शनिवार, १३ एप्रिल, २०१९

अनुबंध.

आज रामनवमी.या निमित्ताने आठवणींच्या मौक्तिक मालिकेत मी गुंफलेला एक मोती....

*अनुबंध*

    "अहो,पांडेबुवा,आत्ताच तर तुमच्या मुलीने दहावीची परिक्षा दिलीए....आणखी तिचा रिझल्टही लागायचाय! हुशार आहे हो,तुमची मुलगी....नाव काढेल नक्कीच...‌.आणि हो,तिचं अक्षर म्हणजे तर मोती आहेत मोती....तिचं वय असं कितीसं आहे? तिला खूप शिकवा...आवड आहे तिला शिक्षणाची....नका हो आत्ताच तिला लग्नाच्या बेडीत अडकवू....एकदा संसाराचा गाडा लागला मागे की शिक्षण होत नाही मुलींचं...."
औंढा नागनाथ, माझ्याआईचं माहेर. येथील बऱ्याच प्रतिष्ठीत लोकांनी,आईच्या शाळेतील तिचे शिक्षक आणि आणखी काही नातेवाईक,या साऱ्यांनी आमच्या आजोबांना आईचे वडिल ,नाना यांना परोपरीने सुचित केलेले....
   पण,नाहीच ऐकले आजोबांनी...."अहो,आता १६वं लागलं आहेच की तिला....लग्नाचं योग्यच आहे वय....किती छान ठिकाण चालून आलंय आमच्या दुर्गीला....शहरात रहाणारे आहेत...अहो,मोठ्ठा‌ वाडा आहे त्यांचा....एकटाच मुलगा....भाडेकरु आहेत भरपूर आणि तब्बल दोनशे रुपये भाडं येतं त्याचं!शिवाय मोठा बंगला आहेच मुलगा बीए फायनल ला गेलाय आणखी काय हंव?आमच्या नानांचा प्रतिप्रश्न.....यावर समोरचा काय बोलणार?
झालं,पंचावन्न वर्षांपूर्वी १९६४साली रामनवमीच्या दिवशी मुला मुलीचा दाखवण्याचा कार्यक्रम ठरला....आईच्या एका नातेवाईकाच्या घरी परभणीला....
   कोण कोण होतं ते माहित नाही,पण मुलगी नाकी डोळी निट्टस,गोरी पान,थोडी बारीकच पण हुशार वाटली लगेच मनात भरली सर्वांच्याच... मुलापेक्षा थोडी उंच वाटते का?अशी शंका आली कोणाच्या तरी मनात....झालं शंकेला जागा नको म्हणून पांढऱ्या दोऱ्याला ओल्या हळदीच्या पाण्यात भिजवले गेले आणि मुलाची व मुलीची स्वतंत्रपणे उंची मोजत शेजारी शेजारी पिवळ्या दोऱ्याच्या खूणा उमटल्या...मुलाची उंची सुतभराने जास्तच निघाली.....आता कोणताच प्रश्न नव्हताच...दोन्ही घरच्या मोठ्या माणसांची आणि अर्थातच मुला मुलीची परस्परांना पसंती सांगितली गेली... आणि या रावनवमीच्या दिवशी कु.दुर्गा दिगंबरराव पांडे ही शोडषा परभणीच्या उमरीकर घराण्याशी अनुबंधाअन्वये बांधली गेली....
दोन्ही घरची मंडळी खूप खुषीत....मुलगा आणि मुलगी दोघंही आपापल्या कुटुंबातील लाडकं शेंडेफळ आपत्य... सहाजिकच लग्नाचा सोहळाच होणार हे निश्चितच होतं...उत्साहभऱ्या आनंदात महिनाच भरात लग्नाची तयारी झाली आणि २६मे १९६४ रोजी आमची आई दुर्गा आणि बाबा प्रभाकर जन्मजन्मांतराच्या लग्न बंधनात बांधले गेले....
ही आठवण आई नेहमी सांगायची...बाबाही सांगतात.....पण आज रामनवमी. आई च्या अनुपस्थितीत ही तिने सांगितलेली आठवण एकदम उचंबळून आली आणि सांगाविशी वाटली....

© नंदिनी म. देशपांडे.

🌹🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा