बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

कन्यादान.

मानवी आयुष्यात कन्यादाना एवढं पुण्य कशात नाही असे म्हणतात...याचाच अर्थ पोटी कन्येनं जन्म घेणं किती पुण्याई आहे बघा...
      कन्या, मुलगी घरात अवतरते ती 'लक्ष्मीचे' रुप असते असे म्हणतात...लक्ष्मीच्या पावलाच्या आगमनाने या घराण्याची भरभराटच होत जाते...हळू हळू ती सरस्वतीचा आशिर्वाद मिळवते आणि जिद्दीने आपल्या पायावर ऊभे रहाण्याचा अट्टहास ठेवते....
     हे साधत असताना ती घरातील सर्व सदस्यांच्या गळ्यातील ताईत बनते...भावंडात सर्वांत मोठी असेल ,तर वडिलांचा उजवा हात बनते...आईला घरकामात मदत करते...गृहिणीपदाची  वाट अजमावून बघण्याची आस मनी ठेवते...
      मोठी ताई असेल तर भावंडांची आईसारखी काळजी घेण्याचा प्रयत्न करते आणि लहान असेल तरीही भावंडांवर प्रेमाची पखरण करते...आजी-आजोबा यांची सेवा करण्यात कृतार्थता मानते...
      एकूणच मुलगी घरात आनंदी आनंद पेरत पेरत येते...

       हिच मुलगी लग्नाळू वयाची झाली की, भावंड तिला चिडवतात, 

ताई मला सांग, मला सांग, कोण येणार गं पाहूणे?

     ही ताई मग लटक्या रागाने 'मी लग्नच करणार नाही मुळी'असं म्हणते...पण मनात मात्र रुबाबदार राजकुमाराची वाट बघत असते...स्रीसुलभ भावना मनात नाचत रहातात ती स्वप्न बघण्यात रममाण होते...
      मनासारखा राजकुमार तिला मिळाला म्हणजे, मग ती, 

लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची....

असं गुणगुणंत रहाते...
       हात पिवळे होण्याची घटिका समिप येऊ घालते...मग हातभरून हिरवा चुडा आणि नाजूक मेंदीने रंगलेले आपल्या लेकीचे हात कौतुकाने बघून घरातील मोठी मंडळी,आणि तिच्या सख्या तिला म्हणत असतात, 

 पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा, वधु लाजरी झालीस तू गं सांगे तो चौघडा...

    अशाप्रकारे सनई चौघड्याच्या साक्षीने आपल्या घरची लाडली दोनाचे चार हात होत, नियंत्याने बांधलेल्या ब्रह्मगाठीत बांधली जाते...नवर्या मुलाला गळ्यात हार घालताना लाजेनं चूर होत नजरेनंच त्याच्याशी बोलते...
      
हळव्या तुझीया करात देता करांगुली मी 
स्पर्शावाची गोड शिरशिरी उठते ऊरी 
सप्तपदी मी रोज चालते तुझ्या सवे शतजन्मीचे हे माझे नाते...
      
ही नववधू असे मनातल्या मनात गुणगुणत असेल का?असा भास होतो...
 
      विवाह वेदीवर चढलेले नवरानवरी विवाह विधी पूर्ण करत या समारंभाच्या शेवटाकडे येऊ लागतात...आईचा ऊर आपल्या लाडकीची लवकरच पाठवणी करावी लागणार म्हणून राहून राहून दाटून येऊ लागतो...आपले भरले डोळे ती जाणीवपूर्वक लपवत असते...आणिक वरमाय असणाऱ्या आपल्या विहिणबाईंना विनवते...

ओटीत घातली मुलगी विहिणबाई 
सांभाळ करावा हिच विनवणी पायी...

मुलीचे आणि तिच्या स्वकीयांचे या हळव्या शब्दांनी डोळे पाणावतात...आपल्या लाडक्या सानुलीच्या विरहाने वधूपित्याचे मन मूक रुदन करु लागते...

     आता निरोपाचा क्षण आलेला असतो...वधूला आपले माहेर आणि तेथील माणसं आपल्याला दुरावणार या भावनेने सारखं वाईट वाटणं सहाजिकच असते...
    मनातून ती म्हणत असते, 

निघाले आज तिकडच्या घरी 
एकदाच मज कुशीत घेऊनी पुसुनि लोचने आई 
तुझी लाडकी लेक आपुले घरकुल सोडून जाई 
तव मायेचा स्पर्श मागते 
अनंत जन्मांतरी 
निघाले आज तिकडच्या घरी...

आईवडील आणि वधू या हळव्या क्षणांना सामोरं जात जात 
आई बाबा मुकपणे म्हणत असतात, 

जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा 
गंगा यमुना डोळ्यात ऊभ्या का...

     भरल्या डोळ्याने आपल्या लाडक्या लेकीची पाठवणी करताना आईबाबा कृतकृत्य नजरेनं लेक जावयाला शुभाआशिर्वाद देतात...

     वाजत गाजत नववधु उंबरठ्यावरचं माप ओलांडत सासरच्या घरी प्रवेश करते...सासरच्या घरी लक्ष्मीचे आगमन अगदी वाजत गाजत आनंदाने होते....
 सासुबाई म्हणतात ,

लिंबलोण उतरता 
अशी का झालीस गं बावरी 
मुली तू आलीस आपल्या घरी 
मुली तू आलीस आपल्या घरी...

    असा हा माहेर घरच्या लक्ष्मीचा सासर घरची लक्ष्मी या नात्याने होणारा प्रवास हुरहूर लावणारा पण मोठा गोड आणि हवाहवासा असतो...

      ती कुठेही असेल तरीही लक्ष्मीच असते...
पण आयुष्याच्या अनेक वळणांवर ती सरस्वती, दुर्गा, चंडिका, रेणूकाई, अंबाबाई,अशी शक्ती देवतेची नवचंडी रुपं धारण करत करत नवचंडीच्या अनेक रुपांतून आपल्या आयुष्याचा प्रवास करते...
न थकता, कोणत्याही तक्रारीशिवाय आणि अडचणींवर मात करत करत जिद्दीने यशस्वी होत जाते....

   कालच झालेल्या जागतिक कन्यका दिनाच्यानिमित्ताने एका स्त्रीच्या प्रवासाचा असा आढावा घ्यावासा वाटला...म्हणून हा लेखन प्रपंच...
वाचकांनाही आवडेल अशी आशा करते...

©️नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

गौरींचा निरोप समारंभ...

गेली तीन दिवस घरोघरी चालू असणारा गौरी आवाहन आणि पुजनाच्या सोहळ्याची आज सांगता....
        आपल्या घरी आलेल्या गौरींना सजवून तीन दिवस तिच्याशी हितगुज साधणारी गृहलक्ष्मी आज स्वतः  सात्विक सौंदर्यानं उजळून निघते...चेहर्‍यावर प्रसन्न हसरे भाव, मनात समाधानाचे तेज, घरात मांगल्याची शिंपण आणिक दारात रंगारंगांची सुरेख रंगावली मांडत आपल्या प्रसन्नमुखाने सुवासिनींना हळदी कुंकुंवाच्या निमित्ताने आपल्या गौराईंचा थाट बघण्यासाठी आमंत्रित करते...
     गौरीच्या रुपाने आलेल्या माहेरवाशिणींना आज निरोप द्यायचा आहे...आपली लेक लग्नानंतर पाहूणी म्हणून आलेली असताना तिला कुठे ठेवू अन कुठे नको असेच प्रत्येक आईला वाटते...पण ती चार दिवस मानाने आणि यथोचित पाहुणचाराने जेंव्हा तिच्या सासरी निघते तो क्षण खरे तर संमिश्र भावनांनी भारलेला...
        गौरीही लेकीचंच रुप घेऊन आलेल्या असतात...त्यांना निरोप तर द्यावा लागणारच ना...
      तिच्या सांगाती देण्यासाठी केलेले फराळाचे पदार्थ, खिरापत  प्रसाद म्हणून सुवासिनींना देताना या आईरुपी गृहिणीचा चेहरा कृतार्थ भावनेने ओतप्रोत असतो...गौरीचं - लेकीचं कौतूक इतरांकडून ऐकताना तिला गगन ठेंगणे न झाले तरच नवल!
     आपल्या लेकीचं परिपूर्ण रुप ती गौरींच्या माध्यमातून न्याहाळते...या घरची लक्षमी ही दिल्याघरी खूप सुखात नांदो, मुलाबाळांच्या गराड्यात राहो आणि भरभराटीने समृध्द होवो हिच मनोमन ईच्छा असते या गृहलक्ष्मीची...
      तिच्या येण्याने भरुन राहिलेले आपले माहेरही तिच्या पदस्पर्शाने आणि तिच्या वावरण्याने सदा आनंदी, समाधानाने, समृध्द होत राहो...धनधान्याच्या राशीं नेहमीच घरात नांदत्या राहोत...तिच्या मनातील समृध्द भाव आणि तृप्तता आपल्या माहेरावर कायमच परावर्तित होत राहो....दोन्ही घरी अशीच संपन्नतेने, कृतार्थतेने नटलेली राहोत अशीच मनीषा प्रत्येक आईची असते...
      जिथली वस्तू तेथेच शोभून दिसते तद्वतच माहेरघरी आलेली लेक चार दिवस पाहूणी म्हणूनच शोभून दिसते...तिचं खरं वैभव तिच्या सासरी वाट बघत आहे आणि आज आपल्याला तिला निरोप द्यायचाय हे ठामपणे मनाला समजवतानाची घालमेल चेहर्‍यावर उमटू न देता, सुवसिनींबरोबर कौतुकात मग्न अशी गृहलक्ष्मी आज थोडी हुरहुर घेऊन आपल्या गौरींनाही निरोप देते...अगदी हसतमुखाने तृप्ततेने आणि समाधानाने...तिच्याकडून पुढच्या वर्षी येण्याचे आश्वासन  घेत....
      असा हा गौराईंचा पुजन पाहूणचाराचा सांगता समारंभ थाटातच पार पडतो आणि नव्या जोमाने घरातील प्रत्येक घटकाला नवीन उर्जा,नवी उमेद आणि नवीन धनधान्यच्या राशींची घरघरांत उधळण करतो...
नकळत शब्द ओठी येतातच ते म्हणजे,

सर्व मंगल मांगल्ये 
शिवे सर्वार्थ साधके 
शरण्ये त्रिबंके गौरी 
नारायणी नमोस्तुते ॥

   ©️नंदिनी म.देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹🌹

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

घर म्हणून....

घर म्हणून....

      अगं पमा, पोळ्या अगदी मोजूनच कर हं....एखादी जरी उरली तर अक्षरशः टाकून द्यावी लागते...डस्टबीन मध्ये, नको वाटते गं अन्न असं टाकून देणं....
     हे माझं दररोजचं ठरलेलं वाक्य सकाळी पमा पोळ्यांना आली म्हणजे....
      ताई, असू द्या एखादी जास्त, घर म्हणून असावी...तिचंही हे ठरलेलं वाक्य मला मुःखपाठ झालं होतं...
        या वाक्यासरशी मी कितीदा तरी जुन्या आठवणींत पोहोंचत असायची....
      "भरल्या घरात अन्नाचे डबे कधीच रिकामे असू नयेत...घरम्हणून थोडे अन्न तरी शिलकीत हवेच...पैपाहूणा केंव्हाही येतो एखाद्या माणसाचं अन्न असावंच...अचानक आलेलं एखादं माणूस संपादायला हवं दररोजच्या आपल्या स्वयंपाकात..."
 माझी मोठीआई, (आजी)नेहमी सांगायची असे...
     ते अन्न नीट ठेवले जायचे दुसरे दिवशी घरकाम करणारी मावशी आनंदाने घरी घेऊन जायची ...नाहीतर आल्या आल्या नाश्ता करुन मग कामाला लागायची....वाया जात नसायचं हे नक्की....
    आईचा पण हात मोठाच होता स्वयंपाकात...भट्टी चालू असताना कितीही जणं आले तरी काही कमी पडायचं नाहीच...उलट प्रत्येकाला जेऊन जाण्याचाच अग्रह असे तिचा...जेवण करुन तृप्त झालेला पाहुण्यांचा चेहरा बघून आईला फार समाधान वाटायचे...आता वाटतं खरंच, आईच्या हाताने कितीतरी अन्नदान घडले...पदरी साचलेले तेच पुण्य तिला शेवटी कामाला आले असणार नक्कीच....
       माझ्या सासुबाई, कायम चार माणसांच्या घरात राबणाऱ्या...स्वयंपाक गृहाच्या सर्वेसर्वा...खेडे गावात बारा बलुतेदारांपैकी दररोज कुणी ना कुणीतरी वाढण घेऊन जावयास यायचेच...या माऊलीने कधीच कोणाला विन्मुख पाठवल्याचे मला आठवतच नाही...
     उलट आनंदाने अन्नदान करत कृतकृत्य भाव विलसत असायचा त्यांच्या चेहर्‍यावर!
       उरलेच अन्न तर सकाळी गायींच्या गोठ्यात जायचे...पण वाया अजिबात नाही...
      काटकसरीने संसार करत उभ्या केलेल्या आमच्याही संसारात कधी कोणता पाहूणा उपाशीपोटी किंवा अर्धपोटी राहिल्याचे स्मरत नाही...
"अतिथी देवोभव" या मंत्राचे पुरस्कर्ते आम्ही, प्रत्येकाचा साग्रसंगीत पाहूणचार झाला पाहिजे याच संस्कारात दोघेही वाढलेलो....अन्नधान्याची कायमच बरकत असायची...
 उरलं शिळं तर स्वतः खाण्याची किंवा कुणाच्या तरी मुखात जावे अन्न, ही मनोवृत्तीत जोपासत ,अन्नापेक्षा काही मोठे नाहीच ही भावना बाळगणारे आम्ही...वाया कसे जाऊ द्यावे वाटेल?
      पण हल्ली कितीही कमी करा उरतच थोडंतरी...आता पुर्विसारखा गोठा नसतो दारी...  प्रसंंगी घरकाम करणारी मावशी आपण आपल्या पंक्तीला घेऊन  बसतो,आपण जेवावयास...उरलेलं घेऊन जाता का?म्हणण्यासाठी जीभही रेटत नाही...का म्हणून त्यांना शिळं विचारावं हा प्रश्न आपल्याच मनात उभा रहातो...बाहेर शब्द पडणं केवळ अशक्य...मग वाया जातंचं...
      कधी कधी आपण आपल्या ताटात वाढून घ्यावं, कारण आपलं ठेवणं अगदीच व्यवस्थित असतं, अगदी फ्रीज मध्ये वगैरे....पिझ्झा, बर्गर, पाव हे विकत आणून खाण्याचे पदार्थ किती दिवसाचे शिळे असतात कोण जाणे?हा विचार डोक्यात घोळतोच अशा वेळी...त्या पेक्षा कालचीच बनवलेली पण नवा अवतार धारण केलेली आपली फोडणीची पोळी काय खमंग आणि चवदार लागते!तोंडाला चव आणते बापडी, तिला शिळी कशी म्हणणार?
      रात्रीच्या वेळी कधीतरी झोपच येत नाही...बहुदा जेवण लवकर झालेलं असतं...मग रात्री भुक लागल्या सारखी वाटते, उरलेली एखादीच दुधपोळी कुस्करून खाल्ली की भुक शमते आणि झोपही शांत लागते....
 कधी कधी घरात डायबेटिस चा पेशंट असेल तर त्याला रात्री बेरात्री शुगर कमी झाल्याचेही लक्षात येते, पटकन उरलेली एखादीच पोळी साखरअंबा,जाम, लोणचं, किंवा तूप साखर यांच्या सलगीने रोल करुन खाल्ल्यास केवढा तरी आराम मिळतो....अशा वेळी लक्षात येतं हे "घरम्हणून" असावं घरात याला केवढा अर्थ आहे!
   
        हे केवळ अन्नाच्या बाबतीत...पण एकूणच घरातील  डब्यांमधील चीज वस्तू कधीच अगदीच संपवून टाकू नयेत, घरम्हणून पुनःश्च आणेपर्यंत थोड्या तरी असूच द्याव्यात डब्यात हे आईचं वाक्य कायम स्मरणात आहे आजही..."नाही नाही" असे कधी म्हणू नये आणि दुसऱ्या पुढे हात पसरायची वेळ येऊ देऊ नये हेच एका उत्तम
गृहिणीच्या यशस्वीतेचं गमक आहे यावर माझाही विश्वास आहे हे मात्र खरे...
तुम्हाला काय वाटते?

©️नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹🌹

बुधवार, ६ सप्टेंबर, २०२३

शिक्षक दिन, 2023.

काल आमच्या काही मैत्रीणींच्या गप्पा चालू होत्या,शिक्षक दिन असल्याने ओघानेच त्या विषयावर गाडी आलीच...आमच्या लहानपणीच्या आठवणींना, त्यातही शिक्षक दिनाच्या दिवशी आम्ही शाळेत केलेल्या धम्माल गमती जमती सांगताना प्रत्येकजण भरभरुन बोलत होती..
      आजच्या दिवशी,सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला नमस्कार करत, त्यांच्या प्रति आदर व्यक्त करणं,सर्व शिक्षकवृंदांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेणं...त्यांच्या कौतूकाची नजर आपल्यावर पडली की, चेहरा खुलून जाणं हे सारं आठवलं...
      याच दिवशीची आणखी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आठवण म्हणजे, आम्हा विद्यार्थ्यांकडून "स्कूल डे " साजरा होत असे...
   एवढा एक दिवस आम्ही विद्यार्थी शिक्षक शिक्षिकेच्या भुमिकेत प्रत्यक्ष वावरत शाळेचा प्रत्येक विषयाचा तास वाटून घेत असू....काय मज्जा यायची! आपला तास पार पडेपर्यंत जाम टेन्शन असायचं...पण छान वाटायचं...बरंच काही शिकावयास मिळायचं, बरेच अनुभव मिळायचे आणि मुख्य म्हणजे,आमचा आत्मविश्वास वाढावयास मदत होऊन आत्मभान यायचे...आत्मसन्मान साधला जायचा...

     हे झालं आमच्या पिढीचं बालपण!खरोखरच आदर्श ठरावेत आणि आदर्शाच्या मार्गावरुन बोट धरुन चालवणारे होते त्यावेळचे बहुतांशी शिक्षक वृंद...अत्यंत साधेपणात मुर्तीमंत सात्त्विकता,विद्यार्थ्यांप्रति अत्यंत जिव्हाळा आणि प्रत्येक विद्यार्थी घडवण्यात त्यांची तळमळ त्यांच्या धाटणीचे कौशल्य या साऱ्या गोष्टी विद्यार्थ्यां साठी  अनुकरणप्रिय असायच्या...
       विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हा एक महत्त्वपूर्ण संस्कार असायचा...त्याची किंमत शब्दांत किंवा पैशात होणं अगदीच दुरापास्त होतं....शिकवणी किंवा ट्यूशन हे आज असणारे  परवलीचे शब्द अर्थशून्य होते....
       मुळातच शिक्षकीपेशाला,त्यांच्या संस्कार वर्गांना आणि विद्यादानाच्या त्यांच्या निष्ठेला कोणताही पर्यायच असू शकत नव्हता...
     शिक्षकांचे अध्यापन कौशल्य एवढ्या प्रचंड ताकदीचे होते,की त्यांच्यामुळे संबंधित शाळेचे नाव भरभराटीला यायचे...
      खरोखर नतमस्तक व्हावेसे वाटते ते अशा शिक्षकांसमोर!
धन्य ते शिक्षक आणि धन्य ते विद्यार्थी  असे समजले जाणाऱ्या पिढीचे आम्ही विद्यार्थी...आम्हाला याचा सार्थ अभिमान आजही वाटतो आणि म्हणूनच आम्हा मैत्रीणींच्या गप्पांनाही कढ येत गेला या विषयावर बोलताना अगदी!

      ओघानेच आजच्या शिक्षकांचा,विद्यार्थ्यांचा आणिक शैक्षणिक पध्दतींवरही नकळतपणे प्रकाशझोत पडत गेला...आज विद्यार्थी, शिक्षक आणि तिसरा महत्वाचा घटक म्हणजे पालक हे तीनही या शैक्षणिक क्षेत्राचा अनिवार्य भाग आहेत...
       पूर्विच्या काळी पाल्याच्या कौतुकासाठी किंवा त्याच्या तक्रारी साठीच कधीतरी पालकांना शाळेत बोलावले जायचे...पण हल्ली पालकांची आर्थिक संपन्नता आजमावणे हाच एकमेव उद्देश ठेवत पाल्याच्या अगोदर पालकाची मुलाखत होते...पालक शाळेतील शिक्षकांपेक्षा शाळेचे नाव/ इतर सोयी बघून मुलाला शाळेत घालतात...अध्यापन कौशल्यावर आधारित शिक्षक निवडण्यापेक्षा 'डोनेशन' म्हणून जास्तीत जास्त 'दाम'देणारा गृहस्थ शिक्षक म्हणून नेमला जातो...
       मुल्याधिष्ठित नेमणुकी ऐवजी आणि शिक्षणा ऐवजी, गोंधळाधिष्ठित वातावरणात शाळेला सुरुवात होते...भपकेबाज पणावर गुणांपेक्षा कितीतरी भर असतो बर्‍याच शाळांचा....अगदी बोटावर मोजण्या इतपतच शाळा किंवा शिक्षकही औषधाला उरले आहेत...
       मग अशावेळी "आडातच नाही तर पोहोर्यात कसे येणार"?अशी सारी परिस्थिती दिसते...

    मुळात शिक्षकांना प्रशिक्षित करुन मुल्ये काय असतात?गुणाधिष्ठित शब्दाचा नेमका अर्थ, संस्कार आणि त्याचे सामाजिक स्थान, भाषा, व्याकरण,भाषेची शुध्दता म्हणजे काय?किंवा विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत वर्तन म्हणजे काय? शिकवावयास हव्या, तरच त्यांचे योग्य परावर्तन मुलांच्या मनावर पडेल...
     
         याचा अर्थ सरसकट असेच नाहीत असे अजिबात नाही पण यांचे प्रमाण मात्र नगण्यच असावे असे आज चित्र दिसते....शिवाय आपली संपूर्ण शिक्षण पध्दती ही "कोचिंग क्लासेस ",नामक वाळवीने पोखरुन निघाली आहेत...पैसा फेकला की कोणतीही गोष्ट अगदी सहज मिळते ही भावना वाढीस लागून शाळा ही केवळ परीक्षाकेंद्रेच आहेत की काय?असे खरे वाटणारे विदारक सत्य आहे दिसून येते.....
      आपल्या पाल्यांना (चांगले)?
शिक्षण देण्याच्या आणि भारंभार क्लासेस लावण्याच्या नादात पालक म्हणजे पैसा कमावणारी सजीव यंत्र, पाल्य म्हणजे मान हलवणारी बैलं आणि शिक्षक म्हणजे शाळेतील एक शोभेची वस्तू किंवा शिकवणे सोडून इतर भारंभार कामं कागदावर दाखवत निधी जमवणारे मशीन बनले आहे या कणभरही अतिशयोक्ती वाटू नये ही आजची शैक्षणिक पध्दतीची शोकांतिका....
   का म्हणून कोणाला आजच्या शिक्षक दिवसाचे महत्व वाटावे?
का म्हणून या दिनाचे सोहळे साजरे व्हावेत?

     एकूण या पध्दतीतील सर्व घटकांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे..
     अगदी मोजक्या म्हणता येतील अशा काही शाळा आजही आपली पत टिकवून आहेत त्यात भरपूर वाढ होणं फार गरजेचं आहेच...
     शिक्षणाचं बाजारीकरण थांबवून त्याला प्रेम वात्सल्याचं खतपाणी घालत जिव्हाळ्याची भावना 
मनापासून अर्पण करतील यातील सारे घटक तर, या क्षेत्रातील चमचमणारे तारे हे हिर्यांच्या लखलखीने तेजाळून निघतील असे नक्कीच म्हणावेसे वाटते...

शिक्षक दिन. 
सप्टेंबर.5,2023.

©️ नंदिनी म. देशपांडे. 
 औरंगाबाद. 

🌹🌹🌹🌹🌹🌹