शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

कविता-पाऊस. (बालकवी). रसग्रहण.

#आठवणीतील कविता#

      आठवणीतील कविता या साखळी उपक्रमातील एक कडी बनण्याची संधी,मला माझी मैत्रिण अर्चना कुलकर्णी,हिनं दिली आणि मी आनंदून गेले....या साखळीचा एक हिस्सा आपण बनत आहोत,या जाणिवेनं....अर्चनाचे मनस्वी आभार....

      आठवणीतील कविता आठवण्यापूर्विच, त्या कवितांचे कवी प्रथम आठवत गेले....त्यांपैकीच एक;
बालकवी-त्र्यिंबक बापूजी ठोंबरे हे एक!

     अवघ्या सतराव्या वर्षी, साहित्य संमेलनात यांनी जागेवरच कविता रचून, तिचं निवेदन केलं आणि कौतुकानं संमेलनाध्यक्ष कर्नल डॉ.किर्तिकर यांनी त्यांना बालकवी ही पदवी स्वयंस्फुर्तिनं बहाल केली....

     अर्वाचीन काळातील एक प्रतिभावंत कवी अशी ख्याती असणाऱ्या बालकवींना,
"निसर्गकवी"असेही संबोधले जाते...केवळ सत्तावीस वर्षे आयुष्य लाभलेल्या या कवीनं पावणेदोनशे कविता रचून ठेवल्या आहेत!

     त्यांच्या, श्रावणमास, आनंदी आनंद गडे, औदुंबर,निर्झरास,
फुलराणी,पाऊस इ. कवीतांनी शतकोत्तर काळ लोटलायं,पण आजही मनावर गारुड केलं आहे....
   कविता म्हणजे काय?कविता वाचनाची गोडी, 
 निसर्गाकडे बघण्याची सौंदर्यपूर्ण नजर ही आमच्या पिढीला बालकवी
कडंन मिळालेली देणगी आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही....

   त्यांपैकी,"पाऊस"
ही कविता मी आज येथे उपकृत करत आहे...
     सध्या पर्जन्य राजानं,साऱ्या सृष्टीवर आपला वरदहस्त ठेवलेला दिसतोय...
अशाच पाण्यांनं भरभरुन ओंथबणाऱ्या आकाशातील मेघांचे वर्णन काय सुंदर केलंय,या आपल्या कवितेतून बालकवींनी!
   तुम्ही प्रत्यक्ष वाचूनच तो आनंद मिळवा....पावसाच्या जलधारांसवे पाऊस वाचत.....
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
# पाऊस #
___________
थबथबली ओथंबून खाली आली  ‌‌
जलदाली मज दिसली सायंकाळी
रंगही तिचे नच येती वर्णायाते!
सुंदरता त्यांची मम भुलवी चित्ता
व्योमपटी जलदांची झाली दाटी
कृष्ण कुणी काजळिच्या
शिखरावाणी!
नील कुणी ईंद्रमण्याच्या कांतिहुनी!
गोकर्णी,मिश्र जांभळे जसे कुणी;
तेजात धुम्राचे उठती धोत,
चमकती पांडुरही त्यापरिस किती!
जणू ठेविल माल भरुनी वर्षादेवी
आणुनिया दिगंत राहुनि या ठाया!
कोठारी यावरला दिसतो न परी!
पाहूनि ते मग मारुत शिरतो तेथें!
न्याहळूनी नाहिं बघत दुसरे कोणी
मग हातें अस्ताव्यस्त करी त्याते!
मधु मोतीं भुवरती भरभर ओती!

बालकवी.

(बालकवींच्या निवडक कविता).

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

#वरणफळं.#

चोचले जीभेचे....
__________________

*वरणफळं*

    अगं मावशी अहाहा,काय टेस्टी झालीए डिश!मावशी,तू ना, पुण्यात राहिला आलीस ना की,तेथे  एक छानसा स्टॉल टाक वरणफळांचा. बघ मस्त रिस्पॉन्स मिळेल....
    माझ्या भाचीच्या वेदश्रीच्या या सिरियसली बोलण्याचे मला हसू आले...
   
       पण तिच्या म्हणण्यात तथ्य आहे,म्हणजे चवीच्या बाबतीत.... खरंच तर आहे ते!आपला पारंपरिक पदार्थ पिढ्यान् पिढ्यांपासून वेगवेगळ्या चवीने बनवला जाणारा... वेगवेगळ्या पध्दतीनं बनवला जाणारा...पण कॉम्बिनेशन एकच तुरीच्या डाळीच्या पातळ वरणात कणकेचे लाटून छोटी छोटी फळं(पुरी) टाकून त्यात शिजवायची....

      कुणी साध्या वरणात बनवतं,कुणी आंबट वरणात तर कुणी मसाल्याच्या वरणात...मला मात्र ही फळं 
आंबटगोड वरणातलीच आवडतात...तेही पहिल्या वाफेचे...वरण पातळ असेल तेंव्हाचे तर फारच चवीष्ट!
   गरमागरम वाढून घेत, छान पैकी हात सोडून त्यावर तुपाची धार टाकावी आणि लोणचं चटणी सोबतीला असावं...बस्स...
   
   ‌यातही एक एक वेगवेगळी पुरी करुन सोडलेली जास्त चवदार लागते... शंकरपाळी बनवून एकदमच शिजवलेली गिजगा होतात आणि माझ्या मते बेचव लागतात...
   
     पण खरंच ही वरणफळाची डिश आहे मोठी टेस्टी....या लॉकडाऊनच्या काळात भाजीशिवाय बनवता येणारी, वेगळ्या चवीची पण एक वेगळी डिश,उकडीची म्हणता येईल अशीच.आठवड्यातून एकदा तरी बनवावी अशीच आहे...ठरवा तर मग कधी बनवता ते!!

*नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹🌹