शुक्रवार, २६ एप्रिल, २०१९

मनोबोध श्लोक क्र.१५१.

मनाचे श्लोक एक अलौकीक महाकाव्य.
         पुष्पमाला सदर.
       श्लोक १५१.
खरे शोधिता शोधितां शोधताहे।
मना बोधिता बोधिता बोधाहे।
परि सर्व ही सज्जनाचेनि योगे।
बरा निश्चयो पाविजो सानुरागे।
     शोध घेता घेता खरा शोध लागतो. मनाला पुन्हा पुन्हा बोध केला म्हणजे त्याच्या ठिकाणी ज्ञान स्थिर होते .पण हे सारे सज्जनांच्या संगती मध्ये घडते. या संगतीने म्हणजेच चांगल्या लोकांच्या सहवासात सद् वस्तूचे निश्चित ज्ञान होऊन तिच्यावर प्रेम जडते.
    समर्थांनी अभ्यासयोग आणि सत्संग ही दोन्हीही परमार्थ मिळवण्याची, त्याच्यापर्यंत जाण्याची साधने आहेत असे म्हटले आहे. एखाद्या गोष्टीचा सतत ध्यास घेतला, एकच गोष्ट सारखी सारखी सांगून मनावर बिंबवली म्हणजे ती कायम लक्षात राहते. “प्रयत्नांती परमेश्वर” म्हणतात ते हेच. शोध घेणे ही प्रक्रिया सुद्धा कायम चालू राहणारी असते.
    संशोधकांनी एखादा शोध लावण्यासाठी प्रयोगशाळेत अव्याहत प्रयत्न केले तरच, एखादा शोध त्यातून साध्य होतो. त्याचप्रमाणे एखादा चांगला विचार जगाच्या कल्याणासाठी सांगावयाचा असेल तर, तो धर्म प्रवर्तकांना सुद्धा वर्षानुवर्षे तपश्चर्या करून त्याची प्रचिती घ्यावी लागते. आणि नंतरच समाजापुढे वारंवार ती गोष्ट सांगावी लागते. तरच तिचा प्रभाव समोरच्या माणसांवर पडू शकतो. एखादा शोध नव्याने लागला तर कायमच लागलाय आणि यापुढे काहीही नाही असे निश्चितपणे ते शास्त्रज्ञ कधीही सांगत नाहीत. कारण त्यानंतरही नवीन काहीतरी शोधण्याची प्रक्रिया चालू होणार असते, चालू राहणार असते. अखंड अशी प्रक्रिया नवनवीन शोधांना सिद्धांतांना जन्म घालते. पण हे सर्व घडण्यासाठी वातावरणही तसेच असावयास हवे. शोध ही गोष्ट  ज्ञानी,संशोधक यांच्या संगतीत घडू शकते.परमार्थ दर्शन सुद्धा संत सहवासातच घडू शकते.   परमार्थाचा शोध ही प्रक्रिया सुद्धा अखंडपणे चालणारी अशीच आहे. एकदा तो शोध लागला म्हणजे शेवट झाला असे अजिबात नाही. उलट एक निष्कर्ष समजला, कळला आता पुढे काय? असा प्रश्न कायमच राहतो. परमेश्वर जसा अनंत आहे तसा त्याचा शोधही अनंत काळापर्यंत चालूच रहाणार आहे.
     याचा अध्यात्म दृष्टीने आपण असा अर्थ लावू शकतो, की सत्याचा चिकाटीने शोध घेतला तर शोध लागतो. मनाला जर वारंवार समजावले तर त्याच्या ठिकाणी ज्ञान स्थिर होते. हे सर्व संतांच्या सहवासाने घडून येते. सत्संगाने सद् वस्तूचे निश्चितच ज्ञान होते. तिच्यावर प्रेम जडते.त्यासाठी इंद्रियजय, विषयवैराग्य, मुमुक्षा ह्या बाबी तर तीव्र तर असाव्याच लागतात. पण त्याशिवाय श्रवण, मनन इत्यादीही घडावे लागते. या साधना द्वारे मनाला हळूहळू आत्मबोध होत जातो. ज्ञान घेतल्या शिवाय मनुष्य जगू शकत नाही.  म्हणजेच सत्याचा शोध घेता घेता मोठी लागते चिकाटी माणसा जवळ असावी लागते.
© नंदिनी म.देशपांडे.


बुधवार, २४ एप्रिल, २०१९

मनोबोध श्लोक क्र.१४९.

मनाचे श्लोक एक अलौकीक महाकाव्य.

पुष्पमाला सदर.

      श्लोक १४९.

जगी पाहता चर्मचक्षी न रक्षे।
जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे।
जगी पाहतां पाहणे जात आहे।
  मना संत आनंत शोधोनि पाहे।

     सद् वस्तू या चर्मचक्षूंनी पाहता येत नाहीत. त्याला ज्ञानचक्षू नी पाहिले तर ते ज्ञानात राखले जात नाही. (ज्ञानात सामावले जात नाहीत). त्याला पाहणे असे आहे की पाहू जाता पाहणेच हरपुन जाते. म्हणूनच अरे मना, त्या अनंत सद् वस्तूचा तू शोध घे .हा या श्लोकाचा दार्शननिक अर्थ.

    गुह्यार्थ सांगावयाचा तर, समर्थांनी या श्लोकातून अतिशय सोप्या भाषेत अत्यंत गूढ असे तत्त्वज्ञान, ब्रह्मज्ञान, तत्त्वविचार स्पष्ट केला आहे. वेदांत एवढ्या सोप्या भाषेत मांडणारे समर्थ खरोखरच महान तत्त्ववेत्ते होते. हे तत्त्वज्ञान सर्वांसमोर, सर्वांसाठी मांडून समर्थ परमार्थाचे निरूपण करताना लक्षात येत जातात.

   सद् वस्तू किंवा परमात्मतत्त्व निर्गुण निराकार असल्यामुळे डोळ्यांना ते दिसत नाहीत.माणसाची सर्व ज्ञानेंद्रिये पंचभूतात्मक आहेत. त्यामुळे ती पंचभूतात्मक गोष्टीच बघू शकतात. परमात्मा किंवा सद्वस्तू हा पंचमहाभूतांच्या पलीकडचा विषय आहे. त्यामुळे ही पंचभूतात्मक इंद्रिय त्याला बघू शकत नाहीत.

   याच परमात्म्याकडे ज्ञानचक्षूंनी म्हणजेच बुद्धीने बघितले तर त्याचे बुद्धीला आकलन होऊ शकते. पण अनुभव मिळत नाही. अनुभव व आकलन यात महद् अंतर आहे. ज्ञानाच्या पातळीवर दिसणारे ज्ञान हे कोरडे असते. तर अनुभवाच्या पातळीवर येणारे ज्ञान हा भावनेचा ओलावा सोबत घेऊन येत असते. म्हणूनच ज्ञान चक्षूंनी पाहणे हे खरे पाहणे नाहीच. पाहता पाहता पाहणेच हरपून जाणे, असे जे असते तेच खरे पहाणे होय. याचाच अर्थ दृश्य दृष्टा आणि दर्शन ही सुत्रीच हरवून जाते. केवळ अद्वैत तेवढेच शिल्लक राहते. हे अद्वैत म्हणजे परमात्मा किंवा सद् वस्तू होय.

     या परमात्म्याला बघताना त्याच्या अस्तित्वामुळे चर्मचक्षू, ज्ञानचक्षू दोन्हीही निस्तेज बनतात. अद्वैताचा साक्षात्कार होताना पुज्य,पुजक ,पुजा या तीनही गोष्टी शिल्लकच राहत नाहीत. आणि पुजू काय तुला मी अशी अवस्था निर्माण होते. म्हणजेच आत्मवस्तु पहाताना त्यात एकरूप  असावे लागते. हेच विलीनीकरण म्हणजे अव्दैताची प्राप्ती होय.तीच करून घेण्यासाठी समर्थ मनाला आवाहन करतात आणि सांगतात, हे मना या अद्वैत आनंत अशा सद् वस्तूचा तू शोध घे.

   आता अध्यात्मिक अर्थ. निराकार सर्वाधार ब्रह्माचे वर्णन करता येत नाही. तर ते जाणून घ्यावे लागते. तसेच ते वाणीने सुध्दा वर्णन करता येत नाही. चर्मचक्षूंना किंवा ज्ञानचक्षूंना ते दिसत नाही. डोळ्यांना दिसणारी वस्तू ही सगुण साकार असावी लागते. ब्रह्म हे निर्गुण निराकार असल्याने ते नेत्रांना दिसणार नाही. डोळ्याने ते पाहू जाणारा मूर्ख ठरतो. चर्मचक्षूने ब्रह्म दिसत नसले तरी ते ज्ञान चक्षूंनी जाणता येते. चर्मचक्षूने अनुभव घेणे ही देहबुद्धीची भूमिका तर  ज्ञानचक्षूंनी अनुभवणे ही आत्मबुद्धी ची भूमिका होय.

© नंदिनी  म.देशपांडे.

🎇🎇🎇🎇🎇🎇

मंगळवार, २३ एप्रिल, २०१९

मनोबोध,श्लोक क्र.१४४.

*मनाचे श्लोक एक अलोकिक महाकाव्य*

    पुष्पमाला सदर .

श्लोक १४४.

जगी पाहता साच तें काय आहे।
अती आदरे सत्य शोधूनि पाहे।
    पुढे पाहतां पाहतां देव जोडे।
भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे। 
       
    जगात शोध घेतला तर खरे काय आहे ?अगदी मनापासून सत्याचा शोध घेतला पाहिजे. असा शोध घेता घेता ईश्वराचे दर्शन होईल .नव्हे,ते होतेच. त्यामुळे माणसाला होणारे भ्रम,भ्रांती,अज्ञान हे सर्व काही नाहीसे होते. हा झाला या श्लोकाचा दार्शनिक अर्थ.
आता गुह्यार्थ.
    माणूस सतत सत्याचा शोध घेण्यासाठी पाठपुरावा करत असतो.प्रपंच करत असताना त्याला भौतिक सुखाच्या अनेक साधनांचा शोध लागतो. त्याचा बोधही त्याला होतो.त्यामुळे माणसाच्या आयुष्यात समृद्धीही निर्माण होते. त्यातून त्याला सुखाची प्राप्ती ही होऊ लागते. मग असे झाले तरीही त्याचे मन मात्र रिते रितेच असते.आपली मानसिक शांतता या सर्व सुखाने पूर्ण होऊ शकत नाही याची त्याला जाणीव होते. हा सल सतत त्याच्या मनात असतो. आपल्याला नेमके काय हवे हे माणसाला कळत नाही. आपल्या अंतर्मनाला नेमके काय हवे याचा शोध घेण्यासाठी माणसाने  पाठ पुरावा केलाच पाहिजे. असे समर्थ येथे सुचवत असताना दिसून येतात.
    या सुखाच्या शोधाचा मार्ग काही साधा नाही. सरळ सोपा नाही. ही प्रक्रिया बराच काळ चालणारी असते.माणसाला एकदा शाश्वत सुखाचा शोध लागला, की आपल्या मनातील रितेपणाची हुरहुर कमी व्हावयास सुरवात होते. ती बराच काळ चालू असते. हळूहळू ती  क्षीण होत  जाते.  हीच हुरहुर माणसाला 'साच' म्हणजे खरे काय आहे?याचा वेध घेत असते.  त्याच्या शोध कार्यातूनच दुःखाचे तत्वज्ञान जन्माला येते. आणि यातून सत्याचे, आत्म शांतीच्या मार्गाचे  म्हणजेच परमात्मा स्वरूपाचे दर्शन त्याला घडते. आणि हाच तो क्षण असतो,जेथे माणसाला सत्याचा शोध,त्याच्या मनातील सल , हुरहुर यांना पूर्णविराम मिळतो .आणि याच परिस्थितीत तो लौकिक दुःखांना पार करून पुढे जातो . पुढे पाहता पाहता म्हणजेच पुढे जाता जाता त्याला देवाची सोबत मिळते. अज्ञान भ्रम, भ्रांती हे सारे  नाहीसेे होण्यास मदत होते.
     म्हणूनच जगात सत्य काय आहे? याचा शोध माणसाने मनापासून घेतलाच पाहिजे.असे आवाहन समर्थ या श्लोकातून करतात.
    अाता या श्लोकाचा अध्यात्मिक अर्थ पुढील प्रमाणे. 
    खऱ्या खोट्याचा विचार न करता कल्पना रूप अविद्येचे खोटे नाणे जवळ बाळगल्यामुळे मानवाला आपले अत्यंतिक हित नाही तर, उलट आपले हित साधणार आहे या भ्रमात मात्र तो राहतो. अविद्यारुपी खोटे नाणे संग्रह केल्याने होणारा तोटा त्याच्या लक्षात येतो.ब्रह्मविद्या रुपी खरे नाणे संग्रह केल्याने निश्चितच फायदा होतो. साचा म्हणजे सत्य जे जे डोळ्यांना दिसते, अगर मनात असते, ते ते सर्व विकारी आणि नाशवंत आहे.सत्य असे काहीच नाही यासाठी हे मना, जगात सत्य वस्तू कोणती याचा विचार केल्यास कालांतराने तुला सत्य वस्तूचे ज्ञान होईल. म्हणजे जे अव्यय म्हणजे कधीच नाश न पावणारे,नित्य कायम राहणारे आणि अविकारी म्हणजे ज्याचे स्वरूप कधीही पालटत नाही ते सत्य होय .

©  नंदिनी म. देशपांडे.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

पुस्तकं.

*पुस्तकं*

*पुस्तकं* इतिहासाचा वारसा.

*पुस्तकं* जनमनाचा आरसा.

*पुस्तकं* संस्कृतिचा ठसा.

*पुस्तकं* संस्कारांचा वसा.

*पुस्तकं* साहित्याचं लेणं.

*पुस्तकं* विद्वत्तेचं देणं.

*पुस्तकं* करमणुकीचं साधन.

*पुस्तकं* आनंदाचा ठेवा.

*पुस्तकं* खाद्य संस्कृतीचा मेवा.

*पुस्तकं* जीवाभावाची सोबत.

*पुस्तकं* ग्रंथ संपदेचं संचित.

*पुस्तकं* वाटतात आपले गुपित.

*पुस्तकं* न ठेवे कुणा वंचित.

*पुस्तकं* विनोदाचा हशा.

*पुस्तकं* आयुष्याची दिशा.

*पुस्तकं* वाचनाची नशा.

*पुस्तकं*
वाचत रहा नित्य.

*पुस्तकं* ज्ञानसागराची भिस्त.

*आज २३, एप्रिल*
*जागतिक पुस्तक दिनाच्या*
*मनःपुर्वक शुभेच्छा*.🌹

© *नंदिनी देशपांडे*

📖📖📖📖📖📖

सोमवार, २२ एप्रिल, २०१९

मनोबोध श्लोक क्र.१४३.

मनाचे श्लोक, एक अलौकीक महाकाव्य.

     पुष्पमाला सदर.

      श्लोक १४३.

        अविद्या गुणे मानवा ऊमजेना।
       भ्रमें चूकले हीत ते आकळेना।
       परीक्षेविणे बांधले दृढ नाणें।
      परी सत्य मिथ्या असे कोण जाणे।

           अज्ञानामुळे माणसाला खरे काय ते कळत नाही. त्याच्या बुद्धीला भ्रम पडलेला असतो. त्यामुळे जो व्यक्ती भलतीकडे जातो, त्याला आत्महित साधता येत नाही.

    खऱ्या-खोट्याची पारख न करता एखादे नाणे कमरेला बांधणे किंवा एखादी गोष्ट कवटाळून ठेवणे, म्हणजे, अज्ञानच.
   
    जीवनात सत्य असत्य कोण जाणतो? अशिक्षितपणामुळे आयुष्य जगताना माणसाला प्रत्येक गोष्टीचे म्हणावे तसे ज्ञान मिळू शकत नाही. आणि यातूनच अनेकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. त्यालाच आपण भ्रम होणे असेही म्हणू शकतो. भ्रम निर्माण होणे यासाठी समर्थांनी दासबोधामध्ये (दा.१०स.६)मध्ये अशा प्रकारच्या अनेक भ्रमांचे वर्णन प्रत्ययकारी रीतीने केले आहे. असा भ्रमिष्ट माणूस सत्यापासून दूर गेलेला असतो. परमार्थ किंवा आत्मज्ञान अशा भ्रामक कल्पना तो सांभाळत असतो.   पण या भ्रामक कल्पना सहजासहजी पुर्ण होत नसतात, तर त्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते, सिद्ध व्हावे लागते. भक्तिसाधना समजून घेऊन ती प्रत्यक्षात उतरवणे आवश्यक असते. खरा देव काय आहे? त्याचे ज्ञान करून घ्यावे लागते त्यासाठी गरज पडल्यास सद्गुरूंना वाट विचारावी लागते. त्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. त्यामुळे आपल्या साधन मार्गातील विघ्ने दूर होऊन   तो मार्ग सुकर होण्यास सद्गुरूंची मदतच होते. यातूनच नंतर आत्मज्ञान  होऊ शकते. त्यामुळेच भ्रममूलक आचार, नवस-सायास, आत्मक्लेश या सर्व गोष्टी भ्रामक आहेत. त्यातील सत्यता न पडताळता अशा गोष्टी किंवा नाणे आपण कितीही दिवस जवळ बाळगून ठेवले तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे देवाला अशी काहीतरी आमिषं दाखवून असे झाल्यास अमुक करेल तसे झाल्यास तमुक करेल या गोष्टींना आयुष्यात अजिबात थारा देऊ नये. प्रथम मुख्य देव ओळखावा. सद्गुरू कृपेने त्याची निष्काम भक्ती करावी. यातच आनंद व सत्य मानावे. हाच विचार या श्लोकातून समर्थांनी मांडला आहे.

    थोडक्यात  देव हा सर्वत्र एकच आहे. पण तरीही त्यात अनेकता भासवून घेणे, आणि त्यालाच खरे मानणे, म्हणजेच माणसाचे अज्ञान होय.

अध्यात्मिक अर्थ बघताना आपण असे म्हणू शकतो की, अज्ञानाच्या प्रभावाने माणसाला खरे काय ते लक्षात येत नाही. त्याच्या बुद्धीला भ्रम झालेला असतो. त्यामुळे तो मार्ग चुकतो. मार्ग चुकल्यामुळे त्याला आत्महित साधता येत नाही. मनुष्याला अविद्येमुळे स्वस्वरूपाची ओळख पटत नाही. अविद्या म्हणजे अज्ञान.

   व्यक्तीला आपण कोण? आपले स्वरूप काय आहे? याची जाणीव नसणे.

  “ मी कोण ऐसे नेणारे। तया नांव अज्ञान बोलिजें।”
      मी खरा कोण आहे? हे न कळणे याचे नाव अज्ञान होय. ते अज्ञान नाहीसे झाले की परब्रम्ह हस्तगत होते. असा या ओवीचा अर्थ आहे.
  
© नंदिनी म.देशपांडे.

💥💥💥💥💥💥

श्लोक १२५.

मनाचे श्लोक, एक अलौकीक महाकाव्य.

      पुष्पमाला सदर.
     
      श्लोक १२५.

    अनथां दिनाकारणे जन्मताहे।
     कलंकी पुढे देव होणार आहे.।
     जया वर्णितां सिणली वेदवाणी।
      नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी।

       अनाथ आणि असहाय्य अशा दीन जनांसाठी भगवंत जन्म घेतो. पुढे कल्की च्या रूपाने देवाचा अवतार होणार आहे. त्या भगवंताचे वर्णन करता करता वेदवाणी थकली. असा हा भगवंत भक्तांचा कैवारी आहे. तो आपल्या भक्ताची उपेक्षा कधीच होऊ देत नाही. या श्लोकाचा हा दार्शनिक अर्थ.

     आता गुह्यार्थाच्या दृष्टीकोनातून बघूया.

        भगवंतांनी अनाथांच्या दीनांच्या, संकटग्रस्त भक्तांच्या संरक्षणासाठी आपले वेगवेगळे अवतार धारण केलेले होते.केवळ इंद्र, अहिल्या, द्रोपदी, प्रल्हाद, ध्रुव यांच्यासाठी भगवंताने अवतार घेतले होते असे नव्हे. आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी तो तो अवतार भगवंताने धारण केला होता आणि आपले चरित्र समाजातच घडवले त्यातून समाजापुढे आदर्श निर्माण करून ठेवले. त्यांच्या एक एक अवतार म्हणजे एका एका युगाचा संदर्भ आहे. राम आणि कृष्ण अवतार सर्वांच्याच परिचयाचे आहेत यानंतर होणारा अवतार कलंकी रूपात कलंकी अवतार असेल. असे समर्थांनी म्हटले आहे.

     भक्त हे सज्जन असतात असा एक संकेत आपल्या मनामध्ये दृढ झालेला असतो. त्यामुळे आताच्या काळात सज्जनता कुठे उरलीच नाही तर देव अवतार का घेतील? असे प्रश्न विचारणारेही आहेतच. जगात सज्जन माणसे शिल्लकच नाहीत तर कोणासाठी भगवंत अवतार घेणार? असे काही नाही. कारण गाईं सारखे अतिशय उपयुक्त प्राणी देखील या भूमीवर आहेत. अशा प्राणिमात्रांसाठीही भगवंत अवतरत असतात. असे समर्थांना यातून सुचवायचे आहे.

     भगवंताच्या लीला अगाध आहेत. सगुणा पासून निर्गुणा पर्यंतचे  त्यांचे कितीही चरित्र गायिले तरी ते कमीच आहे. भगवंत अनंत अनादि आहेत. तेथे त्यांचे वर्णन करून वेदवाणी ही थकली. तेथे आपण भक्तीशिवाय दुसरे काय करू शकणार?

     अध्यात्मिक अर्थ :

परमेश्वराच्या कर्तुम अकर्तुम शक्तीवर ज्याची पूर्ण निष्ठा आहे. जिवाचा असाहाय्यतेची ज्याला  जाणीव आहे. म्हणून ज्याने, आपला सर्व अहंकार, सर्व भाव परमेश्वराच्या आधीन केला आहे असा हा दीन.  भक्तवत्सल देव, अनाथ दीन अशा भक्तांचा उद्धार करण्यासाठी या जगात अवतीर्ण होतो.

     कलियुग हा भारतीय संस्कृतीच्या अधोगतीचा काळ समजावा. अध्यात्म प्रणित आणि त्यागप्रधान भारतीय संस्कृती जेंव्हापासून इहलोकवादी आणि भावनाप्रधान बनू लागली तेव्हा, कलियुगाचा आरंभ झाला. कलियुगात भगवंताने मौन धारण केले याचा अर्थ अध्यात्माला मालिन्य आले. हे मालिन्य नाहीसे व्हावे यासाठी सर्व संतांनी प्रयत्न केले. पण त्यांना अपेक्षित यश आले नाही. म्हणून श्री समर्थ म्हणतात,

    प्रपंच सुखे कराव।  परी काही परमार्थ वाढवावा।
    परमार्थ अवघाची बुडवावा। हे विहित नव्हे दा. ५-३-१०३

  ©*नंदिनी  म. देशपांडे.

💐💐💐💐💐💐

रविवार, २१ एप्रिल, २०१९

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने.

२३, एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो.या निमित्ताने मी माझ्या स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचा अनुभव संवादातून सांगण्याचा एक छोटा प्रयत्न या ठिकाणी करु ईच्छिते.

       या वर्षीच्या जागतिक पुस्तक दिनाचं घोषवाक्यच आहे,ते म्हणजे," साहित्यातून संवाद साधा,गोष्टी सांगा."

      आठवणींचा मोरपिसारा, या पुस्तकाची लेखिका माझी विद्यार्थिनी, नंदिनी म्हणजे या मराठवाड्याच्या मातीतलं बावनकशी सोनं आहे. बघा पुस्तक हातात पडल्यावर वाचून तुम्हाला खात्री पटेलच.

       विश्रब्ध लेखन हे तिच्या लिखाणाचे सौंदर्य. तर‌ अडगळीत पडलेल्या अनेक मराठी शब्दांना मुक्तहस्ते शब्द फुलात गुंफत तिने नवीन पायंडा पाडलाय जुन्या शब्दांचे पुनरुज्जीवन करण्याच.....वगैरे वगैरे.

श्री लक्ष्मीकांत तांबोळी सरांची ही अशी वाक्य कानावर पडत होती, आणि माझे मन मात्र मोहरून जात होते. बापरे! सरांनी आपल्याला बावनकशी सोन्याची उपमा देऊन खूपच मोठी जबाबदारी टाकली आहे की आपल्यावर.....

   ‌   आईच्या प्रेरणेने अगदी सहज सरळ साध्या अशा बालपणाच्या आठवणींना मी मोरपिसारा च्या रुपात एकत्रित बांधून ठेवले, आणि एवढे छान काम नकळतपणे आपल्या हातून घडले ही जाणीव सरांच्या भाषणाने प्रथमच झाली माझ्या मनाला.

      या पुस्तकातील वाडा संस्कृती निरनिराळी आभुषणं, त्यात मांडलेली स्त्री व्यक्तिरेखा वगैरे अनेक अनेक ललित लेखांवर सर भरभरून पण खुसखुशीत शब्दात बोलत होते. त्यातील 'बाळांतपण'या लेखावर भाष्य करताना तर सर चक्क म्हणाले, या पुस्तकाचे बाळंतपण करण्याचे काम मात्र लेखिकेने आणि संपादकाने माझ्यावर सोपवले होते.अशा पद्धतीने हशा आणि टाळ्यांच्या गजरात चालू असणाऱ्या माझ्या आठवणींचा मोरपिसारा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रंगतदार बनत चालला होता.

   ‌‌ दुसऱ्या वक्त्या, सौ.चंद्रज्योति भंडारी मॅडम. औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयात मराठी विषयाच्या विभागप्रमुख आहेत. शिवाय मराठीतील महिला लेखिकांच्या व कवयित्रींच्या लेखनावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे. त्यांनीही बारकाईने माझ्या या पुस्तकाचा अभ्यास करत, बोलता-बोलता दुर्गाबाई भागवत,इंदिरा संत,सौ.विश्राम बेडेकर वगैरे महान स्त्री व्यक्तिरेखांच्या लेखनाशी माझ्या लेखनाची तुलना करत, माझा जणू सन्मानच केला."त्यांच्या एवढी योग्यता, त्यांच्या लेखनाची उंची तू नक्कीच गाठू शकशील,"अशी कौतुकाची थाप देऊन मला प्रोत्साहित केले.

      मॅडमने सुध्दा पुस्तकातील सर्वच ललित लेखां विषयी सखोलपणे विवेचन करत,हे पुस्तक वाचताना, माहेर या ललित लेखाने मला माझ्या माहेराच्या आठवणी जाग्या केल्या,नव्हे मी माझ्या माहेरी जाऊनही आले.असे भंडारी मॅडम‌ बोलल्या.साड्यांचे प्रकार वाचताना मी भरपूर प्रकारच्या साड्याही नेसून घेतल्या असेही त्या बोलत होत्या.

    या प्रकाशन कार्यक्रमात झालेल्या सर्वच भाषणांनी माझ्यावर व माझ्या पुस्तकावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला. पण वाचकांनीही हे पुस्तक वाचल्यानंतर जेव्हा आवर्जून फोन करून सांगितले की हा लेखसंग्रह आमच्या पूर्णपणे पसंतीस उतरला तर आहेच.पण या आठवणीतून उभा केलेला काळ हा खरंच अगदी असाच अस्तित्वात होता, हे हल्ली आमच्या मुला सुनांना सांगितले तर कळत नाही. खरं वाटत नाही. त्यामुळे हे पुस्तक मी त्यांना वाचावयास सांगणार आहे. "एक कॉपी मी अमेरिकेत माझ्या मुलीसाठी पाठवली आहे" असे जेव्हा एका वाचकाने मुद्दाम फोन करून सांगितले, आणि काय आनंद झाला म्हणून सांगू! या पुस्तकामुळे आम्हाला खूपच नॉस्टॅल्जिक व्हायला झालं त्यातच रेंगाळत बसावं असं वाटत होतं.आपल्या सासूबाईंची व्यक्तिरेखा आत्ता पर्यंत कोणी लिहिली असेल असे वाटत नाही.... वगैरे वगैरे अनेक छान छान प्रतिक्रिया माझ्यापर्यंत जशा येत होत्या, खरेतर तेंव्हा मला लक्षात आलं की अरेच्चा,आपण खरच मराठीतील लेखकांच्या मांदियाळीत येऊन बसलेलो आहोत हे खरंय तर....

औरंगाबाद पासून मुंबई पुण्या पर्यंत आणि नांदेड कोल्हापूर अगदी थेट कर्नाटका पर्यंतच्या मराठी माणसाच्या हातात आठवणींचा मोरपिसारा पोहोंचले आणि मला कृतकृत्यता लाभली...

     अशा या माझ्या पहिल्याच पुस्तकाची लेखन प्रक्रिया अगदी सहज घडत गेली.किंबहूणा,या पुस्तकाचा प्रकाशन प्रवास आणि प्रकाशन सोहळा माझ्या आयुष्यातील एक सुवर्णयोग ठरला. माझ्या जीवनाला एक कलाटणी देणारी ही घटना या नात्याने आठवणींच्या मोरपिसाऱ्यातील इतर अनेक मोरपिसां प्रमाणे आणखी एक सुंदर मोरपिस,आठवणीच्या रुपात माझ्या मनःचक्षूं मध्ये कायमचे विराजमान झाले. कधीच न विसरण्यासाठी. आपली खास उंची आणि जागा निर्माण करत.

     मूळचा असणारा लेखनाचा छंद लहानपणापासून वेळ मिळेल तसा जोपासत जोपासत शाळेचा वार्षिक अंक वर्तमानपत्र,साप्ताहिकं मासिकं, दिवाळी अंक,इत्यादी माध्यमातून लिहिती रहात  पूर्ण करते आहे, हे माझ्या आईच्या लक्षात आले. तिला अर्थातच,प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या कौशल्यगुणांचे कौतुक वाटतच असते. तसेच ते माझ्या आईला सुध्दा वाटायचं. मी माझे सारे लिखाण जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवले पाहिजे.यासाठी सारखे समुपदेशन करत आईने मला प्रोत्साहित केले खरे. पण तिच्याच प्रेरणेने मी बांधलेली पुस्तक रुपातली पहिली कलाकृती बघावयास आई राहिली नाही हे शल्य मात्र मनाला कायम लागून राहिले.हे पण तेवढेच खरे.प्रकाशनाचा सोहळा चालू असताना आईच्या आठवणीने खूप गहिवरायला होत होतं. पण जिथे कुठे असेल आई तेथून ती आपल्या मुलीचं कौतुक नक्कीच डोळे भरून बघत असेल. अशी ग्वाही राहून राहून माझे मन मलाच देत होतं.

     दोन वर्षांपूर्वी दिवाळीची भेट या स्वरुपात वाचकांच्या हाती माझे पुस्तक, 'आठवणींचा मोरपिसारा' सुपूर्त करताना खरोखर मनस्वी आनंद झाला होता.आईच्या ऋणातून, आपल्या मायबोलीच्या ऋणातून, आपल्या मातीच्या, शाळेच्या, पर्यायाने माझ्या लेखांवर प्रेम करणाऱ्या वाचकांच्या ऋणातून थोडे तरी उतराई होण्याचा प्रयत्न मी केल्याचे समाधान मनावर उमटत गेले.

      आठवणींचा मोरपिसारा या ललित गद्याच्या पहिल्या पुस्तकाला प्रथम प्रकाशित पुस्तकाच्या ओळीमधील पहिल्या क्रमांकाचा गौरव देऊन सन्मानित करण्यात आले.त्यावेळी, या माझ्या समाधानाने अलौकिकत्व प्राप्त केले.

     ‌ गेल्या पंचवीस वर्षांपासून देण्यात येणारा, मराठवाड्यातील 'कै. सावित्रीबाई वामनराव जोशी' पुरस्कार. आत्तापर्यंत अनेक दिग्गजांना मिळालेला हा पुरस्कार बाविसाव्या वर्षी चा असा २०१६-१७  यावर्षी माझ्या आठवणींचा मोरपिसारा या पहिल्या पुस्तकाला मिळालाय. असे जेव्हा मला फोनवरून प्रथम सांगण्यात आले, तो क्षण माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा केंद्रबिंदू नक्कीच ठरला होता. यात अजिबात दुमत नाहीच. केवळ आपली स्वतःची अशी अभिव्यक्ती,कलाकृती पुस्तक रूपात आपण पहिल्यांदाच बांधली काय आणि ती पहिल्या प्रकाशनाच्या मानांकनात सामील होत, तिला यावर्षीचा पहिला गौरव सन्मान प्राप्त होतो काय माझ्यासाठी हे खरोखरच एक स्वप्नवत सत्य होतं. ते प्रत्यक्षात उतरलं आहे ही अनुभूती खरचं खूप अविस्मरणीय आनंददायक अशीच.

      ‌ परीक्षकांनी हेच पुस्तक पुरस्कारासाठी का निवडले याची केलेली मिमांसा खरोखर आजच्या काळात विचारप्रवृत्त करावयास लावणारी होती . मला ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्या सुद्धा एक सुप्रसिद्ध लेखिका गादगे मॅडम . यांनी पुस्तक वाचून माझे हे पुस्तक त्यातील लिखाण नात्यांचा भावबंध जपणारे आहे . हा एका संस्कृतीचा , एका  काळाचा अनमोल ठेवा आहे हे जेव्हा सांगितले ;तेव्हा मलाही माझ्या पुस्तकाची नव्याने पुन्हा ओळख झाल्यासारखे वाटले . खरं म्हणजे तीन पिढ्यांची  साक्षीदार असणारी मी ,या समाजाच्या बदलत गेलेल्या चालीरितीं मध्ये काळाच्या ओघात  सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक बदल कसे होत गेले, आणि या बदलांमधील मी एक दुवा या उद्देशाने लिहिती झालेली मी. पुस्तक रुपाने माझ्या विचारांचा  ठेवा बनून राहिले आहे. त्यावर या साऱ्या मान्यवरांचे विचार ऐकल्यानंतर मला विश्वास बसला. आणि समाजात वावरताना थोडेसे समाजऋणातून उतराई झालीयं मी. ही जाणीव स्पर्श करून गेली.चित्ताला खूप मोठ्या प्रमाणावर प्रसन्नता प्राप्त झाली. जी अगदी अतुलनीयच आहे. अशा निर्मळ निर्भेळ समाधानाने मी भरून पावले त्यामुळे  ही पहिली कलाकृती हा माझ्या आयुष्यातील एक अतिशय हृद्य, अविस्मरणीय, आईच्या आठवणींने हळवा बनवणारा सोहळा ठरला हे निर्विवाद.

     याच दिवशी मी माझ्या आगामी पुस्तक प्रकाशनाचा संकल्प सोडला आणि तो पुर्णत्वास जात कांहीच दिवसांत "भावशिंपलीतील मोती"
वाचकांशी संवाद साधण्यास पुस्तक विश्वात प्रवेश करत आहे हे आवर्जुन सांगावेसे वाटते.

*© नंदिनी म.देशपांडे.*
औरंगाबाद.

💥💥💥💥💥💥💥💥