गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८

**ऋण मायबोलीचे.**

          
    ‌‌  लाभले आम्हास भाग्य,बोलतो
         मराठी.

       जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी

       धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी

       एवढ्या जगात माय मानतो मराठी.

      २७ फेब्रुवारी,ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज (वि.वा.शिरवाडकर) यांचा जन्मदिवस आपण 'जागतिक मराठी दिन' असा साजरा करतो.किंबहूणा या फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण महिनाभर , मराठी साहित्य संमेलनाचे वारे अख्ख्या महाराष्ट्राला व्यापून टाकते.
  
       मराठी साहित्य संमेलन सुध्दा नेमकेच पार पडले.आपल्या मायबोलीचा जागर आपल्याच भुमीवर व्हावयास हवा असे वाटून गेले मनाला पण असो,बडोदेला हा मान मिळाला असे मानू या आपण.

     ‌ याच दिनाच्या औचित्याने ठिकठिकाणी साहित्य सभा, संमेलनं,काव्यसंमेलनं, साहित्य वाचन वगैरे वगैरे उपक्रम विविध स्तरांवर राबविण्यात येताना दिसतात.आपल्या मायबोलीच्या सन्मानासाठी असे उपक्रम आयोजित करणं,त्यात सहभागी होणं हे, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचे नैतिक कर्तव्य आणि जबाबदारी आहेचअसे म्हणावेसे वाटते.

      या अंतर्गत महान अशा सिध्दहस्त लेखकांच्या लेखणीतून पाझरलेले गद्य किंवा पद्य या स्वरुपातील प्रसिध्द मराठी वाङमयाचे स्मरण,वाचन,लेखन करत, त्यांना पुनरुज्जीवित करत नवीन पिढीसमोर वैशिष्ट्य पूर्ण दृष्टिकोनातून मांडणे यासाठी होणारा प्रयास खूपच स्तुत्य आहेच.तो मायबोलीच्या अस्तित्वासाठी,ते टिकवून ठेवण्यासाठीअत्यंत गरजेचा आहे यात वादच नाही.

     ‌हल्ली सोशल मिडिया मुळे अभिव्यक्त होणार्यांची संख्या लक्षणीय स्वरुपात वाढलेली दिसून येते.कारण एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे असे म्हणता येते.या मुळे नवनवीन लेखक , कवी उदयाला येत आहेत.त्यांना स्वत:ला आपल्यात दडलेल्या नवीन लेखकाची ओळख होताना दिसून येत आहे.परिणामी त्यांची सृजनशीलता पण बहराचे लावण्य लेवून बरसाताना आपण बघत आहोतच.

   ‌ खरे म्हणजे त्यांच्याही नकळत अशा अनेक लेखकांच्या हातून मराठी भाषा जोपासण्याचे काम यथोचितपणे घडत आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही निश्र्चितच.त्यांच्या लिखाणाचे स्वरुप भलेही वेगवेगळ्या पध्दतीचे असेल.कोणी कथा, ललित लेख,कोणी कादंबरी तर कोणी कविता,गझल या प्रकारात लिहिते होत असेल. अगदी सुविचार,चारोळी या प्रकारातही अभिव्यक्त होत असेल पण तो सुध्दा नवनिर्मितीचा आनंद देवून जातोच की ! मराठी भाषेचा अस्त समिप येऊ घातलाय की काय? या शंकेला एक सकारात्मक प्रतिक्रिया देत शंका निरसन करण्याचा खूप महत्त्वाच्या प्रयत्न या नवलेखकांकडून केला जातोय हे खरंच कौतुकास्पद म्हणता येईल.मातृभाषेच्या ऋणातून काही प्रमाणात उतराई होण्याचा हा प्रयत्न प्रशंसनीय आहेच.

     अर्थातच आपल्या महाराष्ट्रातील जेष्ठ , प्रसिध्द लेखक,कवींचे वाङमय वाचत मोठी झालेली ही लिहिती पिढी, आपल्या लेखनातून पुढच्या पिढीसाठी मराठीभाषा संवर्धनासाठीचे काम करत आहे.मराठी भाषेचा हा सौंदर्यपूर्ण ठेवा 'वसा' म्हणून जपून ठेवत आहे .पुढच्या पिढीसाठी.याच हेतूने प्रत्येक पिढीने पुढच्या मराठी भाषिकांनी हा ठेवा जपून ठेवल्यास तिच्या अस्तित्वाला धक्का बसणार नाही. अर्थात ही आपली मायबोली आहे.ती व्यक्त करण्याचे प्रकार अनेक आहेत पण ती बोली भाषा संपणे केवळ अशक्यप्राय .पण मुर्त स्वरुपात ती टिकवून ठेवणे जास्त आवश्यक आहे.

या साठी आजच्या नवलेखकांना ,संधी उपलब्ध करुन देणे,त्यांच्या साहित्य कृतिंचे प्रकाशन करणे,आणि त्यांचे पुस्तक वितरण करणे किंवा ते वितरणासाठी त्यांना हमी मिळवून देणे या साठी शासन स्तरावर,वेगवेगळ्या साहित्य,सामाजिक मंडळां मार्फत सामाजिक संस्थाच्या माध्यमातून,ग्रंथालयांकडून प्रामाणिकपणे मदत होणे अत्यंत आवश्यक आहे.असे झाले तरच आजचे नवलेखक हे भावी लेखक पिढीचे प्रेरणा स्थान बनु शकतात.

हल्ली शाळांमधून तर आपल्या मातृभाषेचे जवळजवळ उच्चाटन झालेले दिसून येत आहे.कारणे कोणतीही असतील पण वास्तविकता नाकारता येणारच नाही.एक मार्ग खुंटित होतोय म्हटल्यावर त्यांवर केवळ भाष्य करुन चालणार नाही,त्या पेक्षा दुसर्या विविध मार्गांनी ती उजळवत ठेवावयास हवी.उन्नत करावयास हवी.या साठी वेगवेगळे मार्ग,माध्यमं अवलंबिणे अनिवार्य आहेच.आज ई बुक्स ,सी.डी.ज अॉडिओ बुक
वगैरे माध्यमातून या साठी होणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेतच निश्चित .पण मुर्त स्वरुपात ,पुस्तक रुपात पुढच्या पिढ्यां साठी. ठेव म्हणून चांगले लेखन साहित्य टिकवून ठेवणे खूपच प्राधान्याचे आहेच.
गायन क्षेत्रात जसे विविध घराण्याचे शिष्य आपल्या गायनाच्या सुरुवातीला आपल्या घराण्याचा लौकिक वाढवण्या साठी स्वरवंदना अर्पण करतात ,तद्वतच लेखन क्षेत्रात आपल्या मातृभाषेतील सौंदर्य स्थानं प्रत्येक नव्या लेखका मार्फत उद्धृत होणे, चर्चिले जाणे गरजेचे आहे.आणि म्हणूनच नव लेखकांना त्यांच्या पुस्तकाच्या वितरणासाठीची हमी मिळणे फार आवश्यक आहे.तरच ते लिहिण्यासाठी उद्यूक्त होत , मायबोलीच्या संवर्धनाला हातभर लावू शकतील असे वाटते.खर्या अर्थाने असे संगोपन साधायचे असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे असे म्हणावेसे वाटते.

लेखकांच्या लेखणीत खूप ताकद असते हे जगन्मान्य आहेच,यातून समाज आणि पर्यायाने देशाच्या जडणघडणीत त्यांचा सहभाग ते नोंदवू शकतात.पण त्यांच्या लिखाणामागचा हेतू स्पष्टपणे लोकांच्या समोर येणे आवश्यक आहे.तो जास्तीत जास्त वाचकांनी वाचावयास हवा.महाराष्ट्रीयनांची मायबोली मराठी चिर:काल टिकण्या साठी सर्व बाजूंनी प्रयत्न करणे हे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचं कर्तव्य आहे.तरच आपण गर्वाने म्हणू शकतो,

माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट

माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवितो

ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनाईची

माझी मराठी चोखडी रामदास शिवाजीची

यारे,यारे अवघे जण,हाक माय मराठीची

बंध खळाळले गळाभेट साक्ष भिमेच्या पाण्याची

डफ तुणतुणे घेऊनच ऊभी शाहिर मंडळी

मुजर्याची मानकर वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ अभंगाच्या तालावर

कोवळीक विसावली पहाटेच्या जात्यावर.

नंदिनी म. देशपांडे . ©

nmdabad@gmail.com

💎💎💎💎💎💎💎💎

     

    

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

**आत्मशोध एक निकड**

"आत्मशोध एक निकड"
        
      जंकफुड मुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न जेवढा गहन बनलाय तेवढाच गहन प्रश्न त्यांच्या एकटेपणातून निर्माण होणार्या मानसिक आरोग्याचा बनलाय असे वाटू लागले आहे....खेळण्या बागडण्याच्या कोवळ्या वयात मुलांना वैफल्यग्रस्तपणा येणे या साठी बर्याच अंशी परिस्थितीती कारणीभूत असावी हे विचाराअंती बरेचदा जाणवते.....हम दो हमारे दो किंवा हमारा एक अशा चौकोनात किंवा त्रिकोणात बंदिस्त झालेली मुलं ,आईबाबांच्या पोटापाण्यासाठी म्हणण्या पेक्षा महत्वाकांक्षी पण अनावश्यक गरजा आणि स्वतःच्या करिअरच्या अत्यंतिक आधिन होण्याच्या हव्यासापायी पोटच्या मुलांचे आकाश मात्र छोटे करू पहाताहेत अशी शंका बळावते.....आपल्या व मुलांच्याच सुखासाठी पैशामागे आणि वेळेच्या मागे धावण्याच्या शर्यती मध्ये आपल्या कडनं मुलांच्या काही अपेक्षा असतील याचा विचार त्यांच्य मनाला शिवत नसेल का?असे वाटते कधी कधी.....सभोवतीची परिस्थीती बघता,एक तर छोटे कुटुंब त्यात मुलांवर टाकलेली नाना बंधनं.....अमक्याशी बोलू नको,तमक्याशी दोस्ती करू नको,इकडे तिकडे जाऊ नको अशा सुचना भरीसभर कोवळ्या वयाकडून आईबाबांच्या एवढ्या अवाजवी अपेक्षा आणि महत्वाकांक्षा असतात की,आपण हे नाही करू शकलो मग मुलांकडून झालेच पाहिजे....या सबबी खाली पैशाच्या जोरावर त्याला भारंभार क्लासेस लावावयाचे....त्यात त्याचा एकटेपणा घालवणे या पेक्षा तो कायम एंगेज रहात तो स्पर्धेच्या तोंडघाशी कसा पडेल हाच दृष्टिकोण जास्त दिसतो असेच म्हणता येईल....या सर्व कोंडीत आपल्या मुलाचे मानसिक स्वास्थ्य खरंच आरोग्यपूर्ण आहे काय?याचा विचार करावयास ना आईला वेळ ना बाबांना....त्यातही पुन्हा सुट्टीच्या दिवशी त्याला कुठेतरी लॉंग ड्राईव्ह वर नेऊन आणले,एखादा मुव्ही दाखवून आणला किंवा हॉटेलिंग वा एखादे पिकनीक अरेंज केले की आपले आपल्या पाल्याप्रति कर्तव्य संपले असे गैरसमज करून घेणारे आईबाबा,स्वतः साठी आणि पतिपत्नी या नात्या साठी स्पेस राखून ठेवत शिलकीत राहिलेला वेळ मुलांसाठी अशी भुमिका घेत आपल्या कर्तव्य पुर्तिची धन्यता मानतात.....पण मुलांना केवळ बाहेरच नेत,त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालत आणि आवडीची खरेदी करत आधुनिक लाईफ स्टाईल बहाल करत आपण फार आदर्श पालक बनलो आहोत या निव्वळ पोकळवास्यातून बाहेर पडण्याची गरज आज कटाक्षाने निर्माण झाली आहे .....हीच खरी अपेक्षा मुलांची आज आईबाबांकडून आहे हे पुर्ण सत्य आहे असे वाटते.....मुलांच्या भावविश्वात डोकावून बघणारे पालक किती असतील आज हे तेच जाणोत.....मुलांना केवळ आईबाबांचा पैसा,सुखसोयी,हिंडणे,फिरणे,हॉटेलिंग,मुव्ही,खरेदी हेच नकोय तर तुमचा वेळ,सुसंवाद,प्रेम,वात्सल्य,वात्सल्याचा कुरुवाळ,यांचे खरे भुकेले आहेत आजची मुलं....किंबहुणा आईबाबां प्रमाणेच त्यांना आपल्या इतरही नात्यांकडून आजीआजोबा,काकाकाकू,मामामामी,आत्यामामा,मावशीकाका ,बहिणभाऊ वगैरे नत्यांतूनही त्यांना हीच आस असते हे अगदी नैसर्गिक आहे....असा वात्सल्याचा शिडकावा आणि मनमोकळा संवाद मुलांना मिळू लागला म्हणजे त्यांचे बाल्य आत्मिक समाधान आणि परिपूर्ण विश्वासाच्या भक्कम पायावर उमलत जाते....ते सुदृढ व प्रगल्भ बनत जाते....पैशांपेक्षा आपली जिव्हाळ्याची माणसं त्याला बहुमोल वाटू लागतील आणिआत्मविश्वास वाढू लागेल....कारण असे झाले तर त्याच्या मनातील असुरक्षिततेची असणारी भावना मनातून पळ काढेल.....आपल्या माणसांजवळ ते मुल यथायोग्य व्यक्त होऊ लागेल....भविष्यात एक यशस्वी,होतकरुत,परिपूर्ण व्यक्ती बनण्यास फार आवश्यक असते हे .....मुलांच्या मनात निर्माण होत जाणार्या मानसिक नैराश्याचे सावट नकळतपणे त्याच्या शरिर स्वास्थ्यावर परिणाम करु लागते....यातून त्याचा आतताईपणा किंवा स्वतःला संपवण्याच्या कृति व वृत्ती यांना मागे खेचण्याची खरी मोठी जबाबदारी आता पालकांची आहे....त्यांनी स्वतःचे आत्मपरिक्षण करत मुलांच्या मानसिकतेला सशक्त बनवत उदयोन्मुख पिढीचा आधारस्तंभ बनलेच पाहिजे असे म्हणावेसे वाटते......

नंदिनी म.देशपांडे.
जुलै,18,2017.

nmdabad@gmail.com

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

**व्हेलेंटाईन@50**

*🌹🌹व्हेलेंटाईन@50.🌹🌹     

                    गेल्या दोन चार वर्षां पासून,अहो म्हणजे स्मार्ट फोन हातात खेळू लागल्या नंतरच वेगवेगळे डे काय असतात ते उमगु लागले आहे.....नाही तर कोणता तरी डे पार पडून गेल्यानंतरच पेपर वाचल्या नंतर कळायचे...पण हल्ली हातातील या खेळण्यामूळे असे वैशिष्ट्य पुर्ण डे जवळ येत आहेत याची वर्दी खूप दिवस पुर्विच मिळू लागलीय.व्हॉट्स अॅप आणि फेस बुक अगदी एखाद्या प्रामाणिक मदतनीसा सारखी या साठी कायम तत्पर असतात बिचारे..... आता हेच बघा ना,आज काय तो व्हेलेंटाईन डे का काय आहे म्हणे ! त्या आगोदर सलग चार पाच दिवस आणखी कोणते रोज,चॉकलेट,प्रपोज वगैरे वगैरे डेज साजरे केले जातात हे याच मदतनीसांनी सांगितले.....पण हे खरेच साजरे होत आहेत  की फोनवर मेसेजेस चे नुसतेच पेव फुटले आहेत ,अशी पाल मनात चुकचुकत होती. आजच्या तरुणाईकडे निरखून पाहिले ,त्यांचे ते भन्नाट वेगाने गाड्यांवरुन हिंडणे,हसणे खिदळणे बघितले आणि त्यांनी ते खरेच साजरे केलेच आहेत यावर विश्वास बसला.....व्हेलेंटाईन डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा,आकंठ प्रेमात बुडून रहाण्याचा अर्थातच आपल्याच प्रेमाच्या माणसाच्या असा आम्हा पन्नाशी नेमकीच ओलांडलेल्या माणसांना थोड्या फार प्रमाणात ऐकून समजलेला अर्थ ! हो ना ,कारण असं एखादाच दिवस प्रेम व्यक्त करतात आपल्याच आवडत्या व्यक्तीजवळ आणि इतर दिवस मात्र प्रेमाची ही नदी काय आटत असते का? अशी एक प्रांजळ शंका बिचारी डोकावली मनात..... कारण आपल्या आवडत्या म्हणजेच आपल्या आयुष्यभर साथ करणार्या जोडीदारा वरच केली जाते अशी प्रेमाची भानगड असा आमच्यावर असणारा आजवरचा संस्कार! बाकी नात्यां बद्दल वाटतो तो जिव्हाळा.एवढीच माहिती आम्हाला.....दोघांनीही परस्परांवर आजीवन प्रेम केलेच पाहिजे,याच परिघात अडकून पडलेलो आम्ही, सारे अरेंज मॅरेज असताना सुध्दा एकमेकांच्या स्वभावातील गुणदोषां सहित प्रगाढ प्रेम करणारी पिढी आमची.....चार चौघात प्रेम व्यक्त करताना केवळ चोरटे नयन बाण ,अगदीच झाले तर थोडा शाब्दिक खट्याळपणा एवढं चालू शकतं या मर्यादेत वावरणारे आम्ही लोक.अशा एखाद्या दिवशी शब्दातून कृतित व्यक्त व्हायचं असतं प्रेमाला घेऊन त्याचे प्रदर्शन मांडत,हे वास्तव न पचवू शकणारं दोरखंडात जखडलेलं आमचं  प्रेम.....पण आजच्या तरुणाई कडे म्हणा किंवा गोदामातून सांडत आलेले हे मेसेजेस वाचून आपणही थोडंसं उछृंकुल वागावे का ? कधी तरी असा आपल्याच आंर्तमनाला कौल मागणारे आम्ही,बाकी काही नाही तरीआपले दोघांचेच एकत्र फोटो तरी शेअर करावेत अशी ईच्छा नकळत पणे होतेच आमच्या मनांची आणि मग अशा औचित्याने डिपि वरचे फोटो तरी बदलले जातात किमान..... दूर कुठे तरी फिरायला जाणे वगैरे तर मनाच्या अवती भोवती सुध्दा फिरकत नाही कधी, ती तहान फोटो वरच भागवली जाते म्हणा ना!आम्हाला आपलं एकच माहित नवर्या बरोबर प्रेमाच्या गोष्टी या एकांतातच असतात असे नाही झाले तर दोघांच्याही डोक्यावर परिणाम झाल्याचा भास होतो इतर बघणार्यांना.... असा असतो आमचा व्हेलेंटाईन डे!अहो नवर्याने प्रेमाने चुकून गजरा आणलाच कधी तर आपल्याच स्वतः च्याच हाताने माळणे केसांत हा सुध्दा मोठ्ठा अपराध मानणार्या आम्ही.....त्याच्याकडे एखादा प्रेमळ कटाक्ष टाकण्या खेरीज कोणताही पराक्रम न करणारी आमची पिढी.....पण हल्ली सभोवतीचे वातावरण,मेडीया,किंवा मुलांच्या आग्रहा खातर्  मनात कॉम्प्लेक्स आल्यामुळे म्हणा,पण हल्ली आमच्या मनातही वर्षानुवर्षे कोंडत ठेवलेले दोघांचेही प्रेम थोड्या प्रमाणात तरी व्यक्त करावे असे वाटू लागले आम्हाला हे ही नसे थोडके.....आपण खूपच गावंढळ आहोत असे म्हणत कोणी बोट दाखवू नये अशी माफक ईच्छा ठेवत बदलत्या प्रवाहात सावकाश झोकून देत नाईलाजाने सामील होण्याची धडपड आमची यामागे, दुसरे काय!!म्हणूनच आम्हीही अपरिहार्य पणे एखादी पायरी चढत असतो तरुणाई बरोबर आणि हा डे साजरा केल्याचे फार मोठे समाधान चेहर्यावर मिरवतो.......अशा दिवसाची एखादी भेट द्यायची असते परस्परांना हे सुध्दा तरुणाईनं सांगितलेलं ,पण आत्ता पर्यंत त्याचे सर्वस्व माझे आणि माझे सर्वस्व त्याचे असेच मानणारे आम्ही भेट म्हणून द्यावयास शिलकीत काही राहिलेलंच नाही तर द्यावे काय?असा प्रश्न पडलेलं मन आमचं.अख्खं आयुष्यच प्रेमाची भेट म्हणून बहाल केलेलं मग वेगळे पणा मुळी उरतोच कुठे?अशा औपचारिकते शिवाय जपलेलं आमचे हे प्रेम........आज व्हेलेंटाईन डे ची माझ्या नवर्याने कोणतीच किमती वस्तू भेट म्हणून दिली नाही किंवा छानसा ड्रेस गिफ्ट केला नाही तसेच कॅंडल लाईट डिनर नाही म्हणून याच खास दिवशी नवर्याशी भांडून अबोला धरणारी तरुण तरुणी बघितली की वाटतं खरंच यांचं प्रेम आहे एकमेकांवर?का केवळ आभासच आहे यांच्यातील प्रेमात?खरे काय नि खोटे काय यांचा मागोवा घेण्यात आमची मात्र कसोटी लागते.....तिच्या प्रियकराने नवर्याने तिला अमुक अमुक दिले,तु काय आणले?अशी तुलना होतानाचे चित्र बघितले की वाटतं आमच्या पिढीने नवरा बायको म्हणून केलेले आणि त्याच नात्यात प्रियकर प्रेयसी या ही भुमिकेत शिरुन केवळ शारीरिक आकर्षणाला न भुलता मनाने मनाशी साधलेलं निःशब्द एकरुपकत्व हेच तर खरं प्रेम.प्रगल्भ प्रेम.जे जबाबदारी आणि कर्तव्य यांच्याशी बांधिलकी जपत अखंडपणे वाहत रहाणारं......दिवसभराच्या निरिक्षणातून हा निघालेला निष्कर्ष बघितला आणि समर्पणाच्या कृतार्थ भावनेने दोघांनाही सुखाची शांत झोप केंव्हा लागली ते कळलंही नाही......

   *नंदिनी म. देशपांडे*

nmdabad@gmail.com

♥♥♥♥♥♥♥♥♥♥

‌‌ *उत्सवप्रिय वसुंधरा*

*उत्सवप्रिय वसुंधरा*

वैशाख वणव्यात तप्त झालेली अवनी आपली क्षुधा शमवण्यासाठी आकाशातील मेघांना सादच घालते आहे असे वाटते जेंव्हा आपण आरती प्रभूंच्या ,ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना.....या ओळी एेकतो किंवा गुणगुणतो.....आपली सखी,अवनी हिच्या या विनवणीला प्रतिसाद देत महा कवी कालिदासाच्या जयंतीला सोबत घेऊन आषाढ अवतरतो....तो आपल्या  बरोबर धो धो पावसाच्या मोठ्या मोठ्या सरी घेऊनच.....जेष्ठाच्या एखाद्या शिडकाव्याने न शमलेली अवनीची आस या आषाढ सरींनी मात्र तृप्ततेचा श्वास घेत स्वच्छ न्हाऊनच निघते.....स्वतः बरोबरच आपल्या अंगा खांद्यावर खेळणार्या संपूर्ण सृष्टिला सुध्दा यात न्हाऊन निघण्याचा मनमुराद आनंद देत, सगळीकडे चैतन्य पेरत जाते.....आषाढातील अविरत बरसणार्या या सरींना आपल्या उदरात गडप करत ही अवनी जणू नवनिर्मिती साठी सज्ज आहे मी.....अशी घोषणाच देत आहे असे चित्र तयार होऊ लागते, तेंव्हा जेष्ठ कवी,ना.धो.महानोर यांच्या कवितेच्या ओळी,'या नभाने या भुमीला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे....आठवल्या शिवाय रहावत नाहीत.... असे चित्र साकारू लागते ना लागते तोच .....अवनीने पसरवलेल्या हिरव्या गार मखमली गालिचावर मोठ्या झोकात पण हळूवार पाऊले टाकत नाचत बागडत संपूर्ण सृष्टिला तरल बनवत ,आवतरतो तो श्रावण....आणि सहज सुचतात बालकवींच्या कवितेच्या आेळी,श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे,क्षणात येते सरसर शिरवे , क्षणात फिरुनी उन पडे . . .  श्रावण जणू विडाच घेऊन येतो अवनीच्या सृष्टि सौंदर्याला व्दिगुणित करण्याचा.....आपल्या वैविध्यपूर्ण छटांनी या सृष्टिला अविरत सौंदर्याने नटवतो.....अवनीला कधी हिरव्या पोपटी हिवराईची पैठणी नेसवत त्याला उन्हाच्या चंदेरी सोनेरी रंगाची महिरप देत काठांना खुलवतो आणि अशा या भरजरी पैठणीच्या पदराला श्रावण सरींच्या हर्षोल्हासात दंग होऊन नाचणार्या मोरपिसार्याच्या नाजूक नक्षीने सजवतो...श्रावण आला की,हिरवी पिवळी पाने,रंगीबेरंगी फुले,फुलपाखरे अवनीवर फेर धरत नाचू लागतात.झाडे आणि वेली आकाशाकडे झेप घेऊ पहातात. निर्झर ठिकठिकाणी आपले लोभसवाणे रुपडे दाखवत नादमय स्वरात अवनी च्या पायांवर लीन होताना दिसतात.......नद्या स्वच्छंदपणे खळखळून वाहत्या होतात.....उन्हाचा सावली आणि पावसाशी चालू असणारा लपंडाव चांगलाच रंगलेला असतो......तर मध्येच केंव्हा तरी इंद्रधनुची सप्तरंगी कमान आकाशाला सुरेख तोरण बांधताना दिसते.....आकाशही अवखळपणाने कधी आकाशी,कधी निळेशार तर कधी निळेभोर कधी नारिंगी कधी सोनेरी तर मध्येच तांबडे आणि जांभळे असे नयनरम्य रंगांनी सजते....वैशाखात तप्त असणारा तेजोनिधी श्रावणात मात्र प्रेमळ होतो आणि सायंकाळी निरोप घेताना जणू लखलखता सोनगोळाच बनून अंबराची आभा वाढवतो.....हलका थंडगार रानवारा पानापानांशी सलगी करत फुलांचा सुवासिक दरवळ आसमंतात पसरवतो.......निसर्गाचा दिमाख वाढवणारा असा हा श्रावण परोपकारी वृत्ती जोपासत ,अन्नदानाचे पुण्य पदरात पाडून घेत,अध्यात्माच्या आणि धार्मिक व्रत वैकल्याच्या अधिष्ठानावर विराजमान होतो.वातावरणात मांगल्य आणि पावित्र्याची भरभरून उधळण करतो .माहेरवाशिणींना माहेरी जाण्यासाठी उद्यूक्त करतो नि भुतदयेचा मंत्र देऊन नात्यांमधील ओढ निर्माण करतो.......प्राणी मात्रांवर प्रेम करावयास सांगतो......निसर्गाचं आणि अवनीचं हे निरनिराळ्या आभुषणांनी नटलेलं सुंदर रुपडं बघून  नकळतपणे कवी कुसुमाग्रजांना या सुंदर काव्यपंक्ती आठवल्या असाव्यात नक्कीच....."हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला....तांबुस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण  आला मेघात लावित सोनेरी निशाणे आकाश वाटेने श्रावण आला.... लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपीत श्रावण आला... इंद्रधनूच्या बांधित कमानी, संध्येच्या गगनी श्रावण आला. "...   

अॅड.नंदिनी देशपांडे.*

nmdabad@gmail.com

☘🌸☘🌸☘🌸☘🌸☘🌸☘🌸☘🌸

**रिकामं घरटं**

*रिकामं घरटं*
देवा असं कसं मन ?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तूले
आसं सपन पडलं!
मानवी मनाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवत असताना बहिणा बाईंनी या मनाच्या उद्गात्यालाच केलेला प्रति प्रश्न आपल्याला खरंच अंतर्मुख करून टाकतो.....आपल्या आठवणी कधी कधी अगदी ब्लॅन्क होऊन जातात....आपण त्यावेळी मी पार विसरले असे म्हणतो....पण आपले मन कधी ब्लॅंक होताना जाणवले का आपल्याला?आपल्या मानसिकतेचा आत्मा असणारं हे मन जर ब्लॅंक झालं तर.....आपल्या मनाचं आणि भाव विश्वाचं खूप जवळचं नातं आहे....मनाचं पाखरू भावनांच्या हिंदोळ्यावर नेहमीच उडान घेण्याच्या प्रयत्नात असतं....मन आणि रिकामपण यांच्यातही तसं काही साधर्म्य नाहीच ....आपण निवांत असतानाही हे मन पाखरू अवती भोवती मुक्तपणे सैर करून येतंच असतं.... किंबहुणा,आपल्या प्रत्येक गोष्टीशी,माणसांशी,आपल्या वस्तू आणि वास्तूशी,व्यवसायाशी अनेक अनेक बाबींशी आपलं हे मन बांधिलकी जपत असतं .....कधी कधी याची अशी अत्यंतिक सलगी आपल्याला खूप तापदायक ठरते.....
मी आणि माझे मन यांच्या व्दंव्दा मध्ये पुष्कळ वेळी माझे मनच वरचढ ठरते....खरं तर माझ्यातील मी ला काही क्षण का असेनात पण ते केवळ माझेच असावेत असे वाटते.त्यात मी आणि फक्त मी च असवी....अशा वेळी माझ्या मनाला सुध्दा लगाम घालून माझ्याच भोवती पिंगा घालावयास मी भाग पाडते ना, त्या वेळी माझ्या मनाचं घरटं,(मनातील इतर कोणतेही विचार बाजूला सारल्यामूळे)पुर्णतः रितं झालेलं असतं....माझा मनमोर हा माझ्या स्व च्या पुर्णपणे आधिन झालेला असतो या वेळी....ते स्व भोवती आनंदाने फुलोरा फुलवत  थुईथुई नाचत असतं.....हेच मनाच्या आतील गाभार्याचं रुपांतरित झालेलं रिकामं घरटं असतं प्रत्येकाचं.....स्वानंदा साठी दिवसभराच्या रामरगाड्यातून आपल्या स्वतः साठी एखाद्या आवडीच्या कामात घालवलेले हे निवांत क्षण खरंच खूपच मोलाचे.....व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचे असे रिते घरटे वेगवेगळं निश्चितच असणार .....आढावा घेतल्यास काहींना ते आपल्या व्यायामा नंतर पाणी पिण्याची वेळ आपलं रिकामं घरटं वाटतं तर काहींना सकाळी सकाळी चहा घेत घराच्या खिडकीतून बाहेर निरिक्षण करताना....मला मात्र माझी दैनंदिन कामं आटोपल्या नंतर आत्ता लगेच करावे लागेल असे काहीच शिल्लक नाही आणि आता या वेळची मी एकटी राणी असे म्हणत हुश्श करते आणि माझ्या आवडीचे लिखाणाचे काम हाती घेते किंवा आवडती जुनी गाणी ऐकते तेच माझं रिकामं घरटं आहे हे मला त्या वेळी उमगते आणि खूप मना पासून त्या क्षणांचा आनंद मी माझ्यासाठी घेते......तुम्हीही सांगू शकता ,असं रिकामं घरटं तुमच्या साठी केंव्हा उपलब्ध होतं दिवसभरात ते!!!

*अॅड.नंदिनी देशपांडे.*©

nmdabad@gmail.com

**धर्म**

*धर्म*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपला भारत देश,त्याच्या खास वैशिष्ट्यांची आभुषणं आपल्या शिरपेचात खोऊन मोठ्या अभिमानाने या जगाच्या नकाशावर डौलात उभा असल्याचे आपण बघतो आहोतच....नक्कीच प्रत्येक भारतीया साठी ही फार वंदनीय बाब आहे.....आपल्या मातृभूमीची ही विविध आभुषणं,अलंकार किंवा दागिने कोणते ? असा प्रश्न असेल तर मी उत्तर देईन....वैविध्य,सर्व धर्म समभाव, यांमध्ये दडलेली तिची संस्कृति.....वैविध्यते मध्ये विविध भाषा,प्रदेश,धर्म ,जाती,पोशाख,पदार्थ इत्यादी इत्यादी.....सर्व धर्म समभाव हे तर आपल्या राज्य घटनेचे एक ठळक सौंदर्यच ......

हेच सौंदर्य प्रत्येक भारतीयाने अतिशय काळजी पुर्वक हाताळले,जपले,त्याचा आदर केला तर  त्या सारखे भुषणावह काहीही नसेल असे वाटते....

माणूस,हा फार समाजशील प्राणी आहे,तसा तो भावनाशील आणि सश्रध्द सुध्दा आहेच....माणूस,मग तो कोणत्याही जातीधर्माचा का असेना त्या प्रत्येकाला अशी भावनिक भूक असतेच असते....म्हणूनच  भारतीय संस्कृती ही विविध धर्माच्या आधिष्ठानावर ,तत्वज्ञानावर  उठून दिसते नेहमीच..... धर्म आपल्या तत्वांत कायमच इतर सर्व धर्मतत्वांचा आदर करण्याचीच शिकवण देत असतो यात दुमत नाहीच......प्रत्येक धर्म संस्कृति ही जीवन जगण्याची एक एक कला कशी आहे,असावी हे शिकवतो आणि त्या नुसार मार्ग दाखवतो असेच म्हणता येईल.....

एकमेकांच्या धर्मावर,ईश्वरावर कुरघोडी करणं हे कोणत्याही धर्माच्या तत्वांत बसणारे नाही....कारण असे केल्यास त्याला  माणूसकीच्या धर्म तत्वात कधीच स्थान मिळणार नाही हेही तेवढेच खरे.... पण आपल्या धर्माचे  श्रेष्ठत्व सिध्द करण्यासाठी आणि अस्तित्व टिकवून ठेवण्या साठी केवळ धार्मिक कामांना ,धार्मिक स्थळांना ,देवतांना भारंभार देणगी देणं अयोग्यच. या पेक्षा गरजवंताला ही रक्कम मदत म्हणून दिल्यास असे समाधान मनःशांती देवून जाते ....

खरे तर कोणत्याही धर्माच्या एकाही  देवतेला पैशांची आसक्ती कधीच नव्हती ,नसणारही आहे पण त्या नावावर पैसा उभा करत स्वतःची तुंबडी भरण्याची मानवी वृत्ती फार घातक आहे. देवतेला देणगी बहाल केली,प्रत्यक्ष जाऊन हात जोडले म्हणजेच केवळ धर्म जपणे असे नव्हे. धर्म हा आपल्या मनात नितांत श्रध्दा ठेवत आपल्या वागण्या बोलण्यातून कृतितून ,वृत्तीतूनही जोपासला जाऊ शकतो....पण देणगीच्या स्वरुपात त्याचे प्रदर्शन मांडले जाऊ नये....देणगीचे स्वरुप आणि पध्दत यात गुप्तता पाळली गेली असेल तरच ती 'देणगी'या सदरात मोडेल नाही तर, ते देणार्याच्या श्रीमंतीचे प्रदर्शनच ठरेल....

सार्वजनिक स्वरुपाचे उत्सव सुध्दा मुठभर स्वार्थी लोकांच्या हातात सोपवून त्यांना त्यांच्या शक्ती प्रदर्शनाला वाव देत राजकारण करण्याची संधी उपलब्ध करुन देऊ नये. अशा पध्दतीने धर्माच्या नावाखाली चालणारे राजकारण चीड आणणारे ठरते....

देवतेला श्रध्देने जोडलेले दोन हात सुध्दा खूप होतात.....भावनेच्या आहारी न जाता सद्सद्विविवेक बुध्दी शाबुत ठेऊन जपलेला धर्म केंव्हाही श्रेष्ठच.मानवा जवळ भावने पेक्षा बुध्दीचे स्थान नेहमी उच्च प्रतिचे असतेच असते, याचे भान ठेवत वागणे फार आवश्यक आहे.....

प्रत्येक धर्माची सुटसुटीत व्याख्या म्हणजे "कर्तव्य''.  धर्मग्रंथ परत्वे सांगितलेल्या तत्वांना अनुसरुन केलेले आचरण म्हणजे धर्म.ही सर्वच धर्माची तत्वे मानव कल्याणा साठीच लिहून ठेवली आहेत हे निश्चित. पण तथाकथित समाजाने आपल्या सोयीने अर्थ लावत त्यांना विकृत करुन ठेवले आहे....माणसाने आपल्या बुध्दिची दिशा त्यातील तत्वानुसार ठरवत वर्तन केले तर अजिबात गोंधळ उद्भवण्याचा प्रश्नच येणार नाही कधीही....

तात्पर्य काय ,तर  प्रत्येक धर्म हा मानव कल्याणा साठीच विविध विचार धारांतून उदयाला आलेला आहे त्यां व्दारे कल्याणच साधले जावे, स्वार्थाला थारा असू नयेच कधीही तरच आपल्या भारतीय राज्य घटनेच्या तत्वांचे खर्या अर्थाने पालन होईल.....

नंदिनी म. देशपांडे .

nmdabad@gmail.com

आॅगस्ट ; १९,२०१७.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼