बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

महालय,पितृपक्ष.

.*महालय (पितृपक्ष)*

    "ऐक ना, आई गं मला घागरा ओढणी घ्यायचीए बरं का? चौकात एक्झिबिशन हॉल मध्ये एवढे छान प्रदर्शन लागले ना!आपण जाऊ या उद्या..."
"नाही, अजिबात नाही.... आणखी पाच-सहा दिवस, म्हणजे घटस्थापनेच्या दिवसा पर्यंत कोणतीही खरेदी नाही, कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात नाही किंवा शुभ कार्य वर्ज्य आहे... नंतरच बघू या....."
अगं पण का? ते दोनच दिवस आहे एक्झिबिशन...."
" नाही, सध्या पितृपक्ष चालू आहे, तो संपेपर्यंत नाहीच....".
   सध्या घरोघरी मोठी माणसं व मुलं यांच्यात काहीसे असेच संवाद थोड्याफार फरकाने चालू असावेत, असे लक्षात येते....तरी हल्ली अगदी काटेकोरपणे पितृपक्ष पाळला जात असेल असेही नाही....पण काही प्रमाणात मात्र त्याच्या मर्यादांचे पालन केलेच जाते....

    'महालय'म्हणजे पितृ पंधरवडा, पितृपक्ष.... पन्नाशीत साठीत आलेली पिढी आजही ह्या गोष्टी काही प्रमाणात का असेना, पण पाळताना दिसतात.... खरं म्हणजे, हे पंधरा दिवस निषिद्ध का मानले जातात? यांची पारंपारिक कारणं, जर आजच्या तरुणाईला आपण व्यवस्थित समजावून सांगितली, तर ही मुलं त्यांच्या आई-वडिलांना अक्षरशः वेड्यात काढतील.... स्वर्गस्थ झालेल्या पितरांचे पोट जमिनीवरच्या लोकांना,केवळ एक दिवस विधिवत जेवू  घालण्याने भरते ...आणि त्यांच्या माध्यमातून स्वर्गस्थ लोकांना ,त्यांच्या आत्म्यांना तृप्त केले जाते.... म्हणजे शुद्ध फोलपणाच.... हे खरं म्हणजे आपल्यालाही पटत चाललेय हल्ली....पण, लहानपणापासून वर्षानुवर्षे आपल्या मनामध्ये आणि प्रत्यक्ष कृतीमधून रुजवलेले हे संस्कार, ही विचारधारा त्यामागचा हेतू आणि पूर्वजांशी असणारी आपली बांधिलकी या सर्व गोष्टींचा पगडा नाही म्हटलं तरी आजही बाळगून आहोत आपण.... आताशी थोडा सैल होत चालला आहे तोे.... पण  आपल्या मनावर त्यांचा प्रभाव शिल्लक आहेच,आणखीणही.... त्यातील कर्मठपणा बर्‍याच अंशी कमी झालाय....हे मात्र मान्यच करावे लागते....

    यानंतरच्या पिढ्यांना एवढे पूर्वजही नसतील....त्यांची फार  वंशावळही फार मोठी नसेल.... नव्हे,त्यांना ती माहीतही असेल की नाही कोण जाणे?... आणि या मुलांजवळ या सार्‍या गोष्टींसाठी द्यावयास वेळ तर अजिबातच नसेल....

    हल्लीच्या तरुणाईच्या पालकांनी घरातील ज्येष्ठांना, वृद्धांना सन्मानाची वागणूक देत, आपला दिवसभरातला थोडातरी वेळ त्यांच्या समवेत घालवत, आणि त्यांच्याशी काहीवेळ तरी संवाद साधत त्यांच्या सहवासात घालावा.... तसेच आपल्या ऐपतीनुसार, आई वडील यांना,त्यांच्या तरुणपणात  स्वतःसाठी पूर्ण न करता आलेल्या मौजेच्या बाबींची, जमेल तशी पूर्तता करणे....धार्मिक  सहली त्यांच्या साठी घडवून आणणे.... सर्व कुटुंबाने एकत्रित वेळ घालवून....जेष्ठांशी संवाद साधत, त्यांना आनंद युक्त समाधान द्यावं.... जेणेकरून त्यांच्या तरुणपणात आपल्या साठी त्यांनी केलेल्या श्रमाचे, तडजोडीचे साफल्य त्यांच्या हयातीतच त्यांना बघावयास मिळावे...‌ असा योग उपलब्ध करून द्यावा..... या पेक्षा चांगली कृती आणखी काय असू शकते?.... जेष्ठांच्या हयातीतच त्यांची आपण केलेली सेवा,त्यातून त्यांना मिळणारं समाधान, आनंद, त्यांचा आदर या सर्व गोष्टी तरुणाईला अनुकरणीय निश्चितच होतील.....आपल्या अशा वागण्यातून समाजात एक चांगला विचार, चांगला दृष्टीकोण निर्माण होईल यात वादच नाही..... आपल्या पिढीमध्ये असणारी,काही प्रमाणात शिल्लक राहिलेली भावनाशील वृत्ती,आता पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित होईल असे काम आपण....करणे हिच मला वाटतं आपल्या स्वर्गस्थ पितरांसाठी आणि हयात असणाऱ्या ज्येष्ठांसाठी, वृद्धांसाठी वाहिलेल्या शुभेच्छा ठराव्यात....अशा प्रकारच्या प्रत्यक्ष शुभेच्छांमूळे याच जन्मी समाधानाने त्यांचे पोट भरावे, आत्मा तृप्त व्हावा.... एवढे घडून आले तरीही खूप.... असे मला वाटतं...

   ©
*नंदिनी म. देशपांडे.*

सप्टें,२५,२०१९.

✳✳✳✳✳✳

बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९

आयुष्य.

*आयुष्य*

आयुष्य हे ऽ चुलीवरल्या
कढईतले कांदे ऽपोऽहे.....

    आजच्या लेखन  कल्पनेचा विषय वाचला नि,हे गाणं आठवलं पटकन....

     खरंच माणसाचं आयुष्य हे कांदा पोह्या सारखंच खमंग बनत जातं दिवसेंदिवस....
त्यात साऱ्या चीजा ह्या प्रमाणातच पडायला हव्यात तरच ते चवदार बनतं....

    सर्व प्रथम तर हे आयुष्य भिजवलेल्या पोह्या प्रमाणे छान पैकी पाण्यात धुवून  मऊ मुलायम बनायला हवं...
लहानपणापासून आई वडिलांकडून आपल्यावर होत असणाऱ्या कोड कौतुकाच्या,लाडिवाळ लोभाच्या नि भरभरुन मिळणाऱ्या प्रेमळ स्पर्शावाच्या वर्षावात चिंब भिजत मुलायम बनलेले असतेच....
जसं आपण स्वतःला समाजाभिमुख बनवत त्यात मिसळून जाण्याचा प्रयत्न करतो तसं मग त्यात एक एक प्रकारचे मसाले पडत जातात....
   आयुष्याची लज्जत वाढवायला समाजरुपाचे कांदे आवश्यकच.....केवळ यानेही काम भागणार नाहीच रंगही आकर्षक हवाच..... शेवटी 'अॅटिट्यूड' महत्त्वाचाच म्हणूनच योग्य प्रमाणात हळद हवीच....तिचं कमी जास्त प्रमाण उग्र दर्प देऊन जातं तेही बेचव वाटतंच....
आयुष्याच्या प्रवासात येणारी विविध प्रकारची छोटी मोठी वादळं, मनःस्ताप देऊन जातात... पण, पण खूप काही शिकवून जातात खचितच....परिणामी त्यातील झणझणीत पणा पोह्यात टाकलेल्या हिरव्या मिरची प्रमाणे चव व्दिगुणित करतो.....या तीखट पणाचं संतुलन साधावयाचं असेल तर,त्यात लिंबू,शेंगदाणे,दाळं,
हिंग,मोहरी व माधुर्यासाठी किंचितशी साखर आवश्यकच....हे ज्यानं त्यानं आपल्या आवडी नुसार घालावित....ह्यांचे काम करणारे आयुष्यातील घटक म्हणजे,राग व्देश,आसूया या गोष्टींचा सामना करत करत स्पर्धेच्या तोंडघाशी पडत पडत,येणाऱ्या चांगल्या वाईट अशा असंख्य अडचणींवर यशस्वीपणे मात करत त्यातून मार्ग काढत काढत शेवटी आपल्या आयुष्याची रंगत वाढवणं जशी आपण पोह्यांची रंगत वाढवत आपल्या जिव्हेला चव आणतो.... असे पोहे लिलया रसरशीत मुखरसात विरघळत पोटात ढकलले जातात.... अगदी तृप्ततेच्या भावनेनं....

    आयुष्याचंही असंच आहे,वैविध्यानं नटलेल्या या स्वानुभवातून,परिस्थितीतून मार्ग काढत,ताऊन सुलखून निघालेलं आपलं आयुष्य,आपण मागे वळून बघतो तेंव्हा, कृतकृत्यतेचं मनस्वी समाधान देऊन जातं....
ही कृतकृत्यता अनुभवण्यासाठी उसंत मात्र मिळायला हवी....तरच आपण आपल्या आयुष्याचा आस्वाद घेत आहोत याची प्रचिती येईल....
अर्थातच त्यासाठी आपण मानसिक, शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असावयास हवे.....ते सर्वस्वी आपल्याच हातात आहे....

   जीवनात असा सारा सुयोग जुळून आला म्हणजे,परिपूर्तिचा आनंद मनसोक्तपणे लुटत लुटत समाधानानं शेवटच्या प्रवासाला सन्मुख जाता येतं...

    शेवटी माणसाचं आयुष्य आयुष्य म्हणजे काय हो,तर त्याच्या जन्मा पासून सुरू होणारा आणि मृत्यू पंथावरुन हासत चालत जाणारा जीवनपटच....
या जीवन पटावर विणली जाणारी नक्षी आपण किती सहज,संयमानं,व्यवहार कौशल्यानं, शैक्षणिक कुंचल्यानं,सहृदयतेनं,
प्रेमानं,नजाकतीनं विणतो...त्या साठी आपल्या आयुष्यात येणाऱ्या सहवासातील माणसांचे कशा प्रकारे सहाय्य घेतो यावरच सर्वस्वी अवलंबून आहे....होय ना...?

     तर मित्रांनो आयुष्य म्हणजे,आपल्या जन्मापासून ते आपल्या अंतापर्यंत आपणच घेतलेला आपल्या अस्तित्वाचा शोध....त्यासाठी केलेली धडपड....मेहनत....
अन् काय....😊

©
*नंदिनी म.देशपांडे*.

सप्टें,११,२०१९.

✡✡✡✡✡✡

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

शिक्षक दिन.

शिक्षक दिन .

     मॅडम, तुम्ही एवढ्या छानशा कॉलेज मध्ये,सरस प्रध्यापकां कडून एक शिक्षिका बनण्यासाठीचे शिक्षण प्रशिक्षण घेतलंय....मग तुम्ही तुमचं प्रोफेशन एक अॅडव्होकेट म्हणून का निवडलंत....?

    हा प्रश्र्न बऱ्याच जणांकडून हमखास विचारला जातोच....पण यावर  मला मनस्वी हसू येतं...अशा लोकांना अगदी मनापासून सांगावसं वाटतं...

    शिक्षक म्हणजे काय ? हे अगोदर समजून घ्या म्हणजे कळेल आपोआपच...

       आपली स्वतःची जिज्ञासा जागृत करुन त्यावर भरपूर आणि सर्वंकष ज्ञान संपादन करणं....आपण मिळवलेले ज्ञान आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना प्रसंगपरत्वे ,संदर्भाशी संलग्नता ठेवत, ओजस्वी वाणीतून उध्दृत करणे....त्यासाठी विविध उदाहरणांचा दाखला देत त्यातील उपयोगिता, सकारात्मकता,नकारात्मकता वगैरे दृष्टिकोनातून मुल्यमापन करणं....तसेच आपल्या ज्ञानाच्या कक्षा सातत्याने रुंदावत ठेवण्याचा प्रयत्न करत,योग्य ते समुपदेशन करणं....संपर्कातील लोकांसमोर आपल्या वर्तनातून आदर्श उभा करणे....त्यांना सतत प्रोत्साहन देणं त्यांचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करत त्यांना मार्गदर्शन....करत रहाणं या साऱ्यांचा समावेश होतो ....मग त्यासाठी समोर विद्यार्थ्यांच्या रुपात असणारा समुह असू दे, किंवा सहकाऱ्यांच्या रुपात....
किंबहूणा शिकवणं ही एक कला आहे...ती जेवढी कलाकुसरीने तुम्ही वापराल तेवढी ती बहरत जाते... शिक्षण,प्रशिक्षण घेतलं म्हणजे ही कला परिपूर्णतेच्या आणखी जवळ जाते एवढंच.... खरं तर प्रत्येक व्यक्तीजवळ ही कला उपजत असतेच पण तिचे योग्य पोषण झालं म्हणजे ती व्यवस्थित फोफावते.... त्यामूळे प्रत्येक जणच जन्मजात शिक्षक असतो....असे असले तरीही प्रत्येकाने आपण विद्यार्थीच आहोत अजूनही याच भुमिकेतून प्रवास करत राहिले पाहिजे....तरच तो ज्ञान संपादनाची उर्मी कायम जागृत ठेवू शकतो...आणि आपल्या आयुष्यात यशस्वी होत रहातो....
जीवन मुल्यांचं महत्व त्याला पटू लागतं...

     मला वाटतं उपरोक्त बऱ्याच बाबी मला अवगत झाल्या आहेत...या कलेतून पैसा मिळवणं हे सूत्र मी गौण मानलंयं एवढंच....
पण माझा एकूणच जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन हा वरच्या सर्व घटकांना गृहित धरुनच तयार झालाय...माझा प्रवासही त्याच मार्गानं चालू आहे....मी यातून पुर्णपणे समाधान मिळवत आहेच...एका शिक्षकाने प्राप्त केलेलं कसब दररोजच्या व्यवहारात वापरुन मी तिचा एक शिक्षिका म्हणून योग्य उपयोग करत असल्याची जाणीव मला आहे....या पेक्षा आणखी वेगळं काय हवंयं....?असा प्रश्न मी माझ्या मनाला विचारते माझं मन मला त्याचं उत्तर अतिशय सकारात्मक पध्दतीनं देतं आणि मलाही त्यातून भरपूर समाधान मिळतं....आणिक काय हवंयं....

    म्हणूनच मी स्वतःला प्रथम एक शिक्षिका मानते आणि मग नंतर एक अॅडव्होकेट....

    मला माझा पेशा जरी शिक्षकी नसला ,तरीही माझ्यातील "शिक्षकत्वाचा" कायमच अभिमान ‌वाटत आला आहे.....तो कायम वाटेलच हे ही मी स्वाभिमानाने सांगू शकते....आणि म्हणूनच मी एक शिक्षिका आहे हे या ठिकाणी अभिमानाने नमूद करते...

"आज शिक्षक दिन"....म्हणून एवढं व्यक्त व्हावसं वाटलं..शिक्षक मित्र मैत्रीणींसोबतच बाकी सर्वांनाही या औचित्याने भरभरून शुभेच्छा...

©
*नंदिनी म.देशपांडे*

💐💐💐💐💐💐

रविवार, १ सप्टेंबर, २०१९

परतीच्या पावसा

परतीच्या पावसा
🌧🌧🌧🌧🌧

परतीच्या पावसा
तू कृपा करुन जा,
कोरड्या मनांवर
ओलावा शिंपून जा....

परतीच्या पावसा
तू कृपा करून जा,
भेगाळलेल्या भूमीवर
शिडकावा करुन जा....

परतीच्या पावसा
तू कृपा करुन जा,
शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर
हास्य पेरुन जा....

परतीच्या पावसा
तू कृपा करुन जा,
गाभुळल्या पिकांना
जीवदान देवून जा....

परतीच्या पावसा
तू कृपा करुन जा,
मुक्या जनावरांना
जगण्यासाठी दिलासा
देऊन जा....

परतीच्या पावसा
तू कृपा करुन जा,
नद्या ओढी नाल्यांना
वाहते करुन जा....

परतीच्या पावसा
तू कृपा करुन जा
बरसतच बाप्पाचे
स्वागत करुन जा...

परतीच्या पावसा
तू कृपा करुन जा,
आम्हा सर्वांना तृप्त
करत हासवत निरोप
घेऊन जा....

परतीच्या पावसा
कृपा  तू करुन जा,
पुन्हा वेळेवर येण्याचे
वचन देऊन जा....

परतीच्या पावसा
तू कृपा करुन जा,
तू कृपा करून जा....*

©
* नंदिनी म. देशपांडे*.

🌦🌦🌦🌥🌦🌦