शुक्रवार, १२ एप्रिल, २०१९

गटचर्चा.

👨‍👩‍👧‍👧👩‍👩‍👧   **गटचर्चा** 👩‍👩‍👧👨‍👩‍👧‍👧______________                       

हल्ली अबालवृध्द सारेच स्मार्ट फोन वापरण्यासाठी चांगलेच सरसावलेले दिसतात.प्रत्येकाची मनातून आपण कोणत्या ना कोणत्या व्हॉट्स्अॅप ग्रुप चा मेंबर असण्याची सुप्त ईच्छा असतेच असते.आत्ता पर्यंत या फोनच्या फायद्या तोट्याची वीट येईपर्यंत चर्चा एेकली आपण ,आज थोड्या गमती जमतींचा उहापोह करू या .......ही आपण अनुभवत असणारी गम्मत गांभिर्याने विचारात घेऊ या का ?असा विचार मनात चालू झाला आणि अस्मादिकेने  ते मांडण्यासाठी मोबाईलचा की बोर्ड सराईतपणे वापरावयास सुरुवात सुध्दा केंव्हा केली हे त्यांनाच कळले नाही......
   खरी मजा येते ती ग्रुप चॅटिंग करताना....ग्रुप बनवताना विशद केलेले उद्दिष्ट केंव्हा लुप्त होते आणि मैत्रीचा मेळावा दररोज नव्याने कधी भरतो हे समजत सुध्दा नाही.....खरे तर हा मेळावा जागत्या पहाऱ्या सारखा सतत चालूच रहावा ही प्रत्येक मेंबरची अभिलाषा त्याच्या कार्य बाहुल्यामूळे आणि झोपेच्या आवाहनापुढे नाईलाजाने नांगी टाकते.....
   मेंबर्स ची संख्या गटात जशी वाढेल तशी या चर्चेची रंगत वाढत जाते.....कधीही न बोलणारे ,तोंडाला केवळ कुलूप लाऊन वावरणारे येथे मात्र चुरुचुरु बोलू लागतात....वाढते मेंबर्स अशा आविर्भावात वावरतात की जणू काही राजकारणात करतात तशा शक्ती प्रदर्शनाची ही रंगीत तालिमच आहे..    गप्पांचा फड रंगला की हळू हळू एक एक जण आपली एंट्री झोकात मारून जातो.
    ओघानेच रंगत वाढत जाऊन त्यात हालहवाल विचारता विचारता गप्पांची गाडी कुणाची तरी फिरकी घेऊन त्याची खेचता खेचता विनोदी चुटकुल्यांच्या ट्रॅक वर थांबत, सांकेतिक भाषेत वेगाने धाऊ लागते नि हास्याच्या फवाऱ्यांमध्ये साऱ्यांना भिजवून जाते,सर्वांचाच ताण वाहून जातो....
‌आपण या ग्रुपचा मेंबर आहोत ही भावना सुखाऊन जाते..   नियमीत हजर होणाऱ्या पैकी एखादा जरी आला नाही तर त्याच्या काळजीने बाकीच्यांचा जीव व्याकूळ होतो...  
     एखादा दिवस कोणाच्या तरी वाढदिवसाने उगवतो ,शुभेच्छांच्या वर्षावात त्याचे बालपण घेऊन येतो....हे सर्व चालू असतानाच कोणीतरी मध्येच  एखाद्या सोशल किंवा अति महत्वाच्या व्यक्तीच्या पुण्यतिथी किंवा निधनाची बातमी देतं.....आणि या योगा योगाला काय म्हणावे ?याला पर्याय न सापडता सारे निःशब्द होतात आणि मिळणाऱ्या निरागस आनंदावर विरजण पडते...
एखादा दिवस दुःखद बातमी घेऊन आला तर तो उदासवाणे पणा घालवण्यासाठी कोणी तरी विनोदी चुटकुला टाकते.अशा वेळी काय प्रतिक्रिया द्यावी?हा एक यक्ष प्रश्नच बनतो.....
  या चॅटिंग मधून एक मात्र लक्षात येते ,यातून प्रत्येकाच्या स्वभावाचे कंगोरे,त्याचा बाझ, विचारशैली या कांही गोष्टी उमटतात...
    क्षकोणी केवळ इमोजींच्या माध्यमातून व्यक्त होतो,तर कोणी उपदेशाचे डोस देत आपला शिक्षकी बाणा सांभाळतो.एखादा विनोदाचा बादशहा म्हणून मिरवतो आणि एखादा आपल्या साहित्यिक आवडीची हौस भागवून घेतो...   
     सकाळी तर सुविचारांचा एक मोठ्ठा ग्रंथच बनतो मोबाईल म्हणजे. केवळ वाचून डिलीट करण्या साठीच असतात ते....नमनाला गणपती असतो ना तस्सेच.....एखादी सहज टाकलेली पोस्ट वर्मी लागते कोणाच्या तरी ,मग काय त्याचा गैरसमज दूर करण्या साठी नाकीनऊ न आले तर नवलच....राग आलेला असतो तो खरा की लटका हे समजायला कांही मार्गच नसतो....नियमीत हजेरी लावणारांना आपण वेडे तर नाही आहोत ना ?याचा आढावा घ्यावासा वाटतो जेंव्हा, 'हो हो ग्रुप तुमच्याच मुळे चालू आहे ' अशी जेंव्हा उत्तरं एेकावी लागतात...
‌ एखाद्या दिवशी काहीही न टाकता बघ्याची भुमिका घ्यावी असेच वाटते ....त्या त्या दिवसाचा आपला मुड, त्याला सांभाळावेच लागते शेवटी.....पण गटचर्चेची सवय स्वस्थ बसूच देत नाही माणसाला..
  आनंदात ,उत्सवात भागिदारी समाधान देते तर दुःखद प्रसंगात मानसिक आधार.. 
   अमुर्तपणे आपण आपल्या माणसांच्या,मित्रमैत्रिणींच्या,सहकाऱ्यांच्या ,कुटुंबाच्या सहवासात आहोत ही जाणीव आधार देऊन जाते आणि स्मार्ट फोन चे पैसे फिटले केंव्हाच याच्या समाधानाने मन एक सुस्कारा सोडते.....पुनःपुन्हा फोन हातात घेते....एक जादुची पेटी म्हणून किंवा एक खेळणं म्हणून......

©नंदिनी म. देशपांडे.

🌷🌷🌷🌷🌷🌷

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा