शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९

घराचं घरपण...

‌      *घराचं घरपण*

"घराला घरपण देणारी माणसं.... विश्व" अशी काहीतरी जाहिरात असायची पूर्वी टीव्हीवर. हल्ली हिच माणसं अडचणीत आहेत, हे वाचनात आलंयं जाऊ दे. तो मुद्दा निराळा.

     पण मुद्दा हा आहे की ही जाहिरात मला आवडायची. कारण त्यातला "घरपण" हा शब्द माझ्या फार आवडीचा.किंबहूणा 'घराचं घरपण जपणं'हा माझा सर्वांत आवडीचा छंदच.

     कधी कधी,'काय करावं?दिवसच संपत नाही लवकर....' घरात खूप बोअर होतंयं'.असं म्हणणाऱ्या स्त्रियांची कीव करावीशी वाटते.आपल्या स्वतःच्याच संसारात, आपल्या घरातच करमत नाही.वेळ जात नाही. काय करावं?समजत नाही. असं म्हणणाऱ्या स्त्रीयांचीही मोठी गंम्मत वाटते. मला प्रश्न पडतो, या स्त्रिया असं म्हणूनच कसं शकतात?

    गृहिणी,प्रत्येक घरातली गृहिणी ही आपल्या घराचा कणा असते. असे माझे ठाम मत आहे. तिच्यावर लहानपणापासून रुजवलेल्या संस्काराप्रमाणे ही गृहिणी आपल्या घरावरही त्या मूल्यांचे संस्कार रुजवू पाहात असते. त्यात तिच्या आवडीनिवडी,घराचे हित, कुटुंबाचे हित,आपल्या सासरचे संस्कार,रितीरिवाज,
रुढी परंपरा, घरातील व्यक्तींचे स्वभाव,त्यांची प्रगल्भता इत्यादी अनेक गोष्टी विचारात घेऊन, ही स्त्री आपल्या घराच्या संस्कृतीला आकार देत असते.

    प्रत्येक गृहिणी मग ती पूर्णवेळ गृहिणी असो किंवा अर्थार्जनासाठी घरातलं सगळं आटोपून बाहेर पडणारी स्त्री असो, आपल्या घराची, संसाराची ती अनभिषिक्त सम्राज्ञी असतेच.

        आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये गृहिणीला गृहलक्ष्मीचा दर्जा दिला जातो. त्यामुळे तिचे अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहेच.प्रत्येक गृहिणी ही त्या त्या घरात घराला संस्कारांच्या कोंदणात बसवून आकाराला आणते  त्यावेळी ती आपल्या घराचा आत्मा कधी बनते! हे समजतही नाही. घरामध्ये सुख, शांती, आनंद, चैतन्य ठेवायचे असेल तर त्या घरची लक्ष्मी सदैव खूष आणि समाधानी वृत्ती बाळगत वावरणारी असावी.असं म्हटलं जातं ते खूपच खरं आहे.

   कुंभार ज्याप्रमाणे आपल्या चाकावर ओल्या मातीच्या गोळ्याला सुबक आकार देऊन त्यातून एखादे आकर्षक आकाराचे भांडे बनवतो,बनवत असतो तसेच घराच्या बाबतीतही आहे! प्रत्येक गृहिणी ही आपल्या स्वतःच्या घराला, त्यातील  माणसांना किंबहुना वस्तूंना, अन्नपदार्थांना,
स्वच्छतेला नी शिस्तीला तसेच नीटनेटकेपणाला जसं वळण लावेल,तसाच त्या घराचा तो स्वभाव बनत जातो. हळूहळू हा स्वभावच  त्या विशिष्ट घराची ओळख बनते. प्रत्येक घराची अशी ओळख बनवणं, घरावर चांगले संस्कार करणं, घरातील सदस्यांमध्ये सामंजस्य व समन्वयाचं वातावरण निर्माण करणं या सार्‍या गोष्टीत घरातल्या स्त्रीचाच सिंहाचा वाटा असतो. या साऱ्या संस्कारांनी युक्त बनलेलं घर हेच तर त्या घराचं 'घरपण' असतं. 

    म्हणूनच घराचं घरपण जपणारी ही गृहिणी म्हणजे, संसार रथाचे एक चाकच नव्हे,तर ती 'संसाररथाची सारथीच असते',असं म्हणावंसं वाटतं. घराला मंदिर बनवण्यासाठी अशी स्त्री कायम आटापिटा करते.

    आज धकाधकीच्या आयुष्यात आपले राहणीमान, शिक्षण, विविध आवश्यक गरजा पुरवण्यासाठी एकट्या पुरुषाची मिळकत तुटपुंजी पडू शकते. हा विचार करून गृहिणी घराबाहेर पडून,आपल्या बुद्धी चातुर्याच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या यशस्वीतेचा एक एक टप्पा पादाक्रांत करते आहे.पतीच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने किंवा,कधीकधी त्याच्यापेक्षा जास्तही योगदान देत संसारातील आर्थिक बाजू बळकट बनवण्याला प्राधान्य देत असते. देत आहे. त्यामूळे सहाजिकच आहे की पारंपरिक पद्धतीच्या पूर्ण वेळ गृहिणी प्रमाणे आधुनिक गृहिणी आपला पूर्णवेळ घरासाठी पूर्णपणे देऊ शकत नाही. तरीही घराच्या प्रत्येक क्षेत्रावर,प्रत्येक आघाडीवर लक्ष देऊन काळजीपूर्वक सारे प्रश्न, अडचणी मार्गी लावत असते.
   
      त्यासाठी घरातील इतर सदस्यांना आणि आपल्या मदतनीस स्त्रियांना वारंवार मार्गदर्शन करत असते. म्हणूनच कालमानाप्रमाणे घराच्या घरपणाच्या व्याख्येत बदल होताना दिसून येतोय.

    पण "घर" या संकल्पनेत मात्र बदल होणं अशक्य आहे.

    दिवसभराच्या धकाधकीतून बाहेर आल्यानंतर बौद्धिक मानसिक व शारीरिक थकवा घालवण्यासाठी प्रत्येक माणसाला सायंकाळी आठवण होते ती आपल्या घराचीच.

   विसाव्यासाठी घरात आले की घरातील वातावरण प्रसन्न हसतं खेळतं असावं, असं साऱ्यांनाच वाटतं.ते तसंच टिकवून ठेवणं हेच आपण जपलेलं घराचं "घरपण"होय. घरपण जपण्यात गृहिणीचा सिंहाचा वाटा असतोच असा उल्लेख आलेला आहेच ,तरीही तिला त्यासाठी समर्थपणे साथ लागते ती इतरही सदस्यांची.अशी साथ
 देण्याची वृत्ती घरातील इतर सदस्यांचीही असावयास हवीच.ही काळाची गरज बनली आहे हल्ली. अधुनिक पारंपारिक गृहिणीला निगुतीने संसार करायचा असतो. आपला संसार करत असताना तिला घरात हवं नको ते बघणं, ऋतुमानानुसार घरातील अन्नधान्याची योग्य पद्धतीने साठवण करून ठेवणं, घरातील सदस्यांची विविध प्रकारची वस्तूंची,कपड्यांची खरेदी करणं. प्रत्येकाच्या आवडीनुसार त्याला हवं-नको विचारणं, ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांच्या  औषधांचा स्टॉक बघणं आल्यागेल्याची विचारपूस, आल्या गेलेल्यांचा पाहुणचार करणं. त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधणं या गोष्टीही  बघायलाच लागतात तिला.

      गृहिणीला घराची अन्नपूर्णाही  बनावं लागतं.प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपून त्याप्रमाणे पदार्थ बनवण्यास प्राधान्य देणं,त्यातही पुन्हा सर्वंकष जीवनसत्त्व  असेल असा मेन्यू बनवणं .त्यासाठी लागणारी सामग्री वगैरे अनेक गोष्टी आवर्जून तिलाच आणावी लागतात. किंवा कुणाला तरी सांगून मागवून घ्यावी ‌लागतात. एवढेच नाही तर त्या साफ करणं,निवडणं, किंबहुणा घरगुती दही दूध तूप पनीर वगैरे गोष्टीही बनवणं तिच्याशिवाय केवळ अशक्य!

        खाऊचे पदार्थ सणावारांचा गोडाचा मेन्यू, देवपूजा सण-समारंभ तसंच उत्सवांचं सादरीकरण आणि साजरीकरण यांची रुपरेषा ठरवणं, विविध प्रकारची बीलं भरणं, बँक व्यवहार एक ना दोन कित्येक बारीक-सारीक गोष्टींकडे तिचं बारीक लक्ष असतं. ते स्वतः करणं किंवा करवून घेणं या दोन्हीही भूमिका तेवढ्याच महत्त्वाच्या.

     अन्नपूर्णेच्या महत्त्वाच्या भूमिकेबरोबरच आपल्या घरापुरता "इंटेरियर डेकोरेटर",हे पदही स्त्रीला निभवावं लागतंच.  घराची सजावट,फर्निचर त्यांची सुयोग्य मांडणी करणं,प्रत्येकाच्या सोयीनुसार त्यात,त्यांच्या रचनेत बदल करणं घराचे पडदे,चादरी या गोष्टींकडेही तिचं बारीक लक्ष असतचं.

      हे सर्व करताना या गृहिणीला, तिच्याशी असणाऱ्या इतर 
नात्यांची भूमिका सुद्धा तेवढीच महत्त्वाची वाटत असते.कारण एकदा विवाह बंधनात स्त्री अडकली की, लगेच ती निरनिराळ्या नात्यांत गुंफली जात असते.
    'गृहिणी' किंवा 'गृहलक्ष्मी' हे पद प्रमुख तर आहेच.त्या सोबत या ईतर नात्यांत समन्वय ठेवणंही तेवढंच गरजेचं मानते ती.
   
     गृहिणी किंवा गृहलक्ष्मी या प्रमुख भुमिकेबरोबरच  ती पत्नी, सून, आई, वहिनी, काकू,या आणि इतर अनेक नात्यां मध्येही गुंफत गेलेली ही गृहिणी नाती जपणं, त्यांना योग्य तो न्याय देणं हे सुद्धा महत्त्वाचं कर्तव्य तिचा संसार करताना तिला पार पडावं लागतं.

        या शिवाय घरात छोटी मुलं असतील तर, त्यांचं शाळा-कॉलेज, त्यांचा अभ्यास,त्यात मार्गदर्शन करणं या गोष्टी सुद्धा गृहिणीसाठी हल्ली फार महत्त्वाचं काम बनलं आहे.

       मुलांच्या शिक्षणाकडे, त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या संस्कारांकडे लक्ष ठेवणं,त्यांना घरातूनही योग्य संस्कार देणं,  त्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे बारीक लक्ष ठेवणं अशा आणखीही खूप काही गोष्टींकडे, स्त्रीही पूर्णवेळ गृहिणी असो किंवा नोकरी करणारी गृहिणी असली तरीही वर सांगितलेल्या सार्‍याच आघाड्यांवर तिला कायम तत्पर राहावं लागतंच. कारण तिचं घर,तिचा संसार, तिची माणसं ही सर्व तिचा 'आत्मा' असतात. त्यावर कधीही कोणतीही आच येऊ नये असाच तिचा कायम प्रयत्न असतो. 
    
    हे सर्व करत असताना आपले चार पैसे कुठे आणि कसे वाचतील याकडेही चांगलंच लक्ष असतंच तिचं. त्यामूळे घराचं 'घरपण' हे चार भिंतींनी बनत नाही किंवा टोलेजंग इमारतीवरही ते अवलंबून नसतं, तर ते त्या घरातील माणसांवर त्यांच्या संस्कारांवर, स्वभावावर त्या घरातील वातावरणावर, सुख-शांती-समाधान यांवर अवलंबून असतं. या साऱ्या घटकांनी मिळून युक्त असं घर बनवणं ही त्या घरातील गृहलक्ष्मी वर खूप मोठी जबाबदारी आणि तिची कला असते.ती आवडीनं ते निभावत असते. यासाठी तिला लागणारे सहकार्य मात्र घरातील इतर सदस्यांनी करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण घर हे सर्वांचचं असतं. त्याचा आर्थिक आणि मानसिक  मेंटनन्स घरातल्या सर्व सदस्यांवर अवलंबून असतं.
   
     खरं म्हणजे हेच तर घराचं घरपण असतं. एक वेळ घर छोटे असेल तरीही चालत,घरात श्रीमंती थाट नसेलही तरी चालतं पण समाधान हवंच.हे समाधान,प्रसन्नता,
आदरातीथ्य,विनयशील वृत्ती,परस्परां विषयीचा आदर या सर्व गोष्टी घराला मंदिराचं स्वरुप प्राप्त करुन देतात.  त्या घराचं असं घरपण कायम ठेवणं, ते जपणं ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि ते जिवापाड जपण्याचं काम त्या घरची गृहिणी लीलया पार पडते.
    
      मला वाटतं भारतीय कुटुंब व्यवस्थेचं हाच तर मुख्य गाभा आहे. घरपण जपलं तर कुटुंबव्यवस्था ही मजबूत होईल. पर्यायाने समाज आणि देशही. म्हणूनच या व्यवस्थेची मूलभूत अंग असणारी गृहिणीची भूमिका फार महत्त्वाची आहे. ओघानेच असं म्हटलं जातं, "ज्या घरातील गृहलक्ष्मी कायम प्रसन्न समाधानी असते, त्या घराचे घरपण कधीच लोप पावत नाही".

*नंदिनी म.देशपांडे*

विजया दशमी,
ऑक्टो.८,२०१९.

🌺🌺

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा