शुक्रवार, २८ जून, २०१९

लिली...

अंगणी माझ्या फुलली
लिली सोनेरी पिवळी
दिसते मोठी साजिरी
कोवळी तनू ती गोजिरी
जणू हळद लागली अंगी
हासे ती प्रसन्न नाजूका
पाकळी पाकळी मधूनी
डौल तिचा डोलतो
वाऱ्याच्या संथ लयीतूनी
वाटे तव ही पिवळी नाजूक
षोडशा अति सुंदर तरुणी
असती ही कोणी
सलज्ज कुसुमावती
मोहित हे रुप तिचे करी
मन प्रसन्न तरल वरचेवरी....
प्रसन्न तरल वरचेवरी....

     © *नंदिनी*

🌾🌾🌾🌾🌾🌾

शुक्रवार, ७ जून, २०१९

प्रार्थना.

मिळूनी साऱ्याजणी
करु प्रार्थना पावसासाठी
मृदगंध त्याचा
मनात साठवण्यासाठी
धरतीचं लेणं
बहराला आणण्यासाठी
फळाफुलांचा सडा
अवनीवर घालण्यासाठी
बळीराजाच्या चेहऱ्यावर
आनंद फुलवण्यासाठी
प्राणी मात्रांची क्षुधा शमवण्यासाठी
पाण्याचा साठा करुन ठेवण्यासाठी
आंनंदी आनंद पसरविण्यासाठी

© *नंदिनी*

☔☔☔☔☔☔

पाऊस मृगाचा.

*पाऊस मृगाचा*

मुहूर्त साधण्यासाठी चार थेंब पडलास खरा,
अन् मनाला आमच्या, येईन नक्कीच म्हणून  गोड दिलासा दिलास खरा.....
देऊन गेलास थंडावा जरासा,
पण धरत्रीची आस मात्र वाढवून गेलास....
येरे येरे पावसा तू आहेस, जीवलगा आमचा....
पैसा देतो तुला असं मी
म्हणणार नाही,
आणि
आमिषाची आस तुला लावणार नाही....
तू आमचा सखा,
तूच आमचा जीवनदाता....
तुलाच काळजी आता, साऱ्या सृष्टि मातेची.....
मागणं मागते देवाकडे
पाठव लवकर पावसाला, आमच्याकडे....
पाठवा देवा भरभरुन,
सगळीकडे चैतन्य पसरवण्यासाठी....
चादर,
हिरवाईची
पांघरण्यासाठी....

© *नंदिनी*

🌧🌧🌧🌧🌧🌧🌧🌧🌧🌧🌧🌧

सापडला हो ऽ सापडला.

आज जागतिक पर्यावरण दिन.पर्यावरणाच्या संवर्धनासाठी थोडासा प्रबोधनात्मक असणारा माझा एक जुनाच लेख अनेक शुभेच्छांसह.... सर्वांसाठी....🙏🏻

*सापडला हो ऽऽ सापडला !!*
🌧🌧🌧🌧🌧🌧

     कोण हरवला? काय विचारता ? अहो  आपला पाऊस. अबाल वृध्दांपासून साऱ्यांचाच लाडका असणारा. आठवतयं का, गेली दोन महिने तो फिरकला सुध्दा नाही. आमच्या भागाकडे! नाही म्हणायला या वर्षी त्याने एंट्री मात्र झक्कास घेतली होती. अगदी शिस्तीमध्ये शहाण्या मुलासारखे मृगाच्या दिवशीच अवतरला. आणि कोण आनंद झाला साऱ्या जीवसृष्टीला!अंगाची काहिली कमी करण्यासाठी लहान थोर मंडळी मनमुराद भिजली ना या पावसाखाली ! किती आनंद दिला त्याने सर्वांनाच!
    शहरी मंडळींना आता गर्मीचा त्रास कमी होईल म्हणून हुश्श वाटले, तर ग्रामीण भागात काऴी आई त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली, पाऊस धारांनी सुखाऊन गेली.किती किती म्हणून साठवून ठेवू  ढगांनी या दिलेल्या दानाला असे झाले तिला.
   शेतकरी राजा वेळेवर आणि संपूर्ण नक्षत्रभर व्यवस्थित बरसणाऱ्या या जलधारां कडे बघून किती समाधानी दिसत होता म्हणून सांगू ! बरसणा-या प्रत्येक थेंबागणिक तो देवाचे आभार मानत असावा.एवढी तृप्ती त्याच्या चेहराऱ्यावर ओसंडून वाहताना बघून, खरंच या निसर्गाचे आभार मानावे तेवढे कमी असे झाले होते.
   बळीराजा जोमाने शेती च्या कामाला लागला होता. वेळेवर पेरण्या पूर्ण करून तो आषाढीला पांडुरंगाची वारी मोठ्या भक्तीभावाने करून आला. तोपर्यंत त्याच्या शेतातील पिकं आपला लुसलुशीत पोपटी हिरवेपणा दाखवत आनंदाने बागडत डोलत होती. ही बाळं पाहून  तो हरखून गेला आणि त्यांच्या योग्य निरोगी वाढीसाठी त्यांना जास्तीचे शक्तीवर्धक औषधी तालूक्याच्या ठिकाणाहून आणण्याच्या लगबगीला लागला.
   आपण केलेल्या मेहनतीचे चीज डोळे भरुन बघताना , तो कित्तेकदा धरणी मातेच्या पायावर नतमस्तक झाला आणि आभाळाकडे मान वळवून या पाठवलेल्या आभाळ मायेसाठी मुजरा केला त्याने  याला कांही गणतीच नव्हती.      मशागतीच्या कामात आणखी एक महिना कसा निघून गेला ते त्यालाच कळले नाही....
       शहरी भागात पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा धरणांमध्ये जमा झालाय हे एेकून ,वाचून मंडळी निर्धास्त झाली होती. कांही जण जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आहे व बोअरवेल ला मुबलक पाणी आलंय या आनंदात पावसाळी सहली काढण्याच्या तयारीला लागली होती .....ज्या भागात जास्त पाऊस पडतोय त्यानुसार सहलींना भरती येऊ लागलेली दिसू लागली....
   असे सारे चालू असताना आपल्या भागात , अर्थातच माझ्या  मराठवाड्यात गेली दिड दोन महिने अगदी कोरडी गेली आहेत. निगा राखलेले हातचे चांगले पीक करपेल की काय ? या चिंतेने शेतकरी राजा ग्रासून गेला...त्याला खाल्लेला घास देखील गोड लागेना . तो सारखे आभाळाकडे डोळे लावून बसू लागला....कोरडा दुष्काळ येईल की काय ? याची भिती त्याचे मन पोखरु लागली....
    शहरी भागातही पावसाच्या गायब होण्यावर चर्चा होऊ लागली . महागाई आ वासून तोंड उघडेल अशी भिती वाटत असतानाच, "असे कसे घडेल ? त्याला काळजी आहे ना , मागच्या वर्षी नाही का आला वेळेवर ? याही वर्षी सुरुवात चांगली केली त्याने , नाही दगा देणार ..." असे संवाद कानावर येऊ लागले....
    शेतकरी राजा त्या वरुण राजाचा धावा करत , "कुठे हरवलायंस रे बाबा ?
आमच्या कडची वाट सापडतं नाही का तुले ? कुठे शोधावं रे बाबा तुले आता ? असा अंत बघू नकोस रं...औंदाच्या साली तरी  भरपूर पिकू दे रं , खरीप बी अन् रब्बी बी ....आरं तुझ्या जीवावर तर  लग्न ठरविलंय नं पोरीचं....तुच आसा हर्यूलास तर कसं व्हईल ? बरस रे बाबा आता लवकर ,"अशा आर्जवी स्वरात विनवणी करताना दिसत होता ......
     शहरी व ग्रामिण मंडळींची अशी धास्तावलेली गप्पाष्टकं चाललेली असताना पाऊस बिचारा गोंधळून गेला होता....गर्दीच्या ठिकाणी लहान बाळाने वडिलांचा धरलेला हात सुटल्यानंतर त्याला कसे भांबावले पण येते तसे झाले त्याचेही....वाऱ्याच्या संगतीने त्याचे वडिल म्हणजे ढग , यांनी आगेकूच केली नि ,पाऊस बापडा जाऊ लागला त्यांना शोधत शोधत वाट मिळेल तसा....आमची होणारी मनाची घालमेल त्याला का कळत नव्हती ? पण इकडे जाऊ की तिकडे ?या प्रश्नात हे बाळ अडकून पडलं होतं .....शिवाय वारा नि ढग यांच्या शिवाय ते काहीच करु शकत नव्हते....यांच्या मदतीची वाट बघत आपल्याकडे परतून येण्याचा रस्ताच विसरलं हे गोजिरवाणं लेकरु... त्यात त्याची तरी काय चूक ?
     आपल्या वृक्षतोड धोरणामुळे त्याला म्हणजे पावसाला बिचाऱ्याला दिशा दर्शक वारेच मिळत नव्हते ,आपल्या कडे येताना.सर्वत्र सिमेंटची जंगलं ,मोठ्या मोठ्या वृक्षांची वानवाच झालेली....
  प्रखर होत सुर्याने आग आेतायला सुरुवात केली की त्याला थोडा तरी बांध घालावयास झाडेच राहिली नाहीत ....मग काय ? वाराही नाही ,ढगही नाहीत अन् पाऊसही नाही ....हे चक्र आपणच तर चालू केलंय ना ? मग काय अर्थ आहे त्याला दोष देण्यात ? तरीही तो अंतर्यामी सर्वांना सारखेच लेखतो म्हणून बरे ,तो सर्वांचीच काळजी घेतो म्हणून दोन महिन्या नंतर का असेना ,पण वेळ निघून जाण्या पुर्विच ,बळीराजाच्या सणाच्या अगदी तोंडावर ,पोळ्याला त्या पर्जन्य देवतेनं  शेतकरी राजाला भरभरून पाऊस दिला .....त्याला खुष केले नि त्याच्या तोंडचा घास गोड करत ,त्याला पोटभर पुरणपोळीचे जेवण करु दिले ....सार्यांनाच सुखावत पुन्हा एकदा सृष्टिला अभिषेक घडवला ....
      खरंच , म्हणूनच तर हरवलेला पाऊस सापडला परत असं म्हणावसं वाटलंय मला सुरुवातीलाच...
   देवा कसे आणि किती आभार मानावेत रे बाबा तुझे , अशीच कृपादृष्टि असू दे रे तुझ्या या लेकरांवर ......

©नंदिनी म.देशपांडे.

२२ आॅगस्ट ,२०१७.
आैरंगाबाद.

🌧🌧🌧🌧🌧🌧🌧

बुधवार, ५ जून, २०१९

शुभेच्छा.

आजच्या या मंगल दिनी,माझ्या शुभेच्छा
आपल्या चरणी....


एक प्रकाश किरण येई,
घेऊनिया सप्तरंगांना...

भेदूनी तिमिरा उजळूनी टाके,
साऱ्या आसमंता....

सान्निध्याच्या परिघाला घातले,
कुंपण प्रकाशाचे....

बुध्दी स्पर्शातूनि तेजाळे तव,
सुंदर विचार शृंखला....

प्रकाश व्यापूनि टाके जेंव्हा,
घडे परिस स्पर्श तेंव्हा...

पराक्रमाच्या कार्य पूर्तिला येई,
भेटण्या सन्मानाची साथ....

जाणीव कर्तव्याची करिती,
मृदूल फुलांची अखंड पखरण....

मांगल्याचे सूर आळविती,
तरंग प्रफुल्लतेचे....

जीवन वाटी आपल्या असू द्या नित्य,
अशा या मृदूल पायघड्या....

आज मागणं असे ईश चरणी हे,
आजन्म राहो प्रकाश हा....

असाच तेजःपुंज
राहो असाच तेजःपुंज....

एकसष्टी पुर्तिच्या खूप मनापासून आभाळभर शुभेच्छा....

© नंदिनी म. देशपांडे.

💐💐💐💐💐💐

शनिवार, १ जून, २०१९

आमरस.

*आमरस*

     आमरस आणि अक्षयतृतीया यांचे नाते फार प्रिय आणि घट्ट! या दिवशी चैत्रगौरी पुढे आंबा ठेवला की मग, सुसाट वेगाने जेवणावळीत आमरसाच्या फैरी हातात हात  धरुन नाचू लागतात.येथूनच आंब्यातील माधुर्य आपल्यातील गोडवा अधिक व्दिगुणित करत जातो. अगदी सुपर फास्ट एक्सप्रेस प्रमाणे!
     आंबा,फळांचा राजा किती लोभस रुप!हिरव्या कंच कैरी पासून ते पिवळा धमक आंबा आकाराला येईपर्यंतचा काळ खरंच फार जीवघेणाच! कधी एकदा आंबा त्या चैत्र गौरीला नैवैद्य म्हणून ठेवला जातो आणि मग आपल्या जीभेला चाखायला मिळतो याची चातका प्रमाणे वाट बघावयास लावणारा हा वेळ.
      हे लोभस, आकर्षक , रसरशीत फळ आवडत नाही असे म्हणणारा माणूस या भूतलावर आणखी जन्माला आला असेल हे म्हणणे फार धाडसाचे ठरेल.
     किती किती म्हणून सांगू याची रुपं आणि नावं !
      कोकणचा राजा हापूस याचे करावे तेवढे कौतूक कमीच.आकाराने मध्यम ते मोठा तयार झालेला असा हा सोन्यालाही लाजवेल अशी पिवळाई लेऊन येतो! रुपाने आकर्षक शिवाय साखरे पेक्षाही गोड व टिकणारं हे फळ.रस श्रीखंडा सारखा दाट!तोंडाला सुटलं ना पाणी!
    त्या खालोखाल ‌केशर! थोडेसे लांबट  हिरवट, कोकण सोडून उर्वरित महाराष्ट्रभर‌ आपला डौल राखून लोकप्रिय असणारे हे फळ! आणि रसाला अगदी केशर लावलाय जसा असा केशरी रंगाचा!चवीला खूप गोडवा अणणारा!
      पायरी, कितीही पिकला तरी आपला आवडता हिरवा कंच रंग न सोडता थोडासा आंबट पणा सोबत ठेवणारं हे थोडं फसवं फळ.आपला स्वाद टिकवून ठेवणारं हे फळ मला एखाद्या खट्याळ मुलाप्रमाणे भासतं !
   पिवळा,तांबडा,हिरवा असा रंगीबेरंगी पोशाख करत येणारा लालबाग. आपली आब राखत वावरतो.किंचित आंबटगोड चव जिव्हेची लज्जत वाढवत रहातो!
     या शिवायही अनेक अनेक जाती आहेत आंब्याच्या!प्रत्येकाची आपली अशी वेगवेगळी अशी खास वैशिष्ट्यं जपून ठेवली आहेत ज्यानं.
      माझ्या लहानपणी खोबरा नावाचा एक आंब्याचा प्रकार होता.आकाराने अर्धा ते एक किलोचा ,हिरवाच रहायचा शेवट पर्यंत पण फार गोड.
     पातळ सालीचा,पातळ रसाचा मध्यम आकाराचा पण साखरे सारख्या रसाचा हा एक प्रकार. फार आवडायचा आम्हाला.
     अगदी छोटी गोटीच नाव तिचं!हा आंबा म्हणजे जातायेता खाण्याचा.अगदी छोटी चिप वाटावी अशी कोय असणारा हा ,एका बैठकीत सहज २५-३० फळांचा फडशा पडायचा!
     शेपा हा आंबा सहसा कुणालाच आवडायचा नाही.शेपू सारखा वास येणारा म्हणून शेपा.
    शिवाय बादाम तोतापूरी या प्रकारातील आंबे सर्वांत शेवटाला पर्यंत तग धरुन उभे रहातात आणि आपले महत्व वाढवतात.
     "आमरस,"केवळ नाव काढले तरीही तोंडाला पाणी सुटेल असं पक्वान्नाचं राजेशाही रुप!दर वर्षी मे आणि जून चे पंधरा दिवस आमरसा शिवाय जेवणाची मजाच नाही!
      साध्या पोळी बरोबर रस तर असतोच,पण पुरणपोळी बरोबर किंचितसा आंबट रस याची बातच न्यारी!काय चवदार लागतो म्हणून सांगू! सोबतीला कांदाभजी,कुरुडी,पापडी व्वा!
     तिकडे वैदर्भिय, भातावर आणि उकडलेल्या शेवयांवर आमरस टाकून खातात!ज्याची त्याची आवड बाकी काय?त्यांना असे का आवडत असावे?याचे कारण मला तरी आणखी सापडलेच नाही.
    आमरसाबरोबर धपाटं, थालिपीठ हे कॉम्बिनेशनही भाव खाऊन जाणारं!
    ‌आंब्याच्या दिवसात रोज आमरसावर ताव मारुन झाला तरीही,आंबा बर्फी,आंबावडी,आंबापोळी,आम्रखंड आंब्याचा जाम,साखरांबा,गुळांबा असे अनेक चवदार पदार्थ आपली हजेरी देऊन जातात,आंब्याच्या सरत्या दिवसांत!आणि जिव्हेचे चोचले पुरवतात माणसाच्या.
     आंब्याच्या या दिड दोन महिन्यात रसाळीच्या जेवणाची चंगळ असायची अगदी.हल्ली हळूहळू मागे पडत चाललंय हे थोडसं,पण खरंच, ही पध्दत पुनरुज्जिवीत करायला हवी.या निमित्ताने आपल्या घरी आप्तेष्टांना जेवावयास किंबहूणा चार दिवस रहावयासही बोलावणे,आपणही त्यांच्याकडे जाणे या गोष्टी फार आनंद देऊन जायच्या.या पध्दतीने आमरसाच्या वाट्या लागोलाग फस्त करण्या ऐवजी कापलेल्या आंब्याच्या कांही फोडी डिश मध्ये घेऊन खाण्याचे दिवस आले आहेत असे वाटतेय!
    पूर्ण पिकलेला आंबा माचून त्याचा रस तोंडाने चोखून खाण्यातील मज्जा आम्ही अनुभवलीए!काय बहार यायची या वेळी!
  हल्ली असा पध्दतीने आंबा खायचा असतो,या साठी मुलांना प्रात्यक्षिक करुन दाखवावे लागते मात्र.
      आंब्याच्या रसाने माखलेले तोंड हल्लीच्या मुलांनी बघितले तर,"इऽऽऽ"म्हणत ते गावंढळ ठरवतात आम्हाला.
    हल्ली मुलांकडे आंबा खाताना बघितलं की अक्षरशः कणव येते मनात दाटून. वाटतं,आपण कित्ती श्रीमंत होतो,अगदी मोठ्या घमेल्यात मध्यभागी आंबे ठेवून गोल फेरीने त्या भोवती बसत,आंब्यांचा समाचार घेतलेली आपली पिढी कुठे? आणि ही आजची पिढी कुठे?
     आपलं बालपण अगदी सुखनैव,वैभवी आणि अर्थातच मोहोत्सवी!आठवणीत का असेना पण पुन्हःपुन्हा आठवावे असेच....म्हणूनच म्हणावेसे वाटते,

" फळांच्या राजाची मिजास भारी

आंमराईचे वैभव असावे घरी

आंब्याच्या आढीची गोष्टच न्यारी

सुवासाचा दरवळ घरभर पसरी

आंबा मोहोत्सव असावा घरोघरी

जेवणाच्या पंक्तित रसाळीच्या फैरी

माणसांना जोडणाऱ्या
रसाळीच्या फैरी.

*नंदिनी म.देशपांडे*.

‌.🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭