बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

कविता.

लाल पिवळी हिरवी
नाजूक नक्षी सुंदर
रेखली.....
पाना फुलांनी बहरून
माझी बाग अंगणी
फुलली....
दवात न्हाऊनी फुले
सानुली हासत अंगणी
उतरली....
बागडत खेळत अवचित
त्यांनी अंगणी शोभा
आणली....
रंगीबेरंगी रंगावलीतून
अंगण माझे गोड
हासले....
खेळत पाना फुलांनी
सुंदर रुपेरी उन्हाचे 
स्वागत केले....

© नंदिनी.

चोचले.....जिव्हेचे.

चोचले.....जिव्हेचे.

   आजचा जमाना पिझ्झा आणि बर्गर तसेच चायनीज फुडचा असला तरीही, आमच्या सारख्यांना,हवामानाच्या मौसमा प्रमाणे कांही तरी वेगळ्या, पण आपल्या पारंपारिक पदार्थांची आठवण बरोब्बर येतेच....
     लगेच कल्पने मध्ये आम्ही त्याची चव जिव्हेवर रेंगाळती ठेवतो.... आणि दुसऱ्याच दिवशी तो पदार्थ बनवून त्याचा यथेच्छ आस्वादही घेतला जातोच....
     होय,कारण हे पदार्थ बनवावयास फारशी तयारीही लागत नाही....त्यांचे लागणारे साहित्य सामान्यपणे आपल्या घरी नेहमीच उपलब्ध असते....शिवाय त्यांची रेसिपी आम्हाला माहिती असतेच..... बनवण्यासाठीही आम्ही कायम तत्पर असतोच....कारण करण्याची, इतरांना करुन खाऊ घालण्याची आवड आणि स्वतः च्या सुध्दा आवडीचंच....
  ‌‌
       हल्ली बऱ्यापैकी थंडी पडू लागलीए... दररोज तेच ते खाणं नकोसं होतं....त्यातही ऊन ऊन असे वाफाळलेले पदार्थ खावेसे वाटतात....मस्त खमंग, आणि तोंडाला चव आणणारे....
      असंच झालं,दोन दिवसांपूर्वी आणि उकड शेंगुळ्यांचा बेत बनवला....ही डिश बहूतेक रात्री करण्यासाठी चांगली वाटते....कारण गृहिणी स्वतः रात्री चे जेवण चवीने व गरम गरम खाऊ शकते....
      बनवले मी त्या दिवशी उकड शेंगुळे ! पण किती आठवणी जाग्या झाल्या म्हणून सांगू!हे बनवताना!
     माझ्या आईला उकड शेंगुळे फार आवडायचे....अर्थात तिचीच आवड आमच्यात पाझरत आलीए....आईच्या हाताला विलक्षण चव होती....त्याच्या जोडीला सुगरणपणाही !
     आई आजारी पडली कधी, तर तोंडाची गेलेली चव परत आणण्यासाठी,उकड शेंगुळेच बनवायची....केवळ त्याच्या पाण्यासाठी.....
उकड शेंगुळ्याचे गरमागरम पाणीही सूप प्रमाणे प्याले तर,हमखास तोंडाला चव येते हा तिचा अंदाज चक्क वास्तवात उतरायचा....
     या पदार्थात जास्तीत जास्त पाणी ठेवून रसरशीत बनवण्यावर म्हणूनच माझाही भर असतो....
   ‌बारीक,मध्यम आकाराचे,खमंग भरपूर लसणीच्या फोडणीत बनवलेले...
त्यात मनसोक्तपणे कोथिंबीरीचा उपयोग, आणि वर आपल्या लोणकढ्या तुपाचा चांगला आवळ्या एवढा घट्ट गोळा....अहाहा!सोबत लोणचं किंवा चटणी...
काय फक्कड लागतं म्हणून सांगू !!
     घरातली बच्चे कंपनी सुट्ट्यांमध्ये एकत्र जमली की,त्यांनाही या पारंपारिक पदार्थांची ओळख होऊन आवड निर्माण व्हावी, यासाठी मी एक दिवस आवर्जून हा पदार्थ बनवतेच...
    अहो एक खास डिश म्हणून ही मंडळी खातात आवडीनं! मला तर मुलांनी फोर्क (काटा चमचा)मागितल्याचीही आठवण झाली... आणि  हसूच आले पटकन !
    मग हा पदार्थ खावा कसा?याचेही प्रात्यक्षिक करुन दाखवावे लागले!
     पण केंव्हाही बनवले तरी गरम खाण्यातच मजाए! ते गार होतील तसे घट्ट आणि बेचव होत जातात...
   पण गरम गरम खाल्ल्या नंतर आपोआप शब्द बाहेर पडतात आपल्या तोंडातून,
"अन्नदाता सुखी भवः...."
©
*नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹

Manisha Narwadkar Bhakre 

कृति.

ज्वारीचे पीठ,चणा डाळीचे पीठ आणि गव्हाचे पीठ अनुक्रमे २:१:१/२  या प्रमाणात घ्यावे....त्यात, चवीनुसार मीठ,हळद,हिंग,थोडा ओवा हातावर चोळून,तीखट हे साहित्य छान एकत्र करत पाण्यात भिजवून घ्यावे....साधारण भाकरी साठी लागते तसे पीठ मळावे....
कढईत थोडे जास्त तेल घालून फोडणी करुन त्यात लसणीचे तुकडे गुलाबी तळून घ्यावेत आणि भरपूर पाणी फोडणीत टाकावे....
    या पाण्याला चांगली उकळी फुटे पर्यंत,तळहाताला तेल लावून पिठाचे शेंगोळे करवून घ्यावेत....करंगळीच्या जाडीचे करत तीन ईँच लांबीच्या शेंगोळ्यांची दोन टोके पाकळीच्या आकारात चिटकवून घ्यावीत....नंतर हे सर्व तयार केलेले शेंगोळे उकळत्या पाण्यात एक एक सोडावित....
ते शिजत येतील तेंव्हा पाण्यावर तरंगतात आणि चमक येते...साधारण पंधरा मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्यावेत....
हे तयार शेंगोळे पाण्यासह (ग्रेव्ही) ताटलीत वाढून कोथिंबीर घालावी....थोडे चमचाभर तूप टाकून सर्व्ह करावे....

*नंदिनी*

🌹🌹

रविवार, १५ डिसेंबर, २०१९

चहा.

कित्ती करशील
चहा टाळ चहा टाळ पणा

कित्ती कित्ती करशील चहा टाळ चहा टाळ पणा

आज थंडी आहे
 थंडी आहे गं
एकदा तरी चहा घे ना 
आज थंडी आहे गं
एकदा तरी चहा घेना...

कित्ती करशील
चहा टाळ चहा टाळ पणा

चहा घेतल्यानं 
घेतल्यानं चहा
थंडी मध्येही
ऊऽब मिळेल तुला

कित्ती करशील चहा टाळ चहा टाळ पणा....

सांगू काय तुला 
गरमा गरमं
   निक्क्या दुधाचा
कडक चहा बनवून
पिण्यातली मजा 
खरंच
काय सांगू तुला
गरमा गरम चहा पिण्यातली मजा...

कित्ती कित्ती करशील चहा टाळ चहा टाळ पणा...

घेण्यास चहा एकदा
सुरुवात तर कर 
मग बघ कसा तुला तो भावल् 
चहा तुला कसा बघ भावल्

कित्ती कित्ती करशील
चहा टाळ चहा टाळ पणा

म्हणशील काय तू उद्या
चहा मला द्याहो
पडले मी आता चहाच्या प्रेमात
अहो मला द्या ना
कपभर चहा,कप भरच
चहा...

कित्ती करशील
चहा टाळ चहा टाळ
पणा.

तल्लफ येईल मला
चहा घेताच क्षणभरात
थकवा जाईल पार
उत्साहाला अवताण

कित्ती कित्ती करशील
चहा टाळ चहा टाळ पणा...
चहा टाळ चहा टाळ पणा....

आंतरराष्ट्रीय चहादिनाच्या खूप खूप शुभेच्छा....💐💐

©
*नंदिनी म.देशपांडे*.

☕☕☕☕☕☕

#हुरडा पार्टी.

सामुहिक पणे हुरडा खावयास जाणे एक संस्कृती.

    मला आठवतं तसं माझ्या लहानपणापासून आम्ही सारे वाडा वासीय,बैलगाडीत बसून आमच्या शेतामध्ये दरवर्षी दोन वेळा तरी हुरडा खावयास जात होतोच....
एकदा डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान अगदी हिरवाग्गार कोवळा कोवळा हा हुरडा काय गोड लागायचा म्हणून सांगू....अहाहा!
  आजही चव रेंगाळली आहे त्या हुरड्याची म्हणूनच तर तो खाण्याची गोडी आणि आवड निर्माण झाली आम्हाला....
आणि दुसऱ्यांदा फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात....त्या वेळी आमच्या शेताजवळच असणाऱ्या तुरतपीराचा उरुस भरलेला असायचा....
   मग काय दिवसभर शेतात थोडा मोठा झालेला असायचा हा हुरडा, तरीही तो चवीने चाखत सोबत नेलेल्या दशम्या धपाट्यांवर ताव मारायचा....आणि सायंकाळी उरुसात फिरुन मजा करत घरी परतायचो आम्ही सगळे.....
  अहो, पण मी बोलतेय ज्या विषयी तो हुरडा म्हणजे शाळू ,टाळकी किंवा खास गुळभेंडी,मऊ या नावानं प्रसिद्ध असणाऱ्या ज्वारीच्या ओल्या कणसाला कोवळी दाणे धरलेली असतानाच गोवऱ्यांच्या निखाऱ्यांवर भाजून, हातावर चोळून त्यातून निघणारे कोवळे ज्वारीचे दाणे म्हणजेच हुरडा....
   खरं तर तो सामुहिकपणे एकत्र गप्पाष्टकां सोबत दशमी,धपाटे,दही,ठेचा,लोणचं,कांदा,गुळ, शेंगदाणे व तीळखोबऱ्याची चटणी असा खमंग जेवणाचा डबा सोबत नेऊन शेतामध्ये मोठ्या डेरेदार झाडाच्या सावलीत सतरंजीवर ऐसपैस बसून हा हुरडा खाण्यातली मज्जा काय वर्णावी!
  अगोदर हा डबा संपवायचा....मस्त गप्पागोष्टी करत,उभ्या पिकांना निरखत शेतात हुंदडून यायचे.... भरपूर फिरुन झाले की, छानपैकी विहिरीवरुन भरुन आणलेल्या ताज्या गार पाण्यानं तहान भागवयची....तो पर्यंत गड्यानं कोवळी ज्वारीची कणसं कापून आणलेली असायचीच....त्याचबरोबर ओल्या हरभऱ्याचा टहाळ,पेरु,वाळकं हिरव्या चिंचा,ऊस,आवळे असा सगळा रानमेवा जमवून ठेवलेला असायचाच....
मग काय भट्टी लागायलाच उशिर....सर्वच जण गरमागरम हुरडा खाण्यासाठी सरसावून बसलेले असायचेच...
घरुन सोबत आणलेल्या खमंग चटण्या,गुळ,दही
या बरोबर हुरड्याची चव चाखणं म्हणजे अक्षरशः मेजवानीच असायची....
या सोबतच मध्येच ओला हरभऱ्याची जुडी भट्टीवर पकडत भाजून घ्यायची,त्याला 'हुळा'म्हणतात हे आज खूप जणांना माहित नाहीए....त्याचाही आस्वाद घ्यायचा....काय चवदार लागतो तो हुळाही म्हणून सांगू!
तर अशी हुरडा खाण्यातली मजा,आज शहरात कितीही हुरडा पार्ट्या आयोजित केल्या अगदी भरमसाठ पैसै मोजून तरीही येत नाहीच....
   पण पूर्वापार चालत आलेली आपली हुरडा खाण्याची संस्कृती आजही टिकून आहे...हेही काही नसे कमी असं वाटतंयं....
   पूर्वि घरातली भरपूर कामं करुन थकून जाणाऱ्या स्त्रीयांना तेवढाच एक दिवस वनभोजनाचा विरंगुळा...थोडी निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती आणि स्नेहीजनांशी कुटुंबासमवेत हितगुज हे ही कारण असायचं या मागे....पण हल्ली आवड, फॅशन,चेंज,गेट टुगेदर अशा विविध  कारणांखाली आधुनिक हुरडा पार्टी आयोजित होत असते... सर्व रानमेव्या सह आजही हा हुरडा खाणं एन्जॉय करता येतो पण भरलेला खिसा घेऊनच जावं लागतं....तरीही पारंपारिक पध्दतीच्या त्या हुरडा पार्टीची सर काही येत नाहीच....
दुधाची तहान ताकावर भागवल्या सारखं वाटतं...पण तरीही आपण आपली संस्कृती टिकवून ठेवलीए हा आनंद मिळतो... हे पण खूप आहेच....
काळाप्रमाणे होत जाणारे बदल स्विकारणं, जुळवून घेणं ही निसर्गाबरोबरच माणसालाही मिळालेली एक देणगी आहे....तिला अनुसरुन का असेना पण आपण आजही आपली संस्कृती टिकवून आहोत हे महत्वाचे आहे होय ना!
मी प्रचंड प्रमाणात 'हुरडाभक्त'
आहे....एकदा खाऊन झालाय मैत्रीणींबरोबर आज जात आहे 'ह्यांच्या' बरोबर....आहे सध्या ताजा कोवळा घ्यावेत जीभेचे चोचले पुरवून.....तुम्ही केंव्हा जाताय मग हुरडा पार्टीला....? 
    आणि हो,हा हिरवा हुरडा सुकवून त्याची उसळ,खीर हे पदार्थही बनवता येतात बरं का...तेही तेवढेच चविष्ट लागतात !! ‌तर करा मग या सिझनची हुरडा पार्टी एन्जॉय !!

😊

©
*नंदिनी म.देशपांडे.*

🌹🌹🌹🌹

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९

विहिणींचा गोडवा.

*विहिणींचा     गोडवा*

    दोन दिवसांपूर्वी मैत्रीणीच्या मुलीच्या लग्ना निमित्ताने बांगड्या व मेहंदी च्या कार्यक्रमासाठी जाण्याचा योग आला....
    त्या घरची मोठी आणि एकच लेक, लहानपणापासून  आई-वडिलांच्या,आजी आजोबांच्या लाडाकोडात न्हाऊन निघालेली....पण तेवढीच संस्कारी....उच्च शिक्षाविभुषित.....
     जमलेल्या सर्व सुवासिनी,पाहूणे मंडळी, कार्यक्रमाची रंगत वाढवत ठेवण्यासाठी गाणी गाण्यासाठी बोलावण्यात आलेला समुह....अशी सर्व मंडळी नवरीच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत होतीे...
    लग्नघरच ते! वेळेचं गणित थोडसं ईकडे तिकडे होणारच!पण तो पर्यंत सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी लेकीच्या हौशी आईनं,आपल्या लेकीचा लहानपणीच्या रम्य आठवणी, म्हणजे जन्मापासून ते आत्ता नवरी बने पर्यंत असंख्य गोड गोंडस अशा वेगवेगळ्या मूड मधील, अनेक प्रासंगिक स्वरुपाचे आणि कौतूकाचे असे छाया चित्रांचे मोठ्ठे कोलाज दर्शनी भागातच ठेवले होते...त्याला लागूनच नवऱ्या मुलीच्या बालपणीचा भातुकलीचा संसार,तिची खेळणी यांची सुरेख मांडणी केलेली होती......
    नवरीच्या आगमना पर्यंत कुतुहलाने बघाव्या अशाच या सर्व वस्तू ! सर्वांचीच चांगलीच करमुणही झाली आणि प्रत्येकानं हे बघत असतानाच आपल्याही बालपणात हळूच डोकावून बघितल्याचे लक्षात आले....
तो पर्यंत होऊ घातलेल्या नव्या नवरीचं आगमन झालं....अत्यंत कौतुक मिश्रीत पण संमिश्र भावनांची चेहऱ्यावरची गर्दी लपवण्याचा प्रयत्न करत,तिची आई लहान मुलीसारखी तिचे बोट पकडून तिला घेऊन आली....सगळ्यांच्याच नजरा नवरीवर खिळलेल्या....
    आपल्याला आवडलेल्या मुलाशी लग्न करावयाचे तेही आईबाबांची संमती घेऊन तिनं ठरवलेलं....पण तरीही बावरलेपण,आईबाबांचासहवासाची निर्माण होणाऱ्या पोकळीचे मनात निर्माण होणारं शल्य,बालपणीच्या अगणीत क्षणांच्या आठवणी सोडून दूर जाण्याचं हुरहुरलेपण अशा भरघोस भावनांची मांदियाळी मनात घेऊन आलेली ही नवरी....अतिशय देखणी,समंजस दिसत होती....साधंच मेकअप केलेलं होतं तरीही सौंदर्यानं परिपूर्ण असणारी....तिच्या हातांवर हात भरुन सुंदर नाजूक मेहंदी  रेखाटलेली बघून प्रत्येकीच्या चेहऱ्यावर तिच्या विषयी कौतुक दाटून आलेलं दिसत होतं...
   मला मात्र तिच्या विषयी कौतुक तर वाटत होतेच.पण नवरीचा चेहरा अवलोकन केला, आणि मनामध्ये झरझर अनेक अवीट गोडीच्या गाण्यांनी गुणगुणनं सुरु केलंय असं लक्षात आलं.....
 
* होणार सून मी त्या घरची....
लेक लाडकी या घरची
होणार सून मी त्या घरची...

 ‌*पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा....
वधू लाजरी झालीस तू गं सांगे तो चौघडा....

 *निघाले आज तिकडच्या घरी
एकदाच मज कुशीत घेऊन पुसूनी लोचने आई....

अशा अनेक गोड विहिणी कानात गर्दी केली होती....किती सार्थ अर्थ होता या साऱ्याच गाण्यांचा.... कोणत्याही काळातील
लग्नसमारंभात अगदीच ताजातवाना वाटावा असाच...नव्या होणाऱ्या नवरीला आपल्याच भावविश्वात खिळवून ठेवणारा...मनाला गहिवर आणणारा आणि हुरहुर लावणाराही....
आपल्या या गीतांच्या गीतकारांचे, संगीकारांचे आणि गयिकांचे मानावेत तेवढे आभार कमीच आहेत असे जाणवले या वेळी...
नकळतपणे या सर्वांच्या भारतीय संगीत क्षेत्रातील या कार्याला मनापासून सलाम करत मनोमन धन्यवाद द्यावेसे वाटले....

या अवीट गाण्यांची गोडी आपणही ऐकावी यासाठी हा सारा प्रपंच!!
ऐका तर मग या विहिणी....

©
*नंदिनी म.देशपांडे*

🌷🌷🌷🌷🌷🌷

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९

सुख म्हणजे नक्की काय असतं?

*सुख म्हणजे नक्की काय असतं*

सुख म्हणजे नक्की काय असतं?अहो हे काय विचारणं झालं ! सुख असं कधी शब्दात व्यक्त करता येतं का? ही काही मूर्त स्वरुपात दाखवण्याची वस्तू का आहे! जी हातात घेऊन दाखवता येईल आणि ही काही प्रत्येक व्यक्ती जवळ अगदी सारखीच, सारख्याच प्रमाणात असते ! असेही नव्हेच.

      सुख म्हणजे काय तर ही प्रत्येकाने मनातून जाणून घेण्याची अशी एक मानसिक कल्पना आहे असेच मी म्हणेन.ती व्यक्तिसापेक्ष अशीच एक भावना, मानसिक कल्पना  आहे. 

     सुख हे स्थळ,काळ,परिस्थिती काही प्रमाणात आपली किंवा त्या संबंधित व्यक्तीची आर्थिक स्थिती, शैक्षणिक पात्रता इत्यादींवर अवलंबून असू शकते.पण ही पुर्णपणे माणसाच्या मनात घर करून राहिलेली मानसिक कल्पनाच होय,हे नक्की.

     वयानुरूप या संकल्पनेविषयी प्रत्येकाच्या मनात एक वेगळंच चित्र बनत जातं. ही सुखाची संकल्पना मनात तयार होत असताना नक्कीच स्वानुभवाची सभोवतालच्या परिसराची आणि आपल्या आर्थिक परिस्थितीच्या जाणिवेचा विचार यामागे केलेला असतोच.

     प्रत्येकाची सुखाची कल्पना जेवढी माणसाच्या अनुभवावर ठरत जाते, तशीच ती समाधानी वृत्ती, आनंदी वृत्तीशी, आवडीनिवडींशी एकरुपकत्व साधते.

     आपण छोटे असतो तोपर्यंत आई-वडील घरातील मोठी माणसं यांच्या छायेखाली अगदी सुरक्षित असतो. आपले पुरवले जाणारे लाड, तोंडातून बाहेर पडल्याबरोबर मान्य केली जाणारी आपली मागणी, बालहट्ट यांची पूर्तता होणं, हिच प्रत्येक बालकाची आपल्या स्वतःबद्दल असणारी सुखाची कल्पना असते. वाढत्या वयानुसार प्रत्येकाचीआपल्या वैचारिक पातळीचा, निरीक्षणाचा आणि कल्पनाशक्तीचा परिघ सुद्धा विस्तारत जात असतो. आणि त्यानुसार सुखाच्या संकल्पनेतही बदल होत जातो. त्या त्या वयातील आवश्यक त्या सोयी सुविधा आवश्यक बाबी प्राधान्यक्रमाने प्राप्त होत जाणे, यातच माणूस आपले समाधान,पर्यायाने सुख शोधू लागतो.

    सुख आणि समाधान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरु नये. प्रत्येकाच्या मनातील सुखाची कल्पना ही ज्याच्या त्याच्या समाधानाच्या संकल्पनेवर अवलंबून असतेच. समाधान हे आपल्या मानण्यावर असतं. शेवटी,रहावयास उत्तम घर,खाऊन पिऊन सुखी,चांगली नोकरी किंवा व्यवसाय तसेच अंथरुण बघून पाय पसरण्याची आपल्यातील प्रवृत्ती, मुलांना यथायोग्य शिक्षणाच्या संधी, आपल्या कल्पना चित्रात रेखाटल्या नुसार चाललेला संसार वगैरे गोष्टींची परिपूर्णता किंवा मुबलकता ही एखाद्याची सुखाची कल्पना असते. ती त्याला भरभरुन  समाधान देऊन जाते. अशा व्यक्तीच्या कल्पनेतील सुखाची व्याख्या,सुख सुख म्हणजे काय? तर हेच उपरोक्त सर्व बाबींची परीपूर्तताच ! 

    कधीकधी काही लोक सुखाची कल्पना किंवा सुखाची व्याख्या करताना आपल्या श्रीमंतीचा मापदंड लावतात. जेवढी जास्त आर्थिक सुबत्ता तेवढं जास्त सुख असे विचार करणारी माणसं खरंच सुखी असतील का? हा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. अशा लोकांनी अंतर्मुख होऊन सुखाची व्याख्या करावयास शिकले पाहिजे. सुख आणि श्रीमंती, आर्थिक श्रीमंती यांची जवळीक असू शकते पण पूर्णपणे सलगी असेलच असे अजिबात नाही.कधी कधी काही लोकांची सुखाची कल्पना ही, त्यांच्या महत्वकांक्षेशी नातं सांगत असते. अशा व्यक्तीच्या बाबतीत मात्र समाधानाची व्याप्ती फार विस्तृत असते. आपल्या  महत्त्वाकांक्षेचा परमोच्च बिंदू गाठल्याशिवाय अशा व्यक्तींना समाधान प्राप्त होत नाही. म्हणूनच तो स्वतःला 'पूर्णपणे सुखी आहे मी',असेही मानत नाही. सुखप्राप्तीसाठी त्याची सारखी धडपड सातत्याने चालू असते 
    
    काहीजण सुखाची कल्पना ही सभोवताली दिसणाऱ्या परिस्थितीशी, वातावरणाशी तुलना करत ठरवत असतात. सभोवताली दिसणार्‍या परिस्थिती पेक्षा आपल्या परिस्थिती मध्ये कमालीची सकारत्मकता असेल तर, आपसूकच माणूस आपल्या स्वतःला इतरांपेक्षा 'मी नक्कीच सुखात आहे', असे मानावयास लागतो. आपल्या भारतीयांमध्ये आपल्या कौटुंबिक आयुष्याच्या समाधानावरही सुखाची कल्पना निश्र्चित केली जाते.आपलं कौटुंबिक आयुष्य जेवढं सामंजस्याचं, खेळीमेळीचं , मानसिक प्रगल्भतेनं समृद्ध असणारं, तेवढं आपलं सुखही अधिक समृद्ध असं म्हटलं तर काहीच वावगं नाही.

    लग्न होऊन सासरी जाणाऱ्या लेकीला 

"जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा",

 असाच आशीर्वाद आई  देत असते. एकदा मुलगी व्यवस्थित तिच्या संसारात रममाण झाली की हिच मुलगी, 

" घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात।माहेरी जा सुवासाची कर बरसात।
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात। 
आई भाऊसाठी परी मन खंतावतं। "

असं म्हणून आपल्या माहेरी निरोप पाठवते ही आपली गाण्यातून व्यक्त झालेली सुखाची परंपरा.

     संसारातील सुखाची दालनं ही "तडजोड" नामक चावीने खुली होत जातात.हे वास्तव सत्य आहे. शेवटी दोन भिन्न पार्श्वभूमी असणाऱ्या, दोन भिन्न व्यक्तींच्या सहजीवनाने  माणसाचा संसार सुरु होत असतो. अशावेळी मतभिन्नता असणे अपरिहार्य आहे. पण दोघांनीही (पती-पत्नी) यांनी सामंजस्याने चर्चा करून आपल्या सुखाच्या कल्पनेचं चित्र रंगवलं,त्याच्या कक्षा निश्चित केल्या तर, आणि सहमतीने दोघांनीही परस्परांच्या विचारांचा आदर करत तडजोडीचे तंत्र  अंगीकारले, तर दुःखाची सावली सुद्धा त्यांच्यावर पडणार नाही. हे मात्र खरे ! म्हणूनच आयुष्यात तडजोडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे असं म्हणावसं वाटतं.

    शेवटी आपलं सुख हे आपलीच  कृती, वर्तन यावर उभं असतं. सर्वसमावेशक विचार करुन त्याची उभारणी पक्क्या पायावर उभी करणं यातच माणसाचं खरं कसब आहे. 

    आपल्या सुखाच्या कल्पना ठरवताना त्याची सीमारेषा आखून घेताना प्रत्येकाने "ऐकावे जनाचे करावे मनाचे", या तत्त्वाचा अंगीकार करावयास हवा असे वाटते.सुख सुख म्हणजे काय? तर दुसरं काही नसून आपला, "कम्फर्ट झोन"होय. यातून मिळणारा आपल्या मनाचा आनंद, समाधान आपल्याला प्राप्त होणारी मानसिक शांतता,सुरक्षितता आर्थिक सुबत्ता या साऱ्या बाबींचा एकत्रितपणे आपल्या आयुष्यावर पडणारा सकारात्मक परिणामच.  तो केवळ आपल्यालाच जणवू  शकतो. ही अशी जाणीव विस्तारत जाताना माणूस आपल्या आयुष्यात येणारे सुखाच्या, आनंदाच्या, समाधानाच्या परिपूर्ती चे कितीतरी क्षण टिपत टिपत एकत्रित साठवून ठेवतो. आणि त्यातून निघणाऱ्या निष्कर्षाला, त्या सर्वांमधून घेतलेल्या आस्वादाला, त्यांच्या गोड आठवणींना, आणि आठवणींच्या   साठवणीलाच तर सुख असे म्हणतो. म्हणूनच म्हणावसं वाटतं, 

" सुखाचे क्षण, 
टिपत टिपत जाताना
ठेवा आनंदाचा
वाटत वाटत जावा ।
समाधानाच्या, हिंदोळ्यांवर 
स्वार होत असताना
परिपूर्तीचा आस्वाद घ्यावा ।
गंध हा परिपूर्णतेचा
नकळत माझाच श्वास बनावा 
नकळत माझाच श्वास बनावा ।

©
नंदिनी म. देशपांडे.

मो.क्र. ९४२२४१६९९५.

email :

nmdabad@gmail.com

🌹🌹

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९

बालपण

बालपण

आपल्याच बालपणात पुन्हा फिरुन डोकावताना....

   वाटतं,पुनःश्च
   लहान व्हावं...
    अवती भोवतीचा
   स्वच्छंदीपणा आणखी
   एकदा अनुभवावा...

    निरागस प्रश्नांची
     मौक्तिक माला 
    अविरत ज्यपावी...

    फुलपाखरू होऊन
     उंच उंच उडावे
     परि बनून आनंदाने
    खूप खूप बागडावे....

   भातुकलीच्या खेळात,
    बाहुला बाहूलीचे
    लगिन लावावे...

  लुटूपूटूचा स्वयंपाक
   साग्रसंगीत बनवून
 जेवणावळी
घलाव्यात....

 पावसात भिजत चिंब
कागदाची नाव
पाण्यावर सोडावी...

  चॉकलेटचे बांधावेत ईमले
      टपाटप टाकत टापा
    घोड्यावर घ्यावी रपेट....

मामाचं पत्र,आंधळी 
     कोशिंबीर,शिवनापाणी 
आणि
लपाछपी खेळत खेळत
दमून जावं....

बाबांच्या हातून घास
   घेत गोड खाऊचा
  आईच्या तोंडून गोष्ट
   ऐकावी हिरकणीची....

 होताच रात्र,
  पदराच्या पांघरुणात
   आईच्या कुशीत
   झोपावं गुडगुडुप्प
   झोपावं गुडगुडुप्प...

© 
*नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹🌹🌹

घराचं घरपण...

‌      *घराचं घरपण*

"घराला घरपण देणारी माणसं.... विश्व" अशी काहीतरी जाहिरात असायची पूर्वी टीव्हीवर. हल्ली हिच माणसं अडचणीत आहेत, हे वाचनात आलंयं जाऊ दे. तो मुद्दा निराळा.

     पण मुद्दा हा आहे की ही जाहिरात मला आवडायची. कारण त्यातला "घरपण" हा शब्द माझ्या फार आवडीचा.किंबहूणा 'घराचं घरपण जपणं'हा माझा सर्वांत आवडीचा छंदच.

     कधी कधी,'काय करावं?दिवसच संपत नाही लवकर....' घरात खूप बोअर होतंयं'.असं म्हणणाऱ्या स्त्रियांची कीव करावीशी वाटते.आपल्या स्वतःच्याच संसारात, आपल्या घरातच करमत नाही.वेळ जात नाही. काय करावं?समजत नाही. असं म्हणणाऱ्या स्त्रीयांचीही मोठी गंम्मत वाटते. मला प्रश्न पडतो, या स्त्रिया असं म्हणूनच कसं शकतात?

    गृहिणी,प्रत्येक घरातली गृहिणी ही आपल्या घराचा कणा असते. असे माझे ठाम मत आहे. तिच्यावर लहानपणापासून रुजवलेल्या संस्काराप्रमाणे ही गृहिणी आपल्या घरावरही त्या मूल्यांचे संस्कार रुजवू पाहात असते. त्यात तिच्या आवडीनिवडी,घराचे हित, कुटुंबाचे हित,आपल्या सासरचे संस्कार,रितीरिवाज,
रुढी परंपरा, घरातील व्यक्तींचे स्वभाव,त्यांची प्रगल्भता इत्यादी अनेक गोष्टी विचारात घेऊन, ही स्त्री आपल्या घराच्या संस्कृतीला आकार देत असते.

    प्रत्येक गृहिणी मग ती पूर्णवेळ गृहिणी असो किंवा अर्थार्जनासाठी घरातलं सगळं आटोपून बाहेर पडणारी स्त्री असो, आपल्या घराची, संसाराची ती अनभिषिक्त सम्राज्ञी असतेच.

        आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये गृहिणीला गृहलक्ष्मीचा दर्जा दिला जातो. त्यामुळे तिचे अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहेच.प्रत्येक गृहिणी ही त्या त्या घरात घराला संस्कारांच्या कोंदणात बसवून आकाराला आणते  त्यावेळी ती आपल्या घराचा आत्मा कधी बनते! हे समजतही नाही. घरामध्ये सुख, शांती, आनंद, चैतन्य ठेवायचे असेल तर त्या घरची लक्ष्मी सदैव खूष आणि समाधानी वृत्ती बाळगत वावरणारी असावी.असं म्हटलं जातं ते खूपच खरं आहे.

   कुंभार ज्याप्रमाणे आपल्या चाकावर ओल्या मातीच्या गोळ्याला सुबक आकार देऊन त्यातून एखादे आकर्षक आकाराचे भांडे बनवतो,बनवत असतो तसेच घराच्या बाबतीतही आहे! प्रत्येक गृहिणी ही आपल्या स्वतःच्या घराला, त्यातील  माणसांना किंबहुना वस्तूंना, अन्नपदार्थांना,
स्वच्छतेला नी शिस्तीला तसेच नीटनेटकेपणाला जसं वळण लावेल,तसाच त्या घराचा तो स्वभाव बनत जातो. हळूहळू हा स्वभावच  त्या विशिष्ट घराची ओळख बनते. प्रत्येक घराची अशी ओळख बनवणं, घरावर चांगले संस्कार करणं, घरातील सदस्यांमध्ये सामंजस्य व समन्वयाचं वातावरण निर्माण करणं या सार्‍या गोष्टीत घरातल्या स्त्रीचाच सिंहाचा वाटा असतो. या साऱ्या संस्कारांनी युक्त बनलेलं घर हेच तर त्या घराचं 'घरपण' असतं. 

    म्हणूनच घराचं घरपण जपणारी ही गृहिणी म्हणजे, संसार रथाचे एक चाकच नव्हे,तर ती 'संसाररथाची सारथीच असते',असं म्हणावंसं वाटतं. घराला मंदिर बनवण्यासाठी अशी स्त्री कायम आटापिटा करते.

    आज धकाधकीच्या आयुष्यात आपले राहणीमान, शिक्षण, विविध आवश्यक गरजा पुरवण्यासाठी एकट्या पुरुषाची मिळकत तुटपुंजी पडू शकते. हा विचार करून गृहिणी घराबाहेर पडून,आपल्या बुद्धी चातुर्याच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या यशस्वीतेचा एक एक टप्पा पादाक्रांत करते आहे.पतीच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने किंवा,कधीकधी त्याच्यापेक्षा जास्तही योगदान देत संसारातील आर्थिक बाजू बळकट बनवण्याला प्राधान्य देत असते. देत आहे. त्यामूळे सहाजिकच आहे की पारंपरिक पद्धतीच्या पूर्ण वेळ गृहिणी प्रमाणे आधुनिक गृहिणी आपला पूर्णवेळ घरासाठी पूर्णपणे देऊ शकत नाही. तरीही घराच्या प्रत्येक क्षेत्रावर,प्रत्येक आघाडीवर लक्ष देऊन काळजीपूर्वक सारे प्रश्न, अडचणी मार्गी लावत असते.
   
      त्यासाठी घरातील इतर सदस्यांना आणि आपल्या मदतनीस स्त्रियांना वारंवार मार्गदर्शन करत असते. म्हणूनच कालमानाप्रमाणे घराच्या घरपणाच्या व्याख्येत बदल होताना दिसून येतोय.

    पण "घर" या संकल्पनेत मात्र बदल होणं अशक्य आहे.

    दिवसभराच्या धकाधकीतून बाहेर आल्यानंतर बौद्धिक मानसिक व शारीरिक थकवा घालवण्यासाठी प्रत्येक माणसाला सायंकाळी आठवण होते ती आपल्या घराचीच.

   विसाव्यासाठी घरात आले की घरातील वातावरण प्रसन्न हसतं खेळतं असावं, असं साऱ्यांनाच वाटतं.ते तसंच टिकवून ठेवणं हेच आपण जपलेलं घराचं "घरपण"होय. घरपण जपण्यात गृहिणीचा सिंहाचा वाटा असतोच असा उल्लेख आलेला आहेच ,तरीही तिला त्यासाठी समर्थपणे साथ लागते ती इतरही सदस्यांची.अशी साथ
 देण्याची वृत्ती घरातील इतर सदस्यांचीही असावयास हवीच.ही काळाची गरज बनली आहे हल्ली. अधुनिक पारंपारिक गृहिणीला निगुतीने संसार करायचा असतो. आपला संसार करत असताना तिला घरात हवं नको ते बघणं, ऋतुमानानुसार घरातील अन्नधान्याची योग्य पद्धतीने साठवण करून ठेवणं, घरातील सदस्यांची विविध प्रकारची वस्तूंची,कपड्यांची खरेदी करणं. प्रत्येकाच्या आवडीनुसार त्याला हवं-नको विचारणं, ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांच्या  औषधांचा स्टॉक बघणं आल्यागेल्याची विचारपूस, आल्या गेलेल्यांचा पाहुणचार करणं. त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधणं या गोष्टीही  बघायलाच लागतात तिला.

      गृहिणीला घराची अन्नपूर्णाही  बनावं लागतं.प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपून त्याप्रमाणे पदार्थ बनवण्यास प्राधान्य देणं,त्यातही पुन्हा सर्वंकष जीवनसत्त्व  असेल असा मेन्यू बनवणं .त्यासाठी लागणारी सामग्री वगैरे अनेक गोष्टी आवर्जून तिलाच आणावी लागतात. किंवा कुणाला तरी सांगून मागवून घ्यावी ‌लागतात. एवढेच नाही तर त्या साफ करणं,निवडणं, किंबहुणा घरगुती दही दूध तूप पनीर वगैरे गोष्टीही बनवणं तिच्याशिवाय केवळ अशक्य!

        खाऊचे पदार्थ सणावारांचा गोडाचा मेन्यू, देवपूजा सण-समारंभ तसंच उत्सवांचं सादरीकरण आणि साजरीकरण यांची रुपरेषा ठरवणं, विविध प्रकारची बीलं भरणं, बँक व्यवहार एक ना दोन कित्येक बारीक-सारीक गोष्टींकडे तिचं बारीक लक्ष असतं. ते स्वतः करणं किंवा करवून घेणं या दोन्हीही भूमिका तेवढ्याच महत्त्वाच्या.

     अन्नपूर्णेच्या महत्त्वाच्या भूमिकेबरोबरच आपल्या घरापुरता "इंटेरियर डेकोरेटर",हे पदही स्त्रीला निभवावं लागतंच.  घराची सजावट,फर्निचर त्यांची सुयोग्य मांडणी करणं,प्रत्येकाच्या सोयीनुसार त्यात,त्यांच्या रचनेत बदल करणं घराचे पडदे,चादरी या गोष्टींकडेही तिचं बारीक लक्ष असतचं.

      हे सर्व करताना या गृहिणीला, तिच्याशी असणाऱ्या इतर 
नात्यांची भूमिका सुद्धा तेवढीच महत्त्वाची वाटत असते.कारण एकदा विवाह बंधनात स्त्री अडकली की, लगेच ती निरनिराळ्या नात्यांत गुंफली जात असते.
    'गृहिणी' किंवा 'गृहलक्ष्मी' हे पद प्रमुख तर आहेच.त्या सोबत या ईतर नात्यांत समन्वय ठेवणंही तेवढंच गरजेचं मानते ती.
   
     गृहिणी किंवा गृहलक्ष्मी या प्रमुख भुमिकेबरोबरच  ती पत्नी, सून, आई, वहिनी, काकू,या आणि इतर अनेक नात्यां मध्येही गुंफत गेलेली ही गृहिणी नाती जपणं, त्यांना योग्य तो न्याय देणं हे सुद्धा महत्त्वाचं कर्तव्य तिचा संसार करताना तिला पार पडावं लागतं.

        या शिवाय घरात छोटी मुलं असतील तर, त्यांचं शाळा-कॉलेज, त्यांचा अभ्यास,त्यात मार्गदर्शन करणं या गोष्टी सुद्धा गृहिणीसाठी हल्ली फार महत्त्वाचं काम बनलं आहे.

       मुलांच्या शिक्षणाकडे, त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या संस्कारांकडे लक्ष ठेवणं,त्यांना घरातूनही योग्य संस्कार देणं,  त्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे बारीक लक्ष ठेवणं अशा आणखीही खूप काही गोष्टींकडे, स्त्रीही पूर्णवेळ गृहिणी असो किंवा नोकरी करणारी गृहिणी असली तरीही वर सांगितलेल्या सार्‍याच आघाड्यांवर तिला कायम तत्पर राहावं लागतंच. कारण तिचं घर,तिचा संसार, तिची माणसं ही सर्व तिचा 'आत्मा' असतात. त्यावर कधीही कोणतीही आच येऊ नये असाच तिचा कायम प्रयत्न असतो. 
    
    हे सर्व करत असताना आपले चार पैसे कुठे आणि कसे वाचतील याकडेही चांगलंच लक्ष असतंच तिचं. त्यामूळे घराचं 'घरपण' हे चार भिंतींनी बनत नाही किंवा टोलेजंग इमारतीवरही ते अवलंबून नसतं, तर ते त्या घरातील माणसांवर त्यांच्या संस्कारांवर, स्वभावावर त्या घरातील वातावरणावर, सुख-शांती-समाधान यांवर अवलंबून असतं. या साऱ्या घटकांनी मिळून युक्त असं घर बनवणं ही त्या घरातील गृहलक्ष्मी वर खूप मोठी जबाबदारी आणि तिची कला असते.ती आवडीनं ते निभावत असते. यासाठी तिला लागणारे सहकार्य मात्र घरातील इतर सदस्यांनी करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण घर हे सर्वांचचं असतं. त्याचा आर्थिक आणि मानसिक  मेंटनन्स घरातल्या सर्व सदस्यांवर अवलंबून असतं.
   
     खरं म्हणजे हेच तर घराचं घरपण असतं. एक वेळ घर छोटे असेल तरीही चालत,घरात श्रीमंती थाट नसेलही तरी चालतं पण समाधान हवंच.हे समाधान,प्रसन्नता,
आदरातीथ्य,विनयशील वृत्ती,परस्परां विषयीचा आदर या सर्व गोष्टी घराला मंदिराचं स्वरुप प्राप्त करुन देतात.  त्या घराचं असं घरपण कायम ठेवणं, ते जपणं ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि ते जिवापाड जपण्याचं काम त्या घरची गृहिणी लीलया पार पडते.
    
      मला वाटतं भारतीय कुटुंब व्यवस्थेचं हाच तर मुख्य गाभा आहे. घरपण जपलं तर कुटुंबव्यवस्था ही मजबूत होईल. पर्यायाने समाज आणि देशही. म्हणूनच या व्यवस्थेची मूलभूत अंग असणारी गृहिणीची भूमिका फार महत्त्वाची आहे. ओघानेच असं म्हटलं जातं, "ज्या घरातील गृहलक्ष्मी कायम प्रसन्न समाधानी असते, त्या घराचे घरपण कधीच लोप पावत नाही".

*नंदिनी म.देशपांडे*

विजया दशमी,
ऑक्टो.८,२०१९.

🌺🌺

आराधना...

*आराधना*

*आराधनेची* आराधना देवाला भावली,
नी तिची ही प्रर्थना फलद्रुप झाली.... पदरात तिच्या भरभरुन ओंजळीने दान टाकती झाली....
 कुशीतून आराधनाच्या सानुल्या दोन गोड गोंडस पऱ्यां या सृष्टिवर आगमनीत झाल्या.....
ईवल्याशा पऱ्या या दोन, 
जणू सरस्वती आणि लक्ष्मी हातात हात घालून 
हासत खेळत अवतरल्या.....  साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा दिपोत्सवाच्या, पाडव्याच्या ‌शुभ मुहुर्तावर अवनीवर पाऊल टाकत्या झाल्या.....
*नभा* सारख्या विशाल हृदयी आजीच्या या नाती दोन दिवाळी पाडव्याची मौल्यवान सोनेरी भेट बनून आल्या......
ईश्वराने बहाल केलेल्या या अमूल्य ठेव्यानं दोन्ही घरांतील कुटुंबात आनंद लहरी फेर धरत्या  झाल्या......
आई बाबा या पऱ्यांचे कृतकृत्य झाले,
 त्यांच्या
समाधानाच्या तेजाने दिपावलीचे दिवे उजळू लागले.....
पणत्या या दोघी, 
दोन्ही घरांच्या उपजतच स्वयंप्रकाश लेवून आल्या......
आम्ही स्वयंसिध्दा,आम्ही मार्ग दर्शिका,आम्ही हिरकण्या नि आम्हीच
वंशलतिका गाणी मनाशीच गुणुगुणु लागल्या.....
आजी,आजोबा,काका,मामा,आत्या आणि मावशी सारेच कसे प्रफुल्लित जाहले.... दिपोत्सवाच्या संगतीने,सनई च्या मंजूळ स्वरात सोन्याच्या पावलांनी,पाऊस धारेच्या साक्षीनं
 अवतरलेल्या 
या दोन पऱ्यांच्या स्वागतासाठी लगबगीने तयारीला लागले.......
फुलांच्या माळा, रंगीबेरंगी दिपमाळा,आकाश कंदिल सारेच जाहले उत्सुक.....
अंगण सजले रांगोळ्यांनी, अवनी सजली हिरव्या मखमली गलिच्याने..... पऱ्यांसाठीच असे जणू ही पखरण.....
मुलायम या  पायघड्यांनी निसर्ग राजा हासत डोलत भुलोकी या
सज्ज जाहला....
करण्या स्वागत सानुल्यांचे...... 
गोड गोजिऱ्या या दोन पऱ्यांचे,
आराधनेच्या या दोन कन्यकांचे...
या दोन प्रकाश दर्शक तेजस्विनींचे...

©
*नंदिनी म.देशपांडे*

दिवाळी पाडवा,२०१९.

💐💐💐💐💐💐

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

स्टॅच्यू ऑफ युनिटी.

*स्टॅच्यू ऑफ युनिटी*

    गुजरात राज्याची पर्यटनासाठी ट्रीप आखताना, नर्मदा नदीतीरी असणारे केवडिया येथील,सरदार सरोवर, "स्टॅच्यू अॉफ युनिटी" हे एक मुख्य आकर्षण होतेच.... 

    फार मोठे क्षेत्रफळ असणाऱ्या भुमीच्या एका तुकड्यावर भारताचे पोलादी पुरुष, सरदार वल्लभाई पटेल या *लोह* पुरुषाचा भव्य दिव्य पुतळा....

     जगातला सर्वांत उंच पुतळा अशी ज्याची  ख्याती आहे...आरवली पर्वत राजींच्या कुशीतून उंच उंच होत,या पर्वतांची उंची गाठणारा हा सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा,त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या अतिशय समिप घेऊन जाणारा असाचआहे.... सरदारांना आपण प्रत्यक्षपणे बघत असल्याचा भास निर्माण करणारा असा अप्रतीम पध्दतीनं,कलाकुसरीनं बनवलेला आहे....
अगदी चेहऱ्यावरची रेष न रेष बोलकी आहे, ईतपत जाणीव निर्माण करणारा हा पुतळा.भारताच्या एकतेचे प्रतिक बनून प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावणारा असाच आहे...

     रम्य निसर्गाच्या सान्निध्यात,नर्मदेच्या पात्रात तयार करण्यात आलेल्या सरोवर किंवा धरणाच्या काठावर तसेच नर्मदेच्या विशाल पात्रा लगत उभा आहे...जणू कांही अगदी उंच उंच मान करत सरदार पटेल हे पोलादी व्यक्तिमत्व,आपल्या भारत भुमीवर बांधलेल्या बुलंद गढीवर उभे ठाकून आपल्या मातीचा कण ना कण एकत्रित जोडलेला आहे ना?याची टेहाळणी करत आहेत...अशी जाणीव निर्माण करणारा असाच....
खरंच अतिशय प्रेरणादायी आणि प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान व्दिगुणित करणारं असं हे ठिकाण आहे... एकदाच नव्हे तर पुनःपुन्हा भेट द्यावं असंच....
हा पुतळा बनवताना वापरलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कसा उपयोग केला गेलाय, ते तेथे गेल्यानंतर समजेलच...
   
   पण आपल्या देशाची एकात्मकता टिकवून ठेवण्या साठीचे आणि एकूणच त्यांचे भारतीय भुमीच्या स्वातंत्र्यासाठी चे भरीव योगदान,त्यांचे प्रेरणात्मक कार्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय,या पुतळ्याच्या माध्यमातून करवून देण्याचा केलेला प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे....
   
     भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहासाचे स्मरण करत पुढच्या पिढ्यांपर्यंत ते कायम पाझरत ठेवण्याचं काम अशा पध्दतीनं केलं जाणं खरोखरच एक आदर्श पायंडा आहे...
वरकरणी आपण केवळ
पुतळा बघण्यासाठीच आलो आहोत येथे. असे वाटत असले तरीही तेथे गेल्यानंतर अख्खा दिवस त्या परिसरात घालवल्या नंतर, आपला दिवस सार्थकी लागला आहे व आपण कृतकृत्य झाल्याचे पुरेपूर समाधान मिळते....

    पुतळ्याच्या आतून लिफ्ट ने आपण नऊ माळे वरती जातो, त्यावेळी तेथून दिसणारा नजारा काय वर्णावा! एवढ्या उंचावरुन म्हणजे पुतळ्याच्या आतून त्यांच्या हृदयाच्या लेव्हल ला आपण पोहोचतो आणि तेथून दिसणारा नर्मदा नदीवरील भव्य असे धरण,आरवली पर्वतांच्या काळ्याशार रांगा,त्यावर भव्य रंगीबेरंगी छटांना कवेत घेऊन हसणारे आकाश, आणि सभोवतालचा निसर्ग रम्य परिसर डोळ्यांचे पारणे फिटते....
हे सारं बघून खाली उतरलो आपण,की लेखी आणि चित्र रुपातील स्वातंत्र्य संग्रामातील आणि स्वतंत्र भारताच्या विलिनीकरणाच्या कार्यातील वल्लभभाई पटेलांच्या कार्याचा आढावा घेणारं म्यूझियम अप्रतिम आहे...
भला मोठा परिसर अत्यंत सुशोभित स्वरुपात आणि प्रकाशाच्या झगमगाटात डोळे दिपून टाकणारा आहे....आपण अक्षरशः स्तिमित होऊन बघत रहातो.... 

    हे सारं डोळ्यात साठवत साठवत आपण पर्यटन बस मधून व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, आणि धरण परिसरात चक्कर मारुन येतो...
विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली ही व्हॅली मन मोहवून टाकते...
धरण परिसरात अजून काम चालू आहे....बहुतेक धरणाच्या भिंतींची उंची वाढवण्याचे काम चालू होते...
 
    आणखीही बऱ्याच प्रकारच्या विविध प्रकल्पांची कामं जोमानं चालू असल्याचे दिसून आले....त्यात प्राणी संग्रहालय,डिस्ने लॅंड इ.अनेक प्रकारची कामं प्रगतीपथावर चालू आहेत....
हे सारं बघून आपण पुनश्च पुतळ्याच्या पायथ्याशी परततो. सायंकाळी सव्वासात वाजता दाखवल्या जाणाऱ्या साऊंड अॅंड लाईट शो बघण्यासाठी साठी प्रत्येकजण आतूर झालेला दिसतो....

    बरोबर वेळेत चालू होणारा हा शो आपल्या ला या पोलादी पुरुषोत्तमाच्या जीवन चरित्राची,त्यांच्या महान  कार्यकर्तृत्वाची इत्यंभूत माहिती देतो.तसेच यातून आपण, पुतळा बनवताना लागलेल्या कौशल्यपूर्ण हातांची महती,त्यातील तंत्रज्ञानाचं स्वरुप वगैरे गोष्टींची इत्यंभूत माहिती घेत रहातो आपण. आणि इतिहासाची सफर  करुन येतो...

 आपसूकच नतमस्तक होतो....आणि आपल्या राष्ट्र गीतानं कार्यक्रमाचा समारोप करत,भारत मातेचं गुणगाण गाऊ लागतो....

    या साऱ्याच गोष्टी वाचनातून अनुभवण्या पेक्षा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अनुभवण्यात खरोखरच दिव्यत्वाची प्रचिती येऊ लागते..... आपण त्रिवार वंदन करु लागतो... आपल्या भारत भूमीला आणि देशहितासाठी झटणाऱ्या सरदार पटेलांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वांना.....

*जयहिंद-जय भारत*

अशा घोषणा देत....

अशा पध्दतीची स्मरण स्थळं,प्रेरणास्थानं ठिकठिकाणी बनवली गेली पाहिजेत आणि भारताच्या स्वातंत्र संग्रामाचं,एकत्वाचं गीत सतत आळवत राहिलं पाहिजे ही काळाची गरज आहे निश्चितच....याची महती पटत जाते...

©
*नंदिनी म.देशपांडे*.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१९

दीप पुजन.

*दीप पुजन* 

दिवा,प्रकाशाचं प्रतिक।
दिवा मांगल्याचं लेणं।
दिवा ज्ञानज्योतिचं तेज।

उजळवू या दिशा दिशा।
लावोनिया ज्ञानदिवा।
ज्ञानदीपाच्या ज्योतिने।
नष्ट करु आंधळा विश्वास।
प्रसन्नतेच्या दिव्यानं
स्वागत करुया समाधानाचं।
अंधःकार मिटवू या।
प्रकाशाची वाट दावत।
प्रकाशित होवो दाही दिशा।
चैतन्याचा साज लेवत।
मनांमनांतील किल्मिश,मळभ।
दूर करी हा प्रकाश दर्शक।
दिव्या दिव्या दिपत्कार।
तुला माझा शत शत नमस्कार।
शत शत नमस्कार।

©
*नंदिनी म.देशपांडे*

🕎🕎🕎🕎🕎🕎

स्वित्झर्लंड या सम हेच.

.*स्वित्झर्लंड,या सम हाच*

       खूप खूप लांब म्हणजे, सातासमुद्रापलीकडे हे लहानपणी गोष्टीत ऐकलेले वाक्य आज आपल्याच बाबतीत सत्यात उतरेल असं वाटलंच नव्हतं .युरोप टूर साठी प्रस्थान करत होतो ना आम्ही दोघं!  रात्री दीड वाजता टेक अॉफ झालेले आमचं फ्लाइट आपल्या वेळेनुसार दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता म्हणजे युरोपातील आमचे  पहिलेच डेस्टिनेशन, लंडनच्या हिथ्रो विमानतळावर सकाळच्या अकरा वाजता लॅंड झालं.
    येथून पुढचा इटलीतील रोम पर्यंत चा प्रवास मग मोठ्या पारदर्शी बस मधून चालू झाला.सुंदर रस्ते,भरभरुन निसर्ग सौंदर्याने नटलेली अवनी,कंटाळवाणं होण्याची सुतराम शक्यता नव्हती.इंग्लंड मधील लंडन, फ्रान्स मधील पॅरिस,तर बेल्जियम मध्ये ब्रुसेल्स,त्यानंतर नेदरलँड कडे कूच करत जर्मनीच्या कोलोन मध्ये पाऊल ठेवले.या शहरांमध्ये मुक्काम करत,तेथील प्रेक्षणीय ठिकाणं आणि अप्रतीम निसर्गाच्या सानिध्यात रमत गेलो
      वातावरणातील आल्हाददायक स्पर्श अंगावर रोमांच उठवून जात होता.
    ‌ आल्प्स पर्वतांच्या कुशीत दडलेल्या निसर्गसौंदर्याचा यथेच्छ आस्वाद घेत घेत आम्ही स्वित्झर्लंड च्या ल्यूझर्न येथे पोहोचलो.
          युरोपात जेवणाचे फार हाल होतात, त्यातही व्हेज खाणाऱ्यांना तर विचारायलाच नको वगैरे काही गोष्टी मात्र येथील जेवणाने फोल ठरवले. दुपारचे, रात्रीचे जेवण चांगले तर मिळालेच पण सकाळचा नाश्ता सुद्धा अगदी चौरस मिळायचा.पण युरोपात असेपर्यंत वेगवेगळ्या फ्लेवर्स च्या आइस्क्रीमचा  फडशा पाडताना फार मजा आली.थंडीत आइस्क्रीम खाण्याची खरी मजा काय असते! हे अनुभवले
        दुसरा दिवस फार पसन्नतेने उजाडला. आम्हा दोघांसाठी तर हा अगदीच खास असा दिवस होता.अहो, आमच्या दोघांच्या सहजीवनाच्या बांधलेल्या अनुबंधाचा  वर्धापन दिन होता तो!
  अशा या प्रसन्न सकाळी नाश्ता करून आम्ही माउंट टिटलिस च्या दिशेने बर्फाच्छादित पहाडांच्या सानिध्यात काही वेळ राहण्यासाठी निघालो.
       पुन्हा एकदा निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य डोळ्यात साठवत साठवत आनंदाच्या रोमांचकांची शॉल अंगावर ओढत आमची बस हिमशिखरां कडे धाव घेत होती.
       जाताना रस्त्यात स्वित्झरलँड मधील पारंपारिक घरं मोठ्या विनम्रतेने आमचे स्वागत करत आहेत असं वाटलं. अंतराअंतरावर असलेल्या, मोठ्या झोपडीवजा डिझाइन्स असणाऱ्या या घरांना 'शॅलेट'असे संबोधले जाते. किमान टू बीएचके असणारी ही शॅलेटस् दिसावयास अतिशय गोड लहान मुलांसारखी वाटतात.
   एकूणच युरोपात घरांच्या खिडक्या रंगीबेरंगी फुलझाडांनी सजवलेल्या दिसतात. ज्या घरातील खिडक्यां मधील बागेची जास्त निगा घेतलेली दिसून येते, त्या घरातील गृहिणी या संसारामध्ये रमणाऱ्या  असतात.असा येथील लोकांचा समज आहे.
    झोंबणारा हवेतील थंडावा आपण हिमशिखरांच्या अगदी जवळ आलो आहोत,याची वर्दी देत होता. गाडीतूनच दृष्टिक्षेपात आलेली ही शुभ्र बर्फाच्छादित शिखरं आम्ही आपल्या काश्मीर भेटीच्या वेळी जम्मूला जाताना दिसणाऱ्या हिमशिखरांची पुन्हा आठवण करून देत आहेत असं वाटलं.
    अशा आल्हाददायक वातावरणात, स्वच्छ निळ्या पाण्याने भरभरून व झुळझुळ मंजुळ आवाज करत  अशी बाजूनेच वाहणारी नदी जणू आम्हाला तिच्या उगमस्थानाकडे जाण्याचा मार्ग दाखवत होती.
 आम्ही माउंट टिटलिस च्या केबल कारच्या स्टेशनवर पोहोंचलो. काय सुंदर निसर्ग होता तो! चौफेर नजर फिरवताना कोणते दृश्य जास्त छान याचा अजिबात अंदाज येत नव्हता. वातावरणातील नितळपणा मनाला भूल घालत होता व हिम कड्यांवर जाण्यासाठी आतुर बनवत होता.
    येथून चालू झाला आमचा केबल कारचा प्रवास. सेंट्रल स्वित्झर्लंडच्या सर्वांत उंच ठिकाणी जाण्यासाठीचा.खूपच मस्त असा अविस्मरणीय.केबल कारमध्ये बसून न्याहाळलेला निसर्ग फंटास्टिकच!असं दृश्य भारतीयांना अगदी दुर्मिळच. या हिमाच्छादित पहाडांच्या रांगा, त्यांच्या कुशीत निर्धास्तपणे विसावलेल्या अरुंद दिसणाऱ्या नागमोडी दऱ्या तर त्यातील ती हिरवीगार काळपट रंगाची उंचच उंच झाडी,आम्ही येत आहोत याचा सांगावाच जणू देण्यासाठी आलाय असं वाटणारा एखादा मध्येच उडणारा पक्षी आहाहा अवर्णनीयच!बर्फाळ पहाडांत मिळेल त्या ठिकाणी सपाट जागा बघून स्किईंग करणारी हौशी आणि अर्थातच शूर असणारी मंडळी दिसत होती.बर्फावरून घरंगळत खाली येताना त्यांना बघून आपल्याच काळजाचा ठोका चुकेल की काय असे वाटत होते.
    अपेक्षित स्टेशनवर पोहोचल्या नंतर चौफेर असणाऱ्या बर्फा मध्ये खेळताना शुभ्र सफटिकासारखा  चकाकणारा बर्फच बर्फ बघून, अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटत होते.पायी चालताना काय कसरत करावी लागली!आपण खाली पडलो तर कपाळमोक्ष होणार नाही, पण थिजून बसण्याची धास्ती मात्र होती. त्यामुळे खूप विचार करत एक एक पाऊल टाकताना नव्यानेच चालता येणाऱ्या बाळाच्या पावलांची आठवण झाली.
  अशा या  शुभ्र बर्फावर ऊन्हं चमकण्याचा नजारा तर फारच सुंदर दिसला. चहूबाजूंनी बर्फच बर्फ होता, तरीही ऊन पडल्यानंतर बर्फावर असताना सुध्दा भासणारी उन्हाची तीव्रता जाणवून आश्चर्य वाटले. आईस फ्लायर नावाच्या एका बेंच सारख्या,पडू नये यासाठी समोर रॉड लावलेल्या एका केेबल प्रकारातून बर्फाच्छादित प्रदेशात सैर करून येणे, हा सुद्धा खूपच रोमांचकारी अनुभव होता.
  नंतर आम्ही तिसर्‍या माळ्यावर असणाऱ्या एका खास फोटो स्टुडिओ मध्ये गेलो.या बर्फाच्छादित प्रदेशावर या ठिकाणी पाच माळ्यांवर वर्गीकरण करत आवश्यक त्या सोयी पर्यटकांना उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. शिवाय तापमानाचे नियंत्रण करून मोठ्या मोठ्या हॉल्सची रचना अतिउत्कृष्ट.
   बर्फाळ हवामानाचा मनसोक्त आनंद घेत तिसर्‍या माळ्यावर असणाऱ्या खास अशा स्टुडिओमध्ये ओळीत उभे राहिलो. तेथे केवळ एकाच प्रकारचे फोटो काढले जातात. जे की आपल्या भारतीयांना चक्क इंग्रजी पोशाख चढवून वरकरणी इंग्रजाळलेले बनवतात आणि झटकन फोटो काढून पटकन आपल्याला त्याची कॉपीही देतात. आपल्या दृष्टीने अति महागडा असणारा हा फोटो हौशी माणसं नक्कीच एक आठवण म्हणून काढतात. आणि ही आपलीच छबी आहे का! याचा विचार करत हसू लागतात.
    आमची मॅरेज एनिव्हर्सरी होती त्या दिवशी,म्हणून त्या दिवसाची एक खास आठवण आम्हीही फोटोत कैद केली.
   त्याच माळ्यावर बर्फाची गुहा बघितली. आश्चर्य वाटलं ना? अक्षरशः पहाडात जशी गुहा आपण बघतो,तसेच या बर्फाळ पहाडात कोरलेली ही गुहा चारही बाजूंनी बर्फच बर्फ आणि त्यात आपण. हे चित्र खरोखर आपल्यासाठी आश्चर्यकारकच.
         पाचपैकी एका माळ्यावर प्रशस्त असे हॉटेल आहे. एवढ्या उंचावर आणि चोहोबाजूंनी बर्फच बर्फ असणाऱ्या या ठिकाणी गरमागरम इंडियन जेवणाचा आस्वाद घेतला. आहे की नाही गंम्मत!शिवाय चहा, कॉफी,हॉटचॉकलेट या पेयांचा आस्वादही थोडी गर्मी निर्माण करत मजा आणतो. सर्वात कडी म्हणजे, एवढ्या थंड वातावरणात आम्ही तेथे चक्क आईस्क्रीम चाखून पाहिलं!लढाई फत्ते केल्याचा फील  आला अक्षरशः यावेळी.
त्यानंतर पुन्हा ल्यूझर्न शहरात खाली उतरलो आम्ही.तेथे लॉयन मानूमेंट आमची वाट बघत होतं.
     युरोपात साधारण नेदरलँड पासून ठिकठिकाणी  छोट्या मोठ्या अशा काऊ बेल्स ,(गाईंच्या गळ्यात बांधण्याची घंटी.)  विकण्यासाठी ठेवल्याचं दिसलं. त्यांचा आवाज ऐकून मला लहानपणी आजोबांकडे गोठ्यात, रानातून चरत परत आलेल्या गाईंच्या वाजणाऱ्या गळ्यातील घंटीच्या आवाजाची आठवण झाली.तो आवाज व हा घंटीचा आवाज   अगदी हुबेहूब होता.
    ल्यूझर्न मधील त्या दिवशीची संध्याकाळ ही सुध्दा खूप खुश करणारी ठरली. तेथील भव्य अशा स्वच्छ निळ्याशार पाण्याच्या लेक वर,ज्याच्या काठावर बसून आम्ही बदकांना मनसोक्त बागडताना बघितले होते.अशा या लेक वर क्रुझ डिनरचा एक वेगळाच अनुभव मिळाला.
     संगीत वाद्यांच्या  संगतीने वेटर कडून टेबलवर सर्व्ह होणारे डिनर मस्तपैकी एन्जॉय  केले.हे डिनर आजही लक्षात आहे. त्यानंतर हौशी लोकांनी डीजे वर केलेले नृत्य तर झपाटून टाकणारे असेच.
      अशा पध्दतीने आमच्या उभयतांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस अविस्मरणीय पद्धतीने साजरा होऊन आमच्यासाठी एक अविस्मरणीय आठवण बनून राहिला हे मात्र खरं.
    आल्प्स पर्वतांच्या कुशीमध्ये विसावलेला युरोप म्हणजे जणू स्वर्गच!
    दुसऱ्या दिवशीची रम्य सकाळ आम्हाला,झुंग्फ्रौ येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद देण्यासाठी आसुसलेली होती.
या तीन हजार पाचशे मीटर उंच असणाऱ्या ठिकाणासाठी निघालो आम्ही त्यावेळी.
    आल्प्स् पर्वतांच्या प्रदेशात जसे आपण प्रवेश करतो तसे पर्वतांच्या पोटातून जाणाऱ्या भरपूर रस्त्यांवरुन आपला प्रवास सुरू होतो. ज्याला आपण प्राकृत भाषेत बोगदा (टनेल्स) असे म्हणतो.
      येथील निसर्गाचा कण नि कण जेवढा सुंदर दिसतो ना तेवढेच सुंदर येथील बोगदे सुद्धा. लांबच लांब अंतर स्वतःच्या पोटामध्ये सामावून घेणारे हे बोगदे बनवण्याची तंत्रज्ञान, लाईट्स आणि अर्थातच त्यांचे मेंटेनन्स बघून थक्क व्हायला होतं! स्वित्झर्लंड या देशाला, 'बोगद्यांचा देश'असेही संबोधलं जात असावं असे वाटतं.एवढे ते  सुंदर बनवलेले आहेत. ही बोगदी देखील  तेथील सौंदर्यस्थळेच आहेत. यातून होणारा प्रवासही तेवढाच रोमहर्षक ! यामुळे आपण घाटातून वळणावळणाने प्रवास करतोय असे अजिबात जाणवत नाही.अगदी सहज सुंदर प्रवासाची ही अनुभूती आहे.
   ल्यूझर्न ते झुंग्फ्रौ या प्रवासादरम्यान आम्हाला एक निसर्गाचे अप्रतिम   लेणं बघावयास मिळालं.
स्वित्झर्लंड मध्ये प्रवेशताच, बघितलेला ह्राईन धबधबा आणि नंतरचा हा,ग्लेशिअल धबधबा. दोघांचे आपले सौंदर्य, वैशिष्ट्य पूर्णपणे वेगळे.निसर्गत:च वाहात असणार्‍या पाण्याचीच ही दोन रुपं, पण एक स्वतःच्या शुभ्र पणाला आसमंतात व्यापून टाकणारा, तर दुसरा अगदी वरपर्यंत आपल्या उगमस्थानाच्या टोकापर्यंत घेऊन जाणारा, थोडासा भीतीदायक.
  ग्लेशियल वॉटरफॉल! अर्थातच अवनीचे हे लावण्य न्याहाळत न्याहाळत केलेला हा  प्रवास.मन ,वृत्ती आणि शरीर या तिघांनाही उल्हासित बनवणारा. ज्यावेळी आपण या ठिकाणाच्या  पायथ्याशी पोहोचतो ना,त्यावेळी येथे एखादा धबधबा असेल अशी पुसटशीही कल्पना येत नाही आपल्याला. पण, एक भलामोठा उंचच उंच अशा काळ्या पाषाणापासून  बनलेल्या अखंड पहाडाच्या पोटातून आपण काही अंतर लिफ्ट ने तर,काही अंतर उंच पायर्‍यांनी वर चढू लागतो. अजूनही पाण्याचा आवाज नाही की, त्याच्या अस्तित्वाच्या खुणाही नाहीत. असं चांगलंच भयावह गुढ वातावरण असणारं हे ठिकाण. केवळ पाषाणात झिरपत जाणारा ओलावा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या निसरडे पणावरुन स्वत:लाच सांभाळत सांभाळत वरती चढताना आपण पहाडाच्या अगदी वरच्या टोकावर अंधार कोठडीत जातो आहोत असं वाटतं. तेथून मग कुठून तरी येणारी पाण्याची धार जेंव्हा आपल्या भेदरलेल्या डोळ्यांना दिसते ना, तेव्हा नि:शब्द व्हायला होतं. निसर्गाच्या या रुपाला बघून आपण स्तिमितच होतो!
   कुठून तरी पहाडाच्या एका छोट्या कपारीतून सूर्यप्रकाशाचा झरोका दिसतो, तेवढाच काय तो दिवसाची वेळ आहे हा सांगणारा पुरावा.वरती छोट्या असणाऱ्या या धारेच्या मागोवा घेत घेत आपण खाली जेंव्हा उतरत जातो, त्यावेळी पहाडाच्या कडेकपारीतून मिळेल त्या मार्गाने छोट्या छोट्या झऱ्यांना सामावून घेत घेत खाली उंचावरुन आपटत पडणारा पाण्याचा आसुरी नाद करणारा असा हा प्रवाह बघितला.आणि निसर्गाचं हे अद्भुत विश्व जवळून बघितल्याचं समाधान मनाला भारून राहिलं.
    आत्तापर्यंत मी माझ्या आयुष्यात बघितलेल्या सर्व धबधब्यांमध्ये मध्ये सर्वात भयानक वाटणारा पण  अफलातून असा हा ग्लेशिअल धबधबा!  
   एवढा मोठा गड चढत बघितलेला धबधबा पाहून आम्ही  जेंव्हा गड उतरलो, त्यावेळी मोहीम फत्ते झाल्याच्या आविर्भावात आम्ही युरोपातील सर्वात उंच ठिकाणी जाण्यासाठी 'ल्यूटरबर्न' या ठिकाणी आलो. येथूनच 'कॉगव्हील'नावाची ट्रेन आम्हाला सर्वात उंच असणाऱ्या, (3500 मीटर) युरोपातील स्टेशन वर घेऊन जाण्यासाठी सिद्ध झालेली होती. अशा वर चढत जाणार्‍या अद्भुत रेल्वेमध्ये बसताना फार आनंद वाटला. आपल्याच रेल्वे ट्रॅक सारखाच याही रेल्वेचा ट्रॅक असतो.पण दोन चाकांच्या मध्ये कात्रेकात्रे असणारे आणखीही एका आगाऊ चाकाची आणि त्यासाठी दोन रुळांच्या मध्यभागी एक कात्रणे असणाराच अगाऊ बेल्ट असतो. अशी खास रचना आहे या रेल्वेची. जेणेकरून चढत असताना उतारावर रेल्वेचा तोल जाणार नाही.
    कॉगव्हील ट्रेन जशी जशी उंचावर चढू लागते,तशी हिरव्या रंगाचा शालू बदलून वसुंधरा चंदेरी रंगाच्या भरजरी शालू नेसून तयार झाली आहे असं वाटत होतं. सर्वदूर पसरलेल्या आकाशाला गवसणी घालणारे आणि शुभ्र धवल रंगांने सजलेली  शिखरं! त्यांच्याशी स्पर्धा साधण्याचा प्रयास करणारे आकाशातील ढग. या पार्श्वभूमीवर डोकावून खाली बघणारे आकाशी रंगाचे आभाळ !काय विलक्षण विलोभनीय दृश्य दिसत होते ते! संपूर्ण अवकाशावर जणू या शुभ्र पांढर्‍या हिम राजाचे राज्य होते.
     युरोपातील सर्वात उंचावरील रेल्वे स्टेशन वर पोहोंचण्यासाठी लागणारा दीड तासाचा हा वेळ म्हणजे आमच्या डोळ्यांना ही एक मनोहरी अशी पर्वणीच होती.अगदी उंच पॉइंटवर पोहोंचल्यानंतर तर आपण स्वप्नात तर नाहीत ना? अशी शंका येण्याइतपत या ठिकाणची अप्रुपाई जाणवत होती.येथेही तापमान मेंटेन करत बांधलेले हॉल्स आहेत. खूप जणांना या ठिकाणी श्वासाला  अडचण येऊ शकते.
   खरोखर जेंव्हा आम्ही प्रत्यक्ष अगदी उंचीवर होतो त्यावेळी अतिशय देखणा सर्व बाजूंनी केवळ शुभ्र बर्फ बर्फ आणि बर्फच होता! नजरेच्या टप्प्यात न मावणारा, अथांग सागरासारखा पसरलेला! शुभ्रतेचा कळस! डोळ्यांना सुद्धा भूल पडेल की हा बर्फ आहे की धूकं? तेथे थोडा हिमवर्षावही  चालू होताच. अगदी अविस्मरणीय दृश्य आणि अर्थातच त्यातून मिळणारा मोदही तसाच!
   वेगवेगळ्या पहाडांवर व्ह्यू बघण्यासाठी चे केलेली पॉईंट्स ची रचना तर अतिउत्तम.बर्फाळ पहाडांच्या रांगा यातील दऱ्याही बर्फाळ आणि पडणारा पाऊस ही बर्फाचाच! अवर्णनीयच होतं सारं! कितीही ठरवलं,तरीही खूप जास्त वेळ थांबू शकतच नाही आपण येथे. नाही म्हटले तरी हवेमध्ये ऑक्सिजनचं असणारं कमी प्रमाण आपल्याला थोडेसं घाबरवून सोडतंच. त्यानंतर आम्ही आलो बर्फाच्या महालात. दोन पहाडांच्या कपारीत बनवलेला महाला मध्ये. बर्फात बनवलेल्या शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. येथे अखंड अशा बर्फाच्छादित पहाडाच्या पोटात, वेगवेगळे प्राणी पक्षी यांचे मनोहरी पुतळे बनवलेले दिसून येतात. याबरोबरच एवढ्या उंच ठिकाणी पोहोचण्यासाठी झालेले प्रयत्न व  त्या मागचे तंत्रज्ञान काय आहे? यांची माहिती पुरवणारं प्रदर्शनही होते तथेे.या सर्व बाबी खरोखरच नि:शब्द करून थक्कच करणाऱ्या आहेत. निसर्गाचे वैविध्याने नटलेले रूप डोळ्यात साठवून आम्ही नंतर झ्यूरिच शहराकडे प्रस्थान केले.

     © 
*नंदिनी म.देशपांडे*

🔯🔯🔯🔯🔯🔯
       
     ‌*स्वित्झर्लंड,या सम हाच*

     ‌

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१९

ताई मावशी.

ताई‌ मावशी

     नितळ, चमकदार, गव्हाळ कांती,कुरुळे केस, छानसा रेखीव चेहरा....त्यावर सरळ धारदार नाक,किंचितसे चॉकलेटी रंगाचे डोळे,कान थोडेसे पसरट,किरकोळ बांधा पण बोलण्यात मात्र कणखर आणि खणखणीत आवाज....ही सारी वैशिष्ट्ये होती आमच्या ताई मावशीची....श्रीमती प्रमिला खरवडकर हिची....
        सहा बहिणींच्या विस्तारातील ही सर्वांत मोठ्या मावशीची सर्वांत मोठी मुलगी.... त्यामुळे सहाजिकच ती सर्वांचीच मोठी ताई होती.....आणि त्या नंतरच्या पिढीची म्हणजे आमची पण ताई मावशीच....नीटनेटकेपणा
स्वच्छता,टापटिप आणि शिस्त यांच्या जोडीला सुगरणपणा सुध्दा व हुशारही तेवढीच या सर्व गुणांची मुर्तिमंत प्रतिमा म्हणजेच आमची ताई मावशी....
    आज तिथीनुसार तिचं प्रथम पुण्यस्मरण....
      वयाच्या ९३व्या वर्षी अगदी शांतपणे प्राण सोडताना भरगच्च गोकुळातून अगदी सहज निघून गेली मावशी....जणू कांही आत्ता जाऊन येते बाहेर असं म्हणताना जी सहजता असते अगदी तशीच....ती कायमची गेलीए यावर विश्वासच बसत नव्हता...
    ताई मावशीनं एक्झिट अशी घेतली की,तिने मरणाचाही सोहळाच साजरा केला....
     सहस्त्र चंद्र दर्शना पर्यंत जिनं औरंगाबाद च्या श्रेय नगर हाउसिंग सोसायटीचं अध्यक्षपद भुषवलं.... नंतर मात्र तिच्या कानांनी असहकाराचं धोरण स्विकारलं आणि तिनं हे पद दुसऱ्या माणसांच्या सांभाळी केलं.... तरीही तिच्या संमतीशिवाय कोणत्याही बाबतीत कॉलनीचं पान हलत नव्हतं.....दरवर्षी स्वतःच्या हातानं तिळगुळाचे लाडू बनवून साऱ्यांना तिळगुळ देत आशिर्वाद देणारी ही मावशी.... कॉलनीतील मारुती मंदिराचा गाभारा दररोज झाडून पुसून तेथील स्वच्छता राखत,स्वहस्तेच रांगोळीने रेखाटत आपल्या वयाच्या ९० पर्यंत हनुमंताची सेवा करणारी निग्रही अशीच होती....शब्द प्रामाण्य मानणारी ....चूकीला बोट दाखवून ती नजरेस आणून देणारी....सर्वांची आठवण काढत, विचारपूस करत डोक्यावरून आशिर्वादाचा हात फिरवणारी ही ताई मावशी...माणसं जोडून ठेवण्याची कला अखंडपणे जोपासणारी होती....म्हणूनच तिचा ,
"आपल्या माणसांचा"
गोतावळा सुध्दा लक्षणीय स्वरुपात विस्तारलेला होता.... जो तिनं शेवटच्या श्वासापर्यंत जपला....
     अशा आमच्या ताई मावशीला तिच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने शब्द सुमनांची ही विनम्र आदरांजली...‌.जिनं स्वतःच्या जगण्याच्याच नव्हे तर मृत्यूचाही उत्सव केला....तिला विनम्र अभिवादन.🙏🏻

*नंदिनी म.देशपांडे*
(उमरीकर)

शुभेच्छा दसऱ्याच्या.

यशश्रीच्या पायघड्यां वरुन
आयुष्याची वाटचाल आणि
आरोग्य देवता,धन्वंतरीचे उदंड आशिर्वाद कायमच आपल्या सर्वांसोबत राहोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना करत
विजया दशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...💐🙏💐

©
नंदिनी म.देशपांडे.

अभिष्ट चिंतन.

सहवासात ज्यांच्या माझं बालपण पुनःपुन्हा डोकावत रहातं.....
   सान्निध्यात ज्यांच्या सदैव प्रेमाची ऊब मिळत रहाते.....
    बाहू ज्यांचे सदैव प्रेमानं साद घालत असतात....
     वाणी ज्यांची कायमच आमचे मनोबल वाढवत रहाते....
    ज्या चरणांवर नेहमीच नतमस्तक व्हावसं वाटतं....
    ज्यांचा सहवास वात्सल्य प्रेमाची पर्वणीच ठरतं.....
   सान्निध्यात ज्यांच्या सदैव आशिर्वादाची फुलं वेचावयास मिळतात....
   ज्यांच्या अस्तित्वाचं वलय
सदैव दिलासा बहाल करतं असतं.....
   ज्यांची काठी बनून रहाण्यात परमानंदाचं सुख मिळतं....
    ज्यांच्या स्पर्शानं
आधार वडा च्या गार सावलीचा थंडावा मिळतो....
असे माझे वडील,

श्री प्रभाकरराव उमरीकर.....

यांचे आज अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन....
त्यांना मनस्वी शुभेच्छांची ही शब्दमाला हर्षभरीत मनानं सविनय पुर्वक अर्पण....

   बाबा,तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपुर्वक आभाळभर शुभेच्छा....

जीवेत शरदःशतम....

नंदिनी.

💐🙏🎂🎁🎉💐

शुभेच्छा.

💥  #माणुसकीच्या
       पणतीला
    आपुलकीची वात,
      उजळवून टाकू या 
      विवेकाचा प्रकाश  
     मनामनांत नि
      घराघरांत....💥

   💥आपणास व
     आपल्या परिवारास
    दिपावलीच्या
        हार्दिक
           शुभेच्छा💥

*नंदिनी-मधुकर*

💖💖💖💖💖💖

आठवणीतील दिवाळी.

*आठवणीतील दिवाळी*

       कोजागिरी पौर्णिमेला आटवलेल्या मधूर दुधाची चव जिव्हेवर रेंगाळत असतानाच हळूहळू हवेतला बोचरा थंडावा कांतीवर शिरशीरी घेवून येतो.....ही शिरशीरी जणू काही  "दिवाळी जवळ येत आहे आता'', असा सांगावाच घेऊन आलेली असते.

      दिवाळी दरवर्षीच येते.पण प्रत्येक दिवाळीच्या आठवणींची एक खास साठवण मनामध्ये होत जाते,ती त्यातील विशेष गोष्टींमूळे....

माझ्या लहानपणापासून च्या आठवणीतील दिवाळीत दरवर्षी वेगळ्या चवीचे,वेगळ्या पध्दतीनं आणि नाविण्यपूर्ण
फराळाचे पदार्थ बनवणं आणि त्याची ताजी ताजी चव आम्हा सर्वांना चाखावयास लावणं ही आईची एक मनस्वी आवड होती.... चार-पाच दिवसांपूर्वि पासूनच करंजी,अनारसा,साटोरीलाडू, शंकरपाळी, भाजणीची चकली,शेव आणि कधी कधी अगदी फेणी सुध्दा आपल्या हाताने बनवायची आई.... सर्वांत शेवटी विविध प्रकारचे खमंग चिवडे बनायचे या सर्वांच्या सुवासाने दिवाळी उंबरठ्या पर्यंत आल्याची वर्दी मिळायची....

    ‌धन त्रयोदशीला दिवे लावत मांगल्यपूर्ण वातावरणात उंबरठा ओलांडत घरात आलेल्या दिवाळीचं भरभरुन स्वागत व्हायचं....

    नर्कचतुर्दशीला सुर्योदयाच्या अगोदरचे अभ्यंग स्नान हा आमच्यासाठी एक शाही थाटच असायचा...

   ‌   लहानपणीची दिवाळी खूप आठवण देऊन जाते ती आईने स्वतः तिच्या हाताने केलेल्या  सुगंधी तेलाच्या, केसांसह सर्वांगाला केलेल्या हलक्याच पण हव्याहव्याशा मसाजा मूळे....

    ‌आईचा अंगावरुन फिरणारा मुलायम प्रेमळ स्पर्श फार हवाहवासा तर वाटायचाच पण आपल्याच उदरातून जन्मलेलं हे छोटंसं पाडस मोठं होताना बघत,त्याला आपल्या स्पर्शानं न्हाऊ घालत तिला होणारा मनस्वी आनंद,कौतूक आईच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना बघणं हा एक खूप मोठा आनंददायी सोहळाच असायचा....
    
   आईच्या या स्पर्शासाठी आपलाही रोमरोम आसूसलेला आहे ही जाणीव मनाच्या एका हळव्या कप्प्यात लपून बसलेली असायचीच....

        दरवेळी,"तुझी कांती किती मऊ मुलायम!जणू लोण्याचा गोळाच!" हे वाक्य आईच्या तोंडून ऐकण्यात परमानंदाचं सुख मिळायचं...

      माझ्या लग्नानंतरही आईची ही परंपरा खंडित झाली नाही कधी.....
   
        लग्नानंतरही मी अगदी दर वर्षी दिवाळीत आईकडे जायची....आमच्या घरी लक्ष्मीपुजन नाही,म्हणून अगदी पहिल्या दिवसापासून आमची दिवाळी माझ्या माहेरी, आईच्या साग्रसंगीत कोड कौतूकात साजरी होत असायची....

     "तू आल्याशिवाय आम्हाला दिवाळी वाटेलच कशी?" असे म्हणत केलेला आईबाबांचा अग्रह आम्हालाही मोडवायचा नाहीच....

      कांही वर्षांनी आम्ही तीघं भावंड एकाच शहरात रहावयास आलो आणि मग मीच आईच्या या परंपरेत थोडासा बदल करुन तिलाही कसा आराम मिळेल ? याकडे लक्ष देऊ लागले....पण फराळाचे पदार्थ बनवणं आणि जेवणाची लज्जत वाढवणं याची मक्तेदारी मात्र तिने स्वतःकडेच ठेवलेली असायची....

         आपल्या लेकीला दोन बोट का असेना पण तेल लावण्यासाठी अगदी पाच मिनिटं तरी एवढ्या पहाटे पण माझ्या घरी येवून जायचीच आई.....

     खरंच,आईनं केलेलं हे कौतूक हवहवंसं असं लाखमोलाचं असतं प्रत्येक स्त्री साठी....

         कितीही प्रकाशमान अशी विद्यूत रोषणाई केलेली असली तरीही शांत सोज्वळ अशा तेवत्या पणत्यांच्या दिव्यांच्या लख्ख उजळपणाची सर कशालाही नसते ना, तसंच असतं आईच्या कौतूकभऱ्या नजरेचं सौंदर्य तिच्या लेकीसाठी....

        आज आईला जाऊन साडेचार वर्षे झाली आहेत.सभोवती कितीही गोतावळा असेल,कितीही फराळ पक्क्वानांच्या राशी असतील आणि कितीही झगमगाट असेल तरीही तिच्या सहवासात साजऱ्या होणाऱ्या दिवाळीची सर आज काही केल्या येत नाही आणि दर वर्षी दिवाळी आली की, आईसाठी मनाचा हळवा कप्पा आपसूकच हलकासा ओला होऊन जातोच हे नाकारता येणार नाहीच....

©
नंदिनी म.देशपांडे
ऑक्टो.२६,२०१९.

💥💥💥💥💥

आराधना.

*आराधना*

*आराधनेची* आराधना देवाला भावली,
नी तिची ही प्रर्थना फलद्रुप झाली.... पदरात तिच्या भरभरुन ओंजळीने दान टाकती झाली....
 कुशीतून आराधनाच्या सानुल्या दोन गोड गोंडस पऱ्या सृष्टिवर आगमनीत झाल्या.....
ईवल्याशा पऱ्या या दोन, 
जणू सरस्वती आणि लक्ष्मी हातात हात घालून 
हासत खेळत अवतरल्या.....  साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा दिपोत्सवाच्या, पाडव्याच्या ‌शुभ मुहुर्तावर अवनीवर पाऊल टाकत्या झाल्या.....
*नभा* सारख्या विशाल हृदयी आजीच्या या नाती 
दोघी
 दिवाळी पाडव्याची मौल्यवान सोनेरी भेट बनून आल्या......
ईश्वराने बहाल केलेल्या या अमूल्य ठेव्यानं दोन्ही घरांतील कुटुंबात आनंद लहरी फेर धरत्या  झाल्या......
आई बाबा या पऱ्यांचे कृतकृत्य झाले,
 त्यांच्या
समाधानाच्या तेजाने दिपावलीचे दिवे उजळू लागले.....
पणत्या या दोघी, 
दोन्ही घरांच्या उपजतच स्वयंप्रकाश लेवून आल्या......
आम्ही स्वयंसिध्दा,आम्ही मार्ग दर्शिका,आम्ही हिरकण्या नि आम्हीच
वंशलतिका गाणी मनाशीच गुणुगुणु लागल्या.....
आजी,आजोबा,काका,मामा,आत्या आणि मावशी सारेच कसे प्रफुल्लित जाहले.... दिपोत्सवाच्या संगतीने,सनई च्या मंजूळ स्वरात सोन्याच्या पावलांनी,पाऊस धारेच्या साक्षीनं
 अवतरलेल्या 
या दोन पऱ्यांच्या स्वागतासाठी लगबगीने तयारीला लागले.......
फुलांच्या माळा, रंगीबेरंगी दिपमाळा,आकाश कंदिल सारेच जाहले उत्सुक स्वागता....
अंगण सजले रांगोळ्यांनी, अवनी सजली हिरव्या मखमली गलिच्याने..... पऱ्यांसाठीे जणू ही पखरण.....
मुलायम या  पायघड्यांची.......
 निसर्ग राजा हासत डोलत भुलोकी या
सज्ज जाहला....
करण्या स्वागत सानुल्यांचे...... 
गोड गोजिऱ्या या दोन पऱ्यांचे,
आराधनेच्या या दोन कन्यकांचे...
या दोन प्रकाश दर्शक तेजस्विनींचे...

©
*नंदिनी म.देशपांडे*

दिवाळी पाडवा,२०१९.

💐💐💐💐💐💐

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

कोजागिरी पौर्णिमा

चांदण झूला झुलवत
चंद्र अवतरला गगनी
बघताच रुपेरी आभा
चांदणीही भाळली
खुद्कन हसलं आकाश
धुंद झाला चंद्र
नीशेच्या गं अंगणी
टिपूर शिंपलं चांदणं
मंद लहरला पवन
शिरशिरी आला घेऊन
थरथरती चांदणी ती
गेली मनस्वी मोहरुन
अन् बिलगली चंद्रास
अलवार जाऊन
बघूनिया डोळ्यात
चांदणीच्या तरल
चंद्र गेला हरखून
प्रित तिची पाहून...
प्रित तिची पाहून....

© *नंदिनी*

🌕🌕🌕🌕🌕🌕

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

महालय,पितृपक्ष.

.*महालय (पितृपक्ष)*

    "ऐक ना, आई गं मला घागरा ओढणी घ्यायचीए बरं का? चौकात एक्झिबिशन हॉल मध्ये एवढे छान प्रदर्शन लागले ना!आपण जाऊ या उद्या..."
"नाही, अजिबात नाही.... आणखी पाच-सहा दिवस, म्हणजे घटस्थापनेच्या दिवसा पर्यंत कोणतीही खरेदी नाही, कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात नाही किंवा शुभ कार्य वर्ज्य आहे... नंतरच बघू या....."
अगं पण का? ते दोनच दिवस आहे एक्झिबिशन...."
" नाही, सध्या पितृपक्ष चालू आहे, तो संपेपर्यंत नाहीच....".
   सध्या घरोघरी मोठी माणसं व मुलं यांच्यात काहीसे असेच संवाद थोड्याफार फरकाने चालू असावेत, असे लक्षात येते....तरी हल्ली अगदी काटेकोरपणे पितृपक्ष पाळला जात असेल असेही नाही....पण काही प्रमाणात मात्र त्याच्या मर्यादांचे पालन केलेच जाते....

    'महालय'म्हणजे पितृ पंधरवडा, पितृपक्ष.... पन्नाशीत साठीत आलेली पिढी आजही ह्या गोष्टी काही प्रमाणात का असेना, पण पाळताना दिसतात.... खरं म्हणजे, हे पंधरा दिवस निषिद्ध का मानले जातात? यांची पारंपारिक कारणं, जर आजच्या तरुणाईला आपण व्यवस्थित समजावून सांगितली, तर ही मुलं त्यांच्या आई-वडिलांना अक्षरशः वेड्यात काढतील.... स्वर्गस्थ झालेल्या पितरांचे पोट जमिनीवरच्या लोकांना,केवळ एक दिवस विधिवत जेवू  घालण्याने भरते ...आणि त्यांच्या माध्यमातून स्वर्गस्थ लोकांना ,त्यांच्या आत्म्यांना तृप्त केले जाते.... म्हणजे शुद्ध फोलपणाच.... हे खरं म्हणजे आपल्यालाही पटत चाललेय हल्ली....पण, लहानपणापासून वर्षानुवर्षे आपल्या मनामध्ये आणि प्रत्यक्ष कृतीमधून रुजवलेले हे संस्कार, ही विचारधारा त्यामागचा हेतू आणि पूर्वजांशी असणारी आपली बांधिलकी या सर्व गोष्टींचा पगडा नाही म्हटलं तरी आजही बाळगून आहोत आपण.... आताशी थोडा सैल होत चालला आहे तोे.... पण  आपल्या मनावर त्यांचा प्रभाव शिल्लक आहेच,आणखीणही.... त्यातील कर्मठपणा बर्‍याच अंशी कमी झालाय....हे मात्र मान्यच करावे लागते....

    यानंतरच्या पिढ्यांना एवढे पूर्वजही नसतील....त्यांची फार  वंशावळही फार मोठी नसेल.... नव्हे,त्यांना ती माहीतही असेल की नाही कोण जाणे?... आणि या मुलांजवळ या सार्‍या गोष्टींसाठी द्यावयास वेळ तर अजिबातच नसेल....

    हल्लीच्या तरुणाईच्या पालकांनी घरातील ज्येष्ठांना, वृद्धांना सन्मानाची वागणूक देत, आपला दिवसभरातला थोडातरी वेळ त्यांच्या समवेत घालवत, आणि त्यांच्याशी काहीवेळ तरी संवाद साधत त्यांच्या सहवासात घालावा.... तसेच आपल्या ऐपतीनुसार, आई वडील यांना,त्यांच्या तरुणपणात  स्वतःसाठी पूर्ण न करता आलेल्या मौजेच्या बाबींची, जमेल तशी पूर्तता करणे....धार्मिक  सहली त्यांच्या साठी घडवून आणणे.... सर्व कुटुंबाने एकत्रित वेळ घालवून....जेष्ठांशी संवाद साधत, त्यांना आनंद युक्त समाधान द्यावं.... जेणेकरून त्यांच्या तरुणपणात आपल्या साठी त्यांनी केलेल्या श्रमाचे, तडजोडीचे साफल्य त्यांच्या हयातीतच त्यांना बघावयास मिळावे...‌ असा योग उपलब्ध करून द्यावा..... या पेक्षा चांगली कृती आणखी काय असू शकते?.... जेष्ठांच्या हयातीतच त्यांची आपण केलेली सेवा,त्यातून त्यांना मिळणारं समाधान, आनंद, त्यांचा आदर या सर्व गोष्टी तरुणाईला अनुकरणीय निश्चितच होतील.....आपल्या अशा वागण्यातून समाजात एक चांगला विचार, चांगला दृष्टीकोण निर्माण होईल यात वादच नाही..... आपल्या पिढीमध्ये असणारी,काही प्रमाणात शिल्लक राहिलेली भावनाशील वृत्ती,आता पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित होईल असे काम आपण....करणे हिच मला वाटतं आपल्या स्वर्गस्थ पितरांसाठी आणि हयात असणाऱ्या ज्येष्ठांसाठी, वृद्धांसाठी वाहिलेल्या शुभेच्छा ठराव्यात....अशा प्रकारच्या प्रत्यक्ष शुभेच्छांमूळे याच जन्मी समाधानाने त्यांचे पोट भरावे, आत्मा तृप्त व्हावा.... एवढे घडून आले तरीही खूप.... असे मला वाटतं...

   ©
*नंदिनी म. देशपांडे.*

सप्टें,२५,२०१९.

✳✳✳✳✳✳

बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९

आयुष्य.

*आयुष्य*

आयुष्य हे ऽ चुलीवरल्या
कढईतले कांदे ऽपोऽहे.....

    आजच्या लेखन  कल्पनेचा विषय वाचला नि,हे गाणं आठवलं पटकन....

     खरंच माणसाचं आयुष्य हे कांदा पोह्या सारखंच खमंग बनत जातं दिवसेंदिवस....
त्यात साऱ्या चीजा ह्या प्रमाणातच पडायला हव्यात तरच ते चवदार बनतं....

    सर्व प्रथम तर हे आयुष्य भिजवलेल्या पोह्या प्रमाणे छान पैकी पाण्यात धुवून  मऊ मुलायम बनायला हवं...
लहानपणापासून आई वडिलांकडून आपल्यावर होत असणाऱ्या कोड कौतुकाच्या,लाडिवाळ लोभाच्या नि भरभरुन मिळणाऱ्या प्रेमळ स्पर्शावाच्या वर्षावात चिंब भिजत मुलायम बनलेले असतेच....
जसं आपण स्वतःला समाजाभिमुख बनवत त्यात मिसळून जाण्याचा प्रयत्न करतो तसं मग त्यात एक एक प्रकारचे मसाले पडत जातात....
   आयुष्याची लज्जत वाढवायला समाजरुपाचे कांदे आवश्यकच.....केवळ यानेही काम भागणार नाहीच रंगही आकर्षक हवाच..... शेवटी 'अॅटिट्यूड' महत्त्वाचाच म्हणूनच योग्य प्रमाणात हळद हवीच....तिचं कमी जास्त प्रमाण उग्र दर्प देऊन जातं तेही बेचव वाटतंच....
आयुष्याच्या प्रवासात येणारी विविध प्रकारची छोटी मोठी वादळं, मनःस्ताप देऊन जातात... पण, पण खूप काही शिकवून जातात खचितच....परिणामी त्यातील झणझणीत पणा पोह्यात टाकलेल्या हिरव्या मिरची प्रमाणे चव व्दिगुणित करतो.....या तीखट पणाचं संतुलन साधावयाचं असेल तर,त्यात लिंबू,शेंगदाणे,दाळं,
हिंग,मोहरी व माधुर्यासाठी किंचितशी साखर आवश्यकच....हे ज्यानं त्यानं आपल्या आवडी नुसार घालावित....ह्यांचे काम करणारे आयुष्यातील घटक म्हणजे,राग व्देश,आसूया या गोष्टींचा सामना करत करत स्पर्धेच्या तोंडघाशी पडत पडत,येणाऱ्या चांगल्या वाईट अशा असंख्य अडचणींवर यशस्वीपणे मात करत त्यातून मार्ग काढत काढत शेवटी आपल्या आयुष्याची रंगत वाढवणं जशी आपण पोह्यांची रंगत वाढवत आपल्या जिव्हेला चव आणतो.... असे पोहे लिलया रसरशीत मुखरसात विरघळत पोटात ढकलले जातात.... अगदी तृप्ततेच्या भावनेनं....

    आयुष्याचंही असंच आहे,वैविध्यानं नटलेल्या या स्वानुभवातून,परिस्थितीतून मार्ग काढत,ताऊन सुलखून निघालेलं आपलं आयुष्य,आपण मागे वळून बघतो तेंव्हा, कृतकृत्यतेचं मनस्वी समाधान देऊन जातं....
ही कृतकृत्यता अनुभवण्यासाठी उसंत मात्र मिळायला हवी....तरच आपण आपल्या आयुष्याचा आस्वाद घेत आहोत याची प्रचिती येईल....
अर्थातच त्यासाठी आपण मानसिक, शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असावयास हवे.....ते सर्वस्वी आपल्याच हातात आहे....

   जीवनात असा सारा सुयोग जुळून आला म्हणजे,परिपूर्तिचा आनंद मनसोक्तपणे लुटत लुटत समाधानानं शेवटच्या प्रवासाला सन्मुख जाता येतं...

    शेवटी माणसाचं आयुष्य आयुष्य म्हणजे काय हो,तर त्याच्या जन्मा पासून सुरू होणारा आणि मृत्यू पंथावरुन हासत चालत जाणारा जीवनपटच....
या जीवन पटावर विणली जाणारी नक्षी आपण किती सहज,संयमानं,व्यवहार कौशल्यानं, शैक्षणिक कुंचल्यानं,सहृदयतेनं,
प्रेमानं,नजाकतीनं विणतो...त्या साठी आपल्या आयुष्यात येणाऱ्या सहवासातील माणसांचे कशा प्रकारे सहाय्य घेतो यावरच सर्वस्वी अवलंबून आहे....होय ना...?

     तर मित्रांनो आयुष्य म्हणजे,आपल्या जन्मापासून ते आपल्या अंतापर्यंत आपणच घेतलेला आपल्या अस्तित्वाचा शोध....त्यासाठी केलेली धडपड....मेहनत....
अन् काय....😊

©
*नंदिनी म.देशपांडे*.

सप्टें,११,२०१९.

✡✡✡✡✡✡