाच काळ मिळतो,या लोकांना पैसे कमावण्याचा.त्यातही जास्त पर्यटक जून पर्यंतच येतात. कारण जुलैपासून तेथे पावसाळा चालू होतो. यानंतर कोणतीही हमी  देता येत नाही. ऑक्टोबर ते एप्रिल पर्यंत सगळीकडे बर्फच बर्फ असतो. अगदी दिवाळी झाल्याबरोबर  तेथील सर्व मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात.
     उत्तरांचलमध्ये  केवळ माणसांनाच नव्हे,तर देवांनाही निसर्गाशी जुळवून घेत तडजोड करावी लागते. प्रवास चालूच होता. पहाडांची उंची आकाशाला स्पर्श करते आहे की काय? असा भास होत होता.  पहाडी शिखरांच्या मोकळ्या जागेतून जेवढे कांही आकाश दिसत होतं,ते स्वच्छ निळसर, पांढऱ्या ढगांनी नटलेलं असं खूपच सुंदर दिसत होतं. त्यामुळे धुक्याचा लवलेशही नव्हता. अवनीचे हे सौंदर्य आम्हाला मनमुरादपणे  लुटता येत होतं. एवढ्या उंचावर जात होतो आम्ही, वारा होता पण,झोंबणारा गारवा नव्हता.वातावरण खूपच आल्हादायक होतं.
     आम्ही निघालो तेंव्हा,आपण खूप खूप लांब आणि उंच उंच आलो आहोत, आत्तापर्यंत सर्व काही ठीक आहे, पण एखाद्या व्यक्तीला किंवा गाडीला काही अडचण आली तर काय? हा प्रश्न मनात घोंगावत होता आणि या विचाराने मनामध्ये एक अनामिक हुरहूर चालू झाली होती. प्रवासात कितीतरी वेळा," ही सहल सुखरुप पार पडू दे रे देवा"असे म्हणत,मी ईश्वराची विनवणी केली होती, अगदी नकळतपणे.
     अख्ख्या प्रवासात माझी खिडकी असणारी जागा असल्यामुळे,बाहेर दिसणाऱ्या आणि केंव्हाही उद्भवू शकणाऱ्या धोक्यांची कल्पना मला येत होती.
    हिमालयाच्या प्रत्येक पहाडाच्या सौंदर्याची एक वेगळीच मिजास दिसून आली, उत्तरांचलमध्ये!
    गंगोत्री च्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावरच्या  हिमालयाच्या ओळी, प्रचंड मोठ्या, शिवाय पहाडांच्या पायथ्याशीच केवळ हिरवाई दिसत होती.आणि मध्यापासून टोकाकडे मला विराण पहाड दिसत होते. यावरुनच लक्षात आले की,हे पहाड हिवाळ्यात संपूर्णपणे बर्फाने आच्छादले जाणारे आहेत.बर्फ वितळून गंगेला मिळाला असला तरीही, त्याच्या शुभ्रतेची  सावली, या पहाडांवर रेंगाळत होती. त्यामुळे हे ओकेबोके असणारे पहाड अजूनच भयावह वाटत होते. क्षणाक्षणाला मनाला मोहून टाकणारी निसर्ग दृश्य बघत बघत होणारा प्रवास आमच्या गाडीच्या चालकाच्या गाडी चालवण्याच्या कौशल्यामुळे सुखावह ठरत होता. गाडीही चालता-चालताच दोन दोन मिनिटाला मोठा 'फुस्स'असा नागाच्या फुत्कारा सारखा आवाज काढत होती. थोडसं भयावह वाटत होतं ते,पण नंतर समजलं की तो गाडीवर आलेलं दडपण बाहेर टाकण्याचा आवाज आहे. पण एकूणच सर्वच प्रवाशांच्या चेहऱ्यावर एक काळजीची रेषा खेळत होती.हे प्रत्येकालाच जाणवत होतं, पण कोणीही याबाबत बोलत मात्र नव्हतं. आमच्या गाडीचा चालक समोरच्या गाडीसाठी जेंव्हा गाडी मागे घ्यायचा ना, त्यावेळी मात्र तोंडचे पाणी पळायचे आमच्या. कारण शेजारीच खोल खोल गर्तेत नेऊन सोडणारी दरी असायची. चालकाच्या मानसिक  सुदृढपणाचे आणि त्याच्या कौशल्याच्या परिसीमेचा परमोच्च बिंदू असायचा हा.
    आम्ही पहाड चढत जाता जाताच बारीक-बारीक होत जाणारी गंगोत्री,आम्हाला खोल दऱ्या खोऱ्यां मधून यमुनोत्री प्रमाणेच मार्गदर्शन करत होती. तिच्या प्रवेशाचा मार्ग दाखवत होती.
      आता मात्र बर्फाच्छादित पहाडांची संख्या वाढती झाली होती. आपण गंगेच्या उगमस्थाना जवळ पोहोंचत असल्याची वर्दी त्यांनी आम्हाला दिली. गाडी अगदी जवळपर्यंत जाते तिच्या, त्यामुळे फारसे चालावे लागणार नव्हतेच. थोडासा चढ चढून समोर गेलो आम्ही, आणि हरिद्वार मध्ये झालेली गंगेची भेट आठवली.किंबहुणा जास्तच खळाळणारी! परस्परांना बोललेला आवाजही ऐकू येत नव्हता. तोच शुभ्रधवल दुधी प्रवाह, तेथून आम्ही बघत आलेलो, ती गंगा आणि ही गंगा एकच तर होती! केवळ येथून जाताना रस्त्यात तिला तिच्या अनेक बहिणी उदाः आलकनंदा, मंदाकिनी, सरस्वती गळाभेट घेत तिच्यात सामावून जातात. म्हणून ही हरिद्वारच्या जवळ जवळ गेल्यानंतर "गंगा"हे नाव धारण करते. पण येथे गंगोत्रीवर मात्र ती "भागीरथी" या नावानेच संबोधली जाते. राजा भगिरथाने, कैलास पर्वतावर तपश्चर्या करत महत्प्रयासानं, आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी गंगेला पृथ्वीवर आणले. अशी अख्यायिका आहे. भगवान शंकराने आपल्या डोक्यावरच्या एका जटेत गंगेला धारण करुन,तिच्या प्रचंड वेगावर नियंत्रण ठेवले होते.आणि कलियुगात जी लोकं गंगाजल स्नान व दर्शन घेतील, ते पापमुक्त होतील.असे सूतोवाचही पार्वतीमातेच्या जवळ शंकरांनी केल्याची आख्यायिका सांगितली जाते. पण या निमित्ताने का होईना लोक या भागात येऊ लागले. आणि एवढ्या सौंदर्यपूर्ण निसर्गाची सहल करु लागले. नाही तर एरवी या भागात येण्यास सहजासहजी कोणीही धजावले नसतेच.
     गंगाकिनारी गंगोत्री मंदिरात, गंगा, यमुना, सरस्वती, अन्नपूर्णा, लक्ष्मी यांच्या सुंदर मूर्ती आहेत. याच परिसरात, भगीरथाने ज्यावर बसून गंगेला अवतरण्यासाठी तपश्चर्या केली होती ती शिळाही आहे.
     या गंगोत्री स्थानापासून  गंगेचा नेमका उगम, अठरा किलोमीटरवर "गोमुख" या अतिशय विलोभनीय स्थळावरुन होतो.एका मोठ्या हिमनगाच्या खालच्या बाजूने ती वाहात येते. पण अत्यंत गर्दीमुळे तेथे जाण्याची परवानगी दिली जात नाही.
     या ठिकाणी आम्ही चार तास घालवले.तो अनुभव विलक्षण आनंददायी,कृतकृत्य करणारा आणि मनःशांती बहाल करणारा ठरला.हे नक्की. आयुष्यात एकदा तरी या स्थानाला भेट द्यावयास हवीच. असे वाटावयास लावणारे हे क्षण होते. त्यांचा भरभरून आनंद घेत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. कारण जेवण आटोपून सायंकाळच्या आत आपले हॉटेल गाठणं आवश्यक होतं
*गंगोत्री- उत्तरकाशी-सीतापुर*
     गंगोत्री वर भागीरथी नदी चे दर्शन, घाटावरची पूजा, देवदर्शन आटोपत; उत्तरकाशीला आमच्या हॉटेलच्या मुख्य मुक्कामी येण्याचा रस्ता  वर जाताना जो होता, त्याच रस्त्याने आम्ही परत फिरणार होतो.
निसर्ग तोच, पण प्रहर बदलल्यामुळे त्याची आभा जराशी वेगळी वाटत होती.अर्थात एकूणच सृष्टिच्या किंवा दऱ्या पहाडांच्या सौंदर्यामध्ये तसूभरही फरक पडलेला नव्हता. या वसुंधरेचे निरीक्षण  करण्यामागे दरवेळी असायची तीच उत्सुकताही कायम होती.खरंतर अशा सौंदर्यपूर्ण पर्यटन स्थळांवर चांगले महिनाभर तरी येऊन राहावं,आणि या सृष्टीशी संवाद करत;तिच्याशी तादात्म्य पावावं आपण,अशीच उर्मि प्रत्येकाला वाटावी असं हे सारं सौंदर्य! मनाला भुरळ घालणारं, भावनांची तरलता वाढवणारं,डोळ्यांना सुखावणारं. येथे कायम राहणाऱ्या लोकांचा हेवा वाटावा आपल्याला,असं!
    ऋषिकेश पासून सुरु होणाऱ्या सर्व पहाडी रांगा या सर्व हिमालय पर्वतांच्याच.या पहाडांच्या  वर चढत चढत मार्गक्रमण करत असताना,मी पूर्वी लिहिलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक पहाडी रांगाचे सौंदर्य, किंबहुना त्यांच्या दगडांच्या काठिण्याचा पोतही निरनिराळा दिसून येतो.
     काही पहाड अतिशय ठिसूळ खडकांचे,काही खूप कणखर, काही मध्यम प्रतीच्या मुरुमवजा दगडांचे तर काही पहाड अगदीच नाजूक प्रकृतिच्या मातीपासून बनलेल्या भुसभुशीत खडकांचे. प्रत्येक नद्यांचे छोटे-मोठे पात्रही पांढऱ्याशुभ्र गुळगुळीत  दगडगोट्यांनी युक्त असेच.परिणामी तिच्या प्रवाहाबरोबर येणारी वाळू पांढऱ्या रंगाचीच. पण,प्रत्येक नदीचे पाणी मात्र वेगवेगळ्या रंगांचे!
    भागीरथी, यमुना, मंदाकिनी, अलकनंदा, सरस्वती,धौली गंगा,पिंदर गंगा,झेलम आणिकही छोट्या छोट्या नद्या,धबधबे, प्रवाह यांचे उगमस्थान हे हिमालय पर्वतांच्या रांगांमधूनच!
    हिमालयाच्या या पर्वतांचे आपल्यावर केवढे तरी मोठ्ठे उपकार आहेत.नैसर्गिक संपत्तीने ओतप्रोत, जंगल संपत्तीने संपन्न, मोठ्या मोठ्या नद्यांचे उगमस्थान. शिवाय जमिनीची सुपीकता वाढविणारं नद्यांचे सान्निध्य.यांचं सर्वात मोठं ऋण म्हणजे, या हिमालय पर्वतांच्या रुपाने,आपल्या भारत मातेला नैसर्गिक पणे मिळालेली प्रचंड मोठी अशी तटबंदी! या पर्वतांच्या वैविध्यपूर्ण उपकारांचे आपण भारतीय नागरीकांनी मानावते तेवढे धन्यवाद कमीच आहेत.
     उत्तरांचल च्या या सहलीत आम्ही हिमालय पर्वतांच्या रांगा अक्षरशः पिंजून काढल्या.विधात्यानं निर्मिलेल्या या किमयेनं तोंडात बोट घालण्याची वेळ येते आपल्यावर!  किंबहुणा या निसर्गापुढे माणूस म्हणजे,अगदीच कःपदार्थ ठरतो. तो सर्वार्थाने निसर्गापुढे अगदी तोकडाआहे, याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. पर्यटन सहलीच्या निमित्तानेच काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील हिमालयाच्या रांगाही  आमच्या बघण्यात  आल्या आहेत. त्यांचेही आपले एक खास सौंदर्य आहे.
     गंगोत्री वरुन उत्तर काशी च्या वाटेवर असताना, 'हर्षिल' नावाच्या एका सिनिक खेडे गावावरुन आम्ही पास झालो.जेथे 'राम तेरी गंगा मैली' या सिनेमाचे शूटिंग झालेलं होतं.
     तर,देवदार वृक्षांच्या जंगल क्षेत्रातून प्रवास करत करत,आम्ही सायंकाळी सात वाजेपर्यंत उत्तरकाशी येथे पोहोंचलो. दिवसभराचा प्रवास झाला पण, थकवा असा अजिबात जाणवला नाही.
     दुसऱ्या दिवशी सकाळीच नाश्ता करुन, २४० किलोमीटरचा प्रवास करत आम्हाला उरलेल्या हिमालयाच्या रांगांची भेट घ्यावयाची होती. त्यांच्यामुळे अवनी ला मिळालेले विलक्षण सुंदर असं रुप  नजरेनं पिऊन टाकायचं होतं. नव्याने ताजेतवाने होऊन.
     हा आमचा प्रवास चक्क तेरा तासांचा असणार होता. ही मिळालेली सुंदर पर्वणी अनुभवण्यासाठी मन उत्सुक झालेलं होतं.
     हा आमचा प्रवास होता उत्तर काशी ते सीतापुर. सीतापुर हे ठिकाण म्हणजे, केदारनाथ मंदिराला जाण्याच्या पायथ्याचा टप्पा होता.
       गंगामातेच्या दर्शनाने तृप्त झालेलं मन आणि शरीर, सवयीनुसार झोपेच्या आधीन केंव्हा झालं;हे लक्षातही आलंच नाही.
    ठरल्याप्रमाणे सकाळीच नाश्ता आटोपत, आम्ही सीतापूरच्या रस्त्याला लागलो.आल्हाददायक वातावरणाची, सुंदर निसर्गाची सोबत, तरल झालेले मन, विश्रांती घेऊन ताजेतवाने झालेलं शरीर या प्रवासाची उत्सुकतेने वाट बघत होतं.
      एव्हाना, आम्ही पहाडांमधून प्रवास करण्यासाठी चांगलेच  रुळलो होतो. सवयीने भीती थोडीशी बाजूला सारली गेली होती.
     प्रवास चालूच होता. जेवण चहा-कॉफी वगैरेच्या निमित्ताने छोटी-छोटी विश्रांती घेत आम्ही सर्वच प्रवासी प्रवासाचा आनंद लुटत होतो.
     उत्तर काशीहून सीतापूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर आम्हाला "टिहरी" नावाच्या धरणावरुन जावं लागलं. खरं म्हणजे या धरणाच्या सान्निध्यातून जाण्याशिवाय दुसरा मार्गच नाहीए.'टिहरी' या गावावरुन या धरणाचे नाव पडले आहे.
     टिहरी धरणाची वैशिष्ट्ये बघितली तर आपण अगदी अवाक् होऊन जातो!एवढे प्रचंड मोठे धरण आहे हे! डोळे विस्फारतच  या धरणाचं गाडीतूनच अवलोकन केलं आम्ही. येथे फोटो शूटिंगला सक्त मज्जाव आहे.  कडेकोट बंदोबस्ताचा २४ तास पहारा असतो.
        या धरणाचं वेगळेपण जपणारी वैशिष्ट्य अशी, उत्तरांचलमधील सर्वात मोठी नदी भागीरथी वर बांधण्यात आलं आहे हे टिहरी धरण.

    
टिहरी हे धरण भारतातील सर्वात उंच ठिकाणावर पहिल्या क्रमांकाचं आहे.उंचीच्या बाबत आशिया खंडात या धरणाचा दुसरा क्रमांक लागतो. तर उंचीच्याच संदर्भात जगामध्ये आठवा क्रमांक आहे.
    या धरणाची उंची २६० मीटर,लांबी ५७५ मीटर आणि रुंदी शंखाकृती आहे.
     हे धरण बांधण्याचे काम १९७८ साली हाती  घेण्यात आलं होतं.२००६ साली  हे धरण कार्यान्वित करण्यात आलं.
    येथे प्रचंड मोठा असा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट चालवला जातो. हे वीज निर्मितीचे प्रचंड मोठं केंद्र आहे. येथून उत्तर प्रदेश, उत्तराखंड,पंजाब, दिल्ली,हरियाणा, जम्मू काश्मीर,राजस्थान, चंदिगढ, हिमाचल प्रदेश या सर्व राज्यांना वीजपुरवठा होतो.
    दुर्दैवाने या धरणाला काही इजा झाली तर त्याचे परिणाम दिल्लीपर्यंत पोहोचतील असे म्हटले जाते.
       पुर्विच उल्लेख केल्याप्रमाणे संपूर्ण उत्तरांचल हा, त्या ईश्वराने भारतमातेच्या चरणी वाहिलेला एक अतिशय सौंदर्यपूर्ण नजराणा आहे.सीतापूर ला पोहोंचेपर्यंत आम्ही हा डोळ्यात भरभरुन साठवून घेतला.
      रात्रीच्या जेवणानंतर आपसुकच झोपेने डोळ्यांचा ताबा घेतला.सकाळी नऊ वाजता आमचं हेलिकॉप्टर (चॉपर) आम्हाला केदारनाथ वर पोहोंचवण्यासाठी आमची प्रतिक्षा करणार होतं.
*केदारनाथ*
कैलास राणा शिवचंद्र मौळी ।
फणींद्र माथा मुकुटी झळाळी ।
कारुण्य सिंधू भव दुःख हारी।
तुजविण शंभो मज कोण तारी।
    आज आम्हाला निघावयाचे होते, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, समुद्र सपाटी पासून   चक्क ३५८३ मीटर उंचीवर असणाऱ्या केदारनाथ या ठिकाणी!
      सामान्यपणे आपल्या महाराष्ट्रात, चारधाम यात्रा म्हणजे, आपल्या भारताच्या चार दिशांना असणारे चार तीर्थक्षेत्र.पुर्वेकडे जगन्नाथपुरी, पश्चिमेकडे द्वारका,दक्षिणेकडे रामेश्वरम आणि उत्तरेकडे बद्रीनाथ यांचा समावेश केला जातो. पण उत्तरांचल राज्यात, गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, यांच्या दर्शनाला चारधाम यात्रा असे मानतात.आम्ही करत असणारी हिच ती धार्मिक यात्रा.यात आम्ही स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधून घेतले.धामदर्शनाने परमार्थ साधणे,व निसर्ग दर्शनाने निसर्ग सफरीचा आनंद घेणे, हा आमचा स्वार्थ तर होता ! दोन्हींमुळेही मानसिक समाधान मिळत होते,हे सांगणे नलगे.
     तर, आम्ही केदारधाम वर जाण्यासाठी हेलिपॅडवर निघालो. हेलिकॉप्टरचे ऑनलाईन बुकींग अगोदरच केलेले होते. आम्हाला दिलेल्या वेळेच्या एक तास अगोदर या ठिकाणी पोहोचणं आवश्यक होतं. सोबत आधार कार्ड अनिवार्य होतंच.
     केदारनाथला जावयाचं म्हटले की, २०१३ वर्षीच्या प्रलयाची आठवण, जी कायम मनात घर करून बसली होती; ती पुन्हा पुन्हा मनाच्या गाभाऱ्यातून बाहेर डोकावत होती. एवढेच नव्हे तर,त्या गोष्टीला एवढी वर्षे झाली तरीही, त्यावेळी टीव्हीवर बघितलेल्या प्रलयामूळे झालेल्या विनाशाच्या व्हिडीओ क्लिप्स डोळ्यांपुढे आजही तरळत होत्या. योगायोग म्हणजे साधारण त्याच तारखांच्या दोन-तीन दिवस पुढे आम्ही केदारनाथ धाम वर जाणार होतो.पण या सर्व आठवणी ओठांवर आल्या,तरीही बाहेर पडू द्यावयाच्या नाहीतच, ही यात्रा पूर्ण होईपर्यंत असा निग्रह मी केलेला होता.जी परिस्थिती समोर येईल त्याला तोंड द्यावयाचे आणि मुळात, 'आपण सुखरूप परत येणार आहोतच',असा सकारात्मक भावच मनात ठेवायचा.असे ठरवूनच आम्ही उत्तरांचल ला निघालो होतो.
      २०१३ मध्ये तेथे गेलेले आमचे कितीतरी परिचित, वापस आलेले नव्हते. हे माहीत असतानासुद्धा! कारण प्रचंड इच्छाशक्ती चे पारडे जड होते निश्चितच.
     या घटनेपासून मात्र उत्तराखंड टुरिझम डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या मार्फत टुरिस्ट,पिलग्रीम्स रजिस्ट्रेशन आणि ट्रेकिंग एसेस कार्ड, देण्याची सुरुवात झाली. त्यामुळे तिकडे जाणाऱ्या लोकांची नोंद होऊ लागली. तेथे गेल्यानंतर कोण कोण किती दिवस असतील? व कोणत्या दिवशी कुठल्या धामावर असतील ? हे नमूद करुन ठेवले जात आहे.आधार कार्ड,थंब इम्प्रेशन वगैरे घेऊन, आपल्याला एक क्रमांक दिला जातो. जेणेकरुन, काही नैसर्गिक आपत्ती आल्यास तेथे गेलेली माणसं ओळखावयास मदत होऊ शकेल. विशिष्ट शहरातील कोणत्याही एका केंद्रावर अशी नोंद होत होती.भरपूर प्रवाशांची संख्या असल्यामुळे हे काम दोन तासांचे चांगलेच वेळखाऊ पण आवश्यक होतं.ही सगळी प्रक्रिया आम्ही एक दिवस आगोदरच पार पाडली होती.
     केदारधाम वर वरती जाण्यासाठीचे, चार पर्याय आहेत एक हेलिकॉप्टर,दुसरा डोली, तिसरा खेचर व चौथा आपले दोन पाय.
      प्रलया पूर्वी जाण्याचे अंतर १४ किलोमीटर होते.पण नव्याने रस्तेबांधणी झाल्यामुळे ते २१ किलोमीटर झाले आहे.असे सांगितले गेले. त्यामुळे तो पर्याय बादच झाला.
    चार पाच कंपन्यांची हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध आहे.पण ती सुद्धा तेथील हवामानावर अवलंबून असते.अनुकूल हवामान असेल तरच सकाळी सुर्योदया पासून ते सायंकाळी सुर्यास्ता पर्यंत ही सेवा चालू असते. आम्ही खरंच खूप नशीबवान! अख्ख्या सहलीमध्ये हवामान बदलाचा कुठेही अडथळा आला नाही.त्यामुळे सहलीची पूर्ण मजा चाखता आली. छत्री रेनकोट यांचे ओझे वागवावे लागले सोबत, पण त्याची गरज पडलीच नाही.
    हेलिकॉप्टरच्या नियमानुसार सामान घेऊन आम्ही हेलिपॅड च्या स्टेशन वर दाखल झालो. दिलेल्या वेळेतच आम्हाला त्यात बसवण्यात आलं. होय, 'बसवण्यात आलं'असंच म्हणेन मी.कारण, आमचा हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा हा पहिलाच अनुभव होता. ते आमच्यासमोर उतरले त्यावेळी त्याच्या विशालकाय अशा पंखाच्या हवेने आपण फेकले जातोय की काय? असं वाटत होतं. सहा माणसांच्या या हेलिकॉप्टरमध्ये, वजनानुसार कोण कुठे बसावयाचे म्हणजे समोर दोन आणि मागे चार अशी आसन व्यवस्था होती. प्रत्येकाची जागा ठरवून दिलेली होती.  दिवसभराच्या अखंड फेऱ्या चालूच असतात हेलिकॉप्टरच्या. त्यामुळे वेळ वाया जाऊ नये, यावर कटाक्ष ठेवला जायचा. वरतून येणारे प्रवासी व त्यांचे सामान उतरवून घेण्यासाठी त्यांच्या आगमनापूर्वीच तीन मदतनीस सज्ज असतात.आणि चढवणाऱ्या प्रवाशांसाठी वेगळे तीन सज्ज असतात. ते अक्षरशः आपल्याला घाईघाईने उतरवतात आणि चढवतातही!
      आम्ही हॅलिकॉप्टरमध्ये बसून यशस्वीपणे मार्गस्थ झालो. आहाहा !!! काय सुंदर नजारा दिसत होता तो! या अवनीचा! उंच उंच हिरव्यागार पहाडांच्या जंगलांवरतून  आकाशाच्या ढगांमधून तरंगत तरंगत जात असताना, आपण अक्षरशः स्वर्गात जातोय म्हणजे, (सैर करण्यासाठी या अर्थाने,)असंच वाटत होतं. दऱ्या खोऱ्यांतून वाहणाऱ्या नद्या बारीक पांढऱ्या नागमोडी रेषे सारख्या भासत होत्या! फारच अप्रतिम सौंदर्य होते हे पृथ्वीचं! एकदा तरी अनुभवावं असंच!
       आपण हेलिकॉप्टरमध्ये स्थीरस्थावर होऊन सभोवती बघेपर्यंत दहा मिनिटात तर बर्फील्या पहाडांच्या अगदी जवळ आलो आहोत हे लक्षात येईपर्यंतच, केदारनाथच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर पायउतारा देखील होते.
      तेथे पोहोंचल्या  क्षणाचा मात्र होणारा मनातला आनंद केवळ शब्दातीत! या पवित्र भूमीवर पाय लागताच कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं.माणसाचा जन्म घेऊन जिवंतपणी
"
स्वर्ग सफर"म्हणतात ती हीच तर! असं वाटल्यावाचून राहत नाही.
     तेथे उतरल्यानंतर  सुरुवातीला काही वेळ आपण त्या वातावरणाशी जुळवून घेत,सोबत नेलेला कापूर रुमाला मध्ये घेऊन तो नाकाने, तोंडाने श्वासात भरुन घेणे गरजेचे आहे. कारण बऱ्याच जणांना हवेमध्ये ऑक्सिजनच्या कमी प्रमाणाचा, श्वसनाला त्रास होऊ शकतो असे म्हणतात. म्हणूनच, गेल्या गेल्या अवांतर बोलणे टाळावे. तसेच, आपल्या शरीराची हालचालही अगदी मंद गतीने करावी.हेलिपॅड पासून आमचं तेथे असणारं निवासस्थान तसं जवळच होतं. फारतर एखादा किलोमीटरवर.अंतर थोडंच होतं,पण तेवढंही चढावयास दमछाक होत होती. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे असेल बहुतेक असंच वाटलं.
     कित्ती आनंद वाटला आम्ही केदारनाथवर मुक्काम करणार,अशा अलौकिक ठिकाणावर म्हणून सांगू !आमची बॅग टेकवून लगेच जवळच असणाऱ्या श्री केदारनाथ मंदिराच्या दर्शन ओळीत चालायला लागलो.गर्दी भरपूर होती.
     लांबच लांब रांग होती. आकाश निरभ्र होतं. ऊनही नव्हतं. थंडीही फारशी नव्हती. गार हवा वाहत होती. निसर्गाने प्रसन्नपणे आमचे तेथे स्वागत केल्याचा आनंद झाला. दर्शन पूर्ण होईपर्यंत किंबहूणा,आम्ही त्या ठिकाणी असेपर्यंत वातावरणाने अशीच साथ द्यावी आम्हाला, अशी मनोमन प्रार्थना केली. दर्शन प्रतीक्षेचा कालावधी अंदाजे तीन तास लागतील असे वाटत होते.
      दर्शन घेण्यासाठी कोणतेही नियम, नियोजन नव्हते. त्यामुळे शिस्तही नव्हती. मागून येणारेही दर्शनासाठी सरळ समोर जाताना बघून इतर भाविकांचा संताप होणं अपरिहार्य होतं. कारण प्रत्येक जण केवळ आणि केवळ तेवढ्यासाठीच तर या ठिकाणी आलेले होतं! केंद्रिय पद्धतीने ऑनलाईन व्यवस्था असणे आवश्यक आहे हे प्रकर्षानं जाणवलं. संधीसाधू लोक पैसे घेऊन भाविकांना लवकर दर्शन देण्याचं आमिष दाखवत असावेत,हे लक्षात येऊ लागलं.
       केवळ तीन महिन्यांपर्यंत दर्शन उपलब्ध असल्यानं अख्ख्या भारतभरातून येणाऱ्या भाविकांची गर्दी होणं स्वाभाविक होतं.ओळीत उभं राहून निसर्गाचे सौंदर्य मात्र पुरेपूर अवलोकन करता आलं.कापसी ढगांची झुंबरं लावलेलं आकाशी रंगाचं आभाळ, मंदिराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या पांढर्‍याशुभ्र स्फटिकी बर्फाच्छादित पहाडांच्या सलग रांगा आणि त्याच्या पायथ्याशी या विश्वेश्वराचं छोटेखानी पण सुंदर हेमाडपंथी मंदिर! मन भरून गेलं हे सर्व बघताना.आता मात्र ,आत मध्ये असणाऱ्या त्या सृष्टिच्या पालन कर्त्याचं  नेमकं रुप बघण्याची उत्सुकता ताणली जात होती. भक्ती रसाने ओतप्रोत मनाला त्याच्यापुढे माथा  टेकवण्याची ओढ लागली होती. मंदिराच्या अवतीभवती २०१३ च्या प्रलयामुळे झालेले परिणाम स्पष्टपणे दिसत होते. ढगफुटीमुळे पाण्याबरोबर वाहात आलेले मोठे मोठे पाषाण अजूनही त्या ठिकाणीच विसावले होते.वाहात आलेल्या ज्या एका भल्यामोठ्या शीळेमूळे पाण्याचा प्रवाह विभागला गेला आणिक प्रलया मध्येही मंदिर अगदी सुरक्षित राहिले,ती शीळा अजूनही मंदिराच्या पाठीशी एखाद्या सुरक्षारक्षका सारखी पहारा देत बसली आहे. हे दिसत होतं. पाठीमागे पण थोडी उंचावर पहारा देणाऱ्या या शीळेला शतशः नमन करावंसं वाटलं.ती तेथे थांबली नसती तर, आम्ही आज येथे नसतोच.हे मनात आलं.
      एव्हाना,मंदिराच्या अगदी जवळ पोहोंचलो होतो आम्ही.  सुरुवातीलाच केदारनाथाच्या सन्मुख उभा असणारा दगडी नंदी, याला वंदन केलं. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर डोळे भरून बघितलं मूर्तीला.आम्ही उभयतां नतमस्तक झालो. दोन्ही हात लावत दर्शन झाले. गर्दी होतीच.
     प्रसन्नचित्ताने 'ॐ नमः शिवाय' हा मंत्र पुटपुटत करता येईल तेवढं  गाभाऱ्याचं निरिक्षण केलं. इतर ठिकाणची ज्योतिर्लिंगाची पिंड असते तसं येथे काहीच नव्हतं.थोडं आश्चर्यच वाटलं! पण मग त्यामागची सांगितली जाणारी अख्यायिका समजली.
    युध्दानंतर पांडवांचा वनवास संपला.आपल्या स्वजनांच्या संहाराचा त्यांना पश्चाताप झाला.त्यातून पापमुक्ती साठी पांडवांना शिवाचं दर्शन हवं होतं. काही केल्या भगवान शंकर त्यांची भेट घेत नव्हते.पांडव कैलास पर्वतावरही जाऊन आले होते.त्यांना सांगण्यात आलं की, खाली रेड्यांचा कळप चाललाय, भगवान शंकर रेड्याच्या रुपानं त्यांच्यामध्ये मिसळलेले आहेत.पांडवांनी युक्तीने सारे रेडे पळवून लावले. पण एक रेडा मात्र गेलाच नाही. भिमाने त्या रेड्याशी झटापट केली असता, आपल्या पाठीचा उंच भाग त्याच्या हातात सोपवून भगवान शंकर गुप्त झाले. या स्वरुपाचा त्यांचा समोरचा तोंडाचा भाग म्हणजेच नेपाळमधील पशुपतिनाथ होय.
      गाभारा थोडासा खोल,पण आपल्या औंढा नागनाथ देवालयाच्या गाभार्‍या पेक्षा थोडासा मोठा आहे. गाभार्‍याबाहेर पाचही पांडवांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.भाविक या महादेवाच्या  पाठीच्या भागाला साजूक तूप लावतात. भीमा कडून शिवाच्या पाठीला झालेल्या ईजेवर औषध म्हणून असावे. पण हिवाळ्यात यावर बर्फ साचू नये म्हणूनही असावे. असा माझा कयास आहे.
     मुख्य दर्शनानंतर, बाहेरच्या परिसरात आम्ही बराच वेळ रेंगाळलो
तेथील रम्य निसर्गाचा तृप्त मनाने आस्वाद घेतला. भरपूर फोटोसेशन केलं.
       बरेच भाविक, मध्यरात्री होणाऱ्या मुख्य पूजेसाठी पुन्हा देवालयात जाणार होते.
     सायंकाळ झाली, आणि आता मात्र थंडीने जोर धरला होता.अचानक गारठून  टाकणारी थंडी सुरु झाली. कितीही जाड रजया, गरम कपडे घातले तरीही ती झोंबायची राहतच नव्हती. आपल्याला 'ऊन मी म्हणत होतं 'या वाक्प्रचाराची प्रचिती नेहमीच येते. पण येथे 'थंडी मी म्हणत होती' याची आम्हाला प्रचिती आली. अजिबात हालचाल करावीशी वाटत नव्हती. पाणी तर अगदी बर्फाचे असावे असेच! आमच्या ट्रॅव्हल कंपनीचा कूक सोबत होता म्हणून कसेबसे पोटात गरम दोन घास खाऊन,आम्ही खोलीतच बसणे पसंत केलं. झोप लागणे केवळ अशक्यच. कशीबशी रात्र काढली. सूर्योदयाची वाट बघत होतो.कारण आम्हाला पावणेसहा वाजता परतीची वेळ हेलिकॉप्टर साठी देण्यात आली होती.
    सकाळी उठल्याबरोबर साडेपाच वाजताच हेलिपॅडवर प्रयाण केलं. सूर्योदयापूर्वीची आकाशातील अभा फारच विलोभनीय दिसत होती! थंडगार हवा चालू होती.पूर्वेकडे असणाऱ्या केदारनाथाच्या कळसाला आणि उगवत्या नारायणाला नमस्कार करत, त्यांचे मनापासून आभार मानले. आणि  हेलिकॉप्टरमध्ये स्वार झालो आम्ही. पुन्हा सीतापुरला येण्यासाठी.
*सीतापुर -जोशीमठ- बद्रीनाथ*
      आपण एखादी अप्रतिम गाण्याची महेफिल नेमकीच ऐकून आलो, किंवा एखाद्या सोहळ्याला उपस्थिती लावून आल्यानंतर, त्याच्या यशस्वीतेवर भाष्य करत,पुन्हा पुन्हा त्यातच रमत राहतो, त्याचप्रमाणे केदारनाथ वरनं पंधरा-वीस मिनिटातच सीतापूरला पोहोचल्यानंतर, त्या देवदर्शनाचं आणि एकूणच तेथील नैसर्गिक सौंदर्याविषयी ओघानंच समरस होऊन त्यावर दिवसभर भाष्य करत राहिलो आम्ही! हा दिवस पूर्णपणे रिकामाच मिळाला होता. खेचरांवर किंवा डोलीने वर जाऊन येणाऱ्यांसाठी,एक दिवस आरामाची नितांत निकड होतीच. ती मिळावयास हवी हाच येथील मुक्कामाचा मूळ हेतू.
     भरपूर आराम घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळीच नाश्ता आटोपत आठ वाजता आम्ही दिवसभराच्या प्रवासासाठी निघालो. सायंकाळी सहा वाजता जोशीमठ या शहरात मुक्कामी आलो. अर्थातच येताना उत्तरांचलमधील गढवाल प्रांतात असणाऱ्या पहाडांमूळे सृष्टीला मिळालेल्या सौंदर्याचा आस्वाद घेत आलो आम्ही.या संपूर्ण सहलीमध्ये असा नैसर्गिक आभुषणांनी मढलेला निसर्ग, एवढा भरभरून अनुभवावयास मिळाला की, आमच्या डोळ्यांचेे पारणे फिटले.
     सायंकाळी सहा वाजता जोशीमठ या ठिकाणी पोहोचलो खरे, पण नावावरून जोशीमठ म्हणजे एखाद्या मोठ्या धर्म शाळेचे नाव असावे, असाच झालेला गैरसमज पूर्णपणे परागंदा झाला. 'जोशीमठ'हा या राज्यातील बऱ्यापैकी मोठा तालुका असावा.हे शहर,पहाडांच्या कुशीत, हिरव्यागार जमिनीवर शांतपणे विसावा घेत आहे असं वाटत होतं. घरांची रचना टप्प्याटप्प्यांनी असणारी.आपल्याला लांबून पायऱ्यांवर घरं बांधली आहेत असंच वाटणारं.पहाडांच्या अंगाखांद्यावर मनसोक्तपणे खेळणारी ही घरं.
     उत्तरांचलमध्ये शेतीही अशीच केली जाते.टप्प्याटप्प्यांमध्ये, छोटे छोटे वाफे तयार करुन. कारण सपाट जागाच उपलब्ध नाहीए फारशी. त्या ठिकाणी. पूर्णपणे शारीरिक मेहनत करत शेती करण्याशिवाय पर्याय नाही तेथे.यंत्रांच्या सहाय्यानं करणं केवळ अशक्यप्राय!
   सूर्यास्ताला आम्ही सर्वजण आमच्या हॉटेलवर परतलो. रम्य अशा निसर्गाच्या सान्निध्यात असणाऱ्या हॉटेलच्या,आमच्या रुमच्या बाल्कनीत बसून खाली दरीमध्ये दिसणारे जनजीवन न्याहळत होतो.सभोवती हिरवीगार सृष्टी असणाऱ्या या वस्तीजवळच मोर लांडोर यांचे मधूनच दर्शन घडलं.वेगवेगळ्या पक्षांचा आपापल्या घरट्याकडे परततानाचा गोड किलबिलाट ऐकू येत होता.आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, रात्रीच्या वेळी गाईचे हंबरणे कितीतरी वर्षांनी कानावर पडल्याचा अनुपमेय आनंद मिळाला होता. निद्रादेवीचं बोलावणं आलं म्हणून, नाईलाजाने स्वतःला तिच्या स्वधिन व्हावं लागलं. 
    सकाळी पाच वाजता जोशीमठ वरुन आणखी बराच मोठ्या उंचीवर म्हणजे, समुद्रसपाटीपासून तीन हजार तीनशे मीटर उंचीवर असणाऱ्या व अंतरानं त्रेचाळीस किलोमीटर असणाऱ्या बद्रीनाथ धाम याठिकाणी दीड तासात पोहोचलो. हा प्रवास खूपच अद्वितीय सौंदर्यानं नटलेला!जणू काही आपण, आकाशाला गवसणी घालण्याच्या मोहिमेवर निघालो आहोत की काय अशी जाणीव करुन देणारा! उंच उंच आणि फक्त उंचच  नेणारा,असाच होता.
     प्रवास जेवढा उंच तेवढंच वसुंधरेचं पहाडांनी सजवलेलं सौंदर्यही परमोच्च बिंदू गाठणारं! बद्रीनाथा पासून निघणारी अलकनंदा नदी,जिच्या उगमाकडे आम्ही जात होतो.ती बारीक-बारीक वळणं घेत आम्हाला, "बघा,माझं मूळ स्थान कसं, श्री भगवान विष्णूंच्या सानिध्यात,बद्रीनाथाच्या पायथ्याशी आहे, चला,मी ते दाखवते तुम्हाला." असेच जणू सुचवू बघत आहे असं वाटतं होतं.म्हणून तर तिला 'विष्णू पदी गंगा' असं  सन्मानानं संबोधलं जातं.नील आणि नारायण या दोन पर्वतांच्या मधून ही अलकनंदा नदी वाहाते.
      आता मात्र बर्फाच्छादित पहाडांचे वारंवार दर्शन घडू लागले होतं.मन हरखून त्यांच्याकडे बघतच रहावं असं वाटत होतं. रस्त्यांची रुंदी सुद्धा आणखी अरुंद होत होती.हे तर अगदी स्वाभाविकच आहे.कारण पहाडांचा आकार वर निमुळता होत जात असताना व्यवस्थित सर्वेक्षण करत,त्यासाठी खोदकाम करावे लागलं असणार रस्ते बनवताना. जेणे करुन त्या पहाडांची हानी होणार नाही. याचा सखोल अभ्यास होत असणार.
    दीड तासानं आम्ही अलकनंदा नदीला सोबत घेऊन खालून वर प्रवास करत पोंहोंचलो.
     श्री बद्रीनाथाच्या, या विश्वनिर्मात्याच्या पवित्र भूमीवर पाऊल टाकलं आणि अक्षरशः स्वर्ग दोन बोटं उरणं म्हणजे काय असतं! हे जाणवायला लागलं. भाविकांची गर्दी होती म्हणून,आपण पृथ्वीवर आहोत असं वाटत होतं. पण मी अगदी सहज एकटी आले असते तर, 'मी स्वर्ग बघून आले आहे.' असंच वर्णन केलं असतं.आम्ही एवढं उंच आलो होतो की, हात उंच करत उडी घेतली तर,खरंच आपले हात आभाळाला टेकतील, असं वाटण्याइतपत आकाश जवळ वाटत होतं.शुभ्र,स्फटिकी पहाडांनी आमचं उतरल्याबरोबर हसत मुखानं स्वागत केलं. स्वच्छ हवा आणि सूर्यप्रकाशामुळे ऊनही पडलेलं होतं. त्यामुळे थंडीची तीव्रता भासत नव्हती.नाश्ता आटोपून लगेच दर्शन मार्गाला लागलो आम्ही. दुरुनच लालपिवळ्या फुलांनी भरगच्चपणे सजलेलं मंदिर दृष्टिक्षेपात दिसलं.मोठं प्रसन्न झालं मन.तीन तास लागणार दर्शनाला, असा अंदाज होताच.दर्शन ओळीला लागूनच मंदिराच्या जवळून वाहात खाली  खाली उतरणारी अलकनंदा, येथे वरती मात्र खूप मोठ्या प्रवाहानं खळाळून भरुन वाहत होती. जणूकाही स्वर्गलोकी च्या अंगणामध्ये हसत, खेळत बागडत होती ती मनसोक्तपणे!
      हे मंदिर सुद्धा मे ते नोव्हेंबर असे सहा महिनेच दर्शनासाठी खुलं असतं. उरलेल्या सहा महिन्यात हवामानामूळे येथे येणे दुरापास्तच आहे. या काळात बद्रीनाथाची प्रतिकृती, दर्शनासाठी आणि पूजेसाठी जोशीमठ येथे ठेवली जाते. अशी माहिती मिळाली. त्यामुळे येथे माणसांची चहलपहल फक्त सहा महिनेच.आम्ही उभे होतो,त्याच्या खालच्या पहाडाच्या अंगावरुन वाहणाऱ्या अलकनंदेच्या प्रवाहाचं निरीक्षण करत करत आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ केंव्हा पोहोचलो? याची कल्पनाही आली नाही.गर्दी खूप होती. त्यावेळी मला तिरुपती व्यंकटेशाच्या महाद्वारावर होणारी भाविकांच्या गर्दीची आठवण झाली. पहिल्या पायरीवर मूर्तीच्या सन्मुख असावी अशी गरुडाची पाषाणमूर्ती आहे. विष्णूचे वाहन ना ते. सोबत असणारच. त्याला टोपी वाहण्याची पद्धत आहे. टोपी आणि उपरणं वाहून आम्ही मूर्तीच्या दिशेने पुढे सरकलो.विष्णू देवतेची मुर्ती दृष्टीक्षेपात आली,आणि या मांगल्य पूर्ण वातावरणाने भारुन गेलेल्या गाभार्‍या मधील विष्णूची ही मूर्ती दिव्यत्वाचा साक्षात्कार करत, मनामध्ये रुजली कायमची. मुख्य मूर्तीच्या दोन्ही बाजूला गणेश आणि कुबेराची मूर्ती व नरनारायणाच्या मुर्तीही आहेत. मला वाटतं, कुबेराचं मूर्ती रुपातील हे एकमेव मंदिर असेल का?कारण कुबेराची धातूची मूर्ती फक्त बद्रीनाथावरच मिळते असं ऐकण्यात आलं.
      बद्रीनाथाला डोळेभरुन बघितल्यानंतर पुन्हा, बाहेर येऊन बराच वेळ त्यांचे मुखदर्शन घेताना अवर्णनीय असा आनंद होत होता. याच मंदिराच्या सभोवती इतर काही छोटी छोटी मंदिरं आहेत. त्यातील मुख्य असं श्री लक्ष्मी मातेचे मंदिर आहे. अतिशय प्रसन्न आणि सुंदर मूर्तीचे दर्शन, मनाला फार समाधान देऊन जातं.
      चार मुख्य धामांपैकी एक असणारं हे धाम, स्वर्गलोकाची प्रचिती आणून देतं. हे मात्र अगदी सत्य. येथे मिळणारा चवदार असा गरम गरम भाताच्या खिरीचा प्रसाद खाऊन आत्माही तृप्त झाला. मंदिर परिसराचे अवलोकन करताना, दुरुनच मनावर मोहिनी घालणारं, फुलांच्या माळांनी सजवलेलं मंदिर फारच देखणं दिसत होतं अजूनच! लाल पिवळ्या फुलांनी नखशिखांत बहरलेलं हे मंदिराचे लोभस रुप, गोकुळात त्या कान्हासाठी सजलेल्या पाळण्याप्रमाणं भासलं! बघतच राहावं असंच वाटत होतं.
    मंदिराच्या उध्दारामागे  अहिल्याबाई होळकर यांचाही सहभाग नोंदवलेला आहे.या ठिकाणा बाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात.
   हिमालय पर्वतांचं स्थान हे श्री शंकराचं मानलं जातं.भगवान विष्णूंना त्यांच्या सान्निध्यात आपलं स्थान हवं होतं.ते बालकाच्या रुपाने हिमालयात जाऊन अतीव आक्रोश करत बसले. एकदा शंकर-पार्वती येथून रवाना होत असताना, बर्फील्या पहाडावर,जंगलात एवढ्या दुर्गम ठिकाणी,हे छोटसं लेकरु आक्रोश करताना बघून, पार्वती मातेच्या मनातला मातृत्व भाव जागा झाला. आणि त्यांनी या बालकाला आपल्या सोबत घेऊन जाण्याचं ठरवलं. शंकरांनी हे बालक म्हणजे खुद्द विष्णूच आहेत हे ओळखलं होतं. या बालकाने पार्वती मातेला खूप लळा लावला. पार्वतीमातेने प्रसन्न होऊन त्याला वर मागावयास सांगितला. या छोट्या बालकाने आपल्या सान्निध्यात मला माझं एक छोटसं स्थान असावं अशी विनंती केली. आणि त्यानुसार हिमालय पर्वतावर बद्रीनाथावर श्री विष्णूंना स्थान प्राप्त झालं. असंही सांगितलं जातं.
    अग्नीला आपल्या पापांपासून मुक्ती हवी होती म्हणून, श्रीनिवास मुनींनी त्यांना बद्री वृक्षाच्या म्हणजेच बोराच्या झाडांच्या गर्दीत गंधमादन पर्वतावर विष्णुदेव राहतात,त्यांच्या सानिध्यात तू  जा.तेथील पाण्यात लुप्त होऊन राहा. म्हणजे तुला मुक्ती मिळेल असे सांगितल्याने, अग्नी तेथे पाण्यात लुप्त झाले,तेच बद्रीनाथावरचे गरम पाण्याचे कुंड.हे येथे स्नान केल्यामुळे पापक्षालन होते असे सांगितलं जातं.बद्रीनाथ मंदिराला नरनारायण मंदिर,बद्रीनारायण मंदिर असेही म्हटलं जातं.
     भगवान विष्णूंच्या या मंगलमय दर्शनाने,प्रसन्न झालेल्या मनानं आम्ही बद्रीनाथापासून पाच कि.मी.वर उत्तरेकडे असणाऱ्या भारत भुमीवरचं शेवटचं गाव कसं आहे? हे बघण्यासाठीची ताणत जाणारी उत्सुकता घेवून  पुढच्या मार्गाला लागलो...
*बद्रीनाथ* --*माना गाव ते पांडव स्वर्गारोहण मार्ग*.
       रस्त्यावरून वाहणाऱ्या नदीच्या  स्वच्छ थंडगार प्रवाहात, तळपायांना सचैल स्नान घालत पायी पायी,आम्ही *माना* या उत्तर भारताच्या शेवटच्या टोकावर असणार्‍या छोट्याशा गावात प्रवेश केला.
     
माना, हे एक छोटसं गाव. पण त्याची ख्याती मात्र भारी होती. खरंतर या गावातून दोन तीन किलोमीटरची चढण असल्यामुळे मजल-दरमजल करत आम्ही साऱ्यांनीच रपेट मारली.  रस्त्याच्या दुतर्फा अगदी मोजकीच घर असणारं हे गाव.दरवाजातच वृद्ध स्त्रिया लोकरी च्या साह्याने टोप्या विनवण्या साठी कमालीच्या गतीने आपले हात चालवत होत्या. तेथील गृहिणींचा तो लघु उद्योग असावा. रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकाराच्या आकर्षक टोप्या खूप सुंदर दिसत होत्या.पण अख्खे गाव मागे टाकत, आम्हाला आणखी पहाड चढून पुढे जावयाचे होते.या टोप्या बघण्यात वेळ दवडणं काही संयुक्तिक वाटलं नाही.
     समोर तसेच पुढे गेल्यानंतर पहाडांच्या कपारीत असणाऱ्या गणेश गुफेला भेट दिली. डाव्या बाजूला आणखी पायऱ्या चढून गणेशाचं छोटासं मंदिर आणि लोभस मूर्ती बघून दमछाक झाल्याचा त्रास पार विरघळून गेला.
  छोटीशीच गणेश मूर्ती, पण किर्ती मात्र फार महान होती या गणपती बाप्पाची! या गुहेत बसून श्री गणेशांनी स्वहस्ते महाभारत लिहिलं होतं. असं सांगितलं जातं. आपल्याला महाभारत व्यास ऋषींनी लिहिलं हा  इतिहास माहीत आहे. पण ज्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिला गेला, ते प्रत्यक्ष ठिकाण बघून आनंदाला पारावारच राहिला नाही!काय रम्य आणि सौंदर्यपूर्ण ठिकाण होतं ते, म्हणून सांगू! गणेश गुहे पासून आणखी उंचावर, पहाडाच्या वरच्या भागात व्यास गुफा आहे.गंमत म्हणजे या गुहेत बसून महर्षी व्यासांनी श्रीगणेशाला महाभारताच्या 'स्क्रिप्टचं डिक्टेशन' दिलं, आणि श्री गणेशाने ते खाली आपल्या गुफेत बसून लिहून काढलं.अशी आख्यायिका आहे. ऐकताना खरंच खूप मजा वाटत होती, पण मनही विश्वास ठेवू लागलं या कथेवर! खरोखरच,कोणताही अडसर नाही,सभोवताल पहाडांनी वेढलेलं. व्यासांनी आपल्या गुहेतून सांगितलेलं गणेशाला सहज ऐकू येईल अशीच परिस्थिती, वातावरण. आपण कल्पनाचित्र सहज रेखाटू शकतो. आणि त्याचा पुरावा म्हणजे या ठिकाणांना प्रत्यक्ष बघत होतो.
    या दोन्ही गुफांच्या समोरुनच,तेथेच पहाडातून उगम पावलेली सरस्वती नदी वाहते. भल्यामोठ्या पहाडांच्या कपारीतून पडणारी. तिची एक धार फक्त दृष्टीस पडते.ती कुठून येत असावी याचा अजिबात अंदाज येत नाही आपल्या. पण प्रचंड मोठ्या धबधब्याच्या स्वरुपात काळ्या कुळकुळीत पाषाणावर आपटत आपटत आपल्या प्रचंड आवाजात खळाळत  या दोन्ही गुफांच्या समोरुन वाहात जाते. सुरुवातीला दिसणारी ही बारीक धार म्हणजेच सरस्वती नदीचा उगम होय, असे आपण मानतो. ती कुठून येते त्याचा बोध अजिबात होत नाही.या ठिकाणी देवी सरस्वतीचे छोटेसे मंदिर आहे.मुर्ती फारच रेखीव आहे. तर दोन्ही गुफांच्या  समोरुन वाहणाऱ्या या सरस्वती नदीच्या पाण्याच्या खळखळाटाच्या आवाजाचा मात्र, महाभारत  कागदावर उतरवताना, गणेशांना व्यत्यय येऊ लागला. व्यासांचा आवाज त्यांच्या पर्यंत पोहोंचत नव्हता. आहे ना गंमत! तेंव्हा, राग येऊन श्री गणेशांनी सरस्वती देवी ला तुझा आवाज बंद होऊन जाईल असा शाप दिला.आणि थोडे पुढे गेल्यानंतर ही सरस्वती नदी लुप्त होते. अशी आख्यायिका सांगितली जाते.
     ह्याच सरस्वती नदीच्या उगमाच्या जवळ दोन प्रचंड मोठ्या पहाडांना जोडणारा अतिभव्य असा दगड येथे  *'भिमपूल'* या नावाने प्रसिद्ध आहे. पहाडांमधून धबधब्याच्या रुपात पडणारे पाणी, या पुलाच्या खालून आदळत वाहत होतं. खूपच सुंदर ठिकाण आहे हे.या पुलाविषयी मिळालेली माहिती, याच भिमपुला पासून उजव्या बाजूने उंच जाणारा असा पांडवांचा *स्वर्गारोहणाचा* मार्ग आहे आहे.आपण आपल्या डोळ्यांनी तो बघतो आहोत यावर विश्वासच बसत नव्हता!  आहे खरा हा रस्ता पठारी क्षेत्रा सारखा पण उंच जाणारा. स्वर्गारोहणाच्या वेळी, म्हणजे स्वर्गाकडे मार्गस्थ होताना पांडव याच मार्गाने जात होते. पण जाताना सरस्वती नदीच्या दोन पहाडांच्या मध्ये वाहाणऱ्या धबधब्यांचा अडसर बनला होता. त्यांना या मार्गावर जाणे कठीण झालं होतं, रस्ता नाही जावे कसे?अशा परिस्थितीत भिमाने आपल्या प्रचंड शक्तीनिशी उपरोक्त उल्लेख केलेला हा भलामोठा अवजड दगड बरोबर  पहाडांना जोडत, रस्ता तयार केला.आणि मग पांडवांनी यावरुन जात स्वर्गाकडे प्रयाण केले. या सार्‍या कथांवर कितपत विश्वास ठेवावा? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण कथेनुसार त्यातील स्थळांचे पुरावे मात्र बघून आल्याचा अगणित आनंद भरभरुन समाधान देऊन जातो,हे  नाकारुन चालणार नाही.
     या पुलाच्या उजव्या दिशेने संपूर्ण हिमालय पर्वतांच्या रांगा आहेत. त्यातील एका पहाडाच्या तळाशी हिंदुस्थान का *अंतिम दुकान* या नावाचा एक बोर्ड बघितला.तेथे जवळ जात,बघितलं तर खरंच तिथे एक छोटेसं दुकान आहे. तेथे तिरंगा फडकत होता. बोर्डावरील उल्लेखा नुसार हे दुकान खरंच, भारताच्या उत्तरेकडे शेवटचं आहे नक्कीच, यावर विश्वास ठेवावाच लागतो. कारण यानंतर सलग १३ किलोमीटर पर्यंत हिमालय पहाडांच्या रांगा आहेत यातील बऱ्याचश्या बर्फाच्छादित आहेत. आणि त्यानंतर चीनची हद्द चालू होते. असं समजलं. हे सारं समजल्यानंतर मग जाणीव झाली की खरंच आपण आपलं घर सोडून किती लांब पर्यंत आलो आहोत! पण सर्वच यात्रा यशस्वीपणे परिपूर्ण झाली आणि आपण सुखरुप घरी परत जाणार आहोत, या विश्वासाने सहलीचं  खूप सार्थक झाल्याचे समाधान मनात आणि चेहऱ्यावर चमकत होतं.
      बद्रीनाथ हे आमच्या उत्तरांचल चारधाम यात्रेत शेवटचं धाम होतं. येथून आता पुढे परतीचा प्रवास चालू होणार होता. आम्ही जात असताना रस्त्यात, धवली गंगा आणि अलकनंदा यांचा संगम असणारं विष्णुप्रयाग हे ठिकाण बघितलं.अवर्णनीय सौंदर्यपूर्ण असं ठिकाण आहे हे!
     या दिवशी सायंकाळी जोशीमठ येथेच मुक्काम केला. हिंदू धर्माचे संस्थापक आद्य शंकराचार्यांनी येथे हिंदू धर्माचे चार पीठांपैकी एक पीठ आहे म्हणून, मठाची स्थापना केली आहे.ते जेथे तपश्चर्येला बसायचे, ती गुहा येथेच आहे. या मठात लक्ष्मीनारायणाची रेखीव संगमरवरी मूर्ती आहे.तिचे दर्शन घेऊन थोडेसे चढून आम्ही जवळच असणाऱ्या कल्पवृक्षाचे दर्शन घेतले. २५०० वर्षांपूर्वीचा, विस्ताराने प्रचंड मोठा असा हा हिरवागार वृक्ष बघून, तोंडात बोटे घालाविशी वाटली. ते झाड कशाचे असावे? याचा काही अंदाज आला नाही. कारण त्याला फुलं किंवा फळं नव्हती. पण हिरव्यागार झाडाच्या सावलीने  जमिनीचे खूप मोठे क्षेत्र व्यापून टाकलेले होते.
    दुसऱ्या दिवशी सकाळीच परतीच्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यासाठी,बारा तासांचा दोनशे किलोमीटर प्रवास करत आम्ही किर्ती नगर ला आलो.केवळ एक रात्र आराम घेण्यासाठी हा मुक्काम होता. पण येथे हॉटेल एवढ्या छान पॉईंटवर होतं!खळखळ वाहाणाऱ्या नदीच्या काठावरच! सभोवती पहाड, आम्ही खूप आनंद घेतला या ठिकाणाचा.
      सकाळी नाश्ता आटोपून किर्ती नगर ते ऋषिकेश-हरिद्वार दिवसभराचा प्रवास करत, निसर्गसौंदर्य टिपलं.जातांना रस्त्यामध्ये देवप्रयाग येथे अलकनंदा आणि भागीरथी या नद्यांचा संगम बघितला.तर रुद्रप्रयाग येथे, बद्रीनाथा वरुन उगम पावणारी अलकनंदा आणि केदारनाथहून उगम पावणारी मंदाकिनी या दोन नद्यांचा संगम होऊन विष्णू व शिव एकरूप होतात! प्रयाग म्हणजे, दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो,ते स्थान.या भागात असे बरेच प्रयाग आहेत.
     ऋषिकेश शहरामध्ये भागीरथीला गंगा हे नाव प्राप्त होतं. गंगोत्री पासून गोमुखातून उगम पावणारी भागिरथी,येथे पर्यंत येताना बऱ्याच नद्यांना आपल्यात सामावून घेत,येथे गंगा हे नाव धारण करते.येथे मंदिरांची खूप मोठी संख्या आहे.गंगेच्या प्रवाहने संपूर्ण शहराला व्यापून टाकलेलं दिसतं.त्यामुळे दळणवळणाची सोय होण्यासाठी तेथे बरेच झुलते पूल बांधलेले आहेत.सर्वांत पहिला रामांच्या सांगण्यावरुन लक्ष्मणाने बांधला,तो लक्ष्मण झुला प्रसिध्द आहे.आधुनिक तंत्रज्ञानाने  त्याची खूप छान बांधणी केली आहे. त्या शहरात रामझुलाही आहे,आणि  जानकी झुल्याचे काम प्रगतिपथावर आहे.२०२१ मधील कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे ते ऋषिकेश मध्येच.येथेच  लक्ष्मणाच्या मंदिरालाही आम्ही भेट दिली.
       काली कमली वाला नावाचे सत्पुरुष होऊन गेले आहेत.त्यांनी या चारधाम यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी रहावयाची व्यवस्था म्हणून बरेच आश्रम बांधले आहेत. दानशूर लोक यात्रेला आले म्हणजे त्यांना या कामासाठी भरभरून मदत देत असत. त्यामुळे त्यातूनच या आश्रमांचे बांधकाम झाले आहे. ते गेल्यानंतर त्यांच्या मुलानं वडिलांचे काम सर्वदूर पर्यंत पोहचवत, विविध आश्रम बांधले.त्यालाच "चट्टी"असं संबोधन आहे. मी मागे उल्लेख केल्याप्रमाणे  चट्टी,म्हणजेच राहण्याची व्यवस्था असणारे आश्रम होत. उत्तराखंडमध्ये हनुमान चट्टी,जानकीचट्टी, सायंचट्टी असे भरपूर आहेत.याच बाबांचा आश्रम ऋषिकेश येथे आहे.मला वाटतं माझ्या बघण्यातलं हे एकमेव ठिकाण असेल,जेथे "कोणत्याही प्रकारची देणगी देऊ नये,स्विकारली जाणार नाही",असं लिहिलेला बोर्ड होता.
      या चारधाम यात्रेच्या आमच्या समारोपाचा दिवस हरिद्वार येथे होणार होता. हरिद्वार म्हणजे देवांच्या दारी जाण्याचे महाद्वार.गंगामातेच्या स्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी भाविकांची गर्दी नेहमीच असणारी. गंगेच्या पवित्र स्नानाचे अतिशय महत्त्व आहे या ठिकाणी. पापक्षालन करण्यासाठी येथे येऊन गंगेत एक तरी डुबकी मारावी असे म्हणतात. या ठिकाणी  बरेच घाट बांधलेली दिसून येतात. हरिद्वार येथील गंगेची सायंकाळची आरती खूपच विलोभनीय असते.आमच्या चारधाम देवदर्शनाची सांगता, आम्ही गंगा आरतीने करणार होतो. ऋषिकेश मधून निघाल्यानंतर बरोबर सात वाजता, हरिद्वारला "हर की पौडी"या ठिकाणी पोहोंचलो. येथे गंगेच्या मुख्य आरतीचे आयोजन केले जाते. तेथे गंगाकाठावर, गंगेची प्रतीकात्मक मूर्ती पालखीमध्ये  आणली जाते. आणि थोडा अंधार झाल्यानंतर बरोबर साडेसात वाजता मुख्य आरती चालू होते. ती आरती बघण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी येथे जमा होते. मोठ्या मोठ्या भरपूर दिव्यांनी युक्त असे आरती पात्र सात पंड्यांच्या हातात घेऊन, गंगेला मंत्र उच्चारत, पुजा पठण व आरती होते.लखलखत्या दिव्यांचे गंगेच्या वाहत्या पाण्यात पडणारे प्रतिबिंब फारच अप्रतिम दिसते! भरगच्च फुलांनी सजवलेली गंगेची मूर्ती, वाहती गंगा,कांही दिवे द्रोणात टाकून गंगेवर तरंगत सोडून दिलेले,वाद्यांच्या नादात होणारी ही मंगलारती आम्ही सर्वांनी डोळे भरून बघितली. कृतकृत्यतेच्य भावनेने भरलेल्या मनाने गंगामातेला मनापासून नमस्कार करत, तिचे आभार मानले.त्या दिवशीचा मुक्काम हरिद्वार मध्येच केला आम्ही.
आता मात्र घरचे वेध लागले होते. सकाळी नाश्ता आटोपून दिल्लीच्या दिशेने आमच्या बस ने कूच केली.पहाडी प्रदेशाने रजा घेतली होती. रस्ता छानच होता भन्नाट वेगाने दुपारी एक वाजेपर्यंत दिल्लीत आलो.तेथे दुपारचे जेवण घेऊन सर्व प्रवाशांनी परस्परांचा निरोप घेतला.आणि प्रत्येक जण स्वगृहाच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी विमानतळावर जाते झाले.आमचे विमानही वेळेवरच आमची वाट बघत होतेच.रात्री साडेसात च्या ठोक्यावर आम्ही आमच्या स्वगृही पोहोंचलो. यात्रा सफल संपन्न झाली या आनंद व समाधानाच्या ओतप्रोत भावनेसह.
©
*नंदिनी म.देशपांडे*.
आषाढ शुद्ध एकादशी.
जुलै,१२,२०१९.