गुरुवार, ११ जुलै, २०१९

*बद्रीनाथ*

*हिमालयाच्या सहवासात*

*सीतापुर -जोशीमठ- बद्रीनाथ*

      आपण एखादी अप्रतिम गाण्याची महेफिल नेमकीच ऐकून आलो, किंवा एखाद्या सोहळ्याला उपस्थिती लावून आल्यानंतर, त्याच्या यशस्वीतेवर भाष्य करत,पुन्हा पुन्हा त्यातच रमत राहतो, त्याचप्रमाणे केदारनाथ वरनं पंधरा-वीस मिनिटातच सीतापूरला पोहोचल्यानंतर, त्या देवदर्शनाचं आणि एकूणच तेथील नैसर्गिक सौंदर्याविषयी ओघानंच समरस होऊन त्यावर दिवसभर भाष्य करत राहिलो आम्ही! हा दिवस पूर्णपणे रिकामाच मिळाला होता. खेचरांवर किंवा डोलीने वर जाऊन येणाऱ्यांसाठी,एक दिवस आरामाची नितांत निकड होतीच. ती मिळावयास हवी हाच येथील मुक्कामाचा मूळ हेतू.

     भरपूर आराम घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळीच नाश्ता आटोपत आठ वाजता आम्ही दिवसभराच्या प्रवासासाठी निघालो. सायंकाळी सहा वाजता जोशीमठ या शहरात मुक्कामी आलो. अर्थातच येताना उत्तरांचलमधील गढवाल प्रांतात असणाऱ्या पहाडांमूळे सृष्टीला मिळालेल्या सौंदर्याचा आस्वाद घेत आलो आम्ही.या संपूर्ण सहलीमध्ये असा नैसर्गिक आभुषणांनी मढलेला निसर्ग, एवढा भरभरून अनुभवावयास मिळाला की, आमच्या डोळ्यांचेे पारणे फिटले.

     सायंकाळी सहा वाजता जोशीमठ या ठिकाणी पोहोचलो खरे, पण नावावरून जोशीमठ म्हणजे एखाद्या मोठ्या धर्म शाळेचे नाव असावे, असाच झालेला गैरसमज पूर्णपणे परागंदा झाला. 'जोशीमठ'हा या राज्यातील बऱ्यापैकी मोठा तालुका असावा.हे शहर,पहाडांच्या कुशीत, हिरव्यागार जमिनीवर शांतपणे विसावा घेत आहे असं वाटत होतं. घरांची रचना टप्प्याटप्प्यांनी असणारी.आपल्याला लांबून पायऱ्यांवर घरं बांधली आहेत असंच वाटणारं.पहाडांच्या अंगाखांद्यावर मनसोक्तपणे खेळणारी ही घरं.

     उत्तरांचलमध्ये शेतीही अशीच केली जाते.टप्प्याटप्प्यांमध्ये, छोटे छोटे वाफे तयार करुन. कारण सपाट जागाच उपलब्ध नाहीए फारशी. त्या ठिकाणी. पूर्णपणे शारीरिक मेहनत करत शेती करण्याशिवाय पर्याय नाही तेथे.यंत्रांच्या सहाय्यानं करणं केवळ अशक्यप्राय!

   सूर्यास्ताला आम्ही सर्वजण आमच्या हॉटेलवर परतलो. रम्य अशा निसर्गाच्या सान्निध्यात असणाऱ्या हॉटेलच्या,आमच्या रुमच्या बाल्कनीत बसून खाली दरीमध्ये दिसणारे जनजीवन न्याहळत होतो.सभोवती हिरवीगार सृष्टी असणाऱ्या या वस्तीजवळच मोर लांडोर यांचे मधूनच दर्शन घडलं.वेगवेगळ्या पक्षांचा आपापल्या घरट्याकडे परततानाचा गोड किलबिलाट ऐकू येत होता.आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, रात्रीच्या वेळी गाईचे हंबरणे कितीतरी वर्षांनी कानावर पडल्याचा अनुपमेय आनंद मिळाला होता. निद्रादेवीचं बोलावणं आलं म्हणून, नाईलाजाने स्वतःला तिच्या स्वधिन व्हावं लागलं. 

    सकाळी पाच वाजता जोशीमठ वरुन आणखी बराच मोठ्या उंचीवर म्हणजे, समुद्रसपाटीपासून तीन हजार तीनशे मीटर उंचीवर असणाऱ्या व अंतरानं त्रेचाळीस किलोमीटर असणाऱ्या बद्रीनाथ धाम याठिकाणी दीड तासात पोहोचलो. हा प्रवास खूपच अद्वितीय सौंदर्यानं नटलेला!जणू काही आपण, आकाशाला गवसणी घालण्याच्या मोहिमेवर निघालो आहोत की काय अशी जाणीव करुन देणारा! उंच उंच आणि फक्त उंचच  नेणारा,असाच होता.

     प्रवास जेवढा उंच तेवढंच वसुंधरेचं पहाडांनी सजवलेलं सौंदर्यही परमोच्च बिंदू गाठणारं! बद्रीनाथा पासून निघणारी अलकनंदा नदी,जिच्या उगमाकडे आम्ही जात होतो.ती बारीक-बारीक वळणं घेत आम्हाला, "बघा,माझं मूळ स्थान कसं, श्री भगवान विष्णूंच्या सानिध्यात,बद्रीनाथाच्या पायथ्याशी आहे, चला,मी ते दाखवते तुम्हाला." असेच जणू सुचवू बघत आहे असं वाटतं होतं.म्हणून तर तिला 'विष्णू पदी गंगा' असं  सन्मानानं संबोधलं जातं.नील आणि नारायण या दोन पर्वतांच्या मधून ही अलकनंदा नदी वाहाते.

      आता मात्र बर्फाच्छादित पहाडांचे वारंवार दर्शन घडू लागले होतं.मन हरखून त्यांच्याकडे बघतच रहावं असं वाटत होतं. रस्त्यांची रुंदी सुद्धा आणखी अरुंद होत होती.हे तर अगदी स्वाभाविकच आहे.कारण पहाडांचा आकार वर निमुळता होत जात असताना व्यवस्थित सर्वेक्षण करत,त्यासाठी खोदकाम करावे लागलं असणार रस्ते बनवताना. जेणे करुन त्या पहाडांची हानी होणार नाही. याचा सखोल अभ्यास होत असणार.

    दीड तासानं आम्ही अलकनंदा नदीला सोबत घेऊन खालून वर प्रवास करत पोंहोंचलो.

     श्री बद्रीनाथाच्या, या विश्वनिर्मात्याच्या पवित्र भूमीवर पाऊल टाकलं आणि अक्षरशः स्वर्ग दोन बोटं उरणं म्हणजे काय असतं! हे जाणवायला लागलं. भाविकांची गर्दी होती म्हणून,आपण पृथ्वीवर आहोत असं वाटत होतं. पण मी अगदी सहज एकटी आले असते तर, 'मी स्वर्ग बघून आले आहे.' असंच वर्णन केलं असतं.आम्ही एवढं उंच आलो होतो की, हात उंच करत उडी घेतली तर,खरंच आपले हात आभाळाला टेकतील, असं वाटण्याइतपत आकाश जवळ वाटत होतं.शुभ्र,स्फटिकी पहाडांनी आमचं उतरल्याबरोबर हसत मुखानं स्वागत केलं. स्वच्छ हवा आणि सूर्यप्रकाशामुळे ऊनही पडलेलं होतं. त्यामुळे थंडीची तीव्रता भासत नव्हती.नाश्ता आटोपून लगेच दर्शन मार्गाला लागलो आम्ही. दुरुनच लालपिवळ्या फुलांनी भरगच्चपणे सजलेलं मंदिर दृष्टिक्षेपात दिसलं.मोठं प्रसन्न झालं मन.तीन तास लागणार दर्शनाला, असा अंदाज होताच.दर्शन ओळीला लागूनच मंदिराच्या जवळून वाहात खाली  खाली उतरणारी अलकनंदा, येथे वरती मात्र खूप मोठ्या प्रवाहानं खळाळून भरुन वाहत होती. जणूकाही स्वर्गलोकी च्या अंगणामध्ये हसत, खेळत बागडत होती ती मनसोक्तपणे!

      हे मंदिर सुद्धा मे ते नोव्हेंबर असे सहा महिनेच दर्शनासाठी खुलं असतं. उरलेल्या सहा महिन्यात हवामानामूळे येथे येणे दुरापास्तच आहे. या काळात बद्रीनाथाची प्रतिकृती, दर्शनासाठी आणि पूजेसाठी जोशीमठ येथे ठेवली जाते. अशी माहिती मिळाली. त्यामुळे येथे माणसांची चहलपहल फक्त सहा महिनेच.आम्ही उभे होतो,त्याच्या खालच्या पहाडाच्या अंगावरुन वाहणाऱ्या अलकनंदेच्या प्रवाहाचं निरीक्षण करत करत आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ केंव्हा पोहोचलो? याची कल्पनाही आली नाही.गर्दी खूप होती. त्यावेळी मला तिरुपती व्यंकटेशाच्या महाद्वारावर होणारी भाविकांच्या गर्दीची आठवण झाली. पहिल्या पायरीवर मूर्तीच्या सन्मुख असावी अशी गरुडाची पाषाणमूर्ती आहे. विष्णूचे वाहन ना ते. सोबत असणारच. त्याला टोपी वाहण्याची पद्धत आहे. टोपी आणि उपरणं वाहून आम्ही मूर्तीच्या दिशेने पुढे सरकलो.विष्णू देवतेची मुर्ती दृष्टीक्षेपात आली,आणि या मांगल्य पूर्ण वातावरणाने भारुन गेलेल्या गाभार्‍या मधील विष्णूची ही मूर्ती दिव्यत्वाचा साक्षात्कार करत, मनामध्ये रुजली कायमची. मुख्य मूर्तीच्या दोन्ही बाजूला गणेश आणि कुबेराची मूर्ती व नरनारायणाच्या मुर्तीही आहेत. मला वाटतं, कुबेराचं मूर्ती रुपातील हे एकमेव मंदिर असेल का?कारण कुबेराची धातूची मूर्ती फक्त बद्रीनाथावरच मिळते असं ऐकण्यात आलं.

      बद्रीनाथाला डोळेभरुन बघितल्यानंतर पुन्हा, बाहेर येऊन बराच वेळ त्यांचे मुखदर्शन घेताना अवर्णनीय असा आनंद होत होता. याच मंदिराच्या सभोवती इतर काही छोटी छोटी मंदिरं आहेत. त्यातील मुख्य असं श्री लक्ष्मी मातेचे मंदिर आहे. अतिशय प्रसन्न आणि सुंदर मूर्तीचे दर्शन, मनाला फार समाधान देऊन जातं.

      चार मुख्य धामांपैकी एक असणारं हे धाम, स्वर्गलोकाची प्रचिती आणून देतं. हे मात्र अगदी सत्य. येथे मिळणारा चवदार असा गरम गरम भाताच्या खिरीचा प्रसाद खाऊन आत्माही तृप्त झाला. मंदिर परिसराचे अवलोकन करताना, दुरुनच मनावर मोहिनी घालणारं, फुलांच्या माळांनी सजवलेलं मंदिर फारच देखणं दिसत होतं अजूनच! लाल पिवळ्या फुलांनी नखशिखांत बहरलेलं हे मंदिराचे लोभस रुप, गोकुळात त्या कान्हासाठी सजलेल्या पाळण्याप्रमाणं भासलं! बघतच राहावं असंच वाटत होतं.

    मंदिराच्या उध्दारामागे  अहिल्याबाई होळकर यांचाही सहभाग नोंदवलेला आहे.

     या ठिकाणा बाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात.

   हिमालय पर्वतांचं स्थान हे श्री शंकराचं मानलं जातं.भगवान विष्णूंना त्यांच्या सान्निध्यात आपलं स्थान हवं होतं.ते बालकाच्या रुपाने हिमालयात जाऊन अतीव आक्रोश करत बसले. एकदा शंकर-पार्वती येथून रवाना होत असताना, बर्फील्या पहाडावर,जंगलात एवढ्या दुर्गम ठिकाणी,हे छोटसं लेकरु आक्रोश करताना बघून, पार्वती मातेच्या मनातला मातृत्व भाव जागा झाला. आणि त्यांनी या बालकाला आपल्या सोबत घेऊन जाण्याचं ठरवलं. शंकरांनी हे बालक म्हणजे खुद्द विष्णूच आहेत हे ओळखलं होतं. या बालकाने पार्वती मातेला खूप लळा लावला. पार्वतीमातेने प्रसन्न होऊन त्याला वर मागावयास सांगितला. या छोट्या बालकाने आपल्या सान्निध्यात मला माझं एक छोटसं स्थान असावं अशी विनंती केली. आणि त्यानुसार हिमालय पर्वतावर बद्रीनाथावर श्री विष्णूंना स्थान प्राप्त झालं. असंही सांगितलं जातं.

    अग्नीला आपल्या पापांपासून मुक्ती हवी होती म्हणून, श्रीनिवास मुनींनी त्यांना बद्री वृक्षाच्या म्हणजेच बोराच्या झाडांच्या गर्दीत गंधमादन पर्वतावर विष्णुदेव राहतात,त्यांच्या सानिध्यात तू  जा.तेथील पाण्यात लुप्त होऊन राहा. म्हणजे तुला मुक्ती मिळेल असे सांगितल्याने, अग्नी तेथे पाण्यात लुप्त झाले,तेच बद्रीनाथावरचे गरम पाण्याचे कुंड.हे येथे स्नान केल्यामुळे पापक्षालन होते असे सांगितलं जातं.बद्रीनाथ मंदिराला नरनारायण मंदिर,बद्रीनारायण मंदिर असेही म्हटलं जातं.

     भगवान विष्णूंच्या या मंगलमय दर्शनाने,प्रसन्न झालेल्या मनानं आम्ही बद्रीनाथापासून पाच कि.मी.वर उत्तरेकडे असणाऱ्या भारत भुमीवरचं शेवटचं गाव कसं आहे? हे बघण्यासाठीची ताणत जाणारी उत्सुकता घेवून  पुढच्या मार्गाला लागलो...

*क्रमश*

©
*नंदिनी म. देशपांडे.*

आषाढ शुद्ध नवमी.
जूलै,९,२०१९.

🌷🌷🌷🌷🌷🌷

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा