मंगळवार, ३१ मार्च, २०२०

चोचले जीभेचे... मेतकूट...

गुढिपाडवा झाला की,ठेवणीतल्या किंवा साठवणीच्या पदार्थांचे वास आसंमंतात दरवळू लागतात...त्याची मागच्या वर्षीच्या चवीची आठवणही जिभेवर आंमल करु लागते...याच दिवसांत दिवस मोठा होत जातो आणि रिकमपणही बऱ्यापैकी हाताशी असतं...उन्हाळ्याची चाहूल मेतकूट लावलेले कच्चे पोहे, मुरमुरे त्यात भरपूर शेंगदाणे....यांची आठवण करुन देतात...तर दुपारची वेळ सातुच्या पिठाची सय आणत रहाते...
उन्हाळ्यात कांहीतरी चटक मटक आंबट आंबट खाण्याची ईच्छा होते...जिव्हेचे चोचले पुरवण्यासाठी या महिना दोन महिन्यांसाठी मेतकूट,सातूचं पीठ आणि पुडचटणी जर असेल घरात, तर खवय्यांना वेगवेगळे पदार्थ बनवण्याची रेलचेल करता येते....

*मेतकूट* एक अत्यंत उपयोगी,तोंडाला चव आणणारं टिकणारा असा पदार्थ बनवण्याचं माध्यम...किती किती म्हणून उपयोग कराल याचे!एक तर मेतकूटाला लग्नाच्या तयारीतील पदार्थांमध्ये खूप मानाचं स्थान आहे.... शुभ शकूनाचा मान म्हणून येणाऱ्या जवळच्या पाहूण्यांना थोडा तरी नमुना चिवडा लाडू बरोबर देण्याची पध्दत आहे...
शिवाय थोडंसं दही टाकून पातळसर केलेल्या मेतकुटावर फोडणी टाकली थोडी की,जेवणातील चटणीची किंवा कोशिंबीरीची जागा भरुन निघते....जीभेची रसतृप्ती होते ती वेगळीच...अहो,गरमागरम मऊ भातावर लोणकढं तूप आणि मेतकूट मीठ लावून मस्त कालवून खाल्लेल्या भाताची चव....
अहाहा!सोबत एखाद्या लोणच्याची फोड असावी...... मेतकूटावर कच्चं तेल नि मीठ टाकून त्यासोबत शिळी भाकरी किंवा पोळी!एकदा खाऊन तर बघा,संपलं तरीही बोटं चाखत रहाल नुसते...
गार भातावर मेतकूट आणि त्यावर फोडणी ही चवही खासच...तुमच्या पुलावला लाजवणारी...
मेतकूटाची खरी किंमत उन्हाळ्यात मुरमुरे खाताना लक्षात येते...कच्चे मुरमुरे त्यावर भुरभुरलेले मेतकूट,मीठ,कच्चे शेंगादाणे,लावली तर थोडीशी पूडचटणी, आणि कच्चा कांदा.... व्वा!यासारखी चवदार डिश नाही दुपारच्या खाण्याची...
असंच काहिसं पोहे,ज्वारीच्या लाह्या यांंचही कॉम्बिनेशन चवदार!
ढोकळे भात, विदर्भातील एक भाताची चविष्ट डिश!अहो तो तर मेतकूटाशिवाय बनतच नाही...
मेतकूट खरं म्हणजे हा महाष्ट्रीयन पदार्थच आहे का दक्षिणेतला?असा संभ्रम पडतो...कारण तिकडे मेतकूट भाताशिवाय जेवणाला पुर्णत्वच येत नाही...
पण काहीही असले तरीही,मेतकूट एक खमंग माध्यम म्हणून आणि आयत्यावेळी अतिशय उपयोगी ठरणारा पदार्थ, प्रत्येकाच्या स्वयंपाकगृहात आपली खास जागा बनवून आहे...म्हटलं तर त्याशिवाय काहीच अडणार नाही पण म्हटलं तर खूप काही अडेल असा एक ठेवणीतला पदार्थ...
सध्याच्या लॉकडाऊन काळात तर फारच उपयोगी पडणारा...

*नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹🌹🌹

*मेतकूट*

साहित्य:

* एक वाटी चनाडाळ
* एक वाटी उडिद डाळ
* एक वाटी धणे
अर्धी वाटी गहू
* पाव वाटी तांदूळ
* पाव वाटी मुगाची डाळ
* अर्धी वाटी जिरं
* तुपाची वाटी अर्धी मोहरी
* तुपाची वाटी अर्धी मेथीदाणे
* सुंठीचे चार कोंब
* चवीनुसार हिंग
*!हळकुंडाचे कोंब दोन किंवा हळद पावडर

वर दिलेले साहित्य कोरडेच वेगवेगळे चांगले भाजून एकत्र करावेत आणि बारीक दळावेत...
मेतकूट तयार...

*नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹

चोचले जिभेचे...

चोचले जीभेचे.              _____________

*पुडचटणी*

    खरं म्हणजे येसर, मेतकूट आणि पुडचटणी ही सारी एकाच कुटुंबातील सख्खी भावंडं....एकाचं नाव घेतलं की साऱ्यांची जोडीनं येतातच...
    ही तीघंही लग्नकार्यात तेवढीच महत्त्वाची,टिकणारी आणि तोंडाची चव वाढवणारी....
     मेतकुटाविषयी सांगून झालंय आज इतर दोघेजण....
  ‌‌पुडचटणीआंबटगोड चवीची, उन्हाळ्यात हमखास तोंडी लावणं म्हणून भुमिका निभावणारी! उन्हाळ्यात जेवणावरची 
ईच्छा थोडी कमी होते माणसाची, त्यावेळी चव आणण्यासाठी अती उत्तम...
    या शिवाय चिवड्याला किंवा मेतकूट लावलेल्या मुरमुऱ्याला थोडी पुडचटणी भुरभुरुन लावली की झक्कास चव येते!तुमचा बाजारी चिवडा मसाला या पुढे अगदी "ह्है" असाच....
    याशिवाय आपण आंबट वरण(आमटी)बनवतो त्यावेळी,त्यात चमचाभर पुडचटणी घातल्यास मस्त चव येते...बटाट्याची रस्सा भाजीची चवही या थोड्याशा चटणीनं चवदार बनते...
     अशी ही पुडचटणी कोणी वरतून कच्चं तेल,कोणी थोडीशी फोडणी वरतून टाकत आवडीनं खातात. किंवा तशी कोरडीही पोळी, भाकरीबरोबर लज्जत वाढवते...
कधी तोंडी लावणं,(चटणी)तर कधी मसाला म्हणूनही फार उपयोगाची!घरात आवर्जुन असावी अशीच!घरच्या घरी बनवता येणारी...घरातील सदस्य अगदी जिभल्या चाटत चाटत खातील आणि कधी संपली ते कळणार सुद्धा नाही!

*येसर*

      पूर्विच्या काळी एखादं लग्नकार्य असेल  तर चांगले ८-१५ दिवसांपासून घरी पाहूण्यांचा राबता असायचा....कालौघात अनेक कारणांमुळे  कमी झालायं....
पण देवकार्या च्या दिवशी येसर हा पदर्थ आवर्जुन लागायचाच....गम्मत म्हणजे, लग्नकार्य आटोपले,नवरा नवरी स्थिरस्थावर झाली तरीही,कांही मानाची मंडळी लग्नघरी मुक्काम ठोकून असायची....अशा वेळी एक दिवस जेवणात येसर वड्यांचा बेत केला जाई....असणाऱ्या पाहुण्यांनी येसर वड्यांचा यथेच्छ पाहुणचार घ्यावा आणि लग्नघराचा निरोप घ्यावा हे सुचवण्यासाठी ही पंगत असायची....
ही पंगत झाली म्हणजे ताम्हण पळीनं वाजवत असत....याचा अर्थ, "पाहुणे मंडळींनो,आता आपण आपल्या गावी जाण्यासाठी प्रस्थान करा". असा असायचा....त्यांच्या
सोबत येसर मेतकुटाचा नमुना चिवडा लाडू बरोबर दिलाच जायचा...
    हल्ली आपण हॉटेल्स मध्ये पाठवड्यांची भाजी म्हणून जे खातो ना,त्याचे मुळ या येसरवडीच्या डिश मध्येच आहे बरं का....

*नंदिनी म.देशपांडे*.

🌹🌹🌹🌹🌹🌹

 ‌*पुडचटणी*

साहित्य.

* एक वाटी चनाडाळ
*एक वाटी उडीद डाळ
*एक वाटी धणे
*अर्धी वाटी तीळ
*अर्धी वाटी ‌किंवा थोडी त्या पेक्षा कमी जिरं
*हिंग चवीनुसार
*चिंच किती प्रमाणात आंबट लागते त्या नुसार (वाळलेली)या प्रमाणाला पाऊण ते एक वाटी
*गुळ साधारण तेवढाच
*तीखट चवीनुसार
*मीठ चवीनुसार

कृती.
सर्व डाळी,आणि धणे जिरं,तीळ वगैरे वर दिलेलं सर्वच साहित्य वेगवेगळं असं थोड्या तेलावर खमंग भाजून एकत्र करावे.
तीखट,मीठ,हिंग भाजण्याची गरज नाही.
पण शाबीत लाल मिरची घेतल्यास थोड्या तेलावर परतून घ्यावी.
चिंचेच्या रेषा काढून ती पण तेलावर भाजून घ्यावी.भाजलेली चिंच गार झाल्यानंतर कडक होते.चिंच चिंचोके काढून असावी.
या साऱ्या मिश्रणात चिरलेला गुळ घालावा (मिश्रण गार झाल्यानंतर)
नंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे
एकदा फिरवून घेतलेल्या मिश्रणाची चव एकजीव होत नाही म्हणून एकदा मिक्सर मधून काढलेले मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून एकजीव करावे म्हणजे चटणी चवदार लागते....
हे तयार झालेले रवाळ मिश्रण म्हणजेच तयार झालेली पुडचटणी!ही चांगली ३-४महिने टिकते.आंबट गोड असते म्हणून काचेच्या बरणीत भरून ठेवावी.

©️ 
*नंदिनी म.देशपांडे*.

🌹🌹🌹🌹

रविवार, २२ मार्च, २०२०

कोरोना

*कोरोना*

     एवढासा जीव पण दहशत किती देवू.... असं झालंय खरं त्या बारीकशा विषाणूला....
जेमतेम १४-१५ तास त्याचं आयुष्य....पण शतायुषी मजल मारणाऱ्या अती बुध्दीमान प्राण्याला, माणसाला अगदी कःपदार्थ ठरवलंयं त्यानं आपल्या समोर....
व्यवहार सगळेच ठप्प!सगळीकडे भयाण शांतता,भरीस रणरणतं ऊन....आंतरबाह्य भयाण शांतता...ना कोणाचे खाण्यात लक्ष ना टीव्ही बघण्यात....टीव्ही वरही त्याच त्या कोरोनाच्या बातम्या...अख्खा टीव्ही व्यापून गेलाय कोरोनानं.... त्यावरती येणारे आकडेही धडकी भरवणारे....घरातील भिंतीवरच्या घडाळ्याची टिकटिक सुध्दा भयानक वाटतीए... रस्त्यांवर शुकशुकाट...कुत्री सुध्दा म्लान होऊन निपचित पडलेली....झाडं मलूल झालीएत...एखाद दोन छोटे पक्षी हिंमत करताएत माणसाला साद घालण्याची ....तर फुलां भोवती गुंजारव करणारा भुंग्याचाही नाद नकोसा झालाय...कॉलनीतल्या एखाद्या घरातून ऐकू येणारा लहान मुलाचा आरडा ओरडा फारच कर्कश्श वाटतोय....
एखादा पादचारी चुकून माकून दिसलाच रस्त्यावर,तर तो कोरोना तर वाहून नेत नाहीएना?अशी धास्ती वाटतेय...कुणाकडे जाणं नको,कुणी आपल्याकडे येणं नको असं झालंय खरं...लगेच आंर्तमनातून आवाज येतो....तू तरी कुठे सेफ आहेस ? दोन दिवस घरात बंद होऊन बसलाएस,पण 'तो' विषाणू कधीच प्रवेशणार नाही याची तरी काय शाश्वती?....
 केवळ प्रयत्न,संयम,स्वच्छता,प्रतिकार क्षमता नि, सहनशक्ती ‌हीच खरी आपल्याजवळची शस्त्रं.... तीच कायम उपयोगात आणावी लागणार आपल्याला...तो,तो विषाणू वरचढ ठरतोय माणसाला...औषधालाही दाद देत नाहीए...म्हणून काय शांत बसायचंयं? अजिबात नाहीच...लढा द्यायचाच त्याच्याशी....त्याला पराभूत करुन सोडायचंच...सर्व जनशक्तीनीशी....युक्तीनीशी.. त्यासाठीच तर हे आजचं पहिलं पाऊल....नक्कीच यशस्वी होणार म्हणजे होणार म्हणजे होणारच...

नंदिनी म.देशपांडे
दि..२२ मार्च,२०२०.

👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

रविवार, ८ मार्च, २०२०

माझी आजी.

*माझी आजी*

       गोरी गोरी पान,तकतकीत सुरकुतलेली कांती,मध्यम ऊंची पण ताठ कणा...माझ्या आईची आई...माझी आजी....माहेरची शारदा तर सासरची पार्वती!
   आमच्या कुटुंबात दर वेळी आंबट वरण आणि गोळेभात आणि बटाट्याची चिंच गुळ घातलेली भाजी बनवण्याचा बेत झाला की, हमखास आजीची आठवण आजही येते...हे तीनही पदार्थ अतिशय साधे,सोपे अगदी सहज बनवले जाणारे, पण तिच्या हातच्या चवीची अशी आम्हाला आजही जमत नाहीत...कितीही प्रयत्न केला तरीही...
    ९३ वर्षांचे आयुष्य तिला मिळालं. पण तिला सधवा बघितल्याचे खूप पुसटसे आठवते...मी सहा वर्षांची असतानाच आजोबा गेले आणि आजीनं केशवपन केलं..त्या नंतरचीच आजी आजही मनाच्या एका कप्पयात तिची अशी एक जागा कायम करुन आहे...आजीला जाऊनही वीस वर्षे झालीएत आता... पण तिच्या आठवणी,तिचा करारीपणा,खंबीरपणा,तिची कणखर वृत्ती आजही आठवत रहाते... निमित्ताने....
   आजीचा सतत कांहीतरी कामात अण्याचा स्वभाव तर सवयीचाच झाला होता...आजोबांकडे भोवतीच्या बऱ्याच गावांचं पांडेपण होतं....त्यांचा लोकसंपर्क आणि घरी पाहूण्यांची वर्दळ नेहमीच असायची...‌
     औंढा नागनाथ हे माझं आजोळ...म्हणून तेथील प्रत्येक घराचं नागनाथ हे अराध्य दैवत....दररोज सकाळी सोवळ्यात स्वयंपाक आटोपून आजी देवाला,म्हणजे नागनाथाला जाऊन यायची.हाती पितळेची जाळीची कलाकुसर असणारी जड फुलदाणी घेऊन...त्यात परसबागेतीलच पांढरी, लाल कन्हेरीची फुलं आणि बेलाची काही पानं... त्यावेळी तेथील स्थानिक रहिवासी मंदिरात दर्शनासाठी जाताना अनवाणीच जात असत...बाराही महिने...गावातील बहुतेक स्त्रीयांचा असाच नियम असायचा...मग रस्त्यात परस्परांची विचारपूस व्हायची...पण तरीही अर्ध्या तासाच्या आत आजी घरी परतायची....
    वयाच्या नव्वदीपर्यंत आजी कुठेही गेली,अगदी आमच्या घरीही म्हणजे तिच्या लेकीकडे,नातीकडे,एखाद्या बहिणीकडे,भाचीकडे तरी, साऱ्यांचा स्वयंपाक तीच करायची...तिला सोवळ्यात होऊन तिचा करायचाच असायचा पण साऱ्यांचा करण्यात तिला आनंद वाटायचा... 
    आमच्याकडे आली आजी,की घरातील प्रत्येकाच्या आवडीनुसर दररोज एक फर्माईश ती पूर्ण करायचीच....आजी आली की आईला आराम होई...दुपारीही तीनं फार तर अर्ध्या तासापेक्षा जास्त कधी वामकुक्षी घेतलेली आठवत नाही मला....तिचा हात चालूच असायचा सारखा....कधी जात्यावर स्वतः मेतकूट दळून ठेव तर कधी सातूचं पीठ....काहीच काम नसेल तर सपीट काढून गव्हले (वळवट) तरी बनवून ठेवायचीच....एवढे बारीक,शुभ्र आणि पांढरे की बस्स !! खीर खाताना किती मेहनतीचं जिन्नस आहे हे!याची आम्हाल जाणीव व्हायची...
   तिच्या काळात महिलांच्या शिक्षणाला फारसे महत्व नव्हते,पण ती शिकली असती तर नक्कीच बुध्दिमान विद्यार्थ्यांमध्ये तिची गणना झाली असती....
ती किती शिकलीए याची चौकशी मी पण केली नाही कधी,पण दररोज तुळशीपुढे "श्रीराम प्रसन्न" ही अक्षरं रांगोळीनं सुरेख काढायची...
कामाचा उरक आणि टापटिपपणा तर एखाद्या तरुणीला लाजवेल असाच शेवटपर्यंत होता...आपले काम आपणच करायची...कधीही परस्वाधिनत्व पत्करण्याची वेळ तिच्यावर आली नाही...
आपलं पातळ दररोज स्नान झाल्याबरोबर स्वतःच धुवून टाकायची...कायम पांढरं पांढरं शुभ्र असायचं ते...आई कधीतरी गडद पिवळ्या किंवा गुलबक्षी रंगाचं नेसावयास लावायची तिला ते फार खुलून दिसायचं....म्हातारपणातही तिच्या अंगावर...
    आजीसह त्या सहाजणी बहिणी आणि दोन भाऊ होते...या भावंडांमधील परस्परांचे प्रेम फारच वाखाणण्यासारखं होतं...सारीच नाती शेवटच्या क्षणापर्यंत तिनं जीवापाड जपली होती...
    तिनं कधीच कोणाला रागवून बोलल्याचं ऐकलं नाही मी...पण आपला नातू लहान वयात स्वतः एकटा चारचाकी चालवत मध्यरात्री आलेला बघून आईची मात्र चांगलीच कान उघडणी केली होती तिनं...त्यावेळी दुधापेक्षा दुधावरची साय तिच्या मायेला सरस ठरली होती...
    आलेल्या परिस्थितीला धैर्यानं तोंड देण्याची कला तिला आत्मसात होती...तिच्या आयुष्यात प्रत्येक अडचणीच्या परिस्थितीवर तिनं यशस्वीपणे मात केली...आपल्या सुनेला आणि नातवंडांना खंबीरपणे उभं रहायला शिकवलं तिनं....स्वाभिमानानं जगायला शिकवलं...
अत्यंत वैभवाचे दिवस तिनं उपभोगले तसे उतारवयात काही हलाखीचे दिवसही सोसले...खंडीभर गाई वासरं म्हणजे कशी असतात?ते तेथल्या गोठ्यांमध्ये अनुभवाला आलं होतं आम्हाला....पण नातवांसाठी घर आणि शेती जीवापाड सांभाळून ठेवली...त्याची फळं आज नातवंड,पतवंड चाखत आहेत...आईनं प्रेमानं एखादी भेटवस्तूही देऊ केली तर कधीच घ्यायची नाही तिने....जावयाचं काही घेत नसतातच...या सबबीखाली...
    ती एक वेळेलाच जेवायची...रात्री अर्धी ज्वारीची दशमी आणि मीठभुरका किंवा मुरमुऱ्याचा एक प्लेट चिवडा एवढाच आहार घ्यावयाची...मला वाटतं तिच्या दिर्घायुष्याचं हेच रहस्य असावं...नेहमी पेक्षा दोन घासही ती कधीही जास्त खायची नाही पण शेवटपर्यंत काटक होती...
आजी आली की तिच्या दशमीवर आमचा डोळा असायचा...त्यातील थोडी मला मिळायचीच....तिला त्याबरोबर माझ्या हातचा मिठभुरका आवडायचा....मी त्यात किंचित साखर घालत होते त्यामूळे तीखट लागायचाच नाही..त्याचे तिला फार आश्चर्य वाटायचं...पण मी माझं गुपित तिला कितीतरी वर्ष कळूच दिलं नव्हतं...पण ती जेंव्हा स्वतःहोऊन मला तो करावयास लावायची ना,त्यात फार धन्यता वाटायची मला... कारण तिची तेवढीच काय ती सेवा घडण्याची संधी मला मिळयची....
   आमच्या घरी आली आजी की,कधीही जावयाच्या समोर बसलेली किंवा त्यांना प्रत्यक्ष बोललेली मी बघितली नाही...
    आम्हा नातवंडांशी,आईशी गप्पागोष्टी रंगात आल्या की बाबा सामिल होण्यासाठी येत, पण आजी लगेच काढता पाय घेत असे...
कोणत्याही परिस्थितीत तिनं आम्ही आजोळी गेल्यानंतर आम्हा नातवंडांची,लेकीची किंवा जावयाची गैरसोय शेवटच्या श्वासापर्यंत होऊ दिली नाही....तिला आपल्या जावयाचं फार कौतूक आणि अभिमान वाटायचा....
   साऱ्या नातवंडांचे दोनाचे चार हात झालेले तिने बघितले...प्रत्येकाचा संसार बघून सुखावून गेली....शेंडेफळ नातवंड माझा भाऊ...त्याच्या लग्नाला मात्र ती हजर राहू शकली नाही...कारण तेवढा प्रवास झेपण्यासारखं तिचं वय नव्हतं...आम्हा सर्वांना तिची त्यावेळी फार उणीव जाणवत होती...कारण दर कार्यात,कोठीघर आणि देवधर्माचा विभाग ती अत्यंत कुशलतेनं हाताळायची... आईनं तिला लग्नानंतर लवकरच नवदाम्पत्याला तुझ्या आशिर्वादासाठी घेऊन येते.असे आश्वासन दिलेले होते....ती दोघं फिरुन आली की तीन आठवड्यातच आम्ही सारेच तिच्या भेटीला औंढ्याला गेलो...अत्यंत वृध्दावस्थेमूळे तब्येत तोळामासा झाली होती...पण डोळ्यात प्राण आणून नातवाला व नातसुनेला आशिर्वाद देण्यासाठीच जणू त्या प्राणपक्षाला तिनं जिद्दीनं आपल्यातच थोपवून धरलं होतं...स्वतःला शक्य नव्हतं, पण मामीकडून तिनं दरवेळी प्रमाणे याही वेळी  तुकडा ओवाळून पायावर पाणी घालत आम्हा सर्वांचं स्वागत केलं...यथोचिच स्वयंपाक बनवावयास लावून व्यवस्थित पाहूणचार केला...राखी पौर्णिमेचं आईला मामाला औक्षवण करावयास लावलं....आम्हा सर्वांना हसतमुखानं वाटी लावलं (निरोप दिला)‌आणि दुसरे दिवशी पहाटेच पाच वाजता अगदी तृप्ततेनं शांतपणे आपल्या अडवून ठेवलेल्या प्राण पक्षालाही निरोप दिला....कायमचा....
    
   आज जागतिक महिला दिन...शब्दांतून आजीला आदरांजली वहावी असं मनापासून वाटलं आणि लिहिती होत तिच्या आठवणीत रममाण होत नतमस्तक झाले...तिच्या जिद्दीला,काटकपणाला,कणखरपणाला,स्वच्छता,टापटिपीला,सुगरणपणाला,तिच्या माणसं जोडून ठेवण्याच्या स्वभावाला,शिस्तीला त्रीवार अभिवादन करत !!!! 🙏🏻🙏🏻🙏🏻

  *नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.

शनिवार, ७ मार्च, २०२०

तू स्त्री आहेस म्हणून....

‌   *तू एक स्त्री आहेस म्हणून*
*~~~~~~~~~~~~~~* 
 ‌       आईच्या गर्भातच कायमचं खूडून टाकण्याचा प्रयत्न होतोय गं तुला.... जन्माला येण्याआधीच तुझा मृत्यू घडवून आणला जातोय.... का तर तू एक स्त्री आहेस म्हणून.... याला खतपाणी मिळतंयं घरातल्या जुनाट विचारांकडून....त्यांचा पगडा असणार्‍या तुझ्याच माणसांकडून.... काय ही शोकांतिका ?कुठे फेडतील ही पापं ही लोक....

    बरं तू जन्माला आलीसही.... सिद्ध केलंस स्वतःला आपल्या स्वतःच्या मेहनतीनं आपल्या बुद्धी सामर्थ्यावर...‌ तर, तर तुझ्या उच्च शिक्षणासाठी मोडता घातला जातो....आम्ही आता उजवून टाकणार,तुला.,..आमच्या कर्तव्यातून मुक्त होणार आम्ही....जे काय शिकायचे ते नवऱ्याकडे कडे जाऊन....का तर तू एक स्त्री आहेस म्हणून...

     मग धसास नेतेस गं तू लग्नानंतरही हीच जिद्द शिक्षणाची... व्यवस्थित संसार सांभाळत घरच्या रूढी-परंपरा,रितीभाती सांभाळत,सर्वांचं सर्व काही करत असतेस. रात्रंदिवस जागून, नेतेस तुझ्या शिक्षणाची नौका पार करत.... पण आता बस झालं नोकरी वगैरे ची गरज नाहीये.... तुझ्या पैशावर काही घर चालणार नाही ....."आता पाळणा हळू द्या", अशा सूचना होतात....पुन्हा पहिलाच कित्ता,का....तर तू एक स्त्री आहेस म्हणून....  

    पाळणा लवकर हलला तर ठीकच.पण वेळ लागू लागला तर तुलाच दूषणं दिली जातात...तुला वांझ म्हणत हिणवलं जातं.... कुटुंबातील तुझं अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जातो..... का तर तू स्त्री आहेस म्हणून....

    वाढत्या संसारात वेलीवरच्या दोन तीन साजिऱ्या फुलांचं,घरातील ज्येष्ठांचं, नवऱ्याचं,करत करत एव्हाना फार मागे राहिलेल्या आपल्या करिअरला तू विसरूनही जातेस .... मुलं मोठी होत जातात....आपले छंद आवडीनिवडी भटकंती यामध्ये रममाण होतात....पण तुझी वैचारिक प्रगल्भता आणि बौद्धिक चातुर्य तुला अस्वस्थ करत रहातं....

    हल्ली खरंतर खूप रिकामा वेळ मिळतो आपल्याला....तो सत्कारणी लावून, बघूया चार पैसे मिळाले तर ....आपल्या आवडीचे काम मिळते का कुठे ते? पण कसचे काय ?बराच काळ पुढे सरकलेला असतो.... आतापावेतो पुष्कळशा संधी दारावर टिकटिक करत पुढे सरकलेलल्या असतात....वयाचा आकडा सुद्धा संधींना सीमारेषेच्या आत येऊ देत नाही... शिवाय ,"तुला काय कमी आहे आत्तापर्यंत काही कमी केले आहे का मी?आहे ते सर्व तुझंच तर आहे.....कशाला हवीए धावपळ?कर की ,थोडा आराम....असे सल्ले वजा संवाद घराच्या चार भिंतीत होऊ लागतात....का, तर तू एक स्त्री आहेस म्हणून....

    तुझ्या करिअरला महत्व नसतंच मुळी.... कालौघात जावई सुना येतात.... घर कसं माणसांनी भरुन जातं...छोटी नातवंड चिव चिव करत असतात....आजोबा रिटायर्ड झाले तरीही,आजी आजोबा सुखाने राहतील एवढी पेन्शन त्यांना मिळत असते.... मुलं-मुलगी , सून,जावई सारे कमावते असतात.....कोणाला काहीही कमी नसतं.....पण तुझं आईचं अंतःकरण ना!.... तुला चार सहा महिन्याला लेक घरी आली की साडीचोळीनं तिची पाठवणी करावीशी वाटते....नातवंडांचे लाड करावेसे वाटतात..... निमित्तानं जावयाला  कधीतरी कौतुकानं सूटबूट शिवावा वाटतो.... सासुरवाडीचा....कौतूक म्हणून....पण येथेही माशी शिंकतेच....काही फालतू खर्च नकोयंत आता.....त्यांच्या लग्नात झालंयं सगळं यथायोग्य आता काही देणं-घेणं नको....मुलगी परक्याचं धन....तिच्यावर कशाला हवाय खर्च ?...तू बिचारी गप्प बसतेस... मनातून दुखावली जातेस....मनाची कुचंबणा सहन करत....सबला बनण्याच्या तुझ्या प्रयत्नांवर जाणीवपूर्वक पांघरूण घालत....तू अबलाच कशी राहशील याचे प्रयत्न होत राहतात.... त्याची प्रौढी मात्र मिरवली जाते....का तर तू एक स्त्री आहेस म्हणून.... 

      तुझंही वय उतरणीला लागलेलं असतं...आर्थिक सूत्र तुझ्याकडे नसतात....आता तुझ्या सर्व गरजा वेळेवर भागवल्या जातात....मग तुला हातात रक्कम कशाला हवी आहे ? दिलीच तर त्याचा हिशेब मागितला जातो.....कारण तुला आर्थिक व्यवहारांचं निर्णय स्वातंत्र्य उरत नाही... काहीच आवश्यकता नाही याची....या सबबीखाली... तुझ्या हातात पैसा खेळू नये याची व्यवस्थित तरतूद होते...का तर तू एक स्त्री आहेस म्हणून.....

      उतारवयात तू ही शरीराने थकलेली असतेस....मनाने खचून जातेस.....आणि मुख्य म्हणजे तुझी आता गरजच उरलेली नसते....विरोध केलास तू, तरी त्याची किंमत काहीच नसते..... का तर तू एक स्त्री आहेस म्हणून.....

      मुलं मोठी होत राहातात.... त्यांची आकाशं विस्तारतात.....त्यांचे मार्ग सुध्दा बदलतात.....पण आई-वडिलांच्या पुंजीची बरोबरीनं हिस्सेदार होतात......"आता तुमचे असे किती दिवस राहिले  आहेत ? कशाला हवंयं तुम्हाला ऐश्वर्य ?" असं म्हणत, आपल्या पदरात गोडीगोडीनं काढून घेतात.....कारण ती या घरची कुलदिपकं असतात....मुलगी परकी....आणि मुख्य म्हणजे,ती एक स्त्री असते म्हणून.... 

       याही वेळी पूर्णपणे अबला ठरलेल्या तुला एक 'आई' म्हणून लेकीला काहीतरी द्यावं असं मनातून वाटतच राहतं.....तुझी इच्छा पूर्ण होणार नाही हे माहित असतानाही.....कारण तुझं आईचं अंतःकरण असतं..... तुझ्याच  हाडामासाची बनलेली तीनही मुलं...तुझाच एक भाग असतात....तू कधीच त्यांच्यात आपपरभाव करत नसतेस.... कारण तू एक स्त्री आहेस म्हणून...

      आपल्या साऱ्या मुलांशिवाय तुझं संसारचक्र पूर्ण होऊच शकत नाही....या वर्तुळावर तुला आपला नवरा,मुलं,सुना,जावई नातवंडं सारी हवी असतात....आपण स्वतःला झिजवून उभ्या केलेल्या संसार विश्वात तू कायम तुझ्या साऱ्या लेकरांना समान दर्जा देत असतेस....प्रत्येक पाखरावर सारखीच माया आणि प्रेम करत असतेस....त्यांच्याशिवाय तुला पूर्णत्व नसतंच....हे पूर्णत्व आल्याशिवाय  तू मोकळा श्वास घेऊ शकत नाहीस....कारण कारण तू एक स्त्री आहेस म्हणून....

     स्त्रीच्या जन्माला आल्यानंतर तुला,जन्मापासून ते वृद्धत्वा  पर्यंत काळानं बरंच काही शिकवलेलं असतं......दुर्दैवानं कधीतरी बंड करुन तू एकटी उभी राहिलीस  कुणाच्याही आधारा शिवाय..... तर,तर भोवतीच्या घाणेरड्या नजरांचा सामना तुलाच करावा लागतो.... संशयाच्या भोवर्‍यात तुलाच अडकावं लागतं.... कारण कारण तू एक स्त्री आहेस म्हणून .....

    नराधमांच्या हैवानी वृत्तीची शिकार तुलाच व्हावं लागतं नव्हे,तुला जीवंत ऊभं जाळलं जातं.....कारण तू एक स्त्री आहेस म्हणून....

       पावलोपावली, तू एक स्त्री आहेस याची जाणीव तुला करवून दिली जाते....जेणे करून तुझं मानसिक खच्चिकरण होईल....कारण तू एक स्त्री आहेस म्हणून....

अगं तू कितीही स्त्री-पुरुष समानतेचे नारे दिलेस,निशाणं फडकवलेस,तरीही ते फाडूनच टाकले जातात....कधी या पुरुषप्रधान समाजाकडून,कधी धार्मिक नियमांचा भंग होतो या सबबीखाली....तर कधी तू वरचढ ठरशील या धास्तीनं....आणि रुढी परंपरांच्या पगड्यांनं...कारण तू एक स्त्री आहेस म्हणून....

    कधी तू सबला बनलेली नसतेस..... तू कायम अबलाच असते....सर्व बाजूंनी हेळसांड होते ती केवळ तुझीच....कारण तू एक स्त्री आहेस म्हणून......

      महिला दिनाचे कितीही गोडवे गायलेस,कितीही आनंद उत्सव साजरे केलेस,तरी आपल्या समाजात असणाऱ्या अशा मनोवृत्तीचं ,तुला कायम कमी लेखणाऱ्या या प्रवृत्तीचं  समूळ उच्चाटण झाल्याशिवाय तुझा गौरव कधीच होणार नाही.....तुझा सन्मान तुझ्यापर्यंत कधीही पोहोंचणार नाही.... कारण तू एक स्त्री आहेस म्हणून....

  तरीही

  *जागतिक महिला दिनाच्या तुला भरभरुन शुभेच्छा*

*©*नंदिनी म.देशपांडे*.

*मार्च,७,२०२०*
*औरंगाबाद*

🌹🌹🌹🌹🌹🌹