सोमवार, १ जुलै, २०१९

*आजीबाईचा बटवा*.

*आजीबाईचा बटवा*

    आमच्या लहानपणी आमची आजी म्हणजे,आमच्या घरातील पहिला डॉक्टर असायची....बाळ रडतंयं त्याचं पोट दुखत असेल तर लगेच म्हणायची," सुनबाई, घेऊन ये त्याला माझ्या जवळ आणि ओव्याची पुरचुंडी हलकीशी शेक तव्यावर.मला आणून दे...मी अलगदपणे त्याच्या पोटाला शेक देते....बघ,थोड्याच वेळात पोट मोकळे होईल आणि रडणे थांबेल त्याचे...."

     बाळाला कफ झालाय,किंवा घरातील सात आठ वर्षांच्या बालकाला सुध्दा सर्दी झालीय....आजी लगेच म्हणायची,"ये बाळा,जायफळ उगाळून  त्याचा गरमागरम लेप लावते तुझ्या कपाळी नि नाकावर....उद्याच बघ कशी पळून जाईल तुझी सर्दी...." खरंच ती दुसऱ्या दिवशी पळालेलीच असायची....

उन्हाळयात ऊन लागलंयं नाकातून रक्त येतंयं (घोळाणा फुटणे)आई लगेच कच्चा कांदा ठेचायची.....त्यांचा रस हातापायांना,माथ्यावर चोळायची गरज पडल्यास तो प्यावाही लागायचा....चिकट व्हायचं सारं अंग,पण नाईलाज होता...आजीचं औषध होतं ते...नाही म्हणण्याची टापच नव्हती....दुसऱ्याच दिवशी पुन्हा सज्ज आम्ही खेळण्यासाठी....

  जुलाब होताएत म्हटले की आजी नेहमीच गुळचुन्याची कागदी पट्टी पोटावर बेंबी भोवती चिटकवायची....दुसऱ्याच दिवशी एकदम व्यवस्थित....पण ती पट्टी काढताना होणारी कसरत मात्र फार क्लेशकारक असायची...त्याच प्रमाणे काळ्या कॉफीत लिंबू पिळून पिणे हे पण यावर एक रामबाण औषध होतं....
   
   घसा दुखतोयं कोमट पाण्यात  मीठ घालून गुळण्या करणं,खोकला आलाय भाजलेल्या लसणाची पाकळी मधाबरोबर खाणं,लवंग दिव्यावर भाजून खाणं,किंवा जेष्ठमधाची काडी दातांखाली चावत ठेवणं.....सर्दीसाठी गरम दुधात हळद टाकून पिणं किंवा तुळस टाकून सुंठ मीऱ्याचा काढा घेणं,हळद गुळाची गोळी खाणं....अशी एक ना अनेक अनेक औषधांची घरातल्या आजीला माहिती होती....

    अशा छोट्या छोट्या आजारांसाठी आम्ही लहानपणी कधी पटकन दवाखान्यात गेल्याचे कधीच स्मरतच नाही....

     अगदी गरगरल्या सारखं होतंय म्हटलं की,आजी लगेच सुंठसाखर एकत्रित बारीक कुटत हातावर ठेवायची....काय चवदार लागायची ती म्हणून सांगू!....

    तर हा आमचा घरचा हक्काचा अणि प्रेमळ डॉक्टर आपल्या पेशंटला  अगदी सहजपणे घरात नेहमीच उपलब्ध वस्तूं मधून औषध बनवायचा,ते ‌खाऊ घालायचा आणि मायेनं जवळ घेत त्यावर प्रेमाची फुंकर घालायचा....मग का नाही पेशंट बरा होणार?

    हल्ली अशा आजा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत त्या पिढींचा लय होऊ बघत आहे...पण आणखीनही ज्या ज्या घरात अशा आजा आहेत त्यांना त्रिवार वंदन करते...

    आजच्या डॉक्टर्स डे च्या मनापासून शुभेच्छा मी या लेखाव्दारे आवर्जुन त्यांना देते.... अणि हा बटवा जपून ठेवण्याचा हा वसा त्यांनी आपल्या पुढच्या पिढ्यांनाही द्यावा ही विनंती करते....

    ‌पुनःश्च एकदा या आजींना आजच्या खास दिवसाच्या मनापासून शुभेच्छा

©
*नंदिनी म.देशपांडे*

जुलै,१,२०१९.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा