शुक्रवार, १२ जुलै, २०१९

*बद्रीनाथ*

*हिमालयाच्या सहवासात*

*बद्रीनाथ*

*माना गाव ते पांडव स्वर्गारोहण मार्ग*.

       रस्त्यावरून वाहणाऱ्या नदीच्या  स्वच्छ थंडगार प्रवाहात, तळपायांना सचैल स्नान घालत पायी पायी,आम्ही *माना* या उत्तर भारताच्या शेवटच्या टोकावर असणार्‍या छोट्याशा गावात प्रवेश केला.
      माना, हे एक छोटसं गाव. पण त्याची ख्याती मात्र भारी होती. खरंतर या गावातून दोन तीन किलोमीटरची चढण असल्यामुळे मजल-दरमजल करत आम्ही साऱ्यांनीच रपेट मारली.  रस्त्याच्या दुतर्फा अगदी मोजकीच घर असणारं हे गाव.दरवाजातच वृद्ध स्त्रिया लोकरी च्या साह्याने टोप्या विनवण्या साठी कमालीच्या गतीने आपले हात चालवत होत्या. तेथील गृहिणींचा तो लघु उद्योग असावा. रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकाराच्या आकर्षक टोप्या खूप सुंदर दिसत होत्या.पण अख्खे गाव मागे टाकत, आम्हाला आणखी पहाड चढून पुढे जावयाचे होते.या टोप्या बघण्यात वेळ दवडणं काही संयुक्तिक वाटलं नाही.

     समोर तसेच पुढे गेल्यानंतर पहाडांच्या कपारीत असणाऱ्या गणेश गुफेला भेट दिली. डाव्या बाजूला आणखी पायऱ्या चढून गणेशाचं छोटासं मंदिर आणि लोभस मूर्ती बघून दमछाक झाल्याचा त्रास पार विरघळून गेला.

  छोटीशीच गणेश मूर्ती, पण किर्ती मात्र फार महान होती या गणपती बाप्पाची! या गुहेत बसून श्री गणेशांनी स्वहस्ते महाभारत लिहिलं होतं. असं सांगितलं जातं. आपल्याला महाभारत व्यास ऋषींनी लिहिलं हा  इतिहास माहीत आहे. पण ज्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिला गेला, ते प्रत्यक्ष ठिकाण बघून आनंदाला पारावारच राहिला नाही!काय रम्य आणि सौंदर्यपूर्ण ठिकाण होतं ते, म्हणून सांगू! गणेश गुहे पासून आणखी उंचावर, पहाडाच्या वरच्या भागात व्यास गुफा आहे.गंमत म्हणजे या गुहेत बसून महर्षी व्यासांनी श्रीगणेशाला महाभारताच्या 'स्क्रिप्टचं डिक्टेशन' दिलं, आणि श्री गणेशाने ते खाली आपल्या गुफेत बसून लिहून काढलं.अशी आख्यायिका आहे. ऐकताना खरंच खूप मजा वाटत होती, पण मनही विश्वास ठेवू लागलं या कथेवर! खरोखरच,कोणताही अडसर नाही,सभोवताल पहाडांनी वेढलेलं. व्यासांनी आपल्या गुहेतून सांगितलेलं गणेशाला सहज ऐकू येईल अशीच परिस्थिती, वातावरण. आपण कल्पनाचित्र सहज रेखाटू शकतो. आणि त्याचा पुरावा म्हणजे या ठिकाणांना प्रत्यक्ष बघत होतो.

    या दोन्ही गुफांच्या समोरुनच,तेथेच पहाडातून उगम पावलेली सरस्वती नदी वाहते. भल्यामोठ्या पहाडांच्या कपारीतून पडणारी. तिची एक धार फक्त दृष्टीस पडते.ती कुठून येत असावी याचा अजिबात अंदाज येत नाही आपल्या. पण प्रचंड मोठ्या धबधब्याच्या स्वरुपात काळ्या कुळकुळीत पाषाणावर आपटत आपटत आपल्या प्रचंड आवाजात खळाळत  या दोन्ही गुफांच्या समोरुन वाहात जाते. सुरुवातीला दिसणारी ही बारीक धार म्हणजेच सरस्वती नदीचा उगम होय, असे आपण मानतो. ती कुठून येते त्याचा बोध अजिबात होत नाही.या ठिकाणी देवी सरस्वतीचे छोटेसे मंदिर आहे.मुर्ती फारच रेखीव आहे. तर दोन्ही गुफांच्या  समोरुन वाहणाऱ्या या सरस्वती नदीच्या पाण्याच्या खळखळाटाच्या आवाजाचा मात्र, महाभारत  कागदावर उतरवताना, गणेशांना व्यत्यय येऊ लागला. व्यासांचा आवाज त्यांच्या पर्यंत पोहोंचत नव्हता. आहे ना गंमत! तेंव्हा, राग येऊन श्री गणेशांनी सरस्वती देवी ला तुझा आवाज बंद होऊन जाईल असा शाप दिला.आणि थोडे पुढे गेल्यानंतर ही सरस्वती नदी लुप्त होते. अशी आख्यायिका सांगितली जाते.

     ह्याच सरस्वती नदीच्या उगमाच्या जवळ दोन प्रचंड मोठ्या पहाडांना जोडणारा अतिभव्य असा दगड येथे  *'भिमपूल'* या नावाने प्रसिद्ध आहे. पहाडांमधून धबधब्याच्या रुपात पडणारे पाणी, या पुलाच्या खालून आदळत वाहत होतं. खूपच सुंदर ठिकाण आहे हे.या पुलाविषयी मिळालेली माहिती, याच भिमपुला पासून उजव्या बाजूने उंच जाणारा असा पांडवांचा *स्वर्गारोहणाचा* मार्ग आहे आहे.आपण आपल्या डोळ्यांनी तो बघतो आहोत यावर विश्वासच बसत नव्हता!  आहे खरा हा रस्ता पठारी क्षेत्रा सारखा पण उंच जाणारा. स्वर्गारोहणाच्या वेळी, म्हणजे स्वर्गाकडे मार्गस्थ होताना पांडव याच मार्गाने जात होते. पण जाताना सरस्वती नदीच्या दोन पहाडांच्या मध्ये वाहाणऱ्या धबधब्यांचा अडसर बनला होता. त्यांना या मार्गावर जाणे कठीण झालं होतं, रस्ता नाही जावे कसे?अशा परिस्थितीत भिमाने आपल्या प्रचंड शक्तीनिशी उपरोक्त उल्लेख केलेला हा भलामोठा अवजड दगड बरोबर  पहाडांना जोडत, रस्ता तयार केला.आणि मग पांडवांनी यावरुन जात स्वर्गाकडे प्रयाण केले. या सार्‍या कथांवर कितपत विश्वास ठेवावा? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण कथेनुसार त्यातील स्थळांचे पुरावे मात्र बघून आल्याचा अगणित आनंद भरभरुन समाधान देऊन जातो,हे  नाकारुन चालणार नाही.

     या पुलाच्या उजव्या दिशेने संपूर्ण हिमालय पर्वतांच्या रांगा आहेत. त्यातील एका पहाडाच्या तळाशी हिंदुस्थान का *अंतिम दुकान* या नावाचा एक बोर्ड बघितला.तेथे जवळ जात,बघितलं तर खरंच तिथे एक छोटेसं दुकान आहे. तेथे तिरंगा फडकत होता. बोर्डावरील उल्लेखा नुसार हे दुकान खरंच, भारताच्या उत्तरेकडे शेवटचं आहे नक्कीच, यावर विश्वास ठेवावाच लागतो. कारण यानंतर सलग १३ किलोमीटर पर्यंत हिमालय पहाडांच्या रांगा आहेत यातील बऱ्याचश्या बर्फाच्छादित आहेत. आणि त्यानंतर चीनची हद्द चालू होते. असं समजलं. हे सारं समजल्यानंतर मग जाणीव झाली की खरंच आपण आपलं घर सोडून किती लांब पर्यंत आलो आहोत! पण सर्वच यात्रा यशस्वीपणे परिपूर्ण झाली आणि आपण सुखरुप घरी परत जाणार आहोत, या विश्वासाने सहलीचं  खूप सार्थक झाल्याचे समाधान मनात आणि चेहऱ्यावर चमकत होतं.

      बद्रीनाथ हे आमच्या उत्तरांचल चारधाम यात्रेत शेवटचं धाम होतं. येथून आता पुढे परतीचा प्रवास चालू होणार होता. आम्ही जात असताना रस्त्यात, धवली गंगा आणि अलकनंदा यांचा संगम असणारं विष्णुप्रयाग हे ठिकाण बघितलं.अवर्णनीय सौंदर्यपूर्ण असं ठिकाण आहे हे!

     या दिवशी सायंकाळी जोशीमठ येथेच मुक्काम केला. हिंदू धर्माचे संस्थापक आद्य शंकराचार्यांनी येथे हिंदू धर्माचे चार पीठांपैकी एक पीठ आहे म्हणून, मठाची स्थापना केली आहे.ते जेथे तपश्चर्येला बसायचे, ती गुहा येथेच आहे. या मठात लक्ष्मीनारायणाची रेखीव संगमरवरी मूर्ती आहे.तिचे दर्शन घेऊन थोडेसे चढून आम्ही जवळच असणाऱ्या कल्पवृक्षाचे दर्शन घेतले. २५०० वर्षांपूर्वीचा, विस्ताराने प्रचंड मोठा असा हा हिरवागार वृक्ष बघून, तोंडात बोटे घालाविशी वाटली. ते झाड कशाचे असावे? याचा काही अंदाज आला नाही. कारण त्याला फुलं किंवा फळं नव्हती. पण हिरव्यागार झाडाच्या सावलीने  जमिनीचे खूप मोठे क्षेत्र व्यापून टाकलेले होते.

    दुसऱ्या दिवशी सकाळीच परतीच्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यासाठी,बारा तासांचा दोनशे किलोमीटर प्रवास करत आम्ही किर्ती नगर ला आलो.केवळ एक रात्र आराम घेण्यासाठी हा मुक्काम होता. पण येथे हॉटेल एवढ्या छान पॉईंटवर होतं!खळखळ वाहाणाऱ्या नदीच्या काठावरच! सभोवती पहाड, आम्ही खूप आनंद घेतला या ठिकाणाचा.

      सकाळी नाश्ता आटोपून किर्ती नगर ते ऋषिकेश-हरिद्वार दिवसभराचा प्रवास करत, निसर्गसौंदर्य टिपलं.जातांना रस्त्यामध्ये देवप्रयाग येथे अलकनंदा आणि भागीरथी या नद्यांचा संगम बघितला.तर रुद्रप्रयाग येथे, बद्रीनाथा वरुन उगम पावणारी अलकनंदा आणि केदारनाथहून उगम पावणारी मंदाकिनी या दोन नद्यांचा संगम होऊन विष्णू व शिव एकरूप होतात! प्रयाग म्हणजे, दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो,ते स्थान.या भागात असे बरेच प्रयाग आहेत.

     ऋषिकेश शहरामध्ये भागीरथीला गंगा हे नाव प्राप्त होतं. गंगोत्री पासून गोमुखातून उगम पावणारी भागिरथी,येथे पर्यंत येताना बऱ्याच नद्यांना आपल्यात सामावून घेत,येथे गंगा हे नाव धारण करते.येथे मंदिरांची खूप मोठी संख्या आहे.गंगेच्या प्रवाहने संपूर्ण शहराला व्यापून टाकलेलं दिसतं.त्यामुळे दळणवळणाची सोय होण्यासाठी तेथे बरेच झुलते पूल बांधलेले आहेत.सर्वांत पहिला रामांच्या सांगण्यावरुन लक्ष्मणाने बांधला,तो लक्ष्मण झुला प्रसिध्द आहे.आधुनिक तंत्रज्ञानाने  त्याची खूप छान बांधणी केली आहे. त्या शहरात रामझुलाही आहे,आणि  जानकी झुल्याचे काम प्रगतिपथावर आहे.२०२१ मधील कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे ते ऋषिकेश मध्येच.येथेच  लक्ष्मणाच्या मंदिरालाही आम्ही भेट दिली.

       काली कमली वाला नावाचे सत्पुरुष होऊन गेले आहेत.त्यांनी या चारधाम यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी रहावयाची व्यवस्था म्हणून बरेच आश्रम बांधले आहेत. दानशूर लोक यात्रेला आले म्हणजे त्यांना या कामासाठी भरभरून मदत देत असत. त्यामुळे त्यातूनच या आश्रमांचे बांधकाम झाले आहे. ते गेल्यानंतर त्यांच्या मुलानं वडिलांचे काम सर्वदूर पर्यंत पोहचवत, विविध आश्रम बांधले.त्यालाच "चट्टी"असं संबोधन आहे. मी मागे उल्लेख केल्याप्रमाणे  चट्टी,म्हणजेच राहण्याची व्यवस्था असणारे आश्रम होत. उत्तराखंडमध्ये हनुमान चट्टी,जानकीचट्टी, सायंचट्टी असे भरपूर आहेत.याच बाबांचा आश्रम ऋषिकेश येथे आहे.मला वाटतं माझ्या बघण्यातलं हे एकमेव ठिकाण असेल,जेथे "कोणत्याही प्रकारची देणगी देऊ नये,स्विकारली जाणार नाही",असं लिहिलेला बोर्ड होता.

      या चारधाम यात्रेच्या आमच्या समारोपाचा दिवस हरिद्वार येथे होणार होता. हरिद्वार म्हणजे देवांच्या दारी जाण्याचे महाद्वार.गंगामातेच्या स्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी भाविकांची गर्दी नेहमीच असणारी. गंगेच्या पवित्र स्नानाचे अतिशय महत्त्व आहे या ठिकाणी. पापक्षालन करण्यासाठी येथे येऊन गंगेत एक तरी डुबकी मारावी असे म्हणतात. या ठिकाणी  बरेच घाट बांधलेली दिसून येतात. हरिद्वार येथील गंगेची सायंकाळची आरती खूपच विलोभनीय असते.आमच्या चारधाम देवदर्शनाची सांगता, आम्ही गंगा आरतीने करणार होतो. ऋषिकेश मधून निघाल्यानंतर बरोबर सात वाजता, हरिद्वारला "हर की पौडी"या ठिकाणी पोहोंचलो. येथे गंगेच्या मुख्य आरतीचे आयोजन केले जाते. तेथे गंगाकाठावर, गंगेची प्रतीकात्मक मूर्ती पालखीमध्ये  आणली जाते. आणि थोडा अंधार झाल्यानंतर बरोबर साडेसात वाजता मुख्य आरती चालू होते. ती आरती बघण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी येथे जमा होते. मोठ्या मोठ्या भरपूर दिव्यांनी युक्त असे आरती पात्र सात पंड्यांच्या हातात घेऊन, गंगेला मंत्र उच्चारत, पुजा पठण व आरती होते.लखलखत्या दिव्यांचे गंगेच्या वाहत्या पाण्यात पडणारे प्रतिबिंब फारच अप्रतिम दिसते! भरगच्च फुलांनी सजवलेली गंगेची मूर्ती, वाहती गंगा,कांही दिवे द्रोणात टाकून गंगेवर तरंगत सोडून दिलेले,वाद्यांच्या नादात होणारी ही मंगलारती आम्ही सर्वांनी डोळे भरून बघितली. कृतकृत्यतेच्य भावनेने भरलेल्या मनाने गंगामातेला मनापासून नमस्कार करत, तिचे आभार मानले.त्या दिवशीचा मुक्काम हरिद्वार मध्येच केला आम्ही.

      आता मात्र घरचे वेध लागले होते. सकाळी नाश्ता आटोपून दिल्लीच्या दिशेने आमच्या बस ने कूच केली.पहाडी प्रदेशाने रजा घेतली होती. रस्ता छानच होता भन्नाट वेगाने दुपारी एक वाजेपर्यंत दिल्लीत आलो.तेथे दुपारचे जेवण घेऊन सर्व प्रवाशांनी परस्परांचा निरोप घेतला.आणि प्रत्येक जण स्वगृहाच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी विमानतळावर जाते झाले.आमचे विमानही वेळेवरच आमची वाट बघत होतेच.रात्री साडेसात च्या ठोक्यावर आम्ही आमच्या स्वगृही पोहोंचलो. यात्रा सफल संपन्न झाली या आनंद व समाधानाच्या ओतप्रोत भावनेसह.

*समाप्त*

©
*नंदिनी म.देशपांडे*.

आषाढ शुद्ध एकादशी.
जुलै,१२,२०१९.

🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा