सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व!

एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व,
 #श्री #रामचंद्र
#आसोलेकर
💥💥💥

     "दादा आधार देऊ का तुम्हाला? उठण्यासाठी?"
असं म्हणत मी पटकन उभी राहिले.... सोफा थोडा खालच्या लेव्हलला होता, म्हणून काळजीनं विचारलं मी दादांना...पानं वाढलेली होती,त्यांना उठून जेवणाच्या टेबला जवळ जेवणासाठी जावयाचं होतं...पण दादांनी खुणेनेच तळहात हलवत मला नकार दिला....आणि मागनं उमाचा त्यांची (सूनबाई) तिचा आवाज आला तीनही मला सुचना केली,'त्यांना आवडत नाही आधार घेणं,'मी मात्र दोन मिनिट निःशब्दच झाले....   
   
     साधारण सात-आठ महिन्यांपूर्वी आम्ही मुंबईला त्यांच्या घरी आयआयटीच्या कॅम्पसमध्ये,पवईत गेलो होतो....दादांच्या आणि आमच्या आत्यांच्या भेटीसाठी... तसे नात्याने,दादा माझे मामा... आत्यांचे यजमान... पण आम्ही सर्वजण त्यांना 'दादा' या नावाने संबोधितो... अगदी त्यांच्या भावंडांपासून, मुलांपासून आम्ही बाकीचे सर्व नातेवाईक... 

    दादा, *रामचंद्र असोलेकर*  या नावाने सर्वांना परिचित आहेत... माझ्यासाठी तर ते एक पितृतुल्य व्यक्तिमत्व...
माझ्या वडिलांच्या नंतर आदरयुक्त असणारं असंच त्यांचं माझ्या आयुष्यातील स्थान.... 
२१ सप्टेंबर १९३१  रोजी जन्मलेले आमचे दादा, आज त्यांच्या वयाच्या नव्वदी मध्ये प्रवेश करत आहेत... आणि आजही हे व्यक्तीमत्व बघून पंचविशी तीशीचा तरुण लाजेल असेच हे कार्यरत असतात... प्रत्येकासाठी अत्यंत अनुकरणीय, आदर्श, सोज्वळ,अतिशय साधी रहणी, भौतिक सुखाची कधीही आसक्ती नसणारं,कायम दुसऱ्यांचा विचार करणारं,अतिशय स्वावलंबी आणि कुटुंबासाठी,आईवडिलांसाठी ,
आपल्या माणसांसाठी अविरत कष्टणारं असंच...
किंबहूणा, "कुटुंबाप्रती कर्तव्य" हेच आपल्या आयुष्याचे ब्रिद ठेवणारे असे....

    नाकी डोळी नीटस, हसतमुख गोरापान तेजःपुंज चेहरा, मध्यम उंचीचा बांधा आणि बघणार्‍याला आदरच वाटावयास हवा असंच हे  व्यक्तिमत्व....
आजही श्री रामचंद्रराव आसोलेकर नव्वदीत आले आहेत,यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही... दोन-तीन दिवस त्यांच्या सहवासात घालवले तर, 'हे ज्येष्ठ नव्हेतच, तर नव्वदीतील तरुणच'! असेच उद्गार निघतील कोणाच्याही मुखातून...

   आई-वडिलांचं हे ज्येष्ठ आपत्य... वडील प्राथमिक शिक्षक शेतीशिवाय दुसरा बाकी आधार नाही.... पण पाठची पाच भावंडं... एवढा मोठा डोलारा सांभाळताना एकट्या वडिलांची कसरत व्हायची.... माफक शिक्षण झाल्याबरोबर नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता ,दादांजवळ....  बीएस्सी नंतर खूप इच्छा असूनही शिक्षणाला अर्ध विराम  देऊन औरंगाबादच्या शासकीय (घाटी) रुग्णालयात क्लार्कची नोकरी स्विकारली त्यांनी... त्यामुळे वडिलांना आधार होऊन भावंडांची लग्न, बहिणींची बाळंतपण, शिवाय घाटी ची सोय म्हणून नातेवाईकांची आजारपणं, त्यांची शुश्रुषा ह्यांची कायम जबाबदारी त्यांनीच घेतली... औरंगाबाद शहराचं ठिकाण म्हणून गरजवंत नातेवाईकाला शिक्षणासाठी स्वतःच्या घरी ठेवून घेणं... असे कितीतरी नातेवाईकांना, स्नेह्यांना आपल्या आहे त्या परिस्थितीत सामावून घेत असताना कोणताही अभिनिवेश नाही की उपकाराची भाषा नाही....कायम  इतरांप्रती मदतीचा हात त्यांनी दिलाय....

      त्यांच्या स्वतःच्या संसारात या दोघांशिवाय तीन मुलींसह एक मुलगा.... या चौघांनाही त्यांनी शिक्षणाच्या परिपूर्ण संधी उपलब्ध करून दिल्या...त्यांनी प्रत्येकाला उच्चशिक्षीत बनवलेले आहे... आज प्रत्येक जण ताठ मानेने आपल्या पायावर भक्कमपणे स्थिरावलेली दिसतात... मुलाला इंजिनियर बनवत,पी.एच. डी.बनवले... परदेशगमनाची संधी उपलब्ध करून दिली...आज पवई आय आयटीत तो पर्यावरण विभागाचा एच.ओ.डी.असून प्रोफेसर आहे...एक मुलगी शिक्षिका, इतर दोघी डॉक्टर म्हणून यशस्वी  झाल्या आहेत... असं सगळं सांभाळत, आपली शिक्षणाची सुप्त इच्छाही त्यांनी नोकरी करत करतच पूर्ण केली...एल.एल.बी. केले... शिवाय वयाच्या ४५ व्या वर्षी एम. एस. सी. बायोकेमिस्ट्री करुन घाटीमध्येच प्राध्यापक पदावर रुजू झाले... आज औरंगाबाद येथील कितीतरी डॉक्टर्स त्यांचे विद्यार्थी आहेत...

    या सर्व आघाड्यांवर बरोबरच कौटुंबिक जबाबदारीत तसूभरही कमी पडले नाहीत दादा... अर्थात घरातल्या आघाडीवर आमची आत्या, सौ. कुंदा रामचंद्र आसोलेकर हिची यथार्थ साथ होतीच... आजही आहेच...आमच्या आत्यांना तिच्या लग्नानंतर जवळजवळ पंचवीस वर्षे बाहेरचे कोणतेही व्यवहार करावे लागलेच नाहीत...एक तर घकामाच्या मांदीयाळीत तिला वेळही मिळायचा नाही, आणि काटकसरीनं संसार करत, घरातील सदस्यांच्या कपड्यांचं शिवणकाम करत वाचवता येतील तेवढे पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला...दादा, बाहेरची सारी कामं खंबीरपणानं
करुन संसारातील समतोल साधत....शिवाय  आत्यावर असणाऱ्या घरच्या जबाबदारीची जाणीव ठेवत घर कामातही शक्य तेवढी मदतच केली दादांनी...घरात नेहमीच पाहूण्यांचा राबता असायचा...
  
  शासकीय नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर सुध्दा दादा, पुण्यात भारतीय विद्यापीठाच्या मुलींच्या हॉस्टेलवर रेक्टर पदावर कांहीवर्ष कार्यरत होते...
  
   मुंबईसारख्या ठिकाणी सुध्दा आसोलेकर कुटुंबाच्या चार पिढ्या एकत्र राहत असत... दादांचे वृद्ध आई-वडील, ही दोघं नवरा-बायको, मुलगा-सून आणि एक नातू... अक्षरशः या सर्वांना समाधानाने एकत्र नांदताना बघून लोकांना आश्चर्य वाटायचं... आपल्या वयाच्या सत्तरी,बहात्तरी पर्यंत रामचंद्रराव आसोलेकरांना मातृपितृ सुख मिळाले...खरंच, त्यांच्यासारखे भाग्यवान तेच!

   दादा आपल्या सत्तरी मध्ये स्वतः आपल्या अतिवृद्ध आईला उचलून घेत त्यांची शुश्रूषा करत असत...

     गेली दोन वर्षे झाली, माझी आत्या बेडरिडन  आहे... २४ तासांसाठी मेट्रन ठेवावी लागते.... पण या 'करोना'काळात ती सोयही थांबवावी लागली आहे...   आज नव्वदीतही हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, रामचंद्रराव आसोलेकर, आपल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असणाऱ्या आपल्या अर्धांगिनी ची काठी बनून तिला मानसिक आधार तर देत आहेतच, पण  तिला शारीरिक आधार देत,अगदी भरवण्या पासून तिची शुश्रुषा करत आहेत ! अगदी न थकता...विना तक्रार...अजूनही आपली बँकेचीे कामं ते गाडीतून जातात, पण स्वतः करतात.... उच्चप्रतीची स्मरणशक्ती लाभलेले, आणि भूगोल या विषयाचे सखोल ज्ञान असणारे रामचंद्रराव आसोलेकर कायम अवतीभवती काय चालू आहे याचे अपडेट्स ठेवून असतात....

    असा सगळा आनंदीआनंद असताना, समाधान असताना कुठेही दादांच्या वागण्या-बोलण्यात बडेजाव नाही... कायम जमिनीवर पाय घट्ट रोवलेले असतात... 
दुर्देवानं आजारपणामूळे एका जावयानं अर्ध्यातून संसार टाकत एक्झिट घेतली या जगातून...पण, दादा आणि आत्याने आपल्या मुलीला आणि  नातवंडांना अगदी समर्थपणे मानसिक आधार देत खंबीरपणे उभं केलं आहे....नातवंडही आपापल्या पायावर स्थिर होत आहेत....

    तरुणपणातील कष्टांचा शीण कुठल्या कुठे पळून गेलाय आज दादांचा... असाच प्रसन्न तृप्तीचा आनंद, समाधान ईश्वराने त्यांच्या आयुष्यात कायम ठेवावा... या अतिशय साध्या आदरणीय व्यक्तिमत्वाला शतायुषाचा उंबरठा ओलांडण्यास ईश्वरानं साथ करावी...हिच सदिच्छा व्यक्त करते,मी आज त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने....  
    दादांना, या पुढच्या वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा देऊन त्यांना अभिवादन करते....🙏🙏
*त्वं जीव शतम् वर्धमानः।।*

©️ 
*नंदिनी म. देशपांडे.*

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

🌹वेणी🌹

🧛‍♀️ *वेणी*.🧛‍♀️
~~~~~~~~~
   आज सहज आरशात बघून केसांना कंगवा करताना, जाणवले खूप वर्षांनी केसांची लांबी थोडी वाढली आहे का? लॉक डाऊन आणि अजूनही या करोना दहशतीने पार्लरमध्ये जाऊन केसांना कात्री लावण्याची हिम्मत होत नाहीये मला.... पण गंमत म्हणून पेडाची वेणी घालावी का?किती किती वर्ष झाली,अशी वेणी गुंफायला....    
   एकदा मनाने ठरवल्यावर मग काय, लगेच कृतीत उतरवले.... आणि नकळत मन चाळीस-पंचेचाळीस वर्ष मागे, अगदी माझ्या बालपणात जाऊन पोहोचले.... बालपणी पाचवीत प्रवेश केला, आणि," आता मी मोठी झालेआहे आई...मी आता बॉबकट करणार नाही.....मी यापुढे केस वाढवणार आहे...."असा हट्ट धरून  त्यावेळी वेणी घालण्यासाठी केस वाढवले होते.... पण आपली आपल्याला ही वेणी घालता येत असेल तर शपथ! अजिबात जमायचे नाही....
    मग सकाळची शाळा असताना आईने तेल लावून चापून-चोपून वेणी घालून द्यावी.... कधी घाईघाईत ती उंच व्हावी तर कधी अगदी मानेवर मग मात्र माझी आईकडे अशीच घातलीस तू वेणी ,अन् तशीच घातली...अशी भुन भुन चालू असायची....कधी ती थोडी उंचच जायची तर कधी अगदीच मानेवर...
कधी थोडी सैल होऊन केस बाहेर निघायचे...मग, "पुन्हा 
 घालून दे बघ गं आई... बघ कसा 'बुचका' आलाय?"असं टुमणं लावायची मी आईजवळ..... तर कधी एका कानावरच आलीए नाहीतर वाकडीच पडते आहे.... अशा अनेक तक्रारी हमखास असायच्याच... अशा काहीतरी सबबीखाली ती वेणी एकदा तरी उकलून घालावीच लागायची आईला....
     "बुचका", हा शब्द कितीतरी वर्षांनी या संदर्भाने आठवलाच... एरवीही कधीच उपयोगात आणला जात नाही हा, पण मला आठवला अचानक! ह्याचे माझेच मला कौतुक वाटले....
    वेणीचे असंख्य प्रकार होते... एक  वेणी, दोन वेण्या, रिबीन लावून,दोन वेण्यांना रिबनी लावून वर बांधून.... कधी वेणी चा पाळणा सुद्धा!तर कधी चार पेडाची.... कधी उलट्या पेडांची.... अशी विविध रूपं... कशीही घातली तरी केस बांधलेले असावेत.... डोळ्यांवर कपाळावर रेंगाळू नयेत हा त्यामागचा उद्देश असे.... शाळेमध्ये केस मोकळे सोडावयास बंदीच होती....
   काही शाळांमध्ये तर पेडाची वेणी दोन वेण्या घालून वर सांगितली त्या प्रमाणे कानावर फोल्ड करुन घालणेच आवश्यक असायचे....  
    मला आठवतं, मी औरंगाबादेत एक वर्ष आत्याकडे शिकले... तिच्या तिघी मुली आणि चौथी मी... शाळा सकाळची, विश्वास नगर लेबर कॉलनीतून शारदा मंदिर शाळा फार लांब...  तेव्हा सिटी बसेसही मोजक्याच असायच्या.... सकाळी साडेसहाला तयार होऊन शाळेसाठी निघावे लागायचे....आम्ही रात्रीच आत्याच्या उशाशी कंगवा, तेलाची बाटली आणि छोटा आरसा आणून ठेवत असू... बाकी तयारी आम्ही आमचीच शाळेत जाताना करायचो....त्या वेळी सकाळी उठलेली आत्या तेथे जागेवरच बसायची आणि आम्ही एक एक जणी तिच्या समोर वेणी साठी नंबर लावायचो.... चौघींच्या वेण्या त्याही दोन घालून वर बांधणे हे चांगलेच मोठेच काम होते....
    त्याकाळी तरुण मुलींनी केस मोकळे सोडणे म्हणजे वाहिय्यात पणाचे लक्षण समजलं जायचं...नंतर हळू हळू केसांची लांबी कमी होत गेली...पेडाची वेणी घालणं लुप्तच झालयं जवळ जवळ.....कायमच गायब होईल की काय? अशीही पाल चुकचुकते मनात... या निमित्ताने मी मात्र माझ्या बालपणात गेले आणि व्यक्त झाले हे मात्र खरंय....

©️ 
*नंदिनी म. देशपांडे*.

🌹🌹🌹🌹🌹🌹

🌹कहाणी एका यूट्यूब चॅनलची🌹

कहाणी एका चॅनलची....
*********
    "अगं,आत्या, मला फार 'बोअर' होतंयं आत्या....तुझे आपण  यूट्यूब चैनल बनवूया", "सांग केंव्हा बनवायचे?" "अरे,मला काही जमत नाही बाबा.... ते बनवणे, ऑपरेट करणे, व्हिडिओ तयार करणे...." "मी आहे ना गं,मी बनवून देतो....तू फक्त हो म्हण"..... 

लॉक डाऊनच्या काळात, हा आमच्या आत्या- भाच्या मधला अधून-मधून सुरू असणारा संवाद....
१३-१४ वर्षांचा शाळकरी मुलगा हा, आणि किती आत्मविश्वासाने म्हणतोय, मी बनवतो सारे! मला थोडीशी धाक धुक होती.... चॅनल बनवणं म्हणजे काही सोपं आहे का ते? नेटवरून सर्वांना दिसेल... एकदा चालू केल्यास सातत्य ठेवावे लागेल....उद्या शाळा चालू झाल्यानंतर जमणार आहे का याला.... आणि मला तर त्यातले 
र ट फ  काहीच येत नाही....शंकेने घर केलं होतं, पण पुन्हा विचार केला,मागे लागलयं लेकरु, टेक्निकल विषयात त्याला गोडी निर्माण होत आहे,पण हाताखालून सराव होण्यासाठी त्याच्या हातून काम व्हावयास हवेच.... चुकले तरी काही म्हणणार नाही,असे त्याच्या हक्काचे ठिकाण होते मी त्याच्यासाठी.... म्हणूनच मी माझ्या १४ वर्षांच्या भाच्याला, ईशान,त्याचं नाव....
माझे चॅनल बनवण्याची संधी द्यायची ठरवली.... माझा होकार मिळताच, अवघ्या पाचच मिनिटांत खटा खटा मोबाईलचे बटन क्लिक करत, त्यांनं माझं "शब्दगंध" हे यू ट्यूब चॅनल बनवलं सुद्धा....मी चाटच पडले... एवढ्या लवकर! घाईघाईतच  ईशानने मला त्यासाठी नाव विचारलं...त्या वेळी जे सुचलं ते मी पटकन सांगितलं त्याला,
"शब्द गंध".... खरं म्हणजे तो इंग्लिश माध्यमातून शिकणारा विद्यार्थी.... मराठी भाषा  त्याला बोलता येते,कामापुरती  लिहिता येते.... बऱ्याच गोष्टींचा अर्थबोध होत नाही, मग अशावेळी ती गोष्ट तो मला विचारतो, मी त्याला मराठीत किंवा इंग्लिश मध्ये त्याचा अर्थ स्पष्ट करुन सांगते... त्यामुळे त्याचाही मराठीतील शब्दसंग्रह वाढत चाललाय हे लक्षात येऊ लागलंय.... पण तो व्हिडिओ कसा, कुठून बनवायचा, त्याची एडिटिंग 
प्रक्रिया कशी करावयाची, निवेदनाच्या संदर्भात असणारी चित्रं, फोटो कशी टाकावीत? सुरुवात, शेवट, टाइमिंग पार्श्वसंगीत वगैरे वगैरे तांत्रिक बाजू तो अगदी जबाबदारीने,
एवढ्या एकाग्रतेने करतो, की आश्चर्य मिश्रीत कौतुक वाटते मला....मी फक्त स्क्रिप्ट  लिहित असते.... बाकी साऱ्या कल्पना त्याच्याच.... गेल्या चार-पाच वर्षात ॲन्डरॉईड फोन मी जसा वापरते तसा, केवळ लिहिणे, शोधणे, फोन करणे आणि घेणे या शिवाय पुढच्या वर्गात मी आणखीनही जाऊ शकले नाही.... तेथे ही एवढीशी मुलं लीलया किती सहजपणे वापरतात आपलं
टॅलेंट!खरंच चाट पडायला होतं.... हल्लीची पिढी स्मार्ट आहे, त्यांची ग्रास्पिंग पॉवर कमालीची वेगवान आहे, या म्हणण्यात खूपच  तथ्य आहे, याची प्रचिती आली.... त्यामुळे, आणि त्याला आपण संधी देत ती आणखी फुलवत न्यायची हे मी त्याची या क्षेत्रातील आवड बघून ठरवूनच टाकलं.... ह्या प्रयोग करण्यामुळे, याबाबतीत त्याच्या नवनवीन कल्पना त्याला प्रत्यक्षात उतरण्याची संधी मिळते.... यातूनच मुले शिकत जातात आणि परफेक्ट बनतात.... उद्या या छंदाचे रूपांतर असाच दूरदर्शीपणा समोर ठेवत,कदाचित त्याच्या प्रोफेशन मध्येही होऊ शकेल....आपण मुलांना नाउमेद  करता कामा नये असे मला वाटले... 
ईशानने आत्तापर्यंत शब्दगंध चॅनलचे सहा व्हिडिओज बनवले...प्रत्येक व्हिडिओ  मध्ये काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे....
यामध्ये, 
* शब्दगंध एक ओळख.
* श्रावणधारा.
* काव्यशब्दांच्या सरी. 
 *संस्कृती.
* एक धमाल सफर.   आणि *शब्द माधुर्य.
  माझ्या दृष्टीने सर्वच व्हिडीओज चांगलेच बनले आहेत... दरवेळी त्याच्या मनातील  उदयाला येणार्‍या  नवनवीन कल्पना प्रत्यक्षात  उतरवण्यासाठी त्याला त्याची स्पेस,चालना मिळत जाते....त्याची या क्षेत्रातील गोडी, सातत्य परफेक्शन अट्टाहास एकाग्रता या साऱ्या गोष्टी तो या विषयात तयार होण्यास मदत होत जाते....हे बघून मलाही समाधान वाटतं... आणि त्याच्या या क्षेत्रातील कामाचे कौतुकही वाटतं.... म्हणतात ना, 
"केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे".

©️ 
नंदिनी म.देशपांडे.
🌹🌹🌹🌹🌹

https://youtu.be/XRf9-GzP1kM

https://youtu.be/sV6VDQdgANs

https://youtu.be/IzZ-C-cNFSk

https://youtu.be/F_zstroOPPc

https://youtu.be/GYPaRcEhF1k

https://youtu.be/aDWqsvNizv0

व्हिडिओज च्या लिंक्स...
🌹🌹🌹🌹

🌹घे भरारी🌹

🌿 घे भरारी! 🌿

     एक छोटेसे पिल्लू घरात आले की,संपूर्ण घर, वास्तू आणि घरातील माणसांची मनंही  चैतन्यानं भारून जातात.... सारं घर सारखं या पिल्लाच्या सानिध्यात, त्याच्या अवतीभवती रेंगाळत रहातं.... मोठी माणसं स्वतः एक पिल्लू बनून आपल्यात ते पिल्लूपण उतरवतात...या पिल्लाचे बोबडे बोल किंबहुना त्याचं रडूही प्रत्येकाला आनंद देऊन जातं... प्रचंड ऊर्जेचा हा बालरूपी स्त्रोत घरातील साऱ्यांचीच ऊर्जा व्दिगुणीत करत असतं....
    
     हेच बाळ जसं मोठं होत जातं तसं त्याचं आकाशही विस्तारत जातं....त्याची स्वतंत्र मतं उदयाला येतात...या मतांचा इतरांकडूनही आदर होऊं लागतो...कारण,ती त्याची 'स्वतःची'अशी त्याच्या मनाच्या प्रगल्भतेतून बनलेली मतं असतात... त्याच्या मतांना एक ठामपण प्राप्त होत जातं.... आणि मोठ्या होत जाणाऱ्या या बाळाच्या मतांची दखल घेत, घरातले निर्णय पूर्णत्वास येत जातात. जन्मापासून कुमारावस्था पार करुन,बाळ तारुण्यात पदार्पण करतं, पण तरीही घरातील मोठ्यांसाठी हे बाळ आजही बाळच असतं...अतिशय सुरक्षित वातावरणात वाढलेलं;आई-बाबांच्या पंखांच्या सावलीत सुखनैवपणानं बहरलेलं;सुरक्षित कोषात संचार करणारं असंच.... साऱ्यांचंच लाडकंही असतंच.... 

   परिस्थितीनुरुप  कालौघाच्या प्रवाहाबरोबर चालण्याचा त्याचा आपला स्वतःचा असा एक निर्धार असतो... त्याची निर्णयक्षमता परिपक्व झालेली असते.... मनोमन ठरवलेला निर्णय वेळीच प्रत्यक्ष उतरवण्यासाठी हे बाळ आपले प्रयत्न चालू ठेवते....मनापासून केलेले प्रयत्न नक्कीच त्याच्या मेहनतीला फळ देऊन जातात... त्याच्या या जिद्दीला घरातील ज्येष्ठांची साथ मिळत जाते...आयुष्यात केव्हा तरी आपल्याला या घरट्याच्या कोषातून बाहेर पडावेच लागणारच याची पुरेपूर जाणीव या मोठ्या झालेल्या पिलाला  असते... 

    आणि तो दिवस येतो, घरट्यातून आकाशाकडे झेपावण्याचा, पंखांमध्ये आलेलं बळ आजमावण्याचा.... 'आपल्या माणसांपासून कितीतरी दूर जायचे आहे आपल्याला',ही जाणीव क्लेशदायक असेल तरीही,निर्णयावर ठाम राहून भरारी घेण्याचा,आपल्याच मनाने दिलेली साद ऐकण्याचा हा दिवस.... बाळाच्या आयुष्यात त्याला यशश्री कडे खेचून नेतो... हे नवीन स्वप्नांना नवीन ध्यैय्यांना साकार करण्यासाठीचे असे पहिले पाऊल यशस्वीतेच्या दिशेने ज्या दिवशी पडते, तो क्षण त्या बाळाच्या आयुष्यातील सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असाच असतो....

   कधीही आपल्या घरट्यातून बाहेर न पडलेल्या या पिल्लाला आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच उंच भरारी घेऊन सातासमुद्रापार जाण्याचा दिवस; एक नवी उमेद,नवी जिद्द,नवीन उन्मेश, नवीन जोश, नवीन माणसं ,नवीन वातावरण आणि नवीन देश धरती यांकडे घेऊन जातो.... केवळ बाळाने आपले आकाश विस्तारत असताना घेतलेल्या निर्णयाचे ध्येय गाठण्यासाठी,स्वतःला सिद्ध करताना एक पाऊल आणखी
टाकण्यासाठी.... ते प्रत्यक्षात  उतरवण्यासाठी... त्यातून स्वतःला आनंद, समाधान मिळवण्यासाठी आणि इतरांनाही या समाधानात न्हाऊन निघण्यासाठी... म्हणूनच, मोठ्यांच्या अंतःकरणातून या बाळासाठी आपोआप शब्द उमटत जातात, 

यशस्वी भवः
यशस्वी भवः
यशस्वी भवः

©️ नंदिनी म.देशपांडे.
🌹🌹🌹🌹🌹🌹