गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

शेषराव काका,एक दिलदार व्यक्तीमत्त्व.

*शेषराव काका एक दिलदार व्यक्तीमत्व*

लेखिका:*सौ.नंदिनी म.देशपांडे*.

        “ देशमुख,अहो देशमुख चला मी निघतोय कोर्टात जाण्यासाठी.” असे वाक्य शेषराव काकांच्या तोंडून ऐकले मी,तेंव्हा  ते कुणाशी बोलत आहेत हे प्रथम लक्षात आलेच नाही. कारण अवतीभवती तर कोणीच नव्हते!  काका स्वतः अर्धापुरकर देशमुख अशा लांबलचक आडनावा पैकी फक्त देशमुख एवढेच आपले आडनाव लावायचे.येथे दुसरे देशमुख आहेत! आणखी ?मला खूप कुतूहल वाटले. थोडंसं गोंधळून आजूबाजूला बघितले होतं मी,दुसरं कोणी आहे का? एवढ्यात आमच्या नलू आत्या स्वतः हाताने लावलेला पानाचा विडा त्यांच्या हातावर ठेवताना दिसल्या. तेव्हा कुठे मला या गोष्टीचा, दुसऱ्या देशमुखांचा उलगडा झाला.

       दुसरे देशमुख म्हणजे, दुसरे तिसरे कोणीही नव्हते आणि आमची आत्याच  होती तर! काकांची सौभाग्यवती.माझ्या मनात वाटणारे आश्चर्य मी फार वेळ आणखी ताणते ठेऊ शकले नसतेच.औरंगाबादेतच होते  आणि सुमेधा, माझी आतेबहिण कम मैत्रिण! त्यामुळे नेहमीच  आत्याकडे जाणे येणे व्हायचेच.

        घरी आल्यानंतर  आईला ही गंमतीची गोष्ट ऐकवली, आणि बायकोला कोणी असे  आडनावाने बोलते का? असे म्हणून मनातल्या मनात एक हास्याचा चौकार मारला मी. आई म्हणाली, ‘होय काका देशमुखच म्हणतात नलू ताईंना.

      आमचे शेषराव काका,खरचं एक अजब रसायन होते! ईश्वराने सुद्धा या व्यक्तिमत्वाला भूमीवर पाठवत असताना, यांच्यावर दिलदार पणाचा उदार हस्ते वर्षाव केला असणार हे नक्की, असे सारखे वाटत रहायचे.

          रंगाने सावळे  होते तरीही, धारदार नाक, उभट प्रसन्न चेहरा, मध्यम उंची आणि मध्यम शरीरयष्टी असणारे शेषराव काका, कित्येकदा कोर्टात जाताना किंवा येताना बघितले होते माझ्या लहानपणी मी. काळा कोट अंगावर चढवून निघालेल्या काकांचे व्यक्तिमत्व  भारदस्त आणि रुबाबदार दिसायचे. एका निष्णात कायदेपंडिताला शोभेल असाच  रुबाब असायचा त्यांचा! मी लहानपणी केंव्हातरी मराठीतील एक नट राजा गोसावी यांची भूमिका असणारा सिनेमा बघितला होता. आमचे शेषराव काका व राजा गोसावी यांच्यात बरेचसे साम्य असल्याचे लक्षात आले होते त्या लहान वयातही मला!

       पान खाण्याचे शौकिन असणाऱ्या काकांची जीभ पाना मूळे  नेहमीच लाल लाल दिसायची! खरं म्हणजे शेषराव काका नात्याने आमचे मामा. पण त्यांची मुलं त्यांना काका म्हणायची त्यामुळे आम्हा सर्वांचेच ते ‘काका’ झाले होते. माझ्या वडिलांना,आपल्या मेहूण्याला ते ‘प्रभू’ या नावाने आवाज द्यायचे. तेंव्हा त्यांच्यातला आपलेपणा, प्रेमळपणा, काळजी, त्यांच्या विषयी  वाटणारी माया नेहमी पाझरत असायची बोलण्यातून. माझे बाबा, वकील झाल्यानंतर त्यांनी कायद्या संदर्भातील कितीतरी बारीक-सारीक गोष्टी चर्चा करून काकांच्या मार्फत जाणून घेतल्या होत्या. या दोन दिग्गज वकिलांची कायद्यासंदर्भात चालणारी गप्पांची जुगलबंदी तासन तास ऐकण्यासारखी असायची!

       मुंबई हायकोर्टात वकीली करत असल्यामुळे, काकांचे मोठ्या मोठ्या लोकांशी संबंध आले असल्याचे लक्षात यायचे त्यांच्या बोलण्यातून. काकांची मायभूमी मराठवाड्याच्या मातीत असल्यामुळे कितीतरी वर्षे मुंबईत राहूनही आपले ‘मराठवाडीपण’ काका कधीच विसरले नाहीत. म्हणूनच मुंबईत, मराठवाड्यातल्या कोणत्याही वकिलाचे किंवा अशिलाचे काम असेल तर शेषराव काका म्हणजे एक ‘आपला माणूस’ अशा विश्वासाने येथील लोक मुंबईला जायचे. मी तर असे म्हणेन की भारतीय राज्यघटना तत्त्वांचा त्यातील कायद्यांचा बारकाईने अभ्यास करून, कायदा कोळून  प्यालेल्या  कायदेतज्ज्ञांच्या  काही पिढ्या होऊन गेल्या आपल्या महाराष्ट्रात. यांच्यामुळेच वकिली व्यवसायाला  आणि वकिलाला  सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली असावी हे नाकारुन चालणार नाही.  त्यातलेच एक आमचे काकाही होते. जेवढे पट्टीचे मुत्सद्दी कायदेतज्ञ होते काका, तेवढेच ते प्रेमळही होते.

        व्यवसायानिमित्त त्यांचे नेहमीच आमच्या घरी परभणीला येणं व्हायचं. सहाजिकच आमचं घर म्हणजे काकांची सासुरवाडी .त्यांचा मुक्काम आमच्या घरीच असायचा. मित्रमंडळींमध्ये उशिरापर्यंत  रमण्याचा काकांचा स्वभाव होता. घरी यावयास उशीर होणार असेल तर, ‘आज मला यावयास उशीर होईल’ अशी पूर्वसूचना  देत असत काका जाताना. ‘ दार उघडशील ना ,दुर्गा?’ अशी आईची फिरकी घेत काका विचारात असत.
काका माझ्या आईला असे विचारत, त्यावेळी, एखाद्या लहान बहिणीशी  विनोदाने बोलणारा  मोठा भाऊ त्यांच्यात डोकवायचा.

      कोणत्याही नातेवाईकांमध्ये एखादी अडचण आल्यास अधिकारवाणीने बोलण्याचे आणि सल्ला मागण्याचे अश्वस्थ करणारे हक्काचे ठिकाण म्हणजे शेषराव काका होते .

        घरातल्या घरात शतपावली करण्याच्या त्यांच्या छंदानेच बहुतेक काकांची अंगकाठी कधीही बेढब बनू  दिली नाही.   कोर्टात जाताना पांढरा शर्ट, पांढरी पॅंट, काळा कोट असा पेहराव  आणि घरी असताना पांढरा शुभ्र नेहरू शर्ट, शुभ्र पांढरे धोतर हा त्यांचा पेहराव हे म्हणजे त्यांचे एक  व्यवसाय क्षेत्रातील रूप आणि दुसरे,घरगुती ज्येष्ठ व्यक्तीचे आदर युक्त रूप! दोन्हीही रुपं बघणाऱ्या, सहवासातील लोकांना आधार वडा प्रमाणे  भासायची.

     व्यवसायासाठी लागणारा, माणसे जोडण्याच्या काकांच्या स्वभावाला दिलदारपणाची एक छानशी किनार होती. मनाचा दिलदारपणा कित्येकदा त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा.

       काकांनी एखादे दोन चाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना मी कधीच  बघितलेले मला आठवत नाही. पण रिक्षात बसताना कधीही व्यवहाराचे न ठरवता बसणारे काका, आपल्या नियोजित ठिकाणी उतरल्यानंतर खिशातून हाताला येतील तेवढे पैसे किंवा नोट रिक्षा चालवणाऱ्या ला देऊन टाकायचे. हा त्यांचा स्वभाव कितीतरी गरीब गरजू लोकांचे आशीर्वाद मिळवत असावा असे सारखे वाटायचे. म्हणूनच  चिंताक्रांत होऊन बसलेले शेषराव काका मला दिसलेच नाहीत कधीच.  कधी कुणाला  रागावले होते ते ,हेही आठवत नाहीच .किंचित मोठा आवाज,  खणखणीत आणि संपूर्ण घराला भारून टाकणारा होता त्यांचा. उतारवयात काकांच्या कानांनी थोडा असहकार पुकारला होता त्यांच्याशी.यावेळी तर मात्र काकांच्या आवाजाचा ‘व्हॉल्यूम’ थोडा जास्तच वाढलेला लक्षात यायचा कधीकधी. ऐकू आले नसेल तर  कानाला तळ हाताचा आडोसा करत तिरकी मान करण्याची त्यांची लकब आमच्या परिचयाची झाली होती.

        काका आणि आत्या मुंबईला होते तोपर्यंत प्रत्येक नातेवाईकाला ‘आओ जाओ घर तुम्हारा' हा दोघांचाही नारा, खूप लोकांना सामावून घेत, त्यांच्या अडचणींवर मात करणारा ठरला. कारण त्यावेळी  आमच्या नातेवाईकांपैकी हे एकमेव कुटुंब मुंबईला राहणारे आणि हक्काचे असे होते. नलू आत्यांची यथायोग्य साथ आणि समर्पण वृत्ती तसेच  संसार रथ काटकसरीने  यशस्वीपणे  हाकण्यासाठीची त्यांची कला या गोष्टींची साथ काकांना मिळत गेली. त्यामुळेच  उभयतांच्या संसाराचा तोल व्यवस्थित सांभाळला गेला.

          कायद्याच्या मोठ्ठया मोठ्ठया पुस्तकातून नेमकं काय वाचत असतील?हे वकिल लोक! याविषयीचे माझे कुतूहल मी स्वतः वकील झाल्यानंतरच थांबले. अर्थातच त्याचे उत्तर मला सापडले होते एवढे मात्र खरे.

          तर असे हे आमचे शेषरावकाका निष्णात कायदेपंडित, मनमिळावू, प्रेमळ होतेच . मनाचा मोठेपणा असणारे व इतरांच्या मनाचा भाबडेपणा जपणारे असे ,स्नेह सावली निर्माण करणारे एक सोज्वळ व्यक्ती होते. याचा सार्थ मोठेपणा आजही आम्हा नातेवाईकांना वाटतो. त्यांच्या अनेक अनेक आठवणींना आमच्या मनांचा एक कप्पा भारुन टाकलाय आजही....

© *नंदिनी म. देशपांडे*

💐💐💐💐💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा