शनिवार, २९ डिसेंबर, २०१८

भरती ओहोटी.

*भरती -ओहोटी*

लेखिका :
*नंदिनी म. देशपांडे.*

            ‘आ’  म्हणजे आनंद आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर. 'आई 'या शब्दाची फोड अशी केली जाते. या अर्थाने आई म्हणजेच ‘ईश्वराला झालेला आनंद' !किती व्यापक अर्थ आहे हा !स्त्रीने इवल्याश्या जीवाला जन्म दिल्यानंतर झालेला आनंद शब्दातीतच असतो. तिच्या शारीरिक सृजनशीलतेला आलेले फुल
म्हणजे तिचे बाळ.

      आपण एखादे फुलाचे रोपटे घरातील बागेच्या कुंडीत लावल्या नंतर काही दिवसांनी त्यावर फुललेले फुल बघून आपल्याला मनस्वी आनंद होतो.  मग बाळ झाल्यानंतर आईला होणाऱ्या आनंदाची उपमा किंवा तुलनाच म्हणा ना! अगदी ईश्वराला होणाऱ्या आनंदाशीच केली जाते. हा एका आईचा सन्मानच म्हणता येईल.

     थोडक्यात आपल्याला निश्चित असे म्हणता येते की,आई आपल्या सोबत असणे, तिच्या सान्निध्यातील आपले अस्तित्व म्हणजे साक्षात ईश्वराच्या सान्निध्यात घालवलेला आपला वेळ नव्हे काय ? आपल्या बाळाची आई होणं हा निसर्गाने स्त्री जातीला बहाल केलेला नितांत सुंदर अनुभव. छोट्या जीवाला नऊ महिने उदरात वाढवणे, त्याच्या अप्रत्यक्ष अस्तित्वाच्या तिच्या उदरात होणाऱ्या खोड्या झेलणे व त्यामुळे होणारा त्रास स्वीकारत निसर्गनियमानुसार ही आई आनंदाने सहन करते. इतर शारीरिक आणि मानसिक वेदना तिला क्लेशकारकच ठरत असतीलही पण केवळ प्रसव वेदना याच तिच्याकडून आनंदाने स्विकारल्या जातात. त्यासाठी स्त्रीच्या जन्माला यावे हेच खरे !

       पण कधीकधी दुर्दैवाने कितीही  ईच्छा  असली तरीही, एखाद्या स्त्रीला काही अपरिहार्य कारणामुळे तर कधी न उमगलेल्या कारणामुळे प्रत्यक्ष शारीरिक दृष्टीने आई होऊन आईपण उपभोगता  येऊ शकत  नाही .आज मानवाने जीवशास्त्राच्या तंत्रज्ञानामध्ये विलक्षण प्रगती साधलेली  दिसून येते. म्हणतात ना, ‘इच्छा तेथे मार्ग’ तो बरोबर काढलाच जातो. किंबहूणा एखादा तरी मार्ग निघतोच.

       पूर्वी मुल ‘दत्तक' घेणे हा एकच उपाय होता. आपल्याच रक्ताचा अंश आपल्याला मिळावयास हवा. या आत्यंतिक इच्छेपायी विज्ञानाने सरोगसी हा मार्ग सुकर करून दिला आहे. एखाद्या दाम्पत्यांचे स्वतःच्याच रक्ताचे, त्या दोघांचेच जिन्स असणारा असा शंभर नंबरी सोन्यासारखा आपलाच अंश, कृत्रिमपणे बाहेर तयार करुन तो तिसऱ्या एखाद्या महिलेच्या उदरात नऊ महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर वाढवणे आणि त्याचा जन्म झाल्यानंतर ते बाळ आपल्या ताब्यात घेणे. म्हणजे सरोगसी होय. तर असा गर्भ आपल्या उदरात वाढवणारी माता ‘सरोगेटेड मदर’होय.

      आपल्या भारतीय समाजातही गेल्या दहा-पंधरा वर्षात सरोगसीचे फॅड चांगलेच मूळ धरताना दिसून येत आहे.पण या तंत्राचा उपयोग खरोखर ज्यांना आवश्यकता आहे अशांनीच करुन घेणे गरजेचे आहे. आपल्याकडे केवळ गरजेखातर नव्हे तर मुलांची हौस  म्हणून सिंगल पेरेंट ,पहिले मुल  असताना सुद्धा आणखी एक हवे या हट्टापोटी काही सेलिब्रिटी, तसेच नको ते मुल प्रत्यक्ष जन्माला घालून आपली फिगर खराब करून घेणे अशी मानसिकता असणाऱ्या अनेक नट नट्या पैशाच्या जोरावर सरोगसीचा सर्रास वापर करणे पसंत करू लागले आहेत.

       गरीबी  माणसाला स्वस्थ बसू देत नाही. समोरच्या दाम्पत्या कडून या प्रकारासाठी भरमसाठ मोबदला मिळणार.या लालसेने आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिला कोणताही मागचा पुढचा विचार न करता, स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता सरोगेट मदर बनून जणू सरोगसी या प्रकाराचा बाजार मांडू पाहत आहेत.  अशी परिस्थिती वास्तव रूप धारण करते की काय अशी दाट शंका निर्माण झाली आहे. भारतातील विपन्नावस्थेत असणाऱ्या लोकांचा गैरफायदा पदेशस्थ नागरिकच नव्हे तर, परदेशात राहणारे भारतीय सुद्धा, भारतात राहून सरोगसी तंत्राने जन्म घेणारे बालक स्वत:चे बाळ म्हणून परदेशात घेऊन जाऊ लागले आहेत. खरंच एवढी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

      हे तंत्रज्ञान विकसित होऊन बरीच वर्षे झाली तरी, एवढे दिवस कोणत्या नियमांचे बंधन नव्हते. त्याचे दुष्परिणाम लक्षात येऊ लागल्यानंतर आता आत्ताच म्हणजे या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात सरोगसी वरील नियंत्रणासाठी कायदा बनवणारे विधेयक मंजूर केले गेले. कायद्याच्या चौकटीत जर ही बंधने घातली गेली नसती तर न जाणो भारत हा सरोगसी करणाऱ्या मातांच्या संख्येच्या दृष्टीने खूप वरच्या स्थानावर जाऊन बसला असता. शासनस्तरावर या गोष्टीचा गंभीर विचार केल्यामुळे अशा पद्धतीने बाळाला जन्माला घालण्याच्या व्यापारी मनोवृत्तीच्या व्यक्तींना लगाम घातला असे म्हणावयास हरकत नाही. आपण आशा करूया की कोणत्याही पळवाटा न काढता या कायद्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल.

       सरोगसी संदर्भात आत्तापर्यंत केलेले विवेचन म्हणजे, वास्तव आणि तांत्रिक बाजूचे झाले. पण भावनिक बाजूने विचार केल्यास, अशा माणसांच्या म्हणजेच सरोगसीसाठी तयार होणारे दाम्पत्य आणि ते स्वीकारणारी माता, यांच्या मनामध्ये किती वादळं उमटत असावित ,याची  कल्पनाच  न केलेली बरी. खोलवर विचार केल्यास नाईलाज म्हणून स्वीकारलेल्या या पर्यायातील दोन्ही पार्टीज जवळजवळ दहा अकरा महिने अत्यंत तणावयुक्त मानसिक अवस्थेतून प्रवास करत असणार हे निश्चित.

      मी तर असे म्हणेन की, या व्यवहारात आर्थिक उलाढाली पेक्षा सुद्धा भावनिक उलाढाल फार मोठ्या प्रमाणावर होत असणार. आपल्या म्हणजे संबंधित  नवरा बायकोच्या हाडामासाचा अंश दुसऱ्या एका परक्या बाईच्या उदरात नऊ महिने नऊ दिवस वाढवण्यासाठी पाठवणे, हे खूपच हिम्मत बांधून करावयाचे काम आहे.  आपले बाळ सुदृढ, निकोप  बनावे म्हणून संबंधित सरोगेटि स्त्रीकडे, तिचे आरोग्य,तिच्या खाण्यापिण्याच्या राहणीमानाच्या सवयींकडे, तिच्या आर्थिक कौटुंबिक परिस्थितीकडे या बाबत तिच्याशी कितीही करार केले तरी डोळ्यात तेल घालून बघणे खूपच जिकरीचे आहे. एवढे सर्व वेळेवर करूनही बाळाला जन्म दिल्यानंतर ती स्त्री बदलणार तर नाही ना?हा ताण घेऊन फिरणे म्हणजे प्रचंड सहनशक्तीचेच  काम आहे .आपल्या भारतीय समाजात कराराचे भवितव्य अतिशय तकलादू आहे हे बहुतेक करार हे मोडण्यासाठीच केलेले असतात. असा काहीसा समज आहे येथे.

      उलट बाजूने विचार केल्यास उदरात वाढणाऱ्या बाळाच्या हालचाली, त्याच्या गोड गोड नाजूक लाथा, त्याचा हवाहवासा वाटणारा स्पर्श,या सर्व गोष्टींना आई-बाबांना मुकावे लागणे ही त्यांची मानसिक घुसमटच म्हणता येईल. बाळाच्या आईला आपण प्रसववेदना सोसल्या नाहीत ही मनाला लागलेली रुखरुख कायम राहणार ती वेगळीच.

      सरोगेटि करणाऱ्या स्त्रीच्या मानसिकतेचा, भावनांचा विचार केल्यास दुसऱ्याचे मूल जरी तिच्या पोटात वाढत असेल,  मोबदला कितीही मिळाला तरीही  वाढणाऱ्या बाळाची नाळ नकळतपणे तिच्याशी जोडली जातेच. भावनांचे मोल पैशात मोजता येणे शक्यच नाही. उदरात वाढणार्‍या बाळात कितीही जीव गुंतवायचा नाही. असे ठरवले तरीही, एका स्त्रीला निसर्ग नियमांच्या विरोधात वागण्याचा पवित्रा स्वीकारावा लागतो. हे एक कटू पण सत्य आहेच.

    आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कुणाच्यातरी बाळाचे उदरभरण आपल्या उदरातून करणे म्हणजे, आपला एक शारीरिक अवयव भाडे घेऊन पणाला लावण्यासारखे नव्हे काय?

      माणसाला त्याचा मेंदू मृत पावल्यानंतर किंवा त्याचा पूर्ण मृत्यू झाल्यानंतर अवयवदानाचे किंवा देहदानाचे काम पवित्र असे मानले जाते. किंबहुना त्यामुळे कितीतरी लोकांना जीवदान मिळते. याचे समाधान मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला निश्चित मिळते. असे आपण मानतो. पण सरोगसीमध्ये एखाद्या दाम्पत्याच्या संसारात कुटुंबात आनंद, चैतन्य निर्माण करण्याचे काम ही स्त्री करत असते, हे भाग्य हा आनंद ‘याची देही याची डोळा’ प्रत्यक्ष बघणे, हे खरोखरच अवर्णनीय ठरणारेच होय .सरोगेट मदर बनण्याचा काम सुरुवातीपासूनच अतिशय समर्पणाच्या भावनेने केलेले असते .म्हणूनच अनन्यसाधारण महत्त्वाचे आणि आत्मिक आनंद मिळवून देणारे ठरते नक्कीच .

       यासाठी परिस्थिती मोबदला घ्यावयास  भाग पाडते, या स्त्रीला हा भाग निराळा. पण मोबदला घेऊनही आपले मन निगरगट्ट बनवणे ही तिची मानसिक अवस्था तिला खरोखरच कसरत करावयास लावणारी आहे खचितच.

      उपरोक्त प्रकारच्या आर्थिक उलाढालींना लगाम घालण्यासाठी व त्यातून निर्माण होणाऱ्या भावनांची भरती ओहोटी, अर्थात बाळाच्या जन्मा नंतर त्याच्यामुळे आई-बाबांना येणारी आनंदाची भरती व  जिच्या पोटी जन्म घेतला त्या आईच्या भावनांची ओहोटी. यांच्या भावकल्लोळाला बांध घालण्याच्या हेतूने, सरोगसीच्या संकेत आणि नियमांना योग्य तो आकार देत, "भारतीय सरोगसी प्रतिबंधक कायदा २०१६" तयार  करावयाचे शासन स्तरावरचे काम निश्चितच स्वागतार्ह आहे.

     सरोगसीच्या माध्यमातून मूल जन्माला घालणं हा सर्व पैसेवाल्यांचा खेळ आहे. सामान्य किंवा मध्यमवर्गीय लोकांना, कुटुंबांना अजूनही मुल दत्तक घेणे हाच मार्ग  आवाक्यातला वाटतो. त्यामुळे  मूल दत्तक घेऊन त्याचे आई-बाबा बनणे, या पद्धतीवर सरोगसीचा तिळमात्रही परिणाम होणार नाही. हे निश्चित. दत्तक प्रक्रियेतून एका मुलाचे आयुष्य घडवण्याचे होणारे कार्य अलौकिकच आहे. यातून मिळणारे समाधान कोणत्याही मापात मोजता  येणे शक्य नाही.

      थोडक्यात असे म्हणता येते, अगदीच अपरिहार्य परिस्थितीमध्ये जेव्हा टेस्ट ट्यूब बेबीचा विचार होऊ शकत नाही. अशा वेळी मूल दत्तक घेणे आणि सरोगसीच्या माध्यमातून मूल जन्माला घालणे हे पर्याय कायद्याच्या चौकटीच्या बंधनात उपलब्ध होणे.  तो स्वीकारणे. हा मानवाच्या मानसिक प्रगल्भतेचे, सुदृढतेचे आहे असे म्हणता येईल.

*©नंदिनी म.देशपांडे*

💐💐💐💐💐💐

शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१८

शापित बालपण.

*शापित बालपण *

    लेखिका: नंदिनी म. देशपांडे.

  ‘  ए पोऱ्या,चार ग्लास घेऊन ये रे.  अद्रक थोडे जास्त  घालायला सांग रे.’
‘अरे, बाबा दोन कट घेऊन ये.’ किंवा,
‘झाडू फरशी साठी, घरकामासाठी तुझी मुलगी आली तरी चालेल’. हा कामवाली बरोबर चाललेला संवाद. अशा प्रकारचे संवाद दरोज कुठेतरी दिवसभरात कानावर पडतातच आपल्या.

         रसवंतीच्या दुकानावर वरील शब्द कानी पडले, आणि चमकून बघितले तर, एक अकरा बारा वर्षाचा कोवळा मुलगा अंगावर मळकट झालेले कपडे,तुटलेली पायातली चप्पल, व्हिटॅमिन्सच्या डेफिसियन्सी मुळे चेहर्‍यावरील पांढरे डाग. असे रूप घेऊन माझ्या नजरेस पडला. ‘बरं साहेब' म्हणून तो लगबगीने रस काढावयाचा यंत्रा जवळ जाऊन, सराईतपणे दोन हातात चार रसाचे ग्लास घेऊन आला पटकन.
     
       मी माझ्या बालपणात रमले आणि नकळतपणे  आपल्या आणि त्या मुलाच्या बालपणाची तुलना करू लागले. आपले किंवा इतर सुखवस्तू घरातील मुलांचे बालपण किती सुखावह असते. सुरुवातीला चार पाच वर्षाचा काळ खूपच लाड होत असतो.त्यानंतरही तोंडातून पडेल तो शब्द झेलला जातो. अतिशय चांगल्या प्रतीचे शिक्षण होईल अशी शाळा निवडली जाते. कपड्यांचे खाण्याचे काय लाड होत असतात! हे असं होतं  म्हणूनच असे निरागस बालपण पुन्हा पुन्हा यावे असे वाटून, ‘लहानपण देगा देवा’ तोंडातून सहजपणे बाहेर पडते.

               अशी कामं करणारी मुलं, ज्यांना आपण “बालकामगार” अशी संज्ञा देतो.  त्यांना निरागसपण नसतेच मुळी. अकाली प्रौढ बनत प्रौढां सारखी कामं करतात ती! त्यातील बोटावर  मोजता येण्यासारखी काही मुलं जिद्दीने आपल्या स्वतःच्या मनातील शिकण्याची उर्मी काही प्रमाणात पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ते सुद्धा स्वतःच्या कमाईवर !

         निरागस बालपण  त्यांनी का उपभोगू नये ? त्यांना तो अधिकार का नसावा ? का त्यांनी अवेळी कोमजून जावे ? आणि त्यांची ‘बालकामगार’ अशी एक वेगळी कॅटेगरी समाजात कशासाठी तयार व्हावी? या सर्व प्रश्नांचा विचार केल्यास, या सर्व परिस्थितीला केवळ त्यांच्या पालकांनाच दोष देऊन चालणार नाही. त्यांच्याबरोबरच त्यांची आर्थिक परिस्थिती तसेच सामाजिक परिस्थिती ही तेवढीच जबाबदार आहे.

     दारिद्र्यरेषेखाली जगत असणारे त्यांचे आई-वडील हेतुपुरस्सर निसर्ग नियमाच्या विरोधात न जाता कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढती ठेवण्यात धन्यता मानतात.मग त्यांच्या समोर एवढी पोटं भरण्याचा प्रश्न आ वासून  ऊभा रहातो.  दोन वेळा पोटात काही प्रमाणात तरी अन्न जावे हे एकच उद्दिष्ट समोर ठेवत ,आपले मूल दहा वर्षांचे झाले की,  हे पालक त्याला कामाला पिटाळतात. तो कोणते काम करतो? कुठे करतो? वगैरे गोष्टींकडे लक्ष देण्याचा विषय पालकांच्या गावीही नसते. मिळेल ते काम करून चार पैसे आले हातात की आपल्या आई बापाला द्यायचे असतात एवढेच त्यांना माहीत असते.  तो आपले पोट बाहेर काढतोय यातच पालक धन्यता मानतात. त्याला त्यावेळी स्वतःच्या गरजांचा विचार नसतोच.  आर्थिक परिस्थितीमुळे वर उल्लेख केलेल्या वर्गाच्या भावना बधिर होऊन जातात असे म्हणू या आपण....

        पण सभोवतीचा इतर समाज तो का डोळ्यावर कातडे ओढून बसतो? आहे रे आणि नाही रे असे दोन टोकाचे वर्ग का निर्माण व्हावेत? आहे रे म्हणणारा समाज आणखी हव्यास करतो आणि कमी पैशात भरपूर काम करणारा चांगला मुलगा मिळतोय म्हटल्यावर नाही म्हणणे अशक्यच असते. पण स्वतःच्या कुटुंबासाठी मुलांसाठी आराम मिळावा म्हणून या आहेरे वर्गाच्या माणसाच्या मनात एक क्षणासाठी सुद्धा कामावर असणाऱ्या मुलाच्या बालपणाचा विचार डोकावू नये? हा केवढा विरोधाभास!

         रसवंती असुदे चहाची टपरी किंवा हॉटेलमध्ये, किंवा दुकानांमध्ये किंवा घरकामासाठी या सर्वांबरोबर इतर अनेक ठिकाणी १०ते १८ वर्षे वयोगटातील मुले व मुली काम करताना दिसतात. त्यांच्याकडे बघितल्यानंतर खरोखरच मनात खूप कालवाकालव होते. त्यांना दिशा दाखवणारे कोणीतरी पुढे यावे त्यांच्या किमान मूलभूत गरजा तरी पूर्ण झाल्या पाहिजेत  असे वाटत रहाते. असे वाटणारा एखादा समोर येतो, आणि ‘समाजकार्य’ या नावाखाली त्यांना थोडीफार मदत करतो. पण तेवढे पुरेसे आहे का? उलट, या वयोगटातील मुलांना बालकामगार म्हणून कामाला लावले जाणार  नाही अशी सर्वांनी शपथ घेतली पाहिजे. एवढेच नव्हे तर प्रत्येक वॉर्ड मधील नागरिकांनी एकत्र येऊन, एखादी सेवा भावी संस्था स्थापन करावी ज्यातून बालकामगारांसाठी त्यांच्या मानसिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उत्कर्षासाठी सढळ हाताने मदत करावी . त्याला व्यवस्थित मार्गाला लावून केवळ त्याचे आयुष्य नव्हे तर त्याचे कुटुंब ताठ उभे राहण्यासाठी मदत करावी.त्या माध्यमातून समाजकार्य केल्या ची कृतार्थ भावना आठवणीत ठेवावी .

           शासन स्तरावरही केवळ बालकामगारांसाठी जाणीवपूर्वक उपाययोजना केलेली दिसत नाही.भरीव अशी कोणतीही तरतूद केलेली दिसत नाही.बालसुधारगृह, ज्यूवेनाईल कोर्टस, समुपदेशन केंद्र त्यांचे  पुनर्वसन इत्यादी तरतुदी आहेत.पण त्यात बालकामगारां पेक्षा बालगुन्हेगारांना प्राधान्य देऊन केलेल्या योजना जास्त आहेत. प्रौढ कामगारांचे जसे संघटन आहे .ते किमान बहिष्काराच्या मार्गाने जशी  संपूर्ण व्यवस्था ठप्प करु शकतात, असेही काही हत्यार या बालकामगारांच्या हातात नाही.  त्यामुळे त्यांच्यावर होणारा अन्यायही समोर येऊ शकत नाही. बालकांकडून मजुरीचे काम करून घेऊ नये अशी कायद्यात तरतूद असेल, तरीही त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही. पण आपण सर्वांनीच जर बालकांना कामावर ठेवायचेच नाही उलट कोणी काम मागावयास आला तर त्याला शक्य तेवढी आर्थिक मदत करून त्याचे समुपदेशन करावे आणि एखाद्या सामाजिक संस्थेकडे त्याला घडवण्याची  जबाबदारी देऊन समाजाच्या ऋणातून काही अंशी तरी मुक्त व्हावे. असे केल्यास बालकामगार हा समाजातील वर्ग आपोआपच संपावयास मदत होईल. यात शंका नाही. समाजाच्या सुदृढ मानसिकतेचे  हे एक द्योतकच ठरेल.......

  © नंदिनी म. देशपांडे.

💐💐💐💐💐💐

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

* मॅचिंग मंगळसूत्र *

*मॅचिंग मंगळसूत्र*

लेखिका.

*नंदिनी म.देशपांडे*

        पूर्वीच्या काळी गावागावात, चोपेवर, देवळाच्या पारावर, किंवा एखाद्या मोठ्या वृक्षाच्या सावलीत चौथऱ्यावर त्याचप्रमाणे शहरातील मुख्य चौकात, एखाद्या पानठेल्यावर किंवा नाक्यावर लोक समूहाने एकत्र यायचे.  उशिरापर्यंत त्यांचे रात्री गप्पांचे फड बसायचे. त्याच पद्धतीने हल्ली इंटरनेटच्या माध्यमातून,  व्हाट्सअप किंवा फेसबुक यांच्या ओट्यावर बसून म्हणू या हवं तर आपण. तर समूहानेच एकत्र येऊन गप्पांचे फड रात्री उशिरापर्यंत भरलेले दिसून येतात.

        अशाच गप्पा चालू असताना आमच्या एका मैत्रिणिंच्या समूहावर कोणीतरी पोस्ट टाकली. अर्थात ती चक्क एक मंगळसूत्राची जाहिरात होती. “नवरात्रीनिमित्त मॅचिंग मंगळसूत्र मिळतील”. आणि त्याखाली खूप साऱ्या रंगांची वेगवेगळी मंगळसूत्र.अशी पोस्ट होती ती. लगेच एका खट्याळ मैत्रीणींना विचारले मॅचींग नवरा पण मिळतो का ग? झालं, तिने हे विचारले आणि बऱ्याच जणी भराभरा अवतरल्या ना समुहावर ! बहुतेक जणींनी भुवया उंचावल्या. हे चित्र बघून थोडे सावरते घेण्याचा प्रयत्न केला. म्हटलं, आपण निवडलेला जोडीदार हा मॅचिंग असल्या शिवायच लग्न करतो का आपण त्याच्याशी? दुसरीने लगेच नवरा हा मित्र कसा असावा वगैरे वगैरे समर्पक अशा काही पोस्ट टाकल्या. त्यानंतर थोडा वेळ गेला. आम्हा मैत्रिणींचा हसण्या खिदळण्यात.

           जशी रात्र चढत्या क्रमाने वाढू लागली, तसे नेहमीप्रमाणेच माझ्या डोक्यात विचारांची चक्रं ही वेगाने फिरू लागली .दिवसभरात आपल्या कळत नकळत घडणार्‍या गोष्टी, घटना यांचा आढावा मन घेऊ लागले. प्रत्येक गोष्टीचा एक निश्चित अर्थ अशावेळी डोक्यात नक्की होतो.  त्यानुसार मन स्थिर होऊ लागते.

         संध्याकाळच्या मंगळसूत्राच्या त्या पोस्टने सुद्धा मनात चलबिचल वाढवलेली होतीच. मनात आलं मॅचींग मंगळसूत्र आहे, तर मग त्या अनुषंगाने “मॅचिंग नवरा मिळेल का”? हा प्रश्न किती समर्पक असाच विचारला तिने.

             आपल्या भारतीय रूढी-परंपरांमध्ये मंगळसूत्राचे केवढे पवित्र स्थान आहे.सौभाग्य अलंकारातील हा एक प्रमुख दागिना.तो कसा घडवावा? तो कसा असावा? याचे पण काही परंपरागत संकेत आहेत. आधुनिकीकरणाच्या नादात परंपरांना फार पटकन विसरले जाते आपल्याकडून. तसेच काहीसे झाले असणार आणि त्याची परिणती मॅचिंग मंगळसूत्राच्या पोस्टमधून कोणीतरी पसरवली  असेल .दुसरीने विचारले तशी ‘मॅचिंग नवरा मिळेल’ अशी पोस्ट अजून तरी कोणी पाठवलेली नाही. लिव्ह इन रिलेशनशिप या संकल्पनेतून ‘मॅचींग नवरा पहिजे’ही संकल्पना उदयास आली तर नवल वाटू नये.

    वसुधा खूप सालस सोज्वळ, कुटुंब सदस्यांना एकत्रित बांधून ठेवणारी अशी हुशार. मनासारखा जोडीदार मिळाला. दृष्ट लागावी  असा संसारही बहरत गेला .पण दुर्दैवाने नवरा मात्र वाईट सवयींच्या मित्राच्या विळख्यात सापडला.  त्यांच्यातीलच एक बनून गेला. त्यातून बाहेर पडण्याची सुतराम शक्यता नव्हती.अशा उद्विग्न मनस्थितीत जर तिला वाटले, मॅचींग नवरा मिळेल का कुठे?तर? माणसाचे मनच  ते !काहीही विचार येऊ शकतात,नाही का? या मनात.

           वंदना एक होतकरू मुलगी. लग्नाला सात-आठ वर्षे झालेली. दोन छोटी मुलं आहेत पदरात पण तिचा नवरा विपुल अचानक एका अपघातात सापडला. क्षणात होत्याचे नव्हते झाले. तिला नोकरी मिळाली. पण दोन छोट्या बाळांना घेऊन आयुष्याची दोरी ओढणं काही सोपं नाहीये. मजबूत हातांचा आधार मिळणं  ही खरी मानसिक गरज आहे आपली. असे भाष्य केले तिने कोणाजवळ.  आणि समजून घेणारा नवरा,जोडीदार म्हणून मिळेल का? असे तिचे वाटणे काही चूक ठरेल असे वाटत नाही.

          भावना स्वतःच्या पायावर स्थिरावलेली एक सरळमार्गी स्त्री. सुयोग्य जोडीदार मिळवून वीस वर्षे झाली. संसार थाटलेला पण संसारवेलीवर फुल उगवले नाही.पण त्याचेही दोघांनाही अजिबात शल्य नव्हते. समंजस नवऱ्याला एक दिवस अचानक ऑफिस मध्ये काम करत असताना हृदय रोगाचा त्रास झाला आणि त्यात तो कायमचा संपला. जोडीदाराच्या मृत्यूने पोकळी निर्माण झाली, भावना च्या आयुष्यात. वयही अर्धवट धड तरुण नाही आणि वृद्धत्वाकडे झुकलेले सुद्धा नाही. काय बिघडले? तिने आपल्याला साजेसा नवरा मिळेल का? असे विचारले तर?

          डोळे उघडे ठेवून बघितले तर, अशा काही परिस्थितीजन्य कारणातून दुसऱ्यांदा ‘नवरा’ या संकल्पने खाली एखाद्या स्त्रीने योग्य जोडीदार निवडला तर? त्यात गैर वाटण्यासारखे काही नाही. ही स्वागतार्ह वस्तुस्थिती आनंदाने स्वीकारावी.

           पण थोडीशी गंमत म्हणून हल्लीच्या उच्छ्रंकूल जीवनशैलीत जर एखादी युवती मॅचींग ड्रेस प्रमाणेच मॅचींग नवरा बदलत राहिली तर काय परिस्थिती उद्भवेल ? क्षणभर खरंच गंभीरपणे विचार केला या गोष्टींचा, तर अशा परिस्थितीत एकमेकींच्या नवऱ्याची पळवापळवी होईल. ‘नवरा मिळेल' अशा जाहिराती झळकतील! गुणवर्णनासह त्याचे मार्केटिंग होईल. भाडे आणि अटी दोन्हीही सांगितली जातील. शिवाय एखाद्या शोभेच्या बाहुल्या सारखी परिस्थिती होईल बिचाऱ्याची !

          खरं म्हणजे आजच्या समाजरचनेत, मुलींचे लक्षणीय घटलेली संख्या आणि मुलांचे लग्नाचे वय उलटून जमाना झालेले  वय त्यांचे वाढलेले लक्षणीय प्रमाण! अशा परिस्थितीत तात्पुरता मॅचिंग नवरा मिळेल का अशा जाहिरातींना अजून तरी सुरुवात झाली नाही. हे या समाजाचे सुदैवच म्हणायचे.

          हल्ली लग्नाच्या बाबतीत मुली फार चोखंदळ बनल्या आहेत. त्यांचे चोचले नखरे फारच वाढलेले आहेत. लग्नासाठी त्या असाव्यात एवढ्या गंभीर नाहीत वगैरे वगैरे वाक्य वारंवार कामी येतात. या विधानांना दोन्ही बाजू आहेत.एक तर मुली भरपूर शिक्षण घेऊन कमावत्या आणि प्रगल्भ विचारांच्या बनल्या आहेत. त्यांना स्वतःची अशी वेगळी स्वतंत्र विचारसरणी आहे. त्यांनी ती उपयोगात आणली तर त्यात चुकीचे काहीच नाही. या पुरुषप्रधान संस्कृतीने मुलींना खालच्या पातळीला ठेवत नेहमीच दुय्यम वागणूक दिलेली आहे. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत त्यांच्या अंगी मागासलेपण रुजवत ठेवले आहे . त्यांना कायमचे परावलंबित्व बहाल केले. हा सारा इतिहास आधुनिक मुलींना ज्ञात झाला आहे. हे सारे खोडून काढण्याचा चंग मग त्यांच्या मनाने बांधला असेल, तर यात नवल ते काय? आजची मुलगी शिक्षणाने प्रगल्भ आर्थिक दृष्टीने सक्षम स्वयंसिद्ध बनली आहे. असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. याचा परिणाम म्हणून तिची मतं बंडखोर बनली असतील तर असे का होऊ नये? असा प्रतिप्रश्न विचारावासा वाटतो. याचा अर्थ या सर्व परिस्थितीचा दुरुउपयोग करून मुलींनी वागावे. असे अजिबात नाही. आपली निर्णय क्षमता वापरत असताना मुली असो किंवा मुलं त्यांनी आपल्या घरातील इतर मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन आवश्य घ्यावे .त्यांचे अनुभवाचे बोल खूप काही शहाणपण शिकवून जातात. हे अगदी खरे आहे. आपण वयाने, विचाराने, शिक्षणाने प्रगल्भ झालो आहोत म्हणजे दुसऱ्या कोणाच्या मतांचा आदर करूच नये असे होत नाही. समंजस आणि खऱ्या अर्थाने वैचारिक समृद्धी असणारी मंडळी या गोष्टीचा विचार नक्कीच करतात. आजही भारतीय संस्कृतीचे मूळ संस्कार केंद्र आपली कुटुंब पद्धतीच आहे. यावर बहुसंख्य लोकांचा विश्वास आहे. तो कायम राहील अशी आशा बाळगत, काही प्रमाणात का असेना या विरोधी विचारधारा असणारेही याच भारतीय समाजात आहेत. हेसुद्धा नाकारुन चालत नाही. अशांसाठी मंगळसूत्राला  जर नवरा किंवा  सहकार्याची उपमा दिली तर, हे मंगळसूत्र वारंवार बदलण्याची सवय लागण्याची शक्यता निश्चित व्यक्त करता येऊ शकते.

     क्षुल्लक कारणावरून घटस्फोट मागणाऱ्या नवरा बायकोचे न्यायालयीन खटल्यातील प्रमाण बघितले, तर धास्ती वाटते. हे सुद्धा खरेच आहे. किंबहुना घटस्फोटाचे प्रमाण खूप मोठे आहे. ही गोष्ट निश्चितच सामाजिक स्वास्थ्य विचलित करणारी ठरू शकते. तसेच सामाजिक पर्यायाने कौटुंबिक स्वास्थ्य जर कायम बिघडत असेल तर ‘मॅचिंग मंगळसूत्रा’ प्रमाणेच ‘मॅचींग नवरा’ ही  मिळेल अशी जाहिरात झळकावयास वेळ लागणार नाही. वेळीच सावध राहून तारतम्याने वागले तर परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते.

         तेव्हा, खरंच तरुण मित्र मैत्रिणींनो वेळीच सावध व्हा देशाचा एक सजग आणि प्रगल्भ नागरिक बना असे आवाहन करावेसे वाटते.

© नंदिनी म. देशपांडे.

🎀🎀🎀🎀🎀🎀