रविवार, ३१ जानेवारी, २०२१

फुलपाकळी हसली..

पाकळी पाकळीतून हलकेच
   उमलली
   जांभळफुलं सुंदर ती
   हसली
   संगतीला नाजूक पिवळी 
   सखी
  हातीहात घेऊनि स्वागत
  करी
  शेवंती मम नयनां
  सुखावती
  हिरवी पिवळी पर्ण
 देखणी
 फुलवून पिसारा तव
   नाचती  
  शामल नीळ्या पिवळ्या 
    कुसुमांचे
  गुणगान गंधित होऊन
  गाती...

__©️नंदिनी

🌱🌱🌱🌱🌱

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

ऊब.

*ऊब*
😌

    आज आई असती तर...तर तिने तिच्या वयाच्या अमृतमोहोत्सवी वर्षात पदार्पण केले असते....
सकाळ पासून राहून राहून आईची प्रकर्षाने आठवण होत आहे...
कशी बरी दिसली असती आज आई? ७५ पर्यंत रहावयास हवीच होती...हे वय काही खूप नाहीए...असंही सारखं वाटतंय आज मनात...
आज
खूप वाटत होतं, आईच्या वाढदिवसाचा सोहळा केला असता आपण...तिला किती समाधान वाटले असते...
    पण हे घडायचे नव्हतेच....सहा वर्ष  होतील आईला जाऊन....
आईची आठवण झाली की मी, माझी आई नेहमी नेसायची  त्यांपैकी एक मऊ उबदार अशी कॉटनची साडी दुपदरी करत पांघरुन घेते...
किती अश्वासक वाटतो हा स्पर्श म्हणून सांगू!आईच्या प्रेमाची,मायेची साक्ष देणारा...
अगदी प्रेमानं ओथंबलेला आणि दिलासा देणारा...
     एक साडी पांघरायची आणि एका साडीची मऊ घडी उशाला घ्यायची!जणू आईच्या मांडीवर डोक ठेवून निवांत क्षण अनुभवतेय मी आणि तिच्या प्रेमळ हळूवार स्पर्शानं रोमरोम नाहून निघतोय आपला ....
असा भास होत रहातो...
तिच्या आशिर्वादाचा हात तिनं अंगावरुन फिरल्याचा भास होतो...
   माझी आई कायम हैद्राबाद हॅडलूम च्या सुती साड्या नेसायची...काय भारदस्तपण सामावलेलं असायचं त्या साडीत!स्वतः हातानं कडक स्टार्च केलेली, कडक ईस्त्रीची साडी नेसून बाहेर पडायची....
व्यवस्थित नीटनेटकी तयार होऊन...बाहेर जाताना.... घरातही तेवढीच निटनेटकीच रहायची...अशाच पण स्टार्च शिवाय साडी घरात नेसत... असायची ...
अव्यवस्थित रहाणं कधीच भावलं नाही तिला.... 
अगदी आईच्या शेवटच्या क्षणा पर्यंतही तिच्या या सवयीनं साथ काही सोडली नाही तिची...
...साड्यांची रंगसंगती आणि पोत या बाबत फारच चोखंदळपणा जपलेला होता आईनं शेवटपर्यंत...
आई गेल्यानंतर तिच्या चारपाच उबदार साड्या मी तिची आठवण म्हणून जपून ठेवल्या आहेत आजही...
थंडीत ती साडी पांघरली की ऊब देते तर उन्हाळ्यात पांघरल्यास हलका थंडावा देते...
माझ्या वॉर्डरोब मध्ये तिच्या स्पर्शानं ओथंबून गेलेल्या या माझ्या आईच्या साड्या, आईच्या आशिर्वादाचा दिलासा देऊन  जातात...
किती साधी साडी ती! पण आईच्या, स्पर्शानं जणू पावित्र्य  प्राप्त झालेली...
अवती भोवती आईची सावली साथ करते आहे, याचा भास निर्माण करणारी...
किती तरी दिलासादायक...
अशी मनाला ताकद देणारी....आईचा मऊ उबदार स्पर्श बहाल करणारी.... अशी माझ्या आईची ही अनमोल ठेव मी आजही जपलीए.... याचे मला खूप समाधान मिळते... कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळते... आईचे अस्तित्व आसपासच असल्याची भावना सतत जागवते...ही अशी माझ्या आईची उबदार पोत असणारी साडी....
आज पौष पौर्णिमा, आईच्या वाढदिवसा चा दिवस यानिमित्ताने आईच्या पवित्र स्मृतिंना वंदन करत...🙏🌹🙏

*नंदिनी म. देशपांडे*. 

♥️♥️