रविवार, २८ जानेवारी, २०१८

***शब्द***

*शब्द*

🌿 प्रेम या शब्दा प्रमाणेच अडीच अक्षरी पण ,प्रचंड ताकदीची असणारी 'शब्द' ही संकल्पना . शब्द, हा सकारात्मक सामर्थ्याने आेतप्रोत भरलेला , तर याच सकारात्मक शक्तीच्या हातात हात घालून वावरताना दिसते नकारात्मक शक्ती सुध्दा  शब्दांमधून....

      एखादा शब्द दुःखीताला दिलासा देवून जातो , आणि एखादा व्यक्तीच्या वर्मीच घाव घालतो . त्याच्या ह्रदयाची शकलं शकलं करतो . कांही शब्द मनावर हळूवार फुंकर घालतात तर काही मनावर कायम आेरखडे उमटवतात ....

      कांही जण दिलेला शब्द प्रयत्न पुर्वक पाळतात तर कांही जण न जागण्यासाठीच शब्द देतात....पर्यायाने शब्दाला जागतो तो प्रामाणिक तर दिलेल्या शब्दाची खिल्ली उडवणारा व्यक्ती खोटा ठरतो.....

         एखाद्याच्या जिव्हेवरचा शब्द खरा होतो , तो तत्त्वनिष्ठ ,या उलट शब्दाला न जुमानणारा कृतघ्न म्हणून गणला जातो....
    
     शब्द वैभवाने श्रीमंत व्यक्ती ,प्रतिभावान तर दुर्बल शब्दवैभव ठेवणारा व्यक्ती कमनशीबी .....

      व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणी प्रमाणे ,काही जण शब्दांना जपून वापरतात , कारण त्यांना शब्दांच्या धारदार पणाच्या वृत्तीची आोळख असते , तर अशा प्रकारची आेळख नसणार्या व्यक्ती ,शब्दांना मुखा बाहेर सोडतात ते ,एखाद्या बाणासारखे ,एखाद्याचे मन विदीर्ण करण्या साठीच....

      शब्दांचा उपयोग फुलां सारखा करणारे आत्मसंतोषी प्रवृत्तीचे असतात तर , शब्द काट्या प्रमाणे पेरणारी माणसं विघ्नसंतोषी असतात असे म्हटले जाते.....

       कांही जण तर शब्दांशिवाय सुध्दा खूप काही सांगून जातात .....

     तात्पर्य , एकदा तोंडून बाहेर पडलेला शब्द फिरुन पुन्हा येत नाही , एखाद्याला शब्दातून धिर देता आला नाही तरी बेहत्तर , पण तो वाक् बाणा सारखे फेकू नयेत
हेच खरे.......🌿

    नंदिनी म.देशपांडे .
आॅगस्ट,२०,२०१७.
औरंगाबाद.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

शनिवार, २० जानेवारी, २०१८

*ओळख*

*आेळख*

  .   आपल्याला आयुष्यभर  सावली प्रमाणे सोबत करणारी असते ही आपली आेळख....कधी विचार केलाय का आपण बारकाईने ,आेळख ही नेमकी काय चीज आहे ?
    या सृष्टित पहिला श्वास घेतल्या बरोबर या भूतलावर आपली अशी एक खास जागा आपण व्यापून ठेवत असतो.....अमक्याचा मुलगा किंवा मुलगी,तमक्याची आणखी कोणीतरी..... नात्यांची लेबलं लाऊन सुरू झालेली ही आेळख परेड, आपण वयाने जसजसे वाढत जातो तशी आपल्यातील गुण,अवगुण,कलाकौशल्य बुध्दिमत्ता अशा गोष्टींशी हातमिळवणी करत ही आेळख वाटचाल करत रहाते आपल्या वाढीच्या गती बरोबर .

   आपणही सतत धडपडत असतोच की,आपल्यातील सकारात्मक वैशिष्ट्यां बरोबरच आपली आेळख तयार व्हावी या साठी....ती कायमच असावी म्हणूनही झटत असतोच.....किंबहुणा तसा प्रयत्न आपण आपल्या शेवटच्या श्वासा पर्यंत करत असतो.... ही ओळख या नाण्याची एक बाजू झाली....
    पण इतरांच्या नजरेतून सुध्दा आपल्या  नकळत ही आेळख बनत जाते हे पुर्ण सत्य नाकारता येणार नाही...

   तिला चांगली किंवा वाईट दोन्हीही बाजू असू शकतात.

अगदी काल परवाचीच गोष्ट ,माझ्या एका मैत्रिणीशी च्यॅटिंग करताना आम्हाला नव्यानेच शोध लागला की,तिचे 'हे' आमचे शाळामित्रच आहेत ....त्यांची आेळख पटवून देताना ती अगदी सहज म्हणाली,"अगं ते फार खोडकर होते लहाणपणी....म्हणून सगळेच आेळखतात त्यांना" .अर्थातच शाळेत असताना असणारी खोडकर पणाची त्यांची आेळख त्यांच्या हुशारी मूळे एका प्रतिष्ठित वकिला मध्ये बदलली होती....

         काही जणांना समोरच्या व्यक्तीचा चेहरा वाचता येतो.....म्हणजे, तो कसा असेल? स्वभावाने? प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा एक विशिष्ट सूर असतो....ज्या मूळे त्याच्या संबंधी आपण कांही तरी अंदाज बांधू शकतो....समजा एखादी व्यक्ती आपल्या नजरेला नजर देऊन बोलतो आहे असे लक्षात आले तर,तो आत्मविश्वास नि सच्चेपणाने बोलतोय म्हणजेच तो खरा असल्याची ही त्यांची आेळख...याउलट तो आपली नजर टाळत असेल तर ,नव्व्याण्णव गोष्टी बाद असण्याचीच शक्यता जास्त म्हणजे तो खोटरडा अशी आेळख बनू शकते...

         एखादा प्रामाणिक पणे आहे तसे शब्दांकन मांडत असेल तर,तो निरागस आणि मनाची निरागसता ही त्याची आेळख बनते....पण दुसरा कोणी त्याच गोष्टीला आणखी मसाला लाऊन चविष्टपणे त्याच गोष्टीचे वर्णन करत असेल तर,ती व्यक्ती "गप्पीष्ट"या पठडीत जाऊन बसते.....बरेच जण काहीही न बोलता आपल्या कृतितून सफलता प्राप्त करत आपली आेळख निर्माण करतात त्या मूळे ते "मेहनती" अशा स्वरूपात आपली आेळख सा-या  समोर आणतात...

               स्वतःच्या कला कौशल्यावर ओळख बनवणार्यात चित्रकार,लेखक यांच्या पासून ते गायक , वादक,खेळाडू इ.अनेक जण येतात...पण आपल्या कलेचे सातत्य कायम ठेवत ते बाकी लोकांच्या दृष्टीक्षेपात येणे गरजेचे असते....

          चेहर्यावरून आेळख ठरवण्यात कधी कधी गल्लत होऊ शकते....
प्रत्यक्ष सहवासातून समोरच्या माणसाची आेळख व्यक्ती गणिक बदलू शकते...

        बुध्दिमत्तेवरून बनणारी आेळख चिरःकाल टिकणारी असते...सर्वांत आनंद देणारी नि स्वभिमानाने मिरवणारी आपली आेळख म्हणजे आपल्याला आपल्या मुलांकडून ,त्यांच्या सकारात्मक गुणांवरून तयार झालेल्या आेळखीतून आईवडिलांना मिळते ना ती!..'ते'नाही का ?अमुक एका मुलाचे किंवा मुलीचे आईवडिल ? अभिमानाने उर भरून आणणारी ही आेळख आकाश ठेंगणे करणारी ठरते त्यांच्या साठी...आपल्या जगण्याचे सार्थक झाल्याची जाणीव निर्माण करते ती ओळख .....कृतकृत्यतेचे मोकळे श्वास देते ती ओळख.....

   तात्पर्य __आपण आपली आोळख स्वतः बनवत असताना किंवा दुसर्यां कडून ती नकळत बनली जात असताना आपण सन्मार्गावरच पावले टाकत चालणे केंव्हाही शहाणपणाचे असते........

  *नंदिनी म.देशपांडे*

nmdabad@gmail.com

रविवार, १४ जानेवारी, २०१८

तिळगुळ घ्या गोडगोड बोला

"तिळगुळ घ्या , गोड गोड बोला.",
   "चि. सौ......,
           ‌अनेक‌ उत्तम आशिर्वाद.पत्रास कारण की, काहीच दिवसांवर मकर संक्रांतीचा सण येऊ घातला आहे.या निमित्ताने या पत्रा सोबत आम्हा दोघांतर्फे तिळगुळ पाठवत आहे,त्याचा सर्वांनी  प्रेमाने स्विकार करावा......"
        अशा पोस्टाने आलेल्या पॉकेट मधील चारच हलव्याच्या दाण्यांतून अर्धा अर्धा दाणा करत, वाटून तोंडात टाकताना एक तिळ सात जणांनी कसा वाटून खाल्ला ही आईनेच सांगितलेली गोष्ट आठवायची...काय मजा यायची!!
       आज, संक्रांतीच्या दिवशी हमखास अशा पत्रांची,तर यातील तिळसाखरेच्या दाण्यांची आणि त्यातील प्रेमळ मायन्यांची आठवण झाली.
    तिळगुळ ,राखी पौर्णिमा,लग्न, दिवाळसण यांसाठी निमंत्रण वगैरे गोष्टीं साठी येणारी अशी पत्रे इतिहासात जमा झाली आहेत. येथून पुढे लहान मुलांना पत्रांच्या गोष्टी सांगताना 'खूप खूप वर्षां पूर्वी ' अशी सुरुवात करावी लागेल....
     व्हॉट्स ॲप आणि फेसबुकवर  सणावाराच्या त्याच त्याच मेसेजेसचा अजिर्ण होईल इतपत होणारा वर्षाव पाहताना नि वाचताना आज पत्र लिहिण्याची महती पटते....
    ‌पत्रांतील त्या ओळीं मधील ते प्रेम, त्यातून डोकावणारी ती प्रेमळ नजर ,त्यांनी केलेले कौतुक अशा कितीतरी गोष्टींना मुकलोय आपण.... पत्रांचा हा अनमोल ठेवा हृदयापासून जपून ठेवण्याची वाटणारी आस आपण हरवून बसलोय ही हूरहूर  कवटाळत उसासे टाकण्या खेरिज काही करत नाही आपण....
   ‌एक औपचारिकता म्हणून इकडचा मेसेज तिकडे आणि तिकडचा आणखी कुठे तरी असा बोटांनी यंत्रवत पुढे पाठवला जातो आपल्या मार्फत....त्यांचे वाचन करावे का?असा साधासा प्रश्र्न शिवत सुध्दा नाही आपल्या मनाला.....
     आपण यंत्रांच्या संपूर्ण स्वाधिन झालो आहोत हे लक्षात येऊ लागले आहे आता हळूहळू.....
     खरंच आपण 'रोबोट' यंत्र मानव बनलो आहोत अक्षरशः त्यात आत्मा आणि भावना यांना थाराच  उरलेला नाहीए काहीच.... अशीच धारणा या मानव रुपी देहाची बनत चालली आहे आताशी....
   ‌ पण असो,या जगरहाटीत फिरत रहायचे असेल तर या सारख्या बाबी अनिवार्यच म्हणायचे ....चालत रहायचे..... यंत्रवत....बाकी काही पर्याय आहे का?
  ‌ ‌चला,मी पण देते सर्वांनाच तिळगुळ ,
    ,*तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला,
   माझा तिळ सांडू नका नि माझ्याशी भांडू नका.....*
       *नंदिनी म. देशपांडे.*
         nmdabad@gmail.com
❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

*नव्याची नवलाई*

        कुटुंबात येणार्या नव्या पाहूण्याचे स्वागत अर्थात नवजात शिशूचे स्वागत करत असताना आपल्या सर्वांनाच निर्भेळ, निरागस , निखळ आनंद अनुभवायला येतो.तोच हर्ष आपण लावलेल्या रोपट्याला आलेले पहिले फूल बघताना होतो.तसाच आनंद दर वर्षीच्या पहिल्या पावसा नंतर येणार्या मृदगंधे मुळे तृप्त  झाल्यावर देखील येतोच.पेरते झाल्यानंतर नव्याने अंकूरणारे पीक शेतात बघताना बळीराजाच्या चेहर्यावर दिसणारा हर्षोल्हास असो , किंवा प्रतीभावंताच्या प्रतिभेतून साकारल्या गेलेल्या पहिल्या काव्य पंक्तीतून त्याला होणारा मोद असो. किंबहुना पाषाणाला आकार देत देत त्यातून तयार होणारे परिपूर्ण शिल्प बघताना शिल्पकाराच्या मनात दाटून येणारा भाव असो.
        ही सारी उदाहरणे म्हणजे नाविन्याचा ध्यास असणार्या मानवी मनाच्या जन्मजात नैसर्गिक प्रवृत्तीचे द्योतकच आहेत.
           आपण आपल्या स्वत:साठी सुध्दा काही खरेदी केली किंवा कोणी गिफ्ट म्हणून काही दिले आपल्याला तर ती केव्हा एकदा उघडून, उकलून बघतो असे होत असते अगदी.त्या शिवाय चैन पडत नाही. अशा वेळी वयाचे भानही न रहाता आपल्यातील बालक जागा होतोच होतो.
      नवीन घरात राहावयास जायचे असेल, तरीही ते कसे असावे?कसे असेल? तेथे आपले सामान आपण कसे लावणार? वगैरे गोष्टींचे मनोमन काल्पनिक चित्र आपण रंगवत असतो. म्हणजेच नाविन्याची आस असतेच मनात.
       आपण पारंपारिक वस्तू,प्रथा, चालीरीती इत्यादी अनेक बाबींचे कितीही भोक्ते असलो तरीही कधी ना कधीतरी कोणत्या तरी कारणामूळे प्रभावीत होत असतो.पाश्चात्तिकरणाच्या या जगात  आपल्याला सुध्दा त्याचा वेध घेत अनुकरण करण्याची प्रबळ इच्छा होऊच शकते.कितीही नाही ठरवले तरीही आपले मन काही स्वस्थ बसू देत नाही आपल्याला.याचे सर्वांत परिचित उदाहरण म्हणजे पोशाख. पोशाखाचे अनुकरण अगदी सहजपणे पटकन केले जाते.अगदी आपल्याही नकळत. हा झालेला फरक लक्षात येत नाही लवकर, आपण त्याला 'फॅशन' असे गोंडस नाव देतो !
        असेच काहीसे ब्रॅण्डेड वस्तूंच्या अट्टहासा पायी पाश्चात्य अशा बर्याच वस्तू खरेदी करतो आपण! हल्ली तर खूप मोठ्या प्रमाणावर '  वेस्टर्न कॉश्चूम आणि ब्रॅण्डेड वस्तू उपयोगात आणण्याची स्पर्धाच आली आहे असे वाटते.मोठे मोठे माॅल्स अशा अनुकरण प्रिय मनुष्य प्रवृत्तीला खतपाणीच घालण्याचे चोख काम बजावताना दिसून येतात.
     आपण केलेले अशा पद्धतीचे पाश्चात्यांचे अनुकरण आपण राजरोसपणे विसरतो की काय ?अशी पुसटशी शंका सुध्दा शीवत नाही मनाला, जेंव्हा आपण दिमाखाने म्हणतो की, आमचे नवीन वर्ष चालू होते ते गुढीपाडव्यापासून.जानेवारी पासून चालू होणारे नववर्ष आमचे नव्हे. आम्ही अजिबात शुभेच्छा देणार नाही वगैरे वगैरे....
      आपल्या संस्कृतीचा आदर आणि रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे हे निर्विवाद. पण दुसऱ्या कोणत्याही संस्कृतीला कमी लेखावे असे अजिबात नाही.हे चालू झालेले २०१८चे  नववर्ष म्हणजे पाश्र्चात्य नववर्षारंभ ,पण म्हणून काही ते नवे नाही का? आपणही त्यांनाच फॉलो करत नाही आहोत का?व्यावहारिक भाषेत आपण त्याचा उल्लेख नाही का करत? त्यामुळे कोणाचे काही नुकसान झाले आहे का? आपल्या महाराष्ट्रीयन नववर्षा प्रमाणे दररोजच्या व्यवहारात दिन विशेष किंवा तारीख लिहिणारी माणसं हाताच्या बोटांवर किंबहुना तेवढी तरी शोधूनही सापडतील का? या बाबत दाट संशय आहे.
       पाश्र्चात्त्यांचा असेल तरी हा त्यांच्या संस्कृतीचा एक भाग नव्हे का?हे नाकारणे केवळ अशक्य आहे.म्हणूनच आपले तेवढे चांगले , किंवा 'आपला तो बाळ्या,नि दुसऱ्याचं ते कार्ट' ही भुमिका घेणे योग्य आहे का?
      महाराष्ट्रा प्रमाणेच इतरही अनेक राज्यांत असे नवीन वर्ष त्या त्या परंपरे नुसार सुरू होते त्यांचा तिरस्कार आपण करतो का कधी?
       मुळात 'तिरस्कार' या शब्दामध्येच पुरेपूर नकारात्मकता भरलेली आहे.हा तिरस्कार करत करत तो आपण आपल्या अंगी रुजवतो आहोत हे आपण विसरतो पण ही फार ‌घातकच भावना आहे हे विसरून चालणार नाही.कोणतीही संस्कृती, पोशाख, प्रदेश ,आहार, जीवनशैली इत्यादी पातळींवर एखाद्याला विरोध दर्शविण्याने त्यात बदल होणार आहे का? तिचं अस्तित्व लयाला जाणार आहे का?असे घडण्याची शक्यता नगण्यच म्हणता येईल.पण म्हणून आपले निषेध युक्त मत मांडून फार महत्त्वाचा फरक पडू शकेल असेही म्हणता येणार नाही.आणि म्हणूनच एखाद्या गोष्टीवर कायम तिरस्काराची भाषा बोलणेही संयुक्तिक नाहीच.तुम्हाला आवडत नाही ना, मग नका करु व्यक्तिगत पातळीवर तुम्ही तिचा स्विकार,पण आपले मत मांडून इतरांना का आपण तसे करावयास भाग पाडायचे?
     ‌‌ विविधतेने नटलेल्या , सर्व धर्म समभावाचे तत्व पाळणार्या भारतीय नागरिकाला असे वागणे शोभते का? असा एक छोटासा पण महत्वाचा प्रश्न आपण स्वत:लाच करण्याची गरज वाटत आहे.मनोमन विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर नक्कीच नकारात्मक असे ल.
     म्हणूनच पाश्र्चात्य संस्कृतिचे वैशिष्ट्य असले तरीही १ जानेवारी पासून चालू होणारे नवीन वर्ष हे कायम नवीनच रहाणार आहे.त्याची नवलाई आपल्या सर्वांनाच वाटणार आहे.नवीन वर्षासाठी आखलेले असंख्य संकल्प पूर्ण करण्यासाठीचा प्रयत्नही प्रत्येक जण करणार आहेच.नववर्षाचे स्वागत दरवर्षी प्रमाणे तेवढ्याच उत्साहाने व जल्लोषात साजरे झाले आहे.सार्यांनी परस्परांना भरभरून शुभेच्छा देणे या गोष्टी ओघाने घडल्याच.....यांमूळे मानवी मनाला आलेली मरगळ दूर होत नव्या जोमाने वातावरणात उत्साह, चैतन्य,नाविन्य पसरणार हे नक्की.
       नव्याची नवलाई, ध्यास हा प्रत्येक मनाला व्यापून टाकणारा असतोच.त्यामूळे दरवर्षी नव वर्षाच्या स्वागताच्या साजरीकरणात अजिबात फरक पडत नाही हे ही तितकेच खरे.उलट आपल्या ज्ञानेश्वर माउलींनी म्हटल्या प्रमाणे 'हे विश्वचि माझे घर' या कल्पनेला मनात रुजवत अशा निमित्ताने संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी शुभेच्छा देत येणार्या प्रत्येक नाविन्याचा नव्याने शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.त्या नवेपणातील चांगले तेवढे स्विकारावे वाईट त्यागावे अशा दृष्टिकोनातून विचार करत नव्याचे स्वागत करावयास हवे.नव्यातील नवेपणाचा शोध घेत तो पुर्णत्वाला नेण्यासाठी हातभार लावण्याची आवश्यकता आहे.म्हणूनच  म्हणावेसे वाटते,
       न भारतीयो नवसंवत्सरोऽयं
        तथापि सर्वस्य शिवप्रद:स्यात् ।
        येतो धरित्री निखीलैव माता
        तत:कुटुम्बायितमेव विश्वम् ।।
     ‌‌यद्यपि यह नव वर्ष भारतीय नहीं है।
    तथापि सबके लिये कल्याण प्रद हो।
     क्योंकि संपूर्ण धरा माताही है।
     "माता भूमि: पुत्रोऽहं पृथ्वीण्या:"
      अंत एवं पृथ्वी के पुत्र होने के
  कारण समग्र विश्व ही कुटुम्ब स्वरुप है
       पाश्चात्य नववर्षारस्यहार्दिका:
       शुभाशाया: समेषां कृते ।।
         नंदिनी म. देशपांडे
          nmdabad@gmail.com
‌
     

मंगळवार, २ जानेवारी, २०१८

२०१७ , *आनंद सिंचन वर्ष*

           सहज म्हणून मनात आले,अरेच्चा,आज २३ डिसेंबर २०१७.म्हणजे या वर्षाला निरोप द्यायला केवळ एक आठवडा सातच दिवस उरलेत तर....किती पटकन संपले ना हे वर्ष ! हल्ली दर वर्षीच सरत्या वर्षाला निरोप देताना असेच जाणवते हे तेवढेच खरे...प्रत्येक वर्षीचे महिने,दिवस,तास,मिनीट,सेकंद तेवढेच असतात पण,आपण जास्त बिझी झालो आहोत म्हणून असे वाटते तर...
      मागे वळून बघण्या साठी वर्षभराचा आढावा घेऊ यात असे आले मनात,पार २०१६ च्या नोव्हें .मध्ये ठाण मांडले या मनाने आणि तेथून मग फ्लॅश बॅक ला सुरुवात झाली....
       माझे, "आठवणींचा मोरपिसारा" हे ६ नोव्हें,२०१६ ला प्रकाशित झाले.वाचकांच्या पसंतीस जसे जसे हे पुस्तक उतरु लागले होते तसे तसे फोन च्या माध्यमातून ,प्रत्यक्ष वाचकांच्या प्रतिक्रीयांचा पाऊस पडावयास सुरु झालेला....आपली पहिलीच साहित्यकृति जी अगदी सहजपणे लिहिली गेली आहे ,ती वाचकांच्या मनाला भावली आहे ,या प्रफुल्लीत करणार्या जाणिवेने या वर्षीच्या सुरुवाती पासूनच मनाचे पाखरु आनंदाच्या बागेत भिरभिरत,समाधानाच्या ,झाडांवर बागडत डोलत स्थिर होत होते. मन याच आनंद लहरींवर तरंगत असतानाच किंचित काळजीची किनार लावणारी घटना घडली.....
       आमच्या घरचे दोन मेंबर्स या वर्षी दहावीला होते,दोघांनीही वर्षभर खूप एकाग्रतेने सातत्यपूर्ण अभ्यास केलेला....त्या दोघांच्या परिक्षेप्रती त्या दोघां पेक्षा बाकीचे आम्ही सारे फार उत्साहवर्धक होतो....या दोघांपैकी एकाला अॅन्युअल फंक्शन च्या दिवशी परफॉर्मन्स स्टेजवर पायाला मोठा अपघात होऊन,मोठ्या आॅपरेशन ला सामोरे जावे लागले होते....पायाला पडलेले टाके आणि प्लास्टर यांमूळे हाता तोंडाशी आलेला परिक्षेचा घास कुठे सोडावा लागतो की काय ?अशा शंकेने मन पोखरत चालले होते....
     
        पण म्हणतात ना ,'ईच्छा तेथे मार्ग' आणि 'केल्याने होत आहे रे,आधी केलेचि पाहिजे' या तत्वाला खरे करुन दाखवणारा आमचा चेला,अशाही परिस्थितीत परिक्षेला सामोरे जात,त्यात चांगल्या प्रकारे यशस्वी पण झाला.काय आनंदाचा क्षण होता तो आम्हा सर्वांसाठी ! त्याच्या रिझल्टच्या त्या दिवसाचा.....त्याचे कौतूक करावे तेवढे कमीच ! असे वाटावयास लावणारा दिवस ठरला तो जून महिन्यातला.त्याच्या सहन शक्तिला आणि प्रयत्नांना सलाम करावासा वाटला त्या दिवशी....
      दुसरा आमचा मेंबर सुध्दा हार्ड वर्क करत सतत यशोशिखरं पादाक्रांत करणारा असाच होता.त्याचा दहावीचा रिझल्ट सुध्दा अपेक्षित असेच यश मिळवून देणारा पण आम्हा सर्वांनाच तोंडात बोट घालावयास भाग पाडणारा ठरला....९८% मार्क्स आत्ता पर्यंत आमच्या घरात कोणीच घेतलेले नव्हते...परिक्षार्थीने हे आवाहन लिलया पेलले होते.पण खरंच तिचे कौतूक करण्यासाठी शब्दही अपुरे पडत होते त्या अविस्मरणीय दिवशी !
        या आनंदी क्षणांच्या आगोदर कांहीच दिवस,आमचा एक फॅमिली मेंबर नियमानुसार आपली शासकीय सेवा पुर्ण करत सेवानिवृत्त झाला....सलग३३ वर्षे कार्यतत्पर प्रामाणीकपणे केलेल्या सेवेचा शेवटचा निरोपाचा दिवस खूपच अविस्मरणीय बनवला त्यांच्या इतर सहकार्यांनी....
      आपली सेवा हेच आपले दैवत या तत्वाला धरुन सुरु झालेली 'आॅफिस' नावाची ही सेवा मैत्रिण निरोपाचा दिवस जवळ येऊ लागला तसा, मनात गहिवर दाटून आणणारा होता....पण चांगल्या कामाचे फळ नेहमी चांगलेच मिळते असे म्हणतात तसे सार्यांच्या प्रशंसा पुर्ण उद्गारांनी दिलेला निरोप म्हणजे आपल्या निःस्वार्थ सेवेला मिळालेली पावतीच होय असे वाटल्यास मुळीच अतिशयोक्ती ठरु नये असे वाटावयास लावत कृतकृत्यता मिळवून देणारा दिवस ठरला तो.....
        मनःशांती मिळवून देणार्या या दिवसानंतर एका वेगळ्याच व वेळेच्या बंधनापासून थोडेसे लांब ठेवणारा दिनक्रम चालू झाला.या बदलत्या दिनक्रमाचे मनातून स्वागत करत, आम्ही हा आनंद मनसोक्त पणाने लुटत आहोतच.....कार्यबाहूल्या मुळे मुरड घालावी लागणार्या आवडीच्या कामांना प्राधान्य देत या पुढची सेकंड इन्निंग चालू ठेवायची हे 'ब्रिद' समोर ठेवत, निवृत्ती नंतरचा दिनक्रम मनाला खूप आनंद बहाल करत आहे....
       ठरवल्या नुसार पर्यटनाला प्राधान्य देण्याचा मानस प्रत्यक्षात आणण्याची सुरुवात झाली सुध्दा जुलै महिन्यापासून.....
      श्री व्यंकटेशाचे आशिर्वाद घेण्यासाठी पहिली ट्रीप ठरवली ती तिरुपति तिरुमला या रम्य अशा ठिकाणासाठी. तेथील पवित्र आणि मंगलमय वातावरणात चांगले आठ दिवस रमत रमत खूप समाधानाने घरी परतलो आम्ही त्या नंतर. 
....दरम्यानच्या काळात आणखीन एक आनंदाची गोष्ट घडली.आमचा एक मेंबर,ज्याने नेमकाच इंजिनिअरिंग च्या चौथ्या वर्षाला प्रवेश घेतला होता ,तो कॉलेजच्या कॅंपस इंटरव्ह्यू मध्ये सलेक्ट होत ,एका चांगल्या कंपनीमध्ये तिचे प्लेसमेंट होऊन कन्फर्म ऑर्डर घेण्यात तिने बाजी मारली होती.हा क्षण आम्हा सर्वांना खूपच अविस्मरणीय असाच होता. पदवी हाती येण्या  अगोदर छानशा नोकरीने पायघड्या घालण्याच्या या संधीचे ,आमचा हा भिडू नक्कीच सोनं करणार याची खात्री आहेच आम्हा सर्वांना.तिच्या मेहनतीने मिळवलेल्या या यशा मध्ये केवळ तिचाच वाटा आहे यात कोणतेही दुमत असूच शकत नाही हे सर्व मान्य सत्य होते.तिच्या या हक्काच्या कौतुकाची ती मानकरी आहेच नक्कीच.
       'मोरपिसारा' नंतर माझ्याही लेखणीने चांगलाच वेग घेतला होता.आत्ता पर्यंत वहीच्या कागदावर अधिराज्य गाजवणारे माझे शब्दांकुराचे रोपटे हळू हळू व्हॉट्स अॅप, फेसबुक,ब्लॉग यांवरही चांगलेच रुजले जात होते.यावर तग धरून रहावयाचे असेल तर,प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही हे कळून चुकले होते....ही सारी इंटरनेटची हत्यारे छोटी छोटी मुले खेळणी सारखी कशी काय उपयोगात आणतात याचे कुतुहल मात्र वाटू लागले.पण 'प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट' या तत्वानुसार मी वरच्या सर्व आघाड्यांवर बर्यापैकी रुळत आहे याचे द्न्यान मला होऊ लागले होते.आणि माझ्या बिझी बनण्याचे हेही एक कारण आहे याचा उलगडा झाला मला....
     'पर्यटनाला प्राधान्य' या घोष वाक्यावर सुरु झालेला वर्षाचा उत्तरार्ध तिरुपतिच्या धार्मिक टूर नंतर राजस्थान टूर साठी पर्यटन करावयास सज्ज झाला होता....सलग पंधरा दिवस पर्यंत अगदीच रिलॅक्स मुड मध्ये पर्यटनाचा आनंद घेणारी ही पहिलीच वेळ होती....नाही तर शासकीय सेवेत असे तोवर कायम आॅफिस कडे एक कान लावता ठेवत केलेले पर्यटन तेवढी मजा आणत नसायचे.....
     मजबूत सोनेरी ,पांढर्या पाषाणांनी बांधलेले शाही राजवाडे,त्यातील एकाहून एक सरस जुन्या मौल्यवान वस्तूंचे प्रदर्शन, ,शुभ्र संगमरवर उपयोगात आणून अप्रतीम सौंदर्ययुक्त शिल्पकला आणि कलाकुसर यांनी सजवलेले गड किल्ले, महेल जैन मंदिरं ,यांनी डोळे विस्फारावयास भाग पाडले होते...किल्ल्यांमधील शिशमहेल,जयपूरचे हवा महेल यांनी आश्चर्याने आचंबित केले होते.... जयपूरच्या जंतर मंतरमध्ये सुर्यप्रकाशाच्या ऊनसावलीच्या खेळावर गणिती तद्न्यांनी उभी केलेली घड्याळे आणि ग्रह तार्यांचे पंचांग या सर्व गोष्टी अक्षरशः माणसाला चक्रावून टाकणार्या आहेत....या सार्या गोष्टी बघून प्रसन्न चित्ताने एक नवी उर्जा साठवत घरी परतताना भरुन पावल्यासारखे झाले.या सर्व धामधुमीत नोव्हेंबर कधी उजाडला समजलेही नाही....
      नोव्हेंबरच्या मध्यानंतर एका शाळा मित्राच्या मुलीचे लग्न आणि दरवर्षी प्रमाणे शाळा मित्र मैत्रिणींचे स्नेहसंमेलन यांचा संपूर्ण दिवसभर आनंद घेत लहानपणी च्या आठवणींना उजाळा दिला ,विनोदबुध्दीच्या गप्पांमध्ये रममाण होत रिफ्रेश झालो सर्वच जण....
       याच भेटीच्या गप्पाष्टकांमधनं परतलोही नव्हते सारे जण तोच,या स्नेहभेटीला आवर्जुन उपस्थिती लावणारा आमचा एक शाळा मित्र आमच्या डोळ्यां देखत दुर्दैवाने नियतीच्या हवाली होत असतानाचे चित्र खूप क्लेशकारक ठरले....
       डिसेंबर महिना मात्र चैतन्याची पेरणी करतच उगवला.अनपेक्षितपणे एका सायंकाळी माझ्या 'आठवणींचा मोरपिसारा 'या ललितलेख संग्रहाला मराठवाड्याचा मानाचा असणारा सौ.सावित्रीबाई जोशी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे ही बातमी मला फोन वरुन सांगण्यात आली.....सहाजिकच कौटुंबिक आणि मैत्रैय पातळीवर आनंदयुक्त संवादांचा जल्लोश सुरू झाला.आम्हावर अभिनंदनाचा वर्षाव होत कौतूकाचा पाऊस बरसु लागला....मनस्वी कौतूक असणारे स्नेही प्रत्यक्ष भेट घेत,आनंद व्यक्त करू लागले.'आनंद गगनात न मावणे' म्हणजे काय याची प्रचिती अनुभवली....आठवणींचा मोरपिसारा लिहिल्याने आपल्या प्रतिभा कौशल्याचे सार्थक झाले आहे ही जाणीव सुखाऊन गेली....पुरस्कार वितरणाचा २०डिसेंबर हा दिवस निश्चित झाला आहे हे सांगण्यात आलेले होतेच....
        २० डिसें.उजाडला तोच चैतन्याचे लेणे परिधान करत.सोहळा अगदी झोकात साजरा झाला.पुन्हा एकदा अभिनंदन रुपी कौतूकाच्या वर्षावात न्हाऊन निघायला झाले....ठरवल्या प्रमाणे उबदार थंडीच्या संगतीने गरमा गरम चवदार जेवणाचा आस्वाद घेत,आठवणींचा मोरपिसारा साकारत असतानाच्या आठवणींना उजाळा देत प्रसन्नपणे या दिवसाची सांगता झाली...
अत्तर दाणीतील अत्तराचा फाया काढून घेतला,तरीही त्या सुगंधाचा दरवळ जसा रेंगाळत रहातो,तसाच या दिवशीच्या आठवणींचा दरवळ आज आठ दिवस होऊन गेले तरीही येतोच आहे आणि मन व वृत्ती यांना प्रफुल्लीत करत नवीन वर्षाचे,२०१८चे स्वागत आम्ही उद्या करणार आहोत हे नक्कीच....
      मागे वळून बघताना हे संपूर्ण वर्ष आनंदाचे सिंचन करत कौतूकाची पखरण करत करत पुर्ण झालंय हे लक्षात आले.मिळालेला पुरस्कार माझ्या स्वर्गवासी आईच्या स्मृतिंना अर्पण करत मी अत्यंत समाधानाने सरत्या २०१७ या वर्षाचे मनःपुर्वक आभार मानले.....
      * नंदिनी म. देशपांडे *
        
         nmdabad@gmail.com

♬♬☆☆♬♬☆☆♬♬☆☆♬♬☆☆