शनिवार, २७ जून, २०२०

कांदाभजी.

*चोचले जिव्हेचे*

*कांदा भजी*

      खरं म्हणजे,पाऊस आणि कांदाभजी यांचं नातं कोणी लावलंयं माहित नाही, पण मोठं झक्कास आहे!
    
       आषाढाचा महिना आहे हवेमध्ये कुंदपणा दाटून आलाय...आकाशात काळ्या मेघांची दाटी झालीए....त्यांची गार गार हवेने छेड काढलीए...बिचारे चिडून बरस बरस बरसताहेत....अशा या मस्त पावसाळी हवेचा आनंद आपण छानपैकी गरमागरम कांदाभजी बनवण्याचा बेत करुन साजरा करतोय....सुटले ना तोंडाला पाणी!

     कांही ठिकाणी कांदा भजी खेकडा भजी म्हणून ओळखली जातात...कांद्याचे काप उभे केल्यास तसा आकार येणारच,पण म्हणून एवढं किळसवाणं नाव?खाण्यावरची वासनाच जाईल माणसाची....असो...

    पण काहीही म्हणा पाऊस आणि कांदाभजी यांचं जमलेलं सुत छानच!
मला वाटतं याच कारणानं आषाढातच कांदेनवमी येत असणार...चातुर्मासात 'कांदा बंद' चा नारा दिला जातो काही घरांमध्ये,तो पाळण्याचं निमित्त करुन कांदाभजी होतात घरोघरी...हल्ली महिला मंडळात तर या निमित्ताने पावसाळी सहली आयोजित केल्या जातात....कांदाभजीच्या पार्ट्या होतात म्हणे....

     आमच्या मराठवाड्यात भजांचं जुनं नाव"बोंडं",असं आहे...जुनी लोकं आजही असेच संबोधत असतील,पण असं संबोधन करणारी पिढी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे....पण नंतरच्या पिढीला हे भज्यांचं नाव
कांही पचनी पडलं नाही....अहो,बोंडं म्हटलं की मोठे मोठे बेसनाचे तळलेले गोळेच दिसतात डोळ्यासमोर....ते कसे पडणार पचनी?

      मग थोडसं नाजूक नाव, हिंदीतून घेतलंयं मराठीत उसनं खास भज्यांसाठी ते म्हणजे"पकोडे".असं म्हणताच,गरमागरम, कुरकुरीत,छोटी छोटी कांद्याची किंवा मिरचीची झणझणीत किंवा पारशी दोडक्यांची किंवा पानकोबीची किंवा पालकाची अशा सर्वच चवींची चवदार लागतात....

     भजी हे नामाभिदान तसं बरंए पण त्याला पकोड्यांची सर नाही असं माझं मत आहे...

     पण काहीही असो,हा पदार्थ स्वरुपात,नावात कितीही बदल झाला असेल तरीही खमंग आणि चवदारच!
 गरमागरम आस्वादाचा भुकेला....करणाराची आणि खाणारांची भट्टी एकदा जमली की,दोघंही कंटाळणार नाहीत अशीच....एव्हाना पावसाळी कांदाभजींची एक एक फेरी नक्कीच झाली असणार घरोघरी....आता दुसरी फेरी कांदेनवमीच्या दिवशी होय ना?
👍🏻😊

©️
  *नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, २२ जून, २०२०

बाबा

*बाबा*

    "तू आमचं पहिलं आपत्य!किती आनंद वाटला घरात सर्वांनाच!सगळ्यात जास्त तुला जपलंयं....सात महिन्यांची जन्मली आहेस ना तू!पाच वर्षांपर्यंत कडेवरच घेऊन फिरलोय आम्ही दोघं तुला....पायी चालवलं तर बाप्पा (माझे वडिल)रागवायचे आम्हाला."...
   एकदा सायकलवर तुला घेऊन पडलो होतो मी!काय अवतार झाला होता, माझा म्हणून सांगू....पण तुला अधर ठेवलं...."
     माझ्या बालवयातील आठवणी सांगताना आजही पंचाहत्तरी पार केलेले ‌बाबा, तेवढंच उत्साहानं आणि उस्फुर्तपणे कौतुकानं, भरभरुन बोलतात....आणि  अशावेळी मला स्वतःला आज पन्नाशी पार करुन दोन तीन वर्षे झालीएत तरी मीही तेवढीच लहान झाले आहे त्यांच्या सहवासात.... असं वाटत असतं....हे लहानपण,हे कौतुकाचे बोल,हा मनाला खंबीर बनवणारा आधारस्तंभ कधीच लोपू नये,कायम आपली अशीच साथ करत राहो असंच वाटत रहातं....
      आई-वडिलांच्या मायेच्या सावलीत असलं की,मुलांना कितीही वय वाढलं आपलं की आपण आजही लहानच आहोत ही जाणीव कायम असते....ही हवीहवीशी चीरतरुणपण कायम ठेवणारी आपली जाणीव, या आधारवडाच्या सावलीचा थंडगार गारवा देत रहाते कायमच....उन्हाचे चटकेच नव्हे तर साध्या झाळ्या सुध्दा लागू देत नाहीत....
     आज फादर्स डे,खरं म्हणजे आईवडिलांच्या ममतेसाठी कोणत्याही डे ची गरज नाहीच....ते अव्याहतपणे नेहमीच आपल्या पाठीवरुन आपला मृदुल हात फिरवत असतं...पण सगळं जग साजरा करतंय मग या निमित्ताने थोडेसे व्यक्त होऊ आपणही असं वाटलं....
   असेही जन्मदात्यांच्या ऋणातून मुक्त आणि व्यक्त होण्यास, शब्दांचा आधार घेणं म्हणजे,पहाडाला काठीच्या आधारावर पेलण्यासारखं आहे....
    माझ्या बालपणापासून बाबांना जाणून घेणं म्हणजे त्यांनी स्विकारलेली नवनवीन आव्हानं यशस्वीपणे पेलणं होय...अर्थात हे करताना आईचीही खंबीर साथ तेवढीच मोलाची होती...
   त्यांना जाणून घेणं म्हणजे,त्यांनी आपल्या वकिली व्यवसायातील ज्ञानला आजही कायम अपडेट ठेवत, यातील बारकाव्यांची चर्चा करणं,ती समजाऊन सांगणं होय...आम्ही भावंडच नव्हे तर कोणीही परिचित व्यक्ती आला कायद्याचा सल्ला मागावयास, तर त्याचे उदाहरणासह विवेचन करुन शंकानिरसन करणं होय....
     सुट्टीच्या दिवशी आपल्याच क्षेत्रातील मंडळींशी गप्पांष्टकंची महेफिल जमवून आपल्याला आलेले या क्षेत्रातले निराळे अनुभव कथन करणं, हा त्यांचा मनस्वी छंद पण या गोष्टी कानावर पडून आम्हीही त्यातून बरंच कांही शिकलो आहोत... आयुष्याच्या वाटेवरुन यशस्वी वाटचाल करत असताना या छोट्या छोट्या टिप्स फार उपयोगी पडतात...
    कायदेविषयक चर्चा हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय आणि त्यावर त्यांची तेवढीच कमांड असणारा हा विषय...
    कायदेविषयक चर्चेतून बाबा जसे उमजत गेले तसेच बांधकाम या विषयातूनही....व्यवसायानं,शिक्षणानं बांधकम क्षेत्राशी तीळमात्र संबंध नसताना,त्या विषयीची प्रचंड आवड त्यांना कधीच स्वस्थ बसू देत नाही....सारखं त्यांच्या स्वतःच्या किंवा आमच्या पैकी कोणाच्याही घराचं नवीन बांधकाम असो नाहीतर रिनोवेशन हे कायम तत्परतेनं हजर राहून समोर उभं राहून बांधून घेतील....त्यांच्या डोक्यात तेथील नकाशा, डिझाईन यांची प्रतिमा अगोदरच तयार झालेली असते ती तेवढीच स्पष्ट उतरवून घेण्यात बाबांना स्वतःला फार आनंद मिळतो....
   एका जज्जचा किंवा वकिलाचा, सर्व विषयांची संपर्क येत असतो, त्यामूळे त्याने आपले ज्ञानचक्षू सर्वंवकषपणे खुले ठेऊन वावरायला हवे हे त्यांचे तत्व ते आम्हाला नेहमी सांगत असतात...
    बाबा उमगले ते त्यांच्या दूरदृष्टीपणाच्या नजरेमधून....वर्तमानाची पावलं ओळखत भविष्याची वाटचाल करावयास हवी हे त्यांचे ब्रिद स्वतः आचरणात आणत आम्हालाही करावयास लावणारे बाबा...
    त्यामुळे खरंच, अडचणी च्या वेळी माणूस कधीच डगमगत नाही....ह्याची प्रचिती येते....
अशा कितीतरी बारीकसारीक गोष्टींंतून बाबा आम्हाला दरवेळी नव्याने उलगडत गेले...
     गेल्या पाच वर्षात आईची बावन्न वर्षाची साथ सुटलीए...तिची त्यांच्या आयुष्यातील साथ संपलीए.‌‌...पण आपल्या अनुपस्थितीत बाबा सक्षमपणे उभे राहू शकतात आता, ही जाणीव झाल्यानंतरच आई निर्धास्तपणे गेली आहे....आईची उणीव भरुन निघणं केवळ अशक्यच....पण बाबा आम्हा साऱ्या बालगोपाळांमध्ये रमले आहेत...आपल्यातील ज्ञानकणांची झिरपण आमच्यावर करत करत....
    आज,या फदर्स डे च्या निमित्ताने या त्यांच्या मुलीकडून भरभरुन शुभेच्छा आणि त्यांच्या उदंड आयुष्यासाठी ईश्वराजवळ प्रार्थना...🙏🏻

  *नंदिनी म.देशपांडे*
*उमरीकर*

🌹🌹🌹🌹🌹

रविवार, २१ जून, २०२०

साहस

*साहस*

    आज तब्बल तीन महिन्यानंतर सुहासराव घराबाहेर पडले!बाप रे तीन महिने!एवढे दिवस आपण किती सेफ झोन मध्ये होतो!!
     त्या मेल्या मेडियानं दररोज कोरोना बाधितांचा गलेलठ्ठ आकडा दाखवत छातीत नुसती धडकी भरवून ठेवली होती...
घराबाहेर पाऊल ठेवायलाच उशीर,की आपण या कोरोना विळख्यात पडलोच...म्हणून समजा.... ही मनात पक्की घर करुन बसलेली भिती, सारखी त्या देवाचं नाव घेण्यासाठी भाग पाडायची....
एरवी त्या बिचाऱ्याची आठवण कधीतरी सणावाराला दोन हात जोडण्यापुरती होत असे..‌‌.. पण गेल्या तीन महिन्यांत हे आठवणींचं(देवाच्या)
सत्र वारंवार येऊ लागल्याची जाणीव होत आहे...

      समोर येईल ते,असेल त्या चवीचं गपगुमान पोटात ढकलावं लागतंयं आणखीनही....नावं ठेवण्याची किंवा आवडी निवडी सांगण्याची हिम्मत कोण करणार बाबा?
वेळेवर पोटापुरते दोन तीन वेळेला खायला मिळतंयं हेच नशीब समजायचं....बाहेरुन मागवून खाणं किंवा हॉटेलमध्ये जाऊन चोपणं सगळंच थांबलंयं आता.... आपल्या उभ्या आयुष्यात आपल्याला कधी साधा चहा करुन घेणं माहित नाही...किती काळ हे चालेल ते काळच सांगेल....

     मागच्या आठवड्यात लॉकडाऊन चे नियम थोडे शिथील झाले आहेत म्हणा,पण लगेच बाहेर पडण्याची हिम्मत नाही झाली बाबा....

 सुहासराव मनाशीच बोलत होते....
     चार दिवसांपासून किमान गेटपर्यंत येत रस्त्यावरच्या रहदारीचा अंदाज घेत होतो....त्यावरुन किती गर्दी आहे?एवढ्या गर्दीत जावं का आपण?
तशी कोरोना युध्दाला तोंड देण्यासाठी सारी आयुधं जवळ ठेवली आहेतच आपण....तीन महिन्यांपासून....अगदी, वाजवी पेक्षा जास्त किंमत मोजून....न जाणो गरज पडलीच आपल्याला तर....तर असू द्यावीत हाताशी....वेळवर शॉर्टेज झाले तर....या भितीनं....

    नाहीतर मी कसचा देतोय एरवी जास्तीचे पैसे....उलट कमीत कमी पैशात कुठे मिळेल त्या ठिकाणी गेलोच असतो...जाऊ दे, कधी कधी होते असे....जास्तीचे पैसे गेले आपल्या अक्कल खाती....

     आपण आता तरुण नाही आहोत....जेष्ठांच्या यादीतही नाही आहोत मग असं किती दिवस तोंड लपवून बसायचं घरी?
     सौ.पण जातीए कधी कधी बाहेर....अगदी डोळ्यांची आडवी रेषा तेवढी बांधायची ठेवून....काय मिजास आहे?त्या कोरोना राक्षसाची आपल्या पर्यंत पोहोंचण्याची?असे म्हणत झाशीच्या राणीच्या आविर्भावात पडते ती बाहेर....आवश्यक कामं करुन, "मोठ्ठा पराक्रम गाजवून आलेय मी" या आवेशात परतते घरी...आपण मात्र आचंबित होऊन बघत रहाण्याशिवाय काहीच करत नाहीत...

      किती दिवस हे असं भयग्रस्त जीवन जगत कोंडून ठेवायचं स्वतःला घरात?आपलंच मन आपल्या भ्याडपणाची साक्ष देतंयं हल्ली....सांगू कोणाला?

     झालं, एवढं जपूनही दोन दिवसांपूर्वी कॉलनीतल्या आसपासच्या दोन तीन ओळीत कोरोनानं चढाई केली आहे, या बातम्या येऊन धडकल्या....झालं थोडावेळ चलबिचल....हा छुपा रुस्तुम आपल्या गेटमध्ये तर दबा धरुन बसला नाहीए ना?आपलीच टेहळणी करतोय की काय?असेेही वाटले...पण लगेच झटकून टाकली मी ही भिती मनातून....

 ‌.    कसेही तर आपल्या कॉलनीत शिरकाव केलाय या मेल्यानं मग आता करावाच हिय्या,बाहेर फेरफटका मारण्याचा....घरात बसूनही तो आपल्यात घुसणार नाही याची काय गॅरंटी?मग थोडी बाहेर जाऊन परिस्थिती आजमावण्यातील मजा तरी घेऊ या....
     मास्क बांधलेले चेहरे निरखू या....ते ओळखता येतील का आपल्याला ते बघू या....कांही चेहऱ्यांशी संवाद साधूया अर्थात अंतर ठेऊनच....
     आपल्या सुरक्षेच्या दृष्टिने पवित्रा घेत घेत एक एक पाऊल पुढे टाकू या....लहान बाळ जसं नव्यानं चालायला शिकतं आणि अंदाज घेत पावलं टाकत,टाकत अगदी तस्सच!
      पण थोडं धिट बनू या....या कोरोना पासून लांब रहाण्याचा निश्चय करत....तो समीप आला तरी त्याच्याशी दोन हात करण्याची तयारी ठेवत.... आजुबाजुला असेल तो, तरीही त्याला खड्यासारखे बाजूला ठेवत....न घाबरता संपूर्ण काळजी घेत....

   सुहासरावांनी रस्त्यावरुन रपेट मारताना मनाचा ठिय्या केला, आणि त्यांच्या मनावरचं खूप मोठं ओझं झटकून टाकलं....भयाचं.... आणि मोकळा श्वास (तोंडाला मास्क बांधूनच) घेतला....तेवढ्यात गार हवेची झुळूक कुठेतरी पडणाऱ्या पावसाचा मृदगंध सोबत घेऊन आली.... आणि मन प्रसन्न करुन गेली....

   *नंदिनी म.देशपांडे*

जून,१९,२०२०
     
    🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, १३ जून, २०२०

स्वागत पावसाचे.

*स्वागत पाऊसाचे*

सृष्टिला या अभिषेक घडवण्या
वसुंधरेला हिरवाईत
नटविण्या
साज अवनीचा नवनीत
बनवण्या


बरसत आल्या पाऊसधारा
स्वागत त्यांचे चला कराया

फुलांनी बघा सडा शिंपला
पानांनी तव घातला वारा

पक्ष्यांचा हा किलबिलाट
अहा!हा
वाजवी मंजूळ शहेनाई

डोलती सन्मुख फळे रसरशीत 
खग पाहुणचारा असती उत्सुक

प्रसन्न वदनी सुवासिनी
बघा गाती अक्षयगाणी

 हासला मनातून बळीराजाही
लगबग त्याची सुरु जाहली
धान पेरण्या शेतांमधूनी

 घालत मुजरा वरुण
राजाला
आपली कृतज्ञता पोहोंचवित पावसाला

आकाशी तव मेघ दाटले
हरखूनी गेले मनोमनी

पाहूनी आपला स्वागत समारंभ मेघ असे म्हणती
आहे सदा मी भाग्याचा
धनी....

असेच भाग्य सदा लाभू दे
आनंदाचे असेच ‌क्षणक्षण
नित्य सदा बहरु दे

सृष्टिला या रोज नवा
मज अभिषेक घडवू दे
मज अभिषेक घडवू दे.

©  *नंदिनी*

जूलै,७,२०१९.
सायं.६ वा.
औरंगाबाद.