शुक्रवार, ५ जुलै, २०१९

* उत्तर काशी*

*हिमालयाच्या सहवासात*

  * उत्तर काशी *

   यमुनोत्रीच्या दर्शनाने तृप्त झालेल्या मनाला आता मात्र गंगोत्रीच्या दर्शनाची ओढ लागली होती.ती पूर्ण करण्यासाठी तिच्या पायथ्याशी असणाऱ्या मोठ्या शहरात आम्हाला पाच तासांचा प्रवास करत, उत्तरकाशीला पोहोचणे आवश्यक होते. स्यानचट्टी ते उत्तर काशी केवळ एकशे दहा किलोमीटरचा प्रवास होता.पण पाय मोकळे करावे यासाठी आणि जेवणासाठी चा ब्रेक घेत तिथे पोहोचेपर्यंत पाच तास लागणार होते.तीव्र घाटाच्या रस्त्यांवरून प्रवास करताना असा वेळ लागणे सहाजिकच होते. आम्हीसुद्धा देवदर्शन आणि पर्यटन यासाठी तर निघालो होतो ना, मुद्दाम घर सोडून. अशा अतिसुंदर संगीतमय सदाबहार आणि विविध रंगी निसर्ग सफर करण्याचा कंटाळा येणे शक्यच नव्हते. वसुंधरेच्या या सुंदर रुपाचे अवलोकन करत करत , चालू असणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाच्या लढतींवर वर गप्पाष्टकं आणि प्रत्येक वळणावर होणाऱ्या आपल्याच शरीराच्या हेलकाव्यांनी  प्रवासात रंगत आणली होती.असा सुंदर प्रवास कधीच संपू नये असेही कुठेतरी वाटत होते.

     रस्त्यामध्ये गाडी थांबवून कोणत्याही व्ह्यू पॉईंट ला उतरावे अशी तेथे सोयच नव्हती. कारण रस्त्यांची अरुंद आणि अतिवळण रचना. समोरुन येणारे वाहन असेल तर, अलीकडच्या वाहनाला  थांबावेच लागायचे. आणि मग समोरचे वाहन निघून जायचे. पण गंमत म्हणजे दोन्ही वाहनांना रस्त्यावर मिळणाऱ्या इंच इंच जागेचा अंदाज घेऊनच गाडी थांबवावी लागायची. कारण एका गाडीच्या बाजूला भलामोठा पहाड,बाहेर आलेल्या मोठमोठ्या दरडी, तर दुसऱ्या गाडीच्या बाजूला खोल खोल दरी. दोन्ही गाडीतील प्रवाशांना परस्परांशी हस्तांदोलन करता येईल एवढ्या या गाड्या जवळून जायच्या परस्परांच्या! या वेळी तेथील ड्रायव्हर लोकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे अशी भावना होती प्रत्येकाच्या मनात.

खरं म्हणजे उत्तरांचल मध्ये तेथील अख्खा निसर्ग हाच एक मोठ्ठा व्ह्यू पॉइंट होता,माझ्या दृष्टीने!अशा या निसर्ग सफरीचा आनंद लुटत लुटत आम्ही शहराच्या जवळ येऊ लागलो आहोत हे लक्षात आले. समुद्रसपाटीपासून ११५८ मीटर उंच असणाऱ्या उत्तर काशी या शहरातून हिमालय पर्वतांच्या मधुन उगम पावणाऱ्या बऱ्याच छोट्या मोठ्या नद्यांचे प्रवाह वाहत येतात.

    "नदीकिनारी गावे वसवली जातात हे इतिहासातील गृहीत तत्त्व होय." घाट उतरत उतरत असतानाच, पहाडांच्या कुशीमध्ये, वसुंधरेच्या मांडीवर, भागीरथी (गंगा) नदीच्या दोन्ही किनाऱ्यालगत उत्तरकाशी हा, उत्तरांचलमधील प्रमुख मोठा जिल्हा वसलेला आहे.हे दृष्टीक्षेपात आले.

     काय विहंङम दृश्य दिसत होते ते!उंचावरुन या शहराचे!शुभ्र पांढरी खळाळती भागीरथी,वळणावळणाचे टप्पे घेत, येथील नागरिकांशी हितगुज करत आहे असा भास होत होता. शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या वरच्या पातळ्यांवर वर्षभरात बराच काळ पाण्याचा प्रवाह गोठत असावा.म्हणूनच अगदी किनाऱ्यांवर लोकांनी पक्की घरे बांधून राहण्याची हिंमत केली असणार. नदीचा प्रवाह  लहान शांत मुलांसारखा, चोहोबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार पहाडांच्या रांगा, वसुंधरेने पांढराशुभ्र बारीक वाळू कणांचा केलेला पेहराव!येथे राहणाऱ्या नागरिकांचा दररोजचा दिवस कित्ती प्रसन्नपणे उगवत असेल कल्पना करा!

    दुपारच्या तीन चार वाजताच आम्ही हॉटेलवर पोहोचल्यानंतर,थोडासा आराम करून सायंकाळी सहा वाजता आम्ही उत्तरकाशी शहरातून फेरफटका मारावयाचे ठरवले.तेथे असणाऱ्या मुख्य धार्मिक स्थळांनाही भेटी द्यावयाच्या होत्याच उत्तर काशी या शहरालाही धार्मिक पार्श्वभूमी आहे. येथे अगदी गावातच प्रसिद्ध अशा स्वयंभू  काशीविश्वेश्वराचं मंदिर आहे.या मंदिरात असणारी महादेवाची पिंड ही,वाराणसी (काशी) येथील मूर्तीशी साधर्म्य साधणारी असावी, असा माझा तर्क. म्हणूनच ही 'उत्तर काशी' म्हणून नावारुपाला आली असेल, असा माझा कयास आहे. येथील महादेवाची पिंड किंचितशी उजवीकडे झुकलेली असल्याचे स्पष्ट दिसून येते.

   याच मंदिर परिसरामध्ये एक शक्ती मंदिरही आहे.पण तेथे देवीची मूर्ती नाहीए, तर सहा मीटर उंच आणि भव्य असा त्रिशूल  युगानुयुगे अखंड उभ्या अवस्थेत आहे. जेव्हा देव आणि दानव यांच्यात युद्ध चालू होते, त्यावेळी दुर्गादेवीने आपल्या हातातील त्रिशूळ दानवांना मारण्यासाठी स्वर्गातून फेकला होता. तोच त्रिशूळ जमिनीवर या ठिकाणी मातीत रुतून बसला. तेंव्हापासून तो असाच आहे.अक्षरशः भारावून टाकणारी ही अख्यायिका होय.  खरे खोटे त्या देवांनाच ठाऊक. पण एक पर्यटक म्हणून आपण जेव्हा अशी हटके ठिकाणं बघतो ना, तेंव्हा त्यामागील रहस्य या अख्यायिकांच्या रुपाने ऐकून घेण्याची मनुष्य प्रवृत्ती असते. त्याला काहीतरी धार्मिक अधिष्ठान असले म्हणजे, आपोआपच दोन हात जोडले जातात.मनही प्रसन्न होतो.

     यानंतर शहरातून थोडासा फेरफटका मारला.कारण आवश्यक असणारी औषधं, काही वस्तू, किंबहुणा एटीएम सेंटर यानंतर कुठेही उपलब्ध नसणार ही कल्पना होतीच.या संबंधीची  कामं येथेच आटोपणं  आवश्यक होतं.

    नदीकाठावरचं  शहर, चढ-उतारांचं आणि गजबजलेलं होतं. येथीलच नव्हे तर एकूणच उत्तरांचलमध्ये फिरत असताना फळभाज्या, पालेभाज्या, विविध प्रकारचे रसरशीत फळं, आणि मसाल्याचे पदार्थ यांची चंगळ दिसली. पाण्याला तर काही कमीच नाही.  पहाडांमध्येही ठीकठिकाणी  स्वच्छ वाहत्या पाण्याचे झरे, धारा ओसंडून  वाहत येताना दिसायच्या. जाणारे-येणारे वाटसरु याच धारांना एखादा प्लास्टिक पाईपचा तुकडा किंवा रिकाम्या पाण्याच्या बाटलीचा पाइप सारखा उपयोग करत,ते स्वच्छ नैसर्गिक पद्धतीने निर्जंतुकीकरण झालेलं थंडगार गोड पाणी पित होते. किती छान असेल नाही हा अनुभव! असे अनुभव मिळावयास खरंच भाग्य लाभायला हवे तेही  खरंए.

सुर्यास्ताला आम्ही हॉटेलवर परतलो. जेवण वगैरे आटोपून हॉटेलच्या बागेमध्ये आम्हा दोघी मैत्रिणींची गप्पांची बैठक बसली. पुरुष मंडळी वर्ल्ड कप चा सामना बघण्यात रममाण झाली होती.

   आम्ही दोघी बसलो होतो तेथून,हिरव्यागार पहाडांच्या उंच उंच रांगा सुंदर दिसत होत्या. जसजसा अंधार पडू लागला तसा त्या पहाडांवर काहीतरी लकाकत असल्याचे जाणवले.सुरुवातीला दुर्लक्ष केले आम्ही. तरीही वारंवार तिकडे लक्ष जातच होते. तासाभरातच ती लकाकी ज्वालांची होती हे लक्षात आले. कारण पहाडांवरील जंगलात वणवा लागलेला होता. आणि तो क्षणाक्षणाला पसरत चाललेला होता. तेथील स्थानिक नागरिकाला याविषयी विचारले असता,त्याने,  ही नेहमीचीच घटना आहे.  पहाडांवरील दगड गोटे घरंगळत एकमेकांवर आदळतात, आणि त्यातून निघणार्‍या ठिणगीने वणवा पेट घेतो,असे सांगितले. हा निसर्ग नियमच. त्याला कोण रोखणार होते? तेथे ना अग्निशामक दल, ना माणसांची मदत.त्या पर्जन्य राजालाच दया आली आणि तो बरसला तर त्याचीच मदत होणार होती.पण हे दृश्य आमच्या मनात कायमचं कोरलं गेलं होतं मात्र.

     तोपर्यंत निद्रादेवीचंही बोलावणं आलं. म्हणून, नाईलाजाने झोपावयास जावे लागले.कारण भल्या पहाटे पाच तासांचा प्रवास करत येथून ११० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गंगामातेच्या उगम स्थळाकडे आम्हाला रवाना व्हायचे होते.

©
*नंदिनी म.   देशपांडे*

आषाढ शुद्ध तृतिया.
जुलै,५,२०१९.
औरंगाबाद.

🎄🎄🎄🎄🎄🎄

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा