शुक्रवार, १९ एप्रिल, २०१९

मनोबोध श्लोक ६३.

मनाचे श्लोक,मायबोलीतील एक अलौकीक महाकाव्य *

      पुष्पमाला सदर.

     श्लोक ६३.

   घरी कामधेनु पुढे ताक मागे।
   हरीबोध सांडोनी विवाद लागे।
करीत सार चिंतामणी काचखंडे।
तया मागतां देत आहे उदंडें।

          माणसा जवळ ज्ञानरूपी कामधेनु असताना ती सोडून दुसऱ्यांबरोबर वादविवाद करणे म्हणजे घरी कामधेनु असताना दुसऱ्यांकडे ताक मागावयास जाणे, अशातला प्रकार होईल. स्वतःजवळ सद सद विवेकबुद्धी असताना सुद्धा त्याचा उपयोग न करता इतरांशी बाष्कळ वाद करत वेळ वाया घालवणे हा  याचा अर्थ आहे.

     हातात चिंतामणी असताना कोणी काचेचे तुकडे मागितले तर त्याला ते भरपूर मिळतील. याचा अर्थ माणसा जवळ बुद्धिचातुर्या सारखे चिंतामणी रत्न असताना सुद्धा इतरांकडून वादाचे  काचेचे तुकडे जमा करणे होय.

    भगवंताचे ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. पण माणूस मात्र फाजील शंका-कुशंकांचे  जाळे विणत बसतो. भगवंताच्या ज्ञानापुढे असा अशा शुष्क वादला अजिबात अर्थ नाही. त्यामुळे सत्य बाब असत्यात बदलणार नाही.

     म्हणूनच घरी कामधेनु, म्हणजे आत्मज्ञानरुपी गाय असताना सुद्धा निरर्थक वाद करून आपले श्रेयस मिळवण्यात माणूस असमर्थ ठरतो. याच आत्म ज्ञानरूपी गाईचे दूध दिव्यामृत आहे. हाच खरा विवेक आहे. पण विनाकारण बडबड करत दुधाऐवजी तो ताक पित बसतो.  हे केवळ अज्ञान आहे. त्याचे हे अज्ञान म्हणजे  हाती चिंतामणी असताना काचेचे तुकडे जमा करणेअसेच आहे. असे तुकडे जमा करणे म्हणजे अक्षरशः दरिद्री पणाचे लक्षण होय.

      या श्लोकाचा गुह्यार्थ फार महत्त्वाचा आहे. यातून समर्थांना असे सुचवावयाचे आहे की,बुद्धिमान माणसाने आपला विवेक आणि आपली बुद्धी यांमध्ये तफावत निर्माण करून उगाचच वितंडवादाला तोंड फोडता कामा नये. आपल्या बुद्धीला आपल्या विवेकापेक्षा वरचढ होऊ देऊ नये. असे झाल्यास बुद्धी शिरजोर बनते. आपली बुद्धी भगवंताच्या ठिकाणी स्थिर करून श्रद्धा आणि बुध्दी  यांची योग्य सांगड घालावी.आणि आत्मज्ञान प्राप्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. समर्थांसारख्या बुद्धी योगी महापुरुषाचे मांडलेले हे विचार अतिशय मौलिक आहेत हे मान्यच करावे लागेल.

© नंदिनी म. देशपांडे.

🌼🌼🌼🌼🌼

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा