शनिवार, ३० जून, २०१८

*मला भावलेला युरोप*भाग ८.

*मला भावलेला युरोप*
          *भाग८*

          'प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो'असे आपण नेहमी म्हणतो. त्या प्रमाणे प्रत्येक टूरच्या यशामागे टूर लीडरचा सहभाग फार महत्त्वाचा, असे म्हणावेसे वाटते. आपली टूर कशा प्रकारे पार पडली आणि आपण त्यातून किती आनंद मिळवला, हे सर्वस्वी आपल्याला लाभलेल्या टूर लिडरवर खूपसे अवलंबून असते .असे माझे वैयक्तिक मत.
        आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण टूर करणार असू , तर टूर लिडर खूपच शार्प,तात्काळ पण योग्य निर्णय क्षमता असणारा, याशिवाय त्याला स्वतःला त्या सर्व ठिकाणांची ओळख, अभ्यास असावयास हवा.वेळेचे गणित जमवून आणणारा तर तो असणे अत्यावश्यकच.
    सुशांत,आमचा टूर लीडर.एक-दोन दिवसातच  आम्हा सर्वांच्या फॅमिलीतला मेंबर बनून गेला होता. मृदू भाषा पण ठाम निर्णय त्याच प्रमाणे वेळेच्या बाबतीत अगदीच वैशिष्ट्यपूर्ण असा होता. आपण घेऊन आलेल्या समूहाला जास्तीत जास्त कोणत्या नियोजनातून  आनंद देऊ शकतो याचा सातत्याने विचार करणारा होता.
        वेळोवेळी प्रत्येक ठिकाणांची योग्य तेवढी माहिती देत ते विशिष्ट ठिकाण, बघण्यास  आमची उत्सुकता वाढवत ठेवण्यात तो पूर्णपणे यशस्वी ठरला. त्याच्याशी संवाद साधला असता तो गेल्या पंधरा  वर्षांपासून या क्षेत्रात उतरलेलाआहे.तर आठ वर्षांपासून केवळ आंतरराष्ट्रीय टूर्सचेच नियोजन तो सांभाळत आहे असे लक्षात आले. बऱ्याच वेळी वाटले की, आपली सहल सुशांत मुळेच आनंददायक झाली आहे.कारण
युरोपातही पर्यटन क्षेत्रात प्रत्येकाच्या तोंडी त्याचेच नाव असायचे. वर्षभरात अर्ध्यापेक्षा जास्त दिवस युरोपात वास्तव्य असते, हे त्यामागील गुपित होते हे समजले.
      जेवणाची व्यवस्था सांगितल्यानुसार चोख आहे किंवा नाही, हे बघण्यासाठी तो हॉटेलमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम हातावर पदार्थ चाखून बघायला विसरायचा नाही. त्या वेळी नव्यानेच संसारात पाऊल टाकलेल्या नव्या नवती ची आठवण झाली. ती पण स्वयंपाकात हात बसेपर्यंत असेच करत असते.सुशांतचा उद्देश स्वयंपाक करावयाचा नव्हे तर, तो चवीला कसा झाला आहे? ओके आहे ना?हे बघण्याचा असायचा हे निश्चित.
         पूर्वीच उल्लेख केल्याप्रमाणे युरोपातील हॉटेल्समध्ये मनुष्यबळ फारच कमी. त्यातही त्यांचा गोंधळलेला चेहरा बघितला की हा पठ्ठ्या स्वतः त्यांना अगदी जेवण सर्व्ह करण्यापासून मदत करत असायचा. त्यामुळे वेळेचे गणितही बरोबर चालायचे आणि आमचीही गैरसोय टाळली जायची. शिवाय युरोपियनांनाही तो खूप कामाचा मदतनीस आहे असे वाटायचे.म्हणजे सुशांत एका दगडात किती पक्षी मारायचा बघा!
          असे असले तरीही मी स्वतः मात्र सुशांतला एका बसणी  दुपारचे जेवण घेताना कधीच बघितले नाही.क्वचित वेळेला रात्रीचे जेवण तो व्यवस्थित बसून घेत असायचा.आपल्या कुटुंबाचा एक सदस्य आहे आणि त्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे या जाणिवेतून मी सुशांतला जेवणाविषयी आठवण करून द्यायची.
         बाकी टूर वर असताना वाहनांची व्यवस्था, तेथील सर्व तिकीट व्यवस्था, आवश्यक तेथे गाडीची व्यवस्था, वगैरे कामं तो चोख बजावत होताच.त्यामुळेच तर आमच्यासाठी पोटातले पाणी न हलता आमची टूर व्यवस्थित एन्जॉय करू शकलो आम्ही . आपण आयोजित केलेल्या पर्यटनासाठी योग्य असा टूर लीडर मिळणे हा नशिबाचाच एक भाग म्हणता येईल. तोच जर आळशी असेल तर तुमच्या सहलीचा 'फज्जा'उडालाच असे समजावे. पण टूर लीडरचा हा जॉब म्हणजे तारेवरची कसरतच असते. तर त्याच्यासाठी प्रत्येक टूर म्हणजे एक स्वतंत्र कसोटीच होय.
       देशाच्या वेगवेगळ्या विभागातून,निरनिराळ्या भाषा बोलणारे, निरनिराळ्या एज ग्रुपचे तीस चाळीस जण एकत्र आणत त्यांच्या स्वभावधर्मानुसार, त्यांना, त्यांच्या मानसिकतेला सांभाळणे म्हणजे अक्षरशः डोके गरगरवून टाकणारी गोष्ट होय. केवळ तो आणि तोच या सर्व गोष्टींची जुळवाजुळव करू जाणे. म्हणूनच कोणत्याही टूर च्या यशाचे श्रेय हे आपल्या टूर लीडरला द्यावेच लागते. यासाठी सुशांतला,त्याच्या सहन शक्तीला सलाम करत मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात.
          युरोपातील देश अंतराने आणि आकाराने ही जवळजवळ आणि छोटी आहेत. पण लंडन ते रोम पर्यंतच्या प्रवासात जाताना जेवढ्या देशांतून आपण प्रवास करत जाणार आहोत, त्या त्या देशातील एका तरी शहराचे वैशिष्ट्य बघत, त्या देशाची तोंड ओळख करून घ्यावी नि,मग पुढे जावे हा सुशांत चा अट्टहास असायचा. परिणामी आम्हालाही आपण बर्‍याच देशांच्या जमिनीवर पाऊल ठेवले.तेथे काहीतरी बघितले. आणि आपल्या पासपोर्ट वर एवढ्या देशांत आपण जाऊन आलो आहोत, याची एन्ट्री बघून समाधान मिळाले. संपूर्ण प्रवासात निसर्गाकडून तर यथेच्छ नयन सुख मिळणार होते हा भाग वेगळा.
     लेंचेस्टाईन,जगातला सर्वात लहान देशांपैकी क्रमांक दोन वर असणारा एक देश.लोकसंख्येने तर केवळ ३७ हजार.'ऑं' म्हणण्याची वेळ आता तुमची आहे. आपल्या देशात लहान लहान तालुक्याची लोकसंख्या  सुद्धा या पेक्षा नक्कीच जास्त असते. एखाद्या टुमदार घरा प्रमाणे हा एक सुंदर असा देश. या देशाची राजधानी 'वडूज'. शहरामध्ये संपूर्ण शहराला ट्राम मध्ये बघून फेरफटका मारला.अवघ्या तासा भरात शहरभर फिरून झाले! सुरुवातीला वडूज म्हटले की एका महाराष्ट्रीयन गावाचे नाव वाटतेय या कल्पनेने हे अगदीच आपल्याला जवळचे आहे असा भास झाला.या राजधानीच्या शहराची लोकसंख्या तर केवळ पाच हजार. पाहताना मजा आली. पण हे सत्य आहे.ट्राम मधून बसत प्रवास करण्याचा हा अनुभव खूप आनंद देऊन गेला. या दरम्यान दोन्ही बाजूंनी दिसणाऱ्या बिल्डिंग्ज व दृश्य याबाबतीत देण्यात येणारी माहिती इत्यंभूत होती. येथील बंगल्यांचे आर्किटेक्चर डिझाईन मात्र खूपच सरस असे दिसले. मनाला खूप भावले ते .फेरफटका मारून आल्यानंतर अवघ्या काही मिनिटात तर आमच्या पासपोर्टवर त्या देशात जाऊन आल्याचा शिक्का मारून मिळाला आम्हाला!तो मारून घेण्याची सक्ती नव्हतीच पण आम्ही आवश्यक ती फीस भरत, तो हौसेने घेतला आमच्या पासपोर्टवर.
        यानंतर आम्ही प्रवेश केला तो 'आॅस्ट्रिया' या देशात. स्वारोव्हस्की या क्रिस्टल वर्ल्डला भेट देत. अतिशय अप्रतिम पद्धतीने विस्तारित केलेल्या या क्रिस्टल वर्ल्ड मध्ये. जुन्या काळी बनवलेल्या क्रिस्टल्स च्या काही वस्तू, वस्त्र यांचे सुंदर प्रदर्शन आहे.हे रंगीबेरंगी प्रदर्शन बघताना आपले डोळे दिपून न  गेल्यास नवल ते काय! आपणही काही वेळेपुरते या सुंदर जगताचाच एक भाग बनून जातो. या खड्यांच्या दागिन्यांचा मनाला मोह होतो.आणि पर्यायाने आपली खरेदी होतेच.
     वॅटन नावाच्या व्यक्तीने बनवलेले विशाल असे क्रिस्टल वर्ल्ड बघावयास प्रवेश करताना एका राक्षसाच्या मुखातून पडत असणारा पाण्याचा धबधबा आपल्याला बराच वेळ खिळवून ठेवतो.आजूबाजूचा हिरवागार परिसर या  राक्षसी चेहऱ्याला संपूर्णपणे हिरव्या तृणाचा विळखा आणि या हिरव्या पार्श्वभुमीवर त्याच्या डोळ्यात बसवलेले मोठे मोठे क्रिस्टल्स आपले लक्ष वेधून घेतात.
      या खड्यांच्या दुनिये भोवती असणारा रम्य परिसर आरामात बसून विश्रांती घेण्यासाठी खुणावतो आपल्याला. त्याच्या साथीला आल्हाददायक हवामान भुरळ घालत रहाते.
          लेंचेस्टाईन मधून इन्सब्रुक ला म्हणजे आॅस्ट्रिया पादाक्रांत करत असताना दिसणारा निसर्गही अप्रतिमच. चारही बाजू डोंगरांनी वेढलेल्या. हिरवळीने नटलेल्या येथील पहाडांचे सौंदर्य हे स्वित्झर्लंड  च्या पहाडी प्रदेशा पेक्षा निराळेच. हे पहाड प्रथम आपल्याला केवळ पांढऱ्या काळया पाषाणाची दिसतात. पण मध्येच कुठे तरी त्याची बर्फाळ शिखरं  उंच होत, आपल्याला बघत आहेत असे वाटते.आल्प्सच्याच पर्वत रांगा पण प्रत्येकाचे आपले सौंदर्य वेगळे.विशेष म्हणजे बाराही महिने ही काही शिखरं बर्फाच्छादित असतात.अशी सुशांतने माहिती दिली आम्हाला.
       स्वाराव्हस्की ते ईन्सब्रुक प्रवासा पासून सुरू झालेली वायनरीची दोन्ही बाजूंना पसरलेली हिरवी गर्द शेती, थेट रोम पर्यंत  आपला पाठलाग चालू ठेवतात.
      त्या दिवशीचा आमचा नियोजित मुक्काम ईन्सब्रुक शहरात होता. पर्यायाने आम्ही जुन्या ईन्सब्रुक शहरात प्रवेश केला. पंधराव्या शतकात ऑस्ट्रियाचा राजा मॅक्स मिलन याने आपली दुसरी बायको,मारिया थेरोसीन कोरझा हिच्या हट्टापायी  बांधलेली सोन्याचे छत असणारी विशेष बाल्कनी बघितली.
      ‌ 'तुम्ही माझ्यासाठी विशेष असे काही  बनवू शकाल का?' असा प्रश्न विचारत राजाला आव्हान दिले.आणि राजाकडून तिने स्वतःसाठी बनवून घेतलेल्या या बाल्कनीच्या छताला २६५७ सोन्याच्या टाइल्स लावलेल्या आजही चांगल्या अवस्थेत आहेत. स्त्रीहट्ट फार पुरातन काळापासून चालू आहे यावर विश्वास बसला. या भागातील जुन्या युरोपियन इमारती बघून त्या काळातही युरोप चांगलेच प्रगतीपथावर होते याची प्रचिती आली.
  एकाच दिवशी आम्ही ब्रेकफास्ट स्वित्झर्लंड च्या झ्यूरिच मध्ये,लंच लेंचेस्टाईन चर्या वडूज मध्ये तर,डिनर आॅस्ट्रिया च्या ईन्सब्रुक मध्ये घेतले आणि एकाच दिवशी युरोपातील तीन देशांना भेटी दिल्याचा अनोखा आनंद लुटला.
     अशा पद्धतीने, लेंचेस्टाईन आणि ऑस्ट्रियाची ही धावती भेट सुध्दा आमच्या पारड्यात थोडाफार आनंद टाकूनच गेली असे म्हणता येते. संपूर्ण प्रवासात निसर्ग तर वेगवेगळ्या अँगलने आपले रूप दाखवत तृप्ततेचा नजराणा आम्हाला बहाल करत होता हे सांगणे न लगे.

    ‌‌*भाग ८ समाप्त*
    *क्रमश:*

       * © नंदिनी म.देशपांडे*

💖💖💖💖💖💖💖💖

शुक्रवार, २९ जून, २०१८

*मला भावलेला युरोप* भाग सात.

* मला भावलेला युरोप*
          भाग. ७

          आल्प्स पर्वतांच्या कुशीमध्ये विसावलेला युरोपचा भाग म्हणजे ,जणू काही प्रत्यक्ष स्वर्गच. प्रत्येक ठिकाणचे आपले असे वेगळे वैशिष्ट्य वेगळेच सौंदर्य.निसर्गाचे एक वेगळेच रूप आपल्या मनावर राज्य करते. माउंट टिटलिसच्या सौंदर्य स्थळांवरुन अजून बाहेरही आलो नव्हतो आम्ही, तर दुसऱ्या दिवशीची रम्य सकाळ आम्हाला,झुंग्फ्रौ येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद देण्यासाठी आसुसलेली होती.
      मे महिन्याच्या प्रखर उन्हामुळे अंगाची लाहीलाही अनुभवत असणाऱ्या मराठवाड्याच्या वाळवंटातील आम्ही.पण 'आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन' अशी आमची स्थिती झाली यावेळी. या तीन हजार पाचशे मीटर उंच असणाऱ्या ठिकाणासाठी निघालो आम्ही त्यावेळी.
       आल्प्स् पर्वतांच्या प्रदेशात जसे आपण प्रवेश करतो तसे पर्वतांच्या पोटातून जाणाऱ्या भरपूर रस्त्यांवरुन आपला प्रवास सुरू होतो. ज्याला आपण प्राकृत भाषेत बोगदा (टनेल्स) असे म्हणतो.
      येथील निसर्गाचा कण नि कण जेवढा सुंदर दिसतो ना तेवढेच सुंदर येथील बोगदे सुद्धा. लांबच लांब अंतर स्वतःच्या पोटामध्ये सामावून घेणारे हे बोगदे बनवण्याची तंत्रज्ञान, लाईट्स आणि अर्थातच त्यांचे मेंटेनन्स बघून थक्क व्हायला होते ! स्वित्झर्लंड या देशाला, 'बोगद्यांचा देश'असेही संबोधले जात असावे असे वाटते.एवढे ते  सुंदर बनवलेले आहेत. ही  म्हणजे तेथील सौंदर्यस्थळेच आहेत. यातून होणारा प्रवासही तेवढाच रोमहर्षक ! यामुळे आपण घाटातून वळणावळणाने प्रवास करतोय असे अजिबात जाणवत नाही.अगदी सहज सुंदर प्रवासाची ही अनुभूती आहे.
    ल्यूझर्न ते झुंग्फ्रौ या प्रवासादरम्यान आम्हाला एक निसर्गाचे अप्रतिम   लेणं बघावयास मिळालं.
स्वित्झर्लंड मध्ये प्रवेशताच, बघितलेला ह्राईन धबधबा आणि नंतरचा हा,ग्लेशिअल धबधबा. दोघांचे आपले सौंदर्य, वैशिष्ट्य पूर्णपणे वेगळे.निसर्गत:च वाहात असणार्‍या पाण्याचीच ही दोन रुपं, पण एक स्वतःच्या शुभ्र पणाला आसमंतात व्यापून टाकणारा, तर दुसरा अगदी वरपर्यंत आपल्या उगमस्थानाच्या टोकापर्यंत घेऊन जाणारा, थोडासा भीतीदायक.
          ग्लेशियल वॉटरफॉल! अर्थातच अवनीचे हे लावण्य न्याहाळत न्याहाळत केलेला हा  प्रवास.मन ,वृत्ती आणि शरीर या तिघांनाही उल्हासित बनवणारा. ज्यावेळी आपण या ठिकाणाच्या  पायथ्याशी पोहोचतो ना,त्यावेळी येथे एखादा धबधबा असेल अशी पुसटशीही कल्पना येत नाही आपल्याला. पण, एक भलामोठा उंचच उंच अशा काळ्या पाषाणापासून  बनलेल्या अखंड पहाडाच्या पोटातून आपण काही अंतर लिफ्ट ने तर,काही अंतर उंच पायर्‍यांनी वर चढू लागतो. अजूनही पाण्याचा आवाज नाही की, त्याच्या अस्तित्वाच्या खुणाही नाहीत. असे चांगलेच भयावह वातावरण असणारे हे ठिकाण. केवळ पाषाणात झिरपत जाणारा ओलावा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या निसरडे पणावरुन स्वत:लाच सांभाळत सांभाळत वरती चढताना आपण पहाडाच्या अगदी वरच्या टोकावर अंधार कोठडीत जातो आहोत असे वाटते. तेथून मग कुठून तरी येणारी पाण्याची धार जेंव्हा आपल्या भेदरलेल्या डोळ्यांना दिसते ना, तेव्हा नि:शब्द व्हायला होते. निसर्गाच्या या रूपाला बघून आपण स्तिमितच होते.
        कुठून तरी पहाडाच्या एका छोट्या कपारीतून सूर्यप्रकाशाचा झरोका दिसतो, तेवढाच काय तो दिवसाची वेळ आहे हा सांगणारा पुरावा.वरती छोट्या असणाऱ्या या धारेच्या मागोवा घेत घेत आपण खाली जेंव्हा उतरत जातो, त्यावेळी पहाडाच्या कडेकपारीतून मिळेल त्या मार्गाने छोट्या छोट्या झऱ्यांना सामावून घेत घेत खाली उंचावरुन आपटत पडणारा पाण्याचा आसुरी नाद करणारा असा हा प्रवाह बघितला.आणि निसर्गाचं हे अद्भुत विश्व जवळून बघितल्याचे समाधान मनाला भरून राहिले.
    आत्तापर्यंत मी माझ्या आयुष्यात बघितलेल्या सर्व धबधब्यांमध्ये मध्ये सर्वात भयानक वाटणारा पण  अफलातून असा हा ग्लेशिअल धबधबा!
       एवढा मोठा गड चढत बघितलेला धबधबा पाहून आम्ही  जेंव्हा गड उतरलो, त्यावेळी मोहीम फत्ते झाल्याच्या आविर्भावात आम्ही युरोपातील सर्वात उंच ठिकाणी जाण्यासाठी 'ल्यूटरबर्न' या ठिकाणी आलो. येथूनच 'कॉगव्हील'नावाची ट्रेन आम्हाला सर्वात उंच असणाऱ्या, (3500 मीटर) युरोपातील स्टेशन वर घेऊन जाण्यासाठी सिद्ध झालेली होती. अशा वर चढत जाणार्‍या अद्भुत रेल्वेमध्ये बसताना फार आनंद वाटला. आपल्याच रेल्वे ट्रॅक सारखाच याही रेल्वेचा ट्रॅक असतो.पण दोन चाकांच्या मध्ये कात्रेकात्रे असणारे आणखीही एका आगाऊ चाकाची आणि त्यासाठी दोन रुळांच्या मध्यभागी एक कात्रणे असणाराच अगाऊ बेल्ट असतो. अशी खास रचना आहे या रेल्वेची. जेणेकरून चढत असताना उतारावर रेल्वेचा तोल जाणार नाही.
         पुन्हा एकदा बहुविध प्रकारचं लेणं लेवून तेवढेच शांत, सोज्वळ अवनीचं बहरलेलं लावण्यं तिच्या या अप्रतिम रुपड्या कडे लक्ष वेधून घेत होतं. जाताना सुरुवातीला हिरवाई च्या  पानाफुलांच्या नक्षीने विणलेली, त्याला शुभ्रधवल अशा जलधारांच्या उंचावरून पडणाऱ्या कंगोर्ऱ्यांचे काठ असणाऱ्या शालूने सजलेली ही अवनी, कॉगव्हील ट्रेन जशी जशी उंचावर चढू लागते,तशी हिरव्या रंगाचा शालू बदलून ती चंदेरी रंगाच्या भर्जरी शालू नेसून तयार झाली आहे असे वाटत होते. सर्वदूर पसरलेल्या आकाशाला गवसणी घालणारे आणि शुभ्र धवल रंगांने सजलेली  शिखरं! त्यांच्याशी स्पर्धा साधण्याचा प्रयास करणारे आकाशातील ढग. या पार्श्वभूमीवर डोकावून खाली बघणारे आकाशी रंगाचे आभाळ !काय विलक्षण विलोभनीय दृश्य दिसत होते ते! संपूर्ण अवकाशावर जणू या शुभ्र पांढर्‍या हिम राजाचे राज्य होते.
        युरोपातील सर्वात उंचावरील रेल्वे स्टेशन वर पोहोंचण्यासाठी लागणारा दीड तासाचा हा वेळ म्हणजे आमच्या डोळ्यांना ही एक मनोहरी अशी पर्वणीच होती.अगदी उंच पॉइंटवर पोहोंचल्यानंतर तर आपण स्वप्नात तर नाहीत ना? अशी शंका येण्याइतपत या ठिकाणची अप्रुपाई जाणवत होती.येथेही तापमान मेंटेन करत बांधलेले हॉल्स आहेत. खूप जणांना या ठिकाणी श्वासाला  अडचण येऊ शकते.आम्हाला ही शक्यता गृहित धरून पूर्वीच कापूर वडीचे पॅक देण्यात आले होते.असा काही त्रास जाणवू लागला तर तो हुंगण्या साठी  याचा उपयोग करा अशा सूचनां सह.
     खरोखर जेंव्हा आम्ही प्रत्यक्ष अगदी उंचीवर होतो त्यावेळी अतिशय देखणा सर्व बाजूंनी केवळ शुभ्र बर्फ बर्फ आणि बर्फच होता! नजरेच्या टप्प्यात न मावणारा, अथांग सागरासारखा पसरलेला! शुभ्रतेचा कळस! डोळ्यांना सुद्धा भूल पडेल की हा बर्फ आहे की धूकं? तेथे थोडा हिमवर्षावही  चालू होताच. अगदी अविस्मरणीय दृश्य आणि अर्थातच त्यातून मिळणारा मोदही तसाच!
         वेगवेगळ्या पहाडांवर व्ह्यू बघण्यासाठी चे केलेली पॉईंट्स ची रचना तर अतिउत्तम.बर्फाळ पहाडांच्या रांगा यातील दऱ्याही बर्फाळ आणि पडणारा पाऊस ही बर्फाचाच! अवर्णनीयच होतं सार. कितीही ठरवले,तरीही खूप जास्त वेळ थांबू शकतच नाही आपण येथे. नाही म्हटले तरी हवेमध्ये ऑक्सिजनचे असणारे कमी प्रमाण आपल्याला थोडेसे घाबरवून सोडतेच. त्यानंतर आम्ही आलो बर्फाच्या महालात. दोन पहाडांच्या कपारीत बनवलेला महाला मध्ये. बर्फात बनवलेल्या शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. येथे अखंड अशा बर्फाच्छादित पहाडाच्या पोटात, वेगवेगळे प्राणी पक्षी यांचे मनोहरी पुतळे बनवलेले दिसून येतात. याबरोबरच एवढ्या उंच ठिकाणी पोहोचण्यासाठी झालेले प्रयत्न व  त्या मागचे तंत्रज्ञान काय आहे? यांची माहिती पुरवणारे प्रदर्शनही होते तिथे.या सर्व बाबी खरोखरच नि:शब्द करून थक्कच करणाऱ्या आहेत. निसर्गाचे वैविध्याने नटलेले रूप डोळ्यात साठवून आम्ही नंतर झ्यूरिच शहराकडे प्रस्थान केले.

       *भाग ७ समाप्त.*
    *क्रमश:*

      *© नंदिनी म.देशपांडे*

🗯🗯🗯🗯🗯🗯🗯🗯

बुधवार, २० जून, २०१८

*मला भावलेला युरोप*

*मला भावलेला युरोप*
         ‌ ‌‌*भाग-६*

       निसर्गसौंदर्याचा यथेच्छ आस्वाद घेत घेत ल्यूझर्न येथे पोहोचल्यानंतर रात्रीच्या जेवणावर मस्तपैकी ताव मारला.
              युरोपात जेवणाचे फार हाल होतात, त्यातही व्हेज खाणाऱ्यांना तर विचारायलाच नको वगैरे काही गोष्टी मात्र येथील जेवणाने फोल ठरवल्या. तेथील स्थानिक लोक खास इंडियन डिशेश चाखण्यासाठी हॉटेलमध्ये येतात हे ऐकून छान वाटले. आम्हाला भारतीय रेसिपीने तयार केलेले शाकाहारी जेवण सर्वत्र उपलब्ध झाले.  गंम्मत अशी होते की, तेथील हॉटेल्समध्ये काम करणारी माणसं खूप कमी असतात. कारण कमी लोकसंख्येचा परिणाम. शिवाय त्यांना एकदम येणाऱ्या गर्दीची सवय नसते. त्यात आपल्या भारतीय लोकांचा उतावळेपणा.तो कुठेही गेलो आपण तरी तात्पुरता सुद्धा दूर करण्याची सवय नसते आपल्याला. त्यामुळे हे हॉटेल्स मालक गोंधळून जातात बिचारी. तरी बरं,ते अशावेळी आपल्याच अख्ख्या कुटुंबाला कामाला लावतात हॉटेल्समध्ये.
         दुपारचे, रात्रीचे जेवण चांगले तर मिळालेच पण सकाळचा नाश्ता सुद्धा अगदी चौरस मिळायचा.नाही म्हणायला नाश्त्याचे हाल झाले  थोडे,ते इटलीत गेल्यानंतरच.पण युरोपात असेपर्यंत वेगवेगळ्या फ्लेवर्स च्या आइस्क्रीमचा  फडशा पाडताना फार मजा आली.थंडीत आइस्क्रीम खाण्याची खरी मजा काय असते हे अनुभवले.
        रात्री मस्तपैकी आराम करून शारीरिक थकव्याला पळवून लावले. हवामान एवढे आल्हाददायक असते की, मानसिक थकवा कधी जाणवलाच नाही मुळी.
        दुसरा दिवस उजाडला तो मनाच्या प्रसन्नतेच्या वेगवेगळ्या रंगांच्या फुलांची शिंपण करतच. आम्हा दोघांसाठी तर हा अगदीच खास असा दिवस होता.अहो, आमच्या दोघांच्या सहजीवनाच्या बांधलेल्या अनुबंधाचा  वाढदिवस होता तो!
        युरोपात फिरण्यासाठी सिझन चांगला म्हणून मे महिन्यात,हा एकच हेतू ठेवून केलेली टूर पण यथावकाश तारखा बघितल्यानंतर आमच्यासाठी 'सोने पे सुहागा' अशी ठरली.
        आत्तापर्यंतच्या आयुष्यात लग्नाच्या वाढदिवसाला कधीच ठरवून असे मुद्दाम कुठेही गेलो नव्हतो आम्ही. पण यावेळी योगायोगाने थेट स्वित्झर्लंड मध्येच.आणि तेही माउंट टिटलिस ला!माझा विश्वासच बसत नव्हता,पण खरे होते हे!
          अशा या प्रसन्न सकाळी नाश्ता करून आम्ही माउंट टिटलिस च्या दिशेने बर्फाच्छादित पहाडांच्या सानिध्यात काही वेळ राहण्यासाठी निघालो.त्यावेळी मराठीतील एक प्रसिद्ध नाट्यगीत रामदास कामत यांनी गायलेलं, 'साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वतांची' हे गाणं वारंवार ओठांवर येत होतं.
        पुन्हा एकदा निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य डोळ्यात साठवत साठवत आनंदाच्या रोमांचकांची शॉल अंगावर ओढत आमची बस हिमशिखरां कडे धाव घेत होती.
           जाताना रस्त्यात स्वित्झरलँड मधील पारंपारिक घरं मोठ्या विनम्रतेने आमचे स्वागत करत आहेत असे वाटले. अंतराअंतरावर असलेल्या, मोठ्या झोपडीवजा डिझाइन्स असणाऱ्या या घरांना 'शॅलेट'असे संबोधले जाते. किमान टू बीएचके असणारी ही शॅलेटस् दिसावयास अतिशय गोड लहान मुलांसारखी वाटतात.
          एकूणच युरोपात घरांच्या खिडक्या रंगीबेरंगी फुलझाडांनी सजवलेल्या दिसतात. ज्या घरातील खिडक्यां मधील बागेची जास्त निगा घेतलेली दिसून येते, त्या घरातील गृहिणी या संसारामध्ये रमणाऱ्या संसार करण्याची आवड बाळगणाऱ्या असतात.असा येथील लोकांचा समज आहे.
         हे ऐकताना मला आपली एक म्हण आठवली,'अंगणा वरून त्या घराची शोभा कळते' म्हणतात ते खरंच आहे.
          झोंबणारा हवेतील थंडावा आपण हिमशिखरांच्या अगदी जवळ आलो आहोत,याची वर्दी देत होता. गाडीतूनच दृष्टिक्षेपात आलेली ही शुभ्र बर्फाच्छादित शिखरं आम्ही आपल्या काश्मीर भेटीच्या वेळी जम्मूला जाताना दिसणाऱ्या हिमशिखरांची पुन्हा आठवण करून देत आहेत असे वाटले.
        आजच्या प्रवासाला सुरुवात करतानाच, आमचा टूर लीडर आणि सहकारी मित्र मैत्रिणी या सर्वांनी चॉकलेटस्, ग्रीटिंग आणि हॅपी कपलचा बॅच देऊन आम्हाला दिलेल्या शुभेच्छा आमच्या आजच्या खास दिवसाची रंगत वाढवत होताच.
        अशा आल्हाददायक वातावरणात, स्वच्छ निळ्या पाण्याने भरभरून व   झुळझुळ मंजुळ आवाज करत  अशी बाजूनेच वाहणारी नदी जणू आम्हाला तिच्या उगमस्थानाकडे जाण्याचा मार्ग दाखवत होती.
         आम्ही माउंट टिटलिस च्या केबल कारच्या स्टेशनवर पोहोंचलो. काय सुंदर निसर्ग होता तो! चौफेर नजर फिरवताना कोणते दृश्य जास्त छान याचा अजिबात अंदाज येत नव्हता. वातावरणातील नितळपणा मनाला भूल घालत होता व हिम कड्यांवर जाण्यासाठी आतुर बनवत होता.
       ‌ येथून चालू झाला आमचा केबल कारचा प्रवास. सेंट्रल स्वित्झर्लंडच्या सर्वांत उंच ठिकाणी जाण्यासाठीचा.खूपच मस्त असा अविस्मरणीय.केबल कारमध्ये बसून न्याहाळलेला निसर्ग फंटास्टिकच. असे दृश्य भारतीयांना अगदी दुर्मिळच. या हिमाच्छादित पहाडांच्या रांगा, त्यांच्या कुशीत निर्धास्तपणे विसावलेल्या अरुंद दिसणाऱ्या नागमोडी दऱ्या तर त्यातील ती हिरवीगार काळपट रंगाची उंचच उंच झाडी,आम्ही येत आहोत याचा सांगावाच जणू देण्यासाठी आलाय असे वाटणारा एखादा मध्येच उडणारा पक्षी आहाहा अवर्णनीयच!बर्फाळ पहाडांत मिळेल त्या ठिकाणी सपाट जागा बघून स्किईंग करणारी हौशी आणि अर्थातच शूर असणारी मंडळी दिसत होती.बर्फावरून घरंगळत खाली येताना त्यांना बघून आपल्याच काळजाचा ठोका चुकेल की काय असे वाटत होते.
        अपेक्षित स्टेशनवर पोहोचल्या नंतर चौफेर असणाऱ्या बर्फा मध्ये खेळताना शुभ्र सफटिकासारखा  चकाकणारा बर्फच बर्फ बघून, अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटत होते.पायी चालताना काय कसरत करावी लागली!आपण खाली पडलो तर कपाळमोक्ष होणार नाही, पण थिजून बसण्याची धास्ती मात्र होती. त्यामुळे खूप विचार करत एक एक पाऊल टाकताना नव्यानेच चालता येणाऱ्या बाळाच्या पावलांची आठवण झाली.
        अशा या  शुभ्र बर्फावर ऊन्हं चमकण्याचा नजारा तर फारच सुंदर दिसला. चहूबाजूंनी बर्फच बर्फ होता, तरीही ऊन पडल्यानंतर बर्फावर असताना सुध्दा भासणारी उन्हाची तीव्रता जाणवून आश्चर्य वाटले. आईस फ्लायर नावाच्या एका बेंच सारख्या,पडू नये यासाठी समोर रॉड लावलेल्या एका केेबल प्रकारातून बर्फाच्छादित प्रदेशात सैर करून येणे, हा सुद्धा खूपच रोमांचकारी अनुभव होता.
         भरपूर फोटो काढून समाधान झाल्या नंतर आम्ही तिसर्‍या माळ्यावर असणाऱ्या एका खास फोटो स्टुडिओ मध्ये गेलो.या बर्फाच्छादित प्रदेशावर या ठिकाणी पाच माळ्यांवर वर्गीकरण करत आवश्यक त्या सोयी पर्यटकांना उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. शिवाय तापमानाचे नियंत्रण करून मोठ्या मोठ्या हॉल्सची रचना अतिउत्कृष्ट.पर्यटकांचा एवढा विचार जर आपल्याही देशात झाला असता तर, निश्चितच पर्यटन हे एक उत्तम प्रकारचे आर्थिक साधन बनले असते आपल्या देशासाठी असे वाटते.
         बर्फाळ हवामानाचा मनसोक्त आनंद घेत तिसर्‍या माळ्यावर असणाऱ्या खास अशा स्टुडिओमध्ये ओळीत उभे राहिलो. तेथे केवळ एकाच प्रकारचे फोटो काढले जातात. जे की आपल्या भारतीयांना चक्क इंग्रजी पोशाख चढवून वरकरणी इंग्रजाळलेले बनवतात आणि झटकन फोटो काढून पटकन आपल्याला त्याची कॉपीही देतात. आपल्या दृष्टीने अति महागडा असणारा हा फोटो हौशी माणसं नक्कीच एक आठवण म्हणून काढतात. आणि ही आपलीच छबी आहे का! याचा विचार करत हसू लागतात.
        आमची मॅरेज एनिव्हर्सरी होती त्या दिवशी,म्हणून त्या दिवसाची एक खास आठवण आम्हीही फोटोत कैद केली.
          त्याच माळ्यावर बर्फाची गुहा बघितली. आश्चर्य वाटलं ना? अक्षरशः पहाडात जशी गुहा आपण बघतो,तसेच या बर्फाळ पहाडात कोरलेली ही गुहा चारही बाजूंनी बर्फच बर्फ आणि त्यात आपण. हे चित्र खरोखर आपल्यासाठी आश्चर्यकारकच.
         पाचपैकी एका माळ्यावर प्रशस्त असे हॉटेल आहे. एवढ्या उंचावर आणि चोहोबाजूंनी बर्फच बर्फ असणाऱ्या या ठिकाणी गरमागरम इंडियन जेवणाचा आस्वाद घेतला. आहे की नाही गंम्मत!शिवाय चहा, कॉफी,हॉटचॉकलेट या पेयांचा आस्वादही थोडी गर्मी निर्माण करत मजा आणतो. सर्वात कडी म्हणजे, एवढ्या थंड वातावरणात आम्ही तेथे चक्क आईस्क्रीम चाखून पाहिले.लढाई फत्ते केल्याचा फील  आला अक्षरशः यावेळी.
       बर्फाळ पहाडांवर येथेच्छ आनंद लुटल्यानंतर आम्ही माउंट टिटलिस वरतून पुन्हा खाली ल्यूझर्न शहरात उतरलो.
         लॉयन मोन्यूमेंट हे एक आकर्षण आमची वाट बघत होते. फ्रेंच राज्यक्रांतीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंड मध्ये ६५० सैनिक कामी आले होते, तर काहींना फासावर लटकवले गेले होते. त्यांच्या स्मरणार्थ १० ऑगस्ट १८२१मध्ये खुले झालेले हे लॉयन मॉन्युमेंट होय. येथे एका तलावाच्या काठावरील पहाडाच्या कपारीत पाठीत खंजीर खुपसून मारलेल्या सिंहाचा पुतळा आपल्याला बघावयासही उदासवाणा वाटतो. शिल्प बनवणाऱ्याने सर्व भाव व्यवस्थित कोरलेले दिसतात.
      अतिशय प्राचीन, आजही चांगल्या स्थितीत आहे असा वाहतुकीसाठी खुला असणारा, फुलांनी व पेंटिंग्जने सजवलेला वुडन ब्रिज दुरूनच बघितला.
       ल्यूझर्नच्या बाजारपेठेतही फेरफटका मारला. पण प्रकर्षाने घ्यावे असे आपल्या 'बजेट 'मध्ये बसणारे काहीच नव्हते. आपल्या देशातही हल्ली सगळेच मिळते. शिवाय, बॅगांचे वजन वाढवू द्यावयाचे नाही. या सबबीखाली आम्ही शॉपिंग करणे टाळलेच. चॉकलेट्स मात्र भरपूर खरेदी केले त्याचा मोह नाही सुटू शकला.
      युरोपात साधारण नेदरलँड पासून ठिकठिकाणी  छोट्या मोठ्या अशा काऊ बेल्स ,(गाईंच्या गळ्यात बांधण्याची घंटी.)  विकण्यासाठी ठेवल्याचे दिसले. त्यांचा आवाज ऐकून मला लहानपणी आजोबांकडे गोठ्यात, रानातून चरत परत आलेल्या गाईंच्या वाजणाऱ्या गळ्यातील घंटीच्या आवाजाची आठवण झाली.तो आवाज व हा घंटीचा आवाज   अगदी हुबेहूब होता.
     ल्यूझर्न मधील त्या दिवशीची संध्याकाळ ही सुध्दा खूप खुश करणारी ठरली. तेथील भव्य अशा स्वच्छ निळ्याशार पाण्याच्या लेक वर,ज्याच्या काठावर बसून आम्ही बदकांना मनसोक्त बागडताना बघितले होते.अशा या लेक वर क्रुझ डिनरचा एक वेगळाच अनुभव मिळाला.
         संगीत वाद्यांच्या  संगतीने वेटर कडून टेबलवर सर्व्ह होणारे, मस्तपैकी एन्जॉय  केलेले हे डिनर आजही लक्षात आहे. त्यानंतर हौशी लोकांनी डीजे वर केलेले नृत्य तर झपाटून टाकणारे असेच.
      अशा पध्दतीने आमच्या उभयतांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस अविस्मरणीय पद्धतीने साजरा होऊन आमच्यासाठी एक अविस्मरणीय आठवण बनून राहिला हे मात्र खरे.

         भाग-६ समाप्त.
          क्रमशः

   * ©* *नंदिनी म. देशपांडे .*

💝💝💝💝💝💝