बुधवार, १७ एप्रिल, २०१९

मनोबोध.श्लोक ४०.

*मनाचे श्लोक,माय बोलीतील एक अलौकिक महाकाव्य*

*पुष्पमाला*सदर.

श्लोक ४०.

मना पाविजे सर्वही सूख जेथें।
अती आदरे ठेविजे लक्ष तेथें ।
विवेक कुडी कल्पना पालटीजे।
मना सज्जना राघवी वस्ती कीजे।

         समर्थांनी चाळीसाव्या श्लोकातून खूप छान विचार मांडला आहे या सज्जन मनाला उपदेश करताना असताना श्री समर्थ म्हणतात, परमार्थ साधता साधता भगवंतांची भक्ती करत असताना आपण सर्व ऐहिक सुखाची लालसा ठेवू नये असे अजिबात नाही .हे अपेक्षितही नाही.
   
     संसार सुखाचा आस्वाद घेत घेतच परमार्थही साधता येतो. तो साधावा  लागतोच. संसार करत करत परमार्थ साधणे ही पण एक कला आहे. संसारात असताना परमार्थ साधणे हे जरी खरे असले तरी, असे करताना प्रत्येकाने आपली सद्सद्विवेकबुद्धी मात्र जागरूक ठेवावयास हवी. कोणतेही सुख मिळवत असताना त्याच्या प्रती बघण्याचा आपला दृष्टिकोन हा आदरयुक्तच असावयास हवा. जे सुख आदरपूर्वक स्वीकारले जाते त्यात सुसंस्कृतपणा  जपला जातो. पण जे सुख ओरबडून मिळवले जाते तेथे निश्चितपणे अनैतिकतेचा वास असतो. विवेकाचे उल्लंघन तेथे होते. हे असंस्कृतपणाचे लक्षण आहे. आणि अशा प्रकारच्या अतिरेकाला समर्थांनी भोग असे संबोधले आहे. याच साठी समर्थ सांगतात, विवेकें कुडी कल्पना पालटीजे. सदसद्विवेकबुद्धी चा उपयोग करून वाईट मनोवृत्ती ,वाईट कल्पना यांचा त्याग केला पाहिजे. या वाईट कल्पना बदलून त्या ठिकाणी विवेकाची जोपासना केली पाहिजे.

   यातून समर्थांनी माणसाची मनोवृत्ती कशी असावी याचे चपखल उदाहरण मार्मिक शब्दात मांडले आहे यापुढे समर्थ म्हणतात, सचितानंद परमात्मा हाच एकमेव सुखाचा साठा आहे. त्याच्या परमभक्तीतूनच सुखाचा मार्ग प्राप्त  प्राप्त होऊ शकतो. नेहमी हीच भावना केंद्रस्थानी ठेवून परमात्म्याची भक्ती करावी.अशीच भावना जोपासत  ऐहिक  सुखाचा आस्वाद घ्यावा. यात काहीही गैर नाही.पण विवेकबुद्धी कायम बाळगलीच पाहिजे. तरच त्या सुखाची किंमत कळेल. सुसंस्कृतपणा जपला जाईल यावर त्यांनी भर देऊन सांगितले आहे. हे अतिशय मोलाचे मार्गदर्शन समर्थ या श्‍लोकातून करतात.

    अध्यात्मिक पातळीवर या श्लोकाचा खोल अर्थ जाणून घ्यायचा तर, असे म्हणता येईल की सुख मिळवण्याचा माणसाचा प्रयोग सतत चालू असतो. यशस्वी प्रयोगातून निर्माण झालेल्या सुखाचे प्रमाण अल्प असते. पण त्या अल्प सुखासाठी आपण मोठी किंमत देतो. त्याच्याऐवजी संपूर्ण साठा डोळ्यापुढे ठेवून त्यासाठी सारे लक्ष गुंतवले तर, मन पवित्र ठेवावे लागते. सचितानंद स्वरूप भगवंत हा एकमेव संपूर्ण सुखाचा साठा आहे. पण  तो अदृश्य स्वरूपात आहे. अतिसूक्ष्म असा आहे .त्याच्या पातळीवर जाऊन ध्यान करण्यासाठी ,मन स्थिर होण्यासाठी मनात कोणत्याही प्रकारच्या दृश्य वस्तु चे प्रेम राहून चालत नाही.

© नंदिनी म.देशपांडे.

🌸🌸🌸🌸🌸🌸

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा