रविवार, १५ डिसेंबर, २०१९

#हुरडा पार्टी.

सामुहिक पणे हुरडा खावयास जाणे एक संस्कृती.

    मला आठवतं तसं माझ्या लहानपणापासून आम्ही सारे वाडा वासीय,बैलगाडीत बसून आमच्या शेतामध्ये दरवर्षी दोन वेळा तरी हुरडा खावयास जात होतोच....
एकदा डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान अगदी हिरवाग्गार कोवळा कोवळा हा हुरडा काय गोड लागायचा म्हणून सांगू....अहाहा!
  आजही चव रेंगाळली आहे त्या हुरड्याची म्हणूनच तर तो खाण्याची गोडी आणि आवड निर्माण झाली आम्हाला....
आणि दुसऱ्यांदा फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात....त्या वेळी आमच्या शेताजवळच असणाऱ्या तुरतपीराचा उरुस भरलेला असायचा....
   मग काय दिवसभर शेतात थोडा मोठा झालेला असायचा हा हुरडा, तरीही तो चवीने चाखत सोबत नेलेल्या दशम्या धपाट्यांवर ताव मारायचा....आणि सायंकाळी उरुसात फिरुन मजा करत घरी परतायचो आम्ही सगळे.....
  अहो, पण मी बोलतेय ज्या विषयी तो हुरडा म्हणजे शाळू ,टाळकी किंवा खास गुळभेंडी,मऊ या नावानं प्रसिद्ध असणाऱ्या ज्वारीच्या ओल्या कणसाला कोवळी दाणे धरलेली असतानाच गोवऱ्यांच्या निखाऱ्यांवर भाजून, हातावर चोळून त्यातून निघणारे कोवळे ज्वारीचे दाणे म्हणजेच हुरडा....
   खरं तर तो सामुहिकपणे एकत्र गप्पाष्टकां सोबत दशमी,धपाटे,दही,ठेचा,लोणचं,कांदा,गुळ, शेंगदाणे व तीळखोबऱ्याची चटणी असा खमंग जेवणाचा डबा सोबत नेऊन शेतामध्ये मोठ्या डेरेदार झाडाच्या सावलीत सतरंजीवर ऐसपैस बसून हा हुरडा खाण्यातली मज्जा काय वर्णावी!
  अगोदर हा डबा संपवायचा....मस्त गप्पागोष्टी करत,उभ्या पिकांना निरखत शेतात हुंदडून यायचे.... भरपूर फिरुन झाले की, छानपैकी विहिरीवरुन भरुन आणलेल्या ताज्या गार पाण्यानं तहान भागवयची....तो पर्यंत गड्यानं कोवळी ज्वारीची कणसं कापून आणलेली असायचीच....त्याचबरोबर ओल्या हरभऱ्याचा टहाळ,पेरु,वाळकं हिरव्या चिंचा,ऊस,आवळे असा सगळा रानमेवा जमवून ठेवलेला असायचाच....
मग काय भट्टी लागायलाच उशिर....सर्वच जण गरमागरम हुरडा खाण्यासाठी सरसावून बसलेले असायचेच...
घरुन सोबत आणलेल्या खमंग चटण्या,गुळ,दही
या बरोबर हुरड्याची चव चाखणं म्हणजे अक्षरशः मेजवानीच असायची....
या सोबतच मध्येच ओला हरभऱ्याची जुडी भट्टीवर पकडत भाजून घ्यायची,त्याला 'हुळा'म्हणतात हे आज खूप जणांना माहित नाहीए....त्याचाही आस्वाद घ्यायचा....काय चवदार लागतो तो हुळाही म्हणून सांगू!
तर अशी हुरडा खाण्यातली मजा,आज शहरात कितीही हुरडा पार्ट्या आयोजित केल्या अगदी भरमसाठ पैसै मोजून तरीही येत नाहीच....
   पण पूर्वापार चालत आलेली आपली हुरडा खाण्याची संस्कृती आजही टिकून आहे...हेही काही नसे कमी असं वाटतंयं....
   पूर्वि घरातली भरपूर कामं करुन थकून जाणाऱ्या स्त्रीयांना तेवढाच एक दिवस वनभोजनाचा विरंगुळा...थोडी निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती आणि स्नेहीजनांशी कुटुंबासमवेत हितगुज हे ही कारण असायचं या मागे....पण हल्ली आवड, फॅशन,चेंज,गेट टुगेदर अशा विविध  कारणांखाली आधुनिक हुरडा पार्टी आयोजित होत असते... सर्व रानमेव्या सह आजही हा हुरडा खाणं एन्जॉय करता येतो पण भरलेला खिसा घेऊनच जावं लागतं....तरीही पारंपारिक पध्दतीच्या त्या हुरडा पार्टीची सर काही येत नाहीच....
दुधाची तहान ताकावर भागवल्या सारखं वाटतं...पण तरीही आपण आपली संस्कृती टिकवून ठेवलीए हा आनंद मिळतो... हे पण खूप आहेच....
काळाप्रमाणे होत जाणारे बदल स्विकारणं, जुळवून घेणं ही निसर्गाबरोबरच माणसालाही मिळालेली एक देणगी आहे....तिला अनुसरुन का असेना पण आपण आजही आपली संस्कृती टिकवून आहोत हे महत्वाचे आहे होय ना!
मी प्रचंड प्रमाणात 'हुरडाभक्त'
आहे....एकदा खाऊन झालाय मैत्रीणींबरोबर आज जात आहे 'ह्यांच्या' बरोबर....आहे सध्या ताजा कोवळा घ्यावेत जीभेचे चोचले पुरवून.....तुम्ही केंव्हा जाताय मग हुरडा पार्टीला....? 
    आणि हो,हा हिरवा हुरडा सुकवून त्याची उसळ,खीर हे पदार्थही बनवता येतात बरं का...तेही तेवढेच चविष्ट लागतात !! ‌तर करा मग या सिझनची हुरडा पार्टी एन्जॉय !!

😊

©
*नंदिनी म.देशपांडे.*

🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा