मंगळवार, १६ एप्रिल, २०१९

मनोबोध.

मायबोली मराठीतील एक अलौकिक महाकाव्य,

         *मनाचे श्लोक*

       मनाचे श्लोक या अलौकिक काव्याची रचना, श्री समर्थ रामदास स्वामींच्या हस्ते महाराष्ट्राच्या मध्ययुगीन काळात झाली आहे असे मानले जाते. या रचनेचा निश्चित असा काळ कोणता हे सांगता येणार नाही. पण यांच्या निर्मितीसाठी एक तात्कालिक कारण किंवा प्रसंग निश्चितच घडला होता. तो असा....

      दरवर्षी चाफळ या गावी उत्सव साजरा करण्यात येत असे यासाठी शिवरायांच्या दरबारातून धान्य रूपाने नियमित मदत येत असे पण त्या वर्षी नोकरशाहीच्या औदासीन्यामुळे किंवा कामचुकारपणा मुळे ही नियमितपणे येणारी मदत उत्सव समिप आला तरी चाफळ या गावी पोहोचली नव्हती. येणारा उत्सव कसा पार पडेल या चिंतेने सर्व भक्तांना ग्रासले होते. पण समर्थांना मात्र सर्व सामान्य लोकांना रामभक्तीचा उपदेश करुन सर्वांनाच या देवकार्यात सहभागी करवून घेण्याची ही एक नामी संधीच वाटली. त्यांनी आपला हा विचार प्रत्यक्ष उतरवण्यासाठी एकाच रात्रीतून शांत वेळी  आपला एक शिष्य कल्याण याला २०५ श्लोक वर्णन करून सांगितले. आणि एकमेवव्दितीय अशा मनाच्या श्लोकांची निर्मिती,समर्थ रामदास यांच्या हातून घडली.यातील सर्व श्लोक  भुजंगप्रयात या वृत्ता मध्ये बांधले गेलेले आहेत.या श्लोकांना गेयता प्राप्त आहे.

       या श्लोकांचे स्तवन खड्या आवाजात करावे आणि भिक्षेचे आवाहन करत त्या भिक्षेवर दर वर्षी प्रमाणे उत्सव साजरा करण्यात यावा हे त्यामागचे मुख्य प्रयोजन होते.

     त्यावेळी असणाऱ्या सर्वच पातळीवरील अराजकत्वाच्या परिस्थितीत लोकाभिमुख वृत्तीने समाजाचे पोषण व्हावे यासाठी सर्वच संतांनी वसा घेतला होता.त्याच परिस्थितीत,

        मराठा तितुका मेळवावा।
       महाराष्ट्र धर्म वाढवावा।

अशा ओजस्वी वाणीतून समर्थ रामदासांनी समाजात चैतन्य पसरवले होते.....

   अशा या अलौकिक श्लोकांपैकी काही श्लोकांचे थोडक्यात निरुपण मांडण्याचा मी  प्रयत्न करणार आहे....
आपल्या"*पुष्पमाला*" या सदरातून....
  
     सर्वांना हे भावतील अशी अपेक्षा व्यक्त करते....

🌷🌷🌷🌷🌷🌷

*मना सज्जना भक्ति पंथे
       चि जावें।*

     समर्थांनी संपूर्ण मनाच्या श्र्लोकांची रचना ही मानवी मनाला उद्देशून केली आहे.मानवी मनाशी त्यांनी साधलेला तो एक संवाद आहे...

      त्यांनी रचलेल्या २०५ श्लोकातील दुसऱ्याच श्लोकाची ही पहिलीच ओळ....

     समर्थ रामदास मानवी मनाला खूप प्रेमाने गोंजारत उपदेश करताना दिसतात.त्यांनी,समस्त मानव जातीच्या 'मनाला' 'सज्जन' अशी उपाधी दिली आहे.त्यांच्या मते आपले मन हे मुळचे सज्जन प्रवृत्तीचेच असते... किंबहुना संस्कारक्षम मन असणे हेच सज्जन माणसाचे एक प्रमुख लक्षण आहे.मनाला जर'दुर्जन' संबोधले असते तर ते अपरिवर्तनीय किंवा संस्काराभिमुख राहिलेच नसते....

    प्रत्येक व्यक्तीला आपला जीवनविकास साधून घेण्यासाठी आपल्या मनाच्या माध्यमातून भक्ति,प्रेम,श्रध्दा यांच्या मार्गावरुन चालावे लागतेच.या प्रवासातून निश्र्चितच जीवनाचा विकास साधला जातो.ईशवराचे नामःस्मरण,भजन, गुणवर्णन इ. भक्तिची साधनं आहेत आणि यांच्या उपयोगाने ईश्वराशी एकरुपकत्व साधता येऊ शकते...म्हणूनच समर्थ भक्तिमार्गा वरुन चालण्याचे आवाहन मानवी मनाला करतात....

    हे मना,भक्तीमार्गाचे आचरण केल्यास तुला ईश्र्वराचे दर्शन आपोआप घडेल.हा मार्ग जीवाला ईश्वरापर्यंत घेऊन जातो.भगवंत भक्तीत रस निर्माण करणारे मन तयार करण्यासाठी देहाची कर्मे ही शुद्ध व पवित्र असलीच पाहिजेत असा समर्थांचा कटाक्ष आहे.....

क्रमशः

©  * ‌नंदिनी देशपांडे*

🌸🌸🌸🌸🌸

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा