मंगळवार, ९ जुलै, २०१९

केदारनाथ.

*हिमालयाच्या सहवासात*

  *केदारनाथ*

कैलास राणा शिवचंद्र मौळी ।
फणींद्र माथा मुकुटी झळाळी ।
कारुण्य सिंधू भव दुःख
हारी।
तुजविण शंभो मज कोण तारी।

    आज आम्हाला निघावयाचे होते, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, समुद्र सपाटी पासून   चक्क ३५८३ मीटर उंचीवर असणाऱ्या केदारनाथ या ठिकाणी!

      सामान्यपणे आपल्या महाराष्ट्रात, चारधाम यात्रा म्हणजे, आपल्या भारताच्या चार दिशांना असणारे चार तीर्थक्षेत्र.पुर्वेकडे जगन्नाथपुरी, पश्चिमेकडे द्वारका,दक्षिणेकडे रामेश्वरम आणि उत्तरेकडे बद्रीनाथ यांचा समावेश केला जातो. पण उत्तरांचल राज्यात, गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, यांच्या दर्शनाला चारधाम यात्रा असे मानतात.आम्ही करत असणारी हिच ती धार्मिक यात्रा.यात आम्ही स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधून घेतले.धामदर्शनाने परमार्थ साधणे,व निसर्ग दर्शनाने निसर्ग सफरीचा आनंद घेणे, हा आमचा स्वार्थ तर होता ! दोन्हींमुळेही मानसिक समाधान मिळत होते,हे सांगणे नलगे.

     तर, आम्ही केदारधाम वर जाण्यासाठी हेलिपॅडवर निघालो. हेलिकॉप्टरचे ऑनलाईन बुकींग अगोदरच केलेले होते. आम्हाला दिलेल्या वेळेच्या एक तास अगोदर या ठिकाणी पोहोचणं आवश्यक होतं. सोबत आधार कार्ड अनिवार्य होतंच.

     केदारनाथला जावयाचं म्हटले की, २०१३ वर्षीच्या प्रलयाची आठवण, जी कायम मनात घर करून बसली होती; ती पुन्हा पुन्हा मनाच्या गाभाऱ्यातून बाहेर डोकावत होती. एवढेच नव्हे तर,त्या गोष्टीला एवढी वर्षे झाली तरीही, त्यावेळी टीव्हीवर बघितलेल्या प्रलयामूळे झालेल्या विनाशाच्या व्हिडीओ क्लिप्स डोळ्यांपुढे आजही तरळत होत्या. योगायोग म्हणजे साधारण त्याच तारखांच्या दोन-तीन दिवस पुढे आम्ही केदारनाथ धाम वर जाणार होतो.पण या सर्व आठवणी ओठांवर आल्या,तरीही बाहेर पडू द्यावयाच्या नाहीतच, ही यात्रा पूर्ण होईपर्यंत असा निग्रह मी केलेला होता.जी परिस्थिती समोर येईल त्याला तोंड द्यावयाचे आणि मुळात, 'आपण सुखरूप परत येणार आहोतच',असा सकारात्मक भावच मनात ठेवायचा.असे ठरवूनच आम्ही उत्तरांचल ला निघालो होतो.

      २०१३ मध्ये तेथे गेलेले आमचे कितीतरी परिचित, वापस आलेले नव्हते. हे माहीत असतानासुद्धा! कारण प्रचंड इच्छाशक्ती चे पारडे जड होते निश्चितच.

     या घटनेपासून मात्र उत्तराखंड टुरिझम डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या मार्फत टुरिस्ट,पिलग्रीम्स रजिस्ट्रेशन आणि ट्रेकिंग एसेस कार्ड, देण्याची सुरुवात झाली. त्यामुळे तिकडे जाणाऱ्या लोकांची नोंद होऊ लागली. तेथे गेल्यानंतर कोण कोण किती दिवस असतील? व कोणत्या दिवशी कुठल्या धामावर असतील ? हे नमूद करुन ठेवले जात आहे.आधार कार्ड,थंब इम्प्रेशन वगैरे घेऊन, आपल्याला एक क्रमांक दिला जातो. जेणेकरुन, काही नैसर्गिक आपत्ती आल्यास तेथे गेलेली माणसं ओळखावयास मदत होऊ शकेल. विशिष्ट शहरातील कोणत्याही एका केंद्रावर अशी नोंद होत होती.भरपूर प्रवाशांची संख्या असल्यामुळे हे काम दोन तासांचे चांगलेच वेळखाऊ पण आवश्यक होतं.ही सगळी प्रक्रिया आम्ही एक दिवस आगोदरच पार पाडली होती.

     केदारधाम वर वरती जाण्यासाठीचे, चार पर्याय आहेत एक हेलिकॉप्टर,दुसरा डोली, तिसरा खेचर व चौथा आपले दोन पाय.

      प्रलया पूर्वी जाण्याचे अंतर १४ किलोमीटर होते.पण नव्याने रस्तेबांधणी झाल्यामुळे ते २१ किलोमीटर झाले आहे.असे सांगितले गेले. त्यामुळे तो पर्याय बादच झाला.

    चार पाच कंपन्यांची हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध आहे.पण ती सुद्धा तेथील हवामानावर अवलंबून असते.अनुकूल हवामान असेल तरच सकाळी सुर्योदया पासून ते सायंकाळी सुर्यास्ता पर्यंत ही सेवा चालू असते. आम्ही खरंच खूप नशीबवान! अख्ख्या सहलीमध्ये हवामान बदलाचा कुठेही अडथळा आला नाही.त्यामुळे सहलीची पूर्ण मजा चाखता आली. छत्री रेनकोट यांचे ओझे वागवावे लागले सोबत, पण त्याची गरज पडलीच नाही.

    हेलिकॉप्टरच्या नियमानुसार सामान घेऊन आम्ही हेलिपॅड च्या स्टेशन वर दाखल झालो. दिलेल्या वेळेतच आम्हाला त्यात बसवण्यात आलं. होय, 'बसवण्यात आलं'असंच म्हणेन मी.कारण, आमचा हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा हा पहिलाच अनुभव होता. ते आमच्यासमोर उतरले त्यावेळी त्याच्या विशालकाय अशा पंखाच्या हवेने आपण फेकले जातोय की काय? असं वाटत होतं. सहा माणसांच्या या हेलिकॉप्टरमध्ये, वजनानुसार कोण कुठे बसावयाचे म्हणजे समोर दोन आणि मागे चार अशी आसन व्यवस्था होती. प्रत्येकाची जागा ठरवून दिलेली होती.  दिवसभराच्या अखंड फेऱ्या चालूच असतात हेलिकॉप्टरच्या. त्यामुळे वेळ वाया जाऊ नये, यावर कटाक्ष ठेवला जायचा. वरतून येणारे प्रवासी व त्यांचे सामान उतरवून घेण्यासाठी त्यांच्या आगमनापूर्वीच तीन मदतनीस सज्ज असतात.आणि चढवणाऱ्या प्रवाशांसाठी वेगळे तीन सज्ज असतात. ते अक्षरशः आपल्याला घाईघाईने उतरवतात आणि चढवतातही!

      आम्ही हॅलिकॉप्टरमध्ये बसून यशस्वीपणे मार्गस्थ झालो. आहाहा !!! काय सुंदर नजारा दिसत होता तो! या अवनीचा! उंच उंच हिरव्यागार पहाडांच्या जंगलांवरतून  आकाशाच्या ढगांमधून तरंगत तरंगत जात असताना, आपण अक्षरशः स्वर्गात जातोय म्हणजे, (सैर करण्यासाठी या अर्थाने,)असंच वाटत होतं. दऱ्या खोऱ्यांतून वाहणाऱ्या नद्या बारीक पांढऱ्या नागमोडी रेषे सारख्या भासत होत्या! फारच अप्रतिम सौंदर्य होते हे पृथ्वीचं! एकदा तरी अनुभवावं असंच!

       आपण हेलिकॉप्टरमध्ये स्थीरस्थावर होऊन सभोवती बघेपर्यंत दहा मिनिटात तर बर्फील्या पहाडांच्या अगदी जवळ आलो आहोत हे लक्षात येईपर्यंतच, केदारनाथच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर पायउतारा देखील होते.

      तेथे पोहोंचल्या  क्षणाचा मात्र होणारा मनातला आनंद केवळ शब्दातीत! या पवित्र भूमीवर पाय लागताच कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं.माणसाचा जन्म घेऊन जिवंतपणी
"स्वर्ग सफर"म्हणतात ती हीच तर! असं वाटल्यावाचून राहत नाही.

     तेथे उतरल्यानंतर  सुरुवातीला काही वेळ आपण त्या वातावरणाशी जुळवून घेत,सोबत नेलेला कापूर रुमाला मध्ये घेऊन तो नाकाने, तोंडाने श्वासात भरुन घेणे गरजेचे आहे. कारण बऱ्याच जणांना हवेमध्ये ऑक्सिजनच्या कमी प्रमाणाचा, श्वसनाला त्रास होऊ शकतो असे म्हणतात. म्हणूनच, गेल्या गेल्या अवांतर बोलणे टाळावे. तसेच, आपल्या शरीराची हालचालही अगदी मंद गतीने करावी.हेलिपॅड पासून आमचं तेथे असणारं निवासस्थान तसं जवळच होतं. फारतर एखादा किलोमीटरवर.अंतर थोडंच होतं,पण तेवढंही चढावयास दमछाक होत होती. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे असेल बहुतेक असंच वाटलं.

     कित्ती आनंद वाटला आम्ही केदारनाथवर मुक्काम करणार,अशा अलौकिक ठिकाणावर म्हणून सांगू !आमची बॅग टेकवून लगेच जवळच असणाऱ्या श्री केदारनाथ मंदिराच्या दर्शन ओळीत चालायला लागलो.गर्दी भरपूर होती.

     लांबच लांब रांग होती. आकाश निरभ्र होतं. ऊनही नव्हतं. थंडीही फारशी नव्हती. गार हवा वाहत होती. निसर्गाने प्रसन्नपणे आमचे तेथे स्वागत केल्याचा आनंद झाला. दर्शन पूर्ण होईपर्यंत किंबहूणा,आम्ही त्या ठिकाणी असेपर्यंत वातावरणाने अशीच साथ द्यावी आम्हाला, अशी मनोमन प्रार्थना केली. दर्शन प्रतीक्षेचा कालावधी अंदाजे तीन तास लागतील असे वाटत होते.

      दर्शन घेण्यासाठी कोणतेही नियम, नियोजन नव्हते. त्यामुळे शिस्तही नव्हती. मागून येणारेही दर्शनासाठी सरळ समोर जाताना बघून इतर भाविकांचा संताप होणं अपरिहार्य होतं. कारण प्रत्येक जण केवळ आणि केवळ तेवढ्यासाठीच तर या ठिकाणी आलेले होतं! केंद्रिय पद्धतीने ऑनलाईन व्यवस्था असणे आवश्यक आहे हे प्रकर्षानं जाणवलं. संधीसाधू लोक पैसे घेऊन भाविकांना लवकर दर्शन देण्याचं आमिष दाखवत असावेत,हे लक्षात येऊ लागलं.

       केवळ तीन महिन्यांपर्यंत दर्शन उपलब्ध असल्यानं अख्ख्या भारतभरातून येणाऱ्या भाविकांची गर्दी होणं स्वाभाविक होतं.ओळीत उभं राहून निसर्गाचे सौंदर्य मात्र पुरेपूर अवलोकन करता आलं.कापसी ढगांची झुंबरं लावलेलं आकाशी रंगाचं आभाळ, मंदिराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या पांढर्‍याशुभ्र स्फटिकी बर्फाच्छादित पहाडांच्या सलग रांगा आणि त्याच्या पायथ्याशी या विश्वेश्वराचं छोटेखानी पण सुंदर हेमाडपंथी मंदिर! मन भरून गेलं हे सर्व बघताना.आता मात्र ,आत मध्ये असणाऱ्या त्या सृष्टिच्या पालन कर्त्याचं  नेमकं रुप बघण्याची उत्सुकता ताणली जात होती. भक्ती रसाने ओतप्रोत मनाला त्याच्यापुढे माथा  टेकवण्याची ओढ लागली होती. मंदिराच्या अवतीभवती २०१३ च्या प्रलयामुळे झालेले परिणाम स्पष्टपणे दिसत होते. ढगफुटीमुळे पाण्याबरोबर वाहात आलेले मोठे मोठे पाषाण अजूनही त्या ठिकाणीच विसावले होते.वाहात आलेल्या ज्या एका भल्यामोठ्या शीळेमूळे पाण्याचा प्रवाह विभागला गेला आणिक प्रलया मध्येही मंदिर अगदी सुरक्षित राहिले,ती शीळा अजूनही मंदिराच्या पाठीशी एखाद्या सुरक्षारक्षका सारखी पहारा देत बसली आहे. हे दिसत होतं. पाठीमागे पण थोडी उंचावर पहारा देणाऱ्या या शीळेला शतशः नमन करावंसं वाटलं.ती तेथे थांबली नसती तर, आम्ही आज येथे नसतोच.हे मनात आलं.

      एव्हाना,मंदिराच्या अगदी जवळ पोहोंचलो होतो आम्ही.  सुरुवातीलाच केदारनाथाच्या सन्मुख उभा असणारा दगडी नंदी, याला वंदन केलं. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर डोळे भरून बघितलं मूर्तीला.आम्ही उभयतां नतमस्तक झालो. दोन्ही हात लावत दर्शन झाले. गर्दी होतीच.

     प्रसन्नचित्ताने 'ॐ नमः शिवाय' हा मंत्र पुटपुटत करता येईल तेवढं  गाभाऱ्याचं निरिक्षण केलं. इतर ठिकाणची ज्योतिर्लिंगाची पिंड असते तसं येथे काहीच नव्हतं.थोडं आश्चर्यच वाटलं! पण मग त्यामागची सांगितली जाणारी अख्यायिका समजली.

    युध्दानंतर पांडवांचा वनवास संपला.आपल्या स्वजनांच्या संहाराचा त्यांना पश्चाताप झाला.त्यातून पापमुक्ती साठी पांडवांना शिवाचं दर्शन हवं होतं. काही केल्या भगवान शंकर त्यांची भेट घेत नव्हते.पांडव कैलास पर्वतावरही जाऊन आले होते.त्यांना सांगण्यात आलं की, खाली रेड्यांचा कळप चाललाय, भगवान शंकर रेड्याच्या रुपानं त्यांच्यामध्ये मिसळलेले आहेत.पांडवांनी युक्तीने सारे रेडे पळवून लावले. पण एक रेडा मात्र गेलाच नाही. भिमाने त्या रेड्याशी झटापट केली असता, आपल्या पाठीचा उंच भाग त्याच्या हातात सोपवून भगवान शंकर गुप्त झाले. या स्वरुपाचा त्यांचा समोरचा तोंडाचा भाग म्हणजेच नेपाळमधील पशुपतिनाथ होय.

      गाभारा थोडासा खोल,पण आपल्या औंढा नागनाथ देवालयाच्या गाभार्‍या पेक्षा थोडासा मोठा आहे. गाभार्‍याबाहेर पाचही पांडवांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.भाविक या महादेवाच्या  पाठीच्या भागाला साजूक तूप लावतात. भीमा कडून शिवाच्या पाठीला झालेल्या ईजेवर औषध म्हणून असावे. पण हिवाळ्यात यावर बर्फ साचू नये म्हणूनही असावे. असा माझा कयास आहे.

     मुख्य दर्शनानंतर, बाहेरच्या परिसरात आम्ही बराच वेळ रेंगाळलो
तेथील रम्य निसर्गाचा तृप्त मनाने आस्वाद घेतला. भरपूर फोटोसेशन केलं.

       बरेच भाविक, मध्यरात्री होणाऱ्या मुख्य पूजेसाठी पुन्हा देवालयात जाणार होते.

     सायंकाळ झाली, आणि आता मात्र थंडीने जोर धरला होता.अचानक गारठून  टाकणारी थंडी सुरु झाली. कितीही जाड रजया, गरम कपडे घातले तरीही ती झोंबायची राहतच नव्हती. आपल्याला 'ऊन मी म्हणत होतं 'या वाक्प्रचाराची प्रचिती नेहमीच येते. पण येथे 'थंडी मी म्हणत होती' याची आम्हाला प्रचिती आली. अजिबात हालचाल करावीशी वाटत नव्हती. पाणी तर अगदी बर्फाचे असावे असेच! आमच्या ट्रॅव्हल कंपनीचा कूक सोबत होता म्हणून कसेबसे पोटात गरम दोन घास खाऊन,आम्ही खोलीतच बसणे पसंत केलं. झोप लागणे केवळ अशक्यच. कशीबशी रात्र काढली. सूर्योदयाची वाट बघत होतो.कारण आम्हाला पावणेसहा वाजता परतीची वेळ हेलिकॉप्टर साठी देण्यात आली होती.

    सकाळी उठल्याबरोबर साडेपाच वाजताच हेलिपॅडवर प्रयाण केलं. सूर्योदयापूर्वीची आकाशातील अभा फारच विलोभनीय दिसत होती! थंडगार हवा चालू होती.पूर्वेकडे असणाऱ्या केदारनाथाच्या कळसाला आणि उगवत्या नारायणाला नमस्कार करत, त्यांचे मनापासून आभार मानले. आणि  हेलिकॉप्टरमध्ये स्वार झालो आम्ही. पुन्हा सीतापुरला येण्यासाठी.

*क्रमशः*

©
*नंदिनी म देशपांडे*

🌄🌄🌄🌄🌄🌄

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा