मंगळवार, १६ एप्रिल, २०१९

मनोबोध.

श्लोक ९.

  नको रे मना द्रव्य ते पूढिलाजे।
अती स्वार्थबुधी न रे पाप सांचे।
घडे भोगणे पाप ते कर्म खोटें।
न होतां मनासारखें दुःख मोठें।।

    माणसाच्या अती स्वार्थी स्वभाव आणि चंगळवादाला समोर ठेवून समर्थांनी रचलेला हा श्लोक आहे.ऐहिक सुख देणाऱ्या साऱ्या वस्तू पैशाने मिळवता येतात. चंगळवादाचे खरे मूळ हे माणसाच्या स्वार्थीपणा मध्ये आहे. या वृत्तीपाई माणूस स्वतः द्रव्याचा, संपत्तीचा, पैशाचा लोभ करत असतो. पूर्वजांनी मिळवलेले द्रव्य मालमत्ता पैसा हे सर्व सुद्धा त्याला आपल्या स्वार्थासाठी हवे असते. या स्वार्थापोटी तो वाईट कर्म करू लागतो. एवढे करूनही मनासारखे झाले नाही तर तो दुःखीच राहतो.म्हणूनच पूर्वजांचे असलेले धन केवळ आपलेच आहे हा हट्ट माणसाने  सोडावयास हवा.तरच ऐहिक गरजांना, चंगळवादाचा थोडा लगाम बसेल. जेवढी हाव वाढते तेवढाच माणसाच्या मनाची वृत्ती अविवेकी होत जाते. विवेक टिकवून ठेवण्यासाठी स्वार्थीपणाचा त्याग करावा लागतो .
   आजच्या  समाजमनाचाच आरसा समोर ठेवून समर्थांनी हे लिहिले आहे असे वाटते. नैतिकतेच्या सीमा ओलांडल्यास माणसाचा दैत्य  बनू शकतो. स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी माणूस दैत्य बनेल. पण गरजा कमी करुन नैतिकतेच्या अवनतीला लगाम घातल्यास तो देवही बनू शकतो.ईश्वरी भक्ती मुळे तो नतमस्तक होऊ शकतो.म्हणूनच न्यायाने निःस्वार्थ वृत्तीने जीवन जगणे हाच खरा मानवधर्म आहे.

🌹🌹🌹🌹🌹🌹

  नको रे मना मत्सरु दंभ भारु।

६‌ व्या श्लोकातील शेवटचे चरण आहे हे. काम,क्रोध,मद,मत्सर,दंभ,या पाच  विकारां विषयी समर्थ सांगतात,हे पाच विकार म्हणजे माणसाच्या पाच मानसिक अवस्था आहेत.यां पैकी कोणता तरी एखादाच प्रत्येक माणसामध्ये प्रबळ असतो.आपल्यातील  विवेकावर तो अधिन होऊ शकतो.
    पारमार्थिक जीवनात यांपैकी कोणत्याही विकाराचा झालेला अतिरेक हा अडचणी आणू शकतो.याच्या अधिक उद्रेकाने माणसातील अविवेकीपणा प्रभावित होऊन, त्यात स्वतः चाच विनाश घडवण्यास मदत होते. जोपर्यंत हे विकार संयमित स्वरुपामध्ये असतात, तोपर्यंत मानवी जीवनाच्या लौकिक विकासालाही ते पोषक असतात. त्याचा उद्रेक होता कामा नये. या विकारांचा तोल साधत, या विकारांवर मात करत, प्रत्येकाने संयमित वृतीने आपल्यातला विवेक जपला पाहिजे.या उद्रेकी विकारांना समर्थांनी खेदकारी नाना विकारी अशी विशेषणं लावली आहेत.

© *नंदिनी देशपांडे* *

💮💮💮💮💮💮

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा