शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२

सरत्या वर्षाचा (2022)परामर्श...

मनातलं....                       वर्ष संपत चालल्याची चाहूल लागली की, नकळतपणे माझं मन दरवर्षीच  सरत्या वर्षातील घटनांचा मागोवा घेऊ लागतं...                           या सरत्या वर्षाचा,म्हणजे सन 2022 मध्ये घडलेल्या  घटनांचा वयक्तिक पातळीवर परामर्ष घ्यावयाचा ठरवलं तर....
    खरं म्हणजे हे अख्खं वर्ष काळजीचं आणि मनाला क्लेशदायक ठरलं असंच मी म्हणेन...
     वर्षाच्या सुरुवातीलाच, जानेवारी 2022 मध्ये माझ्या वडिलांच्या  वागण्या बोलण्यातील विसंगती लक्षात येऊ लागली....सुरुवातीला विनोदाने त्याकडे बघितले आम्ही...पण लवकरच ते "डेमेन्शिया"(अल्झायमर ) या मानसिक विकाराचे शिकार होत आहेत यावर डॉक्टरांकडून शिक्कामोर्तब झाले...
    आणि माझे तर धाबेच दणाणले....त्यांना असं काहीतरी झालंयं हे ऐकून खरं म्हणजे मलाच प्रचंड धक्का बसला सुरुवातीला.....
   एवढा हुशार, मुत्सद्दी, कायदेतज्ज्ञ आणि बोलक्या असणाऱ्या माणसाला असे होऊच कसे शकते?
    वाचनाची सवय, गप्पांची महेफिल गाजवणारे, गाण्यांची आवड असणारे आणि बातम्या बघत जगभरातील  परिस्थितीचे अपडेट्स घेणारे माझे वडील अशी अल्झायमरची शिकार कसे काय होऊ शकतात?याचा विचार करुन आता कोणताही उपयोग नव्हताच....
      पण आता खंबीरपणे त्यांचा हा अल्झायमर त्यांच्यासाठी जास्तीतजास्त सुखकारक कसा होईल याच साठी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आणि आपण जास्तीतजास्त वेळ त्यांच्यासाठी देणं महत्वाचं आहे हे मनाने जाणलं होतं.... आणि तसंच करण्याचं मीही ठरवलं...
     वडिलांचा अल्झायमर वाढणयाचा वेग विलक्षण होता...चार आठ दिवसाला त्यांच्या वागण्या बोलण्यात फरक पडतोय लक्षात येत होतं...पण शारीरिक दृष्टिने ते पूर्ण तंदुरुस्त आहेत याचा आनंदही वाटत होता...
    त्यांना एक सोबत केअरटेकर ठेवल्याने आम्ही थोडेसे निर्धास्त झालो होतो...
       थोडे फिरुन येणे आणि मी जवळच रहात असल्यामूळे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत माझ्या घराच्या कितीतरी वार्‍या होत होत्या त्यांच्या मार्फत...तेवढाच काय तो विरंगुळा होता त्यांना....आम्हीही दोघं त्यांना मुद्दाम वेळ देतच होतो...
अजून पर्यंत दुसऱ्या कुणाला त्रासदायक होईल असं काही वागणं नव्हतं बदललेलं....डॉक्टरांनीही अशा पेशंट मध्ये काय काय बदल होत असतात याची पूर्ण माहित दिली होती आम्हाला....
       उलट याही अवस्थेत वडीलांची विनोदबुध्दी पूर्णपण शाबूत होती आणि वानोद करत आम्हा सर्वांना ते हसवत रहायचे...असेच जरी राहिले,ते तरी खूप आहे,असे मनोमन वाटत रहायचे...
     आता हळू हळू जेवणाच्या पदार्थांची नावं एव्हाना पूर्णपणे विस्मरणात गेली होती वडिलांच्या.... पण नवरात्रातील देवीच्या सर्व आरत्या अगदी मु:खपाठ होत्या त्यांच्या....मराठी इंग्रजी वाचन विसरले नाहीत, पण गणित आणि अगदी पैशांचंही संख्याशास्त्र पार पुसून गेलेलं मेंदूतून...           अगदी शाळेत असताना शिकलेले तबल्याचे ताल वाजवूनही दाखवायचे आजही आम्हाला ते आणि त्यांचं आवडीचं गाणं "उघड नयन देवा "नेहमी प्रमाणेच सुरात म्हणायचे...सुरुवातीचा शब्द चालू करुन द्यावा लागत असे मात्र....
      असं सगळं हसत खेळत वडिलांचा अल्झायमर त्यांच्यासह आम्हीही झेलत होतो...तसा त्यांचा त्रास असा काहीच नव्हता,किंवा त्यांचं काही करावं लागतंय असंही नव्हतंच...
      बाबा घरात असले की, घर कसं भरल्या सारखं वाटायचं...त्यांचं बोलणं सतत कानावर पडायचं आणि त्यातून आम्हाला आणि त्यांनाही समाधान मिळायचं....
     पण ऑक्टोबर सुरु झाला आणि बाबा आम्हाला चेहर्‍यावरुन ओळखेनासे झाले आहेत लक्षात आलं...स्पर्श आणि आवाज मात्र कळायचा त्यांनाआपल्यामाणसांचा....."आपले जन्मदाते वडिल आपल्या मुलांना ओळखत नाहीत" ही जाणीव अतिशय हळवी बनवून जाते आपल्या मनाला आणि तेवढीच क्लेशकारकही.....
     अशातच दसरा हसतखेळत पार पडला...त्यांच्या आवडीच्या श्रीखंडाचा मनसोक्त अस्वाद घेत त्यांनीही तो साजरा केला....खूप बरे वाटले हेबघून...कारण खाण्याबद्दल अजिबात आसक्तीच राहिली नव्हती त्यांना आतापावेतो....मुळचे खवय्ये होते माझे वडील तरीही....
       कोजागिरी पौर्णिमा मात्र त्यांचा आणखीन एक "मायस्थेनायाचा" विकार सोबत घेऊनच उगवली....
     कधीही नावही न ऐकलेल्या या विकाराची, मात्र यामूळे इत्यंभूत माहिती समजली आम्हाला...
      हॉस्पिटल ला प्रचंड घाबरणारे माझे वडील या निमित्ताने अख्खा एक महिना हॉस्पिटल मध्ये ॲडमीट होते....आपण नक्की चांगले होऊन घरी परतणार या आशेने....अगदी सकारात्मक मनोवृत्तीने ....
   या मायस्थेनियावर मात करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये नाना प्रकारची औषधं, इंजेक्शन्सचा एवढा मारा केला गेला त्यांच्यावर, की आम्हालाही ते बरे होत आहेत असेच वाटू लागले...कदाचित त्यांचा अल्झामरही या काळात लयाला जाईल अशी आशाही वाटू लागली...पण कसचे काय..अशातच दिवाळी आली, बाबा आपल्यात आहेत हा आनंद होताच, पण काळजीची टांगती तलवार लटकत होतीच मनामध्ये...
   बाबांचा, वाढदिवस भाऊबिजेचा...तारीखही 19 ऑक्टोबर ती योगायोगाने याच दिवशी आलेली...पण मनात शंकेची पाल चुकचुकत होती...मी त्या ईश्वराला मनापासून विनंती करत होते की, त्यांचा अवतरण्याचा दिवस आणि  निरोपाचा दिवस एकच यावा असा योग मात्र साधू नकोस बाबा....कारण शुध्दीवर होते तरीही त्यांची लक्षणं काही वेगळीच दिसत होती...
     औषधांच्या मार्याने दिवसेंदिवस खालावत चाललेली तब्येत नकारात्मक संकेत देऊ लागली...
      अख्खा महानाभर त्या नियतीबरोबर चालू असणारी त्यांची कडवी झुंज अखेर वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी संपली...पण आयुष्यात कायम यशस्वी झालेले बाबा या काळाबरोबर चाललेल्या निकराच्या लढाईत मात्र अयशस्वी ठरले...दुर्दैवाने काळाने बाजी मारली आणि अतिशय चांगल्या मुहुर्तावर त्या वैकुंठात जाऊन पोहोंचले....
       या सरत्या वर्षातील  अगदी पावणेदोन महिन्यांपूर्वीच घडलेली ताजीच पण मनावर आघात करुन गेलेली ही घटना...मनात फार मोठी पोकळी निर्माण करुन गेली....
     वडिलांचा अल्झायमर, मायस्थेनियाच्या रुपाने, त्यांनी गाण्यात म्हटलंयं तसं अक्षरशः आपल्या स्वतःच्या श्वासांचा महिनाभर अखंड धूप जाळला बाबांनी, पण तरीही त्यांना सोबत घेऊन गेला...आम्हा भावंडाना पोरकं करत...म्हणूनच हे 2022 वर्ष मी सुरुवातीलाच म्हणाले तसं काळजीचंच आणि मनाला हुरहूर लावून गेलं....असो...
    
      आता येणारे नवीन वर्ष,2023 आनंद, उत्साह आणि सकारात्मक उर्जेचा स्त्रोत अखंड वाहता ठेवेल या आशेने त्याचे स्वागत करण्यास आम्ही सज्ज आहोतच....
 2022 या वर्षाला बाय बाय करत करत....

©️ नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹🌹

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२

लक्ष्मीचा प्रवास...

मानवी आयुष्यात कन्यादाना एवढं पुण्य कशात नाही असे म्हणतात...याचाच अर्थ पोटी कन्येनं जन्म घेणं किती पुण्याई आहे बघा...
      कन्या, मुलगी घरात अवतरते ती 'लक्ष्मीचे' रुप असते असे म्हणतात...लक्ष्मीच्या पावलाच्या आगमनाने या घराण्याची भरभराटच होत जाते...हळू हळू ती सरस्वतीचा आशिर्वाद मिळवते आणि जिद्दीने आपल्या पायावर ऊभे रहाण्याचा अट्टहास ठेवते....
     हे साधत असताना ती घरातील सर्व सदस्यांच्या गळ्यातील ताईत बनते...भावंडात सर्वांत मोठी असेल ,तर वडिलांचा उजवा हात बनते...आईला घरकामात मदत करते...गृहिणीपदाची  वाट अजमावून बघण्याची आस मनी ठेवते...
      मोठी ताई असेल तर भावंडांची आईसारखी काळजी घेण्याचा प्रयत्न करते आणि लहान असेल तरीही भावंडांवर प्रेमाची पखरण करते...आजी-आजोबा यांची सेवा करण्यात कृतार्थता मानते...
      एकूणच मुलगी घरात आनंदी आनंद पेरत पेरत येते...

       हिच मुलगी लग्नाळू वयाची झाली की, भावंड तिला चिडवतात, 

ताई मला सांग, मला सांग, कोण येणार गं पाहूणे?

     ही ताई मग लटक्या रागाने 'मी लग्नच करणार नाही मुळी'असं म्हणते...पण मनात मात्र रुबाबदार राजकुमाराची वाट बघत असते...स्रीसुलभ भावना मनात नाचत रहातात ती स्वप्न बघण्यात रममाण होते...
      मनासारखा राजकुमार तिला मिळाला म्हणजे, मग ती, 

लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची....

असं गुणगुणंत रहाते...
       हात पिवळे होण्याची घटिका समिप येऊ घालते...मग हातभरून हिरवा चुडा आणि नाजूक मेंदीने रंगलेले आपल्या लेकीचे हात कौतुकाने बघून घरातील मोठी मंडळी,आणि तिच्या सख्या तिला म्हणत असतात, 

 पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा, वधु लाजरी झालीस तू गं सांगे तो चौघडा...

    अशाप्रकारे सनई चौघड्याच्या साक्षीने आपल्या घरची लाडली दोनाचे चार हात होत, नियंत्याने बांधलेल्या ब्रह्मगाठीत बांधली जाते...नवर्या मुलाला गळ्यात हार घालताना लाजेनं चूर होत नजरेनंच त्याच्याशी बोलते...
      
हळव्या तुझीया करात देता करांगुली मी 
स्पर्शावाची गोड शिरशिरी उठते ऊरी 
सप्तपदी मी रोज चालते तुझ्या सवे शतजन्मीचे हे माझे नाते...
      
ही नववधू असे मनातल्या मनात गुणगुणत असेल का?असा भास होतो...
 
      विवाह वेदीवर चढलेले नवरानवरी विवाह विधी पूर्ण करत या समारंभाच्या शेवटाकडे येऊ लागतात...आईचा ऊर आपल्या लाडकीची लवकरच पाठवणी करावी लागणार म्हणून राहून राहून दाटून येऊ लागतो...आपले भरले डोळे ती जाणीवपूर्वक लपवत असते...आणिक वरमाय असणाऱ्या आपल्या विहिणबाईंना विनवते...

ओटीत घातली मुलगी विहिणबाई 
सांभाळ करावा हिच विनवणी पायी...

मुलीचे आणि तिच्या स्वकीयांचे या हळव्या शब्दांनी डोळे पाणावतात...आपल्या लाडक्या सानुलीच्या विरहाने वधूपित्याचे मन मूक रुदन करु लागते...

     आता निरोपाचा क्षण आलेला असतो...वधूला आपले माहेर आणि तेथील माणसं आपल्याला दुरावणार या भावनेने सारखं वाईट वाटणं सहाजिकच असते...
    मनातून ती म्हणत असते, 

निघाले आज तिकडच्या घरी 
एकदाच मज कुशीत घेऊनी पुसुनि लोचने आई 
तुझी लाडकी लेक आपुले घरकुल सोडून जाई 
तव मायेचा स्पर्श मागते 
अनंत जन्मांतरी 
निघाले आज तिकडच्या घरी...

आईवडील आणि वधू या हळव्या क्षणांना सामोरं जात जात 
आई बाबा मुकपणे म्हणत असतात, 

जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा 
गंगा यमुना डोळ्यात ऊभ्या का...

     भरल्या डोळ्याने आपल्या लाडक्या लेकीची पाठवणी करताना आईबाबा कृतकृत्य नजरेनं लेक जावयाला शुभाआशिर्वाद देतात...

     वाजत गाजत नववधु उंबरठ्यावरचं माप ओलांडत सासरच्या घरी प्रवेश करते...सासरच्या घरी लक्ष्मीचे आगमन अगदी वाजत गाजत आनंदाने होते....
 सासुबाई म्हणतात ,

लिंबलोण उतरता 
अशी का झालीस गं बावरी 
मुली तू आलीस आपल्या घरी 
मुली तू आलीस आपल्या घरी...

    असा हा माहेर घरच्या लक्ष्मीचा सासर घरची लक्ष्मी या नात्याने होणारा प्रवास हुरहूर लावणारा पण मोठा गोड आणि हवाहवासा असतो...

      ती कुठेही असेल तरीही लक्ष्मीच असते...
पण आयुष्याच्या अनेक वळणांवर ती सरस्वती, दुर्गा, चंडिका, रेणूकाई, अंबाबाई,अशी शक्ती देवतेची नवचंडी रुपं धारण करत करत नवचंडीच्या अनेक रुपांतून आपल्या आयुष्याचा प्रवास करते...
न थकता, कोणत्याही तक्रारीशिवाय आणि अडचणींवर मात करत करत जिद्दीने यशस्वी होत जाते....

   आज जागतिक कन्यका दिनाच्यानिमित्ताने आणि उद्या येणाऱ्या नवरात्रीच्या शुभारंभाच्या निमित्ताने एका स्त्रीच्या प्रवासाचा असा आढावा घ्यावासा वाटला...म्हणून हा लेखन प्रपंच...
वाचकांनाही आवडेल अशी आशा करते...

©️नंदिनी म. देशपांडे. 
दि.२५,सप्टेंबर २०२२.

🌹🌹🌹🌹🌹

मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२

गौराई....

भादव्यात अवतरली गौराई 
आगमनाचा तिच्या थाट होई भारी 
परजन्याने बरसवले पाणी 
वसुंधरेनं ल्याली बनारसी हिरवी 
फुलांनी घातल्या पायघड्या रंगीबेरंगी 
आकाशी जमल्या सप्तरंगी राशी 
इंद्रधनू तोरण लावे निलांबरी 
गणेशाला सवे घेऊनी 
झोकात आली गौराई 
समृध्दीचे सिंचन झाले भुवरी 
संपन्नतेची शहेनाई वाजे अवनीवरी 
गौराई चे कौतूक करावे किती किती!!

©️नंदिनी म.देशपांडे. 
२०,सप्टें.२०२२.
🌹🌹🌹🌹🌹🌹

गौराई चे स्वागत...

भादव्यात अवतरली गौराई 
आगमनाचा तिच्या थाट होई भारी 
परजन्याने बरसवले पाणी 
वसुंधरेनं ल्याली बनारसी हिरवी 
फुलांनी घातल्या पायघड्या रंगीबेरंगी 
आकाशी जमल्या सप्तरंगी राशी 
इंद्रधनू तोरण लावे निलांबरी 
गणेशाला सवे घेऊनी 
झोकात आली गौराई 
समृध्दीचे सिंचन झाले भुवरी 
संपन्नतेची शहेनाई वाजे अवनीवरी 
गौराई चे कौतूक करावे किती किती!!

©️नंदिनी म.देशपांडे. 
२०,सप्टें.२०२२.
🌹🌹🌹🌹🌹🌹

गौराईचे स्वागत..

*सोनपावली गौराई आली* 

गौराईच्या स्वागता
  सांजवेळ दारी आली 
धूपदिप तुळशीपाशी 
मंगल आरती तेवते होई 
प्रासन्या सवे देवा जवळी 
लक्ष्मीच्या सोनपावली 
गौराई आगमनीत झाली
लक्ष लक्ष दिपांच्या ओळी 
मनामनांत दिपू लागली 
मंगलसनई वाजू लागली 
जेष्ठा कनिष्ठा सुहास्य वदनी
स्वागता नित् ऊभ्या घरी
  बघा सांज आली आली 
आनंदे सारी  नाचू गाऊ लागली...

©️नंदिनी म.देशपांडे. 
१९,सप्टें.२०२२.
🌹🌹🌹🌹🌹

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

हिंदी भाषा दिन.

*हिंदी एक राष्ट्रभाषा*

      खरं म्हणजे,माझा हिंदी भाषेचा संबंध आला तो मी पाचव्या वर्गात आल्यानंतरच....व्दितीय भाषा म्हणून हिंदी अनिवार्य...
     पण कुटुंबात आणि अजुबाजूला सर्व मराठीभाषिक! घरी घरकामासाठीची बाई हिंदीभाषिक होती तरीही ती चांगलं मराठी बोलायची...एक मुस्लीम मैत्रीणही होती पण तीही मराठीतच बोलायची! परिणाम असा झाला की, हिंदी भाषेची आवड निर्माण होऊन गोडीच लागली नाही तिची...
       पण, "हिंदी" ही आपली "राष्ट्रीय भाषा"आहे
याचे ज्ञान झाले आणि तिच्याबद्दल आदर वाटू लागला...अभिमान वाटू लागला आणि नकळत प्रेमही वाटू लागलं...मग हिंदीभाषिक लोकांशी तोडकं मोडकं संभाषण सुरु झालं...समोरच्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर जाणवणारी माझ्या बोलण्यातली कमालीची विसंगती बघून तोच आपसूक मराठीत बोलावयास सुरुवात करतोय हे लक्षात येऊ लागलं....मग मीही बापडी फारशी तसदी घेत नसे बोलण्याची...
     मला परीक्षेच्या वेळीही हिंदीचंच टेन्शन यायचं, पण लिहिताना मात्र म्हणावी तशी भिती नाही वाटली.... बोलताना अजूनही जीव्हेची कसरतच होत असते असो...विनोदाचा भाग वेगळा...
    आज "हिंदीभाषा" दिवस..."मराठीभाषा" दिवस साजरा करताना ज्या उत्साहाने लिहिती झाले त्याच उत्साहात आजही लिहिण्याचा प्रयत्न केला....
      हिंदी साहित्य फारसे वाचनात नाही पण तरीही हिंदुस्थानची हिंदी भाषा, आपली राष्ट्रीय भाषा म्हणून निश्चितच तिचा आदर, अभिमान आहेच...तो भारताच्या प्रत्येक नागरिकाने करावयास हवाच...
      उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पुर्वेपासून पश्चिमेपर्यंतच्या संपूण भारतभर हिंदीविषयी तेवढाच अभिमान असणे अपेक्षित आहे...
      भारतात बोली भाषेंची तर गणतीच नसावी एवढ्या आहेत....दर बारामैलांवर भाषा बदलते असे पूर्वि लोक म्हणायचे...
    संस्कृत ही साऱ्या भाषांची जननी आहे ती पण तेवढीच शिरोधार्ह... पण अखंड हिंदुस्थान ची ती हिंदी म्हणून विशेष अभिमान....
       पण पर्यटनासाठी म्हणून जेंव्हा दक्षिणेतील राज्यांमध्ये आम्ही गेलो, त्या वेळी त्यांचा हिंदीला असणारा विरोध आणि दःस्वास मनाला फार यातना देऊन जातो...
     त्यांच्या बोलण्यातून इंग्रजीचा उध्दार ऐकून राग येत नाही,  पण मनात मात्र त्यांच्या विषयी आपुलकी  वाटत नाही....
       हिंदी भाषेची अशी अवहेलना किमान भारत भुमीवर तरी होऊ नये एवढीच या दिनाच्या औचित्याने माझे एक मत...

©️ नंदिनी म.देशपांडे. 
दि. १४ सप्टेंबर, २०२२.

🌹🌹🌹🌹🌹

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

.गौताळा सहल.

जणू काही ती वनराणी आम्हाला साद घालत होती, "अरे अरे माझ्या मित्र मैत्रीणींनो, बघा, बघा जरा वेळ काढून, माझ्या या वैभवाला! पायधूळ तुमची झाडा एखादा दिवस माझ्या या हिरव्यागार मऊशार लादीवर आणि होऊ द्यात माणसांचा चिवचिवाट या माझ्या राज्यात!"
     मस्त श्रावणधारा बरसत आहेत...ऊनपावसाचा लपंडाव चालू आहे...आकाशात आकर्षक रंगांची मुक्तहस्ते उधळण चालू आहे...वनराई अगदी चकचकीत पोशाखात चमकत आहे...हिरव्या,पोपटी रंगांच्या गालिच्यावर रंगीबेरंगी रानफुलं मनसोक्त पणे बागडत आहेत...छोटी छोटी फुलपाखरं त्यांवर रुंजी घालत, शिवनापणीचा खेळ खेळत आहेत...
      हवेतला आल्हाददायकपणा, हवाहवासा गारवा, ऊंच मान करुन ऊभी असणारी सातपुड्याची पर्वतराजी, सभोवतीची वातावरणातील लोभस शांतता....शुभ्र पांढर्‍या ईवल्या ईवल्या चांदण्यांनी लखडून गेलेली अगणीत सागाची झाडं... झाडं नव्हे जंगलच....या झाडांच्या जाडजाड पानांची वार्‍या मूळे होणारी सळसळ... वार्‍या च्या तालावर ठेका धरलेली...या अवनीवर अधून मधून डोकावणारे सचैल पावसात न्हाऊन स्वच्छ झालेले काळेशार पाषाण....मध्येच आपली मान वर करुन आमच्याकडे अवखळपणे बघणारी, खुणावणारे काही विशालकाय काळेपाषाण...नकळतपणे त्यांच्यावर बसून स्वार होत हा निसर्ग, ही हिरवाई, दूरवरून दिसणारी धुक्याची अर्धपारदर्शक चादर,सातपुडा पर्वत रांगांनी हातात हात घालून दंग होऊन धरलेला फेर... आणि त्याला बालगूनच पसरलेले खानदेशाचे पठार... त्यावर डोलणारी काळपट हिरवीगार वनराई!सगळं अवर्णनीय, अप्रतीम आणि हवहवसं....वेळेची सारी बंधनं झिडकारुन तास न तास तृप्त नजरेनं चौफेर न्याहाळत बसावं.
    असंच हे वसुंधरेचं वैभव!
     अशा या नयनरम्य परिसरात, निसर्ग आणि श्रावण यांनी मांडलेल्या प्रसन्नतेच्या सारीपाटावर एका मोठ्या ऊंच अशा डोंगरावर पहारा ठेवत दिमाखात ऐटदारपणे ऊभा असणारा "अंतूर किल्ला", ! सगळंच विलोभनीय!इतिसासाच्या दमदार खूणा अंगावर दागिन्यांसारखा बाळगत ऊभा असणारा हा किल्ला, त्या वरील बालेकिल्ला, किल्ल्याची तटबंदी दुरुनही नजरेत भरणारी अशीच....
      निसर्गाचे हे रमणीय रुपडं आणखीनच बहारदार बनवलं ते तेथील काही धबधब्यांनी आणि दूरवरुन चमकणार्या पानवठ्यांनी....
    वसुंधरेचं हे सारं लावण्य किती किती म्हणून डोळ्यांनी पिऊन घेवू, किती साठवून ठेवू डोळ्यात आणि कॅमेरात अशी झालेली मनाची अवस्था....
      अवनीचं हे अतीसुंदर रुप बघताना आपण कितीतरी पायपीट केलीए आणि आता पाय केवळ दुखरेच नव्हे तर बोलतेही झाले आहेत हे लक्षातही आले नाही...
      कालचा अख्खा दिवस 
अशा या सुखावून टाकणाऱ्या वातावरणात मनभरून घालवला, ते ठिकाण होतं, औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा अभयारण्य!....
    हा योग घडवून आणला तो समुह, साऱ्या भटक्यांचा,निसर्गावर प्रेम करणारांचा,ऐतिहासिक ठेवा निरिक्षणाचा छंद जोपासणारांचा आणि शिल्पकलेच्या अस्वादकांचा....नावच आहे याचं "भटका तांडा"...
     भल्याभल्यांनी प्रेमात पडावं याच्या, मिसळून जावं यांच्यात आणि केवळ या तांड्याचा एक घटक या ओळखीनेच भटकंती करत रहावं असेच वातावरण असणारा.... आनंदाचा, खेळीमेळीचा असा हा एक धम्माल समुह....
     प्रत्येक सहलीची यथोचीत माहिती देणारा, उत्तम व्यवस्थापन आणि संघटक असणारा श्रीकांत  आणि त्याला साथ देणारा,प्रत्येक सहल जास्तीत जास्त चांगली कशी होईल या साठी झटणारा आकाश या दोघांच्या डोक्यातून प्रत्यक्षात उतरलेली ही भटकंतीची एक पर्वणीच!
     दररोजच्या व्यापातून एक अख्खा दिवस अशी भटकंती करत मनाला आलेली मरगळ दूर करत एक सकारात्मक उर्जा, चैतन्य जमा करण्यासाठी आवर्जुन भटकंती साठी जावयास हवेच याची जाणीव करुन देणारा हा तांडा...छोट्यांचा,तरुणाईचा, मोठ्यांचा, किंबहुणा तरुण जेष्ठांचाही आणिक सुदृढ वृध्दांचाही....
सर्वसमावेशक, निकोप मनाचा वृत्तीचा आणि आनंद वाटत निघणारा असाच....
    या भटक्या तांड्याला त्यांच्या कार्य पुर्ती साठी आणि पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा ....

©️नंदिनी म.देशपांडे. 
ऑगस्ट,२२,२०२२.
औरंगाबाद. 

🌹🌹🌹🌹🌹

शुक्रवार, ८ जुलै, २०२२

पुस्तक परीक्षण...."द लॉयर्स कॅम्पेनिअन्"...

पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव:
"द लॉयर्स कॅम्पेनिअन" 
*********
       "द लॉयर्स कॅम्पनिअन्" हे जनशक्ती वाचक चळवळ यांनी संपादित केलेलं पुस्तक माझ्या हाती आलं आणि कधी एकदा वाचून काढेन असं झालं...खरं म्हणजे पुस्तक तसं छोटंसंच आहे...सलग दोन तास बैठकीत आरामात वाचून झालं असतं...पण माझ्या इतर अनेक व्यापापायी ते वाचून पूर्ण होईस्तोवर अख्खा आठवडा गेला....असो...
     जनशक्ती वाचक चळवळ यांनी संपादित केलेल्या पुस्तकाची मांडणी आणि मुखपृष्ठ नेहमीच वाचकाला वाचनासाठी उद्युक्त करतं...माझंही "आठवणींचा मोरपिसारा" हे पुस्तक यांनीच संपादित केलं आहे...
    "द लॉयर्स कॅम्पेनिअन्",ह्या 
पुस्तकाने वाचनासाठी उत्सुकता वाढवण्याचे आणखी एक कारण म्हणजे, ते माझ्या मैत्रीणीने दीपाली कुलकर्णी हिने लिहिलेलं आहे... व्यवसायाने वकील असणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भाने, जो तिचा आयुष्यभराचा जोडीदार आहे, हा धागा कायम पकडत लिहालेलं हे पुस्तक...
 मी सुध्दा एक वकील असल्यामूळे सहाजिकच वाचनाचा मोह मला टाळता आला नाही...बघू या तरी एक वकील जेंव्हा संसार रथाचे एक चाक पेलून धरतो, तेंव्हा आपल्या सहचराच्या मनात त्याच्या विषयी काय टिपणी असू शकते?हे तरी समजेल, ही ताणलेली उत्सुकता ठेवतच मी वाचनाला सुरुवात केली....
      "द लॉयर्स कॅम्पेनिअन्" यात लेखिकेनं आपल्या आयुष्याच्या वाटेवरचा एक टप्पा म्हणजे पंचेवीस वर्षांचा संसार पूर्ण करेपर्यंत तिला,  किंबहूणा तिच्या जोडीदाराच्या व्यावसायिक आयुष्यात आलेले काही अनुभव व्यक्त केले आहेत असे आपण म्हणू शकतो...
     एखाद्या वकीलाला त्यांच्या व्यवसायात येणारे अनुभव म्हणजे निश्चितच त्याच्या अशिला संदर्भात असणार...
  निरनिराळ्या दिवाणी, फौजदारी, धार्मिक,सामाजिक स्तरावर दावा न्यायालयात लढत असताना त्यांच्या सहवासात आलेले अशिल,त्यांचे स्वभाव, त्यांची मानसिकता आणि तो विशिष्ट दावा यशस्वीपणे हाताळत असताना आलेले अनुभव यांची मांडणी अगदी समर्पक पध्दतीने केलेली दिसून येते...
   या छोट्याशाच पुस्तकात एकूण पंचेवीस प्रकरणं आहेत...प्रत्येक प्रकरण अगदी एक ते दोन पानांचंच असेल, पण यात संबंधीत खटल्याचे वास्तव शब्दांकन ज्याला आम्ही आमच्या वकीली भाषेत प्लेंट, किंवा फॅक्टस् म्हणतो, ते गोष्टींच्या रुपात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे...यात अगदी थोडक्यात न्यायालयाची पायरी चढण्यासाठी असणारा हेतू व उद्भवलेली कारणं यांचा समावेश आहे...तेवढ्यावरुन वाचकाला या खटल्या संदर्भात अंदाज येऊ शकतो...
       पण व्यवसाय म्हणून काम करता करता कशी वेगवेगळी प्रतिष्ठीत मंडळी सहवासात येत गेली आणि त्यांच्याशी कायमचे ऋणानुबंध निर्माण झाले हे फार सुरेख पद्धतीने मांडलंय या पुस्तकात....तसेच एक प्रतिथयश वकील म्हणून आपली जागा तयार करताना सुरुवातीला येणाऱ्या अडचणी त्यावर मार्ग काढत काढत एक यशस्वी कारकिर्द उभी करताना पर्यंतच्या प्रवासाचा घेतलेला वेध म्हणजे "द लॉयर्स कॅम्पेनिअन्",असे  मला वाटते...
    बरेचदा खटला चालू असताना अशिलाशी आपलेपणाचे नाते कसे निर्माण होत जाते...कधी कधी तनमनधनाने वकिलाला आपल्या व्यवसायात योगदान देणं किती अपरिहार्य असतं...तर कधी कधी बदमाशांशी वारंवार संबंध येऊन त्याचे मतपरिवर्तन  कसं घडवता येऊ शकतं....या विषयीचे विवेचनही या पुस्तकातून वाचावयास मिळते...
    वकीलाला आपल्या व्यवसायाकडे केवळ "व्यवसाय" म्हणून न बघता मानवतेची कास धरत समाजात एक प्रतिमा तयार करताना त्याच्या गृहलक्ष्मीचे योगदानही तेवढेच महत्वाचे आहे...ती घरची आघाडी सांभाळते आणि संसारात तडजोडी करत आपल्या सहचराच्या यशस्वीतेसाठी कष्ट घेते याचा आढावा या पुस्तकातून बर्‍याच ठिकाणी उधृक्त होते...
शेवटी संसार हा दोघांचा असतो..
तडजोड नामक चावी दोघांनीही सांभाळली आणि परस्पर विश्वासाची कास धरली की तो कसा सुखाचा होत जातो आणि या टप्प्यावर कृतकृत्यतेची भावना मनात जोपासत आपण किती समाधानाने भरुन पावलो आहोत यांचा मांडलेला आलेख म्हणजे दीपाली कुलकर्णी यांचं "द लॉयर्स कॅम्पेनिअन" हे पुस्तक होय...
    यात या दोघांच्या संसारात अनुभवलेले, व्यवसायात आलेले अनुभव आहेत पण हे आत्मचरित्र निश्चितच नव्हे....काही ठिकाणी कथेचे स्वरुप घेत लिहिलेले लेख आहेत तर काही ठिकाणी मनोगत वाटावे अशी व्यक्त झाली आहे लेखिका....
    आणि या टप्प्यावर मिळणाऱ्या समाधानाला ती दुरुन न्याहाळत आहे ही जाणीव करुन देणारं असं हे पुस्तक...एकदा तरी निश्चितच वाचावं असंच आहे...

लेखिका ---
नंदिनी म. देशपांडे. 

जूलै 8,2022.
औरंगाबाद. 

🌹🌹🌹🌹🌹

पुस्तक परीक्षण...

पुस्तकाचे नाव-- "मनभर सावल्या".
लेखिका--
सौ.श्यामा चातक देशपांडे. पुणे. 

परीक्षण---लेखिका:
नंदिनी म.देशपांडे. 
औरंगाबाद. 

   आश्चर्य वाटलं ना?सावल्या अशा मनभर मापात मोजता येतील?होय,पण असा प्रयत्न केलाय खरा, सौ.श्यामा चातक देशपांडे या लेखिकेनं...आपल्या 
"मनभर सावल्या" या पुस्तकातून...
     मनभर सावल्या छोटेसेच पुस्तक आहे ,त्यातील ललित म्हणता येतील असे लेखही अगदी छोटे छोटे; म्हणजे काही लेख तर एका एका पानाचेच आहेत पण, एकूण २७ लेखांचं हे पुस्तक वाचनीय ठरलंयं नक्कीच...
    लेखिकेनं आपल्या बालपणापासूनच्या आठवणींच्या; तिच्या मनात उमटलेल्या कितीतरी प्रसंग, भोवतालचा परिसर, निसर्ग, त्यातील विविध घटक यांच्या संदर्भातील आठवणींचा कल्लोळ 'मनभर सावल्या' या पुस्तकात मांडला आहे...
      गुरुस्थानी असणाऱ्या वडिलांना आणि आईसमान मोठ्या बहिणीला वाहिलेली अर्पण पत्रिका मनाचा ठाव घेते....
    लेखिकेचं माहेर म्हणजे कायम अध्यात्मिक वातावरणाने भारुन राहिलेलं एक समृध्द केंद्र....संत जनीजनार्दनाचे देवस्थान बीड;हे अध्यात्मिक ,धार्मिक ठिकाण.लेखिकेचे वडिल दरवर्षी भागवत पठण,इतर पोथ्या पुराणे, 
सणवार,उत्सव, मोहोत्सव यांचे परंपरापुर्वक साजरीकरण,सादरीकरण करणारे त्या केंद्राचे अधिपती...
    त्यामूळे या सर्व वातावरणाचा, तेथे साजरे होणारे सणवार, उत्सव, अन्नदान,धार्मिक ग्रंथपठण या साऱ्या गोष्टींचा तिच्या मनावर खोलवर रुजून बसलेला पगडा; तिच्या लेखांमधून ठाई ठाई जाणवतो...
    नकळतच तिच्यावर झालेले हे संस्कार तिला आयुष्यभराची साथ करत आठवणींच्या स्वरुपात कोरल्या गेल्या आहेत....  त्याचे अगदी बारीक सारीक इत्यंभूत वर्णन तिने आपल्या लेखांमधून केलेले दिसून येते...
या वर्णनात वाचकासमोर प्रसंग ऊभी करण्याची ताकद दिसते...
    याच बरोबर लेखिकेला निसर्गाच्या सान्निध्यात रमण्याची मनस्वी आवड दिसून येते....निसर्गातील प्रत्येक घटक मग ते झाड असो, शेतातील ऊभी पिके असो किंवा ऊन, पाऊस,नदी समुद्र असो...पशू पक्षी, फुलं,वेली या सर्वांचा सामावेश यात आहे...
   झाडाकडे बघून तिचे चिंतन चालू असते तर सोनसळी ऊन्हामध्ये ती सावल्यांबरोबर हरखून जाते...समुद्राचे रुप तिला ईश्वराचा भास घडवते... सागरलाटांशी हितगुज तिचे मन करते...
  निसर्गाच्या स्वभावाला अनुसरुन  ज्ञानेश्वरी मधील ओव्यांचा संदर्भ अधून मधून लेखिकेने काही ठिकाणी दिलेले दिसतात...ते अगदी समर्पक आहेत...
काही ठिकाणी काव्यपंक्तींची गुफण आहे...
 निसर्गसान्निध्यातील काही अनुभवांचे त्या त्या संदर्भाने पुनरावृत्ती झालेली वाचताना लक्षात येते...
     'सांजवेळ'आणि 'मी जाता राहिल कार्य काय'   या लेखांमध्ये लेखिकेच्या हळव्या झालेल्या मनाचा प्रत्यय येतो...वृध्द झालेले शरीर नश्वरच आहे पण अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यात आणि ज्ञानाच्या ज्योती उजळवत त्या वाटेवरुन चालणं हेच जीवन आहे...हा तिच्या वडिलांनी सांगितलेला तात्विक उपदेश,हा लेखिकेला त्यांच्याकडून मिळालेला गुरुमंत्र आहे यावर तिचा विश्वास आहे, आणि त्या क्षणापासून तिने आपल्या वडलांना गुरुस्थानी मानले आहे...आपल्या आयुष्याची वाटचाल आपणही त्याच मार्गावरुन करत आहोत असे तिला लक्षात येतंयं...
     आईची माया देणाऱ्या मोठ्या  बहिणीचा मृत्यू लेखिकेच्या मनावर फार आघात करुन गेला आहे,हे लक्षात येते. 
आपल्याला पहिल्यांदाच मिळालेली एखादी वस्तू किती प्रिय असू शकते आणि तिचे मोल केवढे अनमोल असते ते 'माझी पहिली साडी' या लेखात यथोचित वर्णन करत मांडले आहे....
लग्नानंतर सासरी असणारा 'झोपाळा' त्यावर घालवलेले निवांत क्षण, आपल्याच मनाचं केलेलं अवलोकन; तसेच सहज म्हणून परिसरात फिरणाऱ्या मांजरीवर कसा जीव जडत गेला सर्वांचा, वगैरे गोष्टी लेखिकेच्या स्मरण शक्तीची दादच म्हणावेत...
एखाद्या व्यक्तीची वाट बघत बसण्यात काय हुरहुर असते ती एका लेखातून मांडली आहे...
सुरुवात बालपणीच्या शाळेच्या आठवणींपासून बालवयात खेळलेले विविध खेळ, दिवाळी सारखे उत्सव, खेडे गावातील आठवणी यांपासून आहे,तरीही बालपण सारखं शेवट पर्यंत डोकावत रहातं...
एकूणच छोटे छोटे असे हे सारेच लेख वाचनीय असून त्या वातावरणात आपल्याला घेऊन जातात...
पुस्तकातील दृश्यांसंबंधी  काही चित्र रेखाटलेली आहेत..ती समर्पक वाटली...बाकी मी सुरुवातीलाच सांगितलं तसे मनभर सावल्या म्हणचे मनातील मनभर आठवणींचं प्रतिक आहे आणि ता आठवणी आठवतील तशा उजाळा देत त्या जागवत ठेवण्याचं काम लेखिकेच्या या पुस्तकाने निश्चित केलंयं असं आपल्याला म्हणता येईल....
🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, २३ एप्रिल, २०२२

प्रवास वर्णन...नॉर्थईस्ट थ्री सिस्टर्स सहल....

🎍आमची नॉर्थईस्ट, थ्री. 
             सिस्टर्स सहल 🎍

©️लेखिका---
नंदिनी म. देशपांडे. 

पुणे ते गोहाटी प्रयाण....
-------------------------
 पुण्याच्या विमानतळावरुन रात्री अडीच वाजता निघालेलं आमचं फ्लाईट अडीच तासात,म्हणजे सकाळी साडेपाच वाजता गोहाटीत पोहोंचले...गम्मत म्हणजे,सकाळी पावणेपाच वाजताच आकाशात तांबडं फुटलेलं होतं...
अरे बापरे!आता तर चक्क उजाडलंयं की...रात्रभर न झालेली झोप आता कशी भरुन काढणार?अशक्यच होतं...
वाहन कोणतंही असो, प्रवासात झोप न येणं किंवा आलीच ती,तर तिला पिटाळून लावणं हे मला कसं काय जमतं हे कोडं आणखी मलाच सुटलेलं नाही...
नवीन ठिकाणी जाण्याची उत्सुकता, भवताल निरखण्याची  क्षमता आणि सोबतच चालू असणारं विचारांचं चक्र या गोष्टी कारणीभूत असाव्यात यासाठी असं वाटतं...
     आता रात्रीच्या वेळेस मिट्ट काळोखात काय डोंबल दिसणार भोवतीचे?असा प्रश्न बाकीच्यांना पडणं अगदी स्वाभाविक आहेच...पण मला त्या मिट्ट काळोखात सुध्दा खूप काही दिसत होतं...सुरुवातीला उड्डाण घेईपर्यंत विमानतळावर रेखाटलेली रंगीबेरंगी दिव्यांची शिस्तीत काढलेली रांगोळी, वैमानिकाचे विमानाची दिशा बदलत नेण्याचे कसब,सवयीनं लक्षात येणाऱ्या आवाजावरुन आता विमान उड्डाण घेईल असे सांगणारे क्षण आणि एकदा उड्डाण घेतल्यानंतर शहरभर पसरलेलं लाईटच्या दिव्यांची निरनिराळी लहान होत बारीक बारीक होणारी मोहक आरास!काय सुंदर दिसतं हे दृश्य!
आपण अधांतरीच आहोत आता ही मनाला झालेली जाणीव थोडी कावरी बावरी करते आपल्याला, पण सुंदर,हसतमुख आणि गोडगोड बोलणार्‍या हवाईसुंदरींची शिस्तीत चाललेली लगबग लगेच आपले लक्ष वेधून घेतेच...
  तर,आसाम,मेघालय आणि अरुणाचल प्रदेश अशी आखणी होती आमच्या टूरची...
       
      गोहाटीतून  सुरु झालेल्या प्रवासाच्या चकचकीत रस्त्यांवर दुतर्फा उंचच उंच आणि सरळसोट वाढत चालेल्या उत्तम प्रतिच्या बांबूची झुडपं गर्दी करत बांबूचं जंगल बनवत आहेत हे लगेच लक्षात येत होतं...हिरवेगार अगदी सरळसोट बांबू आणि त्याची अणिकुचिदार पानं मनाला भुरळ घालत होती...त्यावर डोलणारी पिसासारखी तुरे म्हणजे आपल्याला घर स्वच्छतेसाठी झाडू बनून मदत करणारी केरसुणी हे लगेच लक्षात आले माझ्या...
आसामातील
    बांबू भारतात सर्वदूर पर्यंत आणि परदेशातही निर्यात होतात अशी त्यांची ख्याती आहे....
ठिकठिकाणी बांबूपासून बनवलेल्या सुंदर अशा आकर्षक वस्तू मनाला मोहित करत रहातात...बांबूपासून बनवण्यात येणाऱ्या वस्तूंमूळे आसाम राज्यातील लोकांना  मोठ्या प्रमाणावर कुटिरुद्योगाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत हे मात्र खरे...

   गोहाटी ते शिलॉंग 
-------------------------
    दुपारच्या जेवणानंतर गोहाटीत पाणी पिल्यानंतर आपण खूप मोठ्या अशा एक महत्वाच्या,म्हणजे 'ब्रह्मपुत्रा' नामक सरितेचं पाणी प्यालो आहोत,ही जाणीव  समाधान देऊन गेली...शहरातून प्रवास करत करत आम्हाला मेघालय ची राजधानी शिलॉंग गाठायचे होते...चार तासांचेच अंतर एका राज्यातून दुसर्‍या राज्यात प्रवेश करण्यासाठी!
    खेळीमेळीत प्रवास चालू असताना आल्हाददायक अशा पर्वतीय पहाडांची प्रवासात साथ चालू झाली,आणि लगेच आपण मेघालयात प्रवेश केलाय याची ग्वाही मिळाली....
वातावरणात होणारा बदल लक्षात येऊ लागला होता...

एव्हाना बांबूच्या झुडूपांची संगत कमी कमी होत होती...पहाडांवर इतरही अनेक प्रकारची हिरवीगार झाडं गुण्यागोविंदाने डोलत होती...
     शिलॉंग,मेघालयाच्या राजधानीचं शहर....
येथे प्रवेश करण्यापूर्वी रस्त्यातच आम्ही कृत्रिम पध्दतीने बनवलेल्या सर्वात मोठ्या अशा "उमिअम"लेक, मध्ये जो डोंगरांच्या कुशीमध्ये विजनिर्मिती साठी बनवला गेलाय...तर या तलावात नजिकच आलेल्या सुर्यास्ताच्या साक्षीनं  शांत वातावरणात मस्तपैकी बोटिंग करत झुळूझुळू पाण्यावर हळूवार तरंगत आनंद घेतला...सोनेरी उन्हाची पाण्यावर शिंपण करत,अस्ताला जाणारा दिनकर डोळ्यात साठवून घेतला...
रात्रीच्या जेवणानंतर  आदल्या रात्री न झालेल्या झोपेने आम्हाला तिच्या अधिन करवून घेतले...

'मेघालय' मेघांचं ढगांचं भांडार असणारा प्रदेश, भारताच्या अती पूर्वेकडील राज्यांपैकी एक....कित्तेक वर्षे या राज्यांमध्ये पर्यटनाला येण्याची हिम्मत कोणी करत नव्हते...भौगोलिक दृष्टिने लहरी, बऱ्याच लांब आणि अधुनिक सुविधांशी फारशी हातमिळवणी न केलेल्या या प्रदेशात यावयास कोणी धजावत नसावे बहूतेक....
   हिमालयिन डोंगरांच्या रांगांमध्ये वसलेला आणि काळ्याशार मेघांचे पांघरुण लपेटून राहाणारा हा प्रदेश...येथील माणसं अतिशय साधी, सोज्वळ सभ्य असावेत असेच जाणवले...
सुपारीच्या उंचच उंच झाडांनी वेढलेला हा प्रदेश भरभरुन नयनसुख देणारा असाच...पाऊसाला केंव्हाही झेलणारा आणि पाऊस पडला की थंडीशीही गट्टी करणारा असा....
प्रवास चालू असताना, मेघालयात, लग्न जुळवण्यासाठी मुलाकडची मंडळी मुलीसाठी सांगून येते, किंबहूणा मुला कडचे मुलीकडच्यांना हुंडा देतात आणि मुलगा मुलीच्या घरी जाऊन घरजावई बनून रहातो...छोटा मोठा व्यवसाय करतो असे समजले...मुलगी मात्र या घरची कर्ती स्त्री  असते...हे ऐकून आश्चर्य वाटलं!

    मनसोक्तपणे आपल्याच नादात वाकडी तिकडी वाढलेली हिरवीगार झाडं वेली, मोठमोठी  वृक्ष आपल्या अंगाखांद्यावर खेळवणारी भुमी, मेघालया च्या रुपानं पृथ्वीतलावर अवतरली आहे असे म्हणता येईल...

    मेघालयाच्या मातीची पायधूळ आपण अनुभवली की, निसर्गाच्या तांत्रिक रुपाची प्रचिती येते...
"माणसानं यशाची कितीही शिखरं काबिज केलेली असो पण त्याने आपले पाय मात्र  आपल्या मातीतच घट्ट रोवून ठेवावेत", अशी एक म्हण आहे मराठीत...
मेघालयातील मोठमोठी पण अस्ताव्यस्त पसरलेली,वनराजी बघून ही म्हण तेथील वृक्षांनी शब्दशः आमलात आणली आहे असे म्हणता येईल...

"लाईव्हरुट्स ब्रिजेस" हा शब्द आपल्या कानावरुनही गेला नाही कधी...पण या राज्यात घनदाट वनराजींमध्ये माणसांसाठी सोय म्हणून की काय, निसर्गातूनच असे वर्षानूवर्षांपासून जीवीत असणाऱ्या झाडांनी,वृक्षांनी आपली मुळं पसरवत,नैसर्गिक पुलांची केलेली बांधणी दिसून येते.....कितीतरी संख्येनं तयार होत, आजही ती जीवीत अवस्थेतच वापरली जातात...
   निसर्गाने मानवाला दिलेला हा अनमोल ठेवा तेथील शासनानेही जसा आहे तसा जपलाय...
काही दुमजली पुल आहेत तर बाकीची एकेरी, पण आपण त्यावरुन चालत जाताना खरोखरच थक्क व्हायला होते...
आमचं दुसर्‍याच दिवशीचं आकर्षण हे होतं आणि तो बघण्याची उत्सुकता ताणलेली होती...

ठरल्या प्रमाणे सकाळच्या उत्साहवर्धक मनानं, निसर्गाच्या कुशीतून फेरफटका मारण्यासाठी आम्ही दाट जंगलामध्ये प्रवेश केला...नैसर्गिक स्वरुपात पाऊलवाटेने तयार झालेल्या ओबडधोबड रस्त्यावरुन खरं म्हणजे माणसालाच हल्ली सवय राहिली नाहीए अशा रस्त्यांची...
पण, पण येथे मात्र, "अरे आम्ही या जंगलाचे राजे,येथे आमचेच राज्य असणार ना?"असा प्रतिप्रश्न करत डौलाने आपल्या पानांची सळसळ वाजवत आमच्यावर दाट सावली धरणारी, मोठी मोठी उंच वाढत गेलेली झाडंच आम्हाला चालताना तोल सावरायला आधार देत होती...
समुहाने आलो होतो याठिकाणी म्हणून बरे झाले, पण एकट्या दुकट्याला हिंमत नसती झाली ईकडे येण्याची!असे वाटून गेले क्षणभर!
आणि चालत असतानाच जाणवले, अरे खाली खोल ओढा असावा...थोड्याफार साठलेल्या पाण्याच्या खूणा दिसल्या तेथे... पावसाळ्यात पाण्याच्या माऱ्याने निरनिराळे आकार धारण करत, पहुडलेल्या काळ्या कुळकुळीत दगडांमधून कसरत करत उतरायचे होते आम्हाला...हा विचार मनात घोळत असतानाच आम्ही दोन्ही बाजूंनी झुकत परस्परांत मिसळून घनदाट सावली धरणाऱ्या एका पुलावरतून चालत आहोत आपण आणि हाच तोच झाडांनी (निसर्गाने) माणसाच्या सोयीसाठी बांधलेला पूल आहे हे लक्षात आले...
 या निसर्गासमोर अक्षरशः नतमस्तक व्हायला झाले...

    निसर्गाची ही किमया डोळ्यात साठवून ठेवताना मोबाईल मध्ये साठवण्याचा मोह अजिबात आवरता आला नाही...
      निसर्गाशी अतिशय जवळीक साधणाऱ्या या राज्यात, मेघालयात "मॉलिंनॉंग" नावाच्या एका छोट्याशा खेड्याला भेट दिली आम्ही.....
या मॉलिंनॉंग चे महत्व यासाठी की, हे एशियातील सर्वांत जास्त स्वच्छता राखलेले खेडे म्हणून प्रसिद्धीस आलेले आहे...आणि ते तसेच होतेही...निसर्गाच्या याच सान्निध्यात घरगुती पध्दतीने बनवलेले दुपारचे जेवण घेऊन आमची रसना तृप्त झाली...
       तेथेच थोडी भटकंती करत शतपावली साधली...

 या नंतर मग "डावकी"नावाचे दुसरे एक खेडे आम्ही गाठले...तेथे "ऊमन्गॉट", नावाची अतिस्वच्छ,नितळ पाणी घेऊन वाहणारी आणि आपला  सुंदर तळ स्पष्टपणे दाखवणारी नदी वाहते....तेथे पोहोंचलो...तेथे 
 बोटींग करण्याची आमची हौस पुरी करणार होतो आम्ही!
     बोटीत बसून रपेट करताना नदीच्या तळाचे सौंदर्य उलगडत गेले...गार पाण्याला स्पर्श करत ते ओंजळीत भरून क्षितीजाआड लवकरच जाईल हा ...असे वाटणार्‍या सुर्यनारायणाला नकळतपणे अर्घ्यच दिले म्हणा ना!!
  
      आजच्या दिवसाची सहल एव्हाना शेवटच्या टप्प्यात आली होती....पण उत्सुकता होती ती भारत - बांगलादेश सीमा, त्यावर भारताकडून बांधण्यात आलेले तारेचे काटेरी कुंपण आणि मोठ्ठे गेट बघण्याची....
    अस्ताच्या समीप जाणारा सुर्य, लांबच लांब निर्मनुष्य रस्ता, दोन्ही बाजूंनी रिकामी सोडलेली विस्तीर्ण जागा आणि 'ते' प्रचंड मोठे गेट बघितले आणि आपल्या भारत मातेची सेवा करण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे (जवानांचे)
मनःपुर्वक आभार मानले....त्यांना "जयहिंद"म्हणत ही सीमा रेषा डोळ्यात भरभरून साठवून घेतली...
     वडिलोपार्जित घराचे दोन सख्ख्या भावांत होणारे पार्टिशन (वाटणी)असावी अशीच ती सीमारेषा होती....लांबच लांब नजरेच्या टप्प्यात न मावणारी....
उदासवाणी...पण भारतीयांचा देशाप्रती स्वाभिमान जागवणारी....
तिला पुनःश्च एकदा नमन करत आम्ही आमच्या मुक्कामी, शिलॉंग येथे परतावयास सुरुवात केली....

    अतीपूर्वेकडील भारतीय राज्ये आत्तापर्यंत बरीचशी 'दुर्लक्षित प्रदेश' याच पठडीत मोडत होती...पण गेल्या काही वर्षांत या भागातील शासनाने पर्यटनाला प्रोत्साहनपर कितीतरी योजना कृतित उतरवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत होता...
त्यातील सर्वात महत्वाचा म्हणजे रस्ते (चांगले)बनवणे, विजपुरवठा आणि हॉटेल व्यवसायाला प्राधान्यक्रम देणे....या त्रयींशिवाय पर्यटनाची मजा नाहीच....या साऱ्यांची पुर्तता निश्चितच पर्यटनाला वाव आणि त्यातून उत्पन्नाचे साधन बनवणे हेच आहे...

    वळणावळणांच्या डोंगरमाथ्यावर राज्य करणारे रस्ते, प्रवास करताना आपण तेथील निसर्गाच्या प्रेमात कधी पाडतो हे समजतही नाही आपल्याला...
     शिलॉंग शहरही तसेच होते...मला येथे हिमाचल मधील शिमला शहराची राहून राहून आठवण येत होती...थोडासा झोंबणारा हवेतील गारवा ,हवाहवासा वाटणारा असाच होता....मेघांची अंबरातून गच्छंती झालेली होती, म्हणून आम्हाला तेथील लहरी निसर्गाचा काहीच त्रास झाला नाही...
मार्च महिन्यातील दोन आठवडे संपलेले होते पण ऊन असे काहीच नव्हते...एप्रिल च्या शेवटास येथे पावसाच्या ॠतूची सुरुवात होते असे समजले....

शिलॉंग--चेरापुंजी...
    
      शिलॉंग मधील चार दिवसांच्या मुक्कामातील आमचा आजचा तिसरा दिवस होता...आजचे आकर्षण होते, "चेरापुंजी" या शहराला आणि परिसराला भेट....
    'चेरापुंजी' म्हटले की मला वाटतं पाचवी सहावीच्या भुगोलाच्या पुस्तकात होता तो उल्लेख आठवला...
 "अख्ख्या जगात 'चेरापुंजी' या शहरात सर्वांत जास्त पाऊस पडतो".....
 कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपण या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देवू! 

     शिलॉंगहून नाश्ता करुन निघालेली तृप्त रसना आणि प्रसन्न वातावरणाने ताजेतवाने झालेले मन चेरापुंजी कडे धाव घेऊ लागले...दोन तासाचेच अंतर पण घाटाघाटातून जाताना जास्त वाटत होते...सोबतीला हिरव्या हिरव्या पहाडांची आणि मोठ्या झाडाझुडुपांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होतीच...मनसोक्तपणे निसर्ग न्याहाळत आमचा प्रवास चालू होता...

हिमालयिन पहाडांचीही अव्याहत सोबत होती, पण सारेच कसे हिरमुसलेले ओकेओके वाटत होते हे पहाड....चेरापुंजीचे मी मनात रंगवलेले चित्र आणि माझ्या डोळ्यांना दिसणारे चित्र अगदीच विरुद्ध टोकाचे होते...
  माहितीअंती असे समजले की, चेरापुंजीला येण्याचा सिझन खरे म्हणजे हा नाही...तेथील निसर्ग डोळेभरून बघण्यासाठी जून ते ऑक्टोबर मध्ये यायला हवे....
शिवाय गेली बरीच वर्षे चेरापुंजीत सामान्यपणे इतर ठिकाणी होतो तसाही पाऊस पडलेला नाही....आणि आता जगातील सर्वांत जास्त पाऊस पडण्याचे ठिकाण,केंद्र चेरापुंजी ऐवजी बांगला देशाच्या एका गावी(माऊसीनरॅम) सरकले आहे....
     हे ऐकले आणि आमचा तर फारच हिरमोड झाला...कारण तेथील निसर्गात हिरवाईचे प्रमाणही नगण्य होते....खूप दिवसांपासून हा प्रदेश पावसाच्या प्रतीक्षेत असावा हे जाणवत होते...याचा सारा परिणाम तेथील निसर्गावर होणे अगदी स्वाभाविक आहे....
    तेथील एलिफंटा वॉटरफॉल ला पाणीच नाही हे समजले....तेथे जाण्याचा प्रश्नच नव्हता...पण सेव्हन सिस्टर वॉटरफॉल सुध्दा अगदीच नगण्य पाणी फेकतोय हे समजले म्हणून तेही रहित करावे लागले...
पण,भारतातील सर्वात अधिक उंचीवरून (340 मी.) कोसळणारा "नोहकालीकाई" वॉटरफॉल मात्र आम्ही बघावयाचे ठरवले...
      या व्ह्यू पॉईंटवर आलो आणि निसर्गाचे अप्रतीम सौंदर्य मनात, नयनांत साठवून घेतले....
      प्रचंड मोठा गोलाकार आकाराच्या पहाडांचा विशाल द्रोण निसर्गाने बनवलेला दिसत होता...सर्वदूर पर्यंत आपली नजरही पोहोचत नव्हती....पण अगदी लांबून दिसणारा धबधब्याचा ऊंचावरुन पडणारा प्रवाह फारच नजाकतीचा होता....खूप ऊंचावरुन खोल दरीत एका मोठ्या विहिर वजा खड्ड्यात हे फेसाळ पाणी खाली आदळत होते...एवढ्या लांबून पाण्याचा आवाज येणे अशक्य होते ,पण खाली जमा झालेले पाणी मात्र शांत,शितल निळेशार दिसत होते...फारच सुरेख नजारा होता तो!
     नोहालिकाई नावाच्या स्त्री चे नाव या धबधब्याला दिले गेले आहे असे समजले...
     नवऱ्याने संशय घेतलेल्या या नावाच्या सासुरवाशिणीने येथे आपल्या प्राणाची आहूती दिली होती
....ही माहिती मिळताच या धबधब्यावर एक उदास छाया पसरली आहे असे वाटले मात्र...
पण निसर्गाविष्कार अप्रतीमच!!

       यानंतर आम्ही स्वामी रामकृष्णमिश न आश्रमाला भेट दिली...पहाडी प्रदेशात वंचितांसाठी शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन, त्यांना व्यावसायिक शिक्षण देत स्वावलंबन शिकवण्याचा वसा या संस्थेने घेतलाय यांनी चेरापुंजीत (सोहरा) येथे फार सकारात्मक कार्याची सुरुवात 1931 पासून सुरु केलेली आहे...ह्या प्रेरणात्मक कामाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटकही या संस्थेला आवर्जुन भेट देतात...मेघालयातील लोकांच्या कलाकुसरीतुन तयार होणाऱ्या कितीतरी वस्तूंचे नमुने येथे बघावयास मिळतात...खरेदीसाठीही एक छान दालन येथे उघलेले आहे...गरम कपड्यांची खरेदी करुन आपणही भरुन पावतो...
      
   एव्हाना दुपारच्या जेवणाची आठवण पोटोबा करवून देत होते..तेथील एका स्थानिक हॉटेल मध्ये आम्ही जेवण घेतले...चवदार होते पण सहलीच्या पहिल्या दिवसापासून बटाटे,बिन्स गाजर यांची सुकी मिक्स भाजी आणि पनीर मसाला आमची पाठ सोडत नव्हते...जेवणात ग्रीन सॅलड,यात हिरव्यागार ईडिलिंबूच्या चकत्यांचा समावेश असायचा....पण रस मात्र अगदीच नसायचा...दातांनी तोडून खाल्लं तर अतिशय आंबट चव...मी शेवटी त्याचा नाद सोडलाच.... सहल संपवून घरी आल्यानंतरच आपल्या जेवणात लिंबू या फळाची जागा किती महत्वाची!याची प्रचिती आली...
याशिवाय जेवणात 
दाळ ,भात दुधीसारख्या किंवा भोपळ्या सारख्या फळाच्या चकत्यांचे गरमागरम पकोडे आणि गोडाचा गुलाबजाम, रसगुल्ला यांपैकी एक असंच असायचं....असो...
      
     चेरापुंजीच्या भेटी दरम्यान झालेला हिरमोड मात्र जवळच असणाऱ्या, असणऱ्या म्हणण्यापेक्षा नैसर्गिकपणे तयार झालेल्या लेण्या बघून कुठच्या कुठे पळाला....उलट पावसाळ्यात आलो असतो या ठिकाणी तर, या दृष्टिला पडल्याच नसत्या कारण बोगद्यात पाणी साचलेले असते....
     पण खरोखर एका पहाडाच्या छताखाली निसर्गात उद्भवलेल्या कांही बदलांमूळे तयार झालेल्या या लेण्या अप्रतीमच!
    या तयार होण्यामागे दोन विचारधारा दिसून येतात....काहींच्या मते, वर्षानुवर्षे जोरदार पाऊसाच्या मार्यामूळे या पहाडाचे अंतर्गत स्वरुप बदलले असावे...तर काहींच्या मते, तेथे हजारो वर्षांपूर्वीच लाव्हारसाचा उद्रेक झाला असावा...त्यामूळे तो थंडावल्या नंतर त्यातून तयार झालेल्या या लेण्या असाव्यात!
    मला तरी दुसर्‍या क्रमांकाची विचारधारा संयुक्तिक वाटते....

    महाराष्ट्रात प्राचीन असतील तरीही विशिष्ट हेतूने जाणीव पूर्वक मानवनिर्मित लेण्या बघण्याची सवय असताना, ह्या लेण्या बघणं मला खूप अप्रुपाईचं वाटलं...थोडसं 'ॲडव्हेंचरस' ही नक्कीच होतं हे काम! पण बघताना चेरापुंजीत आल्याचं सार्थक वाटून;खूप काहीतरी वेगळंच बघितलंयं आपण हे समाधान मिळालं....
    एक मोठी गुहा वाटावी असा बोगदा असावा असं ठिकाण होतं ते! आणि "आत  उतरुन हळू हळू पुढे चालत रहा, पण आपलं डोकं सांभाळत सांभाळतच", असे सांगण्यात आले आम्हाला.....
    बाहेरुन अंदाज घेतला तर आत जाण्यास रस्ता असेल का?उजेड तर नसावाच अशी शंका होती...शिवाय छोट्या,मोठ्या, उभ्या आडव्या लोंबत्या काळ्याशार पाषाणांनी गर्दी करत भरुन गेलेल्या या बोगद्यातून चालावे कसे?आणि बाहेर येता येईल का सुखरुप?अशा नाना शंका मनात पिंगा घालत होत्या..पण
पण नव्हे आपण आत जाऊनच बघू या तर खरे...नाही जमले तर फिरु या परत असा निश्चय केला...
       आतमध्ये शिरल्यानंतर चार पावलंही टाकणं कठिण अशीच गुहा होती ही...खाली-वर, उभे-आडवे कुठेही बघा काही अणीकुचिदार, काही मोठ्ठ्या मोठ्ठ्या आकाराचे पण सारेच काळे कुळकुळीत आणि सिल्की झालेले दगड  ,आत मध्ये व्यवस्था असणाऱ्या दीव्यांच्या प्रकाशात चकाकत होते...लेण्या म्हणण्या पेक्षा वेगवेगळे आकार धारण केलेली,काळ्या पाषाणाची खाणच होती ती!
    प्रवेश एका बाजूने घेतल्यास बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग होता....
या खाचखळग्यांतून आपले डोके सांभाळत, एकमेकांना आधार देत, काही ठिकाणी अक्षरशः सरपटत सरपटत आम्ही हा जवळ जवळ एक कि.अंतराचा बोगदा पार केला....आत मध्ये जाताना डाव्या बाजूला केवळ एक झरोका होता, तेथून काय तो थोडा सुर्यप्रकाश आत येत होता...
    आतून बाहेर पडलो आणि काय आनंद झाला म्हणून सांगू!मला माझ्यावरच विश्वास बसत नव्हता आपण हा पार करुन आलोय यावर!पण एकूण अनुभव आणि ते ठिकाण आम्ही मस्त एन्जॉय केले...आणि चेरापुंजी ची सहल सफल झाली आहे असे जाणवले...
       परतीचा प्रवास सुरू होईपर्यंत सुर्यास्ताची वेळ झाली...
    
   अती पूर्वेकडील या राज्यांमध्ये सुर्योदय लवकर होतो तसाच सुर्यास्त ही आपल्या महाराष्ट्रात होतो त्या पेक्षा खूप अलीकडे होतो...साडेपाचला तीन्हीसांजा झालेली असायची!

       शिलॉंग गुलाबी थंडीचे शहर...निसर्गा बरोबरच मनंही कायम टवटवीत रहात होतं या ठिकाणी...'दमछाक होणं' फार लांब अंतर ठेवून होतं आमच्या पासून! निरनिराळी रंगीबेरंगी फुलं असणारी रोपट्यांची कुंडीतील आकर्षक रचना  स्वागताला असायची सगळीकडेच...प्रसन्न फुलं लगेच आपले लक्ष त्यांच्याकडे वेधून घ्यायचीच...
     
   दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्ही शिलॉंग शहराचा निरोप घेणार होतो...चार दिवसांत खूप लळा लावला होता या शहराने!
     
   प्रसन्न सकाळ घेऊन उजाडलेली सकाळ आम्हाला पुढच्या प्रवासासाठी खुणावत होती...

शिलॉंग -- तेजपूर....
असा प्रवास होता तो...मेघालयातून आम्ही परत आसामात ब्रह्मपुत्रेच्या किनार्‍यावर जाणार होतो...दोन तासाच्या या प्रवासात आम्ही जाताना मेघालयातील "सुप्रसिद्ध डॉन बॉक्सो म्युझिअम", या अतिशय सुरेख अशा प्रदर्शनाला भेट दिली...चार मजल्यांवर सात मोठी मोठी दालनं असणाऱ्या या प्रदर्शनात अती पूर्वेकडील सातही राज्यांची भौगोलिक दृष्टिकोनातून, सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाविषयी, उद्योगधंदे,पोशाखापासून इत्यंभूत माहिती, चित्र रुपाने, कलाकुसरीतून, वस्तूंच्या रुपात, लिखित माहितीच्या रुपात आणि चित्रफितीव्दारे अत्यंत परिपूर्ण आणि महत्वाची माहिती आम्हाला मिळाली. ...
या लोकांची निसर्गाशी असणारी बांधीलकी आणि आदिवासीपण यांचे सचित्र रेखाटन फारच अप्रतिम पध्दतीने सादर केलेले दिसून आले...
 आदिवासी लोकांच्या संदर्भात पीएचडी कणारी मंडळी मुद्दाम अभ्यासासाठी येथे भेटी देतात...
याच वास्तूच्या टेरेसवर स्कायवॉक चा आनंद घेत संपूर्ण शिलॉंग शहराचा अप्रतीम नजारा बघता आला..फारच छान अनुभव होता हा पण ...

    तेजपूर ला जाताना रस्त्यातच नागांव येथे विशाल असे महामृत्यूंजय मंदिर बघितले आम्ही....पर्यटनाला प्रोत्साहनपर आकर्षक ठिकाण म्हणून गेल्या कांही वर्षात नव्यानेच उभारण्यात आलेले हे मंदिर त्या मागचा हेतू साध्य करत आहे...मंदिराचा बाह्य भाग महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा होता....अजूनही तेथील काम प्रगतीपथावर असल्याचे दिसून आले...
ही वास्तू डोळ्यात साठवून आम्ही आमच्या मुक्कामी पोहोंचलो....

तेजपूर --- दिरांग.

     आसाम मधलं तेजपूर हे ठिकाण, म्हणजे, अरुणाचल प्रदेशात प्रवेश करताना प्रवासाचे ठराविक अंतर पार करत; आराम करण्यासाठी एक सोयीचे ठिकाण... याच दृष्टिकोनातून हा मुक्काम होता आमचा...अर्थातच आल्हाददायक निसर्ग, थंडगार वाहती हवा, आणि सोबतीला पर्वतीय रांगांच्या महिरपी....असे सारे असेल तर माणसाला प्रवासाचा कंटाळा आणि शीण दोन्हीही येत नाही...निसर्गा चे अवलोकन करणं हा छंद असेल जवळच तर अशी भटकंती म्हणजे दुग्धशर्करा योगच!

    तेजपूर ते दिरांग या प्रवासात मात्र आपण आता पहाडांच्या वरच्या भागावर जात आहोत याची जाणीव होऊ लागली...आता पर्यंत च्या प्रवासात लांबून वळसा घालावयास लावणारी वळणं आता मात्र आपला व्यास कमी कमी करत चालली होती...तापमानात घटही कमालीची लक्षात येत होती...
हिमालयाच्या हिमाच्छादित रांगा जवळपासच असाव्यात याचे ज्ञान मनाला आणि वृत्तींनाही जाणवत होते...नव्हे, आता तर हिमाच्छादित शिखरं दृष्टिक्षेपात येऊन अंगावर रोमांच उभे राहू लागले...
    काळ्याशार पहाडांवर शुभ्र बर्फाच्या कणांनी, तुकड्यांनी रेखाटलेली सुंदर रांगोळी म्हणजे त्या अंबराच्या स्वागतार्ह, पाहूणचारासाठी या अवनीने स्वतःच्या हाताने रेखाटलेली सुंदर नक्षीदार रांगोळीच असा भास होत होता....
हा दिवस दिरांग च्या सान्निध्यात घालवला आम्ही...
प्रत्येक हॉटेलच्या परिसरात फुलांचे वैविध्य, त्यांचे रंग आणि रचना मनाला मोहवत असायची...प्रत्येक फूल डोळ्यात आणि फोटोतून जपण्याचा मोह खरोखरच अनावर होत असायचा...

   अरुणाचल प्रदेश हा केंद्रशासित प्रदेश आहे...येथे भारतीय सैन्य दलाच्या परवानगीशिवाय आपण या भुमीवर प्रवेश करु शकत नाही...
ठिकठिकाणी भारतीय सैन्यदलाचे रेजिमेंट्स आपल्याला दिसून येतात...भारतीय जवान पावलापावलावर तळ ठोकून आपल्या भारतीय सीमेचं संरक्षण करत असतानाचे दृश्ये दिसत रहातात...हे बघून आपला उरही अभिमानाने भरून येतो, आणि आपले मन अगदी नकळत त्यांचे आभार मानू लागते...
 आम्ही महाराष्ट्रीयन आहोत म्हटल्यावर,प्रवेशालाच एक सैनिक आमच्याशी मराठीत संवाद साधत होता..'मी लातूरचा आहे' असे त्याने म्हणताच,कृतकृत्य झाल्यासाखे वाटले...बुलढाण्याच्या एका सैनिकानेही मुद्दाम आपली महाराष्ट्रीयन ओळख सांगितली आणि आम्हाला फार आनंद वाटला...त्यालाही आमच्याशी बोलून छान वाटत आहे हे लक्षात आले आमच्या..

  दिरांग वरुन तवांगला जातानाच्या  प्रवासाच्या रस्त्यात आम्ही 500 वर्षे जुनी असणारी मॉन्स्ट्री (भगवान गौतम बुध्दांचा मठ) बघितला...
    किंबहूणा अरुणाचल प्रदेश हा भव्य दिव्य मॉन्स्ट्रीजचा प्रदेश आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही....
  भगवान गौतम बुध्दांचा वास या भुमीला सदैव शांती, प्रेम, आस्था बहाल करतो...एका बाजूला निसर्गाचे विराट रुप, स्वर्गाच्या स्पर्शाला आसुसलेले प्रचंड मोठे हिमाच्छादित शिखरं...आणि दुसरीकडे मॉनस्ट्रीजचे पावित्र्य यांचा सुंदर मिलाफ साधून ताठ मानेने ऊभा असणारा हा प्रदेश...
बौध्द धर्माची विलक्षण छाप जपणारा असाच आहे...
ठिकठिकाणी शांतीचा संदेश देणाऱ्या पताका फडकावत संदेश देत रहातो...
एकापेक्षा एक भव्य दिव्य मॉन्स्ट्रीज, त्यात असणारे,गौतम बुध्दांचे भव्य पुतळे आणि समानतेचा संदेश देणारी त्यातील अनेकविध गोष्टी, वस्तू, तेथील प्रचंड मोठे ध्यान मंदीर आणि मनाला मिळणारी शांतता हे सारंच अद्भुत आहे हे जाणवत रहातं...
  अशा कितीतरी मॉन्स्ट्रीज ना आम्ही भेटी देवून मःशांती अनुभवली या प्रदेशात! प्रत्येक मठातील स्वच्छता, रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांची जोपासना आणि रचना हे सारंच अप्रतिम होतं!

      सेलापास....
    -----------------

तवांगच्याच या रस्त्यामध्ये "सेलापास" नावाचे एक सरोवर आहे...1962 च्या भारत चीन युध्दात सेला नावाच्या मुलीने भारतीयांच्या विजयासाठी फार महत्वाची भुमिका(मदतनीस म्हणून)
बजावली होती...
तिच्या स्मरणार्थ भारत सरकारने बनवलेले हे सरोवर आहे...
   तवांगची ही भुमी हे युध्द चालू असतानाची साक्षिदर आहे...युध्द यशस्वीपणे पेलत, विजयश्री आपल्याकडे खेचून आणली तेच हे 'तवांग' होय....
      सेलापास या सरोवराने तवांगला उर्वरीत भारतभुमीशी जोडून ठेवलेले आहे...म्हणूनही हे सेला पास....
निसर्गाचा अप्रतीम अविष्कार असणारा सेला लेक अक्षरशः आपल्या डोळ्याचे पारणे फेडतो...दुतर्फा शुभ्रतेने नटलेले हिमपर्वत....संपूर्ण पणे गोठून पाणेरी कडक बनलेला चकचकीत पृष्ठभाग म्हणजेच सेला लेक होता..
अगदीच अवर्णनीय होतं हे सारंच...या ठिकाणी ऑक्सिजन चे प्रमाण कमी असते म्हणून बऱ्याच  लोकांना त्रास होऊ शकतो...पण आम्हाला तसे काही जाणवले नाही...याच निसर्गरम्य परिसरात किततरी वेळ रेंगाळत आम्ही आमचे पॅक लंच उघडले आणि मनसोक्त पिकनीक साधून घेतली...

    भारत-चीन युध्दात फारच महत्वाची जबाबदारी पार पाडत शहिद झालेले कॅप्टन जसवंत सिंह यांच्या स्मरणार्थ ऊभे केलेले एक अनुपमेय  मेमोरियल बघण्याचा योगही याच तवांगने घडवून आणला...
"जसवंत घर" असे त्याचे नाव...
प्रत्येक भारतीयाचे स्फुर्तीस्थान असणारे हे ठिकाण... आम्ही विनम्रपणे अभिवादन करत जसवंत सिंहाचे मनोमन आभार मानले...शुध्द हवेवर ऊंच फडकणार्या आपल्या तिरंग्याला आणि जसवंत सिंहांच्या स्मृतिंना जयहिंद करत आम्ही  तेथून निघालो...
   
   महाराष्ट्रभर कडक उन्हाळा असताना आम्ही मात्र थंडीमध्ये कुडकुडत त्या रात्री गरम पांघरुणात लपेटून निद्रादेवीच्या स्वाधीन झालो..

     प्रसन्न सकाळी भरभरुन मोकळा श्वास घेत आम्ही दुसरे दिवशी तवांग शहरात असणाऱ्या जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या आणि भारतातील पहिल्या क्रमांकाच्या सुंदर मॉन्स्ट्रीला भेट दिली...18 फुट ऊंच असणारा भगवान गौतम बुध्दांचा 
भव्य पुतळा कुठूनही लक्ष वेधून घेत होता...सभोवती असणाऱ्या हिमालयाच्या रांगा आपल्या भोवती फेर धरुन आनंदाने नाचत आहेत असा भास होत होता...या अवनीचे अतीसुंदर रुप आपण जवळून न्याहाळत आहोत ही भावना मनातून कृतज्ञता व्यक्त करत आहे या निसर्गा प्रती... हे समाधान घेऊनच अख्खा दिवस तवांगच्या रम्य सान्निध्यात राहिलो आम्ही.... त्याच सायंकाळी,तवांग वॉर मेमोरियल येथेच नितांत सुंदर असा लाईट अँड साऊंड शो बघितला....
राष्ट्रध्वजाला वंदन करत राष्ट्रगीत गायले आणि तवांग च्या भुमीचे आभार मानत दुसरे दिवशी सकाळी तेथून पुढच्या प्रवासासाठी म्हणजे बोंम्डिला या गावी जाण्याची परवानगी घेतली...

  तवांग --- बोंम्डिला.
-------------------------

   दोन दिवस मस्तपैकी तवांग हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण अनुभवले आणि तिसरे दिवशी बोम्डिला या गावी जाण्यास निघालो आम्ही....प्रवास 175 कि.मी.चा, बऱ्या पैकी मोठे अंतर कापायचे होते...कोणताही त्रास होऊ नये आणि कंटाळवाणाही होऊ नये याची भरपूर काळजी घेण्यात येत असे...
मुळात मेघालय आणि अरुणाचल प्रदेशाची सहलीचा हेतूच निसर्गाच्या सान्निध्यात अगदी समरसून रहाणे, अनुभवणे आणि आनंद मिळवणे हा होता....अशा निसर्गात भटकंती कोणाला आवडणार नाही!!...शिवाय रस्ते एकदम छान होते...अगदीच काही ठिकाणी काम चालू असल्याने अगदी थोडी गैरसोय व्हायची पण अगदीच नगण्य अशीच...
     गाड्या आरामदायक होत्या, चालकही चांगले होते आणि नागमोडी चालीने प्रवास करण्यास मज्जा येत होती...
   
      तवांगहून बोम्डिला शहरी जाताना रस्त्यात "गँगॉंग अन् गमपा"
या ठिकाणी अति सुंदर असा "नुरांन्ग"
नावाचा अती उत्कृष्ट निसर्गाविष्कार आम्ही बघितला...हा एक डोळ्याचे पारणे फेडणारा सुंदर धबधबा आहे...
ऊंचावरुन वेगाने खाली पडणारे शुभ्रफेसाळ पाणी, आसमंतात आपले तुषार उडवत आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करतात...या धबधब्याच्या अगदी पायथ्याशी जाऊन उभे रहाण्यात आणि हा थंडगार शॉवरबाथ घेणं एक अविस्मरणीय अनुभव आहे...
हेच फेसाळलेले पाणी खाली पडून नदीमध्ये एकरुप होऊन आपला प्रवाह शांत करते...नयनसुख काय असतं ते प्रत्यक्षात अनुभवायलाच हवं...
    सेला लेक ज्या प्रमाणे सेला नावाच्या मुलीच्या स्मृती जपण्या साठी तयार झालाय... 
अगदी त्याच कार्यात (युध्दजन्य परिस्थितीत) सैनिकांना मदत केली म्हणून सेलाचीच मैत्रीण,नुरांग् हिची आठवण म्हणून या धबधब्याला "नुरांग्न वॉटरफॉल" असे नाव देण्यात आले आहे...
बराच वेळ रेंगाळत या धबधब्याचा आनंद अनुभवला आणि आम्ही बोम्डीलाच्या दिशेने प्रयाण केले...

    बोम्डिला शहर प्रवेशाच्या अगोदर आणखी एका बौध्द मठाला भेट दिली...
   दिवसभराच्या प्रवासाने आरामाची आवश्यकता आहे ही जाणीव करवून दिली आणि यथेच्छपणे रात्रीचे जेवण घेऊन आम्ही निद्रेच्या स्वधिन झालो...थंडीचा कडाकाही काहीसा कमी झालेला होता....सकाळी पुनः कझिरंगाच्या प्रवासासाठी सिध्द व्हायचे होते आम्हाला...

बोम्डीला--काझीरंगा .
   दुसरा दिवस आमच्या सहलीच्या शेवटचा टप्पा ठरणार होता...बोम्डिला ते काझिरंगा हा सहा तासांचा प्रवास करुन आम्ही आसामच्या काझीरंगा या जुन्या आणि मोठ्या अशा राष्ट्रीय पार्क मध्ये प्रवेश केला....
पार्क असले तरीही एक मोठे शहरच होते हे!फार मोठा परिसर या पार्क च्या रुपाने पालथा घालण्याची संधी मिळाली आम्हाला....
ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेले हे पार्क एप्रिल च्या शेवटा पर्यंतच पर्यटकांसाठी खुले असते...
  मे पासून आसामात पावसाळा चालू होतो...ब्रह्मपुत्रेच्या पाण्याची पातळी वाढते आणि सारं जंगल तिच्या पाण्याने व्यापून जाते...एप्रिल च्या शेवटी तेथे असणारे प्राणी, पक्षी डोंगराळ भागाकडे कूच करतात...
 काझिरंगा नॅशनल पार्क मध्ये कायम दलदल असण्याचे हेच खरे कारण आहे....
मार्च च्या शेवटीही जंगलामध्ये भरपूर पाण्याचे साठे असल्याचे दिसून आले...
   हे जंगल फारसे दाट नसावे असे वाटते....पण गेंडे आणि हत्ती यांची बरीच वर्दळ असणारे हे ठिकाण आहे...
   आमचे मुख्य आकर्षण होते ते  म्हणजे हत्तीवर स्वार होऊन जंगलात सैर करुन येणे...
      दुसर्‍याच दिवशी भल्या पहाटे आम्ही हत्तीच्या सफारीसाठी जंगलात पोहोचलो...माहूत आपले हत्ती घेऊन तयारच होते...
अंबारीवजा बेंचेस ची व्यवस्था स्वार होण्यासाठी हत्तीच्या पाठीवर होती...बसे पर्यंत थोडी भिती वाटली...पण मग मात्र निश्चिंतपणे मुक्त सैर केली जंगलात...या एक दीड तासाच्या सफारीवर असताना आम्हाला बरेचसे गेंडे, हत्तीचे कळप, हरीण, सुसर असे प्राणी दिसले...
रानरेडे, आणि काही पक्षी एवढीच काय ती संपत्ती दिसली जंगलाची,पण आमची नजर वाघोबाचा वेध घेत होती...पण शेवटी भ्रमनिरासच झाला..हा अनुभव मात्र मजा चाखून गेला आम्हाला...
     दुपारच्या सत्रात जीप सफारी केली...तेंव्हा तरी दिसेल काही असे वाटले, पण छे!एखाद दुसर्‍या गेंड्या शिवाय काहीही दिसले नाही...

      याच परिसरात असणाऱ्या ऑर्चिड पार्क मध्ये मात्र फार उपयुक्त माहिती मिळाली आणि एकाहून एक सुंदर सुंदर ऑर्चिड्सचे रंग, गंध आणि प्रकार अगदी जवळून बघितले...एवढी सारी फुले बघून मन हर्षोल्हासित झाले आणि काझीरंगाला भेट देण्याचे सार्थक वाटले....
  या शिवाय कॅक्टस गार्डन मध्ये कॅक्टस च्या कधीही न बघितलेल्या कितीतरी जाती बघावयास मिळाल्या...अक्षरशः आचंबित व्हायला झाले....
    याशिवाय थोडीफार खरेदीही झालीच... आसामच्या बिहू नृत्याची आणि त्या मागील हेतू विषयी माहिती देत ह्या पारंपारिक नृत्याचे सादरीकरण खास आम्हा पर्यटकांसाठी हॉटल मध्ये आयोजित करण्यात आले होते...या सर्वांचा आनंद घेत आमचा मुक्काम आम्ही काझीरंगा परिसरात केला....निसर्गाशी हितगुज मनाला आनंद दायक वाटले...पण रात्री आणि सकाळी पाऊसाने मस्त जोरदार हजेरी लावत सलामी दिली आम्हाला....पण तारांबळ उडवली नाही मात्र....

काझीरंगा--गोवहाटी 
-------------------------

सकाळी पावसातच काझीरंगाचा निरोप घेऊन आम्ही गोवहाटीसाठी प्रवास चालू केला....
 प्रवेशालाच ब्रह्मपुत्रेच्या पाण्यात  एका बेटावर असणाऱ्या
 "उमानंदा " या अती प्राचीन महादेव  मंदिराला भेट देवून त्या शिवशंभो ला नमस्कार घातला...
जाता येता छोटासा बोटीचा प्रवास करुन घेतलेले दर्शन, व्दारकेच्या बेट व्दारकेची आठवण देऊन गेला....
खरं म्हणजे या रात्री आमचे ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावर क्रुझ डिनर ठरलेले होते....पण नेमके याच दिवशी आसामचे मुख्यमंत्री शहरात येणार होते आणि याच क्रुझवर त्यांच्या डिनरचे आयोजन केलेले होते....सहाजिकच आम्हाला माघार घ्यावी लागली...
आम्ही आपले छानपैकी हॉटेल डिनर एन्जॉय केले आणि सकाळी परतीचे वेध घेत निद्राधिन झालो...

   हा आमचा सहलीच्या निरोपाचा दिवस होता...शुचिर्भूत होऊन नाश्ता आटोपला आणि गोवहाटीत असणाऱ्यां कामाख्य देवीच्या दर्शनासाठो सज्ज झालो....
साडेतीन पीठापैकी एक असणारं हे एक जागृत शक्तीपीठ आहे...मंदीरात गर्दी बरीच होती...अगदी गावातच असणारं पुरातन मंदिर,कोणतेही मंदिर असू द्यात, तेथील चित्र नेहमीच जसं असतं तसंच सारं सारं होतं येथेही....
मुखदर्शन घेऊन आम्ही देवीला मनोमन नमस्कार केला आणि सहलीची सांगता केली....
दुपारी दोन वाजेपर्यंत एअरपोर्ट गाठावे लागणार होते....तत्पुर्वि सर्वांनी एकत्रित जेवणाचा अस्वाद घेत परस्परांचा निरोप घेतला आणि आपापल्या मार्गावरच्या विमानात स्वार होऊन परतीचा प्रवास चालू केला...
आमचे विमान सर्वांत शेवटी रात्री दहा वाजता होते...
एअरपोर्ट वर बराच वेळ गर्दी ला न्याहाळत अवलोकन केले....
छोटेसेच होते एअरपोर्ट पण संपूर्ण देशाच्या प्रमुख शहरांशी जोडला गेलेले होते हे शहर!त्या मूळे गर्दी भरपूरच होती आणि विमानांची ये जा सुध्दा खूप मोठ्या प्रमाणावर होती येथे...
     ठरलेल्या वेळी आमच्या विमानाने टेक ऑफ केले आणि सहलीला जाताना पौर्णिमेचा पूर्ण चंद्र सोबत घेऊन गेलेलो आम्ही,सहलीहून येताना मात्र काळ्याभोर आभाळात आकाशगंगा आणि कितीतरी लखलखतं चांदणं सोबत घेऊन चाललो होतो....
    फाल्गुनाच्या परतीचा काळ होता तो...चांदोबा मात्र गडप होऊन गेले होते या काळ्या आभाळाच्या पोटात....पुन्हा नव्याने, नव्या रुपात लवकरच प्रकटण्यासाठी.....
आम्हीही अडीच तासाचा विमान प्रवास आणि त्या नंतर पाच तासांचे मार्गक्रमण करत सुर्योदयाच्या साक्षीने आमच्या घरी परतलो....
जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही सहलीला, पण आपल्या घराची ओढ मात्र कायम आपली सोबत करत असते आणि आल्या नंतर "आपले घर ते आपलेच घर....त्याची सर नाहीच कशालाच.."
हा विचार येतोच येतो.....

समाप्त....
दि. 23-4-2022.

🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, १८ एप्रिल, २०२२

आमची नॉर्थईस्ट सहल...

आमची नॉर्थईस्ट,
थ्री सिस्टर्स सहल....
-------------------------
लेखिका---
©️ 
नंदिनी म. देशपांडे. 

.....क्रमशः पुढे चालू...

     अतीपूर्वेकडील भारतीय राज्ये आत्तापर्यंत बरीचशी 'दुर्लक्षित प्रदेश' याच पठडीत मोडत होती...पण गेल्या काही वर्षांत या भागातील शासनाने पर्यटनाला प्रोत्साहनपर कितीतरी योजना कृतित उतरवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत होता...
त्यातील सर्वात महत्वाचा म्हणजे रस्ते (चांगले)बनवणे, विजपुरवठा आणि हॉटेल व्यवसायाला प्राधान्यक्रम देणे....या त्रयींशिवाय पर्यटनाची मजा नाहीच....या साऱ्यांची पुर्तता निश्चितच पर्यटनाला वाव आणि त्यातून उत्पन्नाचे साधन बनवणे हेच आहे...

      वळणावळणांच्या डोंगरमाथ्यावर राज्य करणारे रस्ते, प्रवास करताना आपण तेथील निसर्गाच्या प्रेमात कधी पाडतो हे समजतही नाही आपल्याला...
     शिलॉंग शहरही तसेच होते...मला येथे हिमाचल मधील शिमला शहराची राहून राहून आठवण येत होती...थोडासा झोंबणारा हवेतील गारवा ,हवाहवासा वाटणारा असाच होता....मेघांची अंबरातून गच्छंती झालेली होती, म्हणून आम्हाला तेथील लहरी निसर्गाचा काहीच त्रास झाला नाही...
मार्च महिन्यातील दोन आठवडे संपलेले होते पण ऊन असे काहीच नव्हते...एप्रिल च्या शेवटास येथे पावसाच्या ॠतूची सुरुवात होते असे समजले....

शिलॉंग--चेरापुंजी...
    
      शिलॉंग मधील चार दिवसांच्या मुक्कामातील आमचा आजचा तिसरा दिवस होता...आजचे आकर्षण होते, "चेरापुंजी" या शहराला आणि परिसराला भेट....
    'चेरापुंजी' म्हटले की मला वाटतं पाचवी सहावीच्या भुगोलाच्या पुस्तकात होता तो उल्लेख आठवला...
 "अख्ख्या जगात 'चेरापुंजी' या शहरात सर्वांत जास्त पाऊस पडतो".....
 कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपण या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देवू! 

     शिलॉंगहून नाश्ता करुन निघालेली तृप्त रसना आणि प्रसन्न वातावरणाने ताजेतवाने झालेले मन चेरापुंजी कडे धाव घेऊ लागले...दोन तासाचेच अंतर पण घाटाघाटातून जाताना जास्त वाटत होते...सोबतीला हिरव्या हिरव्या पहाडांची आणि मोठ्या झाडाझुडुपांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होतीच...मनसोक्तपणे निसर्ग न्याहाळत आमचा प्रवास चालू होता...

हिमालयिन पहाडांचीही अव्याहत सोबत होती, पण सारेच कसे हिरमुसलेले ओकेओके वाटत होते हे पहाड....चेरापुंजीचे मी मनात रंगवलेले चित्र आणि माझ्या डोळ्यांना दिसणारे चित्र अगदीच विरुद्ध टोकाचे होते...
  माहितीअंती असे समजले की, चेरापुंजीला येण्याचा सिझन खरे म्हणजे हा नाही...तेथील निसर्ग डोळेभरून बघण्यासाठी जून ते ऑक्टोबर मध्ये यायला हवे....
शिवाय गेली बरीच वर्षे चेरापुंजीत सामान्यपणे इतर ठिकाणी होतो तसाही पाऊस पडलेला नाही....आणि आता जगातील सर्वांत जास्त पाऊस पडण्याचे ठिकाण,केंद्र चेरापुंजी ऐवजी बांगला देशाच्या एका गावी(माऊसीनरॅम) सरकले आहे....
     हे ऐकले आणि आमचा तर फारच हिरमोड झाला...कारण तेथील निसर्गात हिरवाईचे प्रमाणही नगण्य होते....खूप दिवसांपासून हा प्रदेश पावसाच्या प्रतीक्षेत असावा हे जाणवत होते...याचा सारा परिणाम तेथील निसर्गावर होणे अगदी स्वाभाविक आहे....
    तेथील एलिफंटा वॉटरफॉल ला पाणीच नाही हे समजले....तेथे जाण्याचा प्रश्नच नव्हता...पण सेव्हन सिस्टर वॉटरफॉल सुध्दा अगदीच नगण्य पाणी फेकतोय हे समजले म्हणून तेही रहित करावे लागले...
पण,भारतातील सर्वात अधिक उंचीवरून (340 मी.) कोसळणारा "नोहकालीकाई" वॉटरफॉल मात्र आम्ही बघावयाचे ठरवले...
      या व्ह्यू पॉईंटवर आलो आणि निसर्गाचे अप्रतीम सौंदर्य मनात, नयनांत साठवून घेतले....
      प्रचंड मोठा गोलाकार आकाराच्या पहाडांचा विशाल द्रोण निसर्गाने बनवलेला दिसत होता...सर्वदूर पर्यंत आपली नजरही पोहोचत नव्हती....पण अगदी लांबून दिसणारा धबधब्याचा ऊंचावरुन पडणारा प्रवाह फारच नजाकतीचा होता....खूप ऊंचावरुन खोल दरीत एका मोठ्या विहिर वजा खड्ड्यात हे फेसाळ पाणी खाली आदळत होते...एवढ्या लांबून पाण्याचा आवाज येणे अशक्य होते ,पण खाली जमा झालेले पाणी मात्र शांत,शितल निळेशार दिसत होते...फारच सुरेख नजारा होता तो!
     नोहालिकाई नावाच्या स्त्री चे नाव या धबधब्याला दिले गेले आहे असे समजले...
     नवऱ्याने संशय घेतलेल्या या नावाच्या सासुरवाशिणीने येथे आपल्या प्राणाची आहूती दिली होती
....ही माहिती मिळताच या धबधब्यावर एक उदास छाया पसरली आहे असे वाटले मात्र...
पण निसर्गाविष्कार अप्रतीमच!!

       यानंतर आम्ही स्वामी रामकृष्णमिश न आश्रमाला भेट दिली...पहाडी प्रदेशात वंचितांसाठी शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन, त्यांना व्यावसायिक शिक्षण देत स्वावलंबन शिकवण्याचा वसा या संस्थेने घेतलाय यांनी चेरापुंजीत (सोहरा) येथे फार सकारात्मक कार्याची सुरुवात 1931 पासून सुरु केलेली आहे...ह्या प्रेरणात्मक कामाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटकही या संस्थेला आवर्जुन भेट देतात...मेघालयातील लोकांच्या कलाकुसरीतुन तयार होणाऱ्या कितीतरी वस्तूंचे नमुने येथे बघावयास मिळतात...खरेदीसाठीही एक छान दालन येथे उघलेले आहे...गरम कपड्यांची खरेदी करुन आपणही भरुन पावतो...
      
   एव्हाना दुपारच्या जेवणाची आठवण पोटोबा करवून देत होते..तेथील एका स्थानिक हॉटेल मध्ये आम्ही जेवण घेतले...चवदार होते पण सहलीच्या पहिल्या दिवसापासून बटाटे,बिन्स गाजर यांची सुकी मिक्स भाजी आणि पनीर मसाला आमची पाठ सोडत नव्हते...जेवणात ग्रीन सॅलड,यात हिरव्यागार ईडिलिंबूच्या चकत्यांचा समावेश असायचा....पण रस मात्र अगदीच नसायचा...दातांनी तोडून खाल्लं तर अतिशय आंबट चव...मी शेवटी त्याचा नाद सोडलाच.... सहल संपवून घरी आल्यानंतरच आपल्या जेवणात लिंबू या फळाची जागा किती महत्वाची!याची प्रचिती आली...
याशिवाय जेवणात 
दाळ ,भात दुधीसारख्या किंवा भोपळ्या सारख्या फळाच्या चकत्यांचे गरमागरम पकोडे आणि गोडाचा गुलाबजाम, रसगुल्ला यांपैकी एक असंच असायचं....असो...
      
     चेरापुंजीच्या भेटी दरम्यान झालेला हिरमोड मात्र जवळच असणाऱ्या, असणऱ्या म्हणण्यापेक्षा नैसर्गिकपणे तयार झालेल्या लेण्या बघून कुठच्या कुठे पळाला....उलट पावसाळ्यात आलो असतो या ठिकाणी तर, या दृष्टिला पडल्याच नसत्या कारण बोगद्यात पाणी साचलेले असते....
     पण खरोखर एका पहाडाच्या छताखाली निसर्गात उद्भवलेल्या कांही बदलांमूळे तयार झालेल्या या लेण्या अप्रतीमच!
    या तयार होण्यामागे दोन विचारधारा दिसून येतात....काहींच्या मते, वर्षानुवर्षे जोरदार पाऊसाच्या मार्यामूळे या पहाडाचे अंतर्गत स्वरुप बदलले असावे...तर काहींच्या मते, तेथे हजारो वर्षांपूर्वीच लाव्हारसाचा उद्रेक झाला असावा...त्यामूळे तो थंडावल्या नंतर त्यातून तयार झालेल्या या लेण्या असाव्यात!
    मला तरी दुसर्‍या क्रमांकाची विचारधारा संयुक्तिक वाटते....

    महाराष्ट्रात प्राचीन असतील तरीही विशिष्ट हेतूने जाणीव पूर्वक मानवनिर्मित लेण्या बघण्याची सवय असताना, ह्या लेण्या बघणं मला खूप अप्रुपाईचं वाटलं...थोडसं 'ॲडव्हेंचरस' ही नक्कीच होतं हे काम! पण बघताना चेरापुंजीत आल्याचं सार्थक वाटून;खूप काहीतरी वेगळंच बघितलंयं आपण हे समाधान मिळालं....
    एक मोठी गुहा वाटावी असा बोगदा असावा असं ठिकाण होतं ते! आणि "आत  उतरुन हळू हळू पुढे चालत रहा, पण आपलं डोकं सांभाळत सांभाळतच", असे सांगण्यात आले आम्हाला.....
    बाहेरुन अंदाज घेतला तर आत जाण्यास रस्ता असेल का?उजेड तर नसावाच अशी शंका होती...शिवाय छोट्या,मोठ्या, उभ्या आडव्या लोंबत्या काळ्याशार पाषाणांनी गर्दी करत भरुन गेलेल्या या बोगद्यातून चालावे कसे?आणि बाहेर येता येईल का सुखरुप?अशा नाना शंका मनात पिंगा घालत होत्या..पण
पण नव्हे आपण आत जाऊनच बघू या तर खरे...नाही जमले तर फिरु या परत असा निश्चय केला...
       आतमध्ये शिरल्यानंतर चार पावलंही टाकणं कठिण अशीच गुहा होती ही...खाली-वर, उभे-आडवे कुठेही बघा काही अणीकुचिदार, काही मोठ्ठ्या मोठ्ठ्या आकाराचे पण सारेच काळे कुळकुळीत आणि सिल्की झालेले दगड  ,आत मध्ये व्यवस्था असणाऱ्या दीव्यांच्या प्रकाशात चकाकत होते...लेण्या म्हणण्या पेक्षा वेगवेगळे आकार धारण केलेली,काळ्या पाषाणाची खाणच होती ती!
    प्रवेश एका बाजूने घेतल्यास बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग होता....
या खाचखळग्यांतून आपले डोके सांभाळत, एकमेकांना आधार देत, काही ठिकाणी अक्षरशः सरपटत सरपटत आम्ही हा जवळ जवळ एक कि.अंतराचा बोगदा पार केला....आत मध्ये जाताना डाव्या बाजूला केवळ एक झरोका होता, तेथून काय तो थोडा सुर्यप्रकाश आत येत होता...
    आतून बाहेर पडलो आणि काय आनंद झाला म्हणून सांगू!मला माझ्यावरच विश्वास बसत नव्हता आपण हा पार करुन आलोय यावर!पण एकूण अनुभव आणि ते ठिकाण आम्ही मस्त एन्जॉय केले...आणि चेरापुंजी ची सहल सफल झाली आहे असे जाणवले...
       परतीचा प्रवास सुरू होईपर्यंत सुर्यास्ताची वेळ झाली...
    
   अती पूर्वेकडील या राज्यांमध्ये सुर्योदय लवकर होतो तसाच सुर्यास्त ही आपल्या महाराष्ट्रात होतो त्या पेक्षा खूप अलीकडे होतो...साडेपाचला तीन्हीसांजा झालेली असायची!

       शिलॉंग गुलाबी थंडीचे शहर...निसर्गा बरोबरच मनंही कायम टवटवीत रहात होतं या ठिकाणी...'दमछाक होणं' फार लांब अंतर ठेवून होतं आमच्या पासून! निरनिराळी रंगीबेरंगी फुलं असणारी रोपट्यांची कुंडीतील आकर्षक रचना  स्वागताला असायची सगळीकडेच...प्रसन्न फुलं लगेच आपले लक्ष त्यांच्याकडे वेधून घ्यायचीच...
     
   दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्ही शिलॉंग शहराचा निरोप घेणार होतो...चार दिवसांत खूप लळा लावला होता या शहराने!
     
   प्रसन्न सकाळ घेऊन उजाडलेली सकाळ आम्हाला पुढच्या प्रवासासाठी खुणावत होती...

शिलॉंग -- तेजपूर....
असा प्रवास होता तो...मेघालयातून आम्ही परत आसामात ब्रह्मपुत्रेच्या किनार्‍यावर जाणार होतो...दोन तासाच्या या प्रवासात आम्ही जाताना मेघालयातील "सुप्रसिद्ध डॉन बॉक्सो म्युझिअम", या अतिशय सुरेख अशा प्रदर्शनाला भेट दिली...चार मजल्यांवर सात मोठी मोठी दालनं असणाऱ्या या प्रदर्शनात अती पूर्वेकडील सातही राज्यांची भौगोलिक दृष्टिकोनातून, सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाविषयी, उद्योगधंदे,पोशाखापासून इत्यंभूत माहिती, चित्र रुपाने, कलाकुसरीतून, वस्तूंच्या रुपात, लिखित माहितीच्या रुपात आणि चित्रफितीव्दारे अत्यंत परिपूर्ण आणि महत्वाची माहिती आम्हाला मिळाली. ...
या लोकांची निसर्गाशी असणारी बांधीलकी आणि आदिवासीपण यांचे सचित्र रेखाटन फारच अप्रतिम पध्दतीने सादर केलेले दिसून आले...
 आदिवासी लोकांच्या संदर्भात पीएचडी कणारी मंडळी मुद्दाम अभ्यासासाठी येथे भेटी देतात...
याच वास्तूच्या टेरेसवर स्कायवॉक चा आनंद घेत संपूर्ण शिलॉंग शहराचा अप्रतीम नजारा बघता आला..फारच छान अनुभव होता हा पण ...

    तेजपूर ला जाताना रस्त्यातच विशाल असे महामृत्यूंजय मंदिर बघितले आम्ही....पर्यटनाला प्रोत्साहनपर आकर्षक ठिकाण म्हणून गेल्या कांही वर्षात नव्यानेच उभारण्यात आलेले हे मंदिर त्या मागचा हेतू साध्य करत आहे...मंदिराचा बाह्य भाग महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा होता....अजूनही तेथील काम प्रगतीपथावर असल्याचे दिसून आले...
ही वास्तू डोळ्यात साठवून आम्ही आमच्या मुक्कामी पोहोंचलो....

     भाग दुसरा 👆
क्रमशः

🌹🌹🌹🌹🌹

मंगळवार, १२ एप्रिल, २०२२

आमची नॉर्थईस्ट, थ्री सिस्टर्स सहल..

🎍आमची नॉर्थईस्ट, थ्री. 
             सिस्टर्स सहल 🎍

©️लेखिका---
नंदिनी म. देशपांडे. 

पुणे ते गोहाटी प्रयाण....
-------------------------
 पुण्याच्या विमानतळावरुन रात्री अडीच वाजता निघालेलं आमचं फ्लाईट अडीच तासात,म्हणजे सकाळी साडेपाच वाजता गोहाटीत पोहोंचले...गम्मत म्हणजे,सकाळी पावणेपाच वाजताच आकाशात तांबडं फुटलेलं होतं...
अरे बापरे!आता तर चक्क उजाडलंयं की...रात्रभर न झालेली झोप आता कशी भरुन काढणार?अशक्यच होतं...
वाहन कोणतंही असो, प्रवासात झोप न येणं किंवा आलीच ती,तर तिला पिटाळून लावणं हे मला कसं काय जमतं हे कोडं आणखी मलाच सुटलेलं नाही...
नवीन ठिकाणी जाण्याची उत्सुकता, भवताल निरखण्याची  क्षमता आणि सोबतच चालू असणारं विचारांचं चक्र या गोष्टी कारणीभूत असाव्यात यासाठी असं वाटतं...
     आता रात्रीच्या वेळेस मिट्ट काळोखात काय डोंबल दिसणार भोवतीचे?असा प्रश्न बाकीच्यांना पडणं अगदी स्वाभाविक आहेच...पण मला त्या मिट्ट काळोखात सुध्दा खूप काही दिसत होतं...सुरुवातीला उड्डाण घेईपर्यंत विमानतळावर रेखाटलेली रंगीबेरंगी दिव्यांची शिस्तीत काढलेली रांगोळी, वैमानिकाचे विमानाची दिशा बदलत नेण्याचे कसब,सवयीनं लक्षात येणाऱ्या आवाजावरुन आता विमान उड्डाण घेईल असे सांगणारे क्षण आणि एकदा उड्डाण घेतल्यानंतर शहरभर पसरलेलं लाईटच्या दिव्यांची निरनिराळी लहान होत बारीक बारीक होणारी मोहक आरास!काय सुंदर दिसतं हे दृश्य!
आपण अधांतरीच आहोत आता ही मनाला झालेली जाणीव थोडी कावरी बावरी करते आपल्याला, पण सुंदर,हसतमुख आणि गोडगोड बोलणार्‍या हवाईसुंदरींची शिस्तीत चाललेली लगबग लगेच आपले लक्ष वेधून घेतेच...
  तर,आसाम,मेघालय आणि अरुणाचल प्रदेश अशी आखणी होती आमच्या टूरची...
       
      गोहाटीतून  सुरु झालेल्या प्रवासाच्या चकचकीत रस्त्यांवर दुतर्फा उंचच उंच आणि सरळसोट वाढत चालेल्या उत्तम प्रतिच्या बांबूची झुडपं गर्दी करत बांबूचं जंगल बनवत आहेत हे लगेच लक्षात येत होतं...हिरवेगार अगदी सरळसोट बांबू आणि त्याची अणिकुचिदार पानं मनाला भुरळ घालत होती...त्यावर डोलणारी पिसासारखी तुरे म्हणजे आपल्याला घर स्वच्छतेसाठी झाडू बनून मदत करणारी केरसुणी हे लगेच लक्षात आले माझ्या...
आसामातील
    बांबू भारतात सर्वदूर पर्यंत आणि परदेशातही निर्यात होतात अशी त्यांची ख्याती आहे....
ठिकठिकाणी बांबूपासून बनवलेल्या सुंदर अशा आकर्षक वस्तू मनाला मोहित करत रहातात...बांबूपासून बनवण्यात येणाऱ्या वस्तूंमूळे आसाम राज्यातील लोकांना  मोठ्या प्रमाणावर कुटिरुद्योगाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत हे मात्र खरे...

🌹🌹

   गोहाटी ते शिलॉंग 
-------------------------
    दुपारच्या जेवणानंतर गोहाटीत पाणी पिल्यानंतर आपण खूप मोठ्या अशा एक महत्वाच्या,म्हणजे 'ब्रह्मपुत्रा' नामक सरितेचं पाणी प्यालो आहोत,ही जाणीव  समाधान देऊन गेली...शहरातून प्रवास करत करत आम्हाला मेघालय ची राजधानी शिलॉंग गाठायचे होते...चार तासांचेच अंतर एका राज्यातून दुसर्‍या राज्यात प्रवेश करण्यासाठी!
    खेळीमेळीत प्रवास चालू असताना आल्हाददायक अशा पर्वतीय पहाडांची प्रवासात साथ चालू झाली,आणि लगेच आपण मेघालयात प्रवेश केलाय याची ग्वाही मिळाली....
वातावरणात होणारा बदल लक्षात येऊ लागला होता...

एव्हाना बांबूच्या झुडूपांची संगत कमी कमी होत होती...पहाडांवर इतरही अनेक प्रकारची हिरवीगार झाडं गुण्यागोविंदाने डोलत होती...
     शिलॉंग,मेघालयाच्या राजधानीचं शहर....
येथे प्रवेश करण्यापूर्वी रस्त्यातच आम्ही कृत्रिम पध्दतीने बनवलेल्या सर्वात मोठ्या अशा "उमिअम"लेक, मध्ये जो डोंगरांच्या कुशीमध्ये विजनिर्मिती साठी बनवला गेलाय...तर या तलावात नजिकच आलेल्या सुर्यास्ताच्या साक्षीनं  शांत वातावरणात मस्तपैकी बोटिंग करत झुळूझुळू पाण्यावर हळूवार तरंगत आनंद घेतला...सोनेरी उन्हाची पाण्यावर शिंपण करत,अस्ताला जाणारा दिनकर डोळ्यात साठवून घेतला...
रात्रीच्या जेवणानंतर  आदल्या रात्री न झालेल्या झोपेने आम्हाला तिच्या अधिन करवून घेतले...

'मेघालय' मेघांचं ढगांचं भांडार असणारा प्रदेश, भारताच्या अती पूर्वेकडील राज्यांपैकी एक....कित्तेक वर्षे या राज्यांमध्ये पर्यटनाला येण्याची हिम्मत कोणी करत नव्हते...भौगोलिक दृष्टिने लहरी, बऱ्याच लांब आणि अधुनिक सुविधांशी फारशी हातमिळवणी न केलेल्या या प्रदेशात यावयास कोणी धजावत नसावे बहूतेक....
   हिमालयिन डोंगरांच्या रांगांमध्ये वसलेला आणि काळ्याशार मेघांचे पांघरुण लपेटून राहाणारा हा प्रदेश...येथील माणसं अतिशय साधी, सोज्वळ सभ्य असावेत असेच जाणवले...
सुपारीच्या उंचच उंच झाडांनी वेढलेला हा प्रदेश भरभरुन नयनसुख देणारा असाच...पाऊसाला केंव्हाही झेलणारा आणि पाऊस पडला की थंडीशीही गट्टी करणारा असा....
प्रवास चालू असताना, मेघालयात, लग्न जुळवण्यासाठी मुलाकडची मंडळी मुलीसाठी सांगून येते, किंबहूणा मुला कडचे मुलीकडच्यांना हुंडा देतात आणि मुलगा मुलीच्या घरी जाऊन घरजावई बनून रहातो...छोटा मोठा व्यवसाय करतो असे समजले...मुलगी मात्र या घरची कर्ती स्त्री  असते...हे ऐकून आश्चर्य वाटलं!

    मनसोक्तपणे आपल्याच नादात वाकडी तिकडी वाढलेली हिरवीगार झाडं वेली, मोठमोठी  वृक्ष आपल्या अंगाखांद्यावर खेळवणारी भुमी, मेघालया च्या रुपानं पृथ्वीतलावर अवतरली आहे असे म्हणता येईल...

    मेघालयाच्या मातीची पायधूळ आपण अनुभवली की, निसर्गाच्या तांत्रिक रुपाची प्रचिती येते...
"माणसानं यशाची कितीही शिखरं काबिज केलेली असो पण त्याने आपले पाय मात्र  आपल्या मातीतच घट्ट रोवून ठेवावेत", अशी एक म्हण आहे मराठीत...
मेघालयातील मोठमोठी पण अस्ताव्यस्त पसरलेली,वनराजी बघून ही म्हण तेथील वृक्षांनी शब्दशः आमलात आणली आहे असे म्हणता येईल...

"लाईव्हरुट्स ब्रिजेस" हा शब्द आपल्या कानावरुनही गेला नाही कधी...पण या राज्यात घनदाट वनराजींमध्ये माणसांसाठी सोय म्हणून की काय, निसर्गातूनच असे वर्षानूवर्षांपासून जीवीत असणाऱ्या झाडांनी,वृक्षांनी आपली मुळं पसरवत,नैसर्गिक पुलांची केलेली बांधणी दिसून येते.....कितीतरी संख्येनं तयार होत, आजही ती जीवीत अवस्थेतच वापरली जातात...
   निसर्गाने मानवाला दिलेला हा अनमोल ठेवा तेथील शासनानेही जसा आहे तसा जपलाय...
काही दुमजली पुल आहेत तर बाकीची एकेरी, पण आपण त्यावरुन चालत जाताना खरोखरच थक्क व्हायला होते...
आमचं दुसर्‍याच दिवशीचं आकर्षण हे होतं आणि तो बघण्याची उत्सुकता ताणलेली होती...

ठरल्या प्रमाणे सकाळच्या उत्साहवर्धक मनानं, निसर्गाच्या कुशीतून फेरफटका मारण्यासाठी आम्ही दाट जंगलामध्ये प्रवेश केला...नैसर्गिक स्वरुपात पाऊलवाटेने तयार झालेल्या ओबडधोबड रस्त्यावरुन खरं म्हणजे माणसालाच हल्ली सवय राहिली नाहीए अशा रस्त्यांची...
पण, पण येथे मात्र, "अरे आम्ही या जंगलाचे राजे,येथे आमचेच राज्य असणार ना?"असा प्रतिप्रश्न करत डौलाने आपल्या पानांची सळसळ वाजवत आमच्यावर दाट सावली धरणारी, मोठी मोठी उंच वाढत गेलेली झाडंच आम्हाला चालताना तोल सावरायला आधार देत होती...
समुहाने आलो होतो याठिकाणी म्हणून बरे झाले, पण एकट्या दुकट्याला हिंमत नसती झाली ईकडे येण्याची!असे वाटून गेले क्षणभर!
आणि चालत असतानाच जाणवले, अरे खाली खोल ओढा असावा...थोड्याफार साठलेल्या पाण्याच्या खूणा दिसल्या तेथे... पावसाळ्यात पाण्याच्या माऱ्याने निरनिराळे आकार धारण करत, पहुडलेल्या काळ्या कुळकुळीत दगडांमधून कसरत करत उतरायचे होते आम्हाला...हा विचार मनात घोळत असतानाच आम्ही दोन्ही बाजूंनी झुकत परस्परांत मिसळून घनदाट सावली धरणाऱ्या एका पुलावरतून चालत आहोत आपण आणि हाच तोच झाडांनी (निसर्गाने) माणसाच्या सोयीसाठी बांधलेला पूल आहे हे लक्षात आले...
 या निसर्गासमोर अक्षरशः नतमस्तक व्हायला झाले...

    निसर्गाची ही किमया डोळ्यात साठवून ठेवताना मोबाईल मध्ये साठवण्याचा मोह अजिबात आवरता आला नाही...
      निसर्गाशी अतिशय जवळीक साधणाऱ्या या राज्यात, मेघालयात "मॉलिंनॉंग" नावाच्या एका छोट्याशा खेड्याला भेट दिली आम्ही.....
या मॉलिंनॉंग चे महत्व यासाठी की, हे एशियातील सर्वांत जास्त स्वच्छता राखलेले खेडे म्हणून प्रसिद्धीस आलेले आहे...आणि ते तसेच होतेही...निसर्गाच्या याच सान्निध्यात घरगुती पध्दतीने बनवलेले दुपारचे जेवण घेऊन आमची रसना तृप्त झाली...
       तेथेच थोडी भटकंती करत शतपावली साधली...

 या नंतर मग "डावकी"नावाचे दुसरे एक खेडे आम्ही गाठले...तेथे "ऊमन्गॉट", नावाची अतिस्वच्छ,नितळ पाणी घेऊन वाहणारी आणि आपला  सुंदर तळ स्पष्टपणे दाखवणारी नदी वाहते....तेथे पोहोंचलो...तेथे 
 बोटींग करण्याची आमची हौस पुरी करणार होतो आम्ही!
     बोटीत बसून रपेट करताना नदीच्या तळाचे सौंदर्य उलगडत गेले...गार पाण्याला स्पर्श करत ते ओंजळीत भरून क्षितीजाआड लवकरच जाईल हा ...असे वाटणार्‍या सुर्यनारायणाला नकळतपणे अर्घ्यच दिले म्हणा ना!!
  
      आजच्या दिवसाची सहल एव्हाना शेवटच्या टप्प्यात आली होती....पण उत्सुकता होती ती भारत - बांगलादेश सीमा, त्यावर भारताकडून बांधण्यात आलेले तारेचे काटेरी कुंपण आणि मोठ्ठे गेट बघण्याची....
    अस्ताच्या समीप जाणारा सुर्य, लांबच लांब निर्मनुष्य रस्ता, दोन्ही बाजूंनी रिकामी सोडलेली विस्तीर्ण जागा आणि 'ते' प्रचंड मोठे गेट बघितले आणि आपल्या भारत मातेची सेवा करण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे (जवानांचे)
मनःपुर्वक आभार मानले....त्यांना "जयहिंद"म्हणत ही सीमा रेषा डोळ्यात भरभरून साठवून घेतली...
     वडिलोपार्जित घराचे दोन सख्ख्या भावांत होणारे पार्टिशन (वाटणी)असावी अशीच ती सीमारेषा होती....लांबच लांब नजरेच्या टप्प्यात न मावणारी....
उदासवाणी...पण भारतीयांचा देशाप्रती स्वाभिमान जागवणारी....
तिला पुनःश्च एकदा नमन करत आम्ही आमच्या मुक्कामी, शिलॉंग येथे परतावयास सुरुवात केली....

भाग पहिला. 👆

क्रमशः

🌹🌹🌹🌹🌹

शुक्रवार, ११ मार्च, २०२२

माझी आई...

सुसंस्कारांची रुजवणूक करत , आम्हा भावंडांचे जिनं संगोपन केलं....
शिक्षणाशिवाय पुर्णत्व नाही असा ध्यास जिनं ठेवला...
अंथरुण बघून पसरावेत पाय ही शिकवण जिनं दिली...
यशोशिखरावर असतानाही पाऊलाने मात्र मातीशी ईमान ठेवावे असे आवर्जुन जिनं मनावर ठसवलं.... 
समाधानाचा लगाम आपल्याच हाती ठेवावा हे सुचित जिनं केलं... संकटसमयी धिर एकवटून सिध्द होत त्याच्याशी दोन हात करत यशस्वी सामना करावा असं  जिनंसांगितलं. ...
माणूसकीची ज्योत कायम मनात तेवत ठेवावी...... अन्
सुख दुःखात सारखीच साथ देत सोबत सार्यांची करावी असे बाळकडू जिनं पाजवलं.... 
नात्यांमधील गोडवा अविरत जपावा हे जिनं शिकवलं....
मैत्रीला कायम आपलंसं करावं हे जिनं अनुभवातून दाखवलं....
आयुष्याची दिशा ठरवण्यात मोलाचे सहकार्य जिनं आम्हाला केलं....
अशा माझ्या प्रेमळ, निगर्वी सोज्वळ माऊलीचा, स्वर्गीय 
सौ. दुर्गा प्रभाकर उमरीकर हिचा आज सातवा स्मृतिदिन....
तिच्या प्रतिमेला नमन करते आणि 
तिला,तिच्या पवित्र स्मृतिंना, विनम्र विनम्र अभिवादन घालते...

मार्च, 11,2022.

नंदिनी...

 🙏🌹🙏🌹

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

गानसम्राज्ञीला विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏

स्वरसूर सम्राज्ञी, गानकोकिळा, गानसरस्वती, भारतरत्न,
भारतमातेच्या पोटी जन्म घेतलेले एक अनमोल रत्न,भारतीयांचा आत्मा, संगीत क्षेत्रातील ध्रुव तारा अशी किती किती म्हणून उपाधी द्यावित असे एक स्वतःच्या अथक परिश्रमातून स्वतःला घडवलेल्या हे सुवर्ण झळाळी असणारे अनोखे व्यक्तिमत्व, आज शरीर रुपाने लूप्त झाले...त्या ईश्वराच्या दरबारात सुरांचा दरबार भरवण्यासाठी आज लता दिदी जात्या झाल्या असेच म्हणावे लागेल...
    भावनांच्या वैविध्याने ओतप्रोत स्वरांनी, भारतीय मनामनांवर किंबहूणा संपूर्ण जगावर आपल्या स्वरांचे अधिराज्य गाजवणारा हा आवाज ज्याची तुलना भारताचे नंदनवन कश्मीरशी केली जाते असा हा अलौकिक गोडवा असणारा स्वर आज हरवला....खरंच मन सैरभैर झालं काही क्षण... काहीच सुचलं नाही...हे वास्तव स्विकारावयास मन अजिबात धजावत नाहीए...दिदींच्या बाबतीत हे असे कधीतरी घडणार असं कधीच वाटत नव्हतंच...त्या कायम अमरच रहाणार स्वररुपाने आणि शरीररुपानेही हे सतत असंच वाटायचं...आणि आज अचानक ही बातमी येऊन ह्रदयाला विदीर्ण करत गेली...
    स्वरांच्या राज्यात अढळ स्थान असणारा हा चिरंतन आवाज या पृथ्वीतलावर तिच्या अस्तित्वा पर्यंत असणार आहे...
पण लतादिदी,अख्ख्या भारतीयांच्या लतादिदी आज नाही राहिल्या हे मान्य करावयास मन तयार होत नाहीए...
   पण आपले दुर्दैव आणि आज ही बातमी ऐकावी लागली...
     लता दिदींना जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रध्दांजली...

-नंदिनी म.देशपांडे.

🙏🌹🙏🌹🙏

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

प्रेमळ प्रेमलताई.

*प्रेमळ प्रेमल*   
      *ताई*
**************

   प्रेमल ताईची ही प्रतिमा बघितली आणि, तिच्या मला आठवतात तशा म्हणजे, ती बहूतेक चाळीशीत असावी, तेंव्हापासून च्या प्रतिमा, डोळ्यासमोर येत राहिल्या....
    गोरी गोरीपान, पातळ जीवणी,गोल चेहरा, नाजूक बांधा असणाऱ्या प्रेमल ताईचं पहिलं आपत्य,जयाताई आज सत्तरीत आहे!
परभणीला दरवर्षीच दोन तीन वेळेला तरी तिची चक्कर असायचीच.... निळकंठराव भावजींसोबत...
    तिचं माहेर आणि आजोळ दोन्ही परभणीतच, त्यामूळे माहेरी आली की आजोळी एकदोन दिवस मुक्काम असायचा तिचा...
बाप्पांची नात, त्यांच्याच सारखी कांती आणि रुपातलं साम्य!
     तिच्या आईला,अंबुताईला आपण कोणीच बघू शकलो नाही पण, वडिल दिगंबरराव लोहगांवकर मामा आपण सर्वांनीच बघितलेले...बाप्पांचे सर्वांत जेष्ठ जावई...तेही अतिशय देखणे आणि तजेलदार कांतीचे होते...
    प्रेमल ताई,मी बघते तशी नऊवारी पातळातच दिसली नेहमीच....नेसतेही छान ती;आणि कोणताही रंग तिला शोभूनच दिसतो....  त्यामुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुलायचं...आजही ती वयाच्या 87+मध्येही स्वतःच्या हाताने नऊवारच नेसते आणि सुंदर दिसते!

     प्रेमल ताई  खरं म्हणजे बाप्पांची  नात...अंबुताई नावाच्या सर्वांत जेष्ठ मुलीची मुलगी!ही अंबुताई बाप्पा आणि त्यांची पहिली सहचारीणी कृष्णाबाई हिची मुलगी....
या नंतर कृष्णाबाई लवकरच जात राहिल्या म्हणून त्या काळच्या समाज रुढी नुसार बाप्पांचं दुसरं लग्न,आहिल्या म्हणजे मोठीआईशी झालं....पहिली कृष्णाबाई म्हणून मोठीआई उमरीकरांच्या घरी प्रवेशताच आहिल्येची 'कृष्णाबाई' झाली...
आणि लोहगांवकर मामी ज्यांना आपण सारे ओळखतो ती आपली आत्याच म्हणजे, प्रेमल ताई ला जन्म दिलेल्या आत्या च्या जागेवर नव्याने लग्न होऊन आलेली आत्या...मामींचे खरे नाव मला आजही माहित नाही पण आपली मुलगी अंबुताईच्या जागेवरची ती आपलीच अंबुताई, या नात्यानं मोठी आई बाप्पा तिला 'अंबु' बोलवायचे...
तिनेही कधीच ती त्यांना दोघांना किंबहूणा आपल्या सर्वांनाच,म्हणजे आम्हाला आत्याचे आणि बहिणीच्या मुलींना भाच्यांचे प्रेम दिले...आई,बाबा आणि आम्हालाही त्यांचा फार लळा होता...
    प्रेमल ताई आपली सर्वांत मोठी कझिन....म्हणजे जयाताई आणि तिचे भावंडं आमची भाच्चे मंडळी!पण भाच्यां पेक्षा मावशा मामा कितीतरी लहान म्हणून तिला ताईच म्हणतो आम्ही! 
   प्रेमल ताईने जयाताई मार्फत सांगितलेल्या दोन गम्मतशीर आठवणी....
     सिंधू आणि शरयू
आत्या त्यांच्या बरोबर प्रेमल ताई यांना बाप्पांनी शाळेत घातलं होतं आणि या तीघीही पडदा लावलेल्या रिक्षात बसून शाळेत जात असत....

   दुसरी आठवण म्हणजे, (गोदावरी) आत्यांचं लग्न झालेलं होतं....
त्यानंतर सिंधू आत्या,शरयू आत्या आणि त्यांची ही भाच्ची प्रेमल जवळजवळ एकाच वयोगटातल्या,तिघीही लग्नाळू वयाच्या अर्थात त्या काळातल्या...म्हणजे 72 ते 75 वर्षांपूर्विचा काळ तो! या तीघी साधारण नऊ ते बारा या वयोगटातील असाव्यात त्या वेळी...
 तर ,सिंधू आत्याला बघण्यासाठी स्थळ आलं की बाप्पा या तीघींनाही तयार व्हावयास सांगत,आणि तिघींनाही बघण्याचा कार्यक्रम व्हायचा....जिला पसंती आली तिचे हात पिवळे करायचे हा हेतू ठेवून!

     प्रेमल ताईचे मामा म्हणजे आमचे बाबा....तिच्या लग्नात बाबा पाचसहा महिन्यांचे होते...नवर्या मुलीला बोहोल्यावर चढताना नवरीचा मामा तिच्या मागे ऊभा लागतो....अशी आपल्याकडची पध्दत असते...
तिच्या मागे मामा म्हणून बाबा ऊभे होते पण बाप्पांच्या कडेवर!
     आहे की नाही सारेच गमतीशीर...आज आपल्याला वाचून आश्चर्य वाटतं पण या पिढीने हे सारं अनुभवलंयं....या पिढीच्या प्रेमलताई , नलू आत्या आणि त्या खालोखाल कुंदा आत्या ही मंडळी सहज बोलण्यातून या गमती आजही सांगत असतात...त्यातून आपल्याला त्या काळच्या सामाजिक चालीरीती लक्षात येतात...काळ केवढा बदललाय याची प्रचिती येते...
     अशी कितीतरी पावसाळे बघितलेल्या या व्यक्ती म्हणजे अनुभवांचं शहाणपण आणि आठवणींचं भांडार घेऊन आपल्या सहवासात आज आहेत याचं खरोखर अप्रुप आणि भाग्य वाटायला हवं ना आपल्याला!त्यांच्या अनुभवांची शादोरी खूप काही शिकवून जाते आपल्याला...
    आज प्रेमलताई मुलं,नातवंड,पतवंड अशा भरगच्च गोकुळात वास्तव्यास असते, आणि गम्मत म्हणजे तिची पतवंडही लवकरच लग्नाळू वयाचे होतील...
खापरपणती जावाई आणि तिचे मुलही बघेल ही निश्चित....
असेच घडो आणि तिने शतायुषाचा उंबरठा पार करो हिच मनोमन ईच्छा येथे व्यक्त करते आणि माझी लेखणी थांबवते आता...
   
©️ 
*नंदिनी म.देशपांडे*.
दि.3-1-2022.
🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, १ जानेवारी, २०२२

🌹नव्याचे स्वागत🌹

🌹नव्याचे स्वागत 🌹

     कित्ती पटकन संपल्यासारखे वाटले नाही हे 2021वर्ष! या विश्वावरच्या मानवजातीचे आयुष्य ढवळून टाकणारे वर्ष. असेच याचे सिंहावलोकन केल्यास  म्हणता येईल...सर्व म्हणजे अगदी सर्वच पातळ्यांवर या वर्षाने आपला चांगला-वाईट, मनाला विषण्णता आणण्यात ठसा उमटविला....त्यात वयाचे बंधन नव्हते की, गरीब-श्रीमंतीचे...कोणत्याही देशाच्या सीमांची बंधनं नव्हती की कोणत्याही जाती धर्माची....एक विषाणू आला....त्याने आपले परिणाम दाखवण्यास सुरुवात केली...हळू हळू पाय पसरत प्रसार गती वाढवली, नंतर वेगवेगळी रुपं धारण करत मानवाच्या जीवाशी खेळला...अगदी खेळण्यांसारखा...आधाशासारखी माणसं त्यानं अक्षरशः गिळली.... त्याने कित्तेक घरं दुःखात ढकलली, कित्तेक पोरकी केली आणि कित्तेकांच्या तोंडचा घासही काढून घेतला...
    एखादं तुफान यावं आणि त्यात वाताहात होऊन होत्याचं नव्हतं व्हावं ह्याचा अनुभव माणसानं याच वर्षात अनुभवला...
     मुलांचं बाल्य सुकवलं, त्यांच्या शिक्षणात असंख्य अडथळे निर्माण केले..."घरातच रहा" ही शिकवण यानंच दिली...चार भिंतींचे महत्व आणि डोक्यावर छप्पर असणं किती गरजेचं आहे याची प्रचिती आली...
     कोरोनाच्या या थैमानानं माणसाला पैसा हेच सर्वस्व नाही...आणि तो कितीही मोठ्या प्रमाणात असेल जवळ,  तरीही त्याने सर्वच गोष्टी मिळत नाहीत याची जाणीव झाली....
या आणि आणखी कितीतरी गोष्टी माणसाच्या जीवनावर परिणाम करवून गेल्या त्या याच वर्षात...
    अशा साऱ्या नकारात्मक गोष्टींप्रमाणेच काही चांगल्या सकारात्मक बाबींचीही महती पटली आपल्याला ती म्हणजे,आरोग्याची काळजी घेणं...माणसामाणसांतील माणुसकी जपणं, "एकमेका सहाय्य करु..." ही उक्ती प्रत्यक्षात उतरवणं....नात्यांचे महत्व जाणत त्यांची वीण घट्ट करणं एवढचं नव्हे तर एकत्रीत रहाण्याने मनाला मिळालेली उभारी टिकवून ठेवणं...
    नाण्याच्या चांगल्या वाईट दोन्ही बाजूंचा फार जवळून अनुभव घेत,संपूर्ण मानव जात यात तावून सुलाखून निघाली ती याच वर्षात, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही निश्चित....

     पण तरीही नव्याची ओढ, नव्याची उत्सुकता आणि नव्यातील नाविण्य हे ही लुभावते, खुणावतेच की माणसाला...
निसर्गानेच शिकवलेला हा उपदेश माणूस कधीही विसरला नाही, विसरणारही नाहीच...नदी जशी आपल्या मार्गाने, एका दिशेने पुढे पुढे वाहत जाते...वाहता वाहता निसर्गातील इतर घटकांचा होणारा परिणाम स्विकारत स्विकारत अविरतपणे, तसेच काळाचेही आहेच...तो कोणासाठी थांबणार नाही...पुढे सरकताना आपल्यालाही पुढे ढकलत नेतच असतो.... तो कसा व्यतित करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न, ज्याची त्याची पध्दत....पण सरत्या वर्षात मिळालेल्या अनुभवांच्या शहाणपणाचं गाठोडं मात्र आपण कायम जवळ बाळगावं...न जाणो त्यातील कोणता केंव्हा उपयोगी पडेल...
   
     उद्या उगवणारे सुर्यनारायण या अवनीवरील प्रत्येक घटकासाठी नक्कीच सुखी, संपन्न, आरोग्यपूर्ण आयुष्याचा आणि शांततेचा मार्ग आखत आखत अवतरतील अशी आशा व्यक्त करु या सारे जण... आणि एवढ्याशा विषाणूची पाळंमुळं खणून काढत फेकून देण्यात आपण सारेच जण जरुर यशस्वी होऊ या...
     आज संपणाऱ्या 2021 या वर्षाला हसत निरोप देऊन, 
2022 या वर्षात प्रवेशताना 'हम होंगे कामयाब' असा नारा देऊ या...

आपल्या सर्वांना, नवीन वर्षात प्रवेशासाठी मनभरुन शुभेच्छा आणि नववर्षाभिनंदन. 🌹

©️ 
नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹