शनिवार, ६ जुलै, २०१९

*गंगोत्री*

*हिमालयाच्या सहवासात*

*गंगोत्री*

    दुसर्‍या दिवशी ठरल्याप्रमाणे, पहाटे सव्वापाच वाजता आम्ही गंगोत्री साठी प्रयाण केले.  

    उत्तरांचलमध्ये सकाळी पाच वाजता व्यवस्थित उजाडलेलं असतं. त्यामूळे, तशी पहाटही नव्हतीच. तर, चक्क सकाळ झाली होती. अर्थात तिकडे अंधारात प्रवास कदापिही करुच नये हे तत्त्व पाळणे अत्यंत निकडीचे आहे.

    अगोदरच आम्ही उंचावर होतोच.पण त्याहीपेक्षा उंचावर, उंच उंच पहाडांच्या रांगांमधून नागमोडी वळणाची वाट सारत सारत, आमची गाडी निघाली. तशी,या गंगामातेच्या उदयोन्मुखाकडे जाणारा निसर्ग, डोळ्यात साठवून घेण्याची उत्सुकताही लागलेली होतीच.

   आपण अधिकात अधिक उंच जात आहोत, आणि आमच्यासारख्याच पर्यटकांचे एखाद-दुसरे वाहन रस्त्यांवर चालताना दिसत होतं.तेवढीच काय ती रहदारी होती. मुख्य म्हणजे, पर्यटकां शिवाय या संपूर्ण भागात दुसरे कोणीच नव्हते. एवढ्या मोठ्या ३४१५ मीटर उंचीवर जाताना देखील, काही रस्ते अगदी नवीनच बनवलेले होते.  काही रस्ते मात्र खूपच उखडलेले होते,तर काहींची कामं मोठ्या प्रमाणावर सुरु होती. त्याचप्रमाणे तेथेपर्यंत, त्या उंचीपर्यंत  लाईट्स , केबल वायर्स, काही मोबाईल कंपनीचे टॉवर्स असे सारे तंत्रज्ञान पोहोचलेले बघून माणसाला थक्क व्हायला होते. आलेल्या पर्यटकांची आहे त्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त काळजी घेऊन,त्यांना सोयी उपलब्ध करवून देण्याचं,  खरंच खूप कौतुक वाटत होतं. अतिदुर्गम प्रदेशातही सर्व सोयी मिळत असल्यामूळे,नक्कीच पर्यटकांचा ओघ वाढला असणार.

        होय, कारण एप्रिल ते ऑक्टोबर वर्षातला एवढाच काळ मिळतो,या लोकांना पैसे कमावण्याचा.त्यातही जास्त पर्यटक जून पर्यंतच येतात. कारण जुलैपासून तेथे पावसाळा चालू होतो. यानंतर कोणतीही हमी  देता येत नाही. ऑक्टोबर ते एप्रिल पर्यंत सगळीकडे बर्फच बर्फ असतो. अगदी दिवाळी झाल्याबरोबर  तेथील सर्व मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात.

     उत्तरांचलमध्ये  केवळ माणसांनाच नव्हे,तर देवांनाही निसर्गाशी जुळवून घेत तडजोड करावी लागते. प्रवास चालूच होता. पहाडांची उंची आकाशाला स्पर्श करते आहे की काय? असा भास होत होता.  पहाडी शिखरांच्या मोकळ्या जागेतून जेवढे कांही आकाश दिसत होतं,ते स्वच्छ निळसर, पांढऱ्या ढगांनी नटलेलं असं खूपच सुंदर दिसत होतं. त्यामुळे धुक्याचा लवलेशही नव्हता. अवनीचे हे सौंदर्य आम्हाला मनमुरादपणे  लुटता येत होतं. एवढ्या उंचावर जात होतो आम्ही, वारा होता पण,झोंबणारा गारवा नव्हता.वातावरण खूपच आल्हादायक होतं.

     आम्ही निघालो तेंव्हा,आपण खूप खूप लांब आणि उंच उंच आलो आहोत, आत्तापर्यंत सर्व काही ठीक आहे, पण एखाद्या व्यक्तीला किंवा गाडीला काही अडचण आली तर काय? हा प्रश्न मनात घोंगावत होता आणि या विचाराने मनामध्ये एक अनामिक हुरहूर चालू झाली होती. प्रवासात कितीतरी वेळा," ही सहल सुखरुप पार पडू दे रे देवा"असे म्हणत,मी ईश्वराची विनवणी केली होती, अगदी नकळतपणे.

     अख्ख्या प्रवासात माझी खिडकी असणारी जागा असल्यामुळे,बाहेर दिसणाऱ्या आणि केंव्हाही उद्भवू शकणाऱ्या धोक्यांची कल्पना मला येत होती.

    हिमालयाच्या प्रत्येक पहाडाच्या सौंदर्याची एक वेगळीच मिजास दिसून आली, उत्तरांचलमध्ये!

    गंगोत्री च्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावरच्या  हिमालयाच्या ओळी, प्रचंड मोठ्या, शिवाय पहाडांच्या पायथ्याशीच केवळ हिरवाई दिसत होती.आणि मध्यापासून टोकाकडे मला विराण पहाड दिसत होते. यावरुनच लक्षात आले की,हे पहाड हिवाळ्यात संपूर्णपणे बर्फाने आच्छादले जाणारे आहेत.बर्फ वितळून गंगेला मिळाला असला तरीही, त्याच्या शुभ्रतेची  सावली, या पहाडांवर रेंगाळत होती. त्यामुळे हे ओकेबोके असणारे पहाड अजूनच भयावह वाटत होते. क्षणाक्षणाला मनाला मोहून टाकणारी निसर्ग दृश्य बघत बघत होणारा प्रवास आमच्या गाडीच्या चालकाच्या गाडी चालवण्याच्या कौशल्यामुळे सुखावह ठरत होता. गाडीही चालता-चालताच दोन दोन मिनिटाला मोठा 'फुस्स'असा नागाच्या फुत्कारा सारखा आवाज काढत होती. थोडसं भयावह वाटत होतं ते,पण नंतर समजलं की तो गाडीवर आलेलं दडपण बाहेर टाकण्याचा आवाज आहे. पण एकूणच सर्वच प्रवाशांच्या चेहऱ्यावर एक काळजीची रेषा खेळत होती.हे प्रत्येकालाच जाणवत होतं, पण कोणीही याबाबत बोलत मात्र नव्हतं. आमच्या गाडीचा चालक समोरच्या गाडीसाठी जेंव्हा गाडी मागे घ्यायचा ना, त्यावेळी मात्र तोंडचे पाणी पळायचे आमच्या. कारण शेजारीच खोल खोल गर्तेत नेऊन सोडणारी दरी असायची. चालकाच्या मानसिक  सुदृढपणाचे आणि त्याच्या कौशल्याच्या परिसीमेचा परमोच्च बिंदू असायचा हा.

    आम्ही पहाड चढत जाता जाताच बारीक-बारीक होत जाणारी गंगोत्री,आम्हाला खोल दऱ्या खोऱ्यां मधून यमुनोत्री प्रमाणेच मार्गदर्शन करत होती. तिच्या प्रवेशाचा मार्ग दाखवत होती.

      आता मात्र बर्फाच्छादित पहाडांची संख्या वाढती झाली होती. आपण गंगेच्या उगमस्थाना जवळ पोहोंचत असल्याची वर्दी त्यांनी आम्हाला दिली. गाडी अगदी जवळपर्यंत जाते तिच्या, त्यामुळे फारसे चालावे लागणार नव्हतेच. थोडासा चढ चढून समोर गेलो आम्ही, आणि हरिद्वार मध्ये झालेली गंगेची भेट आठवली.किंबहुणा जास्तच खळाळणारी! परस्परांना बोललेला आवाजही ऐकू येत नव्हता. तोच शुभ्रधवल दुधी प्रवाह, तेथून आम्ही बघत आलेलो, ती गंगा आणि ही गंगा एकच तर होती! केवळ येथून जाताना रस्त्यात तिला तिच्या अनेक बहिणी उदाः आलकनंदा, मंदाकिनी, सरस्वती गळाभेट घेत तिच्यात सामावून जातात. म्हणून ही हरिद्वारच्या जवळ जवळ गेल्यानंतर "गंगा"हे नाव धारण करते. पण येथे गंगोत्रीवर मात्र ती "भागीरथी" या नावानेच संबोधली जाते. राजा भगिरथाने, कैलास पर्वतावर तपश्चर्या करत महत्प्रयासानं, आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी गंगेला पृथ्वीवर आणले. अशी अख्यायिका आहे. भगवान शंकराने आपल्या डोक्यावरच्या एका जटेत गंगेला धारण करुन,तिच्या प्रचंड वेगावर नियंत्रण ठेवले होते.आणि कलियुगात जी लोकं गंगाजल स्नान व दर्शन घेतील, ते पापमुक्त होतील.असे सूतोवाचही पार्वतीमातेच्या जवळ शंकरांनी केल्याची आख्यायिका सांगितली जाते. पण या निमित्ताने का होईना लोक या भागात येऊ लागले. आणि एवढ्या सौंदर्यपूर्ण निसर्गाची सहल करु लागले. नाही तर एरवी या भागात येण्यास सहजासहजी कोणीही धजावले नसतेच.

     गंगाकिनारी गंगोत्री मंदिरात, गंगा, यमुना, सरस्वती, अन्नपूर्णा, लक्ष्मी यांच्या सुंदर मूर्ती आहेत. याच परिसरात, भगीरथाने ज्यावर बसून गंगेला अवतरण्यासाठी तपश्चर्या केली होती ती शिळाही आहे.

     या गंगोत्री स्थानापासून  गंगेचा नेमका उगम, अठरा किलोमीटरवर "गोमुख" या अतिशय विलोभनीय स्थळावरुन होतो.एका मोठ्या हिमनगाच्या खालच्या बाजूने ती वाहात येते. पण अत्यंत गर्दीमुळे तेथे जाण्याची परवानगी दिली जात नाही.

     या ठिकाणी आम्ही चार तास घालवले.तो अनुभव विलक्षण आनंददायी,कृतकृत्य करणारा आणि मनःशांती बहाल करणारा ठरला.हे नक्की. आयुष्यात एकदा तरी या स्थानाला भेट द्यावयास हवीच. असे वाटावयास लावणारे हे क्षण होते. त्यांचा भरभरून आनंद घेत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. कारण जेवण आटोपून सायंकाळच्या आत आपले हॉटेल गाठणं आवश्यक होतं

क्रमशः

©
*नंदिनी म. देशपांडे*.

आषाढ शुद्ध चतुर्थी.
दि. जुलै,६,२०१९.

🌳🌳🌳🌳🌳🌳

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा