गुरुवार, १८ एप्रिल, २०१९

मनोबोध श्लोक ४३.

*मनाचे श्लोक,माय बोलीतील एक अलौकीक महाकाव्य *

* पुष्पमाला सदर *

श्लोक ४३.

  मना सज्जना येक जीवीं धरावे।
जनी आपले हीत तूवां करावें।
रघूनायकावीण बोलो नको हो।
सदा मानसीं तो निजध्यास राहो।

        उपरोक्त श्लोकातून समर्थ सांगतात हे मना, तू आपल्या मनाशी एक खूणगाठ पक्की बांधून ठेव. आपल्या जीवनाचे कल्याण आपणच साधावयाचे आहे. हे तू मनाशी पक्के ठरवून आपले कल्याण करून घेण्यासाठी भगवंताचा कायम ध्यास ठेव. त्याच्याशी अनुसंधान ठेव. तरच तुझे कल्याण होऊ शकेल.

   आपले हित कशात आहे? याचा अभ्यास आपणच करावयास शिकले पाहिजे. आणि त्यादृष्टीने कोणता मार्ग आपण अवलंबिला पाहिजे हे निश्चित केले पाहिजे. दुसऱ्याने सांगितले म्हणून आपण ते स्वीकारले. असे असता कामा नये. असे केल्यास ती दुसऱ्यांची गुलामगिरीच ठरेल. दुसऱ्याच्या सल्ल्याने, मार्गाने वागण्याने आपले हित होईलच असे अजिबात नाही. आपण आपला मार्ग शोधताना फार तर संतांनी सांगितलेल्या सन्मार्गाची कास धरावी आपल्या अंतर्मनाची हाक ऐकूनच आपण आपला उद्धार करून घ्यावयास हवा. यासाठी आपण निश्चित केलेल्या मार्गावर ठाम  रहावे. आपल्या मनाशी प्रामाणिक राहावे. हा झाला या श्लोकाचा सरळसरळ अर्थ.

    याच श्लोकाच्या गुह्यार्थाचे विवेचन करताना समर्थ म्हणतात, आपली वाणी बोलणे हे आपल्या विचारांचे वाहक असते. आपण ज्या भावनेने, जशा प्रकारचा विचार करतो त्याप्रमाणेच आपल्या वाणीतून शब्द बाहेर पडत असतात. म्हणूनच आपले व्यक्तिमत्व हे आपल्या वाणीचा आरसा ठरू शकते. त्यासाठीच आपली वाणी नेहमीच शुद्ध असावयास हवी. विचार- वाणी- व्यक्तित्व ही साखळी परस्परपूरक आणि घट्ट असावयास हवी.

   थोडक्यात वाणीत गोडवा येण्यासाठी व्यवहार साधताना संभाषणात गोडवा असणे आवश्यक असते. परमेश्वराच्या नामःस्मरणातून हे सर्व साधण्याचे कसब आपण साध्य करून घेऊ शकतो. व्यावहारिक आयुष्य जगत असताना मितभाषी असणे गरजेचे असते. एकदा व्यवहार संपला की अमिताक्षरी पारमार्थिक शब्द यावयास हवेत.

    मनाच्या अंतर्मनात भगवंतांशी अनुसंधान कायम ठेवण्यासाठी साधकाने भक्तिमार्गाचा अवलंब केलाच पाहिजे. मनी मानसी सतत त्याचाच ध्यास असावा. हे साधणे  अत्यंत कठीण काम आहे. अशा रीतीने आसनी,शयनी भगवंत  पाहणे म्हणजेच निजध्यास होय. साधकाला तो साधता यावयास हवा. असे करता करता एक दिवस साधाकच  भगवंत रूप होतो. यापेक्षा मोठा आनंद तो कोणता ! म्हणूनच नीज ध्यासाची अनुभूती घेतलीच पाहिजे असा आग्रह समर्थ या श्लोकातून करतात.

  © *नंदिनी म. देशपांडे. *

🎇🎆🎇🎆🎇🎆

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा