शुक्रवार, २९ मे, २०२०

निसर्ग काव्य....स्वर्ग

हिरवा,निळा पोपटी निसर्ग
मनास लुभावतो मस्त
वाटे जणू हा अवनी वर
अवतरलेला स्वर्ग स्पष्ट
आकाशीच्या देवतांना
पडलायं वसुंधरेचा मोह
स्वर्गातून उतरण्या तिवर 
 ह्या पायऱ्याच तर होय
पहिली ही शुभ्र धवल
बर्फीली थंडगार छान
दुसरी भासे ती हिरव्या
मखमलीची मृदू शाल
तिसरी पायरी वृक्षरुपी
डोलती हासत स्वागता साठी
चौथी असे ही मुलायम
सुंदर पोपटी रंगाची
त्या खाली ही घरं ईवलीली
माणूस रुपी दुतांची
स्वागत करण्या त्या ईशाचे
फुलांसवे हासत येती
हे ईश्वरा सदैव राहो
कृपा ही अशीच आम्हावरती
शब्द न सापडे व्यक्त होण्या
तुझ्या या अतीव ऋणासाठी
तुझ्या असणाऱ्या
या आशिर्वादासाठी
आम्हा वरच्या या 
सुंदर सुरेख प्रेमासाठी

© *नंदिनी*

🎄🎄🎄🎄🎄🎄

बुधवार, २७ मे, २०२०

चोचले जिभेचे...चणे....

*चोचले जीभेचे*
_______________
*चणे*
   © नंदिनी म.देशपांडे.

    लहानपणापासून परभणी -औरंगाबाद- 
परभणी असा रेल्वेचा भरपूर प्रवास घडला...म्हणजे सारे नातेवाईक याच दोन ठिकाणी एकवटलेले मग काय, निमित्ताने तो अगदी वर्षभरात चार पाचदा तरी व्हायचा....किंवा औरंगाबादहून परभणीला तरी दर एक दोन महिन्यात कोणीतरी यायचंचं...
फार आतुरतेनं वाट बघायचो आम्ही मुलं अशा येणारांची....मुलंच काय पण मोठी माणसंही वाटेकडे डोळे लावून असायची....
का?अहो का म्हणून काय वाचारता,रस्त्यात लागणाऱ्या 'सेलू' गावच्या रेल्वेस्टेशनवर मिळणाऱ्या खमंग चण्यांसाठी....

    ओल्या (भिजत घातलेल्या)साध्या हरभऱ्यांच्या उसळीलाच "चणे"असे संबोधन आहे हे त्यामूळे उमगलं खरं तर....
पण सेलूच्या स्टेशनवर मिळणारे चणे खरोखरच चवीला एक नंबर होते....मला वाटतं या बाबतीत एकखांबी तंबू होता त्या विक्रेत्याचा, त्याच्या हातच्या चवीला नंतरची कित्येक वर्ष अजिबात पर्याय नव्हता....केवळ रेल्वेस्टेशनवरच,शिवाय जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वेच्या वेळातच ते उपलब्ध असायचे....
बरं हा माणूस एका लोखंडी स्टॅंडवर आपलं चण्याचं घमेलं ठेऊन एकाच जागेवर उभा असायचा! त्याची जागाही ठरलेलीच!
   
    स्टेशन आता येणार आहे म्हटलं की,अगोदरच लवकर उतरण्यासाठी प्रवासी गाडीच्या दरवाज्याजवळ येऊन थांबायचे....आले स्टेशन की,भरभरा खाली उतरत त्याच्या दिशेनं पळायचे...या चणे वाल्याच्या भोवती अश्शी गर्दी जमायची ना! पण हा पठ्ठ्या एकटाच पेपरच्या अगोदरच करुन ठेवलेल्या तुकड्यावर गरमागरम खमंग चणे,त्यावर कच्चा भुरभुरलेला कांदा,चतकोर लिंबाची फोड,कैरीच्या दिवसात एखादी कैरीची फोड आणि झणझणीत फ्राय मिरची!अहाहा!झणझणीत होतं सारंच प्रिपरेशन म्हणूनच तोंडाला पाणी सुटायचं,सेलूच्या चण्यांचं नाव काढलं तरी....
    
   ईकडे गाडीत दात घासून बसलेली मंडळी आपलं माणूस चणे घेऊन कधी येतयं याची वाट, खिडकीतून सारखं डोकावत बघत बसायचे....
     
   पण खरंच, या सेलूच्या चण्यांना अख्ख्या पंचक्रोशीत तोडच नव्हती....त्याची चव,त्याची क्वालिटी जी होती ती सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत अगदी एकच.... म्हणूनच हवीहवीशी!
    
     त्यानंतर कांही वर्षांनी आम्हीही वास्तव्यास होतो तेथे पण माणूस पाठवून मुद्दाम चणे मागवून घेत असू स्टेशनवरचे!
   
एरवी रेल्वेस्टेशन,बसस्टॅंड वरचं काहीही खाण्यास मज्जाव करणारी मी,याला मात्र अपवाद ठरायची....माझंच मला आश्र्चर्य वाटतं कधीकधी...असो...
    
    पण कालांतराने हा सेलूच्या चण्यांचा कारभार इतर कोणाच्या तरी हाती गेला आणि सारंच बदलून गेलं असं समजलं....ईतरही चणेवाले सेलू स्टेशन आलं की गाडीत येऊ लागले आणि मग मात्र  चण्यांना बाजारात बसल्यासारखं वाटलं असणार नक्कीच...
मुखातून "चणे घ्या चणे", असं नावही न कढता,प्रचंड मागणी व खप असणारे चवदार चणे मग आपली पत सांभाळू शकले नाहीत असे जाणवले....
    
    हल्ली,सेलूच्या स्टेशनवर चणे मिळतात किंवा नाही याची माहिती नाही, पण एके काळी सेलू शहर,त्यातही स्टेशनच केवळ तेथील खमंग चण्यामूळे ओळखले जायचे....

    ‌‌तीच चव आजही जीभेवर रेंगाळते आहे...कधी चणे खाण्याची हुक्की आली म्हणजे मी पण आवर्जुन बनवतेच....आणि सेलूच्या चण्यांशी,त्याच्या चवीशी आंतर्बाह्य साधर्म्य दाखवणारे चणे मला बनवणं जमतंय....हे सांगताना मला खूप आनंद वाटतोय....
   अबालवृध्दांना आवडणारी ही डिश खरंच तोंडाला फार चव आणते! 😋😋

🌹🌹🌹🌹🌹🌹

रुसवा.

रुसवा हा सोड सखे
    नको असा दुरावा
लटका तुझा राग प्रिये
    प्रेमाचा लाडिक बहाणा
 बहाणा हा मला आता 
    होतो जीवघेणा 
नको अंत पाहूस सखे
    सोड हा अबोला
प्रित तुझी माझी ही
    जन्मोजन्मीचा ठेवा
हृदयांतरीचा आपल्या
    हा अव्दैत विरंगुळा
 सोड आता सखे गं
    रुसवा हा लटका
साद घाल प्रितीला त्या
   पुनःश्च अवतरण्या
घाल साद त्या प्रितिला
पुनःश्च बहरण्या....

© *नंदिनी*

💝💝💝💝💝

मंगळवार, २६ मे, २०२०

आत्या

*आत्या* ♦️
   
©️ नंदिनी म. देशपांडे.

    हो,आत्याच!
   प्रत्येक माहेरवाशिण,ही अपल्या माहेरघरी लक्ष्मीरुपानं आलेली लेक असते....
 आणि त्या घरच्या पुढच्या पिढीच्या बालगोपाळांची ती आत्या होते....
    आत्यासाठी
आपली भाच्चे कंपनी हे तिच्या माहेरचं वैभव असतं...एक वेळ तिच्या स्वतःच्या मुलांनी केलेली मस्करी आत्याला जिव्हारी लागेल, पण भाच्यांनी केलेली गम्मत ती हासण्यावरी नेते...कारण आपल्या भाच्च्यां मध्ये ती आपलं बालपण शोधत असते...आपल्याच प्रतिबिंबाचं परावर्तन न्याहळताना दिसते...
माहेरचं घर म्हणजे तिला तिच्या पायाखालचं अंगवळणी पडलेलं....तेथील बारीक बारीक गोष्टींशी तिच्या बालपणीच्या आठवणी गुंफलेल्या असतात....त्या आठवणी भाच्च्यांना उलगडवून सांगण्यात तिला आनंद मिळतो...म्हणूनच केवळ माहेरच्या माणसांशीच नव्हे तर त्या घरातल्या इतरही गोष्टींमध्ये तिचा जीव गुंतलेला असतो....सासरी गेली आत्या,तरीही आपलं अर्ध लक्ष माहेरी ठेवून जाते.... निघताना तीन तीन वेळेला काळजी घ्यायला सांगते....

    अशा या आत्या भाच्च्याच्या नात्यात अपार गोडवा भारुन राहिलेला असतो....
आत्याला जेवढा भाच्च्यांचा लोभ येतो, तसाच भाच्चे मंडळींना आपली आत्या म्हणजे एक हक्काचं ठिकाण असतं...एखाद्या गोष्टीची आई-बाबांकडून परवानगी हवी असेल तर आत्याचा 'लग्गा'लावला म्हणजे ती हमखास पदरात पाडून घेता येते हे गणित त्यांना उमगलेलं असतं....हव्या असणाऱ्या गोष्टीं साठी आत्याचं माध्यम म्हणून कसा उपयोग करायचा हे वकुबीनं जाणणारी मंडळी, म्हणजे भाच्चे मंडळी....कितीही मोठी झाली ती, तरीही आत्या भाच्च्या मध्ये मनोमन नातं स्थिरावतं ते प्रमुख्यानं मैत्रीचंच...एक निर्मळ निरागस....
आत्यानं समज दिल्याचा राग भाच्च्यांना येत नाही कधी,जेवढा ईतरांनी रागावल्यास येतो....
भाच्च्यांसाठी आत्या म्हणजे "त्यांचं" असं एक खास ठिकाण असतं...
    कुणा विषयी तक्रार असो वा सुचना देणं असो,आत्याला सांगितलं की त्यावर मार्ग निघतो नक्कीच ही भाच्च्यांची धारणा आत्याही पुर्णत्वाला नेते...
तर हे आत्या भाच्च्यांचं नातं,प्रेमाचं,मैत्रीचं,अंतःकरणाचं,
हक्काचं,आपलेपणाचं असं मोठं सरमिसळीचं पण मोठं गोड असतं...

   मलाही पाच आत्या होत्या...
त्यांपैकीच एक आमची मोठी आत्या....गोदावरी नाव होतं तिचं...पण लहान भावंडं आक्का म्हणायचे... त्यानंतरही ती "आक्काच" राहिली....कुणाची आक्का आत्या,कुणाची आक्कामावशी!
    ही आमची आक्का आत्या उंचीला कमीच पण गोरी गोरी पान,केशरी नितळ चमकदार कांतीची,नाकी डोळी निटस, ठसठशीत होती....
त्या वेळच्या प्रथेप्रमाणं दहाव्या,अकराव्या वर्षीच लग्न झालं होतं तिचं...आजही तिचा तेंव्हाचा फोटो बघितला की वाटतं,लग्न म्हणजे काय?याचा बोध तरी असेल का तिला त्या वयात?
बालपण सरलंही नाही की सासरी रवानगी झालेली....तिच्या पेक्षा बारा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या नवरदेवा बरोबर....

   असेल सासर माणसांनी भरलेलं, गर्भश्रीमंत,जमिनदार घराणं....असेल तिला सोन्यानं मढवून टाकलेलं,एक सुन म्हणून,पण त्या साठी किती तडजोडी स्विकारल्या तिनं....
बालपणातलं हक्काचं ठिकाण माहेर दुरावलं,सहाजिकच बालसुलभ वयात आईवडिलांच्या प्रेमाला पारखी झाली...काय शिकली होती माहित नाही,माझ्या माहितीप्रमाणे शाळेत कधी गेलेलीच नव्हती ती...पण आजोबांनी तिला संस्कृत,मराठी,लिहिता वाचता यावं म्हणून घरी येऊन शिकवणाऱ्या एका शिक्षकाची नेमणूक केली होती... त्यामूळे सुंदर हस्ताक्षराची आणि सहज वाचनाची आक्का आत्याची सवय आम्हा सर्वांच्या परिचयाची होती... तिची स्वहस्तक्षरातली बरीच पत्र मी‌पण वाचली होती....
  
  खूप हुशार होती आत्या,हे आम्हाला तिच्या सहवासानं दाखवलं....लिहिता वाचता येण्या ईतपत शिक्षण झालेलं....पण वाचनाची प्रचंड आवड असणारी....आणि वाचनातून आत्मसात केलेलं ज्ञानाचं तेज चेहऱ्यावर प्रतिबिंबीत झालेलं...

     तिला आपले वडिल आणि त्यानंतर भाऊही वकिल असल्याचा फार अभिमान होता.....

   खरं म्हणजे संधी मिळाली असती तर,एक विचारवंत विदूषी अशी तिची ओळख निर्माण झाली असती....पण,इ.स.१९२५ सालचा तिचा जन्म! माहेर शहरातलं,परभणी हे गाव होतं पण सासर मात्र खेडे गाव लातूर जवळ निलंगा तालुक्यातील निटूर....त्या काळच्या सामाजिक रुढी परंपररांना महत्वाचं मानणारं...घरातलं बाळबोध पारंपारिक वातावरण त्यातही एकत्र कुटुंब पध्दती...कर्मठ विचारांची घरची माणसं...मग काय,शिक्षणाचा बट्याबोळच होणारच....शिकायचे आहे मला हे मतही मांडणं दुरापास्तच....
पण तरीही तिची वाचनाची आवड तिनं कायमच ठेवली...एकत्र कुटुंब पद्धती असल्यानं जबाबदारी अशी फारशी नव्हती...दिमतीला गडी माणसं होतीच... वाचनासाठी भरपूर वेळ असायचा... धार्मिक ग्रंथ,गीता,ज्ञानेश्वरी यांचं नित्यपठण करत असायची आत्या.... मुलांनाही शिकवायची...
वर्षातून एकदा दरवर्षी माहेरी परभणीला येत असायची...अंगावर नेहमी वापरण्याचे दागिने एवढे की उंची कमी असल्याने जमिनीवर बसलेली असताना ते जमिनीला टेकायचे! असे आमचे बाबा सांगतात....माहेरी आली की तीन चार महिने आरामात रहायची....बालसुलभ वयात लहानपणीच माहेर घरापासून दूर गेलेली आत्या, अशा प्रकारे मग माहेरी राहून आपली माहेरपणाची हौस भागवून घ्यायची...
त्या मानाने माहेरी  वातावरण आणि जीवनशैलीही आधुनिक पध्दतीची होती...शिवाय मोठी अक्का सर्वांची लाडकी...भावंडांना हवीहवीशी...

   गोदू आत्या स्वभावानं फार प्रेमळ...लहानांना लाड करुन घेण्याचं एक आवडतं ठिकाण!जेवढी प्रेमळ तेवढीच स्पष्टवक्तीही....जे तिच्या मनाला पटायचं नाही ते तिनं स्पष्ट बोलून दाखवावं... शिवाय एखाद्याची झालेली चूक त्याला त्याच्या समोर दाखवून,बोलून सोडायची..... एवढेच नव्हे तर त्याची कान उघाडणी केल्याशिवाय चैन पडायची नाही तिला...
   आत्या माहेरी येताना सोबत दळलेला ओल्या लाल मिरचांचा ठेसा आणि सपिटाचे शुभ्र लाडू आणत असे...आम्हाला फार आवडायचे ते!श्रीखंडाची वडी बनवण्यातही हातखंडा होता तिचा...
    तिची मुलं फार खोडकर होती आणि त्यांच्या मागेपुढे धावण्यात तिला आपलं माहेरपण नीटसं उपभोगता येत नाही असं आमच्या आजोबांना वाटे... त्यामूळे,"गोदे तू येथे येताना पोरांना तिकडेच ठेवून येत जा बरं" असं आजोबा गमतीनं म्हणायचे ही आठवण बाबा सांगतात...

     आमचे बाबा  तिच्यापेक्षा वीस वर्षांनी लहान त्यामूळे माझ्या आई वडिलांना ती आईच्याच ठिकाणी होती....
पण तरीही ती मैत्रीण बनून रहात असे...
अगदी आम्हा भाच्चे कंपनीचीही....
आम्हालाही तिचा सहवास आवडत असे...तिच्या गमतीशीर,प्रेमळ बोलण्याची लकब आम्हा साऱ्यांनाच फार आवडयची...त्यात विलक्षण आपलेपणा,लावकेपणा होता...
   आक्का आत्या जशी मोठी होत गेली तशी तिचं मुळचंच देखणं रुप आणखी सौंदर्यानं खुलत गेलं...वाचनानं तिच्या वृत्ती आणि विचार प्रगल्भ बनत गेले असावेत असे वाटते...
जुन्या काळातली पारंपरिक रुढी परंपरांच्या दबावाखाली असूनही तिचे विचार आधुनिक होते....
फारशी देवभोळी नसणारी, किंबहूना कधीही देवांची पुजा बिजा न करणारी पण श्रध्दा बळगणारी होती...जात,धर्म,पंथ यांना फारसे महत्व न देता माणसातील चांगुलपणा जाणणारी,माणुसकीला प्राधान्यक्रम देणारी होती.... त्यामूळे ती खूप जुन्या काळातली आहे असे तिनं तिच्या वागण्या बोलण्यातून आम्हाला जाणवू दिलंच नाही कधी.... पण विचारांना शेवटपर्यंच आधुनिक पणाची चौकट होती आत्याच्या....  
  लहानपणापासून सुखातच राहिलेली दोन्हीही घरी, त्यामूळे असेल कदाचित पण स्वतःची आबाळ तिनं कधीही होऊ दिली नाही...करवून घेतली नाही...
   
   आपल्या मुलांचा आणि भाच्चे मंडळींचा उत्कर्ष होताना तिने बघितला होता...सगळ्या भाच्चेमंडळींकडे जाऊन दोन दिवस राहून तिनं प्रत्येकाचा संसार बघितला....समाधानानं मन भरुन कौतूक केलं तिनं...मला आठवतं,माझ्याकडे दोन दिवस रहाण्यासाठी मी घेऊन आले असता,माझ्या संग्रही गृहशोभिका मासिकाचे वर्षभराचे अंक होते त्यावेळी...ते सर्वच्या सर्व अंक तिनं एका दिवसात वाचून काढले होते...अगदी वयाच्या सत्तरी नंतरही...मला त्यावेळी फार कौतूक आणि अभिमान वाटला होता तिचा...
तिचा विनोदी स्वभाव फारच भाऊन जायचा सगळ्यांना....
अशी ही आमची आक्का आत्या,स्वाभिमानानेच जगली अखेर पर्यंत...
वय झाल्यानंतर ८१वर्षे पर्यंत जीवनानंद घेऊन,२३ मे २००६ रोजी परलोकात गेली...पण आजही तिच्या आठवणींनी मन हळवं होतं...त्या आठवणींचा ताजेपणा आजही तेवढाच ताजा वाटतो...

    आज २३ मे...आमच्या आक्का आत्याचा १४ वा स्मृतिदिन.... तिच्या आठवणींना उजाळा द्यावा असं प्रकर्षानं वाटलं....आणि तिच्या स्मृतिंना अभिवादन करत लिहिती झाले...🙏🏻

🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, १८ मे, २०२०

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा...

नावातलं माधुर्य
स्वभावात पाझरलं
स्वभावातला गोडवा  
 व्यक्तिमत्वात अवतरला
व्यक्तिमत्वातील चांगुलपणानं
स्नेहीजनांचा गोतावळा 
  जमवला...
स्नेहीजनांच्या सद्भावना
  पाठीशी खंबीरपणे उभ्या
  राहिल्या
कोणाच्या म्हणून
काय विचरता....
अहो,माझ्याच सखयाच्या 
 नाव सांगू‌ तुम्हाला?
नाव आहे त्याचं मधुकर
 लाभो त्यांना उदंड आयुर्र्आरोग्य 
हेच ईश्वरचरणी साकडं
हिच माझी प्रार्थना
 माझ्या ईश्वराला हेच माझं
मागणं....

तुम्हाला, वाढदिवसाच्या खूप मनापासून आभाळभर आरोग्यपूर्ण शुभेच्छा....

🎂🎉💐💕 १५मे,२०२०.

नंदिनी म.देशपांडे

🌹🌹🌹🌹🌹🌹

चोचले जीभेचे... शंकरपाळी.

*चोचले जिभेचे*
________________

    *शंकरपाळी*

© नंदिनी म. देशपांडे.

   शंकरपाळी म्हटलं की,दिवाळी आठवते,चैत्रगौर आठवते,सहज म्हणून केलेलं परिवाराचं एकत्र जमणं आठवतं....ओघानेच लाडू करंजी अनारसे आणि चिवडा यांचीही आठवण येतेच....
    मला वाटतं शंकरपाळी हा खरं म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या खाद्यसंस्कृतीचं एक अविभाज्य अंग.....
ही शंकरपाळी माहिती नाहीत असं म्हणणारा माणूस शोधूनही सापडणार नाहीच!
   ‌लहानपणापासून या ईवल्याशा पदार्थाशी अशी गट्टी जमलीए म्हणून सांगू....
     अगदी शाळेच्या डब्यातला खाऊ म्हणून तर कधी भुलाबाईच्या प्रसादाचा खाऊ म्हणून आईनं आवर्जुन शंकरपाळी बनवावितच... बहूतेक किंचित गोड चवीचीचं... कधी गुळाला तर कधी  साखरेला कणकेत नाही तर मैद्यात घोळवून....
दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांच्या मांदियाळी मध्ये तर हमखास यांची वर्णी लागतेच लागते...डिश ची शोभा वाढवण्यासाठी ह्यांच्या शिवाय मजाच नाही...
कुरकुरीत खुसखुशीत सहज जीभेवर विरघळणारे....
कधी कधी खमंग खारे तर कधी चटपटीत खट्टेमिठेही....अगदीच आळणी असतील तरीही कुरुम कुरुम खाण्यातली मजा काही ओरच! 
    फराळा बरोबरच दुपारचं खाणं म्हणून तर कधी चहासोबत बिस्काटा सारखं....एक सिप चहा चार दोन शंकरपाळी काय मस्त लागतं हे कॉम्बिनेशन!
     बिस्किटं बिनदिक्कत पणे कोपऱ्यात जाऊन बसतात अशावेळी... 
 ‌ लांबचा प्रवास आणि शंकरपाळी यांचं नातंही फारच जवळचं....प्रवासात तोंड चालू ठेवण्यासाठी,पोटभरीची आणि वेगवेगळ्या चवीची शंकरपाळी म्हणजे अगदी हुकुमाचा एक्काच!शिवाय टिकावू पणा अभिमानानं मिरवणारा.... सहाजिकच या शिवाय प्रवास होत नाहीच.....
    करावयाला सोपा,पटकन कुणालाही जमणारा, आयत्या वेळी होणारा नि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या चवीचा बनवता येणारा, असा हा आपला एक पारंपारिक पदार्थ....
  बहुतेक लवकरच हे शंकरपाळे वैश्विक पदार्थ बनण्याकडे वाटचाल करतील हे भाकित नोंदवावयास काहीच हरकत नसावी असं वाटतंय....
  सहज म्हणून दुपारच्या चहाच्यावेळी तोंडात टाकण्यासाठी म्हणून कालच बनवलीत मी पण त्यांचं कौतूक केल्याशिवाय रहावतच नव्हतं...म्हणून हा सारा लिहिण्याचा घाट.....
मग काय! बघू या
आज कोणा कोणाच्या स्वयंपाकगृहात यांचा प्रवेश होतोय ते!....
🌹🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, ११ मे, २०२०

मॅरेज ॲनिव्हरसरी...

असू दे अरेंज किंवा लव मॅरेजही
  तुझ्या सहजीवनी रहाण्याची लज्जतच न्यारी

 दिव्य गंधित प्रेमफुलाचा
 अस्वाद घेत नजाकतीनं भारुन जाते मी आजही
   क्षणोक्षणी अविरत

एक एक पाकळी उलगडताना हळूच मृदूल मुलायम
समाधानाचं सौंदर्य खुलत जायी बहरत बहरत

संसाराच्या मखमली वाटेवर
लागला खाचखळगा कधीतरी
तुझ्या भक्कम हातानं आधार दिला वरचेवरी

निर्धास्त मी तुझ्या सहजीवनी
सावलीत गार तुझ्या विसावूनी
आच कधीच आली नाही
अडचणींची माझ्या जवळी

अशीच साथ राहो कायम 
परमात्म्याला मागणं माझं
तुझ्यासह सहजीवनी
 वेचू देत सोनेरी क्षण

तुझ्या बळकट आधारात 
मला बुडून जाऊ देत
तुझ्या सवे जीवनाचा असाच 
आनंद टिपू देत...
असाच आनंद टिपू  देत..

_सौ.नंदिनी मधुकर.
दि.११मे,२०२०.

🌹🌹🌹🌹🌹