.*महालय (पितृपक्ष)*
"ऐक ना, आई गं मला घागरा ओढणी घ्यायचीए बरं का? चौकात एक्झिबिशन हॉल मध्ये एवढे छान प्रदर्शन लागले ना!आपण जाऊ या उद्या..."
"नाही, अजिबात नाही.... आणखी पाच-सहा दिवस, म्हणजे घटस्थापनेच्या दिवसा पर्यंत कोणतीही खरेदी नाही, कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात नाही किंवा शुभ कार्य वर्ज्य आहे... नंतरच बघू या....."
अगं पण का? ते दोनच दिवस आहे एक्झिबिशन...."
" नाही, सध्या पितृपक्ष चालू आहे, तो संपेपर्यंत नाहीच....".
सध्या घरोघरी मोठी माणसं व मुलं यांच्यात काहीसे असेच संवाद थोड्याफार फरकाने चालू असावेत, असे लक्षात येते....तरी हल्ली अगदी काटेकोरपणे पितृपक्ष पाळला जात असेल असेही नाही....पण काही प्रमाणात मात्र त्याच्या मर्यादांचे पालन केलेच जाते....
'महालय'म्हणजे पितृ पंधरवडा, पितृपक्ष.... पन्नाशीत साठीत आलेली पिढी आजही ह्या गोष्टी काही प्रमाणात का असेना, पण पाळताना दिसतात.... खरं म्हणजे, हे पंधरा दिवस निषिद्ध का मानले जातात? यांची पारंपारिक कारणं, जर आजच्या तरुणाईला आपण व्यवस्थित समजावून सांगितली, तर ही मुलं त्यांच्या आई-वडिलांना अक्षरशः वेड्यात काढतील.... स्वर्गस्थ झालेल्या पितरांचे पोट जमिनीवरच्या लोकांना,केवळ एक दिवस विधिवत जेवू घालण्याने भरते ...आणि त्यांच्या माध्यमातून स्वर्गस्थ लोकांना ,त्यांच्या आत्म्यांना तृप्त केले जाते.... म्हणजे शुद्ध फोलपणाच.... हे खरं म्हणजे आपल्यालाही पटत चाललेय हल्ली....पण, लहानपणापासून वर्षानुवर्षे आपल्या मनामध्ये आणि प्रत्यक्ष कृतीमधून रुजवलेले हे संस्कार, ही विचारधारा त्यामागचा हेतू आणि पूर्वजांशी असणारी आपली बांधिलकी या सर्व गोष्टींचा पगडा नाही म्हटलं तरी आजही बाळगून आहोत आपण.... आताशी थोडा सैल होत चालला आहे तोे.... पण आपल्या मनावर त्यांचा प्रभाव शिल्लक आहेच,आणखीणही.... त्यातील कर्मठपणा बर्याच अंशी कमी झालाय....हे मात्र मान्यच करावे लागते....
यानंतरच्या पिढ्यांना एवढे पूर्वजही नसतील....त्यांची फार वंशावळही फार मोठी नसेल.... नव्हे,त्यांना ती माहीतही असेल की नाही कोण जाणे?... आणि या मुलांजवळ या सार्या गोष्टींसाठी द्यावयास वेळ तर अजिबातच नसेल....
हल्लीच्या तरुणाईच्या पालकांनी घरातील ज्येष्ठांना, वृद्धांना सन्मानाची वागणूक देत, आपला दिवसभरातला थोडातरी वेळ त्यांच्या समवेत घालवत, आणि त्यांच्याशी काहीवेळ तरी संवाद साधत त्यांच्या सहवासात घालावा.... तसेच आपल्या ऐपतीनुसार, आई वडील यांना,त्यांच्या तरुणपणात स्वतःसाठी पूर्ण न करता आलेल्या मौजेच्या बाबींची, जमेल तशी पूर्तता करणे....धार्मिक सहली त्यांच्या साठी घडवून आणणे.... सर्व कुटुंबाने एकत्रित वेळ घालवून....जेष्ठांशी संवाद साधत, त्यांना आनंद युक्त समाधान द्यावं.... जेणेकरून त्यांच्या तरुणपणात आपल्या साठी त्यांनी केलेल्या श्रमाचे, तडजोडीचे साफल्य त्यांच्या हयातीतच त्यांना बघावयास मिळावे... असा योग उपलब्ध करून द्यावा..... या पेक्षा चांगली कृती आणखी काय असू शकते?.... जेष्ठांच्या हयातीतच त्यांची आपण केलेली सेवा,त्यातून त्यांना मिळणारं समाधान, आनंद, त्यांचा आदर या सर्व गोष्टी तरुणाईला अनुकरणीय निश्चितच होतील.....आपल्या अशा वागण्यातून समाजात एक चांगला विचार, चांगला दृष्टीकोण निर्माण होईल यात वादच नाही..... आपल्या पिढीमध्ये असणारी,काही प्रमाणात शिल्लक राहिलेली भावनाशील वृत्ती,आता पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित होईल असे काम आपण....करणे हिच मला वाटतं आपल्या स्वर्गस्थ पितरांसाठी आणि हयात असणाऱ्या ज्येष्ठांसाठी, वृद्धांसाठी वाहिलेल्या शुभेच्छा ठराव्यात....अशा प्रकारच्या प्रत्यक्ष शुभेच्छांमूळे याच जन्मी समाधानाने त्यांचे पोट भरावे, आत्मा तृप्त व्हावा.... एवढे घडून आले तरीही खूप.... असे मला वाटतं...
©
*नंदिनी म. देशपांडे.*
सप्टें,२५,२०१९.
✳✳✳✳✳✳
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा