रविवार, ३१ मार्च, २०१९

* सुर्यदेव *

*सुर्यदेव*

सुर्यदेव चिडले
रागाने कोपले....
आपल्या सहस्त्र करांतून
प्रकटायला लागले....
अवनीवरच्या प्रेमाला
अशी कशी लागली दृष्ट
हिरवा कंच शालू तिचा
करडा केला जास्तच
प्राणी मात्रांच्या तोंडचे तर
पाणीच पळवले त्यांनी
बेसुमार वृक्षतोडीचे
परिणाम भोगले आम्ही
म्हणाले सुर्यदेव,
सांगत होतो नेहमीच
झाडे लावा झाडे वाचवा
तुमच्याच हितासाठी
गोड शब्दांत सांगितलेले
ऐकेल तो माणूस कसचा
तुमच्याच करणीची शिक्षा
गगनराज म्हणून देतोय
आता तरी जागे व्हा,
भराभर झाडं लावा
माणसासारखं शहाण्या
गुपचूप ऐका....
बघताच माणसांची त्रेधातिरपीट
सुर्य देवांना आली कणव
ढगांना काळ्या बोलावणे धाडत
दिला आदेश....
करण्या तिव्रता जराशी कमी
आपल्या सहस्र करांची
म्हणत म्हणत पुनःपुन्हा
झाडे लावा झाडे जगवा
झाडे लावा झाडे जगवा....

©*नंदिनी*

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

रविवार, २४ मार्च, २०१९

होळीचा रंग.


https://youtu.be/VQqu-JYQUZY

खेळताना रंग बाई होळीचाऽऽ होळीचाऽ
   फाऽटला गं कोना माझ्या चोऽळीचाऽ
फाऽटला गं कोना माझ्या चोऽळीचा......
     लहानपणी होळी जवळ आली की रेडिओवर हे गाणं हमखास लागायचचं.... खरं म्हणजे बालवयात होते तोपर्यंत या गाण्याचा ठेका आणि त्यातील अनुप्रास अलंकार यांच्या नादमाधुर्यामुळे व अर्थातच सुलोचनाबाईंच्या ठसकेबाज आवाजातलं हे गाणं मला फार आवडायचं.म्हणजे आजही मला ते आवडतंच. यात शंकाच नाही.... सुलोचनाबाईंनी आपल्या पहाडी आवाजात ते एका उच्च पातळीवर नेऊन  बसवलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.....
    पण वयाच्या आणि विचारांच्या कक्षा जशा रुंदावत जाऊ लागल्या तसं या गाण्याचं, जे केवळ ऐकून सुखावह वाटत होतं,ते नंतर मात्र अर्थ जसा समजू लागला तसं, हे  तर फारच 'बोल्ड' आहे असं जाणवू लागलं.....  ते ऐकताना आवाजही हलकाच ठेवावा, न जाणो आपण हे गाणं ऐकताना कोणी बघितलं आणि आपल्या विषयी गैरसमज करून घेतला तर.... अशी एक भीती वाटायची त्या वेळी....
    आमच्या ऐन तारुण्याचा काळ....अहो म्हणजे,आजही आम्ही तरुण आहोतच....फक्त तारुण्याच्या उत्तरावस्थेत झुकलोयं एवढंच.... असं म्हणा हवं तर.... आमच्या पिढीच्या तारुण्याचा काळ हा सुलोचनाबाईंच्या लावण्यांच्या प्रेमात पडण्याचाच तर होता...... तेंव्हांच्या त्यांच्या बहारदार लावण्या आजही तेवढ्याच बहारदार आहेत....          
    पण तो काळ मात्र आजच्या सारखा नव्हता....राजरोसपणे कॅसेट किंवा रेकॉर्ड ऐकावीत आणि अशी गाणी ऐकावित...असा रिवाज त्यावेळी निदान मुलींसाठी तर नक्कीच नव्हता....
     हल्ली सोशल मिडिया च्या या गर्दीच्या जगतात मनात आलं की पटकन हे गाणं ऐकलं आज मी.... पण तरीही घरात कोणी आपण ऐकताना "आॅब्जेक्शन" घेणार नाही ना?.... अशी पाल चुकचुकलीच मनात....
    हे गाणं चालू असताना आपोआपच ऐकणाऱ्याच्या ओठावरही यातील शब्द येतात आणि आपण गुणगुणू लागतोच....आपल्याला आपणच  खूपच बोल्ड झालो आहोत असं वाटत..... पण असू देत,
  होली हैऽऽऽ म्हणत म्हणत या गाण्याने ऐकताना खूप मजा आणली हे मात्र नक्की....
   तर ,बघा धुळवंडीच्या निमित्ताने तुम्हाला ऐकता आलं तर हे होळीच्या रंगांचं गाणं तर... सोबत लिंक आहेच. आणि आणखीन एक मला आवडणारं होळीचंच गाणं....
आवडेल नक्कीच तुम्हालाही....

*नंदिनी म.देशपांडे.*

https://youtu.be/dmDIGeKbO14

🤗🤗🤗🤗🤗🤗

शनिवार, १६ मार्च, २०१९

* स्फटिक निळाई*

* स्फटिक निळाई *

आकाशीची स्फटिक निळाई,
विरघळूनी या नदीप्रवाही।

श्रृंगारित ही सुंदर अवनी,
आस घेवूनी अधिर स्वप्नांची।

खळखळतो हा नाद जलाचा,
किलबिलाटाची मधुर शहेनाई।

हिरवाईचा मोरपिसारा,
फुलूनी सज्ज हा स्वागताला।

त्या क्षितिजावर धरती
अंबर,
आस लेवूनी मनी मिलनाची।

अहा! किती हा सुरेख नजारा,
भुरळ घालीती चैतन्याला।

होता मिलाफ
क्षितीजावर त्या,
दाटला अवचित संभ्रम
हा का।

कुठली ‌धरती?
अन् कुठले अंबर?....

कुठली धरती?
अन् कुठले अंबर?....

© *नंदिनी*

🌷🌷🌷🌷🌷🌷

* पुलाचे मनोगत *

*पूलाचे मनोगत*

दोन रस्ते जुळवताना
बांधलेला दुवा म्हणतात
मला....

किती तरी लोकांची
   पायधूळ लागते
माझ्या अंगाला....

गर्दीची सवय नेहमी
असते मला....

येणाऱ्या जाणाऱ्या
गर्दीचे चेहरे रोज
वाचायचो मी....

अंतरंगातील त्यांच्या
भाव उमजून
घ्यायचो मी.....

कुणाला असायची लगबग
गाडी पकडण्याची....

कुणाला असायची घाई
आवडत्या माणसाला
भेटण्याची....

कुणी असे आसुसलेला
घरी जाण्यासाठी....

तर,कुणी असे भरभरुन
बोलण्यासाठी....

काहींची आई
वाट बघे
आपल्या लेकराची.....

काहींची बायको
सज्ज स्वागता
प्रसन्न चित्ती....

काहींची सानुली बाळे
वाटेकडे डोळे
लावून आईची....

तर काहींचे पिता
बघायचे वाट
आधार देणाऱ्या हातांची....

रोज न्याहाळत ही
साऱ्यांची तारांबळ....
कृतकृत्य वाटायचे
मलाच मनोमन....

पण,पण वाटलंच नव्हतं
एक दिवस असाही उगवेल....

जोडणारा सांधाच 
असा निखळून पडेल....

माझ्या निखळण्याने
उडेल असा हाहाःकार....

रोज पायधूळ झाडणारे
पडतील असे निपचित....

आणि,सिस्टिमच्या संवेदना
एवढ्या बोथट होतील....

धिक्कार असो या
फसव्या पध्दतींचा....

धिक्कार असो या
निर्ढावलेल्या भेकटांचा....

उबग आलाय आता
या सहनशीलतेचा....

वेळ आलीय
पेटून उठण्याची आता....

हाती बदलाची
मशाल घेण्याची सुध्दा....

भ्रष्टाचाराचे
उच्चाटण करु या...

सारे मिळून शपथ
ही घेऊ या....

अमुलाग्र बदल
आपण घडवू या....

माणुसकीच्या बियांची
पेरणी करु या....

वृक्षाची त्याच्या
जोपासना करु या...

निवांत सावली
माणुसकीची
देऊ या ....

*नंदिनी*

१६,मार्च २०१९.

🌱🌱🌱🌱🌱

शुक्रवार, १५ मार्च, २०१९

*सांजवेळ*

सांजवेळ,
घराचीओढ लावणारी....

सांजवेळ,
घराकडे पावलांना वळवणारी....

सांजवेळ,
पिलांना घरट्याकडे ओढणारी....

सांजवेळ,
मनाला निवांतपणा देणारी....

सांजवेळ,
शरीराला विसावा देणारी....

सांजवेळ,
हृदयीची साद
हृदयाला देणारी...

सांजवेळ
मनीचे हितगुज जीवलगाला सांगणारी...

सांजवेळ,
उद्याची स्वप्नं बघणारी...

सांजवेळ
स्वप्नांना कवेत घेणारी....

सांजवेळ,
बघितलेली स्वप्नं साकारण्यास
पहाटेची वाट दाखवणारी....

सांजवेळ,
प्रदीर्घ विरहानंतर
मिलनाची आस ठेवणारी....

©*नंदिनी*.

रविवार, १० मार्च, २०१९

* रविवार *

*रविवार*

साऱ्या भावंडात शेंडेफळ
मी रविवार...

म्हणून करतात सारे
माझाच जास्तीचा
लाड....

मनसोक्त आरामाच्या
आखत योजना...

जास्तीच्या कामांसाठी
वेळ देण्याचा बहाणा...

मनोरंजनासाठी ही
मलाच राखून ठेवलेले...

जिभेचे चोचलेही
माझ्याच माथी मारलेले...

रविवार रविवार म्हणत
घालवतात दिवस आनंदात...

पण रात्र होताच आठवण होते
माझ्या सर्वांत मोठ्या
भावाची....

उभा असतो दारी
छडी घेतलेला
शिस्तबध्द सोमवार...

मग मात्र कोण घाई
ती झोपण्याची....

आणि सोमवारच्या सकाळचा गजर लावण्याची....

शुभ रात्री म्हणत म्हणत
निद्रादेवीला जवळ करण्याची...‌

*©नंदिनी*

🌹🌹🌹

शुक्रवार, ८ मार्च, २०१९

महिला एक दिन, औचित्य.

*महिला दिन*
*हार्दिक शुभेच्छा*

जिच्या हाती पाळण्याची दोरी ती
राष्ट्राला उध्दारी

जिच्या हाती लेखणीची
ताकद
ती अन्यायावर कोरडे
ओढी

युगानुयुगे जखडलेली तू
आता श्वास घे मोकळा
खोलवरी

बुध्दिमत्तेची तुझ्या झेप
मारो उंचच उंच भरारी

अबला नव्हतीसच तू
सबला नारी सिध्द हो

दाखवण्या साऱ्या जगाला
स्वकतृत्वातूनी

एकच महिला दिन नव्हे
गौरवाचा तुझ्या, पण

अख्खे वर्ष पडेल कमी
करण्या तुझा सन्मान

हात लावता जेथे जेथे
सोने करशील तेथे तेथे

दाखव जगाला या
तुझीच शक्ती
हे सौदामिनी.....

*©*नंदिनी*

👸👸👸👸👸👸

मंगळवार, ५ मार्च, २०१९

उपवास.

*उपवास.*

                  “उद्या महाशिवरात्र आहे. कोण कोण करणार आहे उपवास उद्या? ललिताने रात्रीच्या जेवणाच्या वेळी, टेबल वर सगळ्यांना प्रश्न केला.

     तसे चिनू म्हणाला, “आई मी लंगडा उपवास करणार”.

छकू म्हणाली, “आई मी पूर्ण उपवास करणार बरं का….”

त्यांचे बाबा म्हणाले, “अगं मी पण पूर्ण करेन उपवास. पण काहीतरी वेगळे कर बाबा खाण्यासाठी. छान चमचमीत, झणझणीत. कर ,उपवासाचे थालीपीठ, त्यासाठी शेंगदाण्याची झणझणीत चटणी.”

“ आम्हाला  चावण्या  सारखं काहीतरी कर गं ललिता. एवढी वर्षे पाळली आहे शिवरात्र, आता थोडक्यासाठी कशाला मोडू उपवास…” हळूच अण्णांनी सुचवले.

   “ए आई, माझा लंगडा उपवास आहे. पण साबुदाण्याची खिचडी कर हां भरपूर. मला खुप आवडते. किती दिवस झाले खाल्लीच नाही मी ….”चिनू...

  “आणि हो मग जेवणासाठी ना पावभाजी कर.मस्त. गरमा गरम. सुट्टी आहे उद्या शाळेला.

“ दीदी तू पण लंगडाच कर ना उपवास. मस्त दिवसभर आवडीचं.”

चिनूने दिदिला उपदेश केला.

“चालेल मी पण लंगडाच करीन गं आई, उपवास उद्या. मस्त बटाट्याचे वेफर्स करशील ना? काय फक्कड लागतात गं ताजी ताजी.”इति छकु....

“मला आपली  भगर आणि आमटीच कर गं, गरम गरम छान मऊसुत!  तूप घालून गुटु गुटू गिळता येते”, आई आपले मौन सोडत बोलल्या.

“आणि काय ग रताळी आणली आहेत  ना तू ,त्याचा शिरा कर मधुर म्हणजे पोटभरी वाटेल.”

“ ललिता थोड्या साबुदाण्याच्या पापड्या पण तळून काढ,म्हणजे उपवास असेल तरीही ताटात कसे भरून  होतील पदार्थ.”

नवरोबांची आणखी एक सुचना.

ललिता एवढ्या साऱ्या सुचनांचा भडीमार ऐकून दिक्क झाली.

    खरंतर उद्या उपवासच आहे. झटपट साबुदाणा खिचडी आणि भगर आमटी करावी.आणि  दुपारी मस्त पैकी जाऊन यावे मैत्रिणींबरोबर ‘आनंदी गोपाळ’ बघण्यासाठी. दुपारीच लवकर आहे त्याचा शो. असे मनातच ठरवलेले होते तिने. आता सगळ्या नियोजनावर पाणी फिरणार तर….

      उद्या सगळ्यांना सुट्टी. त्यात उपवासाचा दिवस. या नावाखाली खाण्याची फर्माईश चालूच राहणार दिवसभर. कुठून विषय काढला मी….. असे होऊन गेलंय, बरं आता विचारलं मोठेपणाने  तर प्रत्येकाची खवय्येगिरी तर जोपासावी लागेलच ना !

   चला, साबुदाणा खिचडी आणि अर्थातच साबुदाणा वडा काही पटकन होणारे नाही. लगेचच लागावे लागेल तयारीला.

   कन्येची  वेफर्सची ऑर्डर म्हणजे बटाटे बघावे लागतील आहेत का घरात? नाहीतर पळावे लागेल मंडईत सकाळीच.फळंही आणावे लागतील भरपूर! कधी नव्हे ती ह्यांची फर्माईश झाली .नाही कसे म्हणणार?  तेही काम वाढलेच. फळे स्वच्छ धुऊन घ्या ,बारीक कापा, गार करा, उद्या कस्टर्डही चालणार नाही. दूध आटवून घ्यावे लागेल जरासे.

     आई, अण्णा यांची तरी काय असते एरवी खाण्याची मागणी? बऱ्याच गोळ्या आहेत दोघांनाही. पोटभरीचे हवेच त्यांना….

....आणि हा लंगडा उपवास चिरंजीवांचा. तोही पाळावाच लागेल. आपणच तर घातलाय तो लहानपणीच मुलांना…..

    छकुने  विचारले सुद्धा होते, “आई उपवास म्हणजे कोणी चालत येणारा देव आहे का गं? आणि लंगडत का चालतो तो?”

यावरचे मी तिला दिलेले स्पष्टीकरण किती मजेशीर  वाटले होते त्यावेळी तिला….

      खरं तर, ‘उपवास' म्हणजे उप+वास. याचा अर्थ नेहमीच्या मुख्य पदार्थांच्या पेक्षा वेगळे असलेले उप किंवा जेवणात खाण्याचे पर्यायी पदार्थ. यांचा वास घेणे अर्थात ते चाखून बघणे यालाच आपण उपवास म्हणतो. ऋतूमानाच्या बदलांच्या संधीवर चवीत बदल म्हणून असे मोठे आलेले काही थोडेच तर उपवास करतो आपण.

    शास्त्रीय अर्थ उपवास म्हणजे ‘लंघन’ वगैरे गोष्टी मनाला शिवतही नाही ना ! देवपूजेच्या अनुषंगाने पोटपूजा ही करावीच लागणार! एक वेळ देवपूजा राहिली तरी चालते की ! देव कुठे म्हणतो रोज मला आंघोळ घालत जा म्हणून ! आपणच नाही का आपल्या सोयीने देवाला अंघोळीची गोळी देतो  बरेचदा !

      माणसाचं वेगळं आहे. उपवासाची गोळी असावयास हवी होती असे वाटते कधी कधी. असाच विचार करत करत ललिताला झोप लागली.
   
      भरपूर प्रकारांची फर्माईश आहे  म्हणून नेहमीपेक्षा लवकरच उठली आज ललिता…….

       सर्वांच्या जिभेचे चोचले पुरविण्यात चार वाजले दुपारचे.आता कसचा  ‘आनंदी गोपाळ’? एक सुस्कारा सोडला ललिताने....

   थोडंसं निवांत बसावे, पुन्हा आहेच चिरंजीवांची पाव भाजीची ऑर्डर!

     पण या सर्वांच्या नादात आपली ही काही आवड असू शकते किंवा असावयास हवी, आणि ती आपण पूर्ण करावी हे तर मनातही आलेच नाही कधी !
  
   एखाद्याने जरी विचारले असतं, “तुला, काय आवडतं? तेच कर.” तर नक्कीच आपण शिंगाड्याचा पिठाचा शिरा आणि रताळ्याची उसळ केली असती.....

      रताळे ची उसळ आणि शिंगाड्याचा शिरा ! पण नाहीच माझी आवड पूर्ण करण्यात आणखी एखादा तास गेलाच असता नक्की !

    “ आई शी किती चिकट चिकट (गिजगा) आहे हा पदार्थ”? आणि हा काय शिरा? किती घाणेरडा वास येतोयं याला….. अजिबात करु नकोस  ललिता हे पुन्हा……..” अशी सूचनावजा तंबी ऐकलीयं दोन वर्षांपूर्वी.

   आपण आपल्या आवडीचं काही करावं या भूमिकेतून, करावेसे वाटले होतं त्यावेळी….

     पण खरंच हल्ली आपली आवड-निवड शिलकीत ठेवलीच आहे कुठे आपण? मुलांची, ह्यांची, आईअण्णांची या साऱ्यांच्या आवडी निवडींनाच तर आपणही जोडून घेतलंयं  जाणीवपूर्वक ! आपलेच काम थोडे हलके व्हावे म्हणून आपणच तर  दुय्यम मानलंयं आपल्या आवडींना !

      आपल्या संसाराचं रहाटगाडगं विना अडखळत, विना आवाज करत, मुलायम वाटेवरून चालण्यासाठी ! किंबहुना खाण्याच्या नाहीतर एकूणच जीवनाच्या विविध अंगांशी निगडीत आपल्या आवडींना कोंडून ठेवलंयं आपल्या मनाच्या एका कप्प्यात……

  आपणच  सवय करून घेतलीए ना आपल्या आवडीनिवडी बाजूला सारण्याची…… येतात कधीतरी उफाळून, तरीही पुन्हा घालतोच की मुरड त्यांना आपण ! अगदी सहज ! कोणत्याही  अपेक्षेविना……

  पण तरीही आहोत ना,आपण आनंदी ! काय बिघडलं आपल्या आवडींना फारसे महत्त्व दिले नाही म्हणून ! पण इतरांच्या आवडीनिवडी जपताना मनापासून विचारावेसे वाटले सर्वांना ,म्हणूनच तर चिवचिवाट झाला सगळ्यांचा ! आणि हो लागले थोडे जास्त कष्ट, दररोज पेक्षाही, पण आज आपण किती खूष आहोत  सारे !

       सुट्टीची निवांत मनासारखी पोटपूजा झाली आहे म्हणून !

     समाधानाचे हे तरंग कितीतरी चैतन्य पसरवतात की आपल्या वास्तू मध्ये! यापेक्षा दुसरं काय हवंयं ?चैतन्य फुलवणे, ते जीवापाड जपणे, त्यांना एकत्रित बांधून ठेवणे हीच तर खरी आवड आहे आपली  संसारातील !

      ही माझीच आवड नव्हे का मग ? का म्हणून मानावे मी, की माझ्या आवडीनिवडींना दुय्यम दर्जा आहे असे?  नाहीच, अजिबात असे नव्हेच.   ‘घरातील सर्वांचा आनंद जपणे’ हीच तर माझी खरी आवड. त्यासाठीच तर स्विकारलंयं ना मी पूर्ण गृहिणीपद ! हेच अतिउच्च पद देणारं,मला स्वामिनी बनवत आनंद देऊन जाणारं……माझं इप्सित साध्य करणारं !!

© नंदिनी म.देशपांडे.

🎀🎀🎀🎀🎀🎀