बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

*मैत्रीचं झाड*

*मैत्रीचं झाड*

        सुलभा अचानक आजारी पडली म्हणून धावत पळत आपल्या लहान मुलांना घरी सोडून सुमती आपल्या मैत्रिणीला  भेटावयास आली. आपल्या लाडक्या मैत्रिणीची अवस्था बघून तिला डिस्चार्ज मिळेपर्यंत तिच्याजवळच राहाण्याचा मनोमन निश्चय केला तिने. कुठचेही रक्ताचे नाते नाही,एकाच परिसरात राहत असल्यामुळे दररोजच्या सहवासातून स्नेह जडत गेला दोघींच्याही मनांवर. आपसांतील स्नेहाची जागा प्रगाढ मैत्री ने कधी घेतली,हे त्यांना दोघींनाही कळलेच नाही.
   
        संगीता आणि वनिता दोघी बालपणापासूनच्या  एकत्र खेळणाऱ्या, शाळेत जाताना एकत्रितपणे जाणाऱ्या मैत्रिणी.शाळा सुटली आणि दोघींचे शैक्षणिक मार्गही बदलले.कालांतराने आपापल्या संसारात रमून गेलेल्या. बऱ्याच वर्षानंतर निमित्ताने पुन्हा एकदा भेटल्या,पण काय आनंद ओसंडून वहात होता त्यांच्या चेहऱ्यावर! एवढ्या वर्षांनी भेटूनही तीच लहानपणीची ओढ,प्रेम दिसले  दोघींमध्ये.
    
       महाविद्यालयीन शिक्षणासाठी श्री गेलाय थोडासा दूर गावी पण सुट्यांमध्ये घरी आला म्हणजे, केंव्हा एकदा मित्रांना भेटून येऊ असे होऊन जाते त्याला!
      
      उपरोक्त प्रत्येक उदाहरणात रक्ताचे नाते कुठेही नाही. जात, धर्म, पंथ यांचा मागमूसही नाही पण प्रत्येक व्यक्तीच्या मनात परस्परांबद्दल वाटणारी एक अनामिक शक्ती आहे.या शक्तीचा फार मोठा ताबा आहे या मनांवर. ही जी अदृश्य शक्ती आहे ना, तेच तर खरे मैत्र!

    आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भक्कम आधार देणारं, निर्भेळ मायेची सावली देणारं, एक झाड असतचं असतं. या झाडाची रुजवात होते ती बालपणीच इतरां बद्दल वाटणाऱ्या आपुलकीतून. त्याची मुळं जशी जशी खोल जात, मातीशी घट्ट बंध साधतात तशी, वरचेवर फांद्या फुटतात त्याला. आणि विस्तारत जातात. आपल्या सावलीच्या कवेत जास्तीत जास्त संख्येने इतरांनाही सामावून घेण्यासाठी.कुणाच्याही वयाचा विचार न करता, प्रत्येक माणसाला प्रचंड उर्जा देेणारं,हे झाड म्हणजे, आपली अविरत साथ करणारी,नकळत दृढ होत जाणारी व तिच्या शिवाय आयुष्य अर्थशून्य आहे ,याची जाणीव करून देणारी अशी एक शक्ती. या शक्तीचे नाव आहे मैत्री मैत्री आणि फक्त मैत्री!
     
     खरंच 'मैत्री', एक मऊ मखमली शब्द.कायम गोंजारत ठेवावा असाच. मुलायम असला तरीही मनाच्या प्रत्येक भावनेशी एकरूप होणारा. आपल्या अलवार भावनांवर हलकीशी फुंकर घालत तिला जोपासणारा. तर संघर्षमय काळात खंबीरपणे पाठीशी उभी रहात आधार देणारा. नि:स्वार्थ भावनेने ओतप्रोत भरलेला,पण आनंदाच्या क्षणांचीही सोबत करत आनंद द्विगुणित करणारा. आजन्म साथ करत निरपेक्षतेच्या वाटेवरून चालणारा.तर कौतुक करण्यात सर्वात समोर असणारा. वारंवार भेटी घडायला हव्यातच, याचा अट्टहास न बाळगताही आपलं मैत्र जपणारा. कोणत्याही औपचारिक पणाला फाटा  देणारा असा.
     
         मैत्री, अडचणीच्या
काळात भक्कमपणे दिलासा देणारी, त्यातून बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारी,अशी खूपच अश्वासक.तेवढीच पाठीवरून मायेचा हात फिरवणारी. किती किती रुपं सांगू या  मैत्रीचे!
        ‌
       मैत्री निभावण्यासाठी केवळ परस्परांमध्ये रक्ताचे बंध असावेतच असे अजिबात नाही. म्हणूुनच म्हणतात ना,देवआपल्या रक्ताच्या नात्यात छान छान लोकांना घालावयास विसरला असेल, तर अशा लोकांना नंतर तो  आपल्या मित्रांच्या रूपाने आपल्या आयुष्यात आणवून बसवतो.
     ‌
      खरं म्हणजे, 'मैत्री जपणे' हा एक संस्कार होय.मी सुरुवातीलाच म्हटलंयं तसं तो, इतरां प्रती वाटणाऱ्या आपुलकीतून मुलांच्या मनावर रुजवला जातो.अर्थात कुटुंब सदस्यांकडून. त्याला प्रेमळपणा चे, सदाचाराचे, निरपेक्ष भावनेचे खतपाणी घालत वाढीला लावावं लागतं.तो पर्यंत मुलांच्या जाणिवा विकसित होत जातात आणि समर्पणाच्या भावनेने मैत्री कशी जोपासावी?ती फोफावण्यासाठी प्रयत्न कसे असावेत? या साऱ्या गोष्टी हळूहळू आपोआपच कळावयास लागतात मुलांना.

    या मैत्रीच्या झाडाला नवीन नवीन पालवी फुटत जाते, त्याच्या या पालव्यांचा मजबूत फांद्यांच्या रुपाने विस्तार होत जातो. याच फांद्या म्हणजे, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मिळणारे निरनिराळ्या क्षेत्रातले, परिसरातले, जीवश्चकंठश्च मित्र मैत्रिणी.
   ‌
      या मित्र मैत्रिणीं मध्ये,अगदी लंगोटी यार,शाळेतील सवंगडी, महाविद्यालयीन आयुष्यात आलेले मित्र-मैत्रिणी, नोकरी-व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर तयार होणारे नवीन मैत्र, आपल्या घराच्या परिसरातील स्नेही, मॉर्निंग वॉक वगैरेच्या निमित्ताने तयार होणारे सवंगडी, सारख्या छंदातून, निर्माण होणारा मित्र परिवार अशा अनेकानेक क्षेत्रांतून या मैत्रीच्या झाडांच्या  फांद्या विस्तारतात.आपल्या छायेखाली अनेकांना सामावून घेतात. मैत्रीची शीतल छाया देतात आणि स्नेहाचा स्निग्धपणा देऊन, वपुं नी म्हटल्या प्रमाणे,या स्निग्ध सायीखालच्या दुधाचे रक्षण करतात.
     
     ‌‌सोशल मीडियावर तयार होणारी मैत्री ही एक संकल्पना हल्ली दृढ होत जाऊन आकार घेताना दिसते.
    
      खरोखरच हे सारे अनुभवताना मिळणारे समाधान अवर्णनीयच ! जीवनाला सुकर ,सोपे बनवत, त्यावर प्रेम जडवून ठेवण्यात सर्वात मोठी नि महत्त्वाची भूमिका कोणाची असेल तर ती मैत्रभावाची.
    
     प्रत्येकाच्या जीवनात मैत्री रसाचे फार फार महत्त्व आहे. मनुष्यप्राणी हा समाजशील प्राणी आहे याचे मैत्री हे द्योतक आहे. हे निर्विवाद पूर्ण सत्य होय.
        
      मैत्रीमध्ये नातेसंबंध नसतात असेच काही नाही.उलट मैत्रीपूर्ण नातेसंबंधाची पेरणी कौटुंबिक पातळीवर केलेली असेल तर, त्यातील गोडी वाढावयास मदतच होते. असे करताना नि:स्वार्थ वृत्ती आणि निरपेक्ष भावना यांचा संगम सदस्यांमध्ये असावयास हवा हे नाकारता येणार नाहीच.
   
      आई-बाबा हे मुलांचे मित्र-मैत्रिण बनू शकतात तसेच, पती-पत्नी दोघेही परस्परांच्या जिव्हाळ्याचे मित्र-मैत्रिण बनूच शकतात. असे असेल तर दुग्धशर्करा योग साधला जाऊन कुटुंबाची आदर्शत्वाकडे जाणारी वाट सोपी होत जाते.याशिवाय सासू-सुना, जावा-जावा,भाऊ- भाऊ, बहिण-भाऊ, बहिणी- बहिणी अशा सर्वच नात्यांत मैत्रीच्या स्निग्धपणा कायमच राहावयास हवा. त्यामुळेच नात्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन मुळ धरु लागेल. माणसाला घरची कुटुंबाची ओढ लागून राहिल. कुटुंब व्यवस्था बळकट करण्यासाठी ही फार महत्त्वाची ठरेल.

        मैत्रीपूर्ण वातावरणात कौटुंबिक पातळीवर पारदर्शकता निर्माण होते. ती खूपच महत्त्वाची आहे असे म्हणावेसे वाटते.

     अंतरीच्या तारा झंकारत निर्माण होणारा नाद म्हणजे मैत्री. दुधावरच्या साई मध्ये असणारी स्निग्धता म्हणजे मैत्री. अडचणीच्या वेळेला मदतीसाठी आलेली हृदयस्थ हाक म्हणजे मैत्री. फुलणाऱ्या ताज्या फुलांचा दरवळ म्हणजे मैत्री.  आकारमानातील बदलांमुळे यत्किंचितही फरक न पडता तेजाळणारी चंद्राची आभा म्हणजे मैत्री. त्याची शीतलता म्हणजे मैत्री. अशा अनेक नजाकतींचा संगम असणारी ही मैत्री. पण प्रसंगी निग्रही, अश्वासक, दिलासा दायक असते नक्कीच.

       पुराण काळापासून ते आजतागायत कायम राहिलेली आणि भविष्यातही कायम राहील असा हा मैत्रीभाव ध्रुव ताऱ्या सारखा अढळ रहात, आपल्या मनाची सोबत करत असेल, तर यासारखी दुसरी कोणतीही श्रीमंती नाही हे त्रिकालाबाधित सत्य होय....

       *©* *नंदिनी म. देशपांडे.*

👭👭👭👭👭👭👭👭