बुधवार, ३ जुलै, २०१९

उत्तरांचल चार धाम प्रवास वर्णन.*हिमालयाच्या सहवासात*

*हिमालयाच्या सहवासात*

      * " देवभूमी उत्तरांचल मे आपका स्वागत है।"

  * " आपकी यात्रा मंगलमय होओ।"

   * "हम आपके पुनरागमन की अपेक्षा करते है।"

  * "आपको हुए कष्ट के लिये क्षमस्व।"

   हरिद्वार सोडल्यानंतर ठिकठिकाणी आशा आशयाचे बोर्ड वाचत वाचत चालू झालेला आमचा प्रवास मनामध्ये एक प्रकारची अदृश्य काळजीचे घर बांधतो आहे.याची हळू हळू जाणीव होऊ लागली.

     खरं म्हणजे औरंगाबाद ते दिल्ली प्रवास खूपच आधर आधर, अहो चक्क शुभ्र कापसी ढगांवर आरुढ होत विमानाने तर झाला होता. दिल्लीत पोहोचलो तेव्हा रात्र होती. त्यामुळे दिल्लीच्या  उन्हाच्या झाळा सुद्धा लागल्या नाहीत आम्हाला.
   
     आम्ही दोघं आणि आमचे स्नेही असणारी आणखी एक जोडी.आम्ही चौघांनी मिळून ठरवलेल्या उत्तरांचल सहलीचा हा पहिला टप्पा.

     दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा साडे अकरा पर्यंत दिलीत राहलो आम्ही, पण तेवढ्याच वेळात उन्हाने आपले अस्तित्व सिद्ध केले होतं. विशाल वृक्षांच्या छायेखाली शांतपणे उभी राहात आमची बस प्रवाशांची वाट बघत उभी असल्याने उष्णतेची तीव्रता तेवढी सतावत नव्हती.

     तासा-दीड तासातच देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे सर्व सहप्रवासी बसमध्ये विराजमान झाले, आणि मग मात्र आमच्या बसनेही आपला एसी चालू करत,साऱ्यांची गर्मी पळवून लावली. जून चा मध्य होता तरीही काही त्रास वाटला नाही. सुंदर रस्ते,स्वच्छ सूर्यप्रकाश, भरपूर वृक्षराजींनी हवेमध्ये आणलेला सुखद गारवा आणि डोळ्यांना मिळणारा थंडावा या साऱ्या गोष्टींचा आनंद घेत घेत आमची बस दिल्लीच्या बाहेर पडत हरिद्वारच्या रस्त्याला लागली.
  
      पण, दिल्ली आपल्या देशाच्या राजधानीचं शहर. किती स्वच्छ सुरेख,हिरवाई ने नटलेले.जणू काही सर्व  पूर्वनियोजित दृष्टिकोन ठेवून वसवलेले एक मोठं शहर.परदेशी पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत त्यांच्या मनावर आपली छाप उमटवण्यात आणि आपल्या देशाची मान उंचावण्यात यशस्वी ठरलेलं शहर.भारत मातेच्या या राजधानीकडे बसच्या काचांमधून निरखत असताना,काय कौतूक ओसंडून वाहात होतं आमच्या उभयतांच्या चेहऱ्यावर!

    रस्ता छानच असल्यामुळे भन्नाट वेगाने चालणारी आमची बस आणि मी ऐकत असलेली गाणी यांच्यात छान पैकी एक लय निर्माण झाली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास हरिद्वार या पवित्र शहरात प्रवेश करताच गंगामातेचे दर्शन झालं. शुभ्र धवल दुधी रंगाचं फेसाळतं पाणी आपल्या छोट्या छोट्या तरंगांनी प्रवाहाचा वेध घेताना दिसत होतं गंगेच्या दोन्ही तीरांवर भाविक पवित्र स्नान करत तिच्या पुढे नतमस्तक होत असताना दिसत होते. गंगातीर माणसांच्या गर्दीने आणि प्रसन्नतेने फुलून गेला होता अगदी. येथून जात असतानाच सायंकाळची गंगा आरती बघण्यासारखी असते ही माहिती मिळाली.

    बारा महिने अठरा काळ दुष्काळाच्या वेदना सहन करणारे आम्ही महाराष्ट्रातील काही मराठवाडी मंडळी, विशाल खळाळते पात्र बघत आनंदित आणि अचंबितही झालो होतो, यात शंकाच नाही.

    रात्रीचा मुक्काम हरिद्वारला एका छानशा हॉटेलमध्ये झाला. त्यामुळे पुरेशी झोप आराम करुन दिवसभराच्या प्रवासाचा न आलेला शीण केंव्हाच पळून गेला आमचा.

     दुसऱ्या दिवशी मात्र एक प्रवासी म्हणून खरी परीक्षा होती आमची. कारण सलग बारा तास बस मध्ये बसून असणार होतो आम्ही.
हरिद्वार ते स्यानचट्टी असा होता हा प्रवास.

    खरं म्हणजे,उत्तरांचल राज्यात प्रत्यक्ष येण्याची,आमची ही पहिलीच वेळ होती.तरीही,ईतर नातेवाईकांकडून डेहराडून अणि नैनिताल चे पर्यटनासाठी असणारे महत्व ज्ञात होते.त्यावरुन सहज, सरळ,सोपा सुखकर प्रवास अशीच प्रतिमा तयार झाली होती मनात.

      हरिद्वार ते स्यानचट्टी व्हाया डेहराडून,प्रवासास सुरुवात झाली. आणि मी अगदी सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे उत्तरांचल शासनानाने लावलेले स्लोगन्स वाचावयास मिळू लागले.ते वाचून निश्र्चितच प्रवासाचा आनंद व्दिगुणित होत होता.येथील शासनाला प्रवाशांची किती काळजी आहे ही होणारी जाणीव मनाला सुखावत होती.

     प्रवास चालूच होता.अंतर कमी होतं, तरीही वळणावळणांमूळे वेळ भरपूर लागायचा.असेच पुढे जात असताना मोठ्या मोठ्या पहाडांनी आपले दर्शन द्यावयास सुरुवात केली.किती नेत्र सुखद दृश्य होते ते! वळणा वळणाचा रस्ता,प्रत्येक वळणावर स्वागतासाठी सज्ज उंच हिमालयाचा एक एक पहाड.दुसऱ्या बाजूनं निसर्गानेच तयार केलेली दरी आणि या दऱ्यांमधून शांतपणे शुभ्र जलाला कवेत घेऊन एखाद्या कुमारवयीन बालिके प्रमाणे हसत खळाळत निरागसतेने वाहणारी नदी. अहाहा! काय मनोहरी नजराणा होता हा आमच्या डोळ्यांसाठी!

    घाटाचा रस्ता चालू झालेला, त्यामूळे गाडीचा एसी बंद करण्यात आला होता.माझ्यासाठी ही एक छान पर्वणीच ठरली.माझ्या बाजूच्या खिडकीची काच संपूर्णपणे उघडी ठेवत मी, निसर्गाच्या या आविष्काराच्या सान्निध्यात भरभरुन आनंद मिळवायचाच असं ठरवलंच होतं.

     नेत्रसुखद,विलक्षण देखणं निसर्गाचं हे प्रसन्न रुप! सोबतीला थंडगार वाऱ्याची येणारी झुळूक मनोमन सुखावणारा या हवेचा लाघवी स्पर्श.मनाचा मोर आनंदाने थुई थुई न नाचला तरच नवल ठरावे! असं सगळं आल्हाददायक वातावरण!

      खरं तर अशा प्रवासात  तेही दिवसाच्या वेळी गाडीच्या काचा बंद करत,पडदे ओढून वामकुक्षी घेणाऱ्या लोकांची मला या वेळी प्रचंड कीव कराविशी वाटत होती.

     निसर्गाचा हा नजराणा सलग बारा तेरा दिवस आपण अनुभवणार आहोत,त्याचा यथेच्छपणे आस्वाद घ्यावा,हे सारं नटलेल्या निसर्गाचं रुप डोळ्यांत व शक्य तेवढं कॉमेरा मध्ये बंद करुन ठेवावं अशीच भुरळ कुणासही पडावी असंच होतं सारं सभोवताल!
   ज्याचा त्याचा'दृष्टिकोण'.म्हणून मी दुर्लक्ष केले त्याकडे.पण माझ्या हक्काच्या माणसाला, माझ्या जीवनसाथीदाराला मात्र हा आनंद भरभरुन घेण्या विषयी सुचित करण्याची आग्रही भुमिका मात्र घेतली होती मी.

     आपण पुनःपुन्हा न येवू शकणाऱ्या या मार्गावरचा स्वच्छंदी अनुभव मनाच्या नि शरीराच्या कणाकणात भरुन घ्यावा असाच हा प्रवास होता.

     माझं मात्र चौफेर निरिक्षण चालू होतं.पहाडांचं सौदर्य त्यांच्या आकारात,रंगात,त्यांवर हवे तसे उगवलेल्या हिरव्यागार वृक्षराजींवर, तसेच त्यांच्या उंचीवर, आणि अर्थातच त्यांना साथ देणाऱ्या दऱ्यांवर अवलंबून असतं हे हळूहळू लक्षात येऊ लागलं होतं एव्हाना.येथील पहाडांवर मनसोक्तपणे रेंगाळणाऱ्या सुचीपर्णी वृक्षांसोबत आंब्याची कितीतरी वृक्ष ताठ मानेनं उभी होती.त्याच प्रमाणे लिचीची झाडं,सफरचंदाची झाडं आणखीण बरीचशी मसाल्याच्या पदार्थांची झाडं या सर्वांनी गर्दी जमवलेली होती.तरीही पायथ्याशी
आपल्याकडच्या कढीपत्त्याची बारीक बारीक रोपं लुसलुशीत कांतीनं डौलात चमकत होती.

      या‌ प्रदेशात मिळेल तेथे सपाट जमीनीवर दाट आमराईने आपलं राज्य उभं केलेलं होतं.महाराष्ट्रामध्ये आंब्याचा मौसम संपत चाललेला असताना, उत्तरांचल मध्ये मात्र कैऱ्यांनी लखडलेली झाडं,आमच्याकडे बघत हासून आमचं स्वागत करत आहेत असं वाटत होतं.

      सुरुवातीला असणारी वळणं ज्यावेळी अधिकाधिक चक्राकार बनत चालली होती. तसं हिमालयाच्या रांगा दृष्टीक्षेपात येण्याचं प्रमाणही वाढतं झालं होतं.त्याच जोडीला दऱ्यांच्या खोलीचं प्रमाण विलक्षण खोल खोल जात,त्या जमिनीशी जास्तीत जास्त सलगी करताना दिसत होत्या. त्यांमधून वाहणार्‍या नदीचा प्रवाह अजूनच बारीक, अरुंद, शांत एखाद्या आखून दिलेल्या मार्गावरुन चाललायं हे लक्षात येऊ लागलं. रस्त्यांची रुंदी अरुंद झालेली दिसत होती. त्यातही रस्त्यांना कठडे नावाचा प्रकार गायब होता. आणि अधूनमधून उपरोक्त सुचनांच्या पाट्या. अंगावर रोमांच उभे करणारा हा निसर्ग तेवढाच हवाहवासा होताच.आम्ही घाट उंच उंच चढत जात आहोत याचेच हे निदर्शक होतं.आम्हाला वाट दाखवणारी तिच्या उगमाकडे घेऊन जाणारी ही या दऱ्या खोऱ्यातून वाहणारी आमची मार्गदर्शक सोबतीण यमुना नदीच तर  होती ना!

     यमुना, गंगेच्या बरोबरीने नाव घेतले जातं अशी यमुना. जमुना,कालिंदी अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी, हिमालय पर्वतांमधूनच उगम पावणारी, गंगेची बहीणच ही! गंगोत्रीच्या अगोदर या यमुनोत्री च्या उगमस्थानाच्या दर्शनासाठी आम्ही पोहोचलो ते ठिकाण होते,स्यानचट्टी हे गाव.

    चौफेर हिमालयाच्या रांगांमध्ये, हिरव्यागार जंगलाच्या वनराईमध्ये,शुद्ध स्वच्छ हवेच्या स्त्रोतात खेळणाऱ्या पहाडातून छोटे-मोठे जलस्त्रोत मनसोक्तपणे आपल्या अंगावर खेळवणारे आणि यमुना मातेच्या उगमस्थानाच्या दिशेनं  घेऊन जाण्याचा एक टप्पा असणारे हे स्यानचट्टी.

      दिवसभराच्या प्रवासाला विराम देत,दुसऱ्या दिवशी सकाळीच यमुना मातेच्या मूळ स्थान कडे प्रस्थान करण्यासाठी,अशा आल्हाददायक वातावरणात आम्ही दोन दिवस घालवणार आहोत, ही बाब खूप आनंद देऊन जात होती. याच समाधानात निद्रादेवीने आमच्यावर आपले पांघरुण घातले होते. आणि उद्याच्या अनुभवासाठी सज्ज राहण्यास सांगितले होते तोपर्यंत. कारण येथूनच आमच्या उत्तरांचल चारधाम यात्रेचा श्रीगणेशा होणार होता ना !

क्रमशः

  ©नंदिनी म. देशपांडे.

आषाढ शुद्ध प्रतिपदा.
जूलै,३,२०१९.

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा