शनिवार, २० एप्रिल, २०१९

मनोबोध,श्लोक ६४.

• मनाचे श्लोक,मायबोलीतील एक अलौकीक महाकाव्य.

                  पुष्पमाला सदर.

      श्लोक ६४.

        अति मूड त्या दृढ बुद्धी असेना।
अति काम त्या राम चित्ती वसेना।
अतिलोभ त्या क्षोभ होईल जाणा।
अति विषयी सर्वदा दैन्यवाणा।

    जो माणूस अति मूढ म्हणजेच मतिमंद असतो त्याची बुद्धी स्थिर राहत नाही.अति कामलंपट माणसाच्या ठाई  राम वसत नाही. जो अति लोभी असतो त्याच्या मनाचा संताप उद्रेक केंव्हा होईल हे सांगता येत नाही. आणि जो अति भोगवादी असतो तो भोगासाठी नेहमी लाचार बनतो.

     समर्थांनी मनुष्य स्वभावाचे अगदी तंतोतंत विवेचन केलेले दिसून येते. यावरून त्यांचा मानसशास्त्राचा अभ्यास आणि निरीक्षण किती सूक्ष्म होते याची जाणीव होते. श्लोक क्रमांक ६१ते६६ यामध्ये त्यांनी  वादविवाद टाकून देऊन आत्मविकास कसा साधावा याविषयीचे मार्गदर्शन केले आहे.

    सदरील श्लोकांत कोणत्याही एका मानसिक अवस्थेचा अतिरेक मनुष्याच्या ठिकाणी झाला तर त्याचे अनिष्ट परिणाम होऊन तो लाचार कसा बनतो, आपल्या आत्मोन्नत्ती पासून कसा दूर जातो हे सांगितले आहे. हा झाला या श्लोकाचा दार्शनिक अर्थ.

    गुह्यार्थाच्या दृष्टीने दृष्टीने विचार केल्यास, श्लोकाच्या प्रत्येक चरणात ‘अति’ हे विशेषण लावले आहे. याचाच अर्थ माणसाच्या अंगी यात सांगितलेले विकार अगदी असूच नयेत असे नव्हे. किंबहुना कमी-अधिक प्रमाणात ते प्रत्येकाजवळ असतातच. पण त्यांचा अतिरेक अंगी होणे अजिबात योग्य नाही. असे झाल्यास माणूस लोभी क्रोधी कामपिपासू बनतो. हे सर्व अवगुण आत्मविकासाला बाधक ठरतात. त्यांच्यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येणे खूप आवश्यक असते.

     ज्याच्या जवळ कामवासनेचा अतिरेक असेल त्याच्याजवळ ईश्वर फिरकणारही नाही.अति लोभी माणूस सतत पैशाचा, संपत्तीची लालसा याचाच विचार करत राहील. तर भोगवादी माणूस जास्तीत जास्त भोगाची लालसा करत कितीही लाचारी पत्करून काहीही करावयास मागेपुढे बघणार नाही. म्हणूनच मनुष्याने आपल्या विकारांवर आग्रहपूर्वक नियंत्रण मिळवले पाहिजे. असे आवाहन आपल्या सूक्ष्म मानसशास्त्राच्या अभ्यासातून समर्थ याठिकाणी करताना दिसतात.

   अति मूर्खतेमूळे किंवा अज्ञानामुळे सुख काय ते विषयातच आहे, या समजुतीने खऱ्या सुखस्वरूप अशा आत्मारामा कडे दुर्लक्ष होऊन ही परंपरा ओढवते.जी बुद्धी कुठेही स्थिर राहू शकत नाही ती विकृत बुद्धी असे समजावे. सर्वांचे मूळ माणसाच्या विषया मध्ये सापडते. ज्याचे सुख दृश्य वस्तूवर अवलंबून राहते तो सुखाच्या बाबतीत परावलंबी असतो. जगाने सुख दिले तरच अशा व्यक्तींना सुख मिळते. त्यालाच श्री समर्थ दैन्यवाणा असे म्हणतात. भगवंताचा भक्त गरीब असू शकतो पण दैन्यवाणा नाही.असेच समर्थांना सुचवायचे आहे.

©नंदिनी म. देशपांडे.

🌸🌸🌸🌸🌸🌸

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा