बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

मराठी भाषादिन. एक मंथन.

•   मराठी भाषा दिन, एक मंथन.

      सत्तावीस फेब्रुवारी, कविवर्य कुसुमाग्रज, वि. वा. शिरवाडकर यांची जयंती. महाराष्ट्राच्या या थोर कवी, लेखक, नाटककार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो, हे सर्वश्रुत आहे.
         एक महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणून आजच्या दिवसाची ही आठवण केवळ वाचून-ऐकून आणि शुभेच्छा देणे, एवढीच महत्त्वाची मानावी का? तर अजिबातच नाही.एवढ्याच मर्यादित अर्थाने या दिवसाचे साजरीकरण किमान महाराष्ट्रीयन माणसाकडून तरी अपेक्षित नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आपली मातृभूमी, आपली जन्मदात्री आई व आपली मातृभाषा या तीनही गोष्टींना विलक्षण महत्त्वाचे स्थान असते. खरं म्हणजे आपला मातृभाषा दिन, मराठी भाषा दिन हा आपण एक महाराष्ट्रीयन नागरिक या नात्याने विशेषत्वाने साजरा करावयास हवा.
              अख्खे तीनशे पासष्ट दिवस आपण आपल्या मायबोलीच्या उत्कर्षासाठी  भरीव योगदान देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक मराठी माणसाने, खरोखरच आपण आपल्या मायबोलीचे ऋण फेडण्यासाठी किती सक्रिय आहोत? या अनुषंगाने मंथन करण्याची निश्चितच वेळ आली आहे असे वाटते. खूप काही मोठ्या प्रमाणावर नव्हे तरी, अगदी मराठी पुस्तकं आपल्या वाचन आनंदासाठी आपण विकत घेतो का? मुलांना मराठी पुस्तकं वाचण्यासाठी उद्युक्त करतो का? आपल्या कौटुंबिक पातळीवर,व्यक्तिगत पातळीवर तरी आपण आपल्या मातृभाषेच्या  आविष्कारासाठी किती प्रामाणिक प्रयत्न करतो?
              आपल्याला पहिल्यांदाच बोलावयास येऊ लागले की, वाणीतुन शब्दांचे रूप घेत पाझरणारे सुरुवातीचे शब्द मराठी भाषेतूनच उमटतात. म्हणूनच तर ती आपली मातृभाषा असते .किती जण आपल्या अगदी कौटुंबिक स्तरावरही लहान बालकांना बोलावयास येऊ लागल्यानंतर मराठी भाषेतील शब्दांच्या शुद्ध उच्चारांवर भर देण्याचा प्रयत्न करतात? किती जण मुलांचे ,किंबहूणा स्वतः चे सुध्दा शुद्धलेखन समृद्ध झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करतात? किती जण शालेय शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे. किंवा या शिक्षणामध्ये मराठी विषय अनिवार्यच असावयास हवा. यासाठी सजग आहेत?
               आपल्या घरात सर्वांची संवाद साधण्याची भाषा शुद्ध मराठीत असावी असे किती जणांना वाटते? या सगळ्या आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टी आहेत. आपण स्वतःया गोष्टी आमलात आणत नसाल तर, ‘मराठी भाषा टिकलीच पाहिजे’ हे कितीही ओरडून सांगितले तरी, त्याला काहीच अर्थ नाही.
                मान्य आहे आज संगणकीकरणाच्या या युगात इंग्रजी भाषेशिवाय पर्याय नाही. पण तरीही एक आद्य मातृभाषा या नात्याने आपल्या आयुष्यात मराठी भाषेला स्थान असणे अपरिहार्य नसावे का? ही अपरिहार्यता कायम ठेवत, जिवंत ठेवत नंतर इतर भाषांचे ज्ञान ग्रहण करू नये का?प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने.
      दक्षिणेकडील राज्यांमध्ये त्यांच्या मातृभाषेला किती महत्त्व दिले जाते! त्याच प्रमाणे महाराष्ट्रीयन व्यक्तीने किमान महाराष्ट्रात असताना तरी आपल्या संवादासाठी केवळ मराठीचा अट्टाहास का करू नये? अहो इंग्रजी बोलण्याच्या फालतू मोठेपणामूळे तुम्ही आपल्या मातृभाषेला पायंदळी तुडवत आहात, याचे भान अजूनही येऊ नये यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असणार ? जगातल्या सर्व भाषा जरी आपण शिकल्या तरीही, मराठी भाषा शुद्ध स्वरूपात सर्वात प्रथम आत्मसात करावी हे आपल्याला कळू नये अजूनही ? आपल्याला शक्य त्या ठिकाणी कार्यालयीन कामासाठीही मराठी भाषेचा उपयोग का होऊ नये? असे असंख्य प्रश्न आहेत. ज्यामुळे मातृभाषा असूनही कायम दुय्यम स्थान मिळाले आपल्या मराठीला. ही गोष्ट नक्कीच भूषणावह नाही. आपल्याला खरोखरच आपल्या मातृभाषेबद्दल थोडा जरी आदर असेल तर, व्यक्तिगत पातळीवर वर उल्लेखित प्रश्नांची उत्तरं मिळवणं अत्यंत गरजेचं आहे.
         दर बारा मैलांवर भाषा बदलते असे आपल्याकडे म्हटले जाते. पण भाषेवरील तिच्या उच्चारावरील संस्कारांमध्ये फरक असू शकेल तरीही, लिहिण्यातून तिची शुद्ध अशुद्धता का पडताळली जाऊ नये?त्यासाठी  मातृभाषेच्या उच्चारीकरण, व्याकरण, शुद्धलेखन, संवादीकरण या तीनही गोष्टींचा एकत्रित समन्वय झाला असेल तरच, आपल्या मातृभाषेविषयी आपण फार चोखंदळ आहोत हे एक महाराष्ट्रीयन नागरिक या नात्याने आपण म्हणू शकतो.
                  ज्या दिवशी माझी मातृभाषा मराठी ही माझी अस्मिता ठरेल आणि  या अस्मितेचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी आपण प्रत्येक जण जीवापाड प्रयत्न करू करत राहू अगदी वर्षातल्या प्रत्येक दिवशी तरच, आपण ठामपणे म्हणू शकतो की मी मराठी माणूस आहे आणि मी महाराष्ट्रीयन आहे. माझी भाषा माझी अस्मिता आहे आणि या अस्मितेच्या रक्षणासाठी मी अविरत प्रयत्न करीन. तरच मराठी माणूस असल्याचा मला अभिमान आहे. असे आपण म्हणू शकतो.
               चला तर मित्रांनो आपल्या मायबोलीच्या ऋणातून काही अंशी उतराई होण्याचा प्रयत्न करूया या.पणतीने पणती लावत मराठी भाषेचा दीपक उजळवू या. आणि उजळणार्‍या या दीपाचा महाराष्ट्राला प्रकाश  देऊया. अशी शपथ या दिवशी आपण सर्वजण घेऊया.

*©नंदिनी म. म.देशपांडे*

🎇🎇🎇🎇🎇🎇

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

आनंदी गोपाळ.

**आनंदी गोपाळ**

     "अहो, पण आता हे सर्व वाया गेले ना, मी नाही आता कोणावर उपचार करू शकणार,कोणाचे प्राण वाचवू शकणार."

      चित्रपटाच्या शेवटी शेवटी डॉक्टर आनंदीबाईंच्या तोंडून हे वाक्य ऐकले आणि पोटात खोलपर्यंत कालवाकालव झाली. केवळ नावापुरताच आनंद सामावलेल्या आनंदीबाईंच्या आयुष्यात दुःखच भरलेले होते. हे लक्षात आले.....

    एकोणिसाव्या शतकातील उत्तरार्धाचा तो काळ. स्त्रियांच्या बाबतीत तर अंगावर शहारे आणणारा. आनंदीबाईं च्या रुपाने प्रातिनिधिक उदाहरण प्रत्यक्ष सिनेमातून चित्रित करत त्या काळात अक्षरशः नेऊन सोडले प्रेक्षकांना या सिनेमाने.

      पंधरा वर्षांनी मोठा असणारा बीजवर नवरा .सात आठ वर्षांचं सवतीचं पोर. त्यात कुटुंबातून आणि संस्कृती परंपरांमधून मनावर बिंबवलेला कर्मठ रुढींचा अभेद्य पडदा.

    लग्नाची बोलणीच मुळी ''मी माझ्या बायकोला लग्नानंतर शिकवणार आहे".या वचनावर झालेली.

     कुटुंबाने कितीही प्रतारणा केली पुस्तकांची, तरीही भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचं उदात्त काम आपल्या बायको पासूनच चालू करावयाचे हा गोपाळरावांचा ध्यास. कितीही क्लेशदायक असला तरीही आनंदीला अभ्यासाची गोडी निर्माण करण्यात यशस्वी ठरला.

     जिद्द ठेवली की गती ओघानेच येऊ लागते. सुरुवातीच्या बळजबरीच्या राम रामाला साजेसा आनंदीचा  गोपाळरावांना  प्रश्र्न, जगात चिक्कार पुस्तकं आहेत.

"अजून किती पुस्तक वाचायची आहेत?"

  या प्रश्नाने तिच्या मनाला जणू काही किनाराच गवसला असे म्हणता येते. आनंदीच्या मिशनरी शाळेत जाण्याचा मार्ग यामुळे तयार झाला.केवढी ती अवहेलना! केवढा अपमान सहन करणे!आणि केवढ्या त्या तऱ्हेवाईक नजरा.

"स्त्रीयांनी शिक्षण घेणे म्हणजे,व्यभिचाराचा मार्ग दाखवणे".

अशा बुरसटलेल्या संकल्पना कुरुवाळत बसणारा तो समाज. पण आपल्या सहनशीलतेचा कळस गाठत, ही आनंदी मन लावून शिकते याचे करावे तेवढे कौतुक कमी तर आहेच शिवाय तिच्या जिद्दीला मनापासून अभिवादन करावेसे वाटते.

     महाराष्ट्रात निर्ढावलेल्या लोकांनी गोपाळरावांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकल्यानंतर ज्यावेळी हे कुटुंब कलकत्त्याला रहावयास जातं त्यानंतर जरा तरी मोकळा श्वास घेताना दिसते आनंदी. आपल्या बाळाच्या जाण्याने आनंदीच्या शिक्षणाच्या जिद्दीला योग्य दिशा प्राप्त होते.

"माझं बाळ  उपचाराअभावी गेलं तरीही इतरांची बाळं वाचावीत. त्यासाठी मी डॉक्टर होऊन दाखवणारच. आणि परदेशात जाऊन शिक्षणही घेणार."

ही आनंदीची भीष्मप्रतिज्ञा गोपाळरावांच्या मनात कायम घर करून राहते. त्या दृष्टीने उद्दिष्टापर्यंत पोहोंचण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचे प्रयत्न सर्व बाजूंनी सुरू होतात. पण परदेशी जाण्यासाठी धर्मांतर करावे लागणार ही गोष्ट लक्षात आली की, आनंदी आपल्या ध्यैय्याला काहीसे बाजूला सारते.आणि

"ज्या देशात मला माझ्या धर्मासकट स्विकारले जाणार नाही, तो देश मला मान्य नाही".

असे निक्षून सांगणारी आनंदी, मोठी करारी आणि धाडसी होती. याचे प्रत्यंतर येत रहाते.

      परकीयांना पण  कुठेतरी भारतीय महिलेला कौतुकाची थाप देण्याची वृत्ती असू शकते.हे तेथील एका लेखात आनंदी बाईंच्या जिद्दी विषयी छापून आल्यामुळे लक्षात येते.

   'डॉक्टर होणार'. या निर्णयावर ठाम असणारी आनंदी सहाजिकच आपल्या नवर्‍याला सोडून परदेशी शिक्षणासाठी जाण्यास धजत नाही. पण गोपाळराव सारखा कायम आपला करारी बाणा जपणारा नवरा, तिला एकटीला अमेरिकेत मेडिसिनच्या शिक्षणासाठी जाण्यासाठी भाग पडतो. तेंव्हा हा माणूस एक नवरा म्हणून आणि एकूणच समाजहित लक्षात घेता किती दूरदृष्टी ठेवून वागणारा व्यक्ती होता. हे लक्षात येते. ही दूरदृष्टी वास्तवात उतरवण्यासाठी अखंड लढा देणारे हे गोपाळराव , विधवेचा उद्धार, ऋतुप्राप्ती नंतर महिलांसाठी घालण्यात आलेले अमानवी नियम यांवरही किंचित मीमांसा करताना  दिसून येतात.

    गोपाळरावांसारखे समाज सुधारक त्या काळात जन्माला आले म्हणूनच आज, एकविसाव्या शतकात आपण महिला म्हणून सर्व क्षेत्रं पादाक्रांत करत आहोत.याची राहून राहून संपूर्ण सिनेमा बघत असताना कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते.

     एकदा अमेरिकेत पोहोंचल्यानंतर मात्र मोकळे आकाश मिळते आहे आनंदीला.

    त्यांची मनासारखा अभ्यास करत झोकून देण्याची वृत्ती खरोखर अभिमानास्पद आणि वंदनीय अशीच. अभ्यासाचा ध्यास घेऊन अमेरिकेत पोहोंचलेली ही पहिली भारतीय विदूषी, तेथील  सहन न होणाऱ्या हवामानामुळे शरीराने आतल्या आत खंगत जाते. त्यावेळी जीव घेणा 'ट्यूबर क्यूलॉसिस'हा आजार तिला विळखा घालतोय हे अमेरिकेतील डॉक्टरांच्या लक्षात येऊनही नाईलाज होतो. त्यावेळी उपचारांची उपलब्धता या आजारासाठी असावयास हवी होती. हे राहून राहून वाटतं.

आपला 'पण'पूर्ण करत जेव्हा डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी पदवीदान समारंभात एक भारतीय महिला या नात्याने पदवी स्विकारतात तो क्षण खरोखरच सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असाच होता.

    भारतीय महिलांना एकोणिसाव्या शतकात शिक्षण घेत असताना किती आणि कोणत्या दिव्यातून जावं लागायचं याचं यथार्थ दर्शन या चित्रपटात घडतं.

    डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची भूमिका करणाऱ्या या प्रति आनंदीबाईंना बघून आपोआप शब्द उमटले मनात.

"दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती."

अशा विदुषींनी त्याकाळी हे दिव्य केलंच नसतं तर आजही भारतीय महिला अशाच दुर्लक्षित उपेक्षित राहिल्या असत्या म्हणूनच  गोपाळराव म्हणतात,

"वाया गेले नाहीत तुमचे प्रयत्न. तर आनंदी तुम्ही अगदी पहिली स्त्री आहात या क्षेत्रात येणारी... भारतीय स्त्रियांना आवाहन देणारी..... शिक्षणाची आणि कर्तुत्वाची क्षेत्रं काबीज करण्यासाठी ललकारी देणारी....अगदी पहिली,पहिलीच स्त्री!"

©नंदिनी म. देशपांडे.

✒✒✒✒✒✒

रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

श्रंध्दाजली....

*शहिदांना श्रद्धांजली*💐

     काल १४, फेब्रुवारी. संपूर्ण देश या दिवशी, व्हॅलेंटाईन दिवस साजरा करण्याच्या धुंद,मग्न वातावरणात रममाण झालेला. पण आपले कांही सैनिक, चारच दिवसांपूर्वी आपल्या प्रेमाच्या माणसांचा निरोप घेऊन; पुन्हा आपले कर्तव्य  बजावण्यासाठी नियोजित ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि प्रसन्नतेने जात होते....आपल्यावर असणाऱ्या जबाबदारीची पूर्ण जाणीव ठेऊन....

    या आपल्या काही सैनिकांवर काल अचानक कपटाने झालेल्या हल्ल्याचा धिक्कार धिक्कार आणि धिक्कारच....

त्याला दुसरे शब्द असचू शकत नाहीत....

     हल्ला घडवून आणणारे व प्रत्यक्ष हल्ला करणारे,ही खरोखरच माणसं नव्हेतच तर,हैवानच होत.....त्यांच्यात कोणतीही माणुसकीची भावना शिल्लकच नाही....ते सैतानच आहेत.... हे पुन्हा एकदा सिद्ध झाले....केवळ माणसाचे रुप आणि सजीवपण आहे त्यांच्यात, म्हणून एवढे दिवस 'माणूस' या व्याख्येत बसवून त्यांच्याशी सामंजस्याचा भूमिकेत शिरून काही मन:परिवर्तन होईल या आशेने केलेले आतापर्यंतचे प्रयत्न फोल ठरल्याचे वारंवार सिद्ध होत आहेतच.... आता मात्र निर्वाणीची वेळ नक्कीच आली आहे.....

     हे दहशतवादी जाणून-बुजून दहशतवादी आहेत यात काही दुमत नाहीच.... ते अशा हल्ल्यांची जबाबदारीही मान वर करुन स्विकारतात हे कृत्य, निश्चितच माणूस म्हणून घेण्याच्या व्याख्येत बसणारे नव्हेच.....

    पण अशा लोकांना पाठीशी घालणारे, त्यांचा पुरस्कार करणारे,आणि अशा प्रकारे संपूर्ण राष्ट्र दुःख,राग,उव्देग अशा भावकल्लोळात बुडालेले असताना सुध्दा, आपला पक्ष आपलं राजकारण आणि आपलं वागणं किती योग्य आहे. असा संकुचित विचार करणाऱ्यांचा तर शंभरदा धिक्कार आहे.

     बलिदान दिलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा त्यांचा नाटकी दुटप्पीपणा लोकांच्या लक्षात येत नाही असे त्यांना वाटत असेल,तर तो त्यांचा शुद्ध मूर्खपणा आहे. श्रद्धांजली चे मोठे मोठे बॅनर आणि त्यावर भलीमोठी नेत्यांची रांग,त्यांच्या फोटोंचे प्रदर्शन करणे म्हणजे देशप्रेम नक्कीच नाही.

     कुठे ह्या,आपल्या मातृभूमीसाठी लढणाऱ्या सुपुत्रांचे तेजस्वी कार्य, त्यांचे शूरवीरांचे काळीज, त्यांचे बलिदान. आणि कुठे हे क:पदार्थ  असणारे.स्वतःच्या  स्वार्थाची  जमेल तेंव्हा व जमेल तशी पोळी भाजून घेणारा हा वर्ग....

      हे तर,  राजकीय ड्रामा करुन भावनांच्या प्रकटीकरणाचा बाजार मांडणारे लोक. कायम स्वतःवर कॅमेराचे फोकस फिरवत, देशप्रेमाचा आव आणणाऱ्या अशा लोकांचा हज्जारदा धिक्कार....

   या देशाच्या सत्तेच्या राजकारणात व्यस्त असणार्‍या, जात धर्म पंथ यांच्यातच गुरफटून बसणाऱ्या आणि  विशेष सवलती मिळवण्यासाठी आटापिटा करत आपली बुद्धी गहाण ठेवलेले हे मूठभर लोक.... आणि कुठे ते उदात्त हेतूने आपल्या घरातील कर्ता मुलगा देशसेवेला वाहिलेली हजारो सामान्य कुटुंब. ज्यांच्यासाठी केवळ माझा देश हेच त्यांचे दैवत असते .तर त्यासाठी कर्तव्य बजावणे हाच यांचा धर्म असतो.

      जेंव्हा अशी माणसं मातृभूमीच्या रक्षणासाठी  शपथ घेऊन आपले कार्य निरपेक्षपणाने चोख बजावतात ना, तेव्हा  ती कांही  या मूठभर स्वार्थी लोकांच्या सारखी ढिंढोरा पिटवत, आपलाच उदोउदो आपणच करत नाहीत.तर त्यांचे केलेले कार्य आपोआप त्यांची ओळख पटवून देत  असते.आणि सामान्य माणसाला आपोआप नतमस्तक व्हायला होते....या लोकांच्या कार्याचे मोठेपण बघून....

    अगदी तसेच आहे संपूर्ण भारतीय सैनिकांचे कार्य.हेच खरे उत्तुंग कार्य. हेच खरे देशप्रेम.हीच खरी देशसेवा. आणि हेच खरे मातृभूमीच्या ऋणातून उतराई होणं.

      काल शहीद झालेल्या या चाळीसच्या वर लोकांनी खऱ्या अर्थाने हा प्रेमाचा दिवस साजरा केला. आपल्या मातृभूमीच्या प्रेमापोटी  मातृभूमी मध्येच विलीन होत.... तिच्याशी एकरुपत्व  साधत....

     सलाम अशा शूर वीरांना.            त्रिवार वंदन आपल्या भारतीय सैनिकांना.

    त्रिवार वंदन त्यांना, ज्यांनीआपल्या पोटचा गोळा मोठ्या अभिमानाने या मातृभूमीच्या रक्षणासाठी, देशसेवेसाठी अर्पण केला....  
     
    धन्य ते माता पिता   आणि
    धन्य त्यांचे शूरवीर ! 🙏🙏🙏

🇮🇳जय हिंद, जय भारत🇮🇳

     *नंदिनी म. देशपांडे.*