शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०२३

बाबांची माय. ....

"बाबांची माय"
 -------------

             ©️ नंदिनी म. देशपांडे. 

         "आपल्याला काही गोष्टींचा कालपरत्वे विसर पडतच असतो ना? कारण आपला त्याच्याशी फारसा संबंध येत नाही हो ना? "
      
         अगदीच प्राथमिक टप्प्यात अल्झायमर चालू झालेला असताना माझ्या वडिलांनी मला प्रश्न केला एक दोन वेळेला....किंबहूणा त्यांना अशा काही मानसिक आजाराची सुरुवात झाली असेल याचा मलाही थांगपत्ता लागला नव्हताच....

      "कांही दिवसानंतर मला डोक्यात काहीतरी वेगळंच जाणवतंयं...डोकं जड होतंयं आणि झोपही येते आहे"...अशी एक सुचना मला त्यांनी केली...

      आपल्याला काहीतरी वेगळं होत आहे, ते जाणवतंय, पण नेमकं काय ते सांगता येत नाहीए, याची सातत्याने बाबांना स्वतःला जाणीव होत होती...चाणाक्ष बुध्दिमान माणूस,म्हणूनच आयुष्याचे 78 वर्षे काढलेली ही व्यक्ती अजूनही विचार क्षमता प्रगल्भ होतीच याचेच हे उदाहरण!

         पण जेंव्हा,व्हॉट्स ॲपवर गुुड मॉर्निंग मेसेजेस ईव्हिनिंगला ते पाठवू लागले, शेव्हिंग करताना 
डोक्यावरचे केसही स्वतःच कापू लागले  तेंव्हा मात्र आमचे धाबे दणाणले...आणि अचानक एक दिवस मोबाईल ऑपरेट कसा करावा हेच पूर्णपणे ते अगदीच विसरून गेले...
 
      या सर्व घटना केवळ महिना दोन महिन्यातच घडू लागल्या आणि नेमकाच कोरोना संपलेला असताना आम्ही भावंड मानसोपचार तज्ञाकडे बाबांच्या 'केस'विषयी चर्चेसाठी गेलो...
       
      खरं म्हणजे बाबांच्या दैनंदिन वागण्यात झपाट्याने होणारा बदल हा प्रथम भावाच्या लक्षात आला...तो आम्हा बहिणींना कळकळीने, "मानसोपचार तज्ञाकडे बाबांना घेऊन जाऊ या आपण"असे बोलत होता पण आम्हाला फारसे जाणवत नव्हते आणि बाबा स्वतः यासाठी तयार होतील का?हा फार गहन प्रश्न आमच्यासमोर होता...त्यांना त्यासाठी कसे तयार करावे यासाठी लुप्तीशोध चालू झाला...उलट आमच्या बोलण्यातील या विषयावरची कुणकुण त्यांना लागली असावी, आम्हाला ते स्वतः पेपरमध्ये आलेली अल्झायमर आजारावरचे लेख वाचून दाखवत...आठ नऊ ऑक्टो.ला मानसिक आरोग्या विषयी विशेष दिना निमित्त बरेच लेख आले होते,ते सारे पेपर्स सांभाळून ठेवण्या विषयी आम्हाला सांगत होते...
     
        प्रथम आम्हीच भावंड डॉ. शी चर्चेत भाग घेऊन ठरवू या असे आमचे ठरले...

       एका मानसोपचार डॉक्टर शी पाच फूट लांब बसून आम्ही चर्चा केली...पेशंटला आणण्याची गरज नाही त्यांचा दैनंदिन वागणूकीचा एक व्हीडीओ करुन घेऊन या असे त्या बोलल्या...
तसे आम्ही केलेही आणि दोन दिवसातच त्यांनी बाबांच्या अल्झायमर वर शिक्कामोर्तब करुन औषधंही लिहून दिली...

      फारतर तीनचार दिवसातच औषधांचे परिणाम दिसू लागले...बाबांचा बडबडा स्वभाव अगदीच लोप पावला...एवढा की त्यांना बोलता येतच नाही की काय? अशी शंका मला येऊ लागली...जेवणावरची वासनाही उडत चालली होती....कळजी करण्यासारखी परिस्थिती उद्भवली आणि आम्ही या औषधांना कचराकुंडी दाखवली...

        पुन्हा तज्ज्ञ म्हणवणारे नवीन मानसोपचाराचे डॉक्टर बघितले...त्यांनी पेशंट च्या एमआरआय वगैरे टेस्टस् सुचवल्या लगेच करुनही घेतल्या आणि आमच्या बाबांचा मेंदू श्रींक (आकसण्याची) प्रक्रिया चालू झाली आहे, अशा पेशंटच्या वागण्या बोलण्यात काय काय बदल होऊ शकतात, काळजी कशी घ्यावी वगैरे ईत्यंभूत माहिती आम्हा सर्वांनाच त्यांनी दिली, आणि औषधोपचार चालू केले...पुन्हा पेशंट ला आणण्याची अजिबात गरज नाही हे आवर्जून सांगत...

        डॉक्टर म्हणाले तसे बदल बाबांमध्ये फारच झपाट्याने होत गेले...तसा त्यांचा त्रास आम्हाला नव्हता पण केअर टेकर 24 तास सोबत हवाच  हे कळून चुकले आम्हाला, आणि आम्ही ते ठेवलेही...केवळ एक वर्षच ठेवावा लागला तो...दिवसभर ते माझ्या आसपासच असायचे...मला अजिबात दूर जाऊ द्यायचे नाहीत...अगदी त्यांचं लहानपण फिरुन आलंयं का?अशी शंका वाटण्या ईतपत आमची सोबत त्यांना हवी असायची...

     मला तर त्यांनी त्यांच्या "माय" चा  दर्जा दिला होता...तू माझी आई आहेस तिच्या सारखीच माझी काळजी घेतेस हे वारंवार बोलून दाखवायचे ते!
या निमित्ताने दिवसातले जवळ जवळ बारा तास माझ्या सान्निध्यात असायचे बाबा, होईल तेवढी सेवा करत आपल्या जन्मदात्याच्या ऋणातून किंचितशी उतराई होण्याचा प्रयत्न करत होते मी पण...त्यांनी मला दिलेल्या आईपणाच्या दर्जाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते...

     पण आयुष्याची 77 वर्षे ज्यांनी शाही,वैभवी जीवन जगलं, आपला दबदबा आपल्या कार्यकौशल्यातून दाखवला, कितीतरी माणसं जोडून ठेवली..ज्यांनी आम्हा भावंडांवर नितांत प्रेम करत आमची काळजी वाहिली,माझी आई गेल्यानंतर आम्हा भावंडांवर आईचीही माया केली...त्या आपल्या वडिलांची केवळ एकच वर्ष का असेना पण अल्झायमर मूळे झालेली विकलांग मानसिक अवस्था, मला माझ्या समोर बघणं म्हणजे,हा माझ्या मनाच्या क्लेशदायक वेदनांचा अक्षरशः कडेलोट होता....

      पण त्यांची "माय" बनून कसा सहन केला ते, आठवले तरी मन विदीर्ण होते आजही...

         मागच्या वर्षी ऑक्टो. च्याच 9 ता.ला ,कोजागिरी पौर्णिमेस माझ्याच घरुन त्यांना हॉस्पिटल मध्ये ॲडमीट होण्यासाठी निघताना,मी सांगितल्यानंंतर देवाला व्यवस्थित नमस्कार करुन निघालेले आमचे बाबा, परत फिरुन येतील ना?अशी पालही चुकचुकली माझ्या मनात...

      आपण मोठी माणसं गावाला निघताना त्यांना पदस्पर्श करत नमस्कार करतो तसाच, त्या वेळी मलाही घालावासा वाटत होता...पण सकारात्मक विचार मनात आणत आपण येथेच त्यांचे आनंदाने स्वागतच करणार आहोत असे मनात ठरवून त्यांना हॉस्पिटल मध्ये जाताना निरोप दिला होता मी....

   पण महिनाचभरात परिस्थितीत  फारच गुंतागुंत होत जाऊन माझ्या मनात निर्माण झालेली शंका वास्तवात बदलली...
  तशाही अवस्थेत प्रसन्न आणि तेजःपुंज असणारा त्यांचा हसरा चेहरा मात्र कधीच मलूल झाल्याचे आठवत नाही...
     
      नियतीशी दिलेली बरोबर महिनाभराची त्यांची नीकराची झुंज देखील दुःखाचा लवलेशही आणू शकली नाही बाबांच्या चेहर्‍यावर...

    अगदी आमच्या नकळत शांत सोज्जवळ तेवणारी प्राणज्योत 7 नोव्हेंबर च्या, त्रीपूरी पौर्णिमेच्या नीशेच्या निद्रेमध्ये चीरनीद्रा घ्यावयास गेली....

     आजच्या वर्ष भरापूर्विच्या त्या सर्व दिवसांचे आपसुकच 
पुनरावलोकन मनाने चालू केले आणि माझ्या मनातील या क्लेशदायक आठवणींना वाहून जाऊ दिले अगदी अलवारपणे...

        पण त्यांच्याही नकळत मला माझे बाबा मला "माय" बनवून गेले होते...याचा मला झालेला आनंद मनाच्या आतल्या कुपीत जपून ठेवलाय मी कयमचाच....

आज ति.बाबांचा,प्रथम स्मृतिदिन 
या निमित्ताने त्यांना आदरपूर्वक 
विनम्र अभिवादन....
🙏🙏🙏

औरंगाबाद, 7 नोव्हेंबर 2023.

🌹🌹🌹🌹🌹

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

कन्यादान.

मानवी आयुष्यात कन्यादाना एवढं पुण्य कशात नाही असे म्हणतात...याचाच अर्थ पोटी कन्येनं जन्म घेणं किती पुण्याई आहे बघा...
      कन्या, मुलगी घरात अवतरते ती 'लक्ष्मीचे' रुप असते असे म्हणतात...लक्ष्मीच्या पावलाच्या आगमनाने या घराण्याची भरभराटच होत जाते...हळू हळू ती सरस्वतीचा आशिर्वाद मिळवते आणि जिद्दीने आपल्या पायावर ऊभे रहाण्याचा अट्टहास ठेवते....
     हे साधत असताना ती घरातील सर्व सदस्यांच्या गळ्यातील ताईत बनते...भावंडात सर्वांत मोठी असेल ,तर वडिलांचा उजवा हात बनते...आईला घरकामात मदत करते...गृहिणीपदाची  वाट अजमावून बघण्याची आस मनी ठेवते...
      मोठी ताई असेल तर भावंडांची आईसारखी काळजी घेण्याचा प्रयत्न करते आणि लहान असेल तरीही भावंडांवर प्रेमाची पखरण करते...आजी-आजोबा यांची सेवा करण्यात कृतार्थता मानते...
      एकूणच मुलगी घरात आनंदी आनंद पेरत पेरत येते...

       हिच मुलगी लग्नाळू वयाची झाली की, भावंड तिला चिडवतात, 

ताई मला सांग, मला सांग, कोण येणार गं पाहूणे?

     ही ताई मग लटक्या रागाने 'मी लग्नच करणार नाही मुळी'असं म्हणते...पण मनात मात्र रुबाबदार राजकुमाराची वाट बघत असते...स्रीसुलभ भावना मनात नाचत रहातात ती स्वप्न बघण्यात रममाण होते...
      मनासारखा राजकुमार तिला मिळाला म्हणजे, मग ती, 

लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची....

असं गुणगुणंत रहाते...
       हात पिवळे होण्याची घटिका समिप येऊ घालते...मग हातभरून हिरवा चुडा आणि नाजूक मेंदीने रंगलेले आपल्या लेकीचे हात कौतुकाने बघून घरातील मोठी मंडळी,आणि तिच्या सख्या तिला म्हणत असतात, 

 पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा, वधु लाजरी झालीस तू गं सांगे तो चौघडा...

    अशाप्रकारे सनई चौघड्याच्या साक्षीने आपल्या घरची लाडली दोनाचे चार हात होत, नियंत्याने बांधलेल्या ब्रह्मगाठीत बांधली जाते...नवर्या मुलाला गळ्यात हार घालताना लाजेनं चूर होत नजरेनंच त्याच्याशी बोलते...
      
हळव्या तुझीया करात देता करांगुली मी 
स्पर्शावाची गोड शिरशिरी उठते ऊरी 
सप्तपदी मी रोज चालते तुझ्या सवे शतजन्मीचे हे माझे नाते...
      
ही नववधू असे मनातल्या मनात गुणगुणत असेल का?असा भास होतो...
 
      विवाह वेदीवर चढलेले नवरानवरी विवाह विधी पूर्ण करत या समारंभाच्या शेवटाकडे येऊ लागतात...आईचा ऊर आपल्या लाडकीची लवकरच पाठवणी करावी लागणार म्हणून राहून राहून दाटून येऊ लागतो...आपले भरले डोळे ती जाणीवपूर्वक लपवत असते...आणिक वरमाय असणाऱ्या आपल्या विहिणबाईंना विनवते...

ओटीत घातली मुलगी विहिणबाई 
सांभाळ करावा हिच विनवणी पायी...

मुलीचे आणि तिच्या स्वकीयांचे या हळव्या शब्दांनी डोळे पाणावतात...आपल्या लाडक्या सानुलीच्या विरहाने वधूपित्याचे मन मूक रुदन करु लागते...

     आता निरोपाचा क्षण आलेला असतो...वधूला आपले माहेर आणि तेथील माणसं आपल्याला दुरावणार या भावनेने सारखं वाईट वाटणं सहाजिकच असते...
    मनातून ती म्हणत असते, 

निघाले आज तिकडच्या घरी 
एकदाच मज कुशीत घेऊनी पुसुनि लोचने आई 
तुझी लाडकी लेक आपुले घरकुल सोडून जाई 
तव मायेचा स्पर्श मागते 
अनंत जन्मांतरी 
निघाले आज तिकडच्या घरी...

आईवडील आणि वधू या हळव्या क्षणांना सामोरं जात जात 
आई बाबा मुकपणे म्हणत असतात, 

जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा 
गंगा यमुना डोळ्यात ऊभ्या का...

     भरल्या डोळ्याने आपल्या लाडक्या लेकीची पाठवणी करताना आईबाबा कृतकृत्य नजरेनं लेक जावयाला शुभाआशिर्वाद देतात...

     वाजत गाजत नववधु उंबरठ्यावरचं माप ओलांडत सासरच्या घरी प्रवेश करते...सासरच्या घरी लक्ष्मीचे आगमन अगदी वाजत गाजत आनंदाने होते....
 सासुबाई म्हणतात ,

लिंबलोण उतरता 
अशी का झालीस गं बावरी 
मुली तू आलीस आपल्या घरी 
मुली तू आलीस आपल्या घरी...

    असा हा माहेर घरच्या लक्ष्मीचा सासर घरची लक्ष्मी या नात्याने होणारा प्रवास हुरहूर लावणारा पण मोठा गोड आणि हवाहवासा असतो...

      ती कुठेही असेल तरीही लक्ष्मीच असते...
पण आयुष्याच्या अनेक वळणांवर ती सरस्वती, दुर्गा, चंडिका, रेणूकाई, अंबाबाई,अशी शक्ती देवतेची नवचंडी रुपं धारण करत करत नवचंडीच्या अनेक रुपांतून आपल्या आयुष्याचा प्रवास करते...
न थकता, कोणत्याही तक्रारीशिवाय आणि अडचणींवर मात करत करत जिद्दीने यशस्वी होत जाते....

   कालच झालेल्या जागतिक कन्यका दिनाच्यानिमित्ताने एका स्त्रीच्या प्रवासाचा असा आढावा घ्यावासा वाटला...म्हणून हा लेखन प्रपंच...
वाचकांनाही आवडेल अशी आशा करते...

©️नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

गौरींचा निरोप समारंभ...

गेली तीन दिवस घरोघरी चालू असणारा गौरी आवाहन आणि पुजनाच्या सोहळ्याची आज सांगता....
        आपल्या घरी आलेल्या गौरींना सजवून तीन दिवस तिच्याशी हितगुज साधणारी गृहलक्ष्मी आज स्वतः  सात्विक सौंदर्यानं उजळून निघते...चेहर्‍यावर प्रसन्न हसरे भाव, मनात समाधानाचे तेज, घरात मांगल्याची शिंपण आणिक दारात रंगारंगांची सुरेख रंगावली मांडत आपल्या प्रसन्नमुखाने सुवासिनींना हळदी कुंकुंवाच्या निमित्ताने आपल्या गौराईंचा थाट बघण्यासाठी आमंत्रित करते...
     गौरीच्या रुपाने आलेल्या माहेरवाशिणींना आज निरोप द्यायचा आहे...आपली लेक लग्नानंतर पाहूणी म्हणून आलेली असताना तिला कुठे ठेवू अन कुठे नको असेच प्रत्येक आईला वाटते...पण ती चार दिवस मानाने आणि यथोचित पाहुणचाराने जेंव्हा तिच्या सासरी निघते तो क्षण खरे तर संमिश्र भावनांनी भारलेला...
        गौरीही लेकीचंच रुप घेऊन आलेल्या असतात...त्यांना निरोप तर द्यावा लागणारच ना...
      तिच्या सांगाती देण्यासाठी केलेले फराळाचे पदार्थ, खिरापत  प्रसाद म्हणून सुवासिनींना देताना या आईरुपी गृहिणीचा चेहरा कृतार्थ भावनेने ओतप्रोत असतो...गौरीचं - लेकीचं कौतूक इतरांकडून ऐकताना तिला गगन ठेंगणे न झाले तरच नवल!
     आपल्या लेकीचं परिपूर्ण रुप ती गौरींच्या माध्यमातून न्याहाळते...या घरची लक्षमी ही दिल्याघरी खूप सुखात नांदो, मुलाबाळांच्या गराड्यात राहो आणि भरभराटीने समृध्द होवो हिच मनोमन ईच्छा असते या गृहलक्ष्मीची...
      तिच्या येण्याने भरुन राहिलेले आपले माहेरही तिच्या पदस्पर्शाने आणि तिच्या वावरण्याने सदा आनंदी, समाधानाने, समृध्द होत राहो...धनधान्याच्या राशीं नेहमीच घरात नांदत्या राहोत...तिच्या मनातील समृध्द भाव आणि तृप्तता आपल्या माहेरावर कायमच परावर्तित होत राहो....दोन्ही घरी अशीच संपन्नतेने, कृतार्थतेने नटलेली राहोत अशीच मनीषा प्रत्येक आईची असते...
      जिथली वस्तू तेथेच शोभून दिसते तद्वतच माहेरघरी आलेली लेक चार दिवस पाहूणी म्हणूनच शोभून दिसते...तिचं खरं वैभव तिच्या सासरी वाट बघत आहे आणि आज आपल्याला तिला निरोप द्यायचाय हे ठामपणे मनाला समजवतानाची घालमेल चेहर्‍यावर उमटू न देता, सुवसिनींबरोबर कौतुकात मग्न अशी गृहलक्ष्मी आज थोडी हुरहुर घेऊन आपल्या गौरींनाही निरोप देते...अगदी हसतमुखाने तृप्ततेने आणि समाधानाने...तिच्याकडून पुढच्या वर्षी येण्याचे आश्वासन  घेत....
      असा हा गौराईंचा पुजन पाहूणचाराचा सांगता समारंभ थाटातच पार पडतो आणि नव्या जोमाने घरातील प्रत्येक घटकाला नवीन उर्जा,नवी उमेद आणि नवीन धनधान्यच्या राशींची घरघरांत उधळण करतो...
नकळत शब्द ओठी येतातच ते म्हणजे,

सर्व मंगल मांगल्ये 
शिवे सर्वार्थ साधके 
शरण्ये त्रिबंके गौरी 
नारायणी नमोस्तुते ॥

   ©️नंदिनी म.देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹🌹

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

घर म्हणून....

घर म्हणून....

      अगं पमा, पोळ्या अगदी मोजूनच कर हं....एखादी जरी उरली तर अक्षरशः टाकून द्यावी लागते...डस्टबीन मध्ये, नको वाटते गं अन्न असं टाकून देणं....
     हे माझं दररोजचं ठरलेलं वाक्य सकाळी पमा पोळ्यांना आली म्हणजे....
      ताई, असू द्या एखादी जास्त, घर म्हणून असावी...तिचंही हे ठरलेलं वाक्य मला मुःखपाठ झालं होतं...
        या वाक्यासरशी मी कितीदा तरी जुन्या आठवणींत पोहोंचत असायची....
      "भरल्या घरात अन्नाचे डबे कधीच रिकामे असू नयेत...घरम्हणून थोडे अन्न तरी शिलकीत हवेच...पैपाहूणा केंव्हाही येतो एखाद्या माणसाचं अन्न असावंच...अचानक आलेलं एखादं माणूस संपादायला हवं दररोजच्या आपल्या स्वयंपाकात..."
 माझी मोठीआई, (आजी)नेहमी सांगायची असे...
     ते अन्न नीट ठेवले जायचे दुसरे दिवशी घरकाम करणारी मावशी आनंदाने घरी घेऊन जायची ...नाहीतर आल्या आल्या नाश्ता करुन मग कामाला लागायची....वाया जात नसायचं हे नक्की....
    आईचा पण हात मोठाच होता स्वयंपाकात...भट्टी चालू असताना कितीही जणं आले तरी काही कमी पडायचं नाहीच...उलट प्रत्येकाला जेऊन जाण्याचाच अग्रह असे तिचा...जेवण करुन तृप्त झालेला पाहुण्यांचा चेहरा बघून आईला फार समाधान वाटायचे...आता वाटतं खरंच, आईच्या हाताने कितीतरी अन्नदान घडले...पदरी साचलेले तेच पुण्य तिला शेवटी कामाला आले असणार नक्कीच....
       माझ्या सासुबाई, कायम चार माणसांच्या घरात राबणाऱ्या...स्वयंपाक गृहाच्या सर्वेसर्वा...खेडे गावात बारा बलुतेदारांपैकी दररोज कुणी ना कुणीतरी वाढण घेऊन जावयास यायचेच...या माऊलीने कधीच कोणाला विन्मुख पाठवल्याचे मला आठवतच नाही...
     उलट आनंदाने अन्नदान करत कृतकृत्य भाव विलसत असायचा त्यांच्या चेहर्‍यावर!
       उरलेच अन्न तर सकाळी गायींच्या गोठ्यात जायचे...पण वाया अजिबात नाही...
      काटकसरीने संसार करत उभ्या केलेल्या आमच्याही संसारात कधी कोणता पाहूणा उपाशीपोटी किंवा अर्धपोटी राहिल्याचे स्मरत नाही...
"अतिथी देवोभव" या मंत्राचे पुरस्कर्ते आम्ही, प्रत्येकाचा साग्रसंगीत पाहूणचार झाला पाहिजे याच संस्कारात दोघेही वाढलेलो....अन्नधान्याची कायमच बरकत असायची...
 उरलं शिळं तर स्वतः खाण्याची किंवा कुणाच्या तरी मुखात जावे अन्न, ही मनोवृत्तीत जोपासत ,अन्नापेक्षा काही मोठे नाहीच ही भावना बाळगणारे आम्ही...वाया कसे जाऊ द्यावे वाटेल?
      पण हल्ली कितीही कमी करा उरतच थोडंतरी...आता पुर्विसारखा गोठा नसतो दारी...  प्रसंंगी घरकाम करणारी मावशी आपण आपल्या पंक्तीला घेऊन  बसतो,आपण जेवावयास...उरलेलं घेऊन जाता का?म्हणण्यासाठी जीभही रेटत नाही...का म्हणून त्यांना शिळं विचारावं हा प्रश्न आपल्याच मनात उभा रहातो...बाहेर शब्द पडणं केवळ अशक्य...मग वाया जातंचं...
      कधी कधी आपण आपल्या ताटात वाढून घ्यावं, कारण आपलं ठेवणं अगदीच व्यवस्थित असतं, अगदी फ्रीज मध्ये वगैरे....पिझ्झा, बर्गर, पाव हे विकत आणून खाण्याचे पदार्थ किती दिवसाचे शिळे असतात कोण जाणे?हा विचार डोक्यात घोळतोच अशा वेळी...त्या पेक्षा कालचीच बनवलेली पण नवा अवतार धारण केलेली आपली फोडणीची पोळी काय खमंग आणि चवदार लागते!तोंडाला चव आणते बापडी, तिला शिळी कशी म्हणणार?
      रात्रीच्या वेळी कधीतरी झोपच येत नाही...बहुदा जेवण लवकर झालेलं असतं...मग रात्री भुक लागल्या सारखी वाटते, उरलेली एखादीच दुधपोळी कुस्करून खाल्ली की भुक शमते आणि झोपही शांत लागते....
 कधी कधी घरात डायबेटिस चा पेशंट असेल तर त्याला रात्री बेरात्री शुगर कमी झाल्याचेही लक्षात येते, पटकन उरलेली एखादीच पोळी साखरअंबा,जाम, लोणचं, किंवा तूप साखर यांच्या सलगीने रोल करुन खाल्ल्यास केवढा तरी आराम मिळतो....अशा वेळी लक्षात येतं हे "घरम्हणून" असावं घरात याला केवढा अर्थ आहे!
   
        हे केवळ अन्नाच्या बाबतीत...पण एकूणच घरातील  डब्यांमधील चीज वस्तू कधीच अगदीच संपवून टाकू नयेत, घरम्हणून पुनःश्च आणेपर्यंत थोड्या तरी असूच द्याव्यात डब्यात हे आईचं वाक्य कायम स्मरणात आहे आजही..."नाही नाही" असे कधी म्हणू नये आणि दुसऱ्या पुढे हात पसरायची वेळ येऊ देऊ नये हेच एका उत्तम
गृहिणीच्या यशस्वीतेचं गमक आहे यावर माझाही विश्वास आहे हे मात्र खरे...
तुम्हाला काय वाटते?

©️नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹🌹

बुधवार, ६ सप्टेंबर, २०२३

शिक्षक दिन, 2023.

काल आमच्या काही मैत्रीणींच्या गप्पा चालू होत्या,शिक्षक दिन असल्याने ओघानेच त्या विषयावर गाडी आलीच...आमच्या लहानपणीच्या आठवणींना, त्यातही शिक्षक दिनाच्या दिवशी आम्ही शाळेत केलेल्या धम्माल गमती जमती सांगताना प्रत्येकजण भरभरुन बोलत होती..
      आजच्या दिवशी,सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला नमस्कार करत, त्यांच्या प्रति आदर व्यक्त करणं,सर्व शिक्षकवृंदांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेणं...त्यांच्या कौतूकाची नजर आपल्यावर पडली की, चेहरा खुलून जाणं हे सारं आठवलं...
      याच दिवशीची आणखी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आठवण म्हणजे, आम्हा विद्यार्थ्यांकडून "स्कूल डे " साजरा होत असे...
   एवढा एक दिवस आम्ही विद्यार्थी शिक्षक शिक्षिकेच्या भुमिकेत प्रत्यक्ष वावरत शाळेचा प्रत्येक विषयाचा तास वाटून घेत असू....काय मज्जा यायची! आपला तास पार पडेपर्यंत जाम टेन्शन असायचं...पण छान वाटायचं...बरंच काही शिकावयास मिळायचं, बरेच अनुभव मिळायचे आणि मुख्य म्हणजे,आमचा आत्मविश्वास वाढावयास मदत होऊन आत्मभान यायचे...आत्मसन्मान साधला जायचा...

     हे झालं आमच्या पिढीचं बालपण!खरोखरच आदर्श ठरावेत आणि आदर्शाच्या मार्गावरुन बोट धरुन चालवणारे होते त्यावेळचे बहुतांशी शिक्षक वृंद...अत्यंत साधेपणात मुर्तीमंत सात्त्विकता,विद्यार्थ्यांप्रति अत्यंत जिव्हाळा आणि प्रत्येक विद्यार्थी घडवण्यात त्यांची तळमळ त्यांच्या धाटणीचे कौशल्य या साऱ्या गोष्टी विद्यार्थ्यां साठी  अनुकरणप्रिय असायच्या...
       विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हा एक महत्त्वपूर्ण संस्कार असायचा...त्याची किंमत शब्दांत किंवा पैशात होणं अगदीच दुरापास्त होतं....शिकवणी किंवा ट्यूशन हे आज असणारे  परवलीचे शब्द अर्थशून्य होते....
       मुळातच शिक्षकीपेशाला,त्यांच्या संस्कार वर्गांना आणि विद्यादानाच्या त्यांच्या निष्ठेला कोणताही पर्यायच असू शकत नव्हता...
     शिक्षकांचे अध्यापन कौशल्य एवढ्या प्रचंड ताकदीचे होते,की त्यांच्यामुळे संबंधित शाळेचे नाव भरभराटीला यायचे...
      खरोखर नतमस्तक व्हावेसे वाटते ते अशा शिक्षकांसमोर!
धन्य ते शिक्षक आणि धन्य ते विद्यार्थी  असे समजले जाणाऱ्या पिढीचे आम्ही विद्यार्थी...आम्हाला याचा सार्थ अभिमान आजही वाटतो आणि म्हणूनच आम्हा मैत्रीणींच्या गप्पांनाही कढ येत गेला या विषयावर बोलताना अगदी!

      ओघानेच आजच्या शिक्षकांचा,विद्यार्थ्यांचा आणिक शैक्षणिक पध्दतींवरही नकळतपणे प्रकाशझोत पडत गेला...आज विद्यार्थी, शिक्षक आणि तिसरा महत्वाचा घटक म्हणजे पालक हे तीनही या शैक्षणिक क्षेत्राचा अनिवार्य भाग आहेत...
       पूर्विच्या काळी पाल्याच्या कौतुकासाठी किंवा त्याच्या तक्रारी साठीच कधीतरी पालकांना शाळेत बोलावले जायचे...पण हल्ली पालकांची आर्थिक संपन्नता आजमावणे हाच एकमेव उद्देश ठेवत पाल्याच्या अगोदर पालकाची मुलाखत होते...पालक शाळेतील शिक्षकांपेक्षा शाळेचे नाव/ इतर सोयी बघून मुलाला शाळेत घालतात...अध्यापन कौशल्यावर आधारित शिक्षक निवडण्यापेक्षा 'डोनेशन' म्हणून जास्तीत जास्त 'दाम'देणारा गृहस्थ शिक्षक म्हणून नेमला जातो...
       मुल्याधिष्ठित नेमणुकी ऐवजी आणि शिक्षणा ऐवजी, गोंधळाधिष्ठित वातावरणात शाळेला सुरुवात होते...भपकेबाज पणावर गुणांपेक्षा कितीतरी भर असतो बर्‍याच शाळांचा....अगदी बोटावर मोजण्या इतपतच शाळा किंवा शिक्षकही औषधाला उरले आहेत...
       मग अशावेळी "आडातच नाही तर पोहोर्यात कसे येणार"?अशी सारी परिस्थिती दिसते...

    मुळात शिक्षकांना प्रशिक्षित करुन मुल्ये काय असतात?गुणाधिष्ठित शब्दाचा नेमका अर्थ, संस्कार आणि त्याचे सामाजिक स्थान, भाषा, व्याकरण,भाषेची शुध्दता म्हणजे काय?किंवा विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत वर्तन म्हणजे काय? शिकवावयास हव्या, तरच त्यांचे योग्य परावर्तन मुलांच्या मनावर पडेल...
     
         याचा अर्थ सरसकट असेच नाहीत असे अजिबात नाही पण यांचे प्रमाण मात्र नगण्यच असावे असे आज चित्र दिसते....शिवाय आपली संपूर्ण शिक्षण पध्दती ही "कोचिंग क्लासेस ",नामक वाळवीने पोखरुन निघाली आहेत...पैसा फेकला की कोणतीही गोष्ट अगदी सहज मिळते ही भावना वाढीस लागून शाळा ही केवळ परीक्षाकेंद्रेच आहेत की काय?असे खरे वाटणारे विदारक सत्य आहे दिसून येते.....
      आपल्या पाल्यांना (चांगले)?
शिक्षण देण्याच्या आणि भारंभार क्लासेस लावण्याच्या नादात पालक म्हणजे पैसा कमावणारी सजीव यंत्र, पाल्य म्हणजे मान हलवणारी बैलं आणि शिक्षक म्हणजे शाळेतील एक शोभेची वस्तू किंवा शिकवणे सोडून इतर भारंभार कामं कागदावर दाखवत निधी जमवणारे मशीन बनले आहे या कणभरही अतिशयोक्ती वाटू नये ही आजची शैक्षणिक पध्दतीची शोकांतिका....
   का म्हणून कोणाला आजच्या शिक्षक दिवसाचे महत्व वाटावे?
का म्हणून या दिनाचे सोहळे साजरे व्हावेत?

     एकूण या पध्दतीतील सर्व घटकांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे..
     अगदी मोजक्या म्हणता येतील अशा काही शाळा आजही आपली पत टिकवून आहेत त्यात भरपूर वाढ होणं फार गरजेचं आहेच...
     शिक्षणाचं बाजारीकरण थांबवून त्याला प्रेम वात्सल्याचं खतपाणी घालत जिव्हाळ्याची भावना 
मनापासून अर्पण करतील यातील सारे घटक तर, या क्षेत्रातील चमचमणारे तारे हे हिर्यांच्या लखलखीने तेजाळून निघतील असे नक्कीच म्हणावेसे वाटते...

शिक्षक दिन. 
सप्टेंबर.5,2023.

©️ नंदिनी म. देशपांडे. 
 औरंगाबाद. 

🌹🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

संवाद.

संंवाद

    काही काही पदार्थांची चव जीभेवर रुजून बसलेली आहे अगदी लहानपणापासून...आईच्या हातची चव असायची ना त्यांना...शिवाय प्रेम आणि माया ओतून मन लावून केलेला असायचा पदार्थ...
    पदार्थ अगदी साधेसेच आपल्या दैनंदिन आहारातले, पण जीभेवर ठेवले की अहाहा....
    आता हेच घ्या ना,आपण दररोजच खातो ती साधी पोळी, अगदी पातळ, त्याला छानसे पापुद्रे सुटलेले, मऊ,लुसलुशीत आणि खरपूस भाजून हलकी बनलेली गरमागरम पोळी!अशी खाण्याची लागलेली सवय,मग कशी आवडेल दुसर्‍या कुणाच्या हातची?पुरणपोळीच्या बाबतही तेच, गरमागरम छान फुगलेली कमी व पातळ कणकेच्या उंड्यात जास्त पुरण घालून बनवलेली...जीभेवर ठेवली की विरघळणारच!   
    पंचामृत, पातळ भाजी, भजी, कायरस,तव्यावरचं पिठलं अहाहा!हे जेवणाची लज्जत वाढवणारे पदार्थ, माझ्या आई च्या हातचे बनवलेेेले खाण्याची लागलेली सवय तिला जाऊन आठ वर्षे झाली तरीही जीभेवर रेंगाळतेच आहे अजून....  
    तिने बनवलेले उकड शेंगोळे,वरणफळं आणि नागपंचमीला करतात तो वाफेवरचा भरड्याचा ढोकळा...आजही पाणी सोडतात तोंडाला...
           चिवडा, पोहे, दहीपोहे, लावलेले पोहे, बेसनाचे, नारळी पाकाचे आणि सत्यअंबेच्या प्रसादाचे लाडू हे सारेच आईने बनवलेले त्याला तोडच नसायची अगदी....मग काय जाता येता त्यावर ताव मारणं चालूच रहायचंय... 
    करंजी, चकली, साटोरी हे पदार्थ बनवणं हा देखील तिचाच हातखंडा होता...वेगवेगळ्या खिरी,श्रीखंड,बासुंदी फारच लज्जतदार मधूर! ही पण आईची खैसियतच....
    या जीभेला लहानपणापासून या चवींची लागलेली सवय आईच्या हयातीत माझ्या वयाच्या अर्धशतकापर्यंत चाखलीए मी...अशी सहजासहजी जाणे कदापीही शक्यच नाही...
   आज,रंगपंचमी,आईचा आठवा स्मृतिदिन म्हणून आठवणी जाग्या झाल्या नकळतपणे....खरं म्हणजे, तिच्या आठवणींचा डोंगर मनात अगदी आत स्थिरावलाय,पण आजच्या निमित्ताने या आठवणी मी वेचून ठेवल्या तिचे स्मरण करत करत....आणि "सुगरण" आईशी नकळतपणे संवाद साधलाय मी या निमित्ताने...   
   
नंदिनी म. देशपांडे.       
रंगपंचमी २०२३.     
🌹🌹🌹🌹

शनिवार, २७ मे, २०२३

फुलांचा हार.

फुलांचा हार
-‐------------------------------

आहाहा! किती सुवासिक, नाजूक शुभ्रफुले गुंफली आहेत ही...अगदीच ताजी ताजी....सारखं हाताळून खराब हण्याची भिती वाटते...असाच सारखा बघत रहावा असे वाटते...
पण याकडे बघत असताना कितीतरी विचार मनात येवून गेले...
     खरं म्हणजे हा सुंदर हार देवघरातील देवाच्या तसवीरीवरच जास्त शोभून दिसेल...मध्यभागी केशरी फुलांचे पदक आणखी सौंदर्य खुलवत जाते आहे...देवाच्या मुर्तीच्या गळ्यात विषेशत्वानं खुलेल हा हार!असो...

  एखाद्या नवपरिणीतेच्या केसांमध्ये माळून याच हाराची हेतूच बदलेल नाही का?नव्हे तो केसांत गजरा म्हणून छानसा मिरवेल...
लाजत मुरकत आपलं आरसपाणी सौंदर्य बहराला आलंयं याची जाणीव तिला करवून देईल...
    
     पण जर हार  एखाद्या पुढार्याच्या किंवा उत्सव मुर्तीच्या गळ्यात गेला, तर मात्र अजून एक अर्थ घेऊन येईल, ज्याला सत्कार, कौतूक असे म्हणता येईल....
    
     हाच हार शुभमंगल प्रसंगी नवरा नवरीच्या गळ्यात पडतो, आणि दोघेही परस्परांच्या गळ्यातील ताईत कधी बनून जातात त्यांनाच समजत नाही...आहे की नाही गम्मत!
     
    पण असाच हार एखाद्या व्यक्तीच्या फोटोला घातलेला असेल तर एकदम संदर्भच बदलतो...
यामागचा हेतू आणि उद्देश दोन्हीही पापणीच्या कडा ओलावणारे....

    एखाद्या यंत्रावर, वस्तुंवर, असेच काहीसे घाालेले हार मात्र उद् घाटनाचा,नवेपणाचा आपला बाझ सांभाळून असतात...तर....
घरांवर सणावाराला लावलेले हार उत्सवी वातावरण सोबत आणतात...सार्या घराला आनंदी उत्साही बनवतात...
  
    आणि....आणि....  हाराने जर सरणावरच्या निर्जीव कलेवरावर जागा शोधली तर...तर. 
....निःशब्द व्हायला होते...काय बोलणार....

     तर अशा प्रकारे हार फुलांचाच असतो, तो कधी मनात भक्तीभाव निर्माण करतो, कधी प्रणय भावना जागृत करतो तर कधी कधी कौतुकाची थाप पाठीवर देतो....हाच हार नवरा बायकोची लग्नगाठ बांधतो तर
       कधी उत्सव, उत्साह यांना मनसोक्त दाद देतो तर 
      कधी आठवणींच्या मोरपिसारा फुलवतो...तर तर कधी मनातील व्याकुळता हुरहुर यांचे प्रतिक बनतो...
      " हार " (फुलांचा)अशा पधादतीने संदर्भाने आपला हेतू बदलतो भावनांचा आदर करत स्वतःचे अस्तित्व जपून असतो...आणि लोकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण करतो...
हार एकच तरीही संदर्भाचे कोंदण लागले की आपल्या मनातील भावनांना वाट करवून देतो....अशी बहुपदरी ख्याती सांभाळत आपले महत्त्व कायम ठेवतो तो असाच फुलांचा हार असतो....काय खरे आहे ना?

©️नंदिनी म.देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹🌹

मंगळवार, १६ मे, २०२३

पहाडांचा देश,भुतान....

*पहाडांचा देश*,    
*"भुतान"*
***********
लेखिका-
©️नंदिनी म. देशपांडे.

           आठ दहा वर्षे झाली...सर्वांत अगोदर हिमाचल प्रदेशाची एक  पर्यटक म्हणून सैर केली...थोडी वाटली भिती,तेथील वळणावळणांचा प्रवास,ते खचलेले रस्ते, पाण्याच्या प्रवाहाने सातत्याने उघडी पडलेली वळणं आणि ड्रायव्हिंग साठी लागणारं विशेष कौशल्य हे सारंच थोडसं छातीत धडकी भरवणारं असं होतं...भव्य पहाडी प्रदेशातून मोठी म्हणावी अशी ती पहिलीच सहल!
   नंतर दोन एक वर्षात, कश्मीरची सहल केली...अर्थातच भारताचे एक सुंदर "नंदनवन" याच दृष्टिकोनातून तेथील निसर्ग न्याहाळला आणि तेथूनच मग हिमपर्वतांच्या आणि हिमालयाच्या रांगड्या पहाडांच्या आम्ही दोघेही जणू प्रेमातच पडलो...

         हिमालयिन रांगांमधून भटकंती साधत, त्याच्या सहवासाची ओढ काही स्वस्थ बसू देत नाही आजही...हाच धागा पकडून उत्तरांचल, अरुणाचल ह्याही प्रदेशांमध्ये भटकंती पार पडली आमची...आणि गेल्या आठवड्यातच "भुतान" या छोट्याशा देशाची सैर केली...
       किती छोटा देश तो!केवळ वीस जिल्ह्यांचा!अहो आपल्या महाराष्ट्राएवढाही नाही!आश्चर्य वाटले...बघण्याची उत्सुकता जागी झाली आणि तडीसच नेली...

       कोरोना काळापासून बाहेरच्या कोणत्याही एअरवेज ला परवानगी नाही या देशात....
     सहाजिकच बागडोगरा या प. बंगाल मधील शहरापर्यंत विमानाने गेलो आम्ही, आणि बागडोगरा या भुतान आणि भारताच्या सीमेवरच 'इमिग्रेशन' आणि 'व्हिसा ऑन अरायव्हल' या प्रक्रिया पूर्ण करत, मिनी बसने या देशाच्या सफरीवर निघालो आम्ही!
      गाडी सुरु झाली, आणि पाच दहा कि.मी. पर्यंतही गाडी वेग घेते न् घेते तोवर मोठ्या मोठ्या डोंगर रांगांमधून वळणं गिरक्या घेत आहेत लक्षात येऊ लागले...

         स्वच्छ व चकचकीत रस्ते, रहदारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे बसचे हसरे चालक, रहदीरीसाठी आवश्यक सुचनांचे स्पष्ट फलक आणि मार्किंग हे सारेच आम्हा भारतीयांना आचंबित करणारे होते...आपल्याला सवयच नाहीए ना एवढ्या व्यवस्थितपणाची!
         अतिशयोक्ती सोडा पण या देशाची एकूण लोकसंख्या केवळ साडेसहा ते  सात लाख,  हेच याचे गुपित असावे असे वाटते....
     असंख्य पहाडांच्या कुशीत ,मनमोकळ्या विशाल अशा सौंदर्यपूर्ण निसर्गाच्या सान्निध्यात आणि अल्हाददायक हवामानाच्या लयीने आपले आयुष्य जगणारा हा देश आपल्या भारतीय घड्याळापेक्षा बरोब्बर अर्धा तास पुढेच धावतो!
      फारसा प्राचीन असा इतिहास नसणारा हा भुतान तीन वेळेला,म्हणजे एकदा ब्रिटिशांच्या, एकदा तिबेटच्या तर एकदा उल्फा अतिरेक्यांच्या चढाईला सामोरा गेला पण निधड्या छातीने आणि हिमालयिन रांगांच्या ढालीने यावर मात करुन गेला...हे सांगत असताना, आमच्या बसचा गाईड, जिमी त्याचे नाव,अभिमानाने उर भरुन आला होता....
      
     असंख्य गिरक्या घेत  शुध्द हवेचा अविरत स्रोत श्वासांमध्ये किती साठवून घ्यावा असेच वाटत राहिले....आपल्याकडे एवढ्या शुध्द हवेची वाणवा तर येथे प्रदुषणातील 'प्र' सुध्दा कुणाला माहिती नाही अशी परिस्थिती!
       शुध्द, गारेगार, अल्हाददायक हवेची सोबत, संगतीला ऊन सावलीचा खेळ आणि कधी कधी आकाशातील काळ्या मेघांची गर्दी सारंच हवंहवंसं!

         असा चाललेला प्रवास फुंगशुलिंग या पहिल्या मुक्कामी घेऊन गेला आम्हाला....रात्रभर आराम
झाल्यानंतर दिवसभराचा प्रवासाचा शिण पार पळून गेला...सकाळी नऊ वाजता भरपूर ब्रेकफास्ट आटोपून आम्ही भुतानच्या राजधानीचे शहर,"थिम्पु" या ठिकाणासाठी निघालो...अंतर कमी असले तरीही घाटाच्या रस्त्यांवरून ते कापण्यास वेळ जरा जास्तच लागतो...

         थिम्पु या राजधानीच्या शहरात आम्ही दाखल झालो, तेंव्हा सायंकाळ होत आलेली होती...जास्त उंचीवर आल्याने हवेतील गारठा वाढलेला जाणवला...हॉटेल च्या रुम मध्ये वॉर्मर्स होती त्यामूळे बाहेर आल्याशिवाय हवामानाचा अंदाज येत नव्हता....थिम्पु मधील ट्रेक आणि व्हॅलीज दोन्हीही छानसे एन्जॉय करता आले...
      सकळी नाश्ता आटोपत शहर आणि परिसर रपेटीला निघालो...
सर्व प्रथम आम्ही, तेथील राजाचे स्मृतिचिन्ह म्हणून उभे असलेली सर्वात जुन्या असणाऱ्या  मॉनेस्ट्रीला भेट दिली...
     मागच्या वर्षीच अरुणाचल प्रदेशातील आणि या वर्षी भुतान मधील बऱ्याच मॉनेस्ट्रीज बघण्याची संधी मिळाली....पण दोन्हीही वेगवेगळ्या विचारधारांनी प्रेरित आहेत आणि त्यांचे तत्त्वज्ञानात सुध्दा थोडाफार फरक जाणवला...देशपरत्वे फरक जाणवणे अगदीच सहज शक्य आहे...
      भव्यदिव्यता, स्वच्छता आणि शांतता या तीनही गोष्टी दोन्ही प्रदेशात सारख्याच होत्या, पण या मठांच्या वास्तू रचनेत फार फरक वाटला....
       बौध्द धर्मातील आद्य पुरुष पद्मनाभ आणि गौतम बुद्ध यांच्या प्रचंड मोठ्या मुर्ती माणसाची नजर खिळवून ठेवतात....शिवाय गाभाऱ्यात चोहोबाजूंनी मांडुन ठेवलेल्या छोट्या छोट्या मुर्ती आपले लक्ष वेधून घेतात...
           कोणत्याही मॉनेस्ट्री  मध्ये अतिशय सुंदर असे रंगीबेरंगि कोरलेले काष्ठशिल्प फारच अप्रतिम आहे...त्यात मोठमोठ्या दालनात भलेमोठ्ठे सुबक खांब आणि त्यांवरील शिल्प मनाला भुरळ घालतात. या शिल्पांमध्ये बौध्द धर्माच्या प्राचीन वाङमयावर प्रकाश टाकलेला दिसतो...
       अतिशय व्यापक जागेवर बांधल्या गेलेल्या या दिव्य वास्तू मनाला शांतता बहाल करतात....
     या नंतर "ताशीचू डॉंग्झ" ,थिम्पुमधील नॅशनल लायब्ररी, ज्यात पवित्र अशा अनेक धार्मिक आणि मौल्यवान पुस्तकांचा फार मोठा संग्रह आहे...काही तर हस्ताक्षरात लिहिलेली, जीर्ण झालेली आहेत पण व्यवस्थित पध्दतीने जपलेला हा ठेवा छानच आहे....येथेच, ज्याचे गिनिज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेले विशालकाय कारातील पुस्तकही बघावयास मिळाले...
       गौतम बुध्दांचा प्रचंड मोठा अणि अती उंच असा भव्य् पुतळा असणारा बुध्दा'ज पॉईंट बघताना, माणूस रममाण होतो...या उंचीवरुन थिम्पु शहराचा नजारा फारच आकर्षक वाटतो...व्हॅलीत वसलेले शहर धुक्याची दुलई पांघरुन बसलंय असा भास होतो....
     फोल्क हेरिटेज म्यूझियम बघितले आणि आपल्या प्राचीन काळातील दैनंदिन जीवनाचा मोठा भाग असणारी अवजारे, वस्तू,आणि साधनं यांची आठवण झाली...
    जगाच्या पाठीवर कुठेही असो,अलवार उत्क्रांत होत होतच मानवाने प्रगती साधली आहे हे निर्विवाद सत्य होय!

       एका विशिष्ट झाडाच्या साली पासून कागद बनवण्याची प्रक्रिया अगदी जवळून प्रात्यक्षिकासह बघण्याची उत्सुकता पुर्णत्वास गेली, ज्यावेळी आम्ही ट्रॅडिशनल पेपर फॅक्ट्रीला भेट दिली...
        पेंटिंग आणि वुडन कार्व्हिंग जेथे शिकवले जाते अशा प्रशिक्षण केंद्राला भेट दिल्यानंतर त्या मागची मेहनत, एकाग्रता आणि कार्य कौशल्य यांचा सुरेख मेळ साधत बनवलेल्या वस्तू बघून या हस्तकौशल्याला खरोखरच सलाम करावासा वाटतो...हा भुतान मधील मोठ्या प्रमाणावर असणारा कुटिरुद्योग असणार हे नक्कीच...
      पाईन वृक्षांची मुबलकता, पहाडांचा गराडा आणि जंगलांचे अस्तित्व या साऱ्या गोष्टी भुतीनीज लोकांसाठी वरदान ठरल्या आहेत..
      "ताकिन"नावाचा प्राणी हा भुतानचा राष्ट्रीय प्राणी आहे...हा अत्यंत रागीट आणि थोडासा अस्ताव्यस्त म्हणावा असाच...तो बघण्यासाठी "मोतथँग झू" ला थोडा ट्रॅक करत भेट दिली...पण तो झोपलेलाच दिसला आणि निराशा पदरी पडली...
    हा प्राणी मला, केरळ मध्ये बघितलेल्या "वारायाडू" या प्राण्याशी साम्य सांगणारा वाटला..
     दोन दिवस दोन रात्री थिम्पुमध्ये घालवल्याचे सार्थक वाटले...
महाराष्ट्रातील उन्हाची काहिली टाळत थंड हवेच्या ठिकाणी आल्याचे समाधान फार मोठे होते...

         तिसऱ्या दिवशी आमच्या बस ने थिम्पुहून पुनाखा च्या दिशेने प्रस्थान केले...बोलका आणि पदवीधर असणारा गाईड प्रवास चालू असताना आम्हाला भुतानच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती विषयी माहिती द्यायचा....राजेशाही पध्दतीचा स्विकार करणार्या भुतान देशातील नागरीकांनी तेथील वंशपरंपरागत राजेशाहीला डोक्यावर घेतलंयं असं जाणवलं...राजाचे स्थान त्यांना ईश्वरापेक्षा काही कमी नसावे असेच वाटत राहिले....ठिकठिकाणी ओळीने प्रत्येक राजाचे तसेच त्याच्या परिवाराचे मोठे मोठे फोटोज येथे लावलेले दिसतात....कोरोना काळात राजाने आपले शेअर्स विकून लोकांसाठी निधी ऊभा केला व मदत केली, याची कृतज्ञता जनता तेथे व्यक्त करते....भारत मित्र राष्ट्र असून दोन वेळेला मोदीजींनी भुतान ला भेट देवून आर्थिक मदत केली याचीही वाच्यता त्या गाईडने आवर्जुन केली...
      राजाने, आपल्या राणीची निवड अगदी सामान्य माणसांमधून केली आहे याचा या नागरीकांना अभिमान वाटतो...
        समाजात मुलींचे स्थान वरचढ आहे...घटस्फोटाचे प्रमाणही बरेच वाढते आहे हे लक्षात आले....
       हॉटेल व्यवसायात आणि इतरही व्यवसायात मुलींचे प्रमाण मोठे आहे...अगदी मेहनतीची कामं करण्यातही.... प्रशाकीय क्षेत्रात मात्र पुरुषांचे वर्चस्व असावे असे समजले...असो....

      थिम्पुहून पुनाखाला जाताना आम्ही 3100 मी.उंचीवर असणारा रम्य असा डोचुला पास हा व्ह्यू पॉईंट बघितला....हवेतील थंडावा, आजूबाजूला हिरवळीने फुललेल्या छोट्या मोठ्या टेकड्या, आणि झुळूझुळू वाहणारी हवा अंगावर रोमांच उठवत होती...अशा वातावरणात गरमागरम कॉफीचा आस्वाद म्हणजे सोनेपे सुहागा! बराच वेळ रेंगाळत तेथे फोटोशुट करणे आनंद देऊन गेले...
      उल्फा अतिरेक्यांशी लढताना मारले गेलेल्या एकशे आठ लोकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भुतानच्या राणीने बांधून घेतलेले एकशे आठ स्तुप  येथे एका टेकडीवर आहेत....त्यापैकी प्रत्येकाचे बलिदान फार मौल्यवान असल्याचे गाईड ने सांगितले....
     बसचा कॅप्टन अगदी हसरा आणि रिकापणात सुरेल बासरी वाजवण्यात मग्न असायचा...

         डोचुला पास वरुन पुनाखात प्रवेश करण्यापुर्वि आम्ही, भुतान मध्ये लांबीने दुसर्‍या क्रमांकाचा असणारा सस्पेन्शन ब्रिज पादाक्रांत केला....नदीच्या विशाल पात्रावर आपण तरंगत चालतोय ही कल्पना चालताना मध्यावर आलो आपण,की धडकी भरवते...पण आल्हाददायक वातावरणात मजा आणली या रपेटीने!वार्‍या चा वेग चालताना काळजी वाढवत होता मात्र...

       भुतान मधील "पुनाखा" हे शहर बऱ्या पैकी मोठे आणि राजधानीचे जुने ठिकाण...येथे आम्ही पुनाखा डिझॉंग ला भेट दिली...डिझॉंग म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण आणि प्रशासकीय कामकाज चालवणारी सारी कार्यालये एकाच आवारात असणारे ठिकाण....किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असे आपण म्हणू शकतो...बाहेरुनच या मोठ्या मोठ्या ईमारती नजरेखालून घातल्या...अगदी अप टू डेट असणाऱ्या या नेटक्या इमारती अभूतपूर्व स्वच्छता राखून होत्या आणि रंगीबेरंगी पानाफुलांच्या विषेशत: गुलाबाच्या वाफ्यांनी सजवलेल्या होत्या....त्यामुळे ही निरस ठिकाणंही रमणीय बनलेली होती....
        सुर्यास्त होण्यपुर्वि आमच्या पैकी बऱ्याच जणांनी पुनाखात रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेतला...मी मात्र दुरुनच हे सारं न्याहाळण्यात धन्यता मानली...

         भुतान मध्ये मला सर्वांत जास्त आवडलेले शहर आणि निसर्ग म्हणजे पारो....जिल्ह्याचे ठिकाण, निसर्गसौंदर्याने नटलेले....खरे तर अख्खा भुतान देश निसर्गावर निस्सिम प्रेम करणारा आणि त्याला धक्काही लागू नये याची कळजी वाहणारा...निसर्गाला न छेडता होईल तेवढीच प्रगती साधणारा..."हेल्पिंग नेचर स्विकारत सदैव आनंदी रहाण्याचा मूलमंत्र सांगणारा असा....

          पारो,आणखीन उंचावरचे आणि सहाजिकच थंडी असणारा परिसर...ही आरामदायक सहल आपल्याकडच्या उन्हाळ्याला काही दिवस पर्याय म्हणून होती...त्यामूळे येथे आरामात तीन दिवस राहिलो आम्ही...
         पहिल्या दिवशी थोडे तेथील मार्केट मध्ये फिरुन हस्तकौशल्याने बनवलेल्या काही वस्तुंची खरेदी साधली....मार्केट अगदी छोटेसेच....ओळीने दुकानं, पर्वतराजींनी आणि त्यातही हिमपर्वतांनी वेढलेलं हे शहर...कुठुनही दिसणारा निसर्गाचा नजारा बघतच रहावा असाच...क्षणभर येथे रहाणार्‍या स्थानिक लोकांचा हेवा वाटला...असो. 
       दुसरा दिवस पारो मधील काही मॉनेेस्ट्रीज, डिझॉंग बघण्यात अर्धा संपला...कुठलेही ठिकाण बघावयाचे म्हटले की, बराचसा ट्रेक असायचाच...कधीही ट्रेकला न गेलेली मी भुतान मध्ये एवढी चढ चढतच राहिले याचे मलाच फार आश्चर्य वाटले...
        'पाय बोलणं','पायांचे तुकडे पडणं ' वगैरे वाक्प्रचार येथे प्रत्यक्ष अनुभवले मात्र झोपही पटकन आणि मुरमुसून लागायची...
       पारो परिसरात बघितलेला सर्वात प्राचीन आणि अगदी कठिण असा खडा 6 कि.मी. ट्रेक असणारा,ता झांग् प्राचीन ताक्शँग (टायगर्स नेस्ट) मॉनेस्ट्री...एवढा ट्रेक शक्यच नव्हते...आम्ही आपला व्ह्यू पॉईंट बघत खालूनच फोटो कढले...
   उंच डोंगरात कपारीमध्ये बनवलेली ही मॉनेस्ट्री महंतांनी ध्यानधारणेसाठी उपयोगात आणल्याची सांगतात....याच्याच पायथ्याशी असणारं पाईन वृक्षांचं जंगल मात्र वेड लावतं मनाला....उंचच उंच असंख्य वृक्षांना पाईन ची ती शेंगा वजा फळं लगडलेली होती...आणि हवेतील थंडगार गारवा यथेच्छ सोबत करत होता...

             आमच्या गाईडने, तेथील पुरुष वर्गात सारखे विड्याचे पान चघळणाच्या सवयीला धार्मिक अधिष्ठान असल्याचे सांगितले....
पण तेथील स्त्रियांना हे वागणे फारसे आवडत नाही हे सांगावयास तो विसरला नाही....
            पण गोरीगोरीपान तेही चकचकीत!बसक्या नाकांची ही माणसं पान खाण्याच्या सवयीने कायम लाल चुटूक ओठ घेऊन लिपस्टिक लावून असतात....

       "चेलेलापास" भुतान मधील मोटर वे ने जाण्यासारखे सर्वात उंच असे 3800 मी. उंचीवरचे हे हुडहुडी भरवणारे अतीथंड ठिकाण...हिमाच्छादित पहाडांनी वेढलेला, धुक्यानं भारलेला आणि वार्‍यावर डोलणारा हा प्रदेश...अगदी निर्मनुष्य....रस्तेही निर्मनुष्य आणि आवाजहीन... एवढ्याही शांततेची भिती वाटते आपल्याला...येथे येताना मात्र जंगलांमध्ये चरत असणारे 'याक'प्राण्यांचे कळप मात्र दिसले...

      पण सेलेला पास अगदीच भावले मनाला आणि मागच्याच वर्षी भेट दिलेले अरुणाचल मधील सेला पास या पॉईंट ची आठवण जागी झाली....

       भुतान मध्ये विषेश जाणवलेली बाब म्हणजे तेथील युनिफॉर्मिटी....कुठेही जा,तेथील स्त्रिया आणि पुरुष त्यांच्या परंपरागत पोषाखातच वावरतात..
सर्वांच्या कपड्यांचे डिझाईन सुध्दा एकच...बहुतेक बारीक चेक्स...फक्त रंगात वैविध्य....
       तसेच घरांची आणि बिल्डिंग्ज चे डिझाईन सुध्दा सारखेच....त्यांच्या घरांचच्या खिडक्या पारंपारिक वुडन कार्व्हिंग करत रंगवलेल्या आणि सजवलेल्या...
         रहावयाची घरं आणि कार्यालयं यांच्या छताचा रंग मात्र सगळीकडेच सारखा...फरक केवळ रंगात...लाल आणि हिरवा असा....

      सेलेला पास आणि भुतान मधील काळेकुळकुळीत  नागमोडी रस्ते, उंच उंच पहाडांची गर्दी, त्यातून दिसणारे निळे, सावळे, जांभळे आकाश, पारोमधील बर्फाळलेले आरशासारखे चमचमणार्या टोप्या चढवलेले पहाडांच्या टोकदार टोप्या,तेथील जंगलांना मिळालेलं पाईन वृक्षांचे सौंदर्य, रंगीबेरंगी फुलं, तेथील हवीशी थंडी, गारवा हे सारं मनात साठवून तेथील लोकसंगीताचा आस्वाद घेत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो...
       पारो-पुनाखा मार्गे भारतात प्रवेशत घड्याळ अर्धातास अलिकडे केलं... सिलिगुडी -बागडोगरा -पुणे  असे औरंगाबादेत "आपल्याघरी" परतलो...

🌹🌹🌹🌹🌹🌹

मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

नॉर्थ ईस्ट थ्री सिस्टर्स सहल.

🎍आमची नॉर्थईस्ट, थ्री. 
             सिस्टर्स सहल 🎍

©️लेखिका---
नंदिनी म. देशपांडे. 
तेजपूर --- दिरांग.

    आसाम मधलं तेजपूर हे ठिकाण, म्हणजे, अरुणाचल प्रदेशात प्रवेश करताना प्रवासाचे ठराविक अंतर पार करत; आराम करण्यासाठी एक सोयीचे ठिकाण... याच दृष्टिकोनातून हा मुक्काम होता आमचा...अर्थातच आल्हाददायक निसर्ग, थंडगार वाहती हवा, आणि सोबतीला पर्वतीय रांगांच्या महिरपी....असे सारे असेल तर माणसाला प्रवासाचा कंटाळा आणि शीण दोन्हीही येत नाही...निसर्गा चे अवलोकन करणं हा छंद असेल जवळच तर अशी भटकंती म्हणजे दुग्धशर्करा योगच!

    तेजपूर ते दिरांग या प्रवासात मात्र आपण आता पहाडांच्या वरच्या भागावर जात आहोत याची जाणीव होऊ लागली...आता पर्यंत च्या प्रवासात लांबून वळसा घालावयास लावणारी वळणं आता मात्र आपला व्यास कमी कमी करत चालली होती...तापमानात घटही कमालीची लक्षात येत होती...
हिमालयाच्या हिमाच्छादित रांगा जवळपासच असाव्यात याचे ज्ञान मनाला आणि वृत्तींनाही जाणवत होते...नव्हे, आता तर हिमाच्छादित शिखरं दृष्टिक्षेपात येऊन अंगावर रोमांच उभे राहू लागले...
    काळ्याशार पहाडांवर शुभ्र बर्फाच्या कणांनी, तुकड्यांनी रेखाटलेली सुंदर रांगोळी म्हणजे त्या अंबराच्या स्वागतार्ह, पाहूणचारासाठी या अवनीने स्वतःच्या हाताने रेखाटलेली सुंदर नक्षीदार रांगोळीच असा भास होत होता....
हा दिवस दिरांग च्या सान्निध्यात घालवला आम्ही...
प्रत्येक हॉटेलच्या परिसरात फुलांचे वैविध्य, त्यांचे रंग आणि रचना मनाला मोहवत असायची...प्रत्येक फूल डोळ्यात आणि फोटोतून जपण्याचा मोह खरोखरच अनावर होत असायचा...

   अरुणाचल प्रदेश हा केंद्रशासित प्रदेश आहे...येथे भारतीय सैन्य दलाच्या परवानगीशिवाय आपण या भुमीवर प्रवेश करु शकत नाही...
ठिकठिकाणी भारतीय सैन्यदलाचे रेजिमेंट्स आपल्याला दिसून येतात...भारतीय जवान पावलापावलावर तळ ठोकून आपल्या भारतीय सीमेचं संरक्षण करत असतानाचे दृश्ये दिसत रहातात...हे बघून आपला उरही अभिमानाने भरून येतो, आणि आपले मन अगदी नकळत त्यांचे आभार मानू लागते...
 आम्ही महाराष्ट्रीयन आहोत म्हटल्यावर,प्रवेशालाच एक सैनिक आमच्याशी मराठीत संवाद साधत होता..'मी लातूरचा आहे' असे त्याने म्हणताच,कृतकृत्य झाल्यासाखे वाटले...बुलढाण्याच्या एका सैनिकानेही मुद्दाम आपली महाराष्ट्रीयन ओळख सांगितली आणि आम्हाला फार आनंद वाटला...त्यालाही आमच्याशी बोलून छान वाटत आहे हे लक्षात आले आमच्या..

  दिरांग वरुन तवांगला जातानाच्या  प्रवासाच्या रस्त्यात आम्ही 500 वर्षे जुनी असणारी मॉन्स्ट्री (भगवान गौतम बुध्दांचा मठ) बघितला...
    किंबहूणा अरुणाचल प्रदेश हा भव्य दिव्य मॉन्स्ट्रीजचा प्रदेश आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही....
  भगवान गौतम बुध्दांचा वास या भुमीला सदैव शांती, प्रेम, आस्था बहाल करतो...एका बाजूला निसर्गाचे विराट रुप, स्वर्गाच्या स्पर्शाला आसुसलेले प्रचंड मोठे हिमाच्छादित शिखरं...आणि दुसरीकडे मॉनस्ट्रीजचे पावित्र्य यांचा सुंदर मिलाफ साधून ताठ मानेने ऊभा असणारा हा प्रदेश...
बौध्द धर्माची विलक्षण छाप जपणारा असाच आहे...
ठिकठिकाणी शांतीचा संदेश देणाऱ्या पताका फडकावत संदेश देत रहातो...
एकापेक्षा एक भव्य दिव्य मॉन्स्ट्रीज, त्यात असणारे,गौतम बुध्दांचे भव्य पुतळे आणि समानतेचा संदेश देणारी त्यातील अनेकविध गोष्टी, वस्तू, तेथील प्रचंड मोठे ध्यान मंदीर आणि मनाला मिळणारी शांतता हे सारंच अद्भुत आहे हे जाणवत रहातं...
  अशा कितीतरी मॉन्स्ट्रीज ना आम्ही भेटी देवून मःशांती अनुभवली या प्रदेशात! प्रत्येक मठातील स्वच्छता, रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांची जोपासना आणि रचना हे सारंच अप्रतिम होतं!

      सेलापास....
    -----------------

तवांगच्याच या रस्त्यामध्ये "सेलापास" नावाचे एक सरोवर आहे...1962 च्या भारत चीन युध्दात सेला नावाच्या मुलीने भारतीयांच्या विजयासाठी फार महत्वाची भुमिका(मदतनीस म्हणून)
बजावली होती...
तिच्या स्मरणार्थ भारत सरकारने बनवलेले हे सरोवर आहे...
   तवांगची ही भुमी हे युध्द चालू असतानाची साक्षिदर आहे...युध्द यशस्वीपणे पेलत, विजयश्री आपल्याकडे खेचून आणली तेच हे 'तवांग' होय....
      सेलापास या सरोवराने तवांगला उर्वरीत भारतभुमीशी जोडून ठेवलेले आहे...म्हणूनही हे सेला पास....
निसर्गाचा अप्रतीम अविष्कार असणारा सेला लेक अक्षरशः आपल्या डोळ्याचे पारणे फेडतो...दुतर्फा शुभ्रतेने नटलेले हिमपर्वत....संपूर्ण पणे गोठून पाणेरी कडक बनलेला चकचकीत पृष्ठभाग म्हणजेच सेला लेक होता..
अगदीच अवर्णनीय होतं हे सारंच...या ठिकाणी ऑक्सिजन चे प्रमाण कमी असते म्हणून बऱ्याच  लोकांना त्रास होऊ शकतो...पण आम्हाला तसे काही जाणवले नाही...याच निसर्गरम्य परिसरात किततरी वेळ रेंगाळत आम्ही आमचे पॅक लंच उघडले आणि मनसोक्त पिकनीक साधून घेतली...

    भारत-चीन युध्दात फारच महत्वाची जबाबदारी पार पाडत शहिद झालेले कॅप्टन जसवंत सिंह यांच्या स्मरणार्थ ऊभे केलेले एक अनुपमेय  मेमोरियल बघण्याचा योगही याच तवांगने घडवून आणला...
"जसवंत घर" असे त्याचे नाव...
प्रत्येक भारतीयाचे स्फुर्तीस्थान असणारे हे ठिकाण... आम्ही विनम्रपणे अभिवादन करत जसवंत सिंहाचे मनोमन आभार मानले...शुध्द हवेवर ऊंच फडकणार्या आपल्या तिरंग्याला आणि जसवंत सिंहांच्या स्मृतिंना जयहिंद करत आम्ही  तेथून निघालो...
   
   महाराष्ट्रभर कडक उन्हाळा असताना आम्ही मात्र थंडीमध्ये कुडकुडत त्या रात्री गरम पांघरुणात लपेटून निद्रादेवीच्या स्वाधीन झालो..

     प्रसन्न सकाळी भरभरुन मोकळा श्वास घेत आम्ही दुसरे दिवशी तवांग शहरात असणाऱ्या जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या आणि भारतातील पहिल्या क्रमांकाच्या सुंदर मॉन्स्ट्रीला भेट दिली...18 फुट ऊंच असणारा भगवान गौतम बुध्दांचा 
भव्य पुतळा कुठूनही लक्ष वेधून घेत होता...सभोवती असणाऱ्या हिमालयाच्या रांगा आपल्या भोवती फेर धरुन आनंदाने नाचत आहेत असा भास होत होता...या अवनीचे अतीसुंदर रुप आपण जवळून न्याहाळत आहोत ही भावना मनातून कृतज्ञता व्यक्त करत आहे या निसर्गा प्रती... हे समाधान घेऊनच अख्खा दिवस तवांगच्या रम्य सान्निध्यात राहिलो आम्ही.... त्याच सायंकाळी,तवांग वॉर मेमोरियल येथेच नितांत सुंदर असा लाईट अँड साऊंड शो बघितला....
राष्ट्रध्वजाला वंदन करत राष्ट्रगीत गायले आणि तवांग च्या भुमीचे आभार मानत दुसरे दिवशी सकाळी तेथून पुढच्या प्रवासासाठी म्हणजे बोंम्डिला या गावी जाण्याची परवानगी घेतली...

  तवांग --- बोंम्डिला.
-------------------------

   दोन दिवस मस्तपैकी तवांग हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण अनुभवले आणि तिसरे दिवशी बोम्डिला या गावी जाण्यास निघालो आम्ही....प्रवास 175 कि.मी.चा, बऱ्या पैकी मोठे अंतर कापायचे होते...कोणताही त्रास होऊ नये आणि कंटाळवाणाही होऊ नये याची भरपूर काळजी घेण्यात येत असे...
मुळात मेघालय आणि अरुणाचल प्रदेशाची सहलीचा हेतूच निसर्गाच्या सान्निध्यात अगदी समरसून रहाणे, अनुभवणे आणि आनंद मिळवणे हा होता....अशा निसर्गात भटकंती कोणाला आवडणार नाही!!...शिवाय रस्ते एकदम छान होते...अगदीच काही ठिकाणी काम चालू असल्याने अगदी थोडी गैरसोय व्हायची पण अगदीच नगण्य अशीच...
     गाड्या आरामदायक होत्या, चालकही चांगले होते आणि नागमोडी चालीने प्रवास करण्यास मज्जा येत होती...
   
      तवांगहून बोम्डिला शहरी जाताना रस्त्यात "गँगॉंग अन् गमपा"
या ठिकाणी अति सुंदर असा "नुरांन्ग"
नावाचा अती उत्कृष्ट निसर्गाविष्कार आम्ही बघितला...हा एक डोळ्याचे पारणे फेडणारा सुंदर धबधबा आहे...
ऊंचावरुन वेगाने खाली पडणारे शुभ्रफेसाळ पाणी, आसमंतात आपले तुषार उडवत आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करतात...या धबधब्याच्या अगदी पायथ्याशी जाऊन उभे रहाण्यात आणि हा थंडगार शॉवरबाथ घेणं एक अविस्मरणीय अनुभव आहे...
हेच फेसाळलेले पाणी खाली पडून नदीमध्ये एकरुप होऊन आपला प्रवाह शांत करते...नयनसुख काय असतं ते प्रत्यक्षात अनुभवायलाच हवं...
    सेला लेक ज्या प्रमाणे सेला नावाच्या मुलीच्या स्मृती जपण्या साठी तयार झालाय... 
अगदी त्याच कार्यात (युध्दजन्य परिस्थितीत) सैनिकांना मदत केली म्हणून सेलाचीच मैत्रीण,नुरांग् हिची आठवण म्हणून या धबधब्याला "नुरांग्न वॉटरफॉल" असे नाव देण्यात आले आहे...
बराच वेळ रेंगाळत या धबधब्याचा आनंद अनुभवला आणि आम्ही बोम्डीलाच्या दिशेने प्रयाण केले...

    बोम्डिला शहर प्रवेशाच्या अगोदर आणखी एका बौध्द मठाला भेट दिली...
   दिवसभराच्या प्रवासाने आरामाची आवश्यकता आहे ही जाणीव करवून दिली आणि यथेच्छपणे रात्रीचे जेवण घेऊन आम्ही  निद्रेच्या स्वधिन झालो...थंडीचा कडाकाही काहीसा कमी झालेला होता....सकाळी पुनः कझिरंगाच्या प्रवासासाठी सिध्द व्हायचे होते आम्हाला...

बोम्डीला--काझीरंगा .
   दुसरा दिवस आमच्या सहलीच्या शेवटचा टप्पा ठरणार होता...बोम्डिला ते काझिरंगा हा सहा तासांचा प्रवास करुन आम्ही आसामच्या काझीरंगा या जुन्या आणि मोठ्या अशा राष्ट्रीय पार्क मध्ये प्रवेश केला....
पार्क असले तरीही एक मोठे शहरच होते हे!फार मोठा परिसर या पार्क च्या रुपाने पालथा घालण्याची संधी मिळाली आम्हाला....
ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेले हे पार्क एप्रिल च्या शेवटा पर्यंतच पर्यटकांसाठी खुले असते...
  मे पासून आसामात पावसाळा चालू होतो...ब्रह्मपुत्रेच्या पाण्याची पातळी वाढते आणि सारं जंगल तिच्या पाण्याने व्यापून जाते...एप्रिल च्या शेवटी तेथे असणारे प्राणी, पक्षी डोंगराळ भागाकडे कूच करतात...
 काझिरंगा नॅशनल पार्क मध्ये कायम दलदल असण्याचे हेच खरे कारण आहे....
मार्च च्या शेवटीही जंगलामध्ये भरपूर पाण्याचे साठे असल्याचे दिसून आले...
   हे जंगल फारसे दाट नसावे असे वाटते....पण गेंडे आणि हत्ती यांची बरीच वर्दळ असणारे हे ठिकाण आहे...
   आमचे मुख्य आकर्षण होते ते  म्हणजे हत्तीवर स्वार होऊन जंगलात सैर करुन येणे...
      दुसर्‍याच दिवशी भल्या पहाटे आम्ही हत्तीच्या सफारीसाठी जंगलात पोहोचलो...माहूत आपले हत्ती घेऊन तयारच होते...
अंबारीवजा बेंचेस ची व्यवस्था स्वार होण्यासाठी हत्तीच्या पाठीवर होती...बसे पर्यंत थोडी भिती वाटली...पण मग मात्र निश्चिंतपणे मुक्त सैर केली जंगलात...या एक दीड तासाच्या सफारीवर असताना आम्हाला बरेचसे गेंडे, हत्तीचे कळप, हरीण, सुसर असे प्राणी दिसले...
रानरेडे, आणि काही पक्षी एवढीच काय ती संपत्ती दिसली जंगलाची,पण आमची नजर वाघोबाचा वेध घेत होती...पण शेवटी भ्रमनिरासच झाला..हा अनुभव मात्र मजा चाखून गेला आम्हाला...
     दुपारच्या सत्रात जीप सफारी केली...तेंव्हा तरी दिसेल काही असे वाटले, पण छे!एखाद दुसर्‍या गेंड्या शिवाय काहीही दिसले नाही...

      याच परिसरात असणाऱ्या ऑर्चिड पार्क मध्ये मात्र फार उपयुक्त माहिती मिळाली आणि एकाहून एक सुंदर सुंदर ऑर्चिड्सचे रंग, गंध आणि प्रकार अगदी जवळून बघितले...एवढी सारी फुले बघून मन हर्षोल्हासित झाले आणि काझीरंगाला भेट देण्याचे सार्थक वाटले....
  या शिवाय कॅक्टस गार्डन मध्ये कॅक्टस च्या कधीही न बघितलेल्या कितीतरी जाती बघावयास मिळाल्या...अक्षरशः आचंबित व्हायला झाले....
    याशिवाय थोडीफार खरेदीही झालीच... आसामच्या बिहू नृत्याची आणि त्या मागील हेतू विषयी माहिती देत ह्या पारंपारिक नृत्याचे सादरीकरण खास आम्हा पर्यटकांसाठी हॉटल मध्ये आयोजित करण्यात आले होते...या सर्वांचा आनंद घेत आमचा मुक्काम आम्ही काझीरंगा परिसरात केला....निसर्गाशी हितगुज मनाला आनंद दायक वाटले...पण रात्री आणि सकाळी पाऊसाने मस्त जोरदार हजेरी लावत सलामी दिली आम्हाला....पण तारांबळ उडवली नाही मात्र....

काझीरंगा--गोवहाटी 
-------------------------

सकाळी पावसातच काझीरंगाचा निरोप घेऊन आम्ही गोवहाटीसाठी प्रवास चालू केला....
 प्रवेशालाच ब्रह्मपुत्रेच्या पाण्यात  एका बेटावर असणाऱ्या
 "उमानंदा " या अती प्राचीन महादेव  मंदिराला भेट देवून त्या शिवशंभो ला नमस्कार घातला...
जाता येता छोटासा बोटीचा प्रवास करुन घेतलेले दर्शन, व्दारकेच्या बेट व्दारकेची आठवण देऊन गेला....
खरं म्हणजे या रात्री आमचे ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावर क्रुझ डिनर ठरलेले होते....पण नेमके याच दिवशी आसामचे मुख्यमंत्री शहरात येणार होते आणि याच क्रुझवर त्यांच्या डिनरचे आयोजन केलेले होते....सहाजिकच आम्हाला माघार घ्यावी लागली...
आम्ही आपले छानपैकी हॉटेल डिनर एन्जॉय केले आणि सकाळी परतीचे वेध घेत निद्राधिन झालो...

   हा आमचा सहलीच्या निरोपाचा दिवस होता...शुचिर्भूत होऊन नाश्ता आटोपला आणि गोवहाटीत असणाऱ्यां कामाख्य देवीच्या दर्शनासाठो सज्ज झालो....
साडेतीन पीठापैकी एक असणारं हे एक जागृत शक्तीपीठ आहे...मंदीरात गर्दी बरीच होती...अगदी गावातच असणारं पुरातन मंदिर,कोणतेही मंदिर असू द्यात, तेथील चित्र नेहमीच जसं असतं तसंच सारं सारं होतं येथेही....
मुखदर्शन घेऊन आम्ही देवीला मनोमन नमस्कार केला आणि सहलीची सांगता केली....
दुपारी दोन वाजेपर्यंत एअरपोर्ट गाठावे लागणार होते....तत्पुर्वि सर्वांनी एकत्रित जेवणाचा अस्वाद घेत परस्परांचा निरोप घेतला आणि आपापल्या मार्गावरच्या विमानात स्वार होऊन परतीचा प्रवास चालू केला...
आमचे विमान सर्वांत शेवटी रात्री दहा वाजता होते...
एअरपोर्ट वर बराच वेळ गर्दी ला न्याहाळत अवलोकन केले....
छोटेसेच होते एअरपोर्ट पण संपूर्ण देशाच्या प्रमुख शहरांशी जोडला गेलेले होते हे शहर!त्या मूळे गर्दी भरपूरच होती आणि विमानांची ये जा सुध्दा खूप मोठ्या प्रमाणावर होती येथे...
     ठरलेल्या वेळी आमच्या विमानाने टेक ऑफ केले आणि सहलीला जाताना पौर्णिमेचा पूर्ण चंद्र सोबत घेऊन गेलेलो आम्ही,सहलीहून येताना मात्र काळ्याभोर आभाळात आकाशगंगा आणि कितीतरी लखलखतं चांदणं सोबत घेऊन चाललो होतो....
    फाल्गुनाच्या परतीचा काळ होता तो...चांदोबा मात्र गडप होऊन गेले होते या काळ्या आभाळाच्या पोटात....पुन्हा नव्याने, नव्या रुपात लवकरच प्रकटण्यासाठी.....
आम्हीही अडीच तासाचा विमान प्रवास आणि त्या नंतर पाच तासांचे मार्गक्रमण करत सुर्योदयाच्या साक्षीने आमच्या घरी परतलो....
जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही सहलीला, पण आपल्या घराची ओढ मात्र कायम आपली सोबत करत असते आणि आल्या नंतर "आपले घर ते आपलेच घर....त्याची सर नाहीच कशालाच.."
हा विचार येतोच येतो.....

समाप्त....
दि. 23-4-2022.


🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, २७ मार्च, २०२३

कवितेची कविता.

कविता⚘
*******************
 मनीच्या कल्पनांना. 
   शब्दरुपी पंख 
  फुटतात 
  गूज एखादे मनात
  रुजते अन् 
  अंकूरते
  सौंदर्यदृष्टिला 
  कल्पनेचा बहर येतो 
  उपमा अलंकार 
  मनावर राज्य 
  करु लागतो 
  आठवांची मखमल 
  शब्दशिंपण घालते 
  अशावेळी अवचितच 
   मनात काव्य
   विलसत जाते 
   काव्याचं 
   विलसत जाणं
   जेंव्हा शब्दांनी
   पुलकित होतं 
   तेंव्हा आणि 
   त्याच क्षणी  
  कविता प्रसवते 
  शब्दफुलांची 
  गुंफण होऊन 
  कागदावर उतरते 
  काव्याविष्काराची 
  ही सुंदर वीण 
  रुंजी घालत असते 
  वाचक तिला 
  मनाच्या गाभार्‍यातून 
  वाचत जातो 
  कवीयत्रीचं मन 
  अशा वेळी 
  काव्यशिल्प साकारल्यानं 
  हर्षित होत जातं....

आज २१ मार्च, 
कविता दिनाच्या 
सर्वांना हार्दिक शुभेच्छा....

©️ नंदिनी म. देशपांडे.

🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, १३ मार्च, २०२३

पुस्तक परीक्षण.

पुस्तकाचे नाव: 

द सायलेंट स्टाॅर्म.
लेखक - नारायण कुडलीकर.

      काहीच दिवसांपूर्वी नव्यानेच प्रकाशित झालेलं हे पुस्तक....पुस्तकाचे लेखक श्री नारायण कुडलीकर, यांच्या कुटुंबाशी आमचे फार पुर्विपासूनचे कौटुंबिक नातेसंबंध.....
त्यांनी मला स्वतः आवर्जून घरी आणून दिलेलं हे पुस्तक....मला म्हणाले,तू वाच आणि मला प्रतिक्रिया पाठव कसे वाटले पुस्तक याची......

     पूर्विच वाचनासाठी हाती असलेले पुस्तक संपवून मी लगेच "द सायलेंट स्टाॅर्म" वाचावयास घेतलं,आणि काय सांगू!वाचून पूर्ण होईपर्यंत जीवाला चैन पडेना... दररोजच्या दैनंदिनीतून वेळ मिळेल तसे तीन दिवसांत वाचून काढले मी हे आणि पूर्ण झाले की मोठ्ठा उसासा सोडला अगदी नकळतपणे....

   मला ऐकून माहिती असलेली  आलेल्या या वादळाशी या सर्वांनी दिलेली झुंज, पण "द सायलेंट स्टॉर्म" वाचल्या नंतर आपण या लढाईचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत असे वाटावयास लावणारे हे शब्दांकन....
  ‌ 
    आता प्रतिक्रिया लिहावयाची....खरंच काय लिहू? कसे लिहू?असे झाले अगदी...इतर पुस्तकांसारखे परीक्षण लिहिण्याच्या पलिकडचे आहे हे द सायलेंट स्टॉर्म....जेथे नियतीनेच आयुष्याच्या सारीपाटावर एवढी कठिण परिक्षा घेतली,त्याचे मी बापडी काय परीक्षण करणार आणि लिहिणार!

     हे खरं म्हणजे लेखकाच्या भावविश्वाचे,पुस्तक रुपात व्यक्त झालेले एक मनोगत आहे...साध्या सरळ माणसाच्या आयुष्यात ध्यानीमनी नसताना दबक्या पावलांनी एखादं वादळ यावं आणि हळू हळू त्याने अख्खं वर्षभर याच व्यक्तीच्या, त्याच्या कुटुंबाच्या भोवती घोंघावत राहावे...साऱ्या कुटुंबाच्या मानसिक, शारीरिक क्षमतेची परीक्षा घ्यावी आणि अत्यंत पराकाष्ठेचे प्रयत्न करत, या सर्वांनी मिळून हे वादळ परतवून लावावं....
     ते परतवताना स्वतःलेखकाच्या आणि त्यांच्या कुटुबीयांची होणारी मानसिक,भावनीक घालमेल...त्यांनी दाखवलेली कमालीचा खंबीरपणा, सकारात्मकता,जिद्द आणि त्यासाठी लागणारे प्रचंड मनोबल, ईश्वरावरची त्यांची  श्रध्दा,प्रेमाच्या,मैत्रीच्या,आणि रक्ताच्या नात्यांची ही वास्तव कहाणी आहे....
     देवानेही एखाद्याची किती परीक्षा बघावी आणि परिक्षार्थीने प्रचंड मनोधैर्य सांभाळत त्यात यशस्वी व्हावे...त्या यशाची ही खरी कहाणी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही....

     आयुष्याच्या एका वळणावर नियतीने घेतलेल्या परीक्षेची द सायलेंट स्टॉर्म ही, प्रत्यक्ष परीक्षा चालू असतानाचे  अप्रत्यक्ष वर्णन... पण वाचकाला वाचताना खिळवून ठेवणारे...पुढे काय झाले असेल?याची उत्कंठा सतत जागृत ठेवणारं, अप्रतीम शब्दांकन....
    लेखकाच्या मनाने घेतलेल्या ध्यासाची,पत्नीप्रेमाची,संसाररथाचे एक चाक खोल गर्तेत अडकले असेल तर, त्या चाकाला सर्वशक्तीनिशी वर उचलून सुरक्षित ठेवण्यामागचे अत्यंत भावस्पर्शी मनोगत आहे हे पुस्तक....
    लेखकाने आयुष्याच्या एका टप्प्यावर दिलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची द सायलेंट स्टॉर्म ही यशस्वीपणे सोडवलेली उत्तरपत्रिका असेच वर्णन मी करीन ह्या पुस्तकाचे....

     कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात कधीही असे निर्णायक क्षण येऊ शकतात...पण आलेल्या परिस्थितीला,आपल्याच सहचारिणीच्या बाबतीत आलेल्या गंभीर आजारपणाला जीद्दीने आणि अत्यंत सकारात्मकतेने,यत्किंचितही मनोधैर्य खचू न देता यशस्वीपणे कशी मात करावी?याचा पाठ घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने वाचावे असे हे पुस्तक...
     
    आपल्या पत्नीच्या गंभीर आजारावर मात करत असताना कौटुंबिक सदस्यांपासून ते डॉक्टर मंडळींपर्यंत ज्यांचा म्हणून सहभाग लाभला त्या सर्वांच्याप्रती आदरभाव व्यक्त करणारं हे एक मनोगत...
     
    वाचताना पूर्णपणे गुंतून जात भावूक बनत जातो वाचकही....आणि हिच लेखकाच्या लेखणीची ताकद आहे हे मान्य करावेच लागते.... पुस्तक वाचत असताना...
    घरातील एखाद्या सदस्याच्या बाबतीत गंभीर आजारपण आलेलं असताना समयसुचक वृत्ती जोपासत  योग्य निर्णय भराभर घेणं कसं गरजेचं आहे,आणि अशा आजारांनी येण्यापूर्वी पेशंटला दिलेले पुर्वसंकेत गंभीरपणे हाताळण्याची  किती गरज असते, 
  या सर्व बाबींचा उहापोह द सायलेंट स्टॉर्म या पुस्तकात आहे...
  वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीने लिहिलेले नसेल तरीही आपल्या माणसाच्या (पेशंटच्या) उद्भवलेल्या गंभीर आजारपणावर वैद्यकीय उपचार करताना,पेशंटचा काळजीवाहक म्हणून भुमिका बजावताना घ्यावयाची काळजी, डॉक्टरांच्या सुचनांचे काटेकोर पालन,पेशंटच्या खाण्यापिण्याच्या औषधांच्या वेळा,पेशंटची शारीरिक स्वच्छता करण्याची पध्दत,पेशंटचा व्यायाम या सर्वच गोष्टींची इत्यंभूत माहिती आपल्याला अचूक मिळेल असे हे पुस्तक होय..
 ‌एकूणच हे पुस्तक अतिशय वाचनीय बनले आहे...

     पुस्तक पुर्ण वाचले आणि मनोमन लेखक श्री नारायण कुडलीकर यांच्या अथक प्रयत्नांना सलाम करत, सौ.अलका ताईंना,उदंड उदंड आयुष्याचं दान मागण्यासाठी ईश्वरासमोर हात जोडले... प्रार्थनेसाठी अलगद ओठांवर शब्द उमटत गेले....

    श्रीकांत उमरीकर यांच्या जनशक्ती वाचक चळवळ प्रकाशनाखाली प्रकाशित झालेलं हे द सायलेंट स्टॉर्म पुस्तक निश्चितच वेगळ्या धाटणीचं,पण मार्गदर्शक असं एक चांगलं पुस्तक किंवा छोटी कादंबरी आहे...
     श्री नारायण कुडलीकर यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी तोंड दिलेल्या या वादळातून सहीसलामतपणे त्यांची अर्धांगिनी बाहेर पडली आणि ती सुखरुप आहे यासाठी या सर्वांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा....

©️ नंदिनी म. देशपांडे.
मार्च,१०,२०२३.

🌹🌹🌹🌹🌹🌹

मंगळवार, ७ मार्च, २०२३

पुस्तक परीक्षण.

पुस्तक परीक्षण.
*************
        ©️ नंदिनी म.देशपांडे.
               दि.४मार्च,२०२३.

       पुस्तकाचं नाव:

नयनरम्य नॉर्वे. 
लेखिका:
मंगला आसोलेकर-देशपांडे.

   ‌ "नयनरम्य नॉर्वे" हे पुस्तक हाती आलं आणि त्याचे विलोभनीय रुप बघून केंव्हा एकदा वाचून काढेन असे झाले होते अगदी... पुस्तक कोरं करकरीत असताना वाचण्यातील मजा काही वेगळीच असते...
   ‌सामान्यपणे कुठलेही ‌पुस्तक हे घरातील एखाद्या जेष्ठ व्यक्तीला किंवा आदरयुक्त व्यक्तीला समर्पित करण्याचा प्रघात असतो.पण हे पुस्तक लेखिकेनं आपली छोटीशी नात अवंती हिला समर्पित केलंय हे या पुस्तकाचे वेगळेपणच म्हणता येईल....
    ‌‌ 
    एकूण १८ प्रकरणांत गुंफले गेलेले हे पुस्तक संमिश्र साहित्य प्रकारात मोडेल असे माझे मत आहे...सुरुवातीची आणि शेवटची काही प्रकरणं लेखिकेच्या प्रवासवर्णनपर लेखनाचा प्रत्यय वाचकाला करवून देतात तर,काही प्रकरणं नॉर्वेच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक समाज जीवनावर शब्दलालित्याने प्रकाश टाकतात आणि बरीचशी प्रकरणं ही नॉर्वे या देशाच्या पर्यावरणाचा आणि तेथील निसर्गाचा इत्यंभूत आढावा घेताना दिसतात...
        
    स्वतःलेखिकेच्या पहिल्या विमानप्रवासाचा अनुभव निश्चितच वाचकालाही त्यांच्या पहिल्या विमानप्रवासाचा अनुभव मनात ऊभा करतो....
   
    "‌डिफेन्स एक रोमांचक अनुभव", हे प्रकरण या पुस्तकाचा गाभा म्हणता येईल असेच झाले आहे... खरोखरच हा डिफेन्स चा अनुभव आपणही प्रत्यक्ष हजर राहून अनुभवत असल्याचा भास होत रहातो वाचताना...यामूळे नकळतपणे आपल्या देशातील उच्च शिक्षणाची पध्दती आपण या डिफेन्स पध्दतीशी तौलनिक दृष्टीने पडताळून बघू लागतो...
   लेखिकेच्या मुलाचा नॉर्वे मध्ये शिकावयास जाण्याचा उद्देश सार्थकी लागलाय हे वाचकालाही मनोमन पटत जातं,आणि परितोषच्या पाठीवर वाचकांची शाबासकीची थाप पडते....माझ्या मते येथेच हे पुस्तक लिहिण्या मागचा हेतू साध्य होत आहे याची जाणीव होत जाते...
   ‌
     जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात उद्भवली तशीच परिस्थिती कोविड काळात या ही देशात उद्भवली याचे इत्यंभूत वर्णन या पुढच्या प्रकरणात वाचावयास मिळते..
पण खरं म्हणजे या काळात तेथे लांबलेलं वास्तव्यच या पुस्तक लिखाणा मागची प्रेरणा ठरलं हे प्रांजळपणे लेखिकेने बरेचदा नमुद केलंय...या कारणाने का असेना पण नॉर्वे या युरोपीय देशाची सविस्तर माहिती देणारं मराठी भाषेतलं कदाचित पहिलं पुस्तक मंगला आसोलेकर देशपांडे यांच्या लेखणीतून उतरलं आहे....

      नॉर्वे या देशाच्या निसर्गाने लेखिकेच्या मनावर जादू केली आहे.तेथील संपूर्ण वास्तव्यात तिच्यावर हा निसर्ग गारुड करुन होता.ठिकठिकाणी आणि वारंवार याचा प्रत्यय वाचकाला येत रहातो...त्यांचे मन जणू फुलपाखरू होऊन या निसर्गाचा आस्वाद घेत रहाते आणिक नकळतपणे काव्यमय होऊन तिला निसर्ग दृश्यांच्या अनुषंगाने ठिकठिकाणी विविध कवींच्या काव्यपंक्तींच्या उपमा सहजपणे सुचत जातात...
   मुळातच लेखिकेला अध्यापनाचा दांडगा अनुभव आहे...संस्कृत आणि मराठी भाषेवर चांगलेच प्रभुत्व असून त्यांचेे वाचनही भरघोस आहे हे पुस्तक वाचताना सतत जाणवत रहाते...
       
     प्रत्येक विषय अगदी सविस्तरपणे मांडण्याची लेखिकेची शैली त्यांच्या अध्यापन कलेतून आली असणार हे सुद्धा सतत जाणवत रहाते.
परिणामी हे त्यांचे पहिलेच पुस्तक असेल असे अजिबात वाटत नाही.
    
    लेखिकेनं आपल्या नयनरम्य नॉर्वे या पुस्तकातून नॉर्वे या देशाचा इतिहास,भगोल, सामाजिक -सांस्कृतिक‌ ,पध्दती,चालीरीती,किंबहूणा तेथील शैक्षणिक, आर्थिक पध्दतींचा, खाद्यसंस्कृती विषयीचा आणि अगदी तेथील रोजगाराच्या संधी,करप्रणाली,आरोग्यविषयक सोयी सुविधा यांचाही सविस्तर उहापोह केला आहे...
     शिक्षणाच्या निमित्ताने किंवा नव्यानेच या देशात जाताना तेथील माहिती मिळवण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयोगी पडेल असेच आहे.

    वृध्दांच्या निवाऱ्याचा प्रश्न तेथील शासन किती गांभीर्याने आणि काळजीने हाताळते यावर टाकलेला प्रकाश अनुकरणीय आहे....तसेच व्यायाम,त्याचे विविध प्रकार,समुद्री आणि बर्फावरील खेळ यांचे बाळकडू बालकांना कसे लहानपणापासून दिले जाते,पर्यावरणाशी समायोजन साधण्याची हातोटी कशी कुंटुंबाकडूनच शिकवली जाते याचाही सविस्तर आढावा लेखिकेनं घेतलेला दिसून येतो...
    
     आपल्याकडे 'घर पहावे बांधून' असे म्हणतात, तर नॉर्वेमध्ये 'घर पहावे घेऊन'
अशी उक्ती असावी असे वाटते...घर घेण्याची तेथील पध्दत बरीच क्लिष्ट पण स्पष्ट असल्याचे लक्षात येते...
     
   ‌हे पुस्तक वाचताना वाचकही तेथील व्यवस्थेचा आणि आपल्या देशातील व्यवस्थेचा नकळतपणे तौलनिक विचार करु लागतो...पण माझ्या मते,आपल्या देशाचे आकारमान,लोकसंख्या यांचा विचार करता बऱ्याच मर्यादा येऊ शकतील त्यामूळे शक्य होईल का हे?अशी शंका डोकावते मनात....
     
    शेवटच्या दोन तीन प्रकरणात लेखिकेनं प्रत्यक्ष भेट देवून केलेलं पर्यटन स्थळांचं आणि निसर्गाचं वर्णन वाचकालाही आभासी दर्शनाचा प्रत्यय आणून देण्यात यशस्वी झालयं....
  ‌ माणसाची निसर्गाशी बांधलेली नाळ आणि बांधिलकी मुलांच्या बाल्यावस्थे पासूनच कशी जपायला हवी याचे विवेचन फारच प्रभावीपणे मांडले आहे....

    एकूणच पुस्तकाची मांडणी,बांधणी,त्यातील सुंदर छायाचित्रे,लेखिकेची विषय मांडण्याची शैली,संदर्भसुचीचा उल्लेख वाचकाला "नॉर्वे" या छोट्याशा युरोपीय देशाचे मनोरम्य दर्शन घडवण्यात यशस्वी झाले आहे असेच म्हणावेसे वाटते...
    अभंग प्रकाशनाने साहित्य क्षेत्रात आणलेले, मंगला आसोलेकर -देशपांडे यांचे हे पहिले पुस्तक.एक लेखिका म्हणून मी, या पुस्तकाचे मनभरुन स्वागत करते आणि पुढच्या लेखनासाठी मंगला आसोलेकर-देशपांडे यांना शुभेच्छा देते....

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

रोज डे.

🌹*गुलाब*🌹

रहातो जरी 
काट्यांच्या सहवासात.....

असतो कायम ठेवून 
अस्तित्वाचे मृदूपण....

सदा सौंदर्याने परिपूर्ण 
बहरत बहरत....

निर्भेळ आनंदाची 
करुन काट्यांना पखरण....

सुगंधाची उधळण करत
हरखून जातो मनोमन....

होतो मनस्वी कृतार्थ
 प्रेमाच्या या विश्वात....

प्रेमी जेंव्हा मागतात 
मागणं आपल्या प्रेमाचं....

करुन माझी देवघेव
कटिबद्धता साधतात मनात....

आपलेच प्रतिबिंब न्यहाळत
परस्परांच्या डोळ्यात....

तेंव्हा होतो विराजमान
प्रत्येकाच्या हृदयात....

मीच तो उमलणारा
 कळीपाकळीतील गुलाब.....

मीच तो हसणाराही
ललनांच्या गालात....

काट्यांचे मानत धन्यवाद....
 आनंदाला बहर आणतो घराघरांत....

©*नंदिनी*
फेब्रू.७,२०१९.

🌹🌹🌹🌹🌹

रोज डे.

🌹*गुलाब*🌹

रहातो जरी काट्यांच्या सहवासात.....

असतो कायम ठेवून अस्तित्वाचे मृदूपण....

सदा सौंदर्याने परिपूर्ण बहरत बहरत....

निर्भेळ आनंदाची करुन काट्यांना पखरण....

सुगंधाची उधळण करत
हरखून जातो मनोमन....

होतो मनस्वी कृतार्थ प्रेमाच्या या विश्वात....

प्रेमी जेंव्हा मागतात मागणं आपल्या प्रेमाचं....

करुन माझी देवघेव
कटिबद्धता साधतात मनात....

आपलेच प्रतिबिंब न्यहाळत
परस्परांच्या डोळ्यात....

तेंव्हा होतो विराजमान
प्रत्येकाच्या हृदयात....

मीच तो उमलणारा कळीपाकळीतील गुलाब.....

मीच तो हसणाराही
ललनांच्या गालात....

काट्यांचे मानत धन्यवाद....

 आणतो आनंद बहराला घराघरांत....

©नंदिनी देशपांडे.
फेब्रू.७,२०१९.

🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, २३ जानेवारी, २०२३

शुभारंभ.

*शुभारंभ*

 ।गणपती बाप्पा मोरया।
शुभ+आरंभ=शुभारंभ.
     कोणत्याही,अगदी छोट्याशा पण महत्वाच्या कामाची सुरुवात आपण ज्या क्षणापासून करतो तो त्या विशिष्ट कामाचा शुभारंभ असतो,असे आपण मानतो..
काम महत्वाचे असते म्हणून सुरुवातही शुभ मुहूर्तावर, शुभहस्ते आणि शुभदिनी व्हायला अशी आपली अंतरिक इच्छाही असतेच हो ना?
    ‌‌तर असा हा शुभारंभाचा क्षण आपण साजरा करतो..
आपल्या हिंदू संस्कृतीत या क्षणाला फार महत्त्व आहे...
कोणी श्रीफळ फोडून,कुणी छोटी मोठी पुजा घालून तर कोणी एखाद्या विशिष्ट दिनाचे औचित्य साधून हा शुभारंभाचा योग साधत असतो....
पण खरं सांगावयाचे झाले तर, कोणत्याही कार्याच्या शुभारंभाला माणसांच्या घोळक्या शिवाय शोभा नाही असेच म्हणावे लागते....
 शुभारंभी कुटुंबातील सारे उपस्थित असावेत ही मनोधारणा असणं अगदीच रास्त आहे..
       म्हणूनच शुभारंभ दणक्यात करण्याची प्रथा पडली असावी असे वाटते..
शुभारंभाचा घाटच मुळी घातला जातो,तो आपण करत असलेल्या कामाची वाच्यता चार माणसांत होऊन त्याला प्रसिद्धी मिळावी,त्याचे कौतूक व्हावे आणि समाजाने याची दखल घ्यावी यासाठी...
'शुभारंभ' ही संकल्पना म्हणूनच सामाजिक आहे.
       हे लक्षात घ्यावयास हवे की, शुभारंभ हा केवळ चांगल्या,समाजहिताच्या आणि सकारात्मक भावनेने केलेल्या कामाचाच झाला पाहिजे तर आणि तरच ते काम लोकांची वाहवा मिळवेल.
       हल्ली शुभारंभाला उद्घाटन समारंभ असेही संबोधले जाते...पण शुभारंभ हा पारंपरिक शब्द कसा भारदस्त आणि ईश्वरी वरदहस्त सवे घेऊन आल्या सारखा वाटतो... म्हणून तर आरंभ देवतेची, विघ्नहर्त्याची पुजा या प्रसंगी घालतात याला नक्कीच पुष्टी मिळते....
   ‌‌चला तर सख्यांनो,उत्तरायणाच्या साक्षीने आपणही मरगळ झटकू या आणि नव्याने लेखनाचा श्रीगणेशा करुन शुभारंभ करु या.

©️नंदिनी म.देशपांडे.
जाने.१९,२०२३.
🌹🌹🌹🌹🌹

सर्कस,एक गर्भित सत्य.

सर्कस,एक गर्भित सत्य....
*********************

       जीना यंहा मरना यंहा
ईसके सिवाय जाना कंहा?

हे राजकपूर चं गाणं,आज नुसतं ऐकलं तरीही,त्यांचा तो केवीलवाणा चेहराच सतत डोळ्यासमोर रेंगाळत रहातो माझ्या....
    या उलट लहानपणी आमच्या शहरात, साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात उरुस भरायचा त्या वेळी सर्कसचा तंबू ठोकलेला असायचा...त्याचं फार आकर्षण वाटायचं...
मोठे व्यापलेले मैदान,अवती भोवती विशाल हत्ती,घोडे,माकडं यांना बांधलेले असायचे...त्या वेळी सर्कस बघण्याचं फार आकर्षण वाटायचं मनाला...
पण वयाच्या आणि मनाच्या प्रगल्भते बरोबर अशा सर्कशीतील पात्रांच्या,कलाकारांच्या,खेळाडूंच्या भुमिका किंबहूना त्यातील प्राण्यांविषयी सुध्दा एक कणव दाटून येऊ लागली मनामध्ये....सर्कस बघण्याचं आकर्षणही कमी कमी होत गेलं....
       सर्कस,म्हणजे त्यातील पात्रांना करावी लागणारी अगदी जीवावर बेतेल अशी तारेवरची कसरतच...
जीव मुठीत धरुन अघोरी खेळांना सामोरी जाणारी ही सर्कशीत काम करणारी मंडळी,केवळ आपली आणि आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी महिनो न् महिने घराबाहेर रहाणारी आणि प्रेक्षकांचा श्वास रोधून ठेवत,आपल्या जीवावर बेतणाऱ्या कसरती करणारी, हतबल झालेली ही मंडळी...
      कधी अक्षरशः 'मौत का कुवा" मधून बाहेर परततील का?असे वाटायला लावणारी हीच जेंव्हा उंच झोक्यावरुन कोपरापाणी खेळतात तेंव्हा बघणाराच्या काळजाच ठोकाच चुकेल की काय असे वाटते....
    यातील काहीजण वाघोबाशी सलगी करतात तेंव्हा तर प्रेक्षकांची आपलाच बचाव करण्यासाठी त्रेधातिरपीट उडते अगदी...
विशालकाय हत्ती जेंव्हा माहूताच्या तालावर नाचतात तेंव्हा त्यांचे हे विशालपण फार केविलवाणं वाटतं...
      सगळ्यांच्या आवडीचं पण तेवढचं आपल्या शारीरिक व्यंगाचं प्रदर्शन करत लोकांना हसवणारं सर्कशीतील पात्र म्हणजे,त्यातील "जोकर".
जोकर शिवाय सर्कस आणि पत्त्यांचा डाव ह्या दोन्हींनाही अर्थच नाही...
      एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू घेऊन वावरणारं हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन रहाते नक्कीच.... आपल्या शारीरिक व्यंगाचा असा उपयोग करणं म्हणजे व्यंगाचं एका अर्थी प्रदर्शन असले तरीही स्वकष्टातून कमावलेली दोन वेळची भाकरी त्याला समाधान देऊनच जात असणार...
      एकूणच सर्कस म्हणजे लोकांची करमणूक करणारं साधन,पण त्यातील जीवंत पात्रांच्या वाट्याला अवहेलना, असुरक्षितता आणि केविलवाणेपण बहाल करणारे एक पोट भरण्याचे साधनच आणि दुसरे काय...
या पात्रांच्या चेहर्याऱ्यांमागची ही शोकांतिका आपण माणूस म्हणून बघायला हवी हे मुद्दाम नमुद करावेसे वाटते....

©️
नंदिनी म. देशपांडे.
२०-१-२०२३.

🌹🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, ७ जानेवारी, २०२३

नि.न्यायमूर्ती प्रभाकरराव उमरीकर.

*निवृत्त न्यायमूर्ती श्री* *प्रभाकरराव उमरीकर* 

     कायद्याचा सातत्याने अभ्यास हा ज्यांचा ध्यास,कायदेविषयक ज्ञान सतत अपडेट ठेवणं हा ज्यांचा छंद, येईल त्याला कायदेविषयक निकोप सल्ला देणं ही ज्यांना आवड आणि कायदेविषयक चर्चेमध्ये हिरीरीनं भाग घेणं यात ज्यांचा आनंद, असे एक व्यक्तीमत्व म्हणजे, निवृत्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्री प्रभाकरराव आनंदराव उमरीकर....
     19 ऑक्टो.1944 रोजीचा यांचा जन्म...मुळचे परभणीचे रहिवासी,पण कालांतराने औरंगाबादेत स्थायिक झालेले  कायदेक्षेत्रातील एक निष्णात ज्ञानभांडार....
      7 नोव्हेंबर,2022 रोजी अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली....
दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्हीही क्षेत्रात सारख्याच परिपूर्णतेने न्यायदान करणं हा यांचा हातखंडा होता...
वकिली व्यवसायात वडिलांच्या,आनंदराव उमरीकर यांच्या नंतरची ही दुसरी पिढी...
औरंगाबादच्या एम.पी.लॉ कॉलेज मधून कायद्याची पदवी संपादन केल्यानंतर सुरुवातीला तीन वर्षे वकिली व्यवसाय केला आणि नंतर सात वर्षे सरकारी वकील म्हणून कार्यरत राहिले...
श्री प्रभाकरराव उमरीकर यांची त्यानंतर न्यायाधीश पदी नेमणूक झाली आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या गावांत/शहरांत न्यायदानाचे पवित्र कार्य पार पाडत राहिले....
कितीही क्लिष्ट खटले असतील तरीही आपल्या सूक्ष्म अभ्यासूवृत्तीने त्यांनी दाव्यांचे निकाल दिले आहेत...दावा दिवाणी असो किंवा फौजदारी  दोन्ही पक्षाच्या वकिलांचे म्हणणे ऐकले, की लगेच डायसवरच (कोर्टहॉल) मध्येच, न्यायपत्राचे डिक्टेशन देत संदर्भित खटल्याचा निकाल देणं ही यांची खैसियत होती...
अतिशय मोजक्या न्यायाधिशांना जमणारी ही गोष्ट प्रभाकरराव उमरीकर यांनी आपल्या कार्यकाळात एका व्रतस्थ न्यायाधिशाप्रमाणे पाळली होती...
कितीतरी वकिल मंडळी, न्यायाधीश मंडळी एखाद्या कायदेविषयक क्लिष्टते संदर्भात यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी अगदी हक्काने येत असत...यथायोग्य मार्गदर्शन करत,ते प्रत्येकास उत्साहाने कायदेविषयक सल्ला देत...त्यातील बारकावे समजाऊन सांगत...कोणीही कधीच विन्मुख होऊन परतत नसे...
त्यांनी न्यायदान केलेले आणि अपिलात (उच्च न्यायालयात) दाखल झालेल्या सर्वच खटल्यांचा निकाल कायमस्वरुपी जसा आहे तसाच रहात असे...
केवळ एका दाव्यात दिलेला निकाल उच्च न्यायालयात फेटाळला गेला, पण सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल फेटाळून जिल्हा न्यायालयात झालेला निकालच कायम ठेवला होता...ही आठवण सांगताना त्यांना आपण न्यायक्षेत्रात दिलेल्या सेवेबद्दल कृतकृत्यतेची भावना वाटत असे...
 कित्तेक बार मधील वकिल मंळींनी श्री प्रभाकरराव उमरीकर यांनी दिलेल्या निकालपत्रांचे पुस्तक बनवून, न्यायालयाच्या वाचनकक्षात अभ्यासासाठी ठेवले आहेत....
वकील मंडळींमध्ये त्यांची प्रतिमा "एक रेडी रेफरन्सर" अशी केली जायची...
कायद्याचा अतिसूक्ष्म अभ्यास करत कायदा कोळून प्यालेले न्यायाधीश ही त्यांची ख्याती अवघ्या महाराष्ट्रात आहे...
आज ते आपल्यात नाहीत तरीही त्यांच्या निकालपत्रांच्या पुस्तकाच्या रुपाने कायमच कायदेक्षेत्रात वावरणार आहेत हेच खरे....
निवृत्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश दिवंगत श्री प्रभाकरराव उमरीकर,यांना सात जानेवारी रोजी या जगातून एक्झिट घेऊन दोन महिने होतील...त्यांना विनम्र अभिवादन. 🙏🙏
©️ 
ॲड.नंदिनी म.देशपांडे.
nmdabad@gmail.com 
9422416995.
🌹🌹