गुरुवार, ४ जुलै, २०१९

*यमुनोत्री*

*हिमालयाच्या सहवासात*

    *यमुनोत्री*

    वर असणाऱ्या या टप्प्यावरुन, यमुनोत्री कडे प्रस्थान करण्यासाठी आमची बस हिमालय पर्वतांवर रस्तारुपी वळणावळणातून चढाई करत जानकी चट्टी ला येऊन पोहोचली.

     'चट्टी' हा काय प्रकार आहे?आश्चर्य वाटले ना?याबाबत पुढील भागांमध्ये ओघानेच स्पष्टीकरण येणार आहेच.

   तसाच आल्हाददायक रोमांचित करणारा निसर्ग, ज्याने आम्हा प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ न देता, पुरेपूर काळजी घेतली होती. कारण या भागात निसर्ग कायम लहरी प्रमाणे वागत असतो, एकाच वेळी तीनही ऋतू अनुभवास येऊ शकतात. या म्हणण्याला किती विश्वास ठेवावा असा प्रश्न आम्हालाच पाडला होता त्याने. सकाळची मस्त निसर्ग सैर करत, २६५०मीटर उंची असणाऱ्या जानकी चट्टीवर आम्ही बसमधून उतरत असताना,यमुनोत्री च्या उगमापर्यंत आणि मंदिरापर्यंत भाविक पर्यटकांना पोहोंचवण्यासाठी, सवारी मिळवण्यासाठी डोलीवाल्यांनी आणि घोडे (खेचर) वाल्यांनी बसच्या दरवाज्यापाशी तुफान गर्दी केली होती.  त्यावेळी मला अक्षरशः आमच्या औरंगाबादची आठवण झाली. पुण्याहून औरंगाबादला उतरल्यानंतर बाबा पेट्रोल पंपाच्या बस थांब्यावर अॉटो वाले जशी गर्दी करतात ना, ती आठवण आल्याशिवाय रहावले नाहीच. असो.

जानकी चट्टी पासून आणखी वर म्हणजे, ३१६५ मीटर उंचीवर यमुनोत्री ला जाण्यासाठी आम्ही डोलीने जाण्याचा पर्याय निवडला. हे अंतर सहा किलोमीटर आहे. खूप जण पायी जाणं पसंत करत होते. पण, आम्हाला ते कदापीही शक्य झाले नसते. खेचरांचा पर्यायही उपलब्ध होता पण त्यातही सुरक्षेची हमी वाटली नाही. म्हणून उरलेला पर्याय डोली.केवळ लाकडाच्या पट्ट्या आणि रुळ वापरुन बनवलेली डोली, बसणाऱ्याला बऱ्यापैकी पाय लांब करत आरामात बसता येईल अशीच बनवलेली बघावयास मिळाली. डोली बनवताना बनवण्यामध्ये मजबूती आणि नजाकत या दोन्हींचाही मिलाफ बघावयास मिळाला. यावेळी वैष्णोदेवीला डोलीने गेलो होतो आम्ही, तो प्रसंग डोळ्यांपुढे आला.पण तेथील डोल्या केवळ लोखंडी धातू पासून बनवलेल्या होत्या.

    खरं म्हणजे आपल्या शरीराचे ओझे असे दुसऱ्यांच्या आठ खांद्यांवर लादून पुण्य मिळवण्याचा मार्ग मनाला न पटणाराच. त्या भागातील स्थानिक आणि नेपाळ मधून पोटासाठी आलेले नेपाळी तरुण हे मुख्य लोक प्रमुख्याने आहेत या व्यवसायात. आम्ही माहिती घेतली त्यावेळी या श्रमिक लोकांशी व्यवहाराबाबत कोणत्याही वाटाघाटी न करण्याचे आणि ते मागतील तो आकडा त्यांना मोबदल्याच्या रुपानं द्यावयाचे असे पूर्विच ठरलेले होते आमचे. माझ्या डोलीचे चारही वाहक नेपाळी तरुण, सुस्वभावी आणि खूपच नम्र वागणारे आहेत हे थोड्याच वेळात लक्षात आले.अधनं मधनं नाश्ता जेवण वगैरे चे बिल मागताना,"एवढे एवढे बील झाले, पण तुमच्या इच्छेनुसार जेवढे द्यावयाचे तेवढेच द्यावेत मॅडम...." असे म्हणत होते त्यावेळी माझ्या पोटात कालवाकालव चालली होती. बिचारे, पोटासाठी येथे एवढे कष्ट करतात येऊन ते, आणि ज्यांच्या जीवावर आपल्यासारखे भाविक, पर्यटक पुण्य मिळवतात,तेथे अशा बारीकसारीक रकमेच्या हिशेबाचे आकडे मोजणे म्हणजे निव्वळ क्षुल्लक बाब होय.

     जानकी चट्टी ते यमनोत्री केवळ सहा किलोमीटरचे अंतर पण ती पहाडाची अगदी चढणच होती. छोट्या छोट्या अंतरावर गोल गोल आणि अवघड वळणं,त्यातही असणारा रस्ता केवळ सहा फूट रुंदीचा. त्यातच डोली वाले, खेचरावरुन जाणारे आणि पायी चालणारे ह्या सर्वांच्या चालण्याच्या कसबाला त्रिवार कुर्निसातच घालावासा वाटला.

      एकाबाजूला भलामोठा हिमालयाचा भिडू आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी.जमिनीचा तळ दिसणे केवळ अशक्यच. यमुना माता वसुंधरेला आलिंगन घ्यावयास उत्सुक आणि आम्ही यमुनेच्या उगमाकडे जावयास उत्सुक! तिचा प्रवास खालच्या दिशेने चालू होता तर आमचा वरच्या दिशेने!

    पण या निसर्गाचे किती किती आणि काय काय वर्णावे ते अद्भुतपण! संपूर्ण पहाडाने हिरवीगार चादर आपल्या अंगावर ओढलेली.झोंबणारा गारवा देणाऱ्या हवेच्या झुळकी. काळया आणि पांढऱ्या मेघांचा लपंडाव. पहाडांची आकाशाला गवसणी घालण्याची स्पर्धा. आणि माणूस नामक जीवाला यमनोत्री च्या दर्शनाची ओढ हे खूपच विलोभनीय सौंदर्य! पहाडांच्या वरच्या पातळीवरुन जेंव्हा आपण सहजच वळण घेत असताना खाली बघतो ना,त्यावेळी आपल्या हृदयाचा ठोका चुकेल की काय? अशी वाटणारी निःशब्द भीती. सगळंच विलक्षण आणि शब्दातीत. त्यावेळी या डोली वाल्यांच्या पायावर डोकं ठेवावयास हवं असे वाटणारा हा क्षण.

     यमुनोत्री च्या मंदिरा जवळ जेंव्हा आपण डोलीतून पायउतार होतो ,त्यावेळी होणारा आनंद उपभोगावा असाच. कारण त्याचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्यच.

    यमुनोत्रीच्या स्वच्छ पाण्याच्या खळखळाटाच्या नादाने संपूर्ण वातावरण भारुन गेललेे होते.नदीचे पात्र बऱ्यापैकी रुंद आणि यथेच्छ प्रवाह  पाहून, हा अगदीच काही उगमच नसावा या निष्कर्षाला आपण

    आपसूकच येतो.  आणखी काही अंतरावर असणाऱ्या उगमाकडे जाण्याची वाट अशी बिकट आणि तेथे पोहोचू शकणारच नाही कोणीही अशा निसर्गाचे राज्य.त्यामुळे तसा प्रयत्न करणे म्हणजे आपल्या अंताकडे जाणे होय.

     पण येथे आल्यानंतर प्रत्यक्ष यमुना माता खेळताना  बघणे आणि तीही जवळून, त्याचबरोबर संगमरवरी मूर्ती रुपातील तिचे रुप डोळे भरून पाहणे म्हणजे,खरंच आपलं परमभाग्यच! असं वाटल्यावाचून राहत नाही. विशेष म्हणजे जेथे थंडगार पाण्याचा खळाळता प्रवाह आहे त्याला समांतर वाफाळलेल्या गरम पाण्याचंहीे कुंड आहे. तेथे स्नान करण्याचा आनंद बरेच भाविक घेत होते.बऱ्याच ठिकाणाहून गरम पाण्याचे छोटे मोठे झरे वाहत होते.काही ठिकाणी तर कुंडीतील तांदूळ पाण्यात टाकले  काही वेळ तर त्याचा भात शिजत होता. निसर्गाच्या या चमत्काराने खरोखर तोंडात बोट घालण्याची वेळ आणली होती.

    वाहत्या यमुनेला मनापासून नमस्कार करत तिची साडीचोळी ने ओटी भरली.दोन्ही डोळ्यांमध्ये यमुनोत्रीचे हे रुप शक्य तेवढे साठवून ठेवताना कृतार्थतेच्या भावनेने माझ्या डोळ्यातून गंगा-यमुना वाहत आहेत हे लक्षात आलं. पुन्हा एकदा तिच्याकडे बघत हात जोडत,आम्ही खाली जानकी चट्टीवर उतरावयास सुरुवात केली. कारण आकाशातही श्यामल मेघांची बरसण्यासाठी गर्दी जमली होती.

डोलीत बसलो तरीही, उतरत असताना घोड्यावर बसल्याची जाणीव होत होती.डोली वाहकांचा या उतारावरुन पळत पळत चालण्याची एकसारखी गती, परिणामी त्यांच्या पावलांचा आवाज घोड्याच्या टापां प्रमाणे येत होता. तर बसणाऱ्याला त्याच्या शरीराची हालचाल घोड्यावर स्वार झाल्यासारखी होते आहे असं जाणवत होतं.

       अगदी नम्रपणे बहेनजी,मांजी,नानाजी, भाईजी रस्ता दो रस्ता दो.असे म्हणत म्हणत ,  येताना तासाभरात आम्ही जानकी चट्टीवर पोहोंचलो देखील.जाताना याच अंतराला अडीच तीन तास लागले होते.  आमची बस आमची वाट बघत उभी होतीच.

    डोलीतून पायउतार झाल्यानंतर डोली वाल्यांना बक्षीसासह त्यांचा मोबदला बहाल करताना त्यांचे कष्ट आणि त्यांच्या चेहर्‍यावर तेज बघून ऊर भरून आल्याशिवाय राहिला नाही.

      उरलेल्या दिवशी आराम घेत पुन्हा दुसऱ्या दिवशी अशीच एक सवारी घेऊन  त्यांना यमुना मातेचा आशिर्वाद घ्यायचा होता. कृतार्थ भावाने आम्ही आमच्या घरवजा निवासस्थानी परतलो.

    होय,आम्ही जिथे उतरलो होतो ते  निवासस्थानच होते. हॉटेल वगैरे चा अजिबात लूक नव्हता त्याला. कारण एवढ्या दुर्गम भागात जेथे केवळ सहा महिनेच लोकांची चहलपहल असते,त्या ठिकाणी हॉटेल व्यवसायिक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार नाहीत, हे कुणालाही पटकन लक्षात येण्यासारखे होते.त्यामुळे उपलब्ध जागे मध्ये आपली दोन दिवस राहण्याची सोय झाली हे समाधानही खूप मोठा दिलासा होता आमच्यासाठी.

     येथे दोन दिवसांच्या वास्तव्यात बकेटात गरम पाणी आणून दिल्यानंतर होणारी अंघोळ खूप वर्षांनी अनुभवली.

       जानकी चट्टी वरुन परत आल्यानंतर आमच्या निवासस्थानाच्या गच्चीवर चौफेर पहाडांच्या साक्षीने आम्ही दोघी मैत्रिणी,   निसर्गाचे अवलोकन करत करत मन भरुन निवांत गप्पा करत बसलो.कितीतरी वेळ....असा निवांतपणा घरी आल्यानंतर मिळणे केवळ अशक्य होते.

     त्याचवेळी या निवासाच्या घरमालकांना आम्ही बोलता बोलता माहिती विचारली.हे सत्तरीतले घरमालक तब्येतीने अगदी काटक आणि निरोगी होते निसर्गाची आभाळमाया या लोकांवर चांगली होती त्याचा परिणामच म्हणावा हा.त्यांनी सांगितल्या नुसार, असेल तेथे सपाट जमिनीवर शेती हा व्यवसाय येथील लोक करतात. आणि शेतीतून प्रामुख्याने गहू आणि बटाट्याचे उत्पादन घेतात. त्यांच्या चेहऱ्यावर पर्यटकांची सेवा करण्याचे समाधान ओसंडून वाहत होते.

     ज्या पहाडांच्या संगतीने आम्ही मैत्रिणींनी हितगुज केले होते, तेथे अंधार पडल्यामुळे  काळेकभिन्न दिसणारे पहाड आपण बघूच नयेत असे वाटू लागले. या वेळी मात्र आम्ही आमच्या खोली मध्ये जाऊन आराम करणे पसंत केले. कारण दुसर्‍या दिवशी गंगामातेच्या दर्शनासाठीचा असणारा पायथा आम्हाला गाठायचा होता.

©
*नंदिनी म.देशपांडे*.

आषाढ शुद्ध व्दितीया.
जूलै,४,२०१९.

🌲🌲🌲🌲🌲🌲

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा