शुक्रवार, १२ एप्रिल, २०१९

चैत्र गौर.

*चैत्र गौर*

चैत्राच्या शुध्द तृतियेला घराघरांत आगमन झालेली ही गौर,खरं म्हणजे त्या घरातील गृहिणी आणि मुलींची मैत्रिण बनून येते....गृहिणीला पार तिच्या माहेरी नेऊन सोडते....तर,मुलींना आपली मैत्रिण बनवते...तिच्या परिक्षा संपण्याची वाट बघते...तिच्या बरोबर सजण्या धजण्याची आस ठेवते...
हिच सखी चैत्र गौर आपल्या आवडीच्या पदार्थांची आवड प्रदर्शित करते....ही तिची एकटीची आवड न रहाता,अख्ख्या घराच्या जिभेचे चोचले पुरवते... बेसनाचे लाडू काय,शेवचकली काय,करंजी साटोरी काय किंवा वाटली डाळ, चवदार पन्हे एवढेच नव्हे तर भिजवलेले हरभरे आणि कुरकुरीत मुरमुरे...
नेमक्याच संपलेल्या परिक्षेतून उसंत मिळालेली मुलं यथेच्छ ताव मारताना दिसतात या पदार्थांवर....
गौरी समोर आरास करण्यात सर्व बालगोपाळ रमून जातात...त्यांच्या कलेला,कल्पकतेला वाव देणारा हा सण मुलांबरोबरच मोठ्यांचाही उत्साह व्दिगुणित करतो...परस्परांमध्ये संवाद घडवतो.... संपूर्ण घर आनंदाने भारुन टाकतो.....
म्हणूनच या सखीची आपण दरवर्षी आतुरतेने वाट बघत असतो....हो ना!

*नंदिनी म.देशपांडे.*

१०, एप्रिल २०१९.

🥭🍉🍓🍍🍇🍒

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा