शुक्रवार, १२ एप्रिल, २०१९

शहिदांना श्रद्धांजली....

*शहिदांना श्रद्धांजली*💐

     काल १४, फेब्रुवारी. संपूर्ण देश या दिवशी, व्हॅलेंटाईन दिवस साजरा करण्याच्या धुंद,मग्न वातावरणात रममाण झालेला. पण आपले कांही सैनिक, चारच दिवसांपूर्वी आपल्या प्रेमाच्या माणसांचा निरोप घेऊन; पुन्हा आपले कर्तव्य  बजावण्यासाठी नियोजित ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि प्रसन्नतेने जात होते....आपल्यावर असणाऱ्या जबाबदारीची पूर्ण जाणीव ठेऊन....

    या आपल्या काही सैनिकांवर काल अचानक कपटाने झालेल्या हल्ल्याचा धिक्कार धिक्कार आणि धिक्कारच....

त्याला दुसरे शब्द असचू शकत नाहीत....

     हल्ला घडवून आणणारे व प्रत्यक्ष हल्ला करणारे,ही खरोखरच माणसं नव्हेतच तर,हैवानच होत.....त्यांच्यात कोणतीही माणुसकीची भावना शिल्लकच नाही....ते सैतानच आहेत.... हे पुन्हा एकदा सिद्ध झाले....केवळ माणसाचे रुप आणि सजीवपण आहे त्यांच्यात, म्हणून एवढे दिवस 'माणूस' या व्याख्येत बसवून त्यांच्याशी सामंजस्याचा भूमिकेत शिरून काही मन:परिवर्तन होईल या आशेने केलेले आतापर्यंतचे प्रयत्न फोल ठरल्याचे वारंवार सिद्ध होत आहेतच.... आता मात्र निर्वाणीची वेळ नक्कीच आली आहे.....

     हे दहशतवादी जाणून-बुजून दहशतवादी आहेत यात काही दुमत नाहीच.... ते अशा हल्ल्यांची जबाबदारीही मान वर करुन स्विकारतात हे कृत्य, निश्चितच माणूस म्हणून घेण्याच्या व्याख्येत बसणारे नव्हेच.....

    पण अशा लोकांना पाठीशी घालणारे, त्यांचा पुरस्कार करणारे,आणि अशा प्रकारे संपूर्ण राष्ट्र दुःख,राग,उव्देग अशा भावकल्लोळात बुडालेले असताना सुध्दा, आपला पक्ष आपलं राजकारण आणि आपलं वागणं किती योग्य आहे. असा संकुचित विचार करणाऱ्यांचा तर शंभरदा धिक्कार आहे.

     बलिदान दिलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा त्यांचा नाटकी दुटप्पीपणा लोकांच्या लक्षात येत नाही असे त्यांना वाटत असेल,तर तो त्यांचा शुद्ध मूर्खपणा आहे. श्रद्धांजली चे मोठे मोठे बॅनर आणि त्यावर भलीमोठी नेत्यांची रांग,त्यांच्या फोटोंचे प्रदर्शन करणे म्हणजे देशप्रेम नक्कीच नाही.

     कुठे ह्या,आपल्या मातृभूमीसाठी लढणाऱ्या सुपुत्रांचे तेजस्वी कार्य, त्यांचे शूरवीरांचे काळीज, त्यांचे बलिदान. आणि कुठे हे क:पदार्थ  असणारे.स्वतःच्या  स्वार्थाची  जमेल तेंव्हा व जमेल तशी पोळी भाजून घेणारा हा वर्ग....

      हे तर,  राजकीय ड्रामा करुन भावनांच्या प्रकटीकरणाचा बाजार मांडणारे लोक. कायम स्वतःवर कॅमेराचे फोकस फिरवत, देशप्रेमाचा आव आणणाऱ्या अशा लोकांचा हज्जारदा धिक्कार....

   या देशाच्या सत्तेच्या राजकारणात व्यस्त असणार्‍या, जात धर्म पंथ यांच्यातच गुरफटून बसणाऱ्या आणि  विशेष सवलती मिळवण्यासाठी आटापिटा करत आपली बुद्धी गहाण ठेवलेले हे मूठभर लोक.... आणि कुठे ते उदात्त हेतूने आपल्या घरातील कर्ता मुलगा देशसेवेला वाहिलेली हजारो सामान्य कुटुंब. ज्यांच्यासाठी केवळ माझा देश हेच त्यांचे दैवत असते .तर त्यासाठी कर्तव्य बजावणे हाच यांचा धर्म असतो.

      जेंव्हा अशी माणसं मातृभूमीच्या रक्षणासाठी  शपथ घेऊन आपले कार्य निरपेक्षपणाने चोख बजावतात ना, तेव्हा  ती कांही  या मूठभर स्वार्थी लोकांच्या सारखी ढिंढोरा पिटवत, आपलाच उदोउदो आपणच करत नाहीत.तर त्यांचे केलेले कार्य आपोआप त्यांची ओळख पटवून देत  असते.आणि सामान्य माणसाला आपोआप नतमस्तक व्हायला होते....या लोकांच्या कार्याचे मोठेपण बघून....

    अगदी तसेच आहे संपूर्ण भारतीय सैनिकांचे कार्य.हेच खरे उत्तुंग कार्य. हेच खरे देशप्रेम.हीच खरी देशसेवा. आणि हेच खरे मातृभूमीच्या ऋणातून उतराई होणं.

      काल शहीद झालेल्या या चाळीसच्या वर लोकांनी खऱ्या अर्थाने हा प्रेमाचा दिवस साजरा केला. आपल्या मातृभूमीच्या प्रेमापोटी  मातृभूमी मध्येच विलीन होत.... तिच्याशी एकरुपत्व  साधत....

     सलाम अशा शूर वीरांना.            त्रिवार वंदन आपल्या भारतीय सैनिकांना.
    त्रिवार वंदन त्यांना, ज्यांनीआपल्या पोटचा गोळा मोठ्या अभिमानाने या मातृभूमीच्या रक्षणासाठी, देशसेवेसाठी अर्पण केला....          धन्य ते माता पिता आणि धन्य त्यांचे शूरवीर ! 🙏🙏🙏

🇮🇳जय हिंद, जय भारत🇮🇳

*नंदिनी म. देशपांडे.

फेब्रु.१५,२०१९.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा