मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

आयुष्य.

*आयुष्य*

    माणसाचं जीवन किंवा आयुष्य म्हणजे शेवटी काय असतं....तर सोबत येताना घेऊन आलेल्या श्वासांचं गणित...‌.एका श्वासाचं अंतर वाढलं तर मांडलेल्या गणिताचं उत्तर शून्य रहातं.....

    तर हे श्वास आपण कसे,कोणत्या पध्दतीनं घ्यायचे यांचं नियोजन केवळ करणं आपल्या हातात....हेच श्वास अव्याहत घेत असताना या आयुष्याच्या प्रवासात सहवासात,सोबत असणाऱ्या लोकांशी,आप्त स्वकियांशी आपण कसे वागतो,बोलतो,त्यांच्या वर प्रेम आपुलकी चा वर्षाव करतो.....किती सत्कर्म करतो,किती प्रमाणात दुसऱ्यांना मदत करतो आणि किती प्रमाणात स्वतःशी प्रामाणिक राहून स्वतः आनंद घेतो आणि दुसऱ्यांना आनंद देतो....आनंदाच्या लावलेल्या या रोपट्याची जोपासना करत त्याच्या छायेखाली किती जणांना सामावून घेतो आणि स्नेहाच्या फुलांची शिंपण घालतो.....या सर्व निकषांवर आपणच आपल्या आयुष्याची प्रत ठरवत असतो....

म्हणूनच मित्र मैत्रिणींनो,ह्या श्वासांचे गणित मांडून ते यशस्वीपणे सोडवण्यातच खरे कसब,असे म्हणता येईल....हे कौशल्य ज्याला जमले तो आयुष्यात बाजी मारुन यशस्वी झाला...नि,ज्याला जमले नाही तो कायम जीवनानंदाला मुकला...असेच म्हणता येईल....
  
   शेवटी प्रत्येकाच्या श्वासाचा संग्रह संपला की उरणार तो फक्त शुन्यच असेल हे निर्विवादपणे पूर्णसत्यच....

     केवळ आपल्या मागे कांही दिवस तरी आपले नाव काढत आठवणीतील क्षणांचे स्मरण कोणी केले, तर आपण जीवंतपणी मिळवलेले सुखानंदाचे क्षण नंतर काही दिवस त्या उडालेल्या आत्म्याला एक समाधान देऊन जातात...हिच काय ती आपल्या आयुष्यात आपण कमावलेली पुंजी....बाकी काय!!!

बाकी मग आहेच,

जन पळभर म्हणतील हाय हाय।
मी जाता राहिल कार्य काय ।
जन पळभर म्हणतील हाय हाय ।

©
*नंदिनी म. देशपांडे*

🌹🌹

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

कृष्णसखा

*कृष्णसखा*

वसुदेव देवकीच्या सावळ्या नंदना ।
नंद यशोदेचा तू असशी लाला ।
गोपिकांचा रे नटखट कान्हा ।
राधेचा हा प्रिय सखा  ।
सुदाम्याच्या जीवलग दोस्ता  ।
द्रौपदीचा हृदयस्थ राजसा ।
कृष्णसखा तू मनभावना ।
शामल घननिळ शाम
सावळा ।
सौंदर्याचा तूच लडिवाळा ।
लावण्याचा मुर्तिमंत
पुतळा ।
कमल नयना रुप अव्दैता ।
शिरी डौले तो मोरपिसारा ।
गळा विराजे मौक्तिक माला ।
मधुर सुरिला ओठी पावा ।
ऐकूनि मंजूळ सूर
तयाचा ।
मुग्ध मोहरते आमुची
काया ।
अलौकिक रुप हे तुझे ईश्वरा ।
वेड लाविते आमच्या
जीवा ।
नानाविध ही रुपं गोपाळा ।
लुभविती आम्हा मनरमणा ।

कृष्णाष्टमी : २०१९.

©
*नंदिनी म.देशपांडे*

🦚🦚🦚🦚🦚🦚

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

नको नको रं पावसा.

*नको नको रं पावसा*

नको नको रं पावसा
नको देऊ रं हुलकावणी ।। धृ.।।

लावी आशा या जीवाला
लावी डोळेही तुझ्या वाटी
काळे सावळे हे मेघ
दडवी पाऊस आपल्या
पोटी
आभळात भरुन राही
वाऱ्यासवे धावत येई
पण जमिनीवर  बरसत नाही

नको देऊ रं हुलकावणी ।।१।।

सोबती आमचा तू पावसा
का रे रुसला रुसला आम्हा अंगणी न येता
विन्मुख का रे परतला
काय केला गुन्हा सांग
आम्हा देतसे शिक्षा
परतूनि ये आमच्या दारा

नको देऊ रं हुलकावणी ।।२।।

केली झाडांची कत्तल
ऊभी सिमेंट जंगलं
शानशोकी साठी घरं
पर केला अविचार
वरुण राजा हा रुसंल
ना पवनही साथ द्याया
कशापाई तो बरसंलं

नको देऊ रं हुलकावणी ।।३।।

शेजार देशीला तू
किती हाहाःकार केला
आम्हा देशात मातर
अखंड पाणी आमच्या डोळा
घास लागना रं गोड
सहवेना उष्मा घोर
वसुंधरेची हिरवाई
वाट तुझी रं पाहसी

नको देऊ रं हुलकावणी
।।४।।

©
*नंदिनी म.देशपांडे*

🌧🌧🌧🌧🌧🌧

बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

रक्षाबंधन

‌ *रक्षाबंधन*

*रक्षाबंधन*
उत्सव जिव्हाळ्याचा
भावा बहिणींच्या
पवित्र नात्यांचा...

*रक्षाबंधन*
भावा बहिणीनं
परस्परांना
अश्वस्थ करत
आजन्म साथ देण्याचा....

  *रक्षाबंधन*
आपल्या सुख दुःखाची
देवाण घेवाण करत
पाठीशी खंबीरपणे
उभं राहाण्याचा.....

*रक्षाबंधन*
बहिणीनं भावाचं
तर भावानं बहिणीचं
कौतूक करण्याचा....

*रक्षाबंधन*
भाच्यांबरोबर
लहान होत
आपलेच बालपण अनुभवण्याचा....

*रक्षाबंधन*
भाच्यांच्या विश्वात
रममाण होऊन
दंगामस्ती करण्याचा....

*रक्षाबंधन*
आयुष्यभर आधारवड
बनून राहिलेल्या आई वडिलांची सावली बनण्याचा....

*रक्षाबंधन*
चार क्षीण हातांची
आधार काठी बनून
सुरुकुतलेल्या हातांना
मुलायम प्रेमस्पर्श देण्याचा...

*रक्षाबंधन*
नात्यांचे अतूट मौक्तिक
सर्वार्थाने एका मालेत गुंफण्याचा....

*रक्षाबंधन"*
प्रतिकात्मक उत्सव
नात्यांना रक्षिण्याचा
नात्यात गोडवा पेरण्याचा....
नात्यात गोडवा पेरण्याचा....

©
*नंदिनी म. देशपांडे*
रक्षाबंधन,२०१९.

👱‍♀👱👱‍♀👱👱‍♀👱