शनिवार, २८ जुलै, २०१८

हासू ,एक निसर्ग दत्त अलंकार.


*हसू, निसर्ग दत्त  अलंकार*

        दररोज    सकाळी उठल्यानंतर फुरसतीच्या वेळात मोबाईल हातात घेतला की, की ढीगभर तरी गुड मॉर्निंग चे मेसेजेस असतात. त्यात किमान पाच-सहा मेसेजेस तरी “स्माईल” या विषयावर .असतातच. त्यातून हसू येणे याचे वेगवेगळ्या पद्धतीने महत्त्व पटवून दिलेले असते.तसेच हसणे ही प्रक्रिया मानवी आरोग्यासाठी किती उपकारक आहे, याची जाणीव करून दिलेली असते.
      थोडेसे मंथन केले तर असे वाटते, अरे हे सारं आपल्याला माहीतच आहे , यात नवीन ते काय? पण मानवाच्या याच हसण्याला शास्त्रीय आधार किती आहे? याची हास्यक्लब सारख्या सामाजिक संस्थांच्या कडे बघितलं की खरोखर महती पटू लागते. तसे बघितले तर हसू आणि आसू या आयुष्याच्या दोन बाजू. जशा एकाच नाण्याच्या दोन बाजू. काळाच्या हाती असणार्‍या नियती रुपी बाहुलीने हे नाणं जसं खेळवलं असेल त्यानुसार आपल्या आयुष्यातील कोणती बाजू वर येईल हे कोणाला सांगता येत नाही.
      अश्रुंची महती विशद करताना,माणसाचा भूतलावरील प्रवेशच मुळी त्याच्या रडण्याचा आवाज सहित होतो हेच रडू पण त्याच्या इतर आप्त स्वकीयांच्या ओठावर, मुखावर हास्याची चंद्रकोर  फुलवत जाते,याचा त्या जीवाला थांगपत्ता नसतो. म्हणूनच हसू आणि आसू या एकाच नाण्याच्या दोन बाजू.
      छोटेसेच बाळ जेव्हा शांत झोपलेले असते, तेव्हा कौतुकाने त्याचे मुखन्याहाळत असताना बाळ झोपेत हासत आहे असा सारखा भास होतो.त्याच्या चेहऱ्यावरचे गोजिरवाणे, लोभस हास्य नजरेने टिपत रहाणे हा घरात बाळ असताना मोठ्यांना लागलेल्या छंद होऊन बसतो.
      बाळाच्या वाढत्या वयाबरोबर एखाद्या फुलाप्रमाणे त्याच्या जाणीवांची एक एक पाकळी उमलत जाते. जसे बोलता येईपर्यंत रडून एखादी मागणी पूर्ण करून घेणे त्याला जमते तसेच, एखाद्या कृतीतून त्याला मजाही येते त्यातून त्याला आनंद मिळू लागतो तसा त्याच्या हसण्यात एक निरागसपणा, खळखळणारा त्याच्या हास्याचा धबधबा त्याच्या एवढाच इतर मोठ्या माणसांनाही निखळ आनंद देऊन जातो. आणि म्हणूनच हवाहवासा वाटतो मन मोहून टाकतो. ही झाली हसण्याची आनंददायक अनुभूती.
 वाढत्या वयाबरोबर हसण्यातून निखळ आनंद मिळत नाही असे नाही, पण निरागस हसणे मात्र कमी कमी होऊ लागते. बाल्यावस्थेत तर हसण्यातून ऊर्जा मिळते. त्यातूनच सवंगड्यांची टिंगल-टवाळी काढत काढत हास्याचे फवारे उडू लागतात. मुलांना मजेचा हा ऊर्जास्त्रोत त्यांना खेळण्यातून होणारा शारीरिक ताण नाहीसा करतात.
     मानसिक समज येऊ लागली की मग लक्षात येते की,किती रुपं आहेत या हसण्याची ! आनंद घेण्यासाठी, परिस्थितीतील ताण कमी करण्यासाठी एखाद्याला दिलासा देण्यासाठी, उसने आणलेले हसू असो किंवा विनोद बुद्धीने बोलल्यामुळे पटकन बाहेर पडणारे हसू ही सुद्धा रूपच ना त्याची? विकट खुनशी हसण्यातून सूडाची भावना प्रकट होते. एखादे दृश्य, एखाद्या माणसाच्या दुसऱ्या कुणा समोर होणाऱ्या फजिती मुळे येणारे हसू  हे सारे हास्याचेच अविष्कार.
            आपले हसू,हसणे ही दैवी देणगी माणसा जवळ नसती, तर आपले आयुष्य किती नीरस, रटाळ, उदासवाणा आणि गंभीर बनले असते नाही?अनेक भावनांची मांदियाळी मानवी मनामध्ये जोपासली गेली असल्यामुळेच रडणे किंवा हसणे या त्याच्या कृतींना काहीतरी अर्थ आहे. तसे नसते तर हे दोन्हीही अर्थहीन बनले असते खचितच.
        वर सांगितल्याप्रमाणे आनंद या भावनेचे सादरीकरण घडत असताना, आपोआपच आपल्याला हसू येते. ते प्रसन्नतेचे  द्योतक असते त्यावेळी. म्हणूनच आपल्या जवळच्या व्यक्तीला मिळालेले शैक्षणिक यश असू दे किंवा व्यावसायिक, आपल्या मुखावर समाधानयुक्त आनंदाचे हास्य प्रदर्शित होते. 
   एकदा माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला मला,’ आपले ठरले होते ना शॉपिंग ला जायचे,मला नाही जमणार गं आज.’ असे ती म्हणाली. मी कारण विचारले तर तिने घरात पाय घसरून पडल्याचे सांगितले. तिच्या केवळ सांगण्यानेच ‘ते’ चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. आणि सर्वात पहिली प्रतिक्रिया माझ्या हासण्यातून मिळाली तिला.  तिकडून आवाज आला, ‘अगं, मला येथे खूप  दुखतंय, आणि तू काय हसतेस?’ कोणतीही व्यक्ती अचानक वाकडीतिकडी पडल्यानंतर बघणाराल्या सर्वात अगोदर अगदी सहजपणे पटकन येणारी प्रतिक्रिया असते ती हसूच. एवढेच नव्हे तर आपणच कधीकाळी सायकलवरून पडलो होतो आणि संपूर्ण धुळीने माखलेलो होतो आपले हे वेंधळे रूप आठवले की, आपलेच आपल्याला आजही हसू आवरता येत नाही. पडणाऱ्या  व्यक्तीला समज कमी असेल तर राग येऊ शकतो. पण समजदार माणूस मात्र अशा  हसण्याकडे कानाडोळा करण्यातच शहाणपण मानतो. तर असे हे प्रसंग काही अंशी विनोदी दृश्य किंवा विनोद निर्माण करतात. तसेच झालेल्या प्रसंगाचे चित्रण डोळ्यासमोर उभे करताना, सांगणारा रंगवून रंगवून सांगतो आणि आपसूकच हसू अनावर होते कधीकधी. अशीच गत होते,जेंव्हा विनोदी चुटकुले, पुस्तक वाचताना. आपण पुलंच्या विनोदी शैलीचा अनुभव त्यांच्या पुस्तकातून अनुभवत  असतोच.  त्यांची शैली प्रत्यक्ष तो प्रसंग डोळ्यासमोर उभी करणारी अशी आहे हे सर्वश्रुतच आहे. आपल्या हास्याचे फवारे त्यामुळे न आले तरच नवल ! अशा प्रकारच्या वाचनातून आपल्याला एक प्रकारचा आनंद तर मिळतोच शिवाय आपल्यावर असणारा ताण थोडा फार कमी होण्यासाठीही मदत होते. म्हणून अशा प्रकारच्या वाचनातून  मनोरंजन आणि समाधान दोन्ही गोष्टी साधता येतात.
     काही वेळेला आपल्या एखाद्या ग्रुपमध्ये मग तो कौटुंबिक असो किंवा सामाजिक किंवा मित्रमैत्रिणींचा कधीतरी एखाद्या गंभीर विषयावर चर्चा चालू असते, अशा धीरगंभीर वातावरणात मनावर ताण येतो पण असे वातावरण बदलणे खूप गरजेचे असते. अशा परिस्थितीत एखादा हेतुपुरस्सरपणे काहीतरी विनोदी बोलत सर्वांना हासावयास भाग पाडतो. आणि अशा वातावरणातील गांभीर्य कमी होण्यास मदत होते. अर्थातच हास्याच्या साथीने हे सर्व शक्य होते. म्हणूनच मानवी जीवनात “हसणे” या कृतीला अनन्यसाधारण महत्त्व आहेच. 
       भारतीय  परंपरेमध्ये आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आवर्जून हसतमुखाने करण्याची परंपरा आपण पाळतो अर्थात ती स्वागतार्ह आहे यात वादच नाही. आपणच कोणाच्या घरी गेलो आणि कोणी आपले स्वागत दुर्मुखलेल्या चेहऱ्याने केले तर नक्कीच आपल्याला वाईट वाटते, अवघडल्यासारखे ही होते. म्हणूनच ‘हसत मुखाने’ स्वागत हा सोपस्कार फार महत्त्वाचा आहे.
       एखादा परिचित व्यक्ती समोर आल्यानंतर त्याच्याकडे बघून किंवा उभयतांनी एकमेकांना किमान एक स्मित (स्माईल) देणे तरी अपेक्षित असतच असतं. हे माणुसकी जपण्याचं सुध्दा एक लक्षण आहे असे आपण म्हणू शकतो. शिवाय या स्मित हास्यामुळे दोघांनाही प्रसन्न वाटते आणि आपण परिचित आहोत याची ओळखही पटते. त्यामुळे भारतीय संस्कृतीतील स्मितहास्य हा एक सोपस्कार खूपच महत्त्वाचा आहे.
     हल्ली वृत्तपत्रे मासिके यांमधून वधु पाहिजे किंवा वर पाहिजे अशा जाहिराती आपण वाचतो. त्यातील नियोजित वधू-वरांची वैशिष्ट्ये बघीतली तर त्यात वधूच्या वैशिष्ट्यांमध्ये वधु गोरी, निमगोरी, हसतमुख , वगैरे वगैरे अशा प्रकारचे वर्णन असते. याचा अर्थ या ठिकाणी ‘हसतमुख’ या वधूच्या चेह-यासाठी एक चांगले विशेषण या अर्थाने असते. वधू परीक्षेच्या वेळी मुलीला बघून झाले की लगेच मुलगी छान आहे अगदी हसतमुख आहे असे आपण पटकन बोलतो. म्हणजेच हा प्रसन्नता दाखवणारा चेहरा असतो. अशा चेहऱ्यामुळे आपल्याकडे बघणाऱ्यालाही खरंच प्रसन्न वाटतं शिवाय त्यामुळे असे व्यक्तिमत्त्व समोरच्या व्यक्तीवर छाप पाडून जाते. असे नक्कीच म्हणता येते. ही झाली सुखात्मक हास्य अविष्काराची काही  रुपं.
      सुखात्मक प्रकारांप्रमाणेच क्लेशकारक हास्याचे प्रकारही बरेच आहेत. उपरोधिक हास्य हा एक क्लेशदायक प्रकार. ‘नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा' अशी परिस्थिती जेंव्हा  असते,त्यावेळी बहुतेक असे हास्य प्रदर्शित होऊ शकते. एखादी व्यक्ती अगदी साधे वाटणारे कामही नीटपणे करू शकत नसेल पण तिचे गुणगान मात्र अगदी भरभरून होत असेल,उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला साधा वरण भातही चांगला बनवता येत नाही तरीही तिची आई आमच्या चिमणीला ना,पंच पक्वन्नाचा खूप छान स्वयंपाक करता येतो असे ठासून सांगते तेंव्हा तिच्या पाककौशल्याचा अनुभव असणारा व्यक्ती जेव्हा प्रतिक्रियात्मक हसतो, ते उपरोधिक हसू. त्यामुळे या हसण्यामागची भावना जेंव्हा समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येते तेव्हा मनाला क्लेश झाल्याशिवाय राहात नाहीत.
      थोडक्यात उक्ती आणि कृती या दोन्हीत जेव्हा विरोधाभास असतो, तेंव्हा येणारे हसू उपरोधिक असू शकते. याला आपण उपहासात्मक हास्याचीही उपमा देऊ शकतो. सध्या टीव्हीवर चालू असणारी कोणती ती दुहेरी नावाची मालिका. खरे तर अशा मालिकांना प्रसारणासाठी परवानगीच का देतात? हा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो.पण यातील खलनायक तो कोण बल्लाळ त्याच्या तोंडी मात्र पदोपदी विकट हास्याची रेलचेल दिलेली दिसते. एखाद्यावर आसुरी सूड उगवल्यानंतर येणारे हे विकट हास्य. तो बल्लाळ कायम सूड उगवल्याच्याच आनंदात  विकट खुनशी हास्याचे फवारे उडवत असतो. खरोखरच हे हसू बघणाऱ्या व्यक्तीच्या काळजाचा ठोका चुकवत जाते.
     एखाद्याच्या बाबतीत कायम काहीतरी कारणामुळे मनामध्ये खुन्नस ठेवत,आसुरी आनंदाचे  विकट हास्य प्रदर्शित करणे, म्हणजे काहीतरी फार मोठे शहाणपणाचे कृत्य नव्हे किंवा एखाद्या विजयाचा जल्लोषही नव्हेच. तर तुम्ही किती नीच पातळी गाठू शकता, हेच प्रदर्शित करणारी तुमची घाणेरडी वृत्ती असते.  ही आपल्याला  आपणच खोदलेल्या खड्ड्यात कशी ढकलते याची बरीच उदाहरणे सभोवती बघावयास मिळतात. त्यामुळे ही वृत्ती घातक आणि हास्य तर त्याहूनही घातक म्हणता येईल. 
     रहस्यमय हास्य ,हा प्रकारही क्लेशकारक ठरणाराच. आपल्या रिकामपणाच्या वेळात आपण आपल्या खिडकीतून किंवा बाल्कनीतून  येणार्‍या जाणार्‍यांचे निरीक्षण करत असतो कधीतरी. अशावेळी काही निरीक्षणातून जाणवते की,अमका एक व्यक्ती उगाचच विचित्रपणे हसतो आहे. हा विचित्रपणा, त्याच्या चेहऱ्यावरील हाव-भाव सुद्धा भीतीदायक असू शकतात. पण तो हसत मात्र असतो. वरकरणी तो का हसत आहे?याचा आपल्याला काही अंदाज ही येत नाही.यालाच आपण रहस्यमय हास्य असेही म्हणू शकतो. या   व्यक्तीच्या हसण्यात आणि वागण्या-बोलण्यात कोणतेही प्रकारचे तार्किक कारण दिसत नाही. म्हणून ते रहस्यमय बनत असावे. बहुतेक वेळेला मानसिक संतुलन गमावलेली व्यक्ती अशा प्रकारच्या हासण्यासाठी अधीन झालेली आपल्याला कित्तेक वेळा जाणवते. पण शेवटी ते क्लेशकारक हास्यच नव्हे काय?
        मोबाईल वर व्हॉट्स अॅप  वर मेसेज बघत असताना एका सचित्र मेसेजने  माझे लक्ष वेधुन घेतले. एक म्हातारे गृहस्थ मोबाईल रिपेरिंग च्या दुकानात आपला मोबाईल दुरुस्तीला घेऊन जातात. तो तपासून दुकानदार म्हणतो काका हा फोन चांगला तर आहे काही झालेले नाही त्याला तेव्हा ते  म्हातारे बाबा दुकानदाराला म्हणतात फोन तर चांगला आहे मग का बर मुलाचा फोन कधीच येत नाहीये मला……. आणि हे चित्र बघून आणि वाचून क्षणभर माझ्या ह्रदयात खूप कालवाकालव झाली खूप वाईटही वाटले. आणि मन दिङमुढ झाले. बाकी आपण काय करू शकणार? असे वाटून गेले. पण फोटोतील या वृद्ध गृहस्थाच्या चेहऱ्यावर मात्र हास्याची एक लकेर होती. याही परिस्थितीमध्ये हसू येणे किंवा हसणे हे कदाचित वेडेपणाचे वाटेल, पण हे केविलवाणेच  होते खचितच .
      बरेच वेळा केवळ असे केविलवाणे हसून प्रतिक्रिया देण्या शिवाय आपण काही करू शकत नाही. हे निश्चितच  हसणाऱ्याला आणि बघणाऱ्याला ही क्लेश देणारेच, पण अगतिकता दर्शवणारेही आणि म्हणूनच केलीवाणे. बरीच दुःखे झेललेल्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर असे हसू नकळत पणे दिसून येते. बघणाऱ्या व्यक्तीच्या संवेदनशीलतेवर या हसण्या मागची पार्श्वभूमी अवलंबून असते. असे आपण म्हणू शकतो. याशिवाय काही काही व्यक्तींच्या बोलण्यातून संवादफेकीतून खूपदा विनोदी सुरू असतो. ही त्या व्यक्तीची  सवयच बनून गेलेली असते. हा निराळा. ही सवय त्या व्यक्तिमत्त्वाचे कायम एक अंग बनून जाते त्यामुळे समजून घेणारा देखील  कायम हास्याची दाद देऊ शकतो. अर्थात दरवेळी हास्य प्रकटीकरण झालेच पाहिजे असे नाही तर त्यातून गर्भितार्थ आणि गर्भित हास्याचे फवारे ही निघालेले आपण जाणून घेऊ शकतो. असा व्यक्ती स्वभावाने खूपच गप्पिष्ट असावा असा उगाचच भासही होतो. माणसाचे मन सुखावून जाते हे खरे.
   हल्ली होळी, धुळवंड किंवा कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी एखादे पेय मग ती दारू असो की भांग किंवा बियर असे घेऊन तो विशिष्ट प्रसंग एन्जॉय करण्याची फार फॅड वाढले आहे. पण अतिसेवनाने परिस्थिती आणि चित्त थार्यावरून उडते. आणि असा माणूस वेड्यासारखा एक सारखा हसतच राहतो. ही मला ऐकून मिळालेली माहिती. एवढे हसतो की शुद्धीवर येईपर्यंत त्यालाही काही भान रहात नाही.  हे सुद्धा एक प्रकारचे असते हास्यच. यातून खरच आनंद मिळतो का? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. पण याला चित्रविचित्र हसणे एवढेच आपण म्हणू शकतो.
    गंमत वाटली ना एवढे सगळे हास्याचे अविष्कार आहेत ते वाचून! होय ना? आपण जीवन जगताना कित्येकदा हसतो खरे तर मानवी जीवनाला मिळालेले  हे हसू म्हणजे एक वरदान.  त्यामुळे जीवन जगणे हा एक सुखात्मक  अनुभव ठरतो प्रत्येकासाठी. एवढ्या भरपूर प्रकारचे आपण हसू हासत असतो. केव्हा तरी याचे भानही नसते आपल्याला.पण नक्कीच हसतच राहिले पाहिजे. तरच या अमूल्य मानव जन्माला आल्याचे सार्थक झाले असे म्हणता येईल. धन्यवाद त्या विधात्याला. ज्याने ‘हसणे’या संकल्पनेची रुजवात अगदी जन्मतः  मानव जातीमध्ये केली आहे….. हास्यमेव जयते……….

         ©  *नंदिनी म. देशपांडे *

😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃

बुधवार, १८ जुलै, २०१८

*अश्रुंची किमया*

*अश्रुंची किमया*

       गेल्या दोन दिवसांपासून,हिमा दास नावाच्या मुलीचा,जिने धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक मिळवले आहे.या भारतीय युवतीचा ,आश्रुंनी भरलेल्या डोळ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे.
       तिच्या आसवांमध्ये जबरदस्त ताकद दिसते आहे.त्यात,तिने घेतलेल्या मेहनतीला दिलेली दाद आहे.तिच्या प्रतिक्षेला फळ मिळाल्याचा आनंद आहे.तिला मिळालेल्या विजयाचं ते प्रतिक आहे तसेच तिच्या या आसवांतून तिचे देशप्रेम व आदर भरभरुन दिसतोय!
      खरंच,माणसाच्या डोळ्यातील पाण्याचा एक थेंबही
लाख मोलाचा बरं का ! एक तर हा थेंब बरंच काही बोलून जातो. तर हाच डोळ्यातील एक थेंब आपलं आणि समोरच्या व्यक्तीचं अख्खं भाव विश्व बदलवू शकतो. म्हणूनच तो खूप किमती आहे.
      आश्रुं मध्ये खूप ताकद असते असे म्हणतात, ते उगाच नाही. मानवाला जन्माला आल्यापासून ते त्याच्या अंतापर्यंत आजन्म साथ करणाऱ्या डोळ्यातील पाण्याला अश्रू असे म्हणतात हे,अगदी चार-पाच वर्षाच्या छोट्या बालकालाही समजते.ईश्वराने माणसाला बहाल केलेलं हे सर्वात ताकदवान असं अंगभूत अस्त्र होय.
     प्रत्येकाच्या भावविश्वाशी निगडित असणारी अश्रुंची ही देणगी त्याच्या मनातील खळबळ, मग ती एखाद्या हर्षोल्हासापायी असो किंवा उदासवाणे पणाची. त्याच्या चेहऱ्यावर प्रकट होताना नकळतपणे डोळ्यातही बरेच काही सांगून जाते. त्यावेळी डोळे अलगदपणे अश्रूंचा आधार घेतात.
    नवजात अर्भक या पृथ्वीवर अवतरल्या नंतर, अवकाशाशी जुळवून घेताना पहिली सलामी देते. ती म्हणजेच आपल्या डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी करून देत,आपल्या 'टॅहां टॅहां'रडण्यातून. स्वतःच्या अस्तित्वाची खास अशी एक जागा बनवताना सुरू झालेला हा अश्रूंचा प्रवास त्याच्या अंतापर्यंत चालूच राहतो. नवजात बाळाचा पहिला गोंडस रडवेला स्वर त्याला कदाचित थोडासा क्लेशकारक असेल, पण बाकी सर्वांसाठी खूपच आनंदमय असतो. आपल्याच अंशाने या जगात नव्याने प्रवेश घेतल्याची ही जाणीव त्याच्या आप्तस्वकियांना आनंद देते. तेंव्हाही डोळ्यात अश्रूंची गर्दी नकळत दाटून येते, पण ते आनंदाश्रु म्हणूनच.
    बाळ जसेजसे मोठे होऊ लागते तसे त्याला आपल्या अश्रुंची मूल्य समजू लागते.भूक लागली तरीही त्याला रडूनच सांगावे लागते.थोडक्यात,रडवेल्या सुरात आपल्या अश्रुंचे प्रकटीकरण करण्याची कला, खूपच उपयोगी आहे हे त्याला कोणी मुद्दाम शिकवावे लागत नाही.
     वाढत्या वयानुसार प्रत्येकाचे भावविश्व बदलत जाते आणि त्याचे प्रतिबिंब त्याच्या अश्रुतून परावर्तित होते.कोणतीही शारीरिक इजा झाली तर जीव विव्हळतो. तोंडातून निघणार्‍या हूंकारातून ती वेदना बाहेर पडते आणि अश्रुंच्या रुपात डोळ्यांतून पाझरु लागते.हे झालं अश्रुंचं वेदनादायक रुप.
       अगदी निकटच्या व्यक्तीला एखादी शारीरिक किंवा मानसिक वेदना त्रास देत आहे,त्याला ती सहन होत नाही, हे जेव्हा आपल्या लक्षात येते, तेव्हा अगदी नैसर्गिकपणे संबंधित व्यक्तीला होणारा त्रास आपल्या डोळ्यात आलेले अश्रू केंव्हा व्यक्त करून जातात हे बघणार्‍याला कळतही नाही. 'त्याची वेदना ती माझीच वेदना' ही संवेदना जेंव्हा डोळ्यातून पाझरते,मला वाटतं हेच तर खरे अंतकरण होय.ही काही हातात घेऊन दाखवण्याची वस्तू नव्हे. तर मनातील भावनिक कल्लोळामूळे चेहऱ्यावर व मनावर उमटणारी प्रतिक्रिया होय.जिचे उगमस्थान हृदयातून होते. त्याला आपण मनाचं हळवेपण असेही संबोधू शकतो.
       आपल्या प्रेमाच्या लोकांची एखाद्या कार्यातील यशस्विता, त्याने केलेल्या,आमाप प्रयत्न आणि मेहनतीने मिळवलेली आहे हे बघून सहाजिकच संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.ही संबंधित व्यक्तीच्या दैदिप्यमान कारकिर्दीला आनंदाने दिलेली आपली अश्रू रुपी पावतीच असते. किंबहुना कितीही कष्ट पडत असतील, ते करताना वेदना होत असतील आणि त्या डोळ्यातून अश्रू रूपाने बरसत असतील तरीही 'प्रयत्नांती परमेश्वर' किंवा 'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे' तसेच 'वाळूचे कण रगडीता तेलही गळे'या उक्तींवर विश्वास ठेवत, एखाद्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात यशाला कवेत घेऊन आले, तरीही डोळ्यातून नकळत पणे वारंवार भरुन येणाऱ्या अश्रुंना फुलांची उपमा मिळते.म्हणूनच म्हणतात ना अश्रुंची झाली फुले !
        अश्रुंचा अशा प्रकारचा आविष्कार हा मनातील संमिश्र भावनांचा कल्लोळ दाखवून जातो.आनंदाच्या क्षणी सुध्दा ते डोळ्यात तरळतात तर वेदना होताना सुद्धा ते वाहतातच. कधीकधी ते मूकही असतात. मूकपणे वेदना सहन करतात. म्हणूनच कोणाकोणाला रडू लवकर येत नाही असे आपण म्हणतो, ते याच अर्थाने.
     रडू येणे, हा दु:खाने परिसीमा गाठल्या नंतर अश्रूंचा,दिसणारा बाह्याविष्कार आहे. आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला आपण गमावले आहे,ती व्यक्ती पुन्हा कधीही दिसणार नाही, अशी जाणीव झाल्यानंतर फुटणारा अश्रूंचा बांध.हाअगदी अनावर करणारा असतो. संबंधित व्यक्तीची राहून राहून आठवण येत हा आवेग वारंवार येतोच.त्याला आपण थांबवावे म्हटले तरी ते थांबत नाहीत. अशावेळी तो  दुःखावेग होय.असे म्हटले जाते.
     शिवाय आपल्या कुटुंबातील एखादा माणूस आपल्यावर ओरडला,तर त्यामूळे आपल्याला रडू येऊ शकते. लहानपणी शाळेमध्ये शिक्षकां‌कडून  मिळणारा ओरडा सुद्धा कधीतरी आपले अश्रु वाहते करून गेलेला असतोच.
          लहानपणी आजी-आजोबा, आई-वडील, थोरली भावंड यांच्या कडून खाल्लेल्या ओरड्यानं कितीहीे रडू आणले तरीही ते विसरायला लावणारा असतो हा ओरडा. प्रेमाच्या माणसांकडून असतो ना तो ! ओरडा बसल्यावर डोळ्यांतून वाहणारे अश्रू हे वाईट वाटतयं आपल्याला, याचीच आठवण करून देणारे असतात.
      प्रेमाच्या माणसां वरुन लक्षात आलं जेंव्हा आपल्यावर खूप प्रेम करणारा व्यक्ती, प्रेमाने आपल्याला कुरवाळतो तेंव्हा नकळत पणे त्याच्या वात्सल्यपूर्ण स्पर्शामुळे आपल्या डोळ्यात अश्रू तरळून जातातच. सच्च्या प्रेमाची ही जणू दोघांनीही परस्परांना दिलेली ग्वाहीच असते.
       आपल्याला एखाद्या परीक्षेच्या नंतर खूप अभ्यास करूनही पेपर कठीण गेला असेल किंवा रिझल्ट मनाप्रमाणे आला नाही, तर मिळालेल्या अप यशा मुळे वाईट वाटणे अगदी स्वाभाविक आहे.म्हणूनच हे वैफल्य अश्रु रुपातून बाहेर पडून मनावरील ताण कमी करु शकतात.
     आपल्या कुटुंबातील व्यक्ती शिक्षणा निमित्त बऱ्याच दिवसांसाठी दूर परदेशात वगैरे जात असेल तर, मनाची अवस्था अतिशय द्विधा, घालमेल करणारी असते. एकीकडे तो शिक्षणासाठी परदेशात जाणार याचा आनंद,अभिमान यामुळे ऊर भरुन येतो. तर दुसरीकडे त्याचा विरह होणार या भावनेने कंठ दाटून येतो. परिणती शेवटी डोळे ओले होण्यातच होते हे मात्र खरे.
        मनाची अशीच काहीशी घालमेल, मुलीला लग्न होऊन सासरी पाठवताना असते, तिच्या कुटुंबाची. किंबहुना मुलगी कोणाचीही असेल तरीही, ती आपल्याच घरी येणार आहे असे असतानाही तिला माहेरहून सासरी पाठवताना पहिल्यांदा निरोप देण्याचा क्षण म्हणजे बघणाऱ्या सर्वांचेच मन हेलावते. डोळे पाणावतात. अतिशय हळवा प्रसंग असतो तो.ज्याच्या मनी हळवेपण असतं, तो अशा प्रसंगी साश्रु नयनांनीच वावरतो. हे सर्व आपोआप घडत असते. येथे न बोलता मनाचा मनाशी संवाद चालू असतो.
      अशीच परिस्थिती बरेच दिवस माहेरी राहून सासरी जाणाऱ्या मुलीच्या मनाची होत असते. माहेरहून सासरी जाताना तिची पावले जड होतातच. एकीकडे सासरची ओढ असतेच पण त्याच वेळी आपल्या प्रेमाच्या माणसांच्या विरहाची जाणीव तिला अस्वस्थ करत, डोळ्यांत अश्रुंची गर्दी करते.
     कधी कधी एखाद्या कौटुंबिक  विषयात आपल्याच लोकांकडून व्यक्तीच्या मनाची कोंडी होत असेल तर,अतीव दुःख होणे अपरिहार्य ठरते. हा दु:खावेग अश्रु रुपाने डोळ्यातून पाझरु लागतो.त्या बरोबरच होणारे मानसिक क्लेश सुद्धा अश्रुंना वाट करून देतात. त्यामुळे झालेल्या दुःखाचा निचरा होण्यास बरीच मदत होते.
   माणसाला काही शारीरिक व्याधी लागणे, हा निसर्गनियमच आहे.अशा परिस्थिती  मध्ये वेदनांची तीव्रता वाढली की,सहन करण्याची क्षमता कमी होते. अशावेळी डोळ्यातून अश्रु ओघळू लागतात. त्याची वेदना अश्रु रुपात बाहेर पडू लागते. हे अगदी नैसर्गिक आहे.
     तर,अशाप्रकारे अश्रुंची ही सारी किमया माणसाच्या जन्मापासून ते अगदी शेवटच्या क्षणा पर्यंत,इतर कोणाचीही साथ असू दे वा नसू दे आयुष्यभर आपल्याला साथ करत असतात.ते आपल्याला एकटे सोडून जाणार नाहीत याची शाश्वती असते.कधी कधी व मूकपणे ते  बरेच काही बोलून जातात. तर कधी रूदन करत आक्रंदन करतात.कधी दुःखावर फुंकर घालतात. आणि कधी दुःखावेगाने भरभरून वाहू लागतात.
     आनंदाच्या प्रसंगी ते कधी डोळ्यात तरळून आनंदाश्रु म्हणून वाहतात.असे हे माणसाचे अश्रु निर्मळ पाण्यासारखे पण खूप शक्तिमान असतात. बरेचदा या अश्रुं मूळे हृदय परिवर्तन होणारी माणसं आपल्या अवतीभवती दिसू शकतात. तर काही कायम हळवेपणा हा जीवलग मित्रा प्रमाणे सोबत ठेवतात. म्हणूनच मानवी मनाचे व अश्रुंचे नाते खूपच जवळचे असते.भावनांना मूर्त रुप देण्याचे काम त्याचे अश्रू मधून साधले जाते.पुष्कळदा व मूकपणे बरेच काही सांगून जाण्याची किमया असते या अश्रुंची.म्हणून ते फार परिणामकारक ठरते.
     मनाशी अगदी जवळचा संबंध ठेवून असणारे अश्रु,त्याच्या सौंदर्याशीही तेवढीच सलगी करतात. म्हणूनच ते 'पाणीदार डोळे' (मोठे डोळे आणि बोलके भाव दाखवणारे डोळे)ठरतात. पाणीदार या विशेषणातच पाण्याचे अर्थात आसवांचे डोळ्यांना किती महत्व आहे हे लक्षात येते. ते असल्याशिवाय डोळ्यांनाही सौंदर्य मिळत नाही.
    डोळ्याच्या आरोग्यासाठी डोळ्यात पाणी ,अश्रू तयार होण्याची नैसर्गिक रचना असते.  खरोखर सृष्टीच्या या शास्त्रीय दृष्टिकोणाला त्रिवार अभिवादन.
       अश्रुंना मानवी मनाच्या भावनांचे कोंदण मिळाल्यामुळे डोळ्यातील प्रत्येक थेंबाची किंमत अमूल्य अशीच आहे. म्हणूनच कित्येक मनस्वी कवींनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर डोळ्यांवर आणि त्यातील आसवांवर आपल्या काव्यातून व्यक्त केलेले आपल्याला दिसून येते.
     उदारणार्थ,
डोळ्यामधले आसू पुसती ओठांवरले गाणे.
  ‌
   तुझे डोळे पाण्याने भरले माझे डोळे पाण्याने भरले.

   आसू भरी है,ये जीवन की राहे.

             रोते रोते हसना सीखो हसते हसते रो ना.इत्यादी.

   ‌ तर असे हे माणसाचे आंसू, त्याच्यातील माणूसपण जिवंत असल्याची खूण आहे,त्याच्या सजीवपणाची एक ओळख आहे.असेे नक्कीच म्हणता येते.
     किटक,मुक प्राणी, पशू ,पक्षी, झाडे, वेली या सर्वांची आपण सजीवांमध्ये गणना करतो. त्यांना सुद्धा माणसां प्रमाणे या जाणिवा कदाचित असतीलही, पण माणसातील भावनाशील वृत्तीमूळे त्याच्यातील वेदनेची, आनंदाची जाणीव माणूस स्वतःहून करुन घेतो. तशीच ती करून घ्यावी लागते. हा ज्या त्या  व्यक्तीच्या भावनिक जाणिवेशी संबंधित विषय असल्यामुळे प्रत्येकाच्या जाणिवा वेगवेगळ्या असू शकतात निश्चितच.
      आजन्म साथ करणाऱ्या डोळ्यातील अश्रुंचे, प्रत्येक मानव प्राण्याने शतशः आभार मानावयास हवे. हे मात्र पूर्ण सत्य होय.
    सारांश,भावना, मन व अश्रु यांचा त्रिवेणी संगम ज्याच्या जवळ असेल,त्यालाच आश्रुंची किमया आणि किंमत कळू शकते.

        *©* *नंदिनी म. देशपांडे*

✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍

मंगळवार, १० जुलै, २०१८

*मला भावलेला युरोप*भाग ११

*मला भावलेला युरोप*
          *भाग ११*

         ‌ रोममधील पवित्र व्हॅटिकन सिटी या संपूर्णपणे धार्मिक अधिष्ठानावर उभ्या असणाऱ्या छोट्याशा देशातून मूळ रोम शहरात प्रवेश केला, तेव्हा सायंकाळ होत आलेली होती. रोम शहरात प्रथम शिरल्यानंतर "Rome is not built in a day"ही प्रसिद्ध म्हण प्रत्यक्षात कशी उतरत गेली याचा इतिहास जाणून घेण्यासाठी आम्ही ही सायंकाळ राखून ठेवली होती. एका फोर डी मूव्हीतून तीन हजार वर्षे जुनी असणारी इटलीची,रोमची संस्कृती, कला ,चित्रकला याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती.
  ‌‌ थिएटर बाहेर ठेवलेल्या काळ्या चष्म्यांना सोबत ठेवत आत प्रवेश केला,तेंव्हा मीट्ट काळोख होता.एखाद्या भयाण जंगलाच्या खोल गुहेत आहोत की काय आपण? असा भास झाला.सोबत बरेच जण होते, म्हणून नाहीतर हिम्मत नसती झाली बाबा,दोघंच दोघं आत जाण्यासाठी, असो.
       अशा मिट्ट काळोखात बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये अडकवण्यात आलेल्या पुतळे वजा मुखवट्यांवर प्रकाश झोत टाकत, हा इतिहास सांगण्याचा श्रीगणेशा केला गेला. दहा मिनिटानंतर मुख्य थिएटरमध्येे गेलो आम्ही.कोणत्या खुर्च्यांवर बसायचे स्थिर किंवा हलत्या? असे दोन पर्याय होते समोर. म्हटलं साध्या खुर्च्यां वर तर नेहमीच बसतो, बघूया या दुसऱ्या नवीन हलत्या खुर्च्यांवर बसतअनुभव घेऊन. स्थानापन्न झालो आम्ही. लगेच सेक्युरिटी गार्डने जवळ येत आमच्या खुर्च्यांना दांडा लावत कुलूप घातले.त्यावेळी मात्र हे काही वेगळेच प्रकरण आहे सांभाळूनच राहावयास हवे याचा अंदाज आला.
       खरी मजा तर तो मुव्ही चालू झाल्यानंतरच होती. मजा कसली!राहून राहून सारखे पोटात गोळे येणे आणि गर्भगळीत होऊन जाणे, याचा अनुभव घेतला.पिक्चर चालू झाल्यानंतर जणू आपल्या अगदी जवळ अवतीभवतीच हे सारे घडते आहे. आपणही त्याचा एक भाग आहोत. असे वाटू लागले.कानठाळ्या बसवणाऱ्या आवाजाच्या तालावर आणि गतीनुसार आमच्या खुर्च्या मागे पुढे अगदी अर्धगोलाकार अशा जोर जोरात फिरवल्या जात होत्या.अर्थात यांत्रिकी पद्धतीने. सुरुवातीला पिक्चर बघण्यात लक्षच नव्हते.आपण पडणार नाही ना?या भीतीने दांड्यावर दोन हात घट्ट पकडून ठेवण्याविषयी मी ह्यांना वारंवार बजावत होते. कारण कोणताही मूव्ही बघत असताना माझ्या पती देवांची झोपण्याची सवय मला चांगलीच परिचयाची होती.
       मूव्हीमध्ये पाण्याचा प्रसंग आणि आवाज आला की ते पाण्याचे काही थेंब आमच्या अंगावर आल्याची ही अनुभूती मिळाली.त्यावेळी शंकेची पाल मनात चुकचुकत गेली. न जाणो आग लागल्याचा प्रसंग असेल तर तिचा दाह पण आपल्याला सोसावा लागेल की काय? हा अनुभव नक्कीच थरारक होता.  तोंडचे पाणी पळवणारच ठरला.
      जेवढा काही मूव्ही लक्ष देऊन बघितला,त्यात तो तो काळ दाखवत रोमच्या उभारणीचे यथार्थ चतुरस्त्र वर्णन अतिशय परिणामकारक केलेले दिसून आले. छतावर रंगवलेल्या चित्रांचा  दाखवलेला प्रसंग अद्भुत वाटला. ४५ मिनिटांचा एकदाचा हा शो संपला आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला. "परत कधीही आणि कुठेही असा खुर्च्यांवर बसण्याचा अनुभव घेऊन बघावयाचा नाही." असा कानाला खडा लावला. गटागटा पाणी पीत कोरडा पडलेला घसा ओला केला.रात्रीचे जेवण आटोपून आराम करण्याची नितांत गरज भासली यावेळी.
     दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून सामाना सहितच  निघालो आम्ही रोमच्या शहर सफारीला. महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात असते तसे ऊन चमकत होते.शहराच्या आतल्या भागातच भटकंती असल्यामुळे थंड हवेचा लवलेशही नव्हता. भर बाजारात असावा असे वाटणारा ट्रेव्ही फाउंटन बघण्यासाठी बसच्या खाली उतरलो. एवढी मोठी बस अशा गर्दीच्या ठिकाणी येणे शक्यच नव्हते. पर्यायाने आमची दोन पायांची गाडी भराभर वेग घेत होती.
        ट्रेव्ही फाऊंटन दृष्टीपथात आले आणि चालण्याचा शीण कुठच्या कुठे पळून गेला. प्रचंड मोठ्या क्षेत्रफळाच्या जमिनीवर, जमिनीच्या खालच्या लेव्हल वर कृत्रिम पद्धतीने बनवलेले असे हे सौंदर्यपूर्ण ठिकाण.पाण्याच्या सभोवती अतिशय भव्य अप्रतीम मानवी शिल्प बनवून ,सभोवती बागडणारे फेसाळ पाणी. जणू काही शिल्पाच्या मांडीवर एखाद्या छोट्या बाळाने हात-पाय हलवत नाचवत आनंदाने खेळावे असे. हेच ते रोममधील प्रसिद्ध ट्रेव्ही फाउंटन.या फाउंटनच्या वाहत्या पाण्यात आपण आपल्या एका हाताने खांद्यावरून पाठीमागे नाणं फेकलं तर ,पुन्हा कधीतरी रोमला येण्याचा योग आपल्याला येतो अशी युरोपियन लोकांची श्रद्धा(?).आपण भारतीय सुद्धा तेथे गेल्यानंतर पाळतो. मी मात्र याला अपवाद ठरले.
        कोलोझियम, कोलोेझिअम म्हणजे प्रचंड मोठे जवळजवळ पन्नास हजार प्रेक्षक बसतील एवढे अगदी गावात असणारे एक स्टेडियम.रोम शहरा मध्ये फिरत असताना कुठूनही त्याचा एखादा तरी भाग दृष्टीस पडायचाच. आणि खंडहर झालेली ही एक ऐतिहासिक वास्तू असावी,हे मनाने आगोदरच ताडले होते. पण प्रत्यक्ष प्रवेश केला नि, एवढे प्रचंड स्टेडियम बघून डोळेच विस्फारले. तीन स्तरांवर बैठकीची व्यवस्था, प्रत्येक स्तरावरील प्रेक्षकांना प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते,नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी त्यावर वेगळ्या पांघरुणाची असणारी व्यवस्था, राजाच्या प्रवेशासाठी खास सोय,हिंस्र प्राणी बांधून ठेवण्यासाठी विशेष जागा इत्यादी गोष्टींची मिळालेली माहिती खरोखर विस्मयचकित करते.
   ‌   कलेचे भोक्ते, संस्कृतीचा इतिहास जपणारे,शिल्पकलेला आणि चित्रकलेला एका अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवणारे रोमन राजे आणि रोमन प्रजा हळुवार मनाचे असतील हा समज खोटा ठरवणारे ठिकाण म्हणजे कोलोजझियम.असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.कोलोजियम हे प्रचंड मोठे स्टेडियम,
हिंस्त्र स्वरूपाच्या खेळांसाठी प्रसिद्ध होते.दोघांपैकी एकाचा मृत्यू होईपर्यंत कुस्ती स्पर्धा येथे रंगत असत.असे ऐकण्यात आले.या कुस्त्या किंवा खेळ  कैदी लोकांच्यात होत असत पुष्कळदा. राजा व प्रजा अत्यानंदाने या अमानवीय खेळाचा आसूरी आनंद घेत असायचे.खेळामध्ये हारणाऱ्याच्या  छातीवर पाय ठेवत, पराक्रमाचा माज चेहऱ्यावर दाखवत जिंकणारा व्यक्ती ज्या वेळी राजाकडे बघत असे.त्यावेळी राजाने आपल्या तळहाताचा अंगठा जर खालच्या दिशेने दाखवला तर, हारणाऱ्याला मारून टाकावे.व हाच अंगठा वरच्या दिशेने दाखवला तर त्याला जीवदान द्यावे.असे संकेत दिले जायचे म्हणे.
        एवढे कलाप्रेमी लोक क्रौर्याची परिसीमा गाठायचे, ज्यावेळी कैदी आणि वाघ-सिंह यांसारखे हिंस्त्र पशू यांच्यात खेळ होत असायचा.याची परिणीती काय होणार हे अंध व्यक्ती सुध्दा पटकन सांगू शकेल.
      अंगावर शहारे आणणारी ही माहिती म्हणजे सौंदर्याला गालबोट लावणारीच आहे हे नाकारता येणार नाही कधीही.
     कोलोझियमची अफाट मोठी वास्तू आश्चर्याने बघत बघत बाहेर पडलो.पण रोममध्ये रस्त्यात ठिकठिकाणी मोठे मोठे मानवी रूपातील अप्रतिम शिल्प मनाला भुरळ घालत होतेच .
     आज आपण युरोपचा निरोप घेणार ही जाणीवही व्याकूळ करत होती. आम्ही मागच्या जवळ जवळ पंधरा दिवसांपासून युरोपिअन्स बनून गेलो होतो.
     ‌ आपल्या मातीची ओढ या व्याकुळते पेक्षा निश्चितच जास्त होती. म्हणूनच आपली माती, आपली माणसं,आपलं अन्न,साद घालत होतं "या,आता परत".केंव्हा एकदा मायदेशी जाऊन खमंग पिठलं,भाकरी,ठेचा खाईन आणि जीभेला चव आणीन असे झाले होते.
       ठरल्याप्रमाणे मुंबईला आल्यानंतर मातृभूमीला वंदन करत, घराकडे जाणाऱ्या वाटेवर विचार चक्राने मनाचा ताबा मिळवला. आपण युरोपात अनुभवलेल्या, बघितलेल्या चांगल्या गोष्टी स्वीकारायला हव्यात असे वाटले.तसेच आपण भारतीय आपल्या देशात असताना उपयोगात आणणारी बेशिस्त, परदेशात जाऊन जेव्हा प्रदर्शित करतो ना ही गोष्ट निरीक्षणातून खूपच वेदनादायक वाटली.आपल्या देशाची प्रतिमा जगात कशी असावी?ती कशी ऊंचवावी?याचे भान प्रत्येक भारतीयाने ठेवावयास हवेच. असे प्रकर्षाने  म्हणावेसे वाटते.जगाच्या पाठीवर कुठेही गेलो आपण,तरी ती एक सर्वांगसुंदर अशी अनुभूती असते. चांगल्या गोष्टींचे, तत्त्वांचे, तंत्रज्ञानाचे,कलेचे आदान प्रदान करण्याचे पर्यटन हे एक मुख्य माध्यम असते. असेच असावे. हे पूर्ण सत्य होय.

         *समाप्त*

   *©* *नंदिनी म. देशपांडे*

✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍